जिथे सागरा धरणी मिळते

वझेबुवा's picture
वझेबुवा in जनातलं, मनातलं
17 Nov 2023 - 9:49 pm

जिथे सागरा धरणी मिळते

मावळतीच्या सूर्याकडे पाहत पाहत पावले पडत होती. ओहोटी असल्याने चालायला भरपूर वाव होता. जसजसा पुढे जात होतो, तसतशी मागच्या लाऊडस्पिकर वर चालू असलेली क्रिकेट मॅचची कॉमेंटरी क्षीण होत होती. त्या तेजोनिधीने पाण्याच्या पृष्ठभागावर सोनेरी रेखा काढली होती आणि वाळूच्या खळग्यांमध्ये साचलेल्या ओहोटीच्या पाण्यात अनेक केशरी दिवे लावले होते. चालता चालता त्या पाण्यातील सूर्याच्या प्रखर प्रतिबिंबावर नजर रोखली गेली. आकाशातला सूर्य जणू जाता जाता वाळूवर रेंगाळत होता. या रेंगाळणाऱ्या शेपटाला खेचत सूर्यनारायण स्थितप्रज्ञता दाखवत होता. लहानपणी देखावा काढताना निळ्या पाण्यात पिवळे शेडींग करायचो ते आठवले.
विचारचक्र चालूच होते. पृथ्वीच्या परिवलनामुळे सूर्योदय सूर्यास्त होतात, पाण्याच्या लाटा पुढे पुढे होत नसून पाणी जागच्या जागी वर खाली होत असते अश्या सर्व वैज्ञानिक संकल्पना मानायला मन तयारच नसते. आणि सूर्य डोंगरामागून डोकावत उगवतो व समुद्रामध्ये हळू हळू बुडतो तसेच फेसाळणाऱ्या लाटा समुद्राच्या पोटातून सुटून किनाऱ्यावर धडक देतात हेच काय ते अशा कातर वेळी मनाला पटणारे सत्य.
किनाऱ्यावर आल्यावर 'जिथे सागरा धरणी मिळते..' इथपासून मनात सुरु झालेला बॅकग्राऊंड स्कोर आता 'खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता..' इथवर आला होता.
चालता चालता पावलांना पाणी लागले. पाऊलभर पाण्यात पोचून थांबलो. आणि त्या थोड्याशा राहिलेल्या तेजाला अर्घ्य दिले.
एक टीम मॅच जिंकली आणि लाऊडस्पिकर वर गलका झाला. तंद्री भंगली आणि मागे वळून मॅचच्या मैदानाकडे पाहिले. पुन्हा फिरलो तर आकाशाचे कॅनव्हास पूर्णपणे कोरे.
जे आहे त्या सगळ्यासाठी देवाचे आभार मानत परतीची पावले पडू लागली.

- वझेबुवा

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

22 Nov 2023 - 8:12 pm | कर्नलतपस्वी

किनाऱ्यावर आल्यावर 'जिथे सागरा धरणी मिळते..' इथपासून मनात सुरु झालेला बॅकग्राऊंड स्कोर आता 'खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता..' इथवर आला होता.

कवी ग्रेस यांच्या कवीता प्रमाणे दुर्बोध.

काहीतरी लिहायचं राहीलयं असे वाटते.

व्यक्त पेक्षा अव्यक्तच जास्त आहे लेखामधे

चौथा कोनाडा's picture

25 Nov 2023 - 10:16 pm | चौथा कोनाडा

मुक्तक आवडले.

तेजोनिधीने पाण्याच्या पृष्ठभागावर सोनेरी रेखा काढली होती आणि वाळूच्या खळग्यांमध्ये साचलेल्या ओहोटीच्या पाण्यात अनेक केशरी दिवे लावले होते.

खुप छान !

'जिथे सागरा धरणी मिळते..' इथपासून मनात सुरु झालेला बॅकग्राऊंड स्कोर आता 'खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता..' इथवर आला होता.

कंदील का आला असेल ही उत्सुकता दाटून आली !
ते कंदीलाचे मुक्तक पण लिहा एकदा.

पुलेशू

श्वेता व्यास's picture

29 Nov 2023 - 10:10 am | श्वेता व्यास

मनस्वी लिहिलेलं आवडलं.