नाहीच जमत बुवा काही गोष्टी!

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
20 Mar 2009 - 2:39 pm

मी खरं तर (यावरून काही अंदाज बांधता येतोय का?) विद्युत अभियांत्रिकीमध्ये एका बर्‍यापैकी नावाजलेल्या शासकीय महाविद्यालयातून (पुण्याचे नव्हे!) पदवी प्राप्त केलेला अभियंता आहे. पदवी मिळवून आता नऊ वर्षे होत आलीत. त्यानंतर त्याकाळच्या शिरस्त्याप्रमाणे इकडे-तिकडे फुटकळ उमेदवारी करून मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एका अत्यंत निरुपद्रवी आणि जिथे तांत्रिक गोष्टींचा अगदी कमी संबंध येतो अशा परंतु डोक्याचा भुगा करणार्‍या कार्यक्षेत्रात घुसलो. आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम सुरू करून मला पाच वर्षे झालीत. तसं माझं संगणकाच्या किंवा संगणकप्रणाली विकसित करण्याच्या तांत्रिक अंगांचं ज्ञान अगदीच नगण्य आहे.

अभियांत्रिकीला प्रवेश घेतल्यापासूनच मला अशी शंका होती की आपल्याला तंत्रज्ञानात गती नाही. अभियांत्रिकीच्या चार वर्षात ही गोष्ट प्रकर्षाने समोर आली. विद्युत अभियांत्रिकी मधले निरनिराळे नियम, सूत्रे मला खूप छळत असत. पॉवर फॅक्टर ही काय भानगड आहे, तो कमी-जास्त झाल्याने आपल्याला काय फरक पडतो, ट्रांन्स्फॉर्मर ही काय चीज आहे, ही चीज व्होल्टेज कमी-जास्त कशी काय करू शकते, मुळात व्होल्टेज काय आणि का असते, व्होल्टेज असतेच तर करंट, एनर्जी इत्यादी सगळे एकाच ठिकाणी सुखेनैव कसे नांदत असतात, इंडक्शन मोटर हे यंत्र फिरते कसे या व अशा अनेक अनाकलनीय गूढकथा मला कधीच उलगडल्या नाहीत. मोठमोठाल्या सर्किट आकृत्या काढून त्यातून वीज कुठून, कुठे, किती वाहते या प्रकारच्या गणितांनी माझ्या मेंदूमध्ये शॉर्ट सर्किट होत असे. नंतर हळू-हळू माझा विद्युत अभियांत्रिकीशी संबंध संपुष्टात आला.

पण प्रत्यक्ष आयुष्यातदेखील मला कधी जास्त खोलात शिरायला लावणारे घरगुती उपकरणांमधले किरकोळ बिघाड रुचले नाहीत. फारतर ट्युबलाईटचा स्टार्टर बदलणे मी समजू शकतो पण लगेच 'ट्युबलाईटला स्टार्टर का लागतो आणि ती पेटल्यानंतर जर तो काढून घेतला तरी ती विझत का नाही?' या बायकोने फेकलेल्या प्रश्नाला उत्तर देणे म्हणजे जरा मेंदूला जास्तच कामाला लावण्यासारखे वाटते. नेमके त्याचवेळेस गॅसवर ठेवलेले दूध उतू जात असेल तर आरडाओरडा करून उत्तर टाळणे मात्र मला झकास जमत आलेले आहे. :-) परवाच घरातला मिक्सर अचानक बंद पडला. बायको तणतणत माझ्याकडे आली. तिने मिक्सर बंद पडलाय असे सांगीतल्यावर माझी दातखिळी बसली. "बघ पुन्हा लावून किंवा थोडा लोड कमी कर, होईल सुरू" असं बोलून मी तिला कटवलं. पण कान तिकडेच होते. मिक्सरचा आवाज आला असता तर मला आवाज फुटायचे चान्सेस होते; अन्यथा काहीतरी करावे लागणार होते. थोड्या वेळाने बायको परत माझ्या अभियांत्रिकी ज्ञानाचा उद्धार करत आली. आता काय करावे? ती म्हणाली "उघडून बघा, एखादी वायर सटकली असेल." आता आली का पंचाईत. मी मोठ्या अनिच्छेने उठलो आणि जवळपास कुठले दुकान आहे का हे आठवू लागलो. तेवढ्यात माझे बाबा आले आणि त्यांनी मिक्सरच्या खालच्या बाजूला असलेल्या एका बटणाला दाबून मिक्सर पुन्हा सुरू करून बघण्यास सांगीतले. बाबा अशा बाबतीत एक्स्पर्ट आहेत. रुढ अर्थाने तांत्रिक विषयांचे कुठलेच ज्ञान नसतांना केवळ जिज्ञासेच्या बळावर ते अशा बर्‍याच गोष्टी करू शकतात ज्यांचा मी अभियंता असूनदेखील विचार देखील करू शकत नाही. शरमेची बाब आहे खरे पण आता काय करणार? :-) बायकोने ते बटण दाबले आणि मिक्सर सुरू झाले.

