सूर्य पाहिलेला माणूस

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
30 Sep 2024 - 2:03 am

सकाळचे साधारण सात वाजले असावेत. श्रावण संपून गेला होता नुकताच तरी अजून आकाशामध्ये ढगांची दाटीवाटी होती. पश्चिमेकडे दूरवर दिसणाऱ्या यवतेश्वरचा डोंगर मात्र अजूनही ढगांच्या दाट धुक्याआड होता, दक्षिणेकडे मात्र अजिंक्यतार्‍याने हिरवीगार दुलई पांघरली होती, पांढरेशुभ्र धबधबे फिसाळत वहात त्या हिरवाईतुन वाट काढत होते. पुर्वेकडे सुर्योदय होऊन गेला होता मात्र सुर्याचा अजुनही ढगांआड लपंडाव चालु होता. हवेत एक आल्हाददायक गारवा होता. हे असं सारं पहात तासन तास बसुन राहावं अन हे सारं सौंदर्य भोगत रहावं बस असं कोणालाही वाटेल असं काहीसं वातावरण होतं .

आज तर सुट्टीचा दिवस असल्याने प्रत्यक्ष सूर्यासमोर बसून संध्या करायची हा नियम. किमान सुट्टीच्या दिवशी तरी नक्कीच ! पळी पंचपात्र घेऊन, सोवळे नेसुन टेरेसवर पळालो. टेरेस वर पोहोचलो, स्वतःचे आसन टाकले. बाजूलाच नाना आजोबा सूर्यनमस्कार घालत होते. त्यांची संध्या कधीच होऊन गेली होती. सूर्योदयाआधीच संध्या असा काहीसा त्यांचा नियम होता. त्यानंतर ते नित्यनेमाने सूर्यनमस्कार काढत.

शिडशिडीत अंगयष्टी. रापलेला ताम्रवर्ण. व्यायामाने आलेल्या घामामुळे चमकुन दिसत होता. अनेक वर्षांच्या केलेल्या सूर्यनमस्कारमुळे नानांचे अजूनही वय काही दिसून येत नव्हतं. त्वचेवर सुरकुत्या पडायला लागलेल्या असल्या तरी अजूनही तकाकी होती . मानेवर रुळणारे शेंडीचे पांढराशुभ्र केस, थोडेसे वाढलेले दाढीचे खुंट , डाव्या खांद्यावरून पाठीवर रुळणारे जानवे, खपाटीला गेलेले पोट आणि खाली कमरेला नेसलेले धोतर या सर्वांमध्ये नाना सूर्याकडे पहात पहात अतिशय शांतपणे पण लयबद्धपणे सूर्यनमस्कार करत होते. नानांना असे पाहिलं की औंधाच्या राजांची , श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधींची प्रकर्षाने आठवण यायची !

BhavanraO

मी मात्र नुसतेच संध्येचे पळी पंचपात्र समोर ठेवून बसलो होतो. नाना सूर्यनमस्कार करता करताच म्हणाले - "पंत करा की सुरू. उशीर झालाय आज आधीच."
मी म्हणालो: " हां थांबतो जरा काही क्षण. ढगाळ झालं सगळं . सुर्य ढगाआड गेलाय ना. सूर्य समोर नसला तर मग मजा नाही येत संध्या करायला."
नाना सूर्यनमस्कार काढत काढत थांबले अन म्हणाले :

"सूर्य ढगाआड गेला म्हणून तो सूर्य राहत नाही काय रे ? "

