यात्रा आणि सक्रिय सोहळे

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
28 Apr 2025 - 8:56 pm

अशात काही सण आणि उत्सवांच्या निमित्ताने सार्वजनिक पातळीवर काही कार्यक्रम, मिरवणुका, शोभा यात्रा पाहिल्या. गुढी पाडवा, शिवजयंती, आंबेडकर जयंती असे अगदी वेगवेगळ्या प्रकारचे निमित्त असले तरी एक साम्य होतं.

कार्यक्रमाची सुरुवात कितीही पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक वाद्य, ज्या सण उत्सवाचं निमित्त आहे त्या महापुरुषाला किंवा देवाला वंदन करून झालं कि थोड्याच वेळात डीजेच्या भिंतीच्या भिंती लावुन गोळा झालेलं पब्लिक त्यात मुख्यत्वे अर्थातच तरुण टोळके वेडेवाकडे नाचूनच शेवट झाला. सुरुवातीची गाणी जरा निमित्ताला साजेशी असली तरी शेवटपर्यंत निमित्ताचं, औचित्याचं भान कोणालाही राहिलं नाही. "घे पाऊल पुढं जरा आणि कंबर लचक जरा" या गाण्याचा आणि शिवजयंतीचा काय संबंध?

कुठेतरी वाचलं होतं असा आपल्याच सणांचा तमाशा आपणच करतो. रमजान मध्ये इफ्तार पार्ट्या होतील, ईदला लोक भेटीगाठी करतील, शीरखुर्मा खातील पण असले चाळे करताना दिसणार नाहीत. तसं पाहायला गेलं तर त्यांच्यात संगीतच वर्ज्य आहे पण तरी लग्नात पार्ट्यात फिल्मी गाणी वाजत असतील पण सहसा सणांच्या दिवशी नाही.

डिस्को, क्लब्स, गाणी लावून सर्वांनी नाचायचे वगैरे प्रकार आपल्याकडे पश्चिमेकडून आले. हरकत नाही, पण तिकडचे लोक सुद्धा दारू पिऊन क्लब मध्ये नाचायची गाणी आणि ख्रिसमसच्या दिवशी वाजवायची गाणी यात फरक ठेवतात. चर्च समोर एड शिरन चं "शेप ऑफ यु" वाजलेलं नाही दिसणार, खास ख्रिसमसची जिंगल बेल आणि इतर कॅरल्स ऐकायला मिळतील. त्यांच्यात संगीत वर्ज्य नाही त्यामुळे खास चर्चमध्ये म्हणायची सुंदर सुंदर गाणी आहेत. अगदी मराठीतही आहेत. लहानपणी माझ्या घराशेजारीच एक चर्च असल्यामुळे मी दर रविवारी "धन्यवाद येशुला", "हालेलूया म्हणूया" अशी गाणी ऐकलेली आहेत. तिथून मला "मुंगळा", "काला कव्वा", "झिंगाट" कधीही ऐकू आलं नाही.

असो, संगीत आणि नाचाचा विषय नाही. सण उत्सव साजरे करण्याची ही पद्धत योग्य आहे का असा विचार करत असताना मला आठवली माझी रायरेश्वरची राईड.

माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर शिवजयंती:

२०२३ मध्ये शनिवारी महाशिवरात्र आणि रविवारी शिवजयंती असा खास विकेंड जुळून आला होता. मी त्या आधीच्या एक दोन वर्ष आधीपासून भरपुर सायकलिंग करायला लागलो होतो. पुणे आणि जवळपास भरपूर मोठ्या मोठ्या राइड्स होत होत्या. तर या वीकेंडला काही प्लॅन करावा असं मनात आलं.

मला आठवलं रायरेश्वर. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसोबत ह्या किल्ल्यावरच्या रायरेश्वर महादेवाच्या मंदिरात येऊन स्वराज्याची शपथ घेतली होती. म्हणजे शिव आणि शिवराय या दोघांशी निगडित हि जागा होती. "शिव वंदन राईड" अशी कल्पना घेऊन मी तिथे पुण्याहुन सायकलने जायचं, मुक्काम करायचा, दोन्ही शिवांना वंदन करून दुसऱ्या दिवशी परत यायचं असा प्लॅन केला. मी आणि तीन मित्रांनी तो अंमलात आणला. माझ्या आयुष्यातली ती सर्वात सुंदर शिवजयंती होती.

