...उर्फ सुगरणीचा सल्ला ५

मेघना भुस्कुटे's picture
मेघना भुस्कुटे in पाककृती
27 Feb 2009 - 4:34 pm

हे आधीचे दुवे -

http://www.misalpav.com/node/2432
http://www.misalpav.com/node/2540
http://www.misalpav.com/node/2696
http://www.misalpav.com/node/3179

मोठ्ठ्या ब्रेकनंतर काही अपडेट्सः

१. क्ष ला काही विशिष्ट व्यक्तिविशेषांमधे असाधारण रुची निर्माण झाल्यामुळे तो भल्या पहाटे उठून ब्रेकफास्टकरिताही एक विशिष्ट हाटेल गाठू लागला आहे. त्यामुळे आमच्या स्वैपाघरातला त्याचा सक्रिय / निष्क्रिय सहभाग जवळपास बंद झाल्यात जमा आहे.
२. स्वैपाघरातील दिने दिने धाडसी प्रयोगांचा आम्हांला (अर्थात! आत्मवाचक आदरार्थी बहुवचन.) वीट आल्यामुळे आम्ही चक्क एक 'कुकबुवा' बाळगला आहे. त्याचं नाव र. (नुकताच लॉण्ड्रीतून आलेला हातरुमाल पोळ्या शेकायला घेणे व तो हातासरशी थोडासा जाळून ठेवणे, महिन्याकाठी निदान तीन तरी दांड्या मारणे, सांगितल्यापैकी अर्धाच स्वयंपाक करून कुणाचे लक्ष नाहीसे पाहून साळसूदपणे पसार होणे, कुठलीही भाजी असो - त्यात एक कांदा, बरीचशी धनिया पावडर व एखादा तरी टमाटू जिरवणे (अत्यंत तुच्छ स्वरात - टमाटर हेल्थके लिये अच्छा होता मॅडम...), उशिरा उगवल्यावर व पैसे उसने मागताना अनन्यसाधारण गोड हसून दाखवणे, अशा अनेक लीला तो लीलया करतो. पण त्याबद्दल सविस्तर परत कधीतरी. तूर्तास नुसताच पात्रपरिचय.)
३. र येऊ लागल्यानंतर सुमारे आठ दिवसांतच मी, अ आणि ब यांची पोटं आळीपाळीने बिघडली. र च्या पाककौशल्याला दोष देण्याआधीच संध्याकाळी आयत्या चहाकरता टपकलेल्या क्ष नं 'तुम्हांला घरातलं जेवण सोसत नाहीय वाट्टं' असं निरागस आवाजातलं भाष्यवजा पिल्लू सोडल्यामुळे आम्हांला आत्मपरीक्षण करणं भाग पडलं. आता सार्‍यांच्या तब्ब्येती ठीक आहेत.

अपडेट्स संपले. पदार्थ सुरू -

मी मिसळ फर्मास करते. (प्रतिक्रियांचा धुरळा विरला असल्यास पुढे जाऊ.) अ ची आई आली होती. (बरोबर. चितळ्यांच्या बाकरवड्या आणणारी. तीच ती.) तिच्यासमोर माझ्या मिसळीचं अतोनात गुणवर्णन करून झालं. अखेरीस माझ्या आळसासमोर प्रतिष्ठेचा प्रश्न जिंकला आणि र ला सुट्टी देण्यात आली. कुणाच्या तरी आईला - साक्षात आईला - माझ्याकडून माझ्या रेसिपीचे धडे घ्यायचे असल्यामुळे मी एक्सायटेड + नर्व्हस + फुशारलेली अशी होते. त्याच उत्साहात मी स्वत: बाजारहाट करून सामग्री घेऊन आले. ती येणेप्रमाणे -

