`तारे' जमीं पर नव्हे, जमीनदोस्त!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
5 Feb 2009 - 11:19 pm

कित्ती हुशार आहे हो तुमची मुलगी! किती छान नाचते, हावभाव करते, समज तरी किती आहे तिला वयापेक्षा!! :)
या आणि असल्या प्रशंसेने आम्ही (आणखीनच) फुगलो होतो. त्यातून भर पडली, सारेगमप सुरू झाल्यानंतर तिच्या आणि मुग्धा वैशंपायनच्या तुलनेची. "सेम टू सेम मुग्धा हं!' :S अशा कॉंप्लिमेंट्‌स मनस्वीला घडोघडी, जागोजागी मिळू लागल्या. "अगं मुग्धा, मला ओळखलंस का?' असं थेट विचारणाऱ्या अनोळखी बायकाही ठिकठिकाणी भेटू लागल्या. जणू या बया गेल्या जन्मी मुग्धाच्या आयाच होत्या आणि आता नव्या जन्मात मुग्धानं मनस्वीचं रूप घेतल्यानंतर त्या तिला जुनी ओळख दाखवू पाहत होत्या! :(
मनस्वीच्या अंगातही मग "मुग्धा' संचारायला वेळ लागला नाही. आधी "एकापेक्षा एक' चालू असताना ती भार्गवी चिरमुले, अमृता खानविलकर होती. आता मुग्धा, आर्या, कार्तिकी झाली. मग शाळेतून घरी आल्यानंतर तोंडापुढे मुठीचा माईक धरून ती घराचा "सारेगमप'चा मंच करून टाकायची! मला आणि बायकोला आलटून पालटून अवधूतदादा आणि वैशालीताईच्या भूमिका बजावायला लागायच्या. :SS
manutaai 028

