योगक्षेमं वहाम्यहम्
काही दिवसापूर्वी दक्षिणेतील एका देऊळात जायचा योग आला. मध्यभागी मुख्य देव किंवा देवता यांचे देऊळ आणि आजूबाजूला इतर देवी देवता यांची छोटी छोटी देऊळे असा नेहमी असतो असा प्रकार इथेही होता. आम्ही मुख्य देवतेचे दर्शन घेऊन अगदी समाधानी होऊन बाहेर पडलो. बाहेरच एक हुंडी होती तिथे आमच्या मनात होते तितके पैसे अर्पण करून बाहेर जायचा मार्गावरून चालू लागलो. अगदी शेजारीच आणखी एक देऊळ होते ,रात्र झाली असल्याने ते आता बंद होते पण त्या देऊळाच्या बाहेरच देवाकडे पाठ करून खुर्चीवर त्या देऊळाचे पुजारी बसले होते. त्यांनी आपले दोन्ही हात आपल्या पुढे पसरून ठेवले होते आणि चेहर्यावर याचकाचे भाव आणून आपल्या दक्षिणी भाषेत ते काही तरी आमच्या कडे बघून बोलत होते. ते काय म्हणत होते हे जरी आम्हाला समजले नसले तरी त्यांच्या एकंदर हाव भावावरून ते आमच्याकडे दक्षिणा मागत होते हे उघड होते.
एक क्षणभर मला एकदम चमकल्यासारखे झाले. अरे ! हे पुजारी त्या सर्व विश्व निर्माण करणाऱ्या भगवंताकडे पाठ करून आमच्यासारख्या पामरांकडून याचक होऊन धनाची अपेक्षा करत होते ? आणि ते ही इतक्या लाचारीने? इतकी वर्षे भगवंताची दररोज पूजा अर्चा करून ,वेगवेगळी स्तोत्रे गाऊन ते हेच शिकले होते का ?
पुजारी हे नेहमीच आदरणीय अशी शिकवण असणारा मी जरा एकदम उदास झालो . वाईट वाटले. पण मला नंतर असे वाटायला लागले की सगळ्याचा कर्ता ,करवता आणि पुरवता सुद्धा परमेश्वर आहे हे आध्यात्मिक सत्य त्यांना माहीत असणारच पण तो नेहमी कुणाच्या तरी माध्यमातून त्यांची गरज पूर्ण करतो हे व्यावहारिक सत्य त्यांना दररोज समोर दिसत असणार म्हणून ही लाचारी किंवा समोरच्या माणसाचा अहंकार जागवून ,त्याच्याकडून काही जास्त दक्षिणा मिळते हे सत्य त्यांना समजले असणार .
पण एक निमिषभर माझ्या मनात हा विचार आला की हे असे भीक कसे काय मागू शकतात ? ! ( त्याला दक्षिणा असे नाव आहे पण ते आम्ही आपल्या मनाने देऊ तेव्हा ती दक्षिणा होते. पण ते जेव्हा लाचारीने मागण्यासाठी असे हात पसरून बसतात तेव्हा ती भीकच ! ) आणि त्या विचाराने मी उदास झालो हे नक्की.
मग एकदम मला एक धर्म गुरूची कथा आठवली. त्यांना आपल्या गावात एक मंदिर बांधायचे होते . पण त्यांची अशी मनीषा होती की गावातील लोकानी एकत्र होऊन त्यांच्या खर्चाने ते मंदिर बांधले जावे . दोन तीन वर्षे प्रयत्न करून सुद्धा ते काही जमत नव्हते. मंदिर काही बांधून होत नव्हते .