बरेच दिवस झाले माझ्याकडचे वायरलेस इंटरनेट कनेक्शन चालत नव्हते. मी कनेक्ट करायला सुरुवात केली की काहीतरी निरोप दाखवून माझा लॅपटॉप रडवेल्या बाळासारखा माझ्याकडे बघत बसे. दरवेळी मी बायकोवर चिडून लॅपटॉप बंद करून टीव्ही बघत बसे. परवा संध्याकाळी मात्र मला कहीतरी महत्वाच्या कामासाठी इंटरनेट लागणारच होते. पुन्हा सगळे तेच घडले. आता काय करावे. मी सगळे निरोप वाचले; निरोप कळले पण हा प्रश्न सोडवायचा कसा ते काही कळत नव्हते. तसाच तणतणत मी झोपलो आणि बायकोला सकाळी ग्राहक केंद्राला फोन करून ही अडचण सोडवून घ्यायला सांगीतले. मी सकाळी ऑफीसला निघून गेलो. सकाळी ११ वाजल्यापासून बायको ग्राहक केंद्राला फोन करायला लागली. ग्राहक केंद्रच ते, तिथे कुठला ग्राहकाला मान? बर्‍याच वेळाने एका माणसाने फोन उचलला. बायकोने त्याला सगळे सांगीतले. त्याने काहीतरी अगम्य खिडक्या उघडायला लावून शेवटी मोडेम आणि लॅपटॉप त्यांच्या नजीकच्या केंद्रात आणायला सांगीतले. तिने हा वृत्त्तांत मला फोनवरून सांगीतला. मग मी एकदा फोन केल्यावर त्याने पहिलाच प्रश्न केला, "तुमच्या लॅपटॉपवर विष्ठा आहे का?". मी जरा चक्रावलो. मला वाटलं कबूतर वगैरे असतात बरेच खिडकीजवळ, एखाद्या कबूतराला काहीतरी नवीन वाटलं असेल म्हणून त्याने हलकं केलं असेल पोट. पण त्याचा इंटरनेट सुरू न होण्याशी काय संबंध? मी भाबडेपणाने प्रश्न विचारला. "वा असं कसं? विष्ठाचं जरा वेगळं आहे सगळं. आम्हाला फारसं काही नाही येत त्यातलं." मग माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की या महान माणसाला व्हिस्टा म्हणायच आहे. मी लगबगीने हो म्हणालो. तो म्हणाला की मिसेसना पाठवा केंद्रावर. जवळच असल्याने मी बायकोला लगेच जायला सांगीतले. मग तिथे पोहोचल्यावर तिने मला फोन केला.

"यांनी इथे सगळं तपासलं, ते म्हणतायत की लाईन मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. लॅपटॉपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे."
"मग त्यांना बघायला सांग ना."
"त्यांनी खूप प्रयत्न केला पण त्यांना काहीच कळत नाहीये. ते म्हणतायत की त्यांना लॅपटॉप हाताळण्याचा आणि व्हिस्टाचा काही अनुभव नाहीये."
"थांब जरा, माझा मित्र सचिन आहे इथे. त्याच्याशी बोल. त्याला कळतं त्यातलं."

"हॅलो सचिन"
"तुम्हाला वायरलेस बटन दिसतय का कुठल्यातरी कोपर्‍यात? ते डिसेबल झालं असेल"
"नाही दिसत आहे. इथे व्हॉल्युमचा आहे पण वायरलेसचं नाहीये."
"कंट्रोल पॅनलमध्ये जा आणि नेटवर्क कनेक्शन्स मध्ये जाऊन राईट क्लिक करा...केलं का? काय येतय?"
"होत नाहीये. ते राईट क्लिक केल्यावर गायब होतय."
"बरं, रिस्टार्ट करून बघा."
"केलं, पुन्हा तेच."
"ते मग पर्सनली बघावं लागेल. समीर घेऊन येईल लॅपटॉप माझ्याकडे, मग मी बघतो"

सचिनने फोन माझ्याकडे दिला.

"हॅलो"
"काय गं, नाही जमत आहे का?"
"नाही. मी थकले. १-१.५ तास झाला आम्ही इथे प्रयत्न करतोय."
"जाऊ दे, तू जा घरी. मी शनिवारी सचिनकडे जाऊन करून घेईल" (इथेही मी आल्यावर बघतो वगैरे निघालं नाही माझ्या तोंडून, शाप आहे, दुसरं काय? २० किलोमीटर मी सचिनकडे घेऊन जायला तयार होतो पण स्वतः प्रयत्न करायला फारसा उत्सुक नव्हतो. दैव, दुसरं काय?)

