मोत्झार्टचे शांतिस्तवन (रेक्विएम)

धनंजय's picture
धनंजय in जनातलं, मनातलं
10 Mar 2009 - 9:06 am

परवाच बॉल्टोमोर सिंफनी ऑर्केस्ट्रा आणि बॉल्टिमोर कोरल आर्ट्स सोसायटी यांनी एकत्र सादर केलेला कार्यक्रम ऐकायचा योग आला. त्यांनी मोत्झार्टचे रेक्विएम (मृतात्म्यासाठी शांतिस्तवन) सादर केले.

या संगीताबद्दलची दंतकथा काही लोकांनी हॉलिवुड-निर्मित "आमादेउस" चित्रपटात बघितली असेलच - तीत कल्पनारम्यता फार आणि तथ्य फार कमी आहे. त्या चित्रपटात मोत्झार्टचा द्वेषयुक्त भक्त त्या काळातला संगीतकार सालिएरी होता, आणि त्याने मोत्झार्टच्या बापाच्या भुताचे सोंग घेऊन भावनिक दडपणाखाली हे संगीत मोत्झार्टकडून लिहून घेतले, अशी काही कथा आहे.

सत्य हे की एका भंपक उमरावाने गुप्तपणे मोर्झार्टकडे या संगीतासाठी पैसे दिले होते. (गुप्तपणे का? तर हा उमराव संगीतकारांकडून संगीत विकत घेऊन आपणच ते रचले असा कांगावा करत असे.) पण अपशकुनी अंधविश्वासाने मोत्झार्टने स्वतःची कल्पना करून घेतली, की आपण आपल्याच मृत्यूनंतरसाठी हे मृतात्मा-शांती-संगीत लिहीत आहोत. त्या दडपणाखाली त्याच्याकडून हे स्तवन पुरते लिहिले गेले नाही. तो आजारी पडून मरण पावला, तेव्हा याच संगीताचा त्याने ध्यास घेतला होता.

पुढे त्यातील भागांचे वर्णन दिले आहे. लॅटिनमधील शब्द कॅथोलिक मृतात्म्यास-शांती-प्रार्थना-सत्रातले ठराविकच आहेत. त्याच-त्या शब्दांना संगीताच्या मार्फत सामर्थ्य देणे हे संगीतकाराचे वैशिष्ट्य होय.

१. त्यातील हा पहिला भागच त्याने संपूर्णपणे (म्हणजे चारही गायकांची आणि वाद्यवृंदाची सुरावट) रचलेला आहे. बाकी भागांचे (भाग ८ पर्यंत) अर्धवट रेखाटनच त्याने केले आहे - गायकांच्या चाली बसवल्या आहेत, पण वाद्यांच्या चालींबद्दल फक्त थोडीच कल्पना दिली आहे.

"त्यांना शांती दे, आणि कायमचा प्रकाश त्यांच्यावर पडो. (वगैरे.)" १.३५ च्या सुमारास क्षणभराच्या शांततेनंतर "आणि कायमचा प्रकाश..." असा धगधगीत सुरांत येतो... आणि २:००च्या सुमारास अगदी शांत होऊन त्यांच्यावर पडतो.

२. "देवा करुणा कर, ख्रिस्ता करुणा कर"

यात सुरुवात खर्जात (बेस) गाणारे पुरुष करतात, पण "आल्तो" गायिका (गमगरे-गमरेग-मपमग-मपगम-...) असे कापरे भरणारा "करुणा (एलेइसॉन)" शब्द म्हणायला लागतात, मग एक एक करून प्रत्येक गायक तो थरकाप गातो...

३. "त्या दैवी क्रोधाच्या दिवशी जग जळून खाक होईल, आणि न्यायाधीश कठोरपणे तपासेल तसा थरकाप उडेल..."

"दिएस इराए (दिवस क्रोधाचा) या पहिल्या शब्दांतच रौद्र रसाचा आविष्कार होतो.

४. "दिव्य बिगूल वाजेल आणि थडग्यांतील मृतांना उठवेल..."

(इथे अर्थातच सुरुवातीला ट्रंपेट वाजते. एक-एक करून गायक गाऊ लागतात.)