मी नानांकडे पाहत राहिलो.
त्यांचे बहुतेक सूर्यनमस्कार पूर्ण झाले असावेत की काय देव जाणे पण ते थांबले. शेजारीच ठेवलेल्या खुर्चीवर येऊन बसले, पंचाने कपाळावरील त्यांनी घाम टिपत टिपत अन काहीसे माझ्याकडे बघून हसुन म्हणाले. " काय पंत, बोला. "
मी म्हणालो: "नाही तसं नाही नाना, पण सूर्य समोर पाहिजे ना प्रत्यक्ष. हा असा . चक्षुर्वै सत्यं."
त्यावर नाना म्हणाले: " ठीक आहे पंत, आता मला सांगा हे ढग कुठून आले? "
मी आता पाचवीत जात होतो. माझ्यासाठी हा अगदीच बालीश प्रश्न होता. मी आश्चर्याने नानांकडे पाहत म्हणालो : "सोप्पं आहे ! समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन बनतात हे ढग. ह्या इकडून येतात समुद्रावरून. "
आणि माझं वाक्य अर्धवट तोडत नाना म्हणाले: "आणि समुद्राच्या पाण्याची वाफ कशामुळे होते?
मी : " हेही सोप्पंय ! सूर्यामुळे !"
नाना : "आणि हे समुद्राचे पाणी कुठून आलं ? "
मी: "हे काय इथेच तर तयार झालं . पृथ्वीवरचीच हायड्रोजन ऑक्सिजन वगैरे वगैरे"
त्यावर नाना हसले आणि म्हणाले: "बरं. आता सांग पृथ्वी कुठून आली? कशापासुन बनली ?"
आता मात्र आवक व्हायची वेळ माझी होती कारण नुकतेच, अगदी काहीच दिवसांपूर्वी , अभ्यासात नानांनी शिकवले होते की पृथ्वीचे मूळ सूर्यातच आहे. सूर्यापासूनच पृथ्वी तयार झाली आहे. अब्जावधी वर्षांपुर्वी. सुर्यापासुन जे काही वायुरुपात विलग झालं त्याच्यापासुनच पुढे निरनिराळे ग्रह बनले.
मग नाना शांतपणे म्हणाले: " आता नीट विचार करुन सांग. सूर्यापासून बनलेल्या पृथ्वीवरच्या पाण्याची वाफ झाली. तीही सूर्यामुळे. त्याचे झाले ढग आणि त्या ढगांनी सूर्य झाकला गेला. तर आता तूच सांग नक्की कोणी कोणाला झाकलं आहे? "
या प्रश्नावर मी अनुत्तरीत होतो.

"हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् । तत्त्वं पूषन्नापावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥ "
सत्यावर मायेचे आवरण पडलेले आहे, ते आवरण दूर कर (अशी पूषन् नामक सूर्यदेवतेची प्रार्थना मी करतो )."

नाना हसले म्हणाले: "ठीक आहे. असू दे. सोप्पे प्रश्न विचारतो. आता पुढे मला सांग ह्या ढगांचं पुढे काय होणार? "
मी परत एकदा गोंधळलेल्या अवस्थेत म्हणालो: "म्हणजे काय? पाऊस पडणार."
त्यावर नाना म्हणाले: " बरं आणि मग ?"
मी: "पाऊस पडला की मग काय गवत झाडं झुडपं शेतीवाडी"
नाना : "उत्तम ! एकदम बरोबर आणि पुढे ? "
आता ही विचारांची शृंखला कुठे चालली होती हे काही मला कळत नव्हतं पण मी उत्स्फूर्तपणे उत्तर देत होतो म्हणालो : "जिथे झाडं, झुडपं, शेतीवाडी झाली तिथं प्राणी पशुपक्षी तयार होणार."
नाना : "आणि ? " नानांनी एकदम कुतूहलाने माझ्याकडे पाहत विचारले.
मी : "अर्थातच माणसं !"
आता नाना उत्साहित होऊन म्हणाले: "एकदम बरोबर. म्हणजे तुझ्या लक्षात येते आहे का की एकच सूर्य आहे. बाकी त्याची बस रूपांतरे होत आहेत. आधी पृथ्वी, मग समुद्र, मग वाफ, ढग, पाऊस, शेती, झाड, पशुपक्षी, माणसं ! हे सारं दिसत जरी भिन्नभिन्न असले तरी त्यांचे मुळ रुप एकच आहे ..."
नाना उत्तराच्या अपेक्षेने माझ्याकडे पहात होते , मी नकळतपणे बोलुन गेलो

"सुर्य !"

"व्हॉला ! " नाना म्हणाले "आता याच माणसांमधील दोन माणसं कुठेतरी कोणत्यातरी घराच्या टेरेसवर बसली आहेत. एक सूर्यनमस्कार करतोय अन् एक संध्येसाठी वाट बघतोय सूर्य ढगाआडुन बाहेर येण्याची ! आता तूच सांग नक्की कोण कोणाची उपासना करते आहे ? "

मी : "...."

