विडंबनः चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी

अविनाश ओगले's picture
अविनाश ओगले in जे न देखे रवी...
26 Jan 2008 - 1:57 pm

भातुकलीच्या खेळामधली... या कवितेचे विडंबन

(प्रा. विसुभाऊ बापट यांच्या "कुटुंब रंगलंय काव्यात" या कार्यक्रमाच्या १००१व्या प्रयोगानिमित्त आयोजित विडंबन स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त विडंबन... परीक्षक- यशवंत देव आणि शिरीष पै)

चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी
त्यांच्या तिथल्या संसाराची ऐका एक कहाणी

त्या राजाची खोली होती तिसर्‍या मजल्यावरती
जिने मोडके अंधारातून उंदीर झुरळे फिरती
लवकर उठती, आणिक भरती खालून वरती पाणी

त्या खोलीला एकच खिडकी आणि एकच दार
शेजार्‍यांना उत्सुकता या संसाराची फार
जाता येता हळू पाहतो डोकावूनही कोणी

नवेच होते लग्न आणखी खेळ नवा तो सारा
परि तेथल्या खिडकीमधूनी मुळी न येई वारा
झोप न येई, डास चावती, नव्हती मच्छरदाणी

त्या राजाचा पगार थोडा त्यात कसे भागावे?
राणीनेही समजून सारे काहीच ना मागावे
संध्याकाळी कुठे न फीरती, खिशात नसती नाणी

महिन्यामधले दिवस भासती सर्व सारखेची
त्या राजाला फक्त काळजी, एक तारखेची
"करा उधारी चुकती सारी" कालच वदला वाणी

चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी
सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी
डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी...

-अविनाश ओगले

विडंबनप्रकटन

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

26 Jan 2008 - 2:10 pm | विसोबा खेचर

नवेच होते लग्न आणखी खेळ नवा तो सारा
परि तेथल्या खिडकीमधूनी मुळी न येई वारा
झोप न येई, डास चावती, नव्हती मच्छरदाणी

क्या बात है ओगले साहेब! मस्तच...

"करा उधारी चुकती सारी" कालच वदला वाणी

ही ओळ जाम आवडली...:)

चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी
सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी
डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी...

विडंबन असूनही हृदयाला हात घालणारा वास्तवदर्शी शेवट! वा वा...

ओगले साहेब,

ख ल्ला स वि डं ब न!

आणि प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...

आपल्यासारखे, केशवासारखे उत्तम विडंबनकार मिपावर आहेत याचा मिपाला अभिमान वाटतो!...

अजूनही येऊ द्या...

केशवा, भातुकलीतील राजाराणीवर तुझ्याकडूनही येऊ देत काही ओळी! आम्ही वाट पाहात आहोत. घाई नाही, टेक युवर ओन टाईम..

आपला,
(भातुकलीतला राजा) तात्या.

नंदन's picture

26 Jan 2008 - 5:04 pm | नंदन

शेवटचे कडवे विशेष आवडले.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2008 - 7:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विडंबन जबराच आहे,

चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी
सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी
डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी...!!!

किती सुंदर !!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय's picture

26 Jan 2008 - 9:14 pm | धनंजय

मला वाटते की विडंबनात वास्तवाला भिडणारे काहीतरी असले (इथल्यासारखे) तरच ते इतके आवडू शकते - "वाहवा" चे "आहाहा" होऊ शकते.

प्राजु's picture

26 Jan 2008 - 9:32 pm | प्राजु

नवेच होते लग्न आणखी खेळ नवा तो सारा
परि तेथल्या खिडकीमधूनी मुळी न येई वारा
झोप न येई, डास चावती, नव्हती मच्छरदाणी

या ओळीतून खरंच चाळीतले चित्र उभे रहिले.

चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी
सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी
डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी...

एकदम छान.. आवडली.