५. "महान राजा... जे वाचणार त्यांना मोफत वाचवतोस... मला वाचव..."
(हा "मोफत" प्रकार ख्रिस्ती [विशेषतः कॅथोलिक] धर्मशास्त्रातला आहे. मनुष्य इतका स्खलनशील आहे, की स्वर्गास स्वतःहून पात्र होईल इतके निष्कलंक पुण्य तो करूच शकत नाही. नरकयातनांतून जे वाचतात, स्वर्गात जातात, ते पुरेशी पुण्याई नसूनही "मोफत" देवाच्या करुणेमुळे जातात.) त्यात "मला वाचव" हे पिल्लू अगदी हळुवार संगीताने १:२० च्या सुमारास संगीतकार सोडतो...

६. "आठव रे, सौम्य येशू! तू आलास तो आमच्यासाठीच ना? मला सोडू नको..." देव (पिता) हा कठोर असणार म्हणून सौम्य येशूकडे आर्जवे सुरू झाली आहेत. संगीताचा रस मागच्या गाण्यातच रौद्राकडून आर्जवाकडे झुकला होता, तो आता पूर्णपणे आर्जवी होतो.

७. "वाईट लोकांना डांबल्यानंतर, सज्जनांबरोबर मला बोलाव..."
"वाईट लोकांना डांबल्यानंतर (कोन्फुतातिस मालेदिक्तिस)"च्या मोठ्या धिकारानंतर "सज्जनांबरोबर मला बोलाव (वोचे मेकुम बेनेदिक्तिस)" मधील बदललेला स्वर ऐका (०:२० च्या सुमारास)

८. "अश्रूभरला तो दिवस, राखेतून न्यायासनापुढे जाण्यासाठी दोषी मनुष्य उठतो..."

यातील गायकांच्या सुरांतले पहिले आठ तालखंड मोत्झार्टने लिहिले आहेत - त्याने लिहिलेली ही आयुष्यातली अखेरची सुरावट - (०:५८ ला संपणारी) संगीतातले काहीही कळत नसून नाट्यमय सुरांमुळे माझ्या स्मृतीत कोरलेली. त्यातही ०:३० पासून थबकणारा ताल ऐका - "क्वाम्-रे-सुर्-गेत्-एक्स्-फा-वि-ल्ला" ="जे-व्हा-उठ्-तो-रा-खे-तू-नी" - त्या दोषी माणसाला उठायचे नाही, तरी टप्प्या-टप्प्याने त्याला उठणे भागच होते आहे...
मग ०:४४ पसून थबकणे नाही पण कोमल-शुद्ध-कोमल-शुद्ध प्रत्येक श्रुती वापरत तारस्वरातील गायिका त्याला बळेच खेचतात - "जुदीकांदुस-होमोरेउस" (तपासायच्या-दोषी-जणास). (स्वरमेळाच्या नियमानुसार तारस्वरातील गायिकांना सर्व कोमल-शुद्ध-तीव्र स्वर गाऊ देण्यासाठी बाकी गायक वेगळेच स्वर गाऊन आधार देतात - पण ते किचकट शास्त्रीय नियम सोडूया - म्हणजे मला तरी कुठे येतात, म्हणून सोडूया...) हेच मोत्झार्टचे लिहिलेले अखेरचे सुर.

स्तवनाचे पुढचे भाग ऐकायचे असल्यास येथे सापडतील.
http://www.youtube.com/view_play_list?p=678DF3A1B39FF735

आता आस्वादाबद्दल मला पडलेला एक प्रश्न :
या सगळ्या प्रकारातील धर्मशास्त्र किंवा अखेरचा-न्याय(कयामत)-शास्त्र माझ्या विश्वासाचे नाही. ज्यांचा त्यावर विश्वास असेल त्यांना संगीताचा आस्वाद कितीतरी वेगळा मिळत असेल नाही का? देवळातही भजन ऐकताना भक्तीभावात तल्लीन झालेल्या श्रोत्याला अधिक आनंद मिळत असेल ना? मग विचार केला, की हे मोत्झार्ट (किंवा उत्तम भजन-गायक) तरी कुठे एवढे पुण्यवान असतात. आपल्या उत्तमोत्तम गायकांना बाई-बाटलीचा परहेज नसतो, तसा मोत्झार्टलाही नव्हता. मग तसा स्खलनशील गायकही तल्लीन होऊन निर्गुणात निस्संग होण्याची भजने गाऊ शकतोच ना? मग त्या धर्मशास्त्रात विश्वास नसलेल्या मलासुद्धा श्रोता म्हणून समरस होता यावे... पण कोणास ठाऊक हे पटत नाही. कदाचित आपल्या बाई-बाटली स्खलनशीलतेने पश्चात्ताप-दग्ध होऊनच मोत्झार्ट त्या करुणा भाकणार्‍या शब्दांना तसे प्रामाणिक संगीत देऊ शकला असेल.