आरोग्यपूर्ण व्हीट ब्रेड (इलाज नव्हता. इथे सहजासहजी आपला चविष्ट लादीपाव मिळत नाही. मिळालाच तर तो शिळा / गोडूस / भुसभुशीत असतो),
फरसाणाऐवजी हल्दीरामच्या आलू भुजिया (इथल्या फरसाणात मक्याचा गोड चिवडा घुसडतात. आणि शेव कैच्याकैच जाडजूड असते),
दही (मला मिसळीत दही आवडत नाही. गैरसमज नको. पण काहीकाही जणांना मिसळीचा सत्यानाश केलेला आवडतो. आता आपण तरी कुठवर पुरे पडणार? खा बापडे दही मिसळ),
मोड आलेलं कडधान्य (हे मी वाचकांच्या सोईकरता लिहिलेलं असलं, तरी मला मिळालं नाही. भरोश्याच्या भाजीवाल्याकडे पावटे, कुळीथ आणि वाल ही तीन कडधान्यं होती. त्याची मिसळ करण्यापेक्षा ’दगडाचा रस्सा’च्या चालीवर ’बिनकडधान्याची मिसळ’ करायचं ठरवून मी काढता पाय घेतला).

बाकीच्या गोष्टी घरात होत्याच.

आता साधारण दृश्यवर्णन हे असं -

आमच्या ३ बाय ६ च्या प्रशस्त स्वैपाघरात (फ्रीज, ओटा आणि सिंक त्यातच. आम्ही कन्नड लोकांसारखा हॉलमधे फ्रीज मांडलेला नाही यादी नोंद घ्यावी.) सफाईदारपणे कांदा बाऽऽऽऽऽऽरीक चिरणारी मी. ब स्वैपाघराच्या दाराशी घोटाळत अंदाज घेणारी. अ टीव्हीसमोर बसून उकडलेले बटाटे सोलत असलेली. अ ची आई लसूण सोलून खलबत्त्यात आलेलसणीची पेस्ट करून देणारी. आता मिसळ खायची या विचारानं प्रफुल्लित झालेले आमचे सगळ्यांचेच चेहरे.

इतक्यात पहिली माशी शिंकली. आत्मविश्वासानं फ्रीज उघडून टोमॅटो काढायला गेलेल्या मला भाजीचा नुसताच रिकामा ट्रे दिसला.

हे काय काकू? टोमॅटो संपलेत?
होय ग होय! कालच नै का आपण सार केलं? तरी कमीच पडले मला साराला टोमॅटो. नै का ग अ?

अ ’बालिका वधू’मधे रममाण झालेली. तिला सोईस्करपणे काहीच ऐकू येत नव्हतं.

असू दे. (चिडचिड लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करत.)
ए ब, प्लीज एक काम कर ना ग. (आवाज वरवर मस्का लावणारा मिठ्ठास. पण चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आल्यास ’बघ बाई ब, आपल्याला सगळ्यांनाच खायचीय मिसळ’ ही गर्भित धमकी.)
पटकन खालनं टोमॅटो दे नं आणून. (निखळ आदेश.)

टोमॅटो येईस्तोवर मी यथाशक्ती माझं ज्ञान पाजळलं. हो, अ च्या आईच्या नजरेतला आदर मला गमवायचा नव्हता.

कढीपत्ता लागतो मला ताजा.
आलेलसणीची पेस्ट तर घालतेच मी भरपूर. शिवाय लसणीच्या चारसहा पाकळ्या ठेचून घालते फोडणीत. मस्त लागतात.
फोडणीत थोडी चिमटीभर साखर घालायची. म्हंजे मग सही तवंग येतो.
मालवण मसाला मेन. त्याचीच तर तरीला चव येते.
तरीला दाटपणा यावा म्हणून तांदळाची पिठी लावते मी चमचाभर. हो हो, थंड पाण्यात विरघळवून. कॉर्नफ्लॉवर लावतो नं आपण सूपला, तसंच.

अ ची आई चतुर्मासाची कहाणी ऐकावी तशी मनोभावे ऐकत असलेली.