- प्राजु

तळीराम's picture

26 Jan 2008 - 10:08 pm | तळीराम

त्या राजाचा पगार थोडा त्यात कसे भागावे?
राणीनेही समजून सारे काहीच ना मागावे
संध्याकाळी कुठे न फीरती, खिशात नसती नाणी

महिन्यामधले दिवस भासती सर्व सारखेची
त्या राजाला फक्त काळजी, एक तारखेची
"करा उधारी चुकती सारी" कालच वदला वाणी

आमचे अशाच एका चाळीत करपलेले तारुण्य आठवले... विनोद चांगला, पण साला डोळ्यातून पाणीच आलं एकदम.

इनोबा म्हणे's picture

27 Jan 2008 - 12:56 am | इनोबा म्हणे

ओगले साहेब तुमचे हे विडंबनही आम्ही यापुर्वीच ऑर्कुटवर वाचले आहे,बाकी हे विडंबन अगदी झकास जमले आहे.
आम्ही तुमची बरीचशी विडंबने वाचलेली आहेत बहूधा,तरीही मिपावासीयांकरिता अशीच आणखी काही येऊ द्या.

(राणीचा राजा) -इनोबा

बेसनलाडू's picture

27 Jan 2008 - 7:23 am | बेसनलाडू

विडंबन फार आवडले. बरेच दिवसांनी असे चांगले विडंबन वाचनात आले. आणखी येऊ द्यात.
(आस्वादक)बेसनलाडू

धोंडोपंत's picture

27 Jan 2008 - 2:47 pm | धोंडोपंत

पंत,

विडंबन झकास. अप्रतिम झालाय.

त्याला असलेली कारूण्याची झालर काळजात रुतली. बहोत बढिया |

आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सर्वसाक्षी's picture

28 Jan 2008 - 5:36 pm | सर्वसाक्षी

पुरस्काराबद्दल अभिनंदन!

चाळीतले जीवन बरोबर टिपले आहे, सुरेख.

धमाल मुलगा's picture

28 Jan 2008 - 6:03 pm | धमाल मुलगा

त्या राजाचा पगार थोडा त्यात कसे भागावे?
राणीनेही समजून सारे काहीच ना मागावे
संध्याकाळी कुठे न फीरती, खिशात नसती नाणी...

वाईट्ट हो! टचकन डोळ्यात पाणी आल॑. साला माझे जुने - उमेदवारीचे ( लाज वाटते ना "बेकारीचे / बेरोजगारीचे" म्हणायला, बाकी हा उमेदवारी शब्द भारदस्त वाटतो) दिवस आठवले. मी अन् माझी ती...तिच॑ शिक्षण चालू अन् आमच॑ पाकिट सदा उताण॑ ! ते॑व्हा नाही जाणवल॑ पण किती समजुतदार ती, कधी काही मागितल॑ नाही की हट्ट नाही....साला आता पैसा आहे तर ते गुलाबी दिवस कुठे गायब झालेत कोण जाणे. बर्‍याचदा तर एकच चहा दोघा॑त...जाऊदे, माझी कसली ला॑बड लाऊन बसलो मी.

छ्या: लै वाईट ल्हिता राव तुमी...भर हापिसात बापयगड्याच्या डोळ्यातून पाणी काढताना कसला हो आन॑द मानता?
च्यायला, उगाचच मी साहित्यिक दु:खी झालोय..ते काळजात कालवाकालव इ.इ.

अविनाशराव, सलाम तुम्हाला अन् तुमच्या ह्या चाळीमधल्या... ला.

(कधीतरी हळवा होणारा) धमाल.

चतुरंग's picture

28 Jan 2008 - 9:42 pm | चतुरंग

खिशात ५००रु. आणि ४००रु. चा आहेर करायचाय कारण जवळच्याचं लग्न (ही 'जवळची' माणसं खरंच किती 'लांबची' निघाली ते नंतर कळतं - पण आपण काही करु शकत नाही - गरीब लोकांना चॉइस नसतो!)
१००रु.यात पुढचे पंधरा दिवस?? डोळ्यापुढे काहीच नाही! त्या कठिण दिवसात बायकोने जी साथ दिली त्याला तोड नाही! मी आयुष्यभरासाठी तिचा ऋणी आहे!!
गोड बोलून कामं करुन घेणारे जवळचे नातेवाईकच निघाले! त्यानंतर लौकिकार्थाने सगळेच यश मिळत गेलं तेव्हा आता तेच लोक लाळघोटेपणा करत येतात तेव्हा कीव येते.
असो.
जुन्या खपल्या काढल्या गेल्यामुळे डोळ्यात आलेलं पाणी पुसून पुढे जाऊयात!