तर अशी ही "सर्वगुणसंपन्न, नृत्यनिपुण, अष्टकलापारंगत' मनस्वी शाळेच्या पहिल्या स्नेहसंमेलनात धिटाईनं स्टेजवर उभी राहिली आणि नाचली, तेव्हा आम्हाला कोण आनंद झाला होता! घरी करून दाखवत असलेल्या सगळ्या स्टेप्स तिनं तिथे स्टेजवर जशाच्या तशा साकारल्या, तेव्हा आम्हाला खुद्‌कन हसूही आलं होतं. एकमेकींना टाळी देतानाचा गोंधळ तर पाहण्याजोगा! या धिटुकलीची ही धिटाई बघायला अख्खा परिवार लोटला होता.
मग डिसेंबरात दुसरं स्नेहसंमेलन आलं. "शाळेत नुसते डान्स नि गॅदरिंगच घेतात की काय,' पासून सर्व प्रचलित वाक्‍यांची पुन्हा पारायणं झाली. =D> प्रत्यक्षात स्नेहसंमेलनाच्या दिवशी आधीच्या एवढी मजा आली नाही. एकतर तिथे शूटिंग करायला, फोटो काढायला शाळेनं अचानकच बंदी केली. त्यामुळं आमचा पोपट झाला. त्यातून मनस्वी एवढी चांगली नाचणारी असूनही तिला दुसऱ्या रांगेत उभं केल्यानंही आम्ही धुसफुसत राहिलो. म्हटलं, जाऊ द्या! पुन्हा कधीतरी बघून घेऊ!
या भक्कम पायाभरणीच्या जोरावर आमचे स्वप्नांचे इमले म्हणजे अगदी गगनाला भिडले होते. त्यामुळं तिच्या "बाल भवन'चं गॅदरिंग जाहीर झालं, तेव्हा तर मनस्वी "बेस्ट परफॉर्मर ऑफ द डे' ठरणार, हे आम्ही मनातल्या मनात पक्कं करून टाकलं होतं! खोकला का काही कारण झालं आणि स्नेहसंमेलनाच्या आदल्याच दिवशी म्हणजे, शेवटच्या प्रॅक्‍टिसला आम्ही तिला पाठवलं नाही. म्हटलं, करेल ती लक्षात ठेवून! =;
स्नेहसंमेलनाचा दिवस उजाडला. विशेष ड्रेसकोड नव्हता, त्यामुळं मुलीला नटवताना आईची "हा ड्रेस की तो,' अशी त्रेधातिरपीट उडाली. सगळं साग्रसंगीत आवरून तिला बाल भवनात नेली. तिसराच डान्स तिचा होता. "बरं का रे मोरा' या गाण्यावर. ते गाणं बाल भवनचंच असल्यामुळं आम्ही आधी ऐकलेलं नव्हतं. आधीची तिची गाणी "आज गोकुळात रंग' आणि "उदे गं अंबे उदे' होती. मनस्वीच्या डान्सची वेळ आली आणि पडदा उघडला. मनस्वीसह तिघी मुली नाचणार होत्या आणि मुलगे मोरासारखे उभे राहणार होते. सुरुवातीच्या वाक्‍यानंतर तिन्ही मुलींनी पुढे येऊन मुलग्यांभोवती नाचायचं, असलं काहीतरी ठरलं असावं. दोघी मुली पुढे आल्या आणि त्यांचा ठरलेला नाच करू लागल्या. मनस्वीसुद्धा पुढे आली आणि स्तब्ध उभी राहिली. समोर कोण बसलंय, लाईट कुठे लावलाय, भानुदासकाका कुठे दिसताहेत, गटातल्या मुली आहेत का, आई-बाबांचे चेहरे दिसताहेत की नाही, वगैरे वगैरे कुतूहल शमविण्याचा ती प्रयत्न करत होती. गाण्याकडे तिचं ढिम्म लक्ष नव्हतं. बरं तिच्यासोबतचा मुलगाही तिच्याहून वरचढ निघाला. त्या बाबानंही काही तिला हलवलं नाही, की बाईंनी स्टेजवर येऊन ढकललं नाही. अख्खं दोन-तीन मिनिटांचं गाणं तिनं एका जागी उभी राहून "एन्जॉय' केलं. >:)
त्या दिवशी संध्याकाळी तिचा मूड जाऊ नये, म्हणून दुपारी व्यवस्थित दामटून झोपवलं होतं. खायला घालून तिथे नेलं होतं. त्यामुळं यापैकी कुठली कारणं तिच्या "नॉन-परफॉर्मन्स'च्या आड येणारी नव्हती. तिनंही न नाचण्याचं कारण गुलदस्तातच ठेवलं. अजूनही ते आमच्यासाठी एक गूढच आहे! :S
"तारे जमीं पर'मधले पालक मुलावर अपेक्षांचं ओझं लादतात. आम्ही तिच्याबद्दलच्या अपेक्षांचं ओझं स्वतःवरच लादून घेतलं होतं, बहुधा. बाल भवनात त्या अपेक्षांचा फुगा फुटला. कानात बसलेले दडे अजून मोकळे होताहेत...!

मुक्तकआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

5 Feb 2009 - 11:22 pm | विसोबा खेचर

वा! खूप गोड पोरगी आहे!

तिला माझ्याकडून एक भला थोरला मिठाईचा बॉक्स लागू! :)

तात्यामामा. :)

आपला अभिजित's picture

5 Feb 2009 - 11:25 pm | आपला अभिजित

रिकामा असेल, तर तिला खेळायला देईन. भरलेला असेल, तर मीच घेईन म्हणतो!!

चतुरंग's picture

5 Feb 2009 - 11:28 pm | चतुरंग

मुलं त्यांची ती मुखत्यार असतात आणि त्यांना जे पाहिजे तेच करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं! ;)
परफॉर्मन्स हा बाकीच्यांसाठी असतो त्यांच्यासाठी ती फक्त एंजॉयमेंट असते. मनात आलं केलं, नाही तर राहिलं.
तुमची कन्यका एकदम चुणचुणित दिसते आहे. अतिशय बोलके डोळे आहेत धिटुकलीचे.
भर स्नेहसंमेलनात तुमच्या डोळ्यांसमोर तारे चमकवणार्‍या तिचे आणि अशा मुलीचे पालक म्हणून आपलेही अभिनंदन! :)

चतुरंग

प्राजु's picture

5 Feb 2009 - 11:33 pm | प्राजु

दिसतेच त्या मुग्धासारखी.
फुगाच तो..... फुटायचाच!! त्यात इतकं काय वाईट वाटून घ्यायचं? लेकीने सांगितलं का फुगे फुगवून बसा म्हणून??
गोड आहे पोरगी.
मस्त अनुभव.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Feb 2009 - 11:34 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्तच. लहान मुलं कधी कोणाचा पो करतील काही सांगता येत नाही. पण तुम्ही पण हे सगळं इतकं छान समजून घेतलं त्याचं पण कौतुक वाटतंय. :)

पोट्टी गोडच.