शेवटी वाटले - असेना का माझा आस्वाद त्या धार्मिक ख्रिस्ती माणसापेक्षा लंगडा! त्या अंत्यदिनाच्या (कयामतीच्या) भीतीमध्ये आणि करुणेमध्ये हा एक संगीतमय तासभर समरस होण्यासाठी त्याला बाकी दिवसभरही तसेच "आपण-पापी-आहोत-पश्चात्तापा"ची झळ सहन करावी लागते. तो आस्वाद नाही मिळाला मला, तरी दिवसभराची मनःशांती मिळते तो सौदा चांगलाच! (पण हा माझा दृष्टिकोन. दिवसभराची झळ सोसून ते संगीत सच्चा आर्तपणे ऐकण्याचा सौदा दुसर्‍या कोणाला त्यांच्या दृष्टीने अमोलिक वाटत असेल.)

कलासंगीतआस्वाद

प्रतिक्रिया

सहज's picture

10 Mar 2009 - 9:43 am | सहज

विस्तृत लेख, दुवे, संगीत सगळेच छान.

अजुन नीट समजुन घेत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Mar 2009 - 10:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विस्तृत लेख, दुवे, संगीत सगळेच छान.

अजुन नीट समजुन घेत आहे.

-दिलीप बिरुटे

सुनील's picture

10 Mar 2009 - 11:06 am | सुनील

अभिजात पाश्चात्य संगीत म्हटले की मला दिल चाहता है मधील आमीर खानची किंवा प्रिटी वूमन मधील जुलीया रॉबर्ट्सची आठवण येते! (साधरणपणे अशीच अवस्था अभिजात भारतीय संगीत ऐकतानाही होते!)

जे काही चाललय ते उच्च आहे पण आपण तितके उच्च नाही. समजून घ्यायची इच्छा आहे पण समजावून सांगणारं कोणी नाही, अशी काहीशी अवस्था होते.

संगीतढ (सुनील)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अभिरत भिरभि-या's picture

10 Mar 2009 - 2:25 pm | अभिरत भिरभि-या

एरवी न कळणारे संगित आणि त्याचा हा रंजक इतिहास, आस्वाद इतक्या सविस्तरपणे सादर केल्याबद्दल धन्यवाद!!

प्रकाश घाटपांडे's picture

10 Mar 2009 - 3:54 pm | प्रकाश घाटपांडे

मागच्या महिन्यात 'रुहानियत' हा सुफी संगीत व मिस्टिक म्युझिक अशा मिश्रणाचा कार्यक्रम पाहिला. मला त्यातील भाषा समजत नव्हती. पण कार्यक्रम माझ्या सारख्या माणसालाही आनंद देउन गेला. भाषा धर्म देश प्रांत यांच्या पलिकडे घेउन जाणारा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

रामदास's picture

11 Mar 2009 - 12:44 am | रामदास

थोडा वेळ द्या.
अर्थात तुम्ही जे लिहीले आहे ते उत्कृष्टच आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Mar 2009 - 12:58 am | बिपिन कार्यकर्ते

सकाळपासून २-३ वेळा थोडं थोडं ऐकलं... सुंदर आहे... नविन आहे कानाला.

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

11 Mar 2009 - 8:15 am | विसोबा खेचर

धन्याशेठ,

सुरेखच लेख दिसतो आहे. आत्ता नुसती नजर फिरवली आहे. यू नळीचे दुवे ऐकून सवडीने प्रतिसाद लिहितो..

आपला,
(धन्याशेठचा फ्यॅन) तात्या.