सुंदर काव्य अविनाशराव. (ह्याला विडंबन म्हणणे म्हणजे त्या काव्याची विटंबना आहे! दुसरा शब्द सुचवतोय "विरुपिणी" - जाणकारांनी मत द्यावे).
आणि पुरस्काराबद्द्ल अभिनंदनही!

चतुरंग

आजानुकर्ण's picture

28 Jan 2008 - 9:53 pm | आजानुकर्ण

विडंबन फारच पसंत पडले

(आस्वादक) आजानुकर्ण पुणेकर

झकासराव's picture

29 Jan 2008 - 12:00 am | झकासराव

क्या बात है.
हसवता हसवता डोळ्यात चटकन पाणी आणलत की हो.
जबरा आहे तुमची लेखणी.

अघळ पघळ's picture

30 Jan 2008 - 8:41 am | अघळ पघळ

मागे एकदा हेच विडंबन 'डोंबीवलीच्या चाळी मधली राजा आणिक राणी' असे ऐकले होते. ते पण असेच मार्मिक आणि छान होते. आपणच रचले होते का?

सुनील's picture

30 Jan 2008 - 9:00 am | सुनील

'डोंबीवलीच्या चाळी मधली राजा आणिक राणी' हे विडंबन प्रसाद शिरगावकर यांचे आहे (ते मायबोली आणि मनोगतावर कार्यरत असतात).

तेदेखील अविनाशरावांच्या विडंबनाइतकेच उत्तम आहे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

इनोबा म्हणे's picture

30 Jan 2008 - 3:17 pm | इनोबा म्हणे

प्रसाद शिरगावकरांच्या साधं-सोपं या संकेतस्थळावर अशी आणखी काही विडंबने वाचता येतील.

-इनोबा

प्रशांतकवळे's picture

30 Jan 2008 - 9:14 am | प्रशांतकवळे

खरच, खुप सुंदर लिहिलेत तुम्ही,

खरच सुंदर..

असेच सुंदर काव्य येत राहो.

प्रशांत

दीपा॑जली's picture

30 Jan 2008 - 11:45 am | दीपा॑जली

चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी
सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी
डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी...

मस्त जमलय.

वडापाव's picture

30 Jan 2008 - 5:52 pm | वडापाव

मलाही कविता करायला फार आवडते. पण मी अशी मस्त विडंबने तर काय, साधं विडंबन सुध्दा नाही करू शकत.
कुटुंं्ब रंगलंय काव्यात, ही कविता मी कधी ऐकली नाही, पण तरीही मला हे विडंबन खूपच आवडलं.
आपण आपल्या ह्या कविता व विडंबने www.blogger.com वर देखील प्रकाशित करू शकता.
जर आधीपासूनच तेथे असाल, तर उत्तमच.
तुमच्या बरोबर मैत्री करण्यास खूप उत्सूक आहे मी.
आपला नम्र,
किन्गके

तळीराम's picture

30 Jan 2008 - 8:49 pm | तळीराम

कुटुंब रंगलंय काव्यात हा श्री. विसुभाऊ बापट सादर करत असलेला कार्यक्रम आहे. ते स्वतः कवी नाहीत. पण प्रसिद्ध कवींच्या अप्रसिद्ध कविता आणि अप्रसिद्ध कवींच्या गुणवान कविता या कार्यक्रमात असतात. एकदा हा कार्यक्रम मी पाहीला होता.

मनिष's picture

31 Jan 2008 - 1:35 pm | मनिष

चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी
सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी
डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी...

काय बोलावे??? मुळ गाण्याइतकेच सुरेख!!!