बिपिन कार्यकर्ते

धनंजय's picture

5 Feb 2009 - 11:37 pm | धनंजय

छान रंगवलाय. तुमच्याबरोबर आमच्याही अपेक्षा आपटल्या. काही झाले तरी पण मुलगी मात्र भारी गोड दिसते तुमची!

भडकमकर मास्तर's picture

5 Feb 2009 - 11:39 pm | भडकमकर मास्तर

छान लिहिलंय...
लहान मुलं अशीच गंमत करत असतात...

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

5 Feb 2009 - 11:45 pm | संदीप चित्रे

तुम्हा दोघांचा फुगा फुटला म्हणून तिला रागवला नाहीत (असं गृहित धरतोय) ते महत्वाचं :)

आपला अभिजित's picture

5 Feb 2009 - 11:49 pm | आपला अभिजित

रागावतोय कुठला?

उलट तीच आमच्याकडून (म्हणजे बर्‍याच वेळा माझ्याकडून) तिच्या न्रुत्याच्या स्टेप्स बसवून घेते आणि मी चुकलो, कंटाळलो, तर बरीच बोलणी खावी लागतात! X( शाळेत ती जाते की मी, हा प्रश्नच पडतो अशा वेळी!!

जमाडी जम्मत ! गमाडी गम्मत ... पण मूड असेल तेव्हाच !
just an observation --- तुमच्या मुलीचे डोळे खुपच छान टपोरे आहेत
Fascinating ,Captivating eyes with eyebrows been archived (sorry याला मराठीत काय म्हणतात माहीत नाही )
~ वाहीदा

प्राची's picture

6 Feb 2009 - 12:05 am | प्राची

>>एकमेकींना टाळी देतानाचा गोंधळ
=))
=))
=))
लहान मुलांकडून झालेल्या या चुकासुद्धा(गमतीजमती) त्यांच्या निरागसपणामुळे बघणार्‍याला आनंद देऊन जातात.

शितल's picture

6 Feb 2009 - 12:10 am | शितल

छान लिहिले आहे..:)
माझ्या लेकाला नाच करायला सांगितले की नुसत्या माकड उड्या मारतो. :(

स्वातीदेव's picture

6 Feb 2009 - 2:00 am | स्वातीदेव

तुमच्या मुलीच्या शाळेच्या स्नेहसंमेलनाचा व्हिडीओ पाहीला. खूप गोड आहे ती. चुणचुणीत आहे. :)

रेवती's picture

6 Feb 2009 - 2:31 am | रेवती

काय मस्त प्रकार आहे हा!
नाच मस्तच आहे. टाळ्या देतानाची मजा बघून जाम हसले.
तुमची मुलगी मुग्धासारखीच गोड आहे. दोघींच्या चेहेर्‍यात साम्य नक्कीच आहे.

रेवती

चित्रा's picture

6 Feb 2009 - 5:33 am | चित्रा

तुमच्या गोड लेकीला नटण्याची खूप आवड दिसते आहे. :)

अजूनही ते आमच्यासाठी एक गूढच आहे!
मुलांच्या छोट्या डोक्यात काही तरी चालू असते बहुदा अशा वेळी. कधीकधी समोरच्या गर्दीकडे पाहून गप्प बसतात, कधी कॅमेर्‍याच्या फ्लॅशची सवय नसल्याने त्याने लक्ष विचलित होते. पण तुम्ही मुलीला उगीच खोदून प्रश्न विचारले नाहीत हे चांगले झाले.

सहज's picture

6 Feb 2009 - 7:22 am | सहज

अभिजित लेख छान. व्हिडीओ धमालं. मजा आली.