थोड्या वेळाने मी घरी पोहोचलो आणि काय सुचलं कोणास ठाऊक, मी लॅपटॉप काढला. आता मोडेमचं फोनशी आणि पॉवरशी पुन्हा कनेक्शन करणे हे एक दिव्य होते. बायको सगळं घेऊन गेली होती ना. बराच वेळ झटापट करून आणि सगळ्या वायरींची सगळी टोके उपलब्ध असलेल्या सगळ्या छिद्रांमध्ये घालून बघून शेवटी एकदाचं नीट कनेक्शन करण्यात.......बायको यशस्वी झाली. मी जे जे सुचवलं ते बहुधा सगळं चुकीचं निघालं. बायकोचा देखील तांत्रिक गोष्टींशी दुरून-दुरूनही संबंध नाही. पण शेवटी म्हणतात ना की सगळ्याच प्रकारच्या बुद्धी सगळ्यांकडे असतातच असं नाही. (असं कुणी म्हटलय काय माहित!). आता मोडेमचे लुकलुकणारे दिवे लागले होते. इन्स्टाल करून देणार्‍या माणसाने जसे सांगीतले होते तसेच ते लागले होते म्हटल्यावर काही चिंता नव्हती. आता मुख्य प्रश्न होता इंटरनेट सुरु होण्याचा. पुन्हा १-१.५ तास सत्राशे साठ प्रकारच्या खिडक्या उघडून मी प्रयत्न करून पाहिला पण काही उपयोग होत नव्हता. सतत काहीतरी कुठेतरी अडतय या आशयाच्या खिडक्या येत होत्या पण पुढे काहीच होत नव्हतं. बरं वायर जोडून इंटरनेट वापरायचं म्हटलं तरी पुन्हा ते सेटिंग बदलणे आणि वायरलेस सुरु झाल्यावर पुन्हा बदलून घेणे या जरा भीतीदायक गोष्टी होत्या. मी पुन्हा-पुन्हा स्क्रीनच्या उजव्या कोपर्‍यात काही दिसतय का ते बघत होतो. बर्‍याच उलाढाली केल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मॅन्युअल बघायला पाहिजे. मॅन्युअलमध्ये मी सरळ इंडेक्समध्ये जाऊन वायरलेस शोधले. तिथे पण बटणाचा उल्लेख होता. बर्‍याचदा कॉम्प्युटरवर क्लिक करण्यासाठी असलेल्या कळांना बटन म्हणतात. मी तसे बटन शोधत होतो. पण मॅन्युअल बघितल्यावर मला अशी शंका यायला लागली की हे कुठलेतरी बाहेरचे बटन असावे. सगळा लॅपटॉप उलटा-पालटा करून शेवटी मला एक बटन आणि त्याच्याजवळ असलेले वायरलेसचे चिन्ह दिसले. ते मी उजवीकडे सरकवले आणि काय आश्चर्य, वायरलेस डिसेबल्डच्या जवळचा लाल ठिपका हिरवा झाला आणि डिसेबल्डच्या जागी कनेक्टेड की इनेबल्ड असे काहीतरी झळकले. मी टुणकन उडी मारली आणि इंटरनेट जोडून बघितले आणि क्षणार्धात वेबसाईट सुरु झाली. एका क्षुल्लक गोष्टीचे ज्ञान नसल्याने कितीतरी लोकांनी किती वेळ यात घालवला होता. यापुढे आता नीट लक्ष देऊन काही रोजच्या उपयोगात येऊ शकणार्‍या तांत्रिक गोष्टींचे ज्ञान वाढविण्याचा मी विडा उचलला आहे. कालच आऊटलूक स्वतः कॉन्फिगर करून मी श्रीगणेशा केलेला आहे. :) बघू किती टिकतोय उत्साह ते. :-)

तंत्रअनुभव

प्रतिक्रिया

दिपक's picture

20 Mar 2009 - 2:55 pm | दिपक

यापुढे आता नीट लक्ष देऊन काही रोजच्या उपयोगात येऊ शकणार्‍या तांत्रिक गोष्टींचे ज्ञान वाढविण्याचा मी विडा उचलला आहे.
शुभेच्छा! :)

समीरसूर's picture

23 Mar 2009 - 10:33 am | समीरसूर

धन्यवाद, दिपक. :-)

--समीर

निखिलराव's picture

20 Mar 2009 - 2:58 pm | निखिलराव

.........

अमोल नागपूरकर's picture

20 Mar 2009 - 3:10 pm | अमोल नागपूरकर

लेख आवडला. मीसुद्धा तुमच्यासारखाच एक विद्युत अभियन्ता आहे. आणि माझी सुद्ध परिस्थिती तुमच्यासारखीच आहे !!!!!!!
केवळ एखाद्या विषयात पदवी घेतली कि त्याच्यात आवड निर्माण होते किंवा त्यातील कळते असे नाही. तुमची उपजत आवड आणि त्या विषयातील अनुभव हे महत्वाचे असतात.

गोमट्या's picture

20 Mar 2009 - 4:03 pm | गोमट्या

मीसुद्धा तुमच्यासारखाच एक विद्युत अभियन्ता आहे. आणि माझी सुद्ध परिस्थिती तुमच्यासारखीच आहे !!!!!!!

असे वाटत होते मीच माझ्यावरच लिहलेला लेख आहे..

(विद्युत चा 'वि' पण अजुनहि माहित नसलेला पण आता आय टी मधे निभावुन गेलेला) गोमट्या

केदार_जपान's picture

23 Mar 2009 - 6:50 am | केदार_जपान

अहो मी पण तुमच्यातलाच एक!!.... :) आणी तो पण एका नावज्लेल्या शासकिय अभियांत्रिकी कॉलेज मधुन पास्स आउट ;)
(आणी तेही पुण्याचे नाही... ;)) खरोखर अगदी जनातले-मनातले छानच लिहिले आहे...

बर्‍याच वर्षानी, पॉवर फॅक्टर (आम्हाला तर सध्या फक्त पवार फॅक्टर च आठवतो), मोटर्स, ट्रांस्फॉर्मर्स असले शब्द कानी पडले..
सगळ्यात गोची केव्हा व्ह्यायची जेव्हा कोणि एलेक्ट्रिशियन अमच्याकडे दुरुस्तीला यायचा...आणि सग्ळ्या घरच्यांच्या देखत आमची होती नव्हती तेवढी काढायचा...मग तो येणार असला की आम्ही घरातुन ९२११...आणि मग नंतर घरत येउन एलेक्ट्रिशियन ला शिव्या द्यायच्या... :)

असो...आलिया आयटी सी असावे सादर...
---------------------------------
केदार जोशी

समीरसूर's picture

23 Mar 2009 - 10:36 am | समीरसूर

धन्यवाद.
अगदी असंच आमच्याकडे व्हायचं. बाबांना वाटायचे की पोराला प्रत्यक्ष ज्ञान मिळायला हवे विद्युत अभियांत्रिकीचे. मग ते इलेक्ट्रीशियनच्या हाताखाली काम करायला लावायचे; पण मी हळूच सटकत असे. :-)

--समीर

समीरसूर's picture

23 Mar 2009 - 10:39 am | समीरसूर

धन्यवाद, अमोल आणि गोमट्या.
अगदीच न आवडणार्‍या विषयात प्राविण्य मिळवणे ही फारच कठीण गोष्ट आहे. त्यात वेळ, शक्ती खर्च करण्यापेक्षा आवडणार्‍या विषयात प्राविण्य संपादन करून खूप नेत्रदीपक कामगिरी करता येण्याच्या संधी खूप असतात.

