एका चर्चेच्या निमित्ताने माझे २ पैसे
===================
-राजीव उपाध्ये
(निमित्त - अमरेंन्द्र बाहुबली यांचा धागा.)
घर भाड्याचे की स्वत:च्या मालकीचे याची अलिकडे वारंवार चर्चा होत असते. योग्य नियोजन केल्यास भाड्याचे घर हा आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर पर्याय असला तरी मानसिक स्वास्थ्य हा निकष असेल तर मात्र स्वत:चे घर केव्हाही योग्य...
गेले ~५० वर्षे मी स्वत:च्या मालकीच्या घरात (टु बी प्रिसाईज "बंगल्यात") राहात आहे. हा अनेकांच्या वैषम्याचा विषय आहे. पण स्वत:ची जमीन आणि स्वत:चे आकाश या सुखाबरोबरच काही प्रश्न बरेच गंभीर आहेत.
माझ्या आईवडीलांनी काही अपरिहार्यतेतून (इस पार या उस पार) घर बांधायचा निर्णय घेतला. "कर्ज घेणे पाप" या तेव्हाच्या समजूतीमुळे कमीतकमी आणि आवश्यक तेव्हढेच कर्ज घेतल्यामुळे वडीलांचा स्वत:चा खिसा (बचत) पूर्ण साफ झाला. त्याचा परिणाम नंतर पुढे कित्येक वर्षे **भयानक आर्थिक झळ** सोसण्यात गेला.
आर्थिक झळ मोठ्या प्रमाणावर बसल्याने त्याचा मोठा परिणाम मानसिक/शारीरिक स्वास्थ्य, शैक्षणिक कामगिरी, सामाजिक आयुष्यावर होतो. आम्ही स्वत:च्या घरात राहात होतो तरी खर्चाच्या बाबतीत मी मागे असे. नूमवीतून कोथरूडला एकवेळ बसने आणि एक वेळ चालत जायचो. आईवडीलांना ज्योतिषाने घाबरवून सोडल्याने सायकल चालवायला परवानगी नव्हती.
माझे तेव्हाचे मित्र मला आजही तुच्छतेनेच वागवतात. बर्याच लोकांची अशी इच्छा अशी धारणा असते की तुम्ही काही कारणाने खड्ड्यात पडलात तर तुम्ही कायम खड्ड्यातच राहावे. पण माझी मुलगी मात्र याबाबतीत माझ्यापेक्षा खुप नशीबवान आहे, याचे समाधान खुप मोठे आहे. तिला माझ्यापेक्षा खुप चांगल्या मित्रमैत्रीणी मिळाल्या. मला वैकुंठावर न्यायची जेव्हा वेळ येईल तेव्हा माझ्या मित्रांपेक्षा माझ्या कन्येचे मित्र/मैत्रीण नक्की पुढे येती्ल याचे समाधान मोठे आहे.
स्वत:च्या घरात तुम्ही राहत असला तरी सगळे प्रश्न सुटले असे होत नाही. तुम्ही फ्लॅटमध्ये (भाड्याच्या अथवा स्वत:च्या मालकीच्या) राहात असाल तर फ्लॅटला केव्हाही कुलूप लाऊन तुम्ही कुठेही जाऊ शकता. पण स्वत:चा बंगला असेल तर सध्याच्या काळात मात्र असे करता येत नाही. मला स्वत:ला घराच्या काळजीने अनेक स्वप्नाना मुरड घालावी लागली. आजही कुठे पर्यटनासाठी गेलो तरी २-३ दिवस झाले की घराच्या आठवणीने अस्वस्थ होते. घराच्या भिंती कितीही निर्जीव असल्या तरी त्या उभ्या करताना केलेले कष्ट सजीव हातांचे होते, त्यासाठी वापरलेली पै-पै सजीव आणि अस्सल होती, त्यामुळे माझ्या घराबद्दलच्या भावना पण तितक्याच सजीव आणि अस्सल आहेत.