मला परत एकदा निशब्द झालेलं पाहून नाना म्हणाले: "अरे उत्तर तुला आधीच माहीत आहे. तुला माहीत नाही असं काहीच नाही. तुला सर्वच माहीती आहे, बस्स आठवायचं आहे ! आठव पाहु ,सुर्याला अर्घ्य देताना आपण काय म्हणतो ? "
"असावादित्यो ब्रह्म |" मी उत्स्फूर्तपणे म्हणालो. " हा सूर्य, प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणारा सूर्य, हाच सर्वव्यापी ब्रह्म आहे."
त्यावर नाना म्हणाले: "आणि पुढे ?"
मी म्हणालो : "ब्रह्मैवाहमस्मि|"
नाना म्हणाले : " अगदी बरोबर. आधी पृथ्वी त्वया धृता लोक: म्हणलास ती पृथ्वी सुर्यापासुन बनलेली, ज्या जलाने प्रोक्षण करत आपोहिष्ठा म्हणालास ते पाणी सुर्यापासुन बनलेले, ज्या हातांनी सुर्याला अर्घ्य दिलेस तो हा हाडामासाचा देह , अन्नमयाद अन्नमयेव अर्थात अन्नापासुन बनलेला . ते अन्न कसं तयार झालं तर सुर्यापासुन ! संध्या करणारा तुझा हा देह सुर्यापासुन बनलेला , अन तुला संध्या शिकवली तो हा देह देखील सुर्यापासुनच बनलेला ! मग नक्की संध्या उपासना नक्की केली कोणी ?"

मी अवाक होऊन नानांकडे पहात राहिलो.

ढगांचे अवगुंठन किंचित बाजूला हटले आणि सूर्य ढगाबाहेर आला. नानांनी काहीही न बोलता फक्त हाताने सुर्याकडे निर्देश करत "हे पहा हे पहा" अशा अर्थाचा इशारा केला.

आणि मी सूर्य पाहिला !

आता मी एकटक सुर्याकडे पहात होतो . माझी नजर काही केल्या सूर्यापासुन हटत नव्हती. परत सुर्य ढगाआड गेला, मी मात्र तसाच पहात राहिलो.
नाना शांतपणे खुर्चीतुन उठले त्यांचे संध्येचे पळी पंचपात्र पंचा वगैरे घेऊन खाली निघुन गेले. जिना उतरत असतानाचे त्यांचे अगदी ऐकु येतीन न येतील अशा आवाजातील शब्द माझ्या कानावर पडले !

"भगवानेव स्वनियाम्य स्वरुपस्थिती प्रवृत्ती स्वशेषतैक रसने अनेन आत्मना कर्त्रा स्वकीयैश्च उपकरणै: स्वाराधनैक प्रयोजनाय परमपुरुषः सर्वशेषी श्रियःपति: स्वशेषभूतं इदं प्रातःसंध्यावंदनाख्यं कर्म स्वस्मै स्वप्रीतये स्वयमेव कारितवान् || "

मी शांत बसून "ढगाआड गेलेल्या सूर्या"कडे पाहत संध्या केली. थोड्यावेळाने आजीचा आवाज ऐकू आला: "गिरिजा. गिरिजा, आधी खाली ये पाहू. उन्हं वर येत आलीत. इथे न्याहारीची वेळ झाली. ये खाली तडक. " आज्जींच्या आवाजाने तंद्रीं भंगली , ध्यान मात्र अजुन तसेच होते .
मौनाने खाली आलो तेव्हा आजोबा देवपूजा करत होते. आज्जींने माझ्या हातात न्याहारीसाठी केलेल्या गोडाच्या शिऱ्याची वाटी दिली आणि आजोबांकडे बघून म्हणाली:
" हे पहा आला तुमचा सूर्य पाहिलेला माणूस !"
आणि हसत हसत आज्जी स्वयंपाक घरात निघुन गेली. नानांनी माझ्याकडे वळुन पाहिलं नाही मात्र त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचं हसु मात्र उमटलं. आज नानांनी पुजेमध्ये जरा बदल केला अन् पुरुषसुक्ताऐवजी ईशावास्योपनिषदातील मंत्र नाना संथ आवाजात म्हणु लागले -