टोमॅटो आले. फोडणी. साखर. कढीपत्ता. लसणीच्या पाकळ्या. आलेलसूण पेस्ट. कांदा-टोमॅटो. मालवण मसाला. मिश्रणाला तेल सुटून घरभर पसरलेला दरवळ. रसमवाला एखादा अण्णा ’कौनसा मसाला अम्मा?’ असं विचारत येतो का काय, असा गर्वभरित संशय मला आलेला. आता वाफवलेलं कडधान्य घालून एक वाफ काढायची. (दुसरी माशी. कडधान्य नाही. पण मी हार मानली नाही. माझ्याकडे व्हर्च्युअल कडधान्य असल्यामुळे मी इथे एक उकडलेला बटाटा चिरडून वापरला.) चव बघून थोडं लाल तिखट. मीठ. एकीकडे अ ला कांदा-कोथिंबीर-लिंबू चिरायला बसवत मी पानं मांडायला घेतली. रटरटणार्‍या मिश्रणात चांगलं तीन फुलपात्रं पाणी ओतलं आणि उकळी येण्याची वाट बघत आतून तांदळाची पिठी काढली.

पाण्यात विरघळवलेली पिठी उकळी आलेल्या रश्श्यात ओतली मात्र -

रस्सा फसफसून वर आला.

सेकंदभर मला काही कळेचना. प्रसंग ओळखून अ, ब आणि अ ची आई तत्परतेनं माझ्या भोवती जमा झालेल्या होत्या हे सांगायला नकोच. प्रकरण आता कढईतून उतू जात होतं. शिवाय त्याला एक चमत्कारिक वासही मारत होता. धक्क्यातून सावरून थोडं संशोधन केल्यावर असं लक्षात आलं, की र नं तांदळाच्या पिठीच्या जागी खायच्या सोड्याची पुडी बेमालूमपणे ठेवलेली होती. आणि माझा निष्कारण बळी गेला होता.

पिठी आणि सोडा यांच्या टेक्श्चरमधे काही फरक असतो की नाही, ते विरघळलं नाही धड तेव्हा कळलं नाही का तुला इत्यादी मुक्ताफळं उधळली गेलीच. पण उत्तररामायणात गुंतण्यात काही फारसा अर्थ नाही.

ते प्रकरण ओतून टाकून त्या दिवशी आम्ही कामतांना राजाश्रय दिला.

शिवाय आपण असं प्रांतवादी संकुचित राहूनही चालत नाहीच नं. बंगळुरी आल्यावर आपल्याच पद्धतीचं खायचं, तर रसम कधी खाऊन बघणार? इथेच आपल्या मराठी माणसांचं चुकतं. अ च्या आईलाही ते पटलं. तिला कामतांकडचं जेवण खूपच आवडलं. तिच्याकरता लिहून दिलेली ही मिसळीची पाककृती -

भरपूर तेलाची (जेवढं भाजीला घ्यावंसं वाटेल, त्याच्या दुप्पट तेल घ्यायचं. बरोब्बर होतं.) फोडणी करायची. नेहमीचीच. मोहरी, हिंग, हळद, थोडं लाल तिखट. त्यात कढीपत्ता, ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा साखर घालून परतून घ्यायचं. मग आलेलसणीची पेस्ट सढळ हस्ते. तिचा वास नाक्यापर्यंत पोचला, की मग बारीक चिरलेले कांदा-टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. त्यात दीडेक चमचा मालवणी मसाला. तोही नीट परतला गेला, की मग वाफवलेलं कडधान्य. वाटाणे, मूग किंवा मटकी. ते नीट झालं की अंदाजे पाणी ओतून उकळी आणायची आणि मग तिखट-मीठ घालून तांदळाची पिठी (!!!) लावायची. तर्री तयार. मग उकडून मीठ लावून कुस्करलेल्या बटाट्याच्या फोडी, त्यावर कच्चा बारीक चिरलेला कांदा. त्यावर आपापल्या वकुबाप्रमाणे रस्सा + तवंग. वरून आलू भुजिया किंवा फरसाण. कोथिंबीर आणि लिंबाची फोड.