--समीर

अमोल नागपूरकर's picture

23 Mar 2009 - 11:17 am | अमोल नागपूरकर

१०० % सहमत. लोकान्ना extraordinary वाटत असलेल्या एखाद्या विषयात ordinary प्रावीण्य मिळवण्यापेक्षा लोकान्ना ordinary वाटत असलेल्या पण आपल्या आवडीच्या एखाद्या विषयात extraordinary प्रावीण्य मिळवणे जास्त चांगले असते.

श्रावण मोडक's picture

20 Mar 2009 - 3:25 pm | श्रावण मोडक

मस्त लेख. हळूच हसवणारा.
विस्टा आणि विष्ठा! अगायायाया. त्या गृहस्थाचं अभिनंदन करावं का? विस्टाचा अनुभव असणाऱ्यांनी बोलावं.

छोटा डॉन's picture

20 Mar 2009 - 4:24 pm | छोटा डॉन

>>मस्त लेख. हळूच हसवणारा.
असेच म्हणतो.
एकदम खुसखुषीत लेखन, लेख आवडला ...

बाकी तुर्तास आम्ही "व्हिस्टा ( च्यायला ह्या शब्दाची इतकी विडंबने वाचली की मुळ शब्द विस्मॄतीत चालला आहे ;) ) " ह्या ओएस (मराठी शब्द ?) च्या चक्क प्रेमात पडलो असल्याने ते सोडुन बाकी सर्वांशी सहमत ...
असेच अजुन येऊद्यात ...

------
( व्हिस्टाच्या स्तुतीच्या बदल्यात मासॉकडुन डॉलर मोजणारा )छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

आनंदयात्री's picture

23 Mar 2009 - 11:02 am | आनंदयात्री

असेच म्हणतो. सहमत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Mar 2009 - 11:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

छो.डॉ आणि आनंदयात्रीसाहेबांशी असहमत.

व्हिस्टा घेण्याची सक्ती झालेल्या काही कमनशीबी लोकांमधली मी! त्या व्हिस्टात काय, कुठे आहे हे माझ्यासारख्या दिवसाला २५ तास संगणक वापरणार्‍या लोकांना कळत नव्हतं. फिक्स्ड आय.पी. कसा टाकायचा हे शोधायला मला पंधरा मिनिटं लागली. कालच एका पार्टीशनवर कुबुंटू ९.०४ टाकलं, आणि कसं अगदी मस्त, सुरळीत सुरू आहे. अंमळ चुकल्याचुकल्यासारखंच वाटलं. गेल्या वर्षभरात विण्डोज फक्त लोकांकडे गेले की वापरावं लागतं तेवढाच संबंध उरलेला आहे. आणि आयुष्य बाळू घाटे (बिल गेट्स हो!) शिवायच किती सुंदर आहे या प्रत्यय येतोय.

समीरसूर, लेख आवडला. मला एकदम मागे एकदा एका नव्या, छोट्या ट्यूबची विद्युतजोडणी केली होती त्याची आठवण झाली. शॉकची खूण अजूनही तळहातावर आहे! :-D

(भौतिकशास्त्रातली पदवीधर) अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

सुमीत's picture

20 Mar 2009 - 3:30 pm | सुमीत

अनुभव कथन आवडले, पण खरे सांगतो आयटी च्या गोष्टी इतक्या काही जंजाळ नसतात.
पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे बुद्धी चा फरक ही असतोच.
माझे न्युरो सर्जन काका संगणक विषयात (PC Harware/Software) माझ्या बहिणी पेक्षा ( बी ई आय टी) प्रवीण आहेत. ह्या मध्ये आवड हीच महत्वाची गोष्ट आहे.

समीरसूर's picture

23 Mar 2009 - 10:42 am | समीरसूर

आवड हा मुद्दा फार महत्वाचा आहे. माझा एक मित्र बी. कॉम आहे पण तो नेटवर्किंगच्या क्षेत्रात निष्णात आहे आणि एका खूप मोठ्या कंपनीत काम करतो. त्याचा अकाऊंटींग, बुककीपिंग, टॅली, ऑडीट इत्यादींशी आता काडीमात्रही संबंध राहिलेला नाही. :-)

धन्यवाद,
समीर

चिरोटा's picture

20 Mar 2009 - 3:43 pm | चिरोटा

एका क्षुल्लक गोष्टीचे ज्ञान नसल्याने कितीतरी लोकांनी किती वेळ यात घालवला होता

आय्.टी. मध्ये हीच समस्या असते.दुसरे म्हणजे ह्या बर्याच्श्या बारिक सारिक गोष्टी सवयिने येतात.(तुमच्या विद्युत अभियांत्रिकीचे तसे नाही.त्यासाठी 'फन्डे' चान्गलेच असावे लागतात.)

तसं माझं संगणकाच्या किंवा संगणकप्रणाली विकसित करण्याच्या तांत्रिक अंगांचं ज्ञान अगदीच नगण्य आहे.

