हेंडगूळ

अरिंजय's picture
अरिंजय in जनातलं, मनातलं
29 Oct 2023 - 2:40 pm

*हेंडगूळ*

पावसाळ्यातली गोष्ट. गाडी मित्राकडे होती, ती आणायला पायीच चाललो होतो. उड्डाणपूलाच्या बाजूने सर्विस रोडवर पूर्ण चिखल झालेला. एकच माणूस जाईल, इतकीच पायवाट शिल्लक, बाकी सगळा चिखल. जवळपास अर्ध अंतर गेल्यावर एके ठिकाणी पाच सहा कुत्र्यांचा घोळका एका कुत्री साठी जोरजोरात भांडत होता. ते बघून पलीकडून येणारे दोघं तिघं आणि इकडून जाणारे आम्ही दोघं तिघं, जागेवर थांबलो. चुकून जरी भांडत आमच्या अंगावर आले, तरी आम्हाला पळायला जागासुद्धा शिल्लक नव्हती. मिनीटभराने ती कुत्री तिथून हलली आणि तिच्या मागे सगळा घोळका. मनातल्या मनात शिव्या घातल्या "भाद्रपदाला अजून दोन महिने अवकाश असताना मधेच काय?". सावधपणे पुढची चिखलाची पायवाट तुडवताना हा किस्सा आठवला.

किस्सा आहे, मी मुक्तांगण मधे असतानाचा. वार्डमधे आमच्या सोबत एक काका होते, "जोशी काका". नावाप्रमाणेच त्यांचं व्यक्तिमत्त्व. मध्यम उंची, ५'४/५'५ वगैरे, गुटगुटीत देह, गुलाबी झाक असलेला गोरापान रंग आणि डोक्यावर फक्त कडेकडेने पांढऱ्याशुभ्र केसांच्या पुंजक्याची पट्टी, मधे तुळतुळीत गुलाबी गोरं टक्कल. बोलणं सुद्धा टिपिकल पुणेरी संथ टोनमधे. पण .... फार अतरंगी माणूस. कन्याकुमारी च्या विवेकानंद केंद्रामध्ये योगासने शिकवायचे. कोणास ठाऊक कसे, व्यसनात अडकले आणि मुक्तांगणला येऊन पोचले. तिथे आमची ओळख झाली.

काकांचा माझ्यावर विशेष लोभ असण्याचं एक कारण होतं. मुक्तांगणमध्ये सगळे पेशंट एकाच वॉर्ड मधे रहायचे. प्रसिद्ध व्यसनमुक्ती केंद्र असल्यामुळे बरीच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पाहुणे मंडळी भेट द्यायला यायची. आणि अशी पाहुणे मंडळी आली की, आमचे वॉर्ड निरीक्षक "बंधू", नाव वेगळं होतं पण सगळे बंधूच म्हणायचे, पाहुण्यांना घेऊन वॉर्ड दाखवायला यायचे. आणि काही खास पेशंट लोकांची ओळख करून द्यायचे, त्यात आमच्या दोघांचा नंबर असायचा. नेहमीप्रमाणे पुस्तकी भाषेत माहिती देऊन झाली की बंधू सगळ्यांना बोलवायचे. "या, या सगळे जण या, पाहुण्यांची ओळख करून घेऊ". असं म्हणलं की सगळे एका जागी गोळा व्हायचे. पुढे काय होणार, सगळ्यांना पाठ असायचं. अशावेळी जोशी काका हटकून माझ्या बाजूला येऊन थांबायचे. पुणेरी संथ टोनमधे पुटपुटायचे, "झाऽली सुरूवात, ....... च्याऽयला. आऽता समोऽर बोऽलावून इज्जत काऽढणार, च्याऽयला". सगळे गोळा झाले की बंधू चालू व्हायचे "आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं करणारी लोकं येतात." मग माझ्या नावाचा पुकारा व्हायचा. मी पुढे जाऊन नमस्कार चमत्कार करून माझ्या व्यसनाची माहिती द्यायचो आणि परत आपल्या जागेवर. आणखी एक दोघं झाले की पुढचा विषय. "आमच्या कडे वेगवेगळ्या स्तरातील लोकं येतात" इती. बंधू. आणि काकांचं नाव घेतलं जायचं. "या, जोशीकाका या". लगेच काका त्यांचे गुलाबी ओठ, पार या कानापासून त्या कानापर्यंत पसरवून स्मित हास्य करायचे आणि माझ्या मागून जात जात कानात पुणेरी संथ टोनमधे पुटपुटायचे "आऽयची ** बंध्याच्या".