गावातले लोक त्याला म्हणाले “ अरे आपल्या देशाचा राजा तुझ्या कडे नेहमी तुझा सल्ला मागायला येत असतो. तो तुला खूप मानतो . त्याच्याकडे जाऊन मदत माग ! तो नक्की मदत करेल आणि आपले मंदिर पूर्ण होईल. “
त्या धर्म गुरुला हे काही पटत नव्हते. त्याच्या मते हे मंदिर गावातील लोकांच्या पैशातूनच व्हायला हवे होते . पण खूप दिवस प्रयत्न करून सुद्धा मंदिर पूर्ण होत नसल्याने शेवटी नाईलाज म्हणून तो राजाला भेटायला जातो. राजवाड्यावर गेल्यावर त्याला कळते की राजा त्यांच्या कुटुंबाच्या कुलदैवतेच्या मंदिरात गेला आहे. तेव्हा हा गुरु सुद्धा तिथे जातो. तिथे जाऊन बघतो तर राजा माथा टेकून टेकून प्रार्थना करत असतो. अंतर्यामी असल्याने गुरूला राजा परमेश्वराकडे काय मागतो आहे हे लक्षात येते.
“ माझे राज्य दुप्पट होऊ दे ! माझी संपत्ति दुप्पट होऊ दे ! धान्याचे कोठार नेहमी भरलेले राहू दे ! वगैरे वगैरे ..”
थोड्या वेळाने राजा परमेश्वराला नमस्कार करून उठतो आणि त्याचे आपल्या गुरु कडे लक्ष जाते. तो धावत येऊन त्यांना नमस्कार करतो आणि त्यांना राजवाड्यात घेऊन जातो. त्यांचा योग्य तो आदर सत्कार करतो. थोड्या वेळाने गुरु राजाची आज्ञा घेऊन जायला लागतो. तेव्हा राजा म्हणतो ,
“ तुम्ही आपण होऊन माझ्याकडे आलात .. म्हणजे तुमचे माझ्याकडे काही तरी काम आहे. पण ते न सांगताच तुम्ही का निघलात ? माझे काही चुकले का ?”
“ अरे राजा तुझे काही चुकले नाही .. माझेच चुकले ! आमच्या गावात एक मंदिर बांधावे अशी माझी बऱ्याच दिवसापासून मनीषा आहे पण मला थोडे द्रव्य कमी पडत होते म्हणून मी तुझ्याकडे ते मागावे म्हणून आलो होतो. पण इथे बघतो तर तूच परमेश्वराकडे आणखी द्रव्य मिळावे म्हणून प्रार्थना करत होतास. मग मला वाटले की तू ज्या परमेश्वराकडे मागणे मागत होतास त्यालाच का माझे मागणे मागू नये ? म्हणून मी परत निघालो आहे.”
ही कथा आठवली आणि त्या पुजार्याची मला दया आली. थोडा राग सुद्धा आला. मी हॉटेलवर परत आल्यावर तो राग शांत झाला . मला नक्की राग कशाचा आला याचा विचार केल्यावर मला समजले की परमेश्वराकडे पाठ करून ते पुजारी क्षुद्र मानवकडे याचना करतात याचा मला राग आला होता.
तो याचना करतो याचा हा राग नव्हता . तसे मी तरी त्या मंदिरात कश्या साठी गेलो होतो ?
काही तरी मागायला किंवा मला काहीतरी त्याच्या आशीर्वादाने मिळाले त्या बद्दल त्या परमेश्वराचे आभार मानायलाच गेलो होतो ना ?
मी काय तिथे येणारे सर्वच जण काही तरी मागायला किंवा काहीतरी मिळाले म्हणून त्या परमेश्वराचे आभार मानायलाच जातात ना ?
नाही तरी गीतेमध्ये कृष्ण काय म्हणतात ?
“अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते |
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ||९ .२२ ||”
माझी मनापासून उपासना करणाऱ्याचे योगक्षेम मी वाहीन ,म्हणजेच जे त्याच्याकडे नाही ते मी त्याला देईन आणि जे त्याच्याकडे आहे त्याचे मी लक्षण करीन.