पूषन्नेकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन् समूह । तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसौ पुरुषः सोऽहमस्मि ॥

सोऽहमस्मि ॥

____________________________________

||तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ||

कथाअनुभव

प्रतिक्रिया

नानांचे व्यक्तिमत्त्व करारी आहे.छान लिहिलंय.
रच्याकने बन्या बापू गोडबोले ५० नित्यनेमाने पहाटे पाच वाजता अजिंक्यतारा किल्ल्यावर येत,ही कोनशिला किल्ल्यावर होती.ते तुमचे कोण?
तेथील ज्येष्ठांना एक प्राचीन देह,मनो शिस्त दिसत आहे _/\_

व्यक्तित्रण चांगलंच जमलंय. बाकी तुम्ही नेहमी अद्वैताकडेच जाता.

निषिक्तश्चन्द्रतेजोभिः सूयते भूगतो रविः |
ओषध्यः षड्रसा मेध्यास्तदन्नं प्राणिनां भुवि ||
एवं भानुमयं ह्यन्नं भूतानां प्राणधारणम् |
पितैष सर्वभूतानां तस्मात्तं शरणं व्रज ||

शेवटी वी आर नथिंग बट अ स्पेसडस्ट, ट्राईंग टू फाइंड इट्स वे बॅक टू द स्टार्स.

प्रसाद गोडबोले's picture

2 Oct 2024 - 10:41 pm | प्रसाद गोडबोले

धन्यवाद वल्लीसर !

आपल्या प्रतिसादातुन नेहमीच नवीन काहीतरी शिकायला मिळते !

एवं भानुमयं ह्यन्नं भूतानां प्राणधारणम् |
पितैष सर्वभूतानां तस्मात्तं शरणं व्रज ||

___/\___

आसावादित्यो ब्रह्म ! ब्रह्मैवाहमस्मि !

गवि's picture

1 Oct 2024 - 11:36 am | गवि

Hydrogen atoms when given enough time, turn into humans.

Everything is hydrogen. Even Sun.

Bhakti's picture

1 Oct 2024 - 12:05 pm | Bhakti

Only Hydrogen? even our body needs Oxygen with hydrogen.

विश्व निर्माण झालं तेव्हा फक्त हायड्रोजन होता. साधा अणू. त्यात न्युट्रान पण नाही. एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह.

ऑक्सिजनच कशाला, सगळीच मूलद्रव्ये या मूळ अणूपासून तयार होत गेली आहेत. इतका काळ जाऊन देखील आजसुद्धा पूर्ण विश्वात नव्वद टक्के अणू हायड्रोजनचे आहेत. सूर्य हा प्रचंड आकाराचा हायड्रोजन बॉम्ब आहे. दूर आहे म्हणून तो आयुष्य देतोय.

प्रचेतस's picture

1 Oct 2024 - 12:20 pm | प्रचेतस

आणि मग क्वार्क्सचं काय?

तुम्हाला सर्व उलगडून सांगावे लागते. क्वार्कच मूळ कण असले तरी त्यांना स्वतंत्र अस्तित्व नसते. अगदी सुरुवातीला ते निर्माण झाले आणि एकत्र येऊन हायड्रोजन बनले. भौतिकशास्त्र विषय नव्हता वाटते तुम्हाला?! अं ?

सिंग्युलॅरिटीच्या वेळी तरी त्यांना अस्तित्व असेलच ना?

हो. असावे. पण त्याबद्दल काही नक्की सांगणे कठीण. अशक्य.

भागो's picture

1 Oct 2024 - 10:53 pm | भागो
मिसळपाव's picture

2 Oct 2024 - 8:55 am | मिसळपाव

पांड्या, पांड्या, लेका बालिस्टर का नाही झालास? !! :-P

भागो's picture

2 Oct 2024 - 10:09 am | भागो

वणक्कम!! सार.
कुंजम लेट पण्याचे.

प्रसाद गोडबोले's picture

3 Oct 2024 - 12:18 am | प्रसाद गोडबोले

Hydrogen atoms when given enough time, turn into humans. Everything is hydrogen. Even Sun.