असे हे काका एक दिवस, चहाच्या वेळी, खिडकीजवळ उभे राहून सावकाश चहा पित, गंभीरपणे बाहेर बघत उभे होते. मी ग्लासभरून गरमागरम चहा घेऊन वॉर्ड मधे शिरत होतो. मला दारात बघून काका पुणेरी संथ टोनमधे एकदम ओरडले,"अऽरे मानस ... मानस, इऽकडे येऽ इकडे ये इकडे ये." मी चहा सांभाळत घाईघाईने काकांजवळ पोहोचलो. त्यांनी त्यांचा गोरापान गुटगुटीत हात बाहेर काढून बोटाने इशारा केला आणि पुणेरी संथ टोनमधे म्हणाले,"तेऽ बऽघ, हेंऽडगुळ लागलंय." बाहेर गवतावर एक कुत्रा आणि एक कुत्री जगप्रसिद्ध रोमँटिक पोज मधे धापा टाकत उभे होते. मी जागेवर फुटायच्या बेतात होतो. उभ्या उभ्या चहा सांभाळत खदाखदा हसायला सुरुवात केली. काका पण सावकाश हसत पुणेरी संथ टोनमधे म्हणाले,"ह्या ह्या ह्या ...... बऽघून घे. याऽ जेऽलमधे हेऽच बऽघायला मिळणार ..... ह्या ह्या ह्या." माझा खदखदाट बघून आणखी तीन चार जण गोळा झाले. काका त्यांना पण दाखवत पुणेरी संथ टोनमधे म्हणाले "बऽघून घ्याऽ रेऽ, इथे हेऽच बघायला मिळणार."

हे ठिकाण

प्रतिक्रिया

कंजूस's picture

30 Oct 2023 - 4:56 am | कंजूस

रम्य ते बालपण.

बघायचं ते दाखवायचं.
विचारायचं.
सांगून खी खी हसायचं.

विंजिनेर's picture

30 Oct 2023 - 7:51 am | विंजिनेर

व्यक्तिचित्रण चांगलं जमतय. मुक्तांगण सुद्धा भरीव विषय आहे - अशा गोष्टींवर लिहा -
बाकी सवंग गोष्टी राहूदे

राजेंद्र मेहेंदळे's picture

30 Oct 2023 - 1:32 pm | राजेंद्र मेहेंदळे

पहिल्यांदाच ऐकला. बांडगूळशी काही नाते आहे का?

चौथा कोनाडा's picture

31 Oct 2023 - 5:26 pm | चौथा कोनाडा

असू शकेल.
बांडगूळशी आणि हेंडगूळ, दोन्ही आशयाच्या अर्थाने एकमेकांशी नाते सांगतातच !

गूळ लावणे, गुळ पीठ जमवणे असे गूळ धारी शब्द आहेतच.

चौथा कोनाडा's picture

30 Oct 2023 - 6:01 pm | चौथा कोनाडा

हा .. हा .... भारी किस्सा.... हा .. हा .. हसु आले !

और आन्देव !

शानबा५१२'s picture

30 Oct 2023 - 7:47 pm | शानबा५१२

ह्या लेखातुन काय शिकायला मिळाले असेल?

मी हेच शोधत होते पण मनाचा ताबा घेणार छान ओघवते लिहिले आहे त्यामुळे विरंगुळा आवडला.मुक्तांगणच्या अजून गोष्टी वाचायला आवडेल.

आणि त्यांना भेट द्यायला येणारे पाहुणे यांचा संवाद ही बाब आत्तापर्यंत समजली नव्हती. या अशा भेटी गाठी काही जणांसाठी मानसिक दृष्ट्या वेदनादायक असू शकतील असा माझा अंदाज आहे. व्यसनाधीनतेकडून व्यसनमुक्तीकडे वाटचाल ही काही सोपी गोष्ट नसावी. खास करुन व्यसन मुक्त होतांना जो शारीरिक बंडाचा त्रास होतो त्यातून माणसे परत परत व्यसनाकडे ओढली जाऊ शकतात. अशा वेळेस, आपण विनाकारण, वैद्यकीय, मानसोपचार आणि समाज संशोधक यांच्या शिवाय असणाऱ्या, लोकांचा कुतुहलाचा विषय होतो ही काही आवडणारी, स्वतःबद्दल चांगलं वाटणारी गोष्ट होऊ शकत नाही. खरं तर, अशा भेटी गाठींचा काही विपरीत परिणाम होतो का ही गोष्ट तपासून बघितली जावी असं वाटते.

टर्मीनेटर's picture

31 Oct 2023 - 10:14 pm | टर्मीनेटर

आणि त्यांना भेट द्यायला येणारे पाहुणे यांचा संवाद ही बाब आत्तापर्यंत समजली नव्हती. या अशा भेटी गाठी काही जणांसाठी मानसिक दृष्ट्या वेदनादायक असू शकतील असा माझा अंदाज आहे.