अजय भागवत's picture

11 Mar 2009 - 8:18 am | अजय भागवत

तुमच्या लेखावरुन जाणीव झाली की, मोझर्ट्ची सिंफनी युट्यूबवर आहे. मस्तपैकी उतरवून घेतली. :-)

प्राजु's picture

11 Mar 2009 - 8:27 am | प्राजु

अगदी विस्तृत.
दुवेही छान आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

17 Mar 2009 - 3:05 am | धनंजय

वास्तवीक चार-गायकांचा स्वरमेळ हा प्रकार मला समजत नाही, तरी हे शांतिस्तवन फार आधीपासून आवडते आहे.

तुम्हालाही हा वेगळा अनुभव आवडला हे वाचून आनंद झाला.

चित्रा's picture

19 Mar 2009 - 8:59 am | चित्रा

रसग्रहणाबद्दल आणि विस्तारपूर्वक सांगितल्याबद्दल धन्यवाद.
कधीकधी सूर हे भाषा कळत नसली तरी मनापर्यंत पोचतात. ओल्ड स्पाइसची जुनी जाहिरात - पहिल्यांदा पाहिली तेव्हा बरीच लहान होते, पण अजूनही आठवते ती त्यातल्या संगितामुळे.
रसग्रहणासंबंधी सहमत, कलेच्या आस्वादासाठी गाण्याचे शब्द जसेच्या तसे पटायला हवेच असे नाही. किंबहुना ते न कळताही ओल्ड स्पाइसच्या जाहिरातीप्रमाणे मनाला स्पर्श करू शकतात. पण आपल्याकडे स्वतःच्या निष्ठांमुळे कलेच्या आस्वादावर बंधने येण्याची उदाहरणे कमी नाहीत.

वरील दुवा चालत नसेल तर यूट्यूबवरील हा दुवा बघावा -

गंमत म्हणजे त्या संगीताचे शब्द "नशीबदेवी किती बेभरवशाची असते" असे काही आहेत :

ऑर्फचे हे संगीत मोठे हेलकावणारे आहे खरे. पण त्याच्या संगीताचे वैशिष्ट्य हे की ते वीररसपूर्ण-सुलभ आहे. त्याच्या मते गेल्या ३००-४०० वर्षातल्या संगीताची गुंतागुंत ही नैसर्गिक रांगड्या मानवी ऊर्मीपेक्षा लेचीपेची आहे. त्याच्या स्वरमेळात सरळ षड्ज-गांधार भावात किंवा षड्ज-पंचम भावात सगळेच आरोह-अवरोह/चाल गातात, असे आहेत. षड्ज-निषद स्वरमेळ क्वचितच दिसतो (वरील फितीत पहिल्या सुरानंतर आहे.) वरील फितीत ०:३० नंतर स्त्रिया आणि पुरुष एकच चाल गातात (षड्ज-षड्ज भाव) - स्त्रिया मध्य सप्तकात, तर पुरुष मंद्र सप्तकात. हे रोमहर्षक आहे यात काही शंका नाही.

पण मोत्झार्टच्या वरच्या संगीतात गुंतागुंत आहे - एक गायक आरोह गातो, तेव्हाच दुसरा चक्क अवरोह गातो, किंवा वक्र तान गातो - यातही सौंदर्य आहे. पण ते शास्त्र काही लोकांना नि:सत्व वाटले.

गंमत आहे - या "रांगड्या नैसर्गिक" संगीतामुळे ऑर्फ याला नात्झी लोकांनी उचलून धरला - वेगवेगळ्या जमातींच्या संकराने कमजोर झालेल्या अभिजात पाश्चिमात्य संगीताच्यापेक्षा मागे जाऊन सनातन "सोपे" एकमुखाने गायलेले शुद्ध आर्य संगीत... ऑर्फने हिटलरचा पाडाव झाल्यानंतर आपल्या संगीताचा असा काही अर्थ नाही हे स्पष्ट करून पुन्हापुन्हा सांगितले.

ओल्ड स्पाइस जाहिरातीच्या संगीताची अशी ही ऐतिहासिक गंमत.

चित्रा's picture

20 Mar 2009 - 4:15 am | चित्रा

नात्झींच्या ऑर्फच्या संगीताचा उपयोग करून घेण्याबद्दल माहिती नव्हते. पण विकीवर कवितेचा समग्र अर्थ दिला आहे, तो वाचला होता.