हळुहळु "स्वत:चा बंगला" अनेकांच्या वैषम्याचा विषय बनत जातो. तेव्हा खरे प्रश्न निर्माण होतात. माझे वडिल १९८६ साली निवर्तले तेव्हा यच्चयावत लोकांनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता "घर विकून टाका" म्हणून धोशा लावला होता. याला अपवाद माझ्या आय० आय० टी० मधल्या एका प्राध्यापकाचा - त्यांनी निक्षून सांगितले की आता सर्वजण घर "विकून टाका" असा सल्ला देतील पण काहीही झाले तरी "घर विकू नका". साहजिकच मी आणि आईने तो सल्ला शिरोधार्य मानला. आपल्या आतल्या आवाजाला बळ देणारी माणसेच फक्त आपली असतात (त्यांना आपल्या सुखाचे/प्रगतीचे दु;ख होत नाही.)
कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही पण आजही एकुलती एक मुलगी जर वारस असेल तर अजुनही अनेक जण भयानक अस्वस्थ होतात. मग लुबाडण्यासाठी हरतर्हेचे प्रयत्न केले जातात. एका पवित्र गुरुवर्यांच्या हलकट पत्नीने मला निर्लज्जपणे सांगितले, "जावयाला इस्टेट देण्यापेक्षा आम्हाला द्या". राहत्या जागेवर स्कीम करत नाही म्हणून तर अनेकजण बोटं मोडताना दिसतात. त्यांची अस्वस्थता तर कशानेही लपत नाही.
तात्पर्य स्वत:चे घर असले तरी त्याची डागडूजी एव्हढीच जबाबदारी राहत नाही, त्याला सांभाळणे पण तितकेच अवघड असते कारण ते इतरांना वाटणार्या असूयेवर अवलंबून असते...
प्रतिक्रिया
21 Aug 2025 - 11:50 am | आग्या१९९०
स्वतःचा बंगला असल्याने मलाही काही अडचणी जाणवतात. घर बंद करून बाहेरगावी गेल्यास घराचे cctv कॅमेरे सतत आजुबाजूच्या हालचालींचे मेसेज पाठवत असल्याने प्रत्येकवेळी घर सुरक्षित आहे ना ह्याची खात्री करत असतो. मागे घर काही दिवस बंद होते तेव्हा कोणीतरी meter box मधून मेन स्विच बंद केल्याने इन्व्हर्टरचा बॅक अप बंद झाल्याने cctv बंद झाले. शंका आली म्हणून मित्राला फोन केला. तेथील वीजपुरवठा खंडित झालेला नव्हता. त्याला बंगल्यावर चक्कर मारायला सांगितले , कुलूप जागेवर होते, मेन switch बंद होते ,ते त्याने चालू केले, थोड्याच वेळात cctv कॅमेरे चालू झाल्याचे दिसले. घरी आल्यावर बघितले तर फ्रिज मधील सगळ्या वस्तू खराब
झाल्या होत्या. सोसायटीतील स्वतःचे घर आणि स्वतंत्र घर ह्यात जबादाऱ्यामध्ये बराच फरक आहे.
21 Aug 2025 - 12:05 pm | कंजूस
बरोबर आहे.
पण जिथे बंगला प्रॉपर्टी टिकवून ठेवण्याची समाजात आवड आणि प्रवृत्ती आहे तिथे काही त्रास होत नसतो. उदाहरणार्थ वसई विरार भाग. आजुबाजूच्या बंगल्यांतून वावर असतो. एकमेकाला धरून असतात रहिवासी. त्या रस्त्याने जाणारा नवखा माणूस लक्षात येतो. बंगला बंद असेल तर खिडक्यांच्या काचा फोडल्या जात नाहीत.
21 Aug 2025 - 5:47 pm | युयुत्सु
मुंबईत एकंदरच पुण्यापेक्षा माणसं एकमेकांना सांभाळून राहतात.
21 Aug 2025 - 12:37 pm | राजेंद्र मेहेंदळे
ही फक्त भारतातीलच नाही, तर परदेशातीलही परीस्थिती आहे.
१. बंगला म्हटले की त्याचा सगळा मेंटेनन्स (स्वच्छता, लाईट, पाणी, सुरक्षा,रंगकाम) स्वतःला करावी लागते. फ्लॅटमध्ये हे खर्च विभागले जातात.