धन्यवाद गवि सर ! आपला प्रतिसाद पाहुन नेहमीच हुरुप येतो :)

"ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे. "

मुळात हाय्ड्रोजन अ‍ॅटम कसा तयार झाला ? टाईम म्हणजे काय ? हायड्रोजन अ‍ॅटमला वेळ देणे म्हणजे नक्की काय ? आणि तो काम्हणुन ह्युमन बनेल , त्याचा उद्देश काय ? वगैरे वगैरे.

बाकी आपला प्रतिसाद पाहुन कणाद महर्षीं आणि त्यांच्या वैशेषिक दर्शनाची प्रकर्षाने आठवण झाली. त्याचा खंडनमंडनात खोलवर जात नाही बसत.
फक्त एक छोटासा तर्क : हायड्रोजन अ‍ॅटम प्रायमाफेस्सी . प्रथमदर्शनी पाहता निर्जीव आहे , अचेतन आहे, जड आहे , मात्र जीवन ही काहीतरी भिन्न गोष्ट आहे. मग चैतन्य , जाणीव , जागृती , सचेत अवस्था कुठे जन्मास येते ? सेल्फ रप्लिकेटिंग केमिकल्स का तयार होतात ? ह्याचे काय उत्तर देणार ? तस्मात ही चेतना , हे चैतन्य हायड्रोजनच्या भौतिक रुपाच्याही परे आहे.
त्यामुळे एव्हरीथिंग इज हायड्रोजन असे म्हणता , सर्वं खल्विदं ब्रह्म असे म्हणतो. आणि ते ब्रह्म इतके सूक्ष्म आहे की हायड्रोजन च्या अणु पासुन सुर्यापर्यंत , आणि प्रोटॉन इलेक्टॉन मधील पोकळी पासुन ते ब्लॅकहोल मधील पोकळीपर्यंत सर्व्य व्याप्त आहे.
सूर्य हा त्याचा निरदेषक आहे , जाणीव करवून देणारा आहे ,

वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योत्कारु सूर्य जैसा ।
येणें येके गुणें आकाशा । अंबरत्व ॥ ६-३ ॥

पण ब्रह्माची जाणीव होणे हेच तन्मय होणे , सायुज्य होणे असल्याने बस इतकेच म्हणुन थांबतो :

सूर्याचिया हाता । अंधकारू नये सर्वथा ।
मा प्रकाशाची कथा । आईकता का ? ॥ ७-२५८ ॥

अंधारु कां उजिवडु । हा एकला येकवडु ।
जैसा कां मार्तंडु । भलतेथें ॥ ७-२५९ ॥

सूर्याला अंधार म्हणजे काय माहीत नाही , मग त्याला प्रकाश म्हणजे काय हे तरी कसे माहीती असणार ? त्यामुळे सूर्याला अंधार नाही अन उजेडही नाही, तो सूर्य बस त्याच्या जागी जसा आहे तसा आहे.

"आहे"

"ह्या विषयावर एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे. "

हा हा हा..

माझ्या प्रतिभासाधनेच्या वेळा (दुपारी बारा ते तीन) सोडून कधीही खुशाल करा चर्चा. ;-))

बाकी जिवंत निर्जीव असे काही नाहीच आहे. सर्व काही जिवंत आहे. वेळ असे काही नसतेच. पण पुरेशी स्थित्यंतरे होऊ देणे अशा अर्थाने वेळ देणे हा शब्दप्रयोग करावा लागतो. नाईलाज.

काहीतरी निर्माण होत रहावे, बदलत राहावे, सुघटित व्हावे, परत मोडावे असे सर्व होत राहणे हीच मुळात एक ईषणा आहे. त्या अर्थाने हे क्वार्क जेव्हापासून आहेत तेव्हापासून त्या ईषणेचं अस्तित्व आहेच. आता कण हे खुद्द ईषणा आहेत की ती वेगळी आहे वगैरे हा तात्विक academic भाग झाला. तसा निरुपयोगी. आपल्या मानण्यावर आहे. (जसा "वेळ"..)

नूतन's picture

1 Oct 2024 - 9:56 pm | नूतन

आवडलं.

श्वेता२४'s picture

3 Oct 2024 - 11:14 am | श्वेता२४

दोन्हि आवड्ले