या राईडबद्दलचा व्हिडीओ

फक्त चौघंच होतो, चढ भरपूर होता आणि त्यामुळे साहजिकच वेग अतिशय कमी, आम्ही पुढे मागेही होत होतो. बराच वेळ एकट्याने सायकल चालवायला, विचार करायला मिळत होता. तसंही सायकलवर फिरण्याची हि खासियत आहेच, एरवी गाडीवर फटकन सरून जातील अशा जागा निवांत पाहणे, स्वतःशीच विचार करत फिरणे यात फार आनंद आहे. तर त्या दोन्ही दिवशी किल्ल्यावर जाऊन येत असल्यामुळे, तिथली शिवजयंती पाहिल्यामुळे, मी बराच वेळ फक्त महाराजांबद्दल विचार करत होतो. इतक्या कमी वयात त्यांनी केलेला संकल्प, पन्नाशी पर्यंतच्या अल्पही नाही आणि दीर्घही नाही अशा आयुष्यात गाजवलेलं प्रचंड कर्तृत्व...

एक अनोखा स्वातंत्र्यदिन:

असाच अनुभव मला त्याआधी पंधरा ऑगस्टच्या आधी आला होता. सायकलिंग ग्रुपमधल्या सारंगदादाने पुण्यातल्या स्वातंत्र्यसैनिकांशी निगडित असलेल्या काही वास्तु आणि जागांची माहिती स्वातंत्र्यदिन जवळ आल्यावर पाठवली होती. मी आणि एक मित्र त्या सर्व आणि आणखी एक दोन तशाच ठिकाणी सायकलवर फिरून आलो. तर तो विचार घेऊन पुण्यात फिरताना मस्त वाटत होतं. लोकमान्य टिळक, आगरकर, वासुदेव फडके, महात्मा गांधी असे अनेक जण त्या काळात याच रस्त्यांवरून फिरले असतील, वावरले असतील. तेव्हाचं वातवरण कसं असेल.

या राईडबद्दलचा व्हिडीओ

माझा वारीचा अनुभव:

मी कॉलेजात असताना आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली होती. विठ्ठलाची अपार भक्ती, श्रद्धा असं काही कारण नव्हतं खरं सांगायचं तर. कुतूहल होतं, शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा नेमकी काय आहे, कशासाठी आहे, कसे चालतात लोक एवढं, काही गवसतं का त्यातुन असे अनेक प्रश्न होते. फार कमी वय होतं त्यामुळे तेव्हा नाही मिळाली सगळी उत्तरं, आणि फार काही समजलंही नाही. अनुभव छान होता. खुप लोकांना, विशेषतः ग्रामीण भागातल्या, भेटता आलं, गप्पा मारता आल्या. डोंगर, शेत, माळरान अशा वेगवेगळ्या ठिकाणी मुक्कामाचा योग आला.

आषाढी एकादशीचं निमित्त असतं पण बहुसंख्य वारकरी तर पंढरपुरात पोहोचल्यावर त्याच दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेऊही शकत नाहीत. चंद्रभागेत स्नान करून, कळस दर्शन करून मग मंदिराला प्रदक्षिणा घालुन परत फिरतात. ज्यांना शक्य आहे ते आणखी मुक्काम करून मग जमेल तसं दर्शन करून निघतात. महाराष्ट्र भरातुन अनेक दिंड्या आळंदी देहू गावी जमा होतात. ट्रक टेम्पो मध्ये सामान भरून अनेक वारकरी आपापल्या गावातुन असा प्रवास करतात. तर काही जण तर आपल्या गावाहून आधी पंढरपूरला जाऊन दर्शन करून मग आळंदी देहू ला जातात. कारण एकादशीला दर्शन होत नाही. थोडक्यात ज्या दिवसाचं निमित्त असतं त्या दिवशी अनेकांचं विठ्ठल दर्शन होत नाही तरी सर्व समाधानी असतात, आपल्या वारीत त्यांना विठ्ठल भेटलेला असतो.