२. तरुणपणी पैसा नसतो पण बंगला हवा असतो, म्हातारपणी पैसा असतो पण बळ नसते. म्हणुन फ्लॅट बरा वाटतो.
३. त्यातल्या त्यात भारतात पैसे टाकुन स्विगी,झोमॅटो,ओला,उबर्,सिक्युरिटी, कामाला माणासे वगैरे मिळतात म्हणुन आणि थोडेफार शेजार पाजारच्या चांगुलपणावर चालुन जाते. परदेशात तेही नाही किवा खुपच महाग.
४. तरुणपणी कुठेही लांबवर स्वस्तात मोठी घरे मिळाली म्हणुन घेणारे वय झाले की गुमान शहराच्या मध्यावर भाड्याने फ्लॅटमध्ये रहायला येतात.
५. एकट्या दुकट्या वयस्कर लोकांच्या बंगल्याभोवती एजंट लोक कायमच घिरट्या घालत असतात. त्यात नवल काही नाही.
तस्मात "हाती नाही बळ, दारी नाही आड, त्याने फुलझाड लावु नये"
21 Aug 2025 - 1:23 pm | अमरेंद्र बाहुबली
धुळ्यातील एक किस्सा, एका बंगल्यात एक म्हातारी राहत होती, तिची दोन्ही मुले अमेरिकेत होती, घर विक म्हणून शहरातले गुंड तिच्यामागे लागले, ती अडून बसली, अमेरिकेतील मुलानी काही केले नाही की काय माहीत नाही, पण म्हातारीचा बंगला खरे/ खोटे कागदपत्र दमदाटी करून सह्या वगैरेंनी कसे माहीत नाही पण लाटला, इथपर्यंत झाले पण नंतर त्या बंगल्यावरून त्या गुंडात आपसात वाद झाले, त्या वादातून एकाचा खून झाला, तो खून सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला, इतका भयंकर खून होता की सारे शहर हादरले, त्या खुनाचा व्हिडिओ तुफान पसरला, युट्युबलही आहे. तलवारीने तुकडे तुकडे केले.
बाकी तुम्ही म्हणता ते खरे आहे, प्रॉपर्टी हडपण्यासाठी प्रचंड त्रास दिला जाती एकट्या दुकट्या माणसाला!
21 Aug 2025 - 7:50 pm | विवेकपटाईत
जे लोक व्यवसायिक आहे आणि त्या शहरात राहणार.उदा.किराणा स्टोअर हलवाई इत्यादी. त्यांनी अवश्य बंगला किंवा घर बांधले पाहिजे. बाकी ज्यांना नोकरीच करायची आहे आणि एकच अपत्य आहे. त्यांनी फ्लॅटमध्ये राहणे उत्तम. कारण नोकरीच्या निमित्ताने कुठेहाकुठे भटकावे लागेल कुणालाच माहीत नाही. बाकी सामान्यत: कोणीही २०- ५० वर्षांपेक्षा जास्त एका जागी राहात नाही. ३५ वर्ष स्वतः च्या घरात राहून मीही फ्लॅट मध्ये आलो. कारण मुलाची नोकरी.
21 Aug 2025 - 8:00 pm | सुबोध खरे
आमच्या सासऱ्यांच्या पनवेलला बंगला होता. ते काश्मीरला गेले असताना तेथे चोरी झाली पहिल्या दिवशी फारसं काही गेलं नाही
सासऱ्यां च्या मित्राने तेथे फोन केला तेंव्हा सासर्यांनी त्यांना गोद्रेजच्या कपाटातील चांदीची भांडी काढून घ्यायला सांगितली.
दोन दिवसांनी परत त्यांच्या बंगल्यात चोरी झाली. यावेळेस सासूबाईंच्या महागाच्या साड्या सोडून काहीच मिळाले नाही.
त्यांनी जाताना सगळे पितळेचे नळ काढून नेले. त्यामुळे तळमजल्यावर पाणी भरले.
शेजारी तुम्हाला काही २४ तास मदत करू शकत नाहीत.
बंगला असल्याचा हा मोठा तोटा असतो.
सासूबाई गेल्यावर आम्ही सासर्यांना बंगला विकून टाकायला लावला आणि आता ते मुलाच्या फ्लॅट मध्ये पुण्याला राहतात