पाच वर्षे तसा फार काळ नाही.माय्क्रोसॉफ्ट्/याहू वगैरे मध्ये १५/२० वर्षे अनुभव असलेले कर्मचारी संगणकप्रणाली विकसित करतात.आवड निर्माण करण्यासाठी खालील उपाय करता येतिल:
१)आय्.टी. मधिल विविध शाखा- architecture/नविन विकसित होणार्या भाशा सम्बन्धित ब्लॉग्स वाचणे.
२)तुमच्या क्षेत्रातिल सम्बन्धित नियत्कालिके वाचणे.
-----
भेन्डि(बेन्गळुरु)

समीरसूर's picture

23 Mar 2009 - 10:45 am | समीरसूर

विद्युत अभियांत्रिकीच्या मूळ तत्वांचे नीट आकलन होणे खूप गरजेचे असते. आयटीमध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस समोर असल्याने खूपशा गोष्टी सुलभ होतात. अर्थात प्रोग्रामिंगमध्ये तर्कशुद्ध विचार करता येणे ही आवश्यक असते.

धन्यवाद,
समीर

मराठी_माणूस's picture

23 Mar 2009 - 11:00 am | मराठी_माणूस

अर्थात प्रोग्रामिंगमध्ये तर्कशुद्ध विचार करता येणे ही आवश्यक असते
सगळे अभियंते तर्कशुद्ध विचार करतात का ? कारण सॉफ्टवेअर कं. भरती करताना कीमान पात्रता अभियंता अशी असते

चिरोटा's picture

23 Mar 2009 - 12:39 pm | चिरोटा

सगळे अभियंते तर्कशुद्ध विचार करतात का?

नाही.पण त्यानी तसा तो करावा अशी अपेक्षा असते.माझ्या अनुभवात मी सर्व प्रकारचे लोक बघितले-काही खुप हुशार तर काही 'हा माणूस ह्या ठिकाणी पोचलाच कसा?"असा प्रश्न पडावा.शेवटी तुम्ही इतरान्शी कसे वागता,जुळवुन घेता,कुठे बोलता,कुठे बोलत नाही (social intelligence) ह्यावर ही बरेच अवलम्बून असते.

निशिगंध's picture

20 Mar 2009 - 3:44 pm | निशिगंध

सुरेख लेख.

मनापासून आवडला..........

_______ निशिगंध

घाशीराम कोतवाल १.२'s picture

20 Mar 2009 - 3:44 pm | घाशीराम कोतवाल १.२

लोकायत.कॉमवर या आणि संगणकासंद्र्भातले प्रश्न विचारा आम्ही असतो तेथे पडिक
लोकांच्या प्रष्नाची उत्तरे द्यायला..
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

समीरसूर's picture

23 Mar 2009 - 10:47 am | समीरसूर

धन्यवाद, घाशीराम. आम्ही अवश्य प्रश्न विचारू. आमच्याकडे खूप प्रश्न असतातच. ;-)

धन्यवाद,
समीर

मोहन's picture

20 Mar 2009 - 3:46 pm | मोहन

लेखन शैली खुपचछान वाटली. बर्याच दिवसांनी चांगले विनोदी लेखन वाचायला मिळाले. धन्यवाद.
पु.ले.शु.

मोहन

सँडी's picture

20 Mar 2009 - 3:52 pm | सँडी

छान छान!

रम्या's picture

20 Mar 2009 - 4:10 pm | रम्या

छान, लिखाण आवडले.
आम्ही येथे पडीक असतो!

नितिन थत्ते's picture

20 Mar 2009 - 5:24 pm | नितिन थत्ते

लेखनशैली छान आणि खुसखुशीत.
मला असा अनुभव नाही.

आज एक नवीन शोध लागला.
इंजिनिअरिंगची आवड नसताना अभ्यास करून केवळ मार्क मिळाले म्हणून इंजिनिअरिंगला जाऊन नंतर तसेच पासही होता येते ही नवीन माहिती कळली. (इंजिनिअरिंगच्या शिक्षणपद्धतीत सुधारणा आवश्यक ;) )

खराटा
(रंग माझा वेगळा)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

20 Mar 2009 - 5:27 pm | घाशीराम कोतवाल १.२

=)) =)) =)) :W :W खराटाराव कधी बदल्ताय अभ्यासक्रम ;)
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

प्रामाणिक पणा पण आवडला.

पण काही गोष्टी खटकल्याच...

"..इंजिनिअरिंगची आवड नसताना अभ्यास करून केवळ मार्क मिळाले म्हणून इंजिनिअरिंगला जाऊन नंतर तसेच पासही होता येते ही नवीन माहिती कळल"....."

४ वर्ष एखाद्या विषयाला देवून त्यातले बेसिक्स ही जर समजत नसतील तर ती इंजिनियरींगची सिट फुकट गेली असं वाटतं.

आजकाल ईंजिनियरींग ला पास होणं काही अवघड राहिलं नाही आहे.
गेल्य ४-५ वर्षांचे पेपर चाळले आणि पी. एल. मधे प्रगती प्रकाशनचे सोल्युशनचे रट्टे मारले की पास होता येतं. अशी अनेक उदाहरण आमच्या वर्गात सुध्धा होती.

