ही लिंक आपल्याला तू नळीवर घेऊन जाईल. चित्रफित बघा. रोजच्या पक्षीदर्शनात विविध पक्षांचे मानव सदृश्य स्वभाव बघायला मिळतात. ते बघताना प्रकृतीबद्दलचे कुतुहल आणखीन वाढत जाते.
"कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरूषार्था"
मनोहर कविश्वर यांच्या गीता प्रमाणे, सैन्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नाव मिळवून सेवानिवृत्त झाल्यानंतर बापाचे कर्तव्य पुर्ण करत मुलींची लग्ने केली.जगरहाटी,नातवंड झाली. थोडी मोठी झाल्यावर "जा,आजोबा छान गोष्ट सांगतात ",असे म्हणून सोईस्करपणे नातवडांची रवानगी आजोबांच्या खोलीत होऊ लागली.कर्तव्यदक्ष पंडीत विष्णू शर्मा कर्तव्यदक्ष आजोबांच्या मदतीलाधावून आला. आजोबा दररोज पंचतंत्रातील गोष्ट आपल्या नातवंडाना सांगू लागले.
आजोबा Gen X च्या पुर्वीचे,नातवंड Gen Alpha, प्रश्न न विचारतील तर नवलच! "आजोबा,विष्णू शर्मा (इथे जेन अल्फा थोडी अडखळली. नेमके विष्णुपंताना काय संबोधावे?असा त्यांना प्रश्न पडला. त्यांनीच तोडगा काढला व First name घेणेच त्यांना सोईस्कर वाटले. किती काॅनफिडन्स!!!) यांना एव्हढ्या गोष्टी कुणी सांगीतल्या?". मी निरुत्तर. मी माझ्या आजोबांना जर असे प्रश्न विचारले असते तर आजोबांनी माझे गाल गुलाबी तरी केले असते किंवा आईकडे हाकलून दिले असते.नवीन गोष्ट सांगतो म्हणून तात्पुरते नातवंडाचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.कोल्हा आणी कावळ्याची गोष्ट सांगायला सुरवात केली.
गोष्ट ऐकल्यावर नातवंडे म्हणाली,"आजोबा, प्रत्येक गोष्टीत नेहमी कावळाच का व्हिक्टिम दाखवला आहे. विष्णूशी काही दुश्मनी होती काय? बिचारा कावळा!,सगळे त्याला त्रास देतात. चिमणीने घरात घेतलं नाही,कोल्ह्याने फसवून त्याचा मांसाचा तुकडा खाल्ला, माठातले पाणी सुद्धा खाली तळाला गेले होते." "आजोबा, खरंच कावळा ऐवढा बुद्धू आहे का हो?" इती नातवंडे.
मला या अल्फा पोरांच कौतुक वाटलं आणी आम्ही लहानपणी कावळ्या सारखेच होतो का काय असा प्रश्न पडला."चला,चला खुप रात्र झाली,गोष्ट संपली,सकाळी शाळेत जायचंय ना!", नातवंडांना आईबापां कडे पाठवून दिले.पावसाळी हवा,थंड,पायापाशी पडलेलं इटालियन कांबळं डोक्यावर ओढून घेतलं.
सकाळ झाली. घरात सामसूम होती. कामाची मंडळी कामावर गेली.आजीबाई क्राईम पेट्रोल च्या फॅन,रात्रीचा साडेबाराची मालिका बघून झोपल्या होत्या.आपल्यापुरता चहा बनवला आणी फिरायला बाहेर पडलो.सवयी प्रमाणे फिरणे झाल्यावर कालोनित व्यायाम बागेत (जशी बंद खोलीत व्यायाम शाळा तशी खुल्या बागेतली व्यायामबाग) इतर समवयस्कां बरोबर हातवारे करू लागलो. नजर भिरभिरत होती.कालोनीला लागूनच बैठे घर व पत्र्याची शेड, शेड मधे गायी म्हशींचा गोठा. गोठ्याच्या छतावर नजर गेली,तीथे एक कावळा बागडत होता.आज त्याचे नशीब खुप जोरावर असावे. छतावर एक पावाचा तुकडा आणी कोंबडीचे अंडे पडले होते.तीथे कसे आले ते देव जाणे. कदाचित कोंबडी ब्रेड खात खात छतावर चढली असावी आणी अंडे देण्याच्या नादात ब्रेड खाणे विसरली. बाळंतपण म्हणजे पुनर्जन्म हो, किती थकवा येतो. म्हणतात ना जावे त्याच्या वंशा.....
अंड्याकडे बघून कावळ्याची लाळ टपकत होती. तो ब्रेड खाऊ,की अंडे खाऊ असा विचार करत करत त्या खाण्याभोवती उड्या मारत होता. एव्हढ्यात, अचानक कुठूनतरी दोन "नाचरे पक्षी (नाव्ही,नाचण, व्हाईट स्पाॅटेड फॅनटेल) ",आल्या व कावळ्याला हुसकून लावण्याचा प्रयत्न करू लागल्या.बिचारा कावळा!,त्याने आपला इरादा बदलला. मदतीसाठी भाऊबंदाना बोलवू लागला. (आगोदर एकट्यानेच खाण्याचा विचार होता त्याचा).
"नाचण", चिमणीपेक्षा थोडा मोठा पक्षी. कावळ्याचे आकारमान नाचण या पक्षाच्या तुलनेत कित्येक पटीने मोठे. "संगठणमें शक्ती है", हे बहुतेक त्यांना माहित असावे.थोडावेळ त्याला त्रास दिला,गर्दी जमली तर आपलीच शामत येईल,असा शहाजोग विचार करून दोन्हीं पक्षी दूर निघून गेले.कावळ्याने सुखेनैव ब्रेड अंड्यावर ताव मारला.मलाहीभुक लागली होती. इतरांचा निरोप घेत घराकडे प्रस्थान केले.
मला नातवंडांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. कावळा लुच्चा व लालची असतो........
प्रतिक्रिया
24 Jul 2025 - 7:32 pm | कंजूस
अशा लबाड कावळ्याची फजिती गोष्टीत असते आणि बरं वाटतं. त्याचं घर वाहून जातं, चिमणी हाकलून देते.
25 Jul 2025 - 12:41 pm | अमरेंद्र बाहुबली
लेख व तुनळी व्हिडिओ आवडला.
29 Jul 2025 - 11:33 am | विवेकपटाईत
डार्विनच्या सिद्धांत आहे जे संगठित ते जिवंत राहतात. कावळा संगठित राहिला त्याने पाव खाल्ला आणि अंडीही.
30 Jul 2025 - 1:11 pm | श्वेता व्यास
व्हिडीओ आवडला. आता Gen Alpha ला गोष्टी सांगताना लुच्चा आणि लोभी म्हणून कबुतरांना पण घ्यावं काय, असा प्रश्न तुमची गोष्ट वाचून पडला :)