तर माझा त्या पूजऱ्यावरचा राग अगदीच अनाठायी नव्हता .हातातील सोने सोडून बाहेरच्या कोळशामागे लागणारा हा पुजारी दररोज पूजा करून काहीच शिकला नाही का ? पण शेवटी त्या बिचाऱ्या पुजऱ्यालाच का दोष द्यावा ? धनाच्या लालसेने तो असे करत होता. सध्या ही लालसाच जगण्याचे मूळ कारण झाले आहे. धनाची लालसा ,स्त्रीची लालसा ,सत्तेची लालसा हेच जगण्याचे मूळ कारण झाले आहे. हिंदू धर्म चार पुरुषार्थ मानतो. धर्म ,अर्थ ,काम आणि मोक्ष. पण यात प्रथम आहे तो धर्म . धर्माचरण करून बाकीचे पुरुषार्थ सिद्धीस न्यावेत. असे हात पसरून द्रव्य मिळवणे अजिबात अपेक्षित नाही .
तो काय किंवा इतर सर्व पुजारी परमेश्वराची दररोज पूजा करतात तेव्हा काही तरी आध्यात्मिक प्रगतीची लक्षणे त्याच्यात उतरावी ही माझी अपेक्षाच अगदी अनाठायी होती का ? की कलियुगात ही अपेक्षाच चुकीची आहे ?
प्रतिक्रिया
3 May 2025 - 5:30 pm | प्रसाद गोडबोले
अहो त्या पुजाऱ्याने फक्त तुम्हाला चार पैसे मागितले,
तुळजापुरात गेला असतात तर पुजाऱ्याने तुमच्या हातावर ड्रग्स चे पाकीट ठेवले असते मागाल त्या =))))
पण विनोदाचा भाग सोडा. ही ही अवस्था सर्वच मंदिरात आहेत. पोटार्थी लोकांनी मंदिरातील पुजारी , कर्मचारी वगैरे जागा ढापलेल्या आहेत. नुकताच त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन आलो, तिथे झक मारत पैसे भरून VIP दर्शन करत असतानाही अरुणा शिरसाट नावाच्या महिला कर्मचाऱ्याने धक्काबुक्की केली. ( देवाच्या समोर उभा होतो, खोटे नाही बोलणार, CCTV रेकॉर्डिंग आहे, शंभू महादेव साक्ष आहे)
मी रीतसर कार्यालयात जाऊन लेखी तक्रार नोंदवून आलो. मी माझे कर्म केले, त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल न होईल, मला त्याच्याशी घेणेदेणे नाही. मला फळाची आशा नाही. मी माझा कर्मयोग नेटाने पूर्ण केला.
त्यानंतर पुढेच असलेल्या निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात जाऊन बसलो. तिथे मात्र चक्क समाधी जवळ बसूनही 10-15 मिनिटं कोणी काही बोललं नाही. नंतर दादाच बोलला - " तुला लेका आता काय गरज पडलेय मंदिरं बिंदिरे फिरायची. तू ज्याच्या मंदिरात जात आहेस तो तोच आहेस - तत्त्वमसि । अजून काही संदेह , शंका आहे का तुझ्या मनात ?"
मी हसलो, तोही हसला. मी दादाला विनम्र नमस्कार केला आणि बाहेर पडलो.
सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायीं ।
तेथे बुडी देई माझ्या मना ॥१॥
आतां मी न करी भ्रांतीचे भ्रमण ।
वृत्तीसी मार्जन केलें असे ॥२॥
एकार्णव झाला तरंगु बुडाला ।
तैसा देह झाला एकरूप ॥३॥
बापरखुमादेविवरें विठ्ठलें नवल केलें ।
तारूं हरविले मृगजळी ॥४॥
4 May 2025 - 10:32 am | Jayant Naik
आपल्या अतिशय सुंदर प्रतिक्रिये बद्दल खूप धन्यवाद.