हाणा.

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Feb 2009 - 4:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मेघना, प्रियसखे, माझ्या विनंतीला मान देऊन तू एवढी भारी पाकृ लिहिलीस ... आता मला काय काय वाटतंय हे लिहायला ना शब्द आहेत, ना दाखवायला इमोटीकॉन्स! एक मात्र खरं, आता डान्या मनातून भेदरलेला असणार, त्याला काँपिटीशन द्यायला तू परत आली आहेस म्हणून ...

आता खरी प्रतिक्रिया:

एकदम झोकात पुनरागमन आणि सुरूवातीपासून शेवट अगदी खणखणीत!
=)) =)) जाम हसले, पोटभर हसले, तेव्हा मिसळ आजच्याऐवजी उद्याच करेन ....

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Feb 2009 - 5:16 pm | बिपिन कार्यकर्ते

मॅग्ना..... खूप मोठ्या ग्यापनंतर दणक्यात पुनरागमन!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

मस्तच झाली मिसळ. =))

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

27 Feb 2009 - 4:44 pm | श्रावण मोडक

फर्मास.
इतकी मोठी गॅप घेत जाऊ नका.

अवलिया's picture

27 Feb 2009 - 5:03 pm | अवलिया

असेच म्हणतो

--अवलिया

आनंदयात्री's picture

27 Feb 2009 - 4:45 pm | आनंदयात्री

सेकंदभर मला काही कळेचना. प्रसंग ओळखून अ, ब आणि अ ची आई तत्परतेनं माझ्या भोवती जमा झालेल्या होत्या हे सांगायला नकोच. प्रकरण आता कढईतून उतू जात होतं. शिवाय त्याला एक चमत्कारिक वासही मारत होता. धक्क्यातून सावरून थोडं संशोधन केल्यावर असं लक्षात आलं, की र नं तांदळाच्या पिठीच्या जागी खायच्या सोड्याची पुडी बेमालूमपणे ठेवलेली होती. आणि माझा निष्कारण बळी गेला होता.

=)) =)) =))

जय हो अम्मा !!

आम्ही असेच एकदा आमच्या मित्रगणांना एकदा स्प्राईट उपमा खाउ घातला होता (पाण्याएवजी स्प्राईट). अन विषेश म्हणजे स्वयंपाक्याचे मनोबल खच्ची होउ नये म्हणुन कसाही लागत असला तरी खाल्ला सगळ्यांनी ... तो स्प्राईट उपमा होता हा शोध नंतर पिण्यास स्प्राईट सापडले नाही तेव्हा लागला :D

-
आपलाच

आंद्या बल्लव

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Feb 2009 - 5:19 pm | बिपिन कार्यकर्ते

स्प्राईट उपमा!!!!!!!!!!!

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

एकदा आमच्या आजीने बेसनाच्या लाडवात पिठीसाखरे ऐवजी सोडा घातला होता चुकून. नेमकी त्या दिवशी संकष्टी होती त्यामुळे रात्री छान नैवेद्य वगैरे दाखवून प्रसाद म्हणून सगळ्यांना जेवताना पानात एकेक वाढला. हलकल्लोळ झाला होता जेवताना. प्रसाद असल्याने टाकूनपण देता येत नव्हता. :(

बिपिन कार्यकर्ते

आजपासून तुझं नाव 'स्प्राईटशास्त्री'!! B)

(मी प्रथम केलेला उपमा इतका गळेपडू झाला होता की कढईतून झारा उचलला तरी त्या उपम्याचा ढीग झार्‍याची साथ सोडायला तयार नव्हता! शेवटी बिचार्‍याला कचर्‍यात टाकला तेव्हा फार वाईट वाटलं होतं !! :( )

चतुरंग

स्मिता श्रीपाद's picture

27 Feb 2009 - 4:51 pm | स्मिता श्रीपाद

पाण्यात विरघळवलेली पिठी उकळी आलेल्या रश्श्यात ओतली मात्र -

रस्सा फसफसून वर आला.