लहानसहान रिपेयरींग साठी इलेक्ट्रीशियनकडे जाणं मला थोडं अपमानास्पद वाटतं

समीरसूर's picture

23 Mar 2009 - 11:33 am | समीरसूर

धन्यवाद, एक.
आपले मत तसे बरोबर आहे पण बहुतांशी वेळेस आपल्याकडे १०-१२ वी मध्ये आवडीचा विचार कुणी करत नाही. मिळालेल्या मार्कांप्रमाणे कुठे प्रवेश घेतला तर चांगल्या नोकरीची शक्यता जास्त आहे हे बघून प्रवेश घेतला जातो. आज आयटीमध्ये काम करणार्‍या बहुतेक ७० ते ८०% लोकांचा त्यांच्या मूळ पदवीच्या शिक्षणाशी संबंध राहिलेला नाही. आणि अभियांत्रिकीची माझी सीट अगदीच वाया गेली असे नाही. त्या शिक्षणाचा मला सुरुवातीला ४ वर्षे उपयोग झालाच आणि शिवाय अजूनही होतोच आहे. माझ्या आताच्या कार्यक्षेत्रात मला माझ्या अभियांत्रिकीच्या शिक्षणाच्या बळावरच संधी मिळाली. अभियांत्रिकी शिक्षणादरम्यान शिकलेले कित्येक फंडे आज मला वापरता येतात. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर मिळालेल्या लॉजिकल थिंकिंग, अनॅलिटीकल स्किल्स इत्यादी कौशल्यांचा उपयोग मला नेहमीच होत आहे. कुठल्याही व्यावसायिक शिक्षणाची सीट अशी वाया जात नसते असे मला वाटते. ज्याला तिथे प्रवेश मिळू शकला त्याला तो मिळाला आणि त्याने ते शिक्षण पूर्ण केले एवढेच. मी तिथे प्रवेश नसता घेतला तर माझ्यासमोर औपचारिक शिक्षणाचे अगदी कमी संधी असलेले पर्याय उपलब्ध होते. अशा परिस्थितीमध्ये कुणीही सगळ्यात जास्त करीअरची संधी असणारा अभ्यासक्रम निवडून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार.

नुसते पेपर चाळून आणि प्रगतीची पुस्तके रट्टे मारून अभियांत्रिकी खचितच उत्तीर्ण होता येत नाही. हा फार मोठा गैरसमज आहे बाहेर. नुसतं पास होण्यासाठी देखील बेसिक्सच थोडंफार ज्ञान असणं आवश्यक आहे. गणित १, २, ३ आणि ग्राफिक्स, मायक्रोप्रोसेसर, स्विचगिअर, कंट्रोल सिस्टीम इत्यादी विषय कुठल्याही पुस्तकाचा निव्वळ रट्टा मारून पास नाही होता येणार. यात बुद्धीला चालना द्यावीच लागते आणि नीट अभ्यासही करावा लागतो. गणिताचे पेपर हे गणिते समजल्याशिवाय पास कसे होणार? नेटवर्क ऍनॅलिसिस या विषयात सराव करून गणिते सोडविता येतात, ती मागील पेपर चाळून सोडविता नाही येत. विषय नीट समजावून घ्यावा लागतो.

लहान सहान रीपेयरिंगसाठी इलेक्ट्रीशियनकडे जाणं आधी थोडं खटकायच पण आता आजिबात नाही. :-) अर्थात मी अगदीच सरसकट सगळ्याच कामांसाठी इलेक्ट्रीशियनकडे धाव घेत नाही आणि त्यात बेसिकली आळसाचा आणि कंटाळ्याचा भाग जास्त आहे असे मला वाटते. आजही घरात कुठे सिमेंट, वीटा, वाळू वगैरे वापरायचं काम असलं तर मी आवडीने करतो (हे देखील थोडंफार अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमातच शिकलो :-)) आणि तासंतास घालवतो पण इलेक्ट्रीकलचे काम असेल तर आळस येतो, कंटाळा येतो आणि मग ते काम टाळण्याचा प्रयत्न सुरू होतो. काम कदाचित सोपं ही असतं :-)

--समीर

समीरसूर's picture

23 Mar 2009 - 10:56 am | समीरसूर

म्हणजे अभियांत्रिकीमध्ये गणितात थोडी गती असणे आवश्यक असते. शिवाय आकलनक्षमता चांगली असेल तर जे वाचलय ते समजून घेऊन परीक्षेत लिहिता येणं फारसं अवघड नसतं. शेवटी आवड नसेल तर जे वाचलय ते परीक्षा झाल्यानंतर लगेच विसरण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि शेवटची परीक्षा संपेपर्यंत जे जे वाचलय, लिहिलय, समजलय ते ते सगळं सपाट होत जातं आणि निकालाच्या दिवशी अगदी ६५% गुण मिळाले आणि गुणपत्रिका हातात घेतल्यावर ताबडतोब रोहित्राच्या किंवा जनित्राच्या गणितीय समीकरणांची आठवण काढायचा प्रयत्न केला तर रुसलेल्या प्रेयसीप्रमाणे समीकरणे मेंदूपाशात येतच नाहीत. :-)

धन्यवाद,
समीर

चिरोटा's picture

23 Mar 2009 - 12:27 pm | चिरोटा

अभियांत्रिकीमध्ये गणितात थोडी गती असणे आवश्यक असते

सहमत्.आय्.टी. मध्ये पण मुलभूत सन्गणक प्रणाली(compiler,operating system,word processor,system software,भाषा वगैरे) बनवायची असेल तर गणिताच्या अनेक शाखान्चे ज्ञान आवश्यक असते.शिवाय सन्गणकाबरोबर 'काड्या' करण्याची सवय पाहिजेच.थोडासा दोष आपल्या शिक्षण पध्दतिकडेही जातो.
'उलट प्रश्न विचाराय्चे नाहीत्,जे अभ्यास्क्रमात आहे ते निमुट्पणे करायचे' ही भावना जायला हवी.