अनिल हटेला's picture

6 Feb 2009 - 7:37 am | अनिल हटेला

खरच मजा आली !!!
:-D

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

महेंद्र's picture

6 Feb 2009 - 8:11 am | महेंद्र

अभिजित,
मजा वाटली. आता माझ्या मुली टिन एजर्स झाल्या पासुन ह्या आनंदाला मुकलो आहे.
खुप छान व्हिडीऑ आहे ..

दशानन's picture

6 Feb 2009 - 8:14 am | दशानन

अरे ही तर सेम माझ्या भाची सारखी दिसते आहे.. सेम तु सेम उभ्या वेण्या.... ;)

सुंदर !!

तुनळीचा दुवा पाहीला... :)

अपेक्षा.... !

अपेक्षेच्या वजन एवढं वाढवू नका की तुम्हालाच जानवेल की फुगा फुटला ते ;)

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

राघव's picture

6 Feb 2009 - 10:32 am | राघव

पोरगी अगदी गोडोबा आहे. :) चुणचुणीत!!
बाकी परफॉर्मन्स बद्दल आपण "काय बी बोलनार नाय!". अवो त्याबाबतीत आडातच नाय आपल्या तर पोहर्‍यात कुठुन येईल? :)

मुमुक्षु

आपला अभिजित's picture

6 Feb 2009 - 10:52 am | आपला अभिजित

अवो त्याबाबतीत आडातच नाय आपल्या तर पोहर्‍यात कुठुन येईल?

हा उपटसुंभपणा करायला कुणी सांगितलं होतं? माझा नाच बघायला तुम्ही कधी आला होतात?? 8>

बाकी तुम्ही हे माझ्या बाबतीतच म्हणालात ते ठीक आहे. तिच्या आईच्या बाबतीतली ही कॉमेंट असेल, तर मात्र तुम्ही आडात असे जाऊन पडाल, की पोहर्‍याने सुद्धा वर काढता येणार नाही!!

परिकथेतील राजकुमार's picture

6 Feb 2009 - 11:33 am | परिकथेतील राजकुमार

मुलगी दिसण्यात आईच्या आणी परफॉर्मन्स मध्ये बाबांच्या वळणावर गेली आहे ;)
हि प्रतिक्रिया चालेल काय ?
बाकी टाळ्या देतानाचा व्हिडीओ बघुन मज्जा आली, त्या वेळी शिक्षकांच्या चेहर्‍यावर उमटलेले भाव बघण्यात अजुन आनंद मिळाला असता !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

राघव's picture

6 Feb 2009 - 12:51 pm | राघव

अवो, थ्ये आमी सोताबद्दल म्हनत हुतो! मपल्याला सोताला परफॉर्मन्स चा प बी येत नाय तर त्याबद्दल काय बोलनार असं म्हनायचं हुतं आमास्नी!
आपुन तर थुमचे फ्यॅन हाउत. थुमच्याबद्दल आमी असं कसं बोलनार?? :)

मुमुक्षु

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Feb 2009 - 11:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अभिजीत, पोरगी एकदम बाहुली आहेच. तुम्ही तिचं बालपण हिरावून घेत नाही आहात हे पाहून खरंच खूप आनंद झाला. तिला उदंड शुभेच्छा.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

आचरट कार्टा's picture

6 Feb 2009 - 12:31 pm | आचरट कार्टा

अभिजितभाऊ,
ह्या पोरांचा असाच असता. खंय चार लोकांत आयशी-बापसान सांगल्यान, "अगदी छान कविता म्हणून दाखवते... म्हण म्हण, चांदोबाची म्हण..." काय पोरान निस्ता "अँ" येवडाच बोलूचा असता, असो नियम हा!
पोरांच ती. टेपरेकॉर्डर थोडोच हा? मनात इला काय वाजलो?

तुमी ह्या समजून घेतंस, ता बरा हा. नायतर "माज्या चेडवान ह्या करूकच व्हया" म्हणान बापूस हटान बसाक लागलो, काय पोरांचे हाल सुरू...

नि एक सांगूचा हा, राग मना नुको. चेडवाची चाक (दृष्ट) काडा आज :)
माका काय? वाटला काय चल!