तीन वर्षांपूर्वी मी सायकलवर वारी केली तेव्हा मात्र वेगळा अनुभव होता. पुणे ते पंढरपूर अशी एका दिवसात ~२२५ किलोमीटर सायकल चालवुन आम्ही संध्याकाळी उशिरा पोहोचलो. त्या दिवशी मुक्काम होता आणि दुसऱ्या दिवशीच्या दर्शनाचे ऑनलाईन पास काढून ठेवलेले होते. सकाळी दर्शन झाल्यावर सायकल टेम्पोमध्ये आणि आम्ही बस मध्ये असा पार्टीच्या प्रवासाचा बेत होता. तरी तिथे गेल्यावर सांगण्यात आलं कि उद्या आपण लवकर निघायचा प्रयत्न करूया आजच मुखदर्शन करून घ्या. प्रचंड थकवा आला होता पण तरी जेवण झाल्यावर स्वतःला ढकलत ढकलत गेलो. आत गेलो, मुखदर्शन झालं आणि सांगता येणार नाही इतकं छान वाटलं. थकवा किंवा अंगदुखी काही चमत्कार होऊन गेली नाही पण तरतरी आली. इतकी तंगडतोड केल्यावर दर्शन झाल्याचं समाधान वाटलं.

या वारीबद्दलचा व्हिडीओ

आपल्या सण, उत्सवाच्या दिवशी काय होतं. घरचा सण असतो तेव्हा आपला भर खायला काय आहे, कुठले कपडे घालायचे, आपल्या घरी कोण येणार आणि आपण कुठे जाणार यावरच असतो. सार्वजनिक उत्सवात सुद्धा तेच.. त्याचा दिखावा, तिथली खाण्यापिण्याची व्यवस्था, ढोल ताशे, डीजे, प्रमुख पाहुणे अशा गोष्टींवर जास्त भर असतो. ज्या देवाचं, माणसाचं निमित्त असतं त्याचा विचार त्या दिवशी आपण स्वतः कितीदा करतो?

वारकरी वर्षातून कधीही पंढरपूरला गाडीने जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकतात. त्यासाठी तर तो वर्षभर उपलब्ध असतो. पण वारीचं महत्व हे प्रवासात आहे. त्यातल्या कष्टात आहे. ते पूर्ण केल्यावर मिळणाऱ्या आनंदात आहे. मग विठ्ठल एकादशीला नाही दिसला तरी चालतो. पंधरा दिवस मैल न मैल चालताना, रिंगण घालताना, इतर वारकऱ्यांसोबत भजनं म्हणताना, कीर्तन ऐकताना असंख्य वेळा त्याचा नामोच्चार झालेला असतो, विठ्ठलाची प्रतिमा डोळ्यासमोर येत नाही असा एकही दिवस वारीत जात नाही.

आपण काही कष्ट करून शरीराला, मनाला भुक लागायला भाग पाडतो त्यानंतर ती वारी ती यात्रा पूर्ण झाल्यावर जे समाधान मिळतं त्याला तोड नाही. भगवा झेंडा आपण नेहमी बघतो इकडे तिकडे. पण तोच ट्रेक करताना वर किल्ल्यावर दिसतो तेव्हाची भावना, किल्ल्यावर पोहोचल्यावर झेंडा समोर येतो तेव्हाची भावना वेगळीच असते. अशी पायपीट केल्यावर जी कडक भुक लागते तेव्हा पिठलं भाकरी, मॅगी, ठेपले, चिवडा काहीही खायला मिळालं तरी भारी लागतं.