नितिन थत्ते's picture

20 Mar 2009 - 5:32 pm | नितिन थत्ते

अगोदरच अभ्यासक्रम बदलला असता तर माझं कसं झालं असतं? ;)

कोणी बदलला तरच बदलण्यात अर्थ आहे ,
कोणी बदलला तरच बदलण्यात अर्थ आहे ,
स्वता अभ्यासक्रम बदलायला मी काय मुर्ख आहे ??
=)) =)) =)) :D :D :D

खराटा
(रंग माझा वेगळा)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

20 Mar 2009 - 5:40 pm | घाशीराम कोतवाल १.२

आमचा आम्हाला परत __/\__
धन्य आहात

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

परिकथेतील राजकुमार's picture

20 Mar 2009 - 5:32 pm | परिकथेतील राजकुमार

स्वानुभव अगदी खुसखुषीत शैलीत मांडला आहे. मस्त वाटले वाचुन.
आपल्या पुढिल संकल्पाला आमच्या शुभेच्छा.

परा गेटस
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

ढ's picture

20 Mar 2009 - 5:43 pm |

असेच म्हणतो.

फार छान लिहिले आहे आपण.

शितल's picture

20 Mar 2009 - 7:33 pm | शितल

मस्त अनुभव कथन. :)

क्रान्ति's picture

20 Mar 2009 - 7:37 pm | क्रान्ति

व्हिस्टाची चक्क विष्ठा! परा, कस वाटल हे विडंबन?
खासच लेख!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्राजु's picture

23 Mar 2009 - 3:08 am | प्राजु

विष्ठा... जबरदस्तच!!!
समीर सूर... तुमचा लेखन सूर मात्र जबरदस्त लागला आहे. लगे रहो!!
जय हो!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शिवापा's picture

20 Mar 2009 - 7:52 pm | शिवापा

टेक्निकल प्रॉब्लेम? लढा अण्णा लढा!

टिउ's picture

20 Mar 2009 - 8:26 pm | टिउ

झकास जमलाय लेख...

बराच वेळ झटापट करून आणि सगळ्या वायरींची सगळी टोके उपलब्ध असलेल्या सगळ्या छिद्रांमध्ये घालून बघून शेवटी एकदाचं नीट कनेक्शन करण्यात...

हे वाचुन पहिल्यांदाच संगणक घेतला होता त्या वेळची आठवण झाली. संगणक एका खोलीतनं दुसर्या खोलीत हलवायचा होता. सगळ्या वायर फटाफट काढुन टाकल्या. लावतांना पंचाईत!

चतुरंग's picture

20 Mar 2009 - 10:52 pm | चतुरंग

समीरसूर ह्यांनी त्यांच्या रोजच्या जीवनातले अनुभव लिहून एका फार वेगळ्याच विषयाला हात घातला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!
एखादा अभ्यासक्रम आपण का स्वीकारतो ह्याची कारणे अनेक असतात. त्यापैकी १२वीला भरपूर मार्क्स म्हणजे इंजि. किंवा मेडिकल असे शिक्के बसतात.
फक्त काही ठराविक विषयातले मार्क्स आणि विद्यार्थ्याचा कल ह्याची सांगड घालणे अवघड असते.
१२वीतले मार्क्स हा बर्‍याचवेळा एक फार्स असतो असे पुढे जाऊन लक्षात येते. त्यातून तुमचा कल नसेल तर फारच वाईट अवस्था होते.
इंजिनियरिंग हा एक कल आहे. सामान्य ज्ञान, तर्कसंगत विचार, उत्तम निरीक्षण, प्रयोग करुन पहाण्याची आवड, विदा (डाटा) वरुन निष्कर्ष, दोष हुडकून काढण्याची हातोटी अशा काही मूलभूत बाबींवर आधारलेला हा अभ्यासक्रम आहे. इंजि.ची डीग्री मिळवणे म्हणजे ह्यातल्या प्रत्येक बाबीत अधिकाधिक प्रगल्भ होत जाणे हा मूळ उद्देश आहे/असायला हवा. शिकले/शिकवले जाणारे विषय हे त्या बाबी प्रगल्भ करण्याचे माध्यम असते.

ही बाब लक्षात न घेता केवळ मार्क मिळालेत म्हणून तिकडे जाणे हा सर्व गोष्टींचा व्यय ठरतो. एखादे वर्ष वाया गेले तरी चालेल पण मी हा अभ्यासक्रम करु शकणार नाही मला दुसरे काही करायचे आहे हा विचार आपल्याकडे करु दिला जात नाही. दुसरी वाट सापडणे, शोधणे अवघड होऊन बसते. त्याला पुढे नोकरी मिळेल की नाही, किंवा त्यातून धंदा करायचा असेल तर तशी वाट सापडेल की नाही अशा चक्रात मुले/मुली सापडतात. "काही नाही तर गेला बाजार काँप्यूटरचा कुठलातरी कोर्स करुन आय टीत घुसता येईल की रे? तिथे तर कुठल्या ब्रँचचा इंजि आहेस हे ही बघत नाहीत!!" असल्या कल्पना घेऊन जर पुढे जायचे असेल तर बाट बिकट होत जाते. फक्त पैसा हे उद्दिष्ट फार थोड्या काळचे समाधान देते. कामात आनंद नसला तर सगळे व्यर्थ आहे!