4 May 2025 - 11:55 am | मूकवाचक
प्रपंच कुणाला चुकला आहे? मग तो पुजारी असो की कलावंत. जसा राजाश्रय नाहीसा झाला, तशी या लोकांना लोकाश्रयावर अवलंबून राहण्याची वेळ आली.
देव मंदिरात नाही, आत आहे वगैरे सगळे ठीक आहे. तशी उमज आली की अध्यात्मातली वणवण आपोआप संपते. अध्यात्माला नाहक चिकटलेला सामाजिक आणि राजकीय चिकटा दूर होतो. बाह्याकडची धाव संपून आंतरिक यात्रा सुरू होते. एवढी परिपक्वता ज्यांच्या अंगी नाही, त्यांची सगुण भक्ती/ बाह्य सोपस्कारांची गरज पूर्ण करण्यात फारसे गैर असे काही नाही. तशी व्यवस्था समाजात असणे गरजेचे आहे. बहुधा जगाच्या पाठीवर सगळीकडे अशी व्यवस्था असते.
भाविकांनी आपणहून पुजारी/ गुरव वगैरे लोकांचा योगक्षेम/ चरितार्थ चालण्यासाठी लोकाश्रय दिला तर प्रश्न मिटेल. राजाश्रय मिळाल्यानेदेखील प्रश्न सुटेल. चवली पावलीपासून करोडोंमधे ज्या समाजात भ्रष्टाचार सर्वदूर पसरला आहे, त्यात योगक्षेम चालवणे फारसे सोपे नाही. शिक्षण महर्षि ते वैद्यकीय व्यावसायिक सगळेच लोक लुबाडत असताना सामान्य माणूस गप्प असतो, कारण प्रतिकार करणे महाग पडू शकते.
व्यावहारिक बाजूचा विचार न करता समाजातल्या कोणत्याही एखाद्या घटकाकडून आदर्शवादाची अपेक्षा ठेवणे फोल ठरेल. असो.
4 May 2025 - 1:21 pm | वामन देशमुख
विशेषतः या वाक्याशी आणि एकूणच प्रतिसादाशी सहमत आहे.
5 May 2025 - 10:29 am | Jayant Naik
शिक्षक , पुजारी , न्यायाधीश , सैन्यातील जवान आणि अधिकारी ,पंतप्रधान,,मुख्य मंत्री , शंकराचार्य हे सर्व लोक आपली कर्तव्ये धर्म म्हणून पर पाडतील आणि फक्त पैसा हेच ध्येय म्हणून वर्तन करणार नाहीत अशी आमची आपली भाबडी समजूत होती. होती. हळूहळू ती नष्ट होते आहे. माझा कसा भ्रमनिरास होतो आहे हे या प्रसंगातून दिसतेच आहे.
4 May 2025 - 2:43 pm | सोत्रि
इथेच गडबड झाली.
- (देव कुठेही नसतो हे जाणणारा) सोकाजी
4 May 2025 - 3:14 pm | प्रसाद गोडबोले
ह्यावरून एक विनोद आठवला ...
आम्ही लहानपणी व्याकरण शिकत असताना वर्गातील एका विद्यार्थ्याने
पुजारी ह्या शब्दाचा संधिविग्रह पूजा +अरि अर्थात पूजेचा शत्रू म्हणजे पुजारी
असा केला होता =))))
- ( देवाचा अभाव असलेले स्थानच नाही हे अनुभवणारा ) प्रगोजी
5 May 2025 - 6:27 am | सोत्रि
Oxymoron :=))
- (विनोदी) सोकाजी
5 May 2025 - 10:33 am | Jayant Naik
खरे आहे हाच विनोद.
5 May 2025 - 10:31 am | Jayant Naik
एकदम मान्य . मुळातच चूक झाली. आमच्यावर असे संस्कार करणाऱ्यांची आणि त्याला चिकटून बसणारे आम्ही यांची !