आणि असं करताना आपण जर सतत विठ्ठलाचं किंवा कुठल्याही देवाचं नाव घेत असु, शिवरायांचा विचार करत असु, महापुरुषांच्या आठवणी जागवत असु, तर त्यातून मिळालेली प्रेरणा आणि आनंद कुठे.. आणि शरीराला काहीच कष्ट न पडता कोंबलेल्या पंचपक्वान्नाच्या जेवणाची सुस्ती, औचित्य विसरून भान विसरून कुठल्याही गाण्याच्या ठेक्यावर नाचण्याची बेहोशी कुठे...

हे कधीच करू नये असं नाही, पण नेहमी फक्त तेच करण्यापेक्षा वेगवेगळे मार्ग आजमावून पाहायला हवं. सुग्रास अन्नाने आपली जीभ सुखावते, नाच गाण्यामुळे मुड छान होतो.. पण आपल्या जिभेला आणि आपल्या मूडला आपण नेहमीच ट्रीट देत असतो. पण ते क्षणिक असतं. त्यात फार काळ टिकण्याची क्षमता नसते.

आपल्या शरीराला आणि मनाला बुद्धीला सुद्धा ट्रीट द्यायला हवी. चांगला व्यायाम, चांगले विचार, चांगला कन्टेन्ट हे त्यासाठीच आहे. आणि खरंच सांगतो, वर जे जे अनुभव सांगितलेत त्या सगळ्याचा सकारात्मक प्रभाव माझ्या मनावर, मुडवर दीर्घकाळ टिकला.

त्यामुळेच इतक्या गाड्या, रेल्वे, हेलिकॉप्टर सगळी सोय असुनही आजही वारीला महत्व आहे. यात्रेला महत्व आहे. मोठमोठ्या यात्रा, ट्रेक्स, परिक्रमा, सायकल प्रवास पूर्ण करणाऱ्यांचं कौतुक आहे.

आपली बरीच प्रख्यात मंदिरे, तीर्थ स्थळे इतक्या दुर्गम ठिकाणी का आहेत? सहज मिळणाऱ्या गोष्टीचं काही कौतुक नसतं. लोकांना तिथे येताना कष्ट पडले पाहिजेत, त्यांनी देवाचा धावा केला पाहिजे, देवासमोर पोहोचल्यावर तुच पार पाडलंस रे बाबा, असे भाव मनात आले पाहिजेत असाच विचार असेल आपल्या पूर्वजांचा कदाचित. वय झालं कि, आरोग्य बिघडलं कि, वेळापत्रक फारच व्यस्त असेल तेव्हा आपल्या घरात, मनात देव आहेच, पण शक्य असेल तेव्हा असा बाहेर पडून देवाकडे जाण्याचा आनंद घेऊन बघायलाच हवा.

वैयक्तिकरित्या मला तर सायकलिंग, ट्रेक्स याची आवड आहे त्यामुळे ते करताना मला आनंद मिळतोच, पण त्याशिवाय माझ्या विचारांना चालना मिळते. माझ्या मेंदूची क्रिएटिव्ह बाजु सक्रिय होते. खालील ब्लॉग्समधले विचार मला राईड, ट्रेक करताना सुचले आहेत. कधी कधी काही ओळी सुचतात. फोटोग्राफी तर होतेच.

- गुढीपाडव्याला राम मंदिरात सायकलवर जाऊन येताना: रामाचा प्रभाव
- सिंहगड ट्रेक करताना कोणीतरी शिवरायांच्या पुतळ्यासमोर ग्लुकोजच्या गोळ्या वाहिलेल्या पाहुन: नैवेद्य

सणाच्या दिवशी त्या त्या देवळात राईड, गणपतीत मानाचे गणपती, नवरात्रीत देवीची नऊ मंदिरे, महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या स्मारक किंवा पुतळ्याजवळ राईड अशा गोष्टी आमच्या सुरूच असतात. मी जमेल तेव्हा असेच प्रयत्न इतर निमित्ताने सुद्धा करतो. माझ्या एक दोन वाढदिवशी मी माझ्या वयाइतके किलोमीटर राईड केली. गेल्या दोन लग्नाच्या वाढदिवसाला मी आणि बायको मिळुन लग्नाला जेवढी वर्ष झाली तेवढे किलोमीटर रनिंग किंवा लॉन्ग वॉक करून आलो. त्याआधीच्या वेळी दोघं एक छोटी हाईक करून आलो.