संपूर्ण सहमत!
मूक्तांगणशी माझा संबंध आला होता एका (आज दिवंगत असलेल्या) शाळूसोबती मित्राला भेटण्याच्या निमित्ताने! ज्याचा उल्लेख मी चारेक वर्षांपूर्वी इथे मिपावर करून झाला आहे....

व्यसनमुक्ती केंद्र वगैरे आधुनिक अंधश्रद्धांवर ज्यांना विश्वास ठेवायचा आहे त्यांना ठेऊद्या बापडे, पण अडगळ वाटू लागलेल्या आई-बापाप्रमाणे कुटुंबातल्या व्यसनी व्यक्तीला ठेवण्याची जागा ह्याशिवाय अशा व्यसनमुक्ती केंद्राची अजून काही वेगळी ओळख नाही असे माझे स्पष्ट वैयक्तिक मत.

व्यसनमुक्ती केंद्रे आणि त्या अनुषंगाने दिल्या जाणाऱ्या 'तथाकथित' धंदेवाईक मनसोपचारांबद्दल खूप काही लिहिण्यासारखे आहे पण आता इथेच थांबतो...

(नव्या अंधश्रध्दांचा कट्टर विरोधक) टर्मीनेटर

पण अडगळ वाटू लागलेल्या आई-बापाप्रमाणे कुटुंबातल्या व्यसनी व्यक्तीला ठेवण्याची जागा ह्याशिवाय अशा व्यसनमुक्ती केंद्राची अजून काही वेगळी ओळख नाही असे माझे स्पष्ट वैयक्तिक मत.

ऑ?? टॉल क्लेम?!! म्हणजे रोचक आहे पण तरीही... असेल बुवा.

टर्मीनेटर's picture

31 Oct 2023 - 10:42 pm | टर्मीनेटर

म्हणजे रोचक आहे

आहेच! मिळाल्यास उपरोलिखित केसेसचा अधिकृत डेटा मिळतो का ते पाहावे, आयपीस, आएएस ऑफिसर्स पासून असिस्टंट पोलीस कमिशनर, फौजदार, हवालदार आणि प्रशासकीय सेवेतील किती मंडळी (नोकरी टिकवण्या साठी अनिवार्य झाल्याने) तिथे भरती होतात ह्याची माहिती मिळाल्यास खूपच रोचक ठरेल 😀

सब गंदा हैं पर धंदा हैं ये...

सुबोध खरे's picture

1 Nov 2023 - 10:22 am | सुबोध खरे

व्यसनमुक्ती केंद्र वगैरे आधुनिक अंधश्रद्धांवर ज्यांना विश्वास ठेवायचा आहे त्यांना ठेऊद्या बापडे, पण अडगळ वाटू लागलेल्या आई-बापाप्रमाणे कुटुंबातल्या व्यसनी व्यक्तीला ठेवण्याची जागा ह्याशिवाय अशा व्यसनमुक्ती केंद्राची अजून काही वेगळी ओळख नाही

सहा आंधळे आणि हत्ती च्या गोष्टी प्रमाणे आपण जेवढे पहिले तेवढाच आपला अनुभव आहे असे खेदाने म्हणावे लागते.

खाजगी व्यसनमुक्ती केंद्रात माणूस आपल्या नातेवाईकाला किती वेळ " अडकवून" ठेवू शकेल?

सरकारी मनोविकार रुग्णालयात किती तरी रुग्ण बरे झाल्यावरहि रुग्णाला घरी नेऊ इच्छित नाहीत. दुसरे "लग्न" केल्यानंतर पहिली बायको बरी झाल्यावरही "ती बरी झालेली नाही" या कारणासाठी तिला रुग्णालयात ठेवणारा नवरा किंवा घरात लग्नाची धाकटी बहीण असल्याने मोठ्या बहिणीला घरी न नेणारा बाप मी पाहिलेला आहे. बऱ्या झालेल्या कित्येक रुग्णांना आईवडील तयार असले तरी त्यांचे भाऊ बहीण घरी नेण्यास अजिबात तयार नसतात. कारण अगोदरच लहान असलेल्या घरात एक अजून कायमचा घरात असणारी व्यक्ती कुणालाच नको असते. नवरा बायकोच्या एकांतात अडचण आणणारी व्यक्ती कुणाला हवी असेल?

या शिवाय अगोदरच ओढगस्तीची स्थिती असल्यास खायचे एक तोंड कशाला वाढवून घ्या असा स्वार्थी पण व्यावहