HAL HF-24 मरूत

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in जनातलं, मनातलं
16 Jun 2025 - 9:33 pm

उद्या १७ जानेवारी, याच दिवशी म्हणजे १७ जानेवारी १९६१ रोजी पहिल्या स्वदेशी बनावटीच्या HAL HF-24 मरूत विमानाने यशस्वी उड्डाण केले होते.

याच प्रसंगाचे औचित्य साधून त्याची माहिती द्यायचा प्रयत्न .

स्वांतत्र्यपूर्व काळात भारताची औद्योगिक प्रगती फारच कमी होती. कच्चा माल परदेशी नेउन विकणे , तिकडे प्रक्रिया करणे या धोरणामुळे उद्योग क्षमता नष्ट झाली होती.
त्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था , उद्योगांची साखळी व्यवस्था अस्तित्वात नव्हती.
स्वातंत्र्यानंतर स्वाव्लंबनाचे धोरण आणण्याचा प्रयत्न केला गेला.
देशात सुई तयार होत नाही अशी हेटाळणी केली जात होती तिथे पं नेहरूंनी स्वदेशी विमानाचे स्वप्न पाहिले.

याची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळात झाली होति .
१९४० साली वालचंद हिराचंद दोशी या मराठी उद्योजकाने हिंदुस्थान ऐरोनौटिक्स या विमान बांधणीच्या कारखान्याची स्थापना केली होती पण दुसर्‍या महायुद्धाच्या काळात या कारखान्याचा ताबा ब्रिटीश सरकारने घेतला. तिथे सुटे भागांचे उत्पादन केले गेले.

HAL

स्वातंत्र्यानंतर या कारखान्याचा ताबा सरकारकडे आला.

तिथे १९५६ मध्ये एचएएलने एचएफ-२४ मरुत प्रकल्पाला सुरुवात केली.
अर्थात यासाठी लागणारे तंत्रज्ञ देशात नव्हते , म्हणून जर्मन वैमानिक अभियंता कर्ट टँक यांना भारतात आमंत्रित केले. कर्ट टँक हे दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या लूफ्तवाफसाठी प्रसिद्ध वुल्फ एफडब्ल्यू १९० विमानाचे डिझायनर होते. त्यांचा अनुभव आणि तांत्रिक कौशल्य या प्रोजेक्टसाठी महत्वचे ठरले.

या प्रोजेक्टची मुख्य उद्दीष्ट्ये होती. १. उत्पादन (स्वदेशी) २. लढाऊ क्षमता ३ . वेग (मॅक २ पर्यंत वेग मिळवणे).

अर्थात परीस्थिती दिल बहलाने के गालीब खयाल अच्छा है ! अशीच होती.
दुसर्‍या महायुद्धानंतर शस्त्रास्त्र स्पर्धा बघता आणि भारत पाकीस्तन चे संबंध पाहता कोणी तंत्रज्ञान न देता केवळ ग्राहक म्हणून भारताकडे बघणार होते.
फक्त इण्जिनसाठी प्रकल्प लांबवत नेणे फायद्यचे नव्हते, म्हणून इण्जिन आयात करण्याचे ठरले.
मरुतसाठी ब्रिस्टल सिडली ऑर्फियस ७०३ टर्बोजेट इंजिन वापरले गेले, जे युनायटेड किंगडममधून आयात केले गेले. हे इंजिन यापूर्वी फोलँड ग्नॅट विमानांमध्ये वापरले गेले होते.

स्वदेशी काय होते ? इंजिन जरी आयात असेल तरी
एअरफ्रेम डिझाइन: पहिल्या टप्प्यात विमानाची रचना तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले. एचएएलने एक पूर्ण आकाराचा दोन-सीटांची फ्रेम बनवली, जी उड्डाण चाचण्यांसाठी वापरला गेला. ही फ्रेम विमानाच्या हवाई गतिशीलतेची चाचणी घेण्यासाठी उपयुक्त ठरले.

टेस्टींग - विंड टनेल टेस्टींग , लोड टेस्टींग , फटीग टेस्टींग अशा अनेक प्रकारच्या चाचण्या पार पाडण्यासाठीचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहीले यात .HAL , HAL Structural Lab , Indian Institute of Science (IISc) – Bengaluru यांचे महत्वाचे योगदान होते.

wind tunnel

आज कोणतीही माहिती आपल्या मोबाइल , लॅपटॉप मध्ये इंटरनेट द्वारे सगळी माहिती , नकाशे , अनुभव बोटांवर उपलब्ध आहेत. त्या काळी असे इंफ्रा उभे करणे जोखमीचे आणि अवघड काम होते.

या विमानाचे नाव वायु देवतेच्या नावावरून "मरुत" असे ठेवण्यात आले. एचएफ हे हिंदुस्तान फायटरचे संक्षिप्त रूप होते,
HAL HF-24 मरूत
marut

सुरुवातीला जरी सुपर सोनीक विमानाचे उद्दिष्ट्य होते तरी तांत्रिक अडचणीमुळे ते जमले नाही. हे विमान सबसोनिक कॅटेगरीमध्ये मोडते.

मारक क्षमता -

कमी पंखांची रचना आणि स्थिर नियंत्रण यामुळे कमी उंचीवर उड्डाणासाठी ते योग्य होते. त्यात चार 30 मिमी ADEN तोफ बसवण्यात आल्या होत्या, ज्या विमानाच्या आतील भागात होत्या. या तोफांचा वापर शत्रूच्या जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी केला जाऊ शकतो. याशिवाय, त्यात 52 (68 मिमी) मात्रा एअर-टू-ग्राउंड रॉकेटचा मागे घेता येणारा बेली पॅक देखील होता, जो हवाई हल्ल्यांसाठी खूप प्रभावी मानला जात असे.
त्याच वेळी, मारुत आपल्या पंखाखाली १,८०० किलोग्रॅम पर्यंतचे बॉम्ब देखील वाहून नेऊ शकत होते, ज्यामुळे ते शत्रूच्या बंकर आणि लष्करी तुकड्यांना लक्ष्य करण्यास सक्षम होते.

अनेक अडचणीसह सुरू झालेल्या विमानाने १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान नेत्रदीपक कामगिरी बजावली. यावेळी HF-24 मरुत हे विमान भारतीय हवाई दलाच्या क्रमांक १० 'विंग्ड डॅगर्स' स्क्वॉड्रन आणि क्रमांक ३१ 'लायन' स्क्वॉड्रनमध्ये कार्यरत होते.

लॉंगेवाला युद्धात आपली खरी कसोटी दाखवली. हॉकर हंटर विमानांसोबत मिळून मरुतने पाकिस्तानी टाक्यांवर आणि सैन्यावर हल्ला केला. याने २२ टँक आणि शंभराहून अधिक वाहने नष्ट केली. स्क्वॉड्रन लीडर के.के. बक्षी यांनी एक पाकिस्तानी एफ-८६ साबर विमान पाडले. तीन मरुत पायलट्सना वीरचक्राने सन्मानित करण्यात आले.

अर्थात प्रत्यक्ष युद्धभूमीवर विमानांमधील त्रुटी लक्षात आल्या . शिवाय आपल्या शत्रूकडे अमेरीकेने पुरवलेली आधुनिक विमाने होती.
त्यामुळे युद्धसज्जतेसाठी विमाने आयात करावीत कारण स्वदेशी विमान निर्मितीला लागणारा वेळ बघता ही जोखीम देशाला परवडणारी नव्हती.

यानंतर स्वदेशी बीओआर ७०३ आफ्टरबर्नर इंजिन विकसित करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तो यशस्वी झाला नाही.
मग हा प्रोजेक्ट मागे पडत गेला.

वेगवेगळ्या विमान , शस्त्र कंपन्या , देश भारताकडे ग्राहक म्हणून बघू लागल्या , त्यांचे लॉबिंग राजकारण्यापासून ते आर्मी ऑफिसर्स पर्यंत सुरू झाले .
त्यातून स्वदेशी निर्मिती मागे पडली. आजही आपप्ल्याकडे राफेल चे सोर्स कोड नाहीत .

मरुतच्या अनुभवाने भारताला स्वदेशी विमाननिर्मितीचा पाया दिला, ज्यावर एलसीए तेजस सारख्या आधुनिक प्रकल्पांची उभारणी झाली. १९८० च्या दशकात एअरनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) आणि एचएएल यांनी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) तेजस प्रकल्प सुरू केला. मरुतप्रमाणेच, तेजसच्या विकासातही इंजिन हा मोठा अडथळा ठरला. तेजस मध्ये सध्या मार्क १ आणि मार्क १ए सध्या जनरल इलेक्ट्रिक एफ४०४-जीई-आयएन२० टर्बोफॅन इंजिन वापरतात, जे अमेरिकेतून आयात केले जाते . तेजस मार्क २ साठी जीई एफ४१४-आयएनएस६ इंजिन वापरले जाईल, ज्याची भारतात ८०% तंत्रज्ञान हस्तांतरणासह उत्पादनाची योजना आहे. भारताने गॅस टर्बाइन रिसर्च इस्टॅब्लिशमेंट (जीटीआरई) मार्फत स्वदेशी कावेरी इंजिन विकसित करण्याचा प्रयत्न केला. कावेरीला ८०-८१ किलोन्यूटन थ्रस्ट देण्याचे उद्दिष्ट होते, परंतु ते केवळ ७०-७५ किलोन्यूटन थ्रस्ट देऊ शकले. यात ओव्हरहिटिंग आणि जास्त वजनाच्या समस्या होत्या. परिणामी, तेजससाठी कावेरी वापरले गेले नाही, परंतु याचे विकासकार्य सुरू आहे आणि भविष्यात इतर प्रकल्पांसाठी वापरले जाऊ शकते. तेजस मार्क १ मध्ये ५९.७% स्वदेशी सामग्री आहे, तर मार्क १ए मध्ये ७०% पेक्षा जास्त आणि मार्क २ मध्ये ८२% स्वदेशी सामग्री असेल, ज्यामध्ये इंजिन वगळता बहुतांश घटक भारतात बनवले जातात. तेजसचा एकूण स्वदेशी सामग्रीचा हिस्सा जास्त आहे. मरुतने भारताच्या विमाननिर्मितीला सुरुवात केली, तर तेजसने ती पुढे नेली. भारताने मरुत आणि तेजसच्या अनुभवातून स्वदेशी इंजिन बनवण्याचे महत्त्व ओळखले. कावेरी इंजिनच्या विकासासाठी १९८० च्या दशकात काम सुरू झाले, परंतु तांत्रिक आणि आर्थिक आव्हानांमुळे ते पूर्णत्वास गेले नाही. १९९८ च्या अणुचाचण्यांनंतर अमेरिकेच्या निर्बंधांमुळे जीई एफ४०४ इंजिनचा पुरवठा खंडित झाला, ज्यामुळे स्वदेशी इंजिनची गरज आणखी तीव्र झाली.
सध्या भारत जीई एफ४१४ चे स्थानिक उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावर काम करत आहे. याशिवाय, भविष्यात तेजस मार्क २ साठी स्वदेशी इंजिन विकसित करण्याचे नियोजन आहे, ज्यामुळे भारत एक दिवस स्वयंपूर्ण नक्कीच होइल.

Tejas

या प्रोजेक्टने भारतीय विमान उद्योगाचा पाया घातला. अवकाश / विमान संशोधनला चालना मिळाली हेच याचे फलीत होय.
आजच्या १७ जून , HAL HF-24 मरूत : हॅपी बर्थ डे

--चित्रे : आंजा वरून साभार
--हा लेख संकलन आहे .

इतिहासप्रकटन

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

16 Jun 2025 - 11:29 pm | कपिलमुनी

पहिल्याच ओळीत टायपो झाला

उद्या १७ जानेवारी, याच दिवशी म्हणजे १७ जानेवारी

जानेवारी ऐवजी जून वाचावे