या लेखाचा विषय शांतिस्तवन असताना वीरश्रीयुक्त गाण्याचा दुवा देण्यामागचे कारण एवढेच की अर्थ माहिती नसताना किंवा कधीकधी अर्थ माहिती असला तरी एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेण्यात फारशी कमतरता येऊ नये. चित्रकारांची चित्रेही एखाद्या धर्मग्रंथातील कल्पनांवर किंवा प्रसंगांवर आधारित असतात, तेव्हाही त्या कलाकृतीचा आस्वाद घेण्यास बंधने येऊ नयेत.

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Apr 2009 - 5:05 pm | बिपिन कार्यकर्ते

बरेच दिवसांपासून निवांतपणे ऐकेन म्हणत होतो. आज ऐकले. तुमचे विवेचन वाचत वाचत ऐकले. अन्यथा काहीच कळले नसते. आताही सगळे कळले किंवा आवडले असे नाही. पण काही तुकडे ऐकताना मात्र 'दिव्यत्व' वाटले.

तुमच्या प्रश्नाबद्दल. मला वाटते की त्यातले धर्मशास्त्र जरी माहित नसेल आणि माहित असून मान्य नसेल तरी अस्वादात कुठेही कमीपणा येऊ नये. फारतर या गोष्टी मान्य असलेल्या व्यक्तीला सांगितीक अनुभवाव्यतिरिक्त काही अनुभव येऊ शकेल, पण सांगितिक अनुभवाची व्याप्ती / तीव्रता मात्र कोणत्याही प्रकारे बाधित होऊ नये असे वाटते.

बिपिन कार्यकर्ते

बॅटमॅन's picture

15 May 2012 - 1:03 pm | बॅटमॅन

या लेखाच्या निमित्ताने चायकोव्हस्कीचे १८१२ ओव्हर्चर, ओफ्फेनबाख चे इन्फर्नल गॅलप, स्वॅन लेक बॅलेट, रोसिनीचे बार्बर ऑफ सेव्हिल,, अशा अनेकानेक उत्तम कलाकृती डोळ्यासमोर आल्या. अमादेउस मधील तो रेक्विएम कंपोज करत असतानाचा सीन निव्वळ अप्रतिम आहे. मोझार्टला त्याची सासू रागावते तेव्हा त्यातूनच त्याला "क्वीन ऑफ द नाईट एरिआ" कसे सुचते ते अतिशय सुंदरपणे दाखवले आहे.

चित्रगुप्त's picture

15 May 2012 - 3:48 pm | चित्रगुप्त

' मोझार्ट चे रेक्वियम ' या विषयावर धागा बघून अतिशय आनंद झाला. मी 'अमादेउस' चित्रपट अनेकदा बघितला असून अनेकांना आग्रहाने दाखवत असतो. त्यातील प्रत्येक संवाद आता जवळ जवळ पाठ झाला आहे.
याची एक 'डायरेक्टर्स कट' असलेली प्रत देखिल मिळाली. त्यात काही जास्तीचे प्रसंग आहेत, उदा. सालिएरि समोर कॉन्स्टान्झी चे विवस्त्र होणे, एका धनाढ्य उमरावाच्या मुलीला संगीत शिकवायला मोझार्ट काही दिवस जातो, वगैरे. हे प्रसंग उत्तम रीत्या चित्रित झाले असले, तरी आज ज्या स्वरूपात हा चित्रपट आहे, तोच जास्त भावतो.
सालिएरीची भूमिका करणार्‍याला शतशः प्रणाम. राजा जोसेफ व त्याचे खुषमस्करे वगैरे प्रसंगातील बारकावे, तसेच वर बॅट्मॅन यांनी सांगितलेले रेक्विएम कंपोज करत असतानाचा सीन, मोझार्टला त्याची सासू रागावते तेव्हा त्यातूनच त्याला "क्वीन ऑफ द नाईट" सुचणे, असे अनेक प्रसंग पुनः पुनः बघावे, असे आहेत. अगदी शेवटी मोझार्टच्या सार्वजनिक दफनाच्या प्रसंगाला पार्श्वसंगीत म्हणून 'लॅक्रिमोसा' चा उपयोग अगदी औचित्यपूर्ण आहे. त्यामुळे हा प्रसंग अतिशय सुन्न करून जातो.
मलाही पॅरिस मध्ये मेरी मॅदेलीन चर्च मध्ये ' रेक्वियम' चा कार्यक्रम बघायला मिळाला, याबद्दल मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो. यातील 'लॅक्रिमोसा' अगदी रोज ऐकतो. वर्णनातीत अश्या गूढ, अद्भुत सौंदर्याने नटलेली ही रचना मोझार्टच्या प्रतिभेचा कळस आहे, असे मला वाटते. याबरोबरच 'पियानो कॉन्चेर्टो क्र. २१' ही रचना पण अद्भुत आहे.
मोझार्ट च्या मृत्यु नंतर त्याच्या शिष्याने 'रेक्वियम' पूर्ण केले, असे ऐकले आहे, त्याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध आहे का?
हा धागा बघितल्याबरोबर रहावले न गेल्याने हा प्रतिसाद देत आहे. सर्व चित्रफिती अजून बघितल्या नाहीत...
या धाग्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