आता कोणाला वाटेल ह्यांना सायकलिंगला निमित्तच पाहिजे. प्रत्येक गोष्टीत सायकल घातलीच पाहिजे का? तसं आहेच ते खरं. :-P पण सगळ्यांनीच सायकल घेतली पाहिजे असं नाही. जी आवड असेल ते करा. चाला, फिरा, पळा... घराबाहेर पडा. यात्रा करा, प्रवास करा. जहाज किनाऱ्यावर सुरक्षित असतं पण त्याची जागा समुद्रातच.

जेव्हा बाहेर पडायला वेळ नाही तेव्हा इतर काही कला आवडत असेल तर ती जोपासा. गाणं म्हणत असाल, काही वाजवत असाल तर त्या दिवशी एखादं साजेसं गाणं रेकॉर्ड करा, फिरायची आवड असेल तर साजेश्या ठिकाणाला भेट द्या, चित्रकला आवडत असेल तर साजेसं चित्र काढा.

या वर्षीच्या शिवजयंतीला माझ्या मुलीने स्वतःहून महाराजांचं एक चित्र काढलं. तिचं पाहुन मलाही काढावं वाटलं आणि मी एक स्केच काढलं. चित्र कसं आलेय ते जाऊ द्या, ती तर अजुन शिकतच आहे आणि मला आता पुन्हा नव्याने शिकण्याची गरज आहे. पण हे काढताना दोघांनी एन्जॉय केलं.

i1

आता तुम्हाला या ब्लॉगचं थोडं विचित्र शीर्षक उलगडलं असेल. होईल तेवढं मराठीच वापरायचं म्हणुन हे सुचलं. कदाचित ऍक्टिव्ह सेलिब्रेशन म्हटलं असतं तर लगेच लक्षात आलं असतं. सक्रिय सोहळा म्हणजे माझ्या लेखी कुठल्याही निमित्ताने सक्रियपणे साजरे केलेले क्षण. निष्क्रिय राहुन अर्थात आपण काही साजरं करू शकत नाही.

पण कुठलाही आनंद उत्सव फक्त काही खाऊन साजरा केला तर तो जिभेसाठी छान, आरोग्यासाठी घातक. फक्त ढिंचॅक ढिंचॅक वाजवुन साजरा केला तर नाचायला छान पण कानासाठी घातक, पर्यावरणासाठी घातक. त्यामुळे सक्रिय म्हणजे साजरा करण्यासाठी असा प्रकार शोधा जो त्या प्रसंगासाठी सुद्धा चांगला, आपल्या शरीरासाठी मनासाठी सुद्धा चांगला.

त्यावरून आठवलं हल्ली सगळीकडे एक प्रकारच्या सक्रिय सोहळ्यांचं प्रमाण वाढत चाललंय. मॅरेथॉन, सायक्लोथॉन, वॉकॅथॉन अशा गोष्टींना वाढता प्रतिसाद आहे हे फार चांगलंय. हे आरोग्याचे, शारीरिक क्षमतेचे सोहळेच असतात. आरोग्याप्रती सजग असलेले, व्यायामाची आवड असलेल्या लोकांची भेट होण्यासाठी उत्तम ठिकाण. तिथे गेल्यावर सगळ्या सभासदांची सकारात्मक ऊर्जा ओसंडून वाहत असते. तुम्ही आजवर केलं नसेल तर एकदा नक्की करून पहा. आपल्या क्षमतेनुसार ५ किमी, १० किमी असा प्रकार निवडा.

पटलं तर अशा सक्रियतेने एखादं निमित्त साजरं करून पहा. आवडलं तर इतरांना सांगा. सक्रियतेच्या वारीत सहभागी व्हा. जय हरी।।

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

29 Apr 2025 - 1:50 pm | मुक्त विहारि

लेख आवडला....