सेकंदभर मला काही कळेचना. प्रसंग ओळखून अ, ब आणि अ ची आई तत्परतेनं माझ्या भोवती जमा झालेल्या होत्या हे सांगायला नकोच. प्रकरण आता कढईतून उतू जात होतं. शिवाय त्याला एक चमत्कारिक वासही मारत होता. धक्क्यातून सावरून थोडं संशोधन केल्यावर असं लक्षात आलं, की र नं तांदळाच्या पिठीच्या जागी खायच्या सोड्याची पुडी बेमालूमपणे ठेवलेली होती. आणि माझा निष्कारण बळी गेला होता.

=)) =)) =)) अजुनही हसतेच आहे मी.... =))

झक्कासच हो मेघना ताई :-)

बाकी,अशी मिसळ खाल्ली तरी काही हरकत नाही...नंतर ग्यासिस चा त्रास नको ;-) काय ;-) ...

विसोबा खेचर's picture

27 Feb 2009 - 4:54 pm | विसोबा खेचर

सह्ही लेखमाला! पुनरागमनाबद्दल मिपावर स्वागत आहे! :)

बाय द वे, रेषेवरील अक्षरेवाल्या मॅडम इतके दिवस कुठे होत्या? रागावल्या तर नव्हत्या मिपावर?! :)

तात्या.

मेघना भुस्कुटे's picture

27 Feb 2009 - 4:58 pm | मेघना भुस्कुटे

रागावतेय कशाकरता? जरा कामाच्या गडबडीत होते. :)

दशानन's picture

27 Feb 2009 - 4:56 pm | दशानन

=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))

सही !

विनायक प्रभू's picture

27 Feb 2009 - 5:11 pm | विनायक प्रभू

एकदम झकास

चटपटीत's picture

27 Feb 2009 - 5:07 pm | चटपटीत

:| :) :? :))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

मनिष's picture

27 Feb 2009 - 5:11 pm | मनिष

झोकात पुनरागमन - डीअर बडी! :D

चतुरंग's picture

27 Feb 2009 - 5:17 pm | चतुरंग

लई म्हणजे लईच दिसानी अवतरलात! छान वाटलं. अशी फर्मास मिसळ असेल तर आम्ही जरुर येऊ खायला!!
बाकी वर्णन करण्यातला खाष्टपणा एकदम झणझणीत हो! ;)
संपूर्ण लेखच हहपुवा!!!! =)) =)) =)) =))

(अवांतर - परवाच कुणीतरी एका भन्नाट चहाची कथा मला ऐकवली ती अशी - त्याच्याकडे एक सद् गृहस्थ आलेले. (कुठल्या मुहूर्तावर घरातून निघाले होते कोण जाणे पण राहूकाल असावा बहुदा!) ह्याने चहा केला. पहिला घोट घेताच आलेल्या माणसाचा चेहेरा अशक्य झाला! तरीही कसाबसा घोटघोट करीत त्यांनी चहा संपवला (कमालीचे धाडसी म्हणायला हवेत!) आणि गेले बिचारे (म्हणजे निघून गेले!).
साखरेच्या ऐवजी मीठ असा अंदाज केलात ना? नाही सपशेल चुकलात. अहो हे कोणीही करील. त्याची आई घरी आली आणि स्वयंपाकाच्या ओट्यावर बरणी बघून म्हणते "हे काय, शिकेकाई कुणी काढली?"
महाशयांनी चहापत्तीच्या ऐवजी शिकेकाई वापरली होती!!!!! :D #o :T )

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Feb 2009 - 5:21 pm | बिपिन कार्यकर्ते

फुकटात पोट साफ करून मिळालं.... =)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

मेघना भुस्कुटे's picture

27 Feb 2009 - 5:24 pm | मेघना भुस्कुटे

हे काय, शिकेकाई कुणी काढली?