बदलण्याची जिद्द असेल आणि दुसरे काही करायचे असेल तर जेव्हा बदलायची संधी दिसते आहे तेव्हा बदला, तो ही फार उशीर नसेल. अन्यथा संपूर्ण करियर चुकीच्या वाटेने जात रहाणे मनाला आणि एकूण जगण्याला एक अस्वस्थतेची, बेचैनीची किनार देऊन जाते!

चतुरंग

नितिन थत्ते's picture

21 Mar 2009 - 10:20 am | नितिन थत्ते

चतुरंग यांच्याशी सहमत.

अवांतरः आजच्या लोकसत्तात एक इंटरेस्टिंग लेख आला आहे. http://www.loksatta.com/daily/20090321/ch09.htm

खराटा
(रंग माझा वेगळा)

चतुरंग's picture

21 Mar 2009 - 10:38 am | चतुरंग

लोकसत्तातला लेख मनोरंजक आहे!
दुव्याबद्दल धन्यवाद, खराटा! :)

चतुरंग

समीरसूर's picture

23 Mar 2009 - 11:47 am | समीरसूर

अगदी बरोबर चतुरंग. नेमका हाच विचार ९८% विद्यार्थी आणि त्यांचे पालक करतात. तसं पाहिलं तर त्यात काही खूप चुकीचं आहे असं मला वाटत नाही. प्रत्येकाला आपल्या आवडीच्या क्षेत्रात करीअर करता येईलच असे नाही. अशा वेळेस एखादा चांगला अभ्यासक्रम पाठीशी असणं बरं असतं. कित्येक विद्यार्थी आय ए एस करण्यासाठी बी. ए./एम. ए. करतात आणि अथक परिश्रमांनंतरही जर यश नाही मिळालं तर पुन्हा मागे वळून चांगल्या संधी मिळवण्यासाठी त्यांना खूप झगडावं लागतं कारण त्यांच्या पदवीला बाहेर तशा संधी कमी असतात आणि शिवाय शिक्षण संपल्यानंतरचा मोठा काळ त्यांनी प्रशासकीय परीक्षांच्या तयारीत घालवलेला असतो. माझा एक इंजिनीयर मित्र या परीक्षांची तयारी करत होत. तीन वर्षे प्रयत्न करून त्याला यश मिळाले नाही. त्याच्याकडे अभियांत्रिकीची पदवी असल्याने उशीरा का असेना पण त्याला सुरुवात करण्यात फारशी अडचण आली नाही. शिवाय आपल्या नावडत्या विषयात देखील अशी काही क्षेत्रे असतात ज्यात आपला कल असू शकतो आणि आपण त्या क्षेत्रातले ज्ञान वाढवून करीअर घडवू शकतो. जसं माझा एक मित्र विद्युत अभियंता असून तो एका कंपनीच्या परचेस विभागात काम करतो. उपकरणाची गरज, उपकरणांची स्पेसिफिकेशन्स, त्यांच्या किमती, त्यांचे फिचर्स, नवीन प्रगती, नावाजलेले ब्रँड्स इत्यादी गोष्टींचे ज्ञान त्याला खूप उपयोगात येते. इथे विद्युत अभियांत्रिकीच्या इतर बेसिक्सचा फारसा संबंध येत नाही. आपली आवड शोधणे आणि त्यानुरुप संधी शोधणे महत्वाचे. :-)

धन्यवाद,
समीर

प्रिया८'s picture

21 Mar 2009 - 1:07 am | प्रिया८

एखादा अभ्यासक्रम आपण का स्वीकारतो ह्याची कारणे अनेक असतात. त्यापैकी १२वीला भरपूर मार्क्स म्हणजे इंजि. किंवा मेडिकल असे शिक्के बसतात.
फक्त काही ठराविक विषयातले मार्क्स आणि विद्यार्थ्याचा कल ह्याची सांगड घालणे अवघड असते.
१२वीतले मार्क्स हा बर्‍याचवेळा एक फार्स असतो असे पुढे जाऊन लक्षात येते. त्यातून तुमचा कल नसेल तर फारच वाईट अवस्था होते.
...........
चतुरंग तुमच्याशी पुर्णपणे सहमत!!
१२ वी मधे पडलेल्या मार्क्सवरुन पुढे कश्यात करियर करायचे हे ठरवणे फार अवघड आहे. सगळ्यानाच या दिव्व्यातून जावे लागते.

आकाशस्थ's picture

22 Mar 2009 - 11:39 pm | आकाशस्थ

लेख मस्त खुसखुशित वाटला.

तू मला एक फोन केला असतास.....!!!!

समीरसूर's picture

23 Mar 2009 - 11:49 am | समीरसूर

तू गाढ झोपेत असशील त्यावेळेस. :-)

धन्यवाद,
समीर

लवंगी's picture

23 Mar 2009 - 6:55 am | लवंगी

माझा लेक ( वय ६ ) मी कार कंपनीत काम करत असुनसुद्धा मला कार बनवता येत नाही म्हंटल्यावर असाच तोडाचा आ वासुन ऊभा राहिलेला मला अजुन आठवतोय.

प्रकाश घाटपांडे's picture

23 Mar 2009 - 10:49 am | प्रकाश घाटपांडे

असे अनुभव आपल्याला व इतरांनाही समृद्ध करतात. अशीच "काड्या"करण्याची प्रवृत्ती अंगात असेल तर ज्ञान मिळते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

समीरसूर's picture

23 Mar 2009 - 11:52 am | समीरसूर

सगळ्यांच्या उत्साहवर्धक प्रतिक्रियांबद्दल शतशः धन्यवाद! :-)

--समीर