माझ्याकडे डायरेक्टर्स कट वालीच व्हर्जन आहे. सालिएरिची भूमिका करणार्‍याला ऑस्कर मिळाले असे विकी सांगतो. आणि तशीच सशक्त आहे ती भूमिका. बाकी मोझार्टला पहिल्यांदा राजदरबारात बोलावले जाते तेव्हाचे संवाद आणि सालिएरीने त्याच्या स्वागतार्थ बनविलेल्या रचनेची बसल्या बसल्या अशी सुंदर मेलडी बनवितो चायला कळायचं बंद होतं :)

http://en.wikipedia.org/wiki/Amadeus_%28film%29#Awards_and_nominations

मोझार्टचे बाकी अनेक पीसेस भारी आहेत. मी ऐकलेले आणि विशेष आवडणारे म्हणजे मॅरिज ऑफ फिआग्रो, स्ट्रिंग क्वार्टेट, सिंफनी क्र. २५ व ४० पण भारी आहे. सिंफनी क्र. २५ म्हणजे टायटन घड्याळाच्या जाहिरातीतील म्युझिक :)

पण रेक्विएम मधील पहिला पीसच मला तरी जास्त आवडतो.

"Kyrie elison" हा धनंजय यांनी दिलेला. इतका विलक्षण गतिमान आणि ताकदवान आहे की काय सांगू. मलापण राहावले नाही, सबब हा प्रतिसाद लिहिला.

चित्रगुप्त's picture

15 May 2012 - 4:07 pm | चित्रगुप्त

वरील चित्रफिति बघण्याचा प्रयत्न केला, तर एकही दुवा उघडला जात नाही, असे दिसले. ?????

बॅटमॅन's picture

15 May 2012 - 4:14 pm | बॅटमॅन

यूट्यूबवर सर्च मारा "Mozart requim" म्हणून. येणार्‍या पहिल्याच ९ मिनिटांच्या व्हिडिओवर क्लिक करा आणि मग येंजाय! बाकी "Confutatis maledictis" मात्र त्यात नाहिये, सेपरेट सर्च मारा त्याकरिता.

धनंजय's picture

16 May 2012 - 2:19 am | धनंजय

जुन्या चित्रफिती यूट्यूबवरून निघून गेल्या आहेत :-(

चित्रगुप्त's picture

17 May 2013 - 5:08 am | चित्रगुप्त

वर्षभरानंतर आज अचानक (योगायोगाने?) हा धागा दिसला. त्यावेळी यातील दुवे उघडत नसल्याने ऐकता आले नव्हते, आता पुन्हा नीट सावकाशीने ऐकणार आहे.
शतकांमध्ये एकादीच अशी महान कलाकृती घडून येत असते. मोझार्टच्या प्रयिभेला पुन्हा एकदा सलाम आणि धनंजय यांना ह्या सुंदर परिचयाबद्दल कुर्निसात.

मुक्तसुनीत's picture

17 May 2013 - 8:21 pm | मुक्तसुनीत

असेच चांगले चांगले जुने धागे वर काढा. धन्यवाद.