=))
=))

खरंय, मीठ कुणीपण घालील. शिकेकाई म्हंजे जिगरबाज माणूस असणार चहा करणारा. काय हो, ती काळ्या रंगाची असते ना?

रेवती's picture

27 Feb 2009 - 5:46 pm | रेवती

मस्त ग मेघना!
मस्त जमलीये मिसळ!
मीही असे अनेक (फसलेले) प्रयोग केलेत, करत आहे.
त्यामुळेच कदाचित सल्ला मनाच्या जवळचा वाटला असावा.

रेवती

सुप्रिया's picture

27 Feb 2009 - 5:46 pm | सुप्रिया

=)) =)) =)) =)) =)) =))
बापरे! हसून हसून पोटात दुखायला लागलं.
लेख तर फर्मास आहेच आणि प्रतिक्रियाही मस्त!

लिखाळ's picture

27 Feb 2009 - 6:47 pm | लिखाळ

वा.. लेख एकदम मस्त :) फार मजा आली ...

चतुरंगांनी लिहिलेला शिकेकाईचा चहा तर छप्परफाड :)
-- लिखाळ.

भडकमकर मास्तर's picture

28 Feb 2009 - 12:37 am | भडकमकर मास्तर

हेच मन्तो
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

शितल's picture

28 Feb 2009 - 2:20 am | शितल

मजा आली वाचुन..:)

प्राजु's picture

27 Feb 2009 - 8:20 pm | प्राजु

ख.... ण्..........ख्............णी..............त!!!!!!!!!
पुनरागमन अगदी खणख्णीत झालं आहे..
मस्त मस्त!! जबरदस्त लिहिलं आहेस.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सहज's picture

27 Feb 2009 - 9:14 pm | सहज

झोकात हजेरी दिली मेघनाबाई!

परप्रातांत जाउन एका सुगरणने तुमच्या प्रांतात घुसखोरी केली म्हणून लगेच हा भाग आणलात ना? :-)

सुवर्णमयी's picture

27 Feb 2009 - 11:38 pm | सुवर्णमयी

सर्वच लेख अप्रतिम आहेत. जोरदार.
सोनाली

अबोलि's picture

27 Feb 2009 - 11:52 pm | अबोलि

झ्कास हा मेघना! आणिक लवकरच वाचायला मिळु देत....

पिवळा डांबिस's picture

28 Feb 2009 - 3:29 am | पिवळा डांबिस

इथे मिपावर तुमच्या रेसेपीज आम्हाला सगळ्यात जास्त आवडतात...
लहानपणी (आईची नजर चुकवून!) वाचलेल्या माहेर, स्त्री वगैरे मासिकांची आठवण येते....
:)

केळ्या's picture

28 Feb 2009 - 5:48 pm | केळ्या

मूळची मिसळ झकास;पण प्रतिक्रिया फारच सुंदर!

लवंगी's picture

28 Feb 2009 - 6:50 pm | लवंगी

शैली छान आहे.. मजा आली वाचायला..

मेघना भुस्कुटे's picture

3 Mar 2009 - 10:16 am | मेघना भुस्कुटे

भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद मंडळी!

भलती भोळे's picture

27 Nov 2012 - 11:53 am | भलती भोळे

मस्तच

मृदुला सूर्यवंशी's picture

27 Nov 2012 - 2:27 pm | मृदुला सूर्यवंशी

मेघनाताई फार खुसखुशीत लिहीले आहे पण तुम्ही दिलेले वरील दुवे चालत नाहीत का? खुपदा प्रयन्त करून पाहिला.

मस्त !! फसफसून वर येणार्‍या रश्श्याचं चित्र डोळ्यासमोर येऊन हसतो आहे. ;)

मेघना भुस्कुटे's picture

27 Nov 2012 - 4:53 pm | मेघना भुस्कुटे

आभार मंडळी, सगळे लेख इथे गावतील.

आमोद's picture

27 Apr 2014 - 5:31 pm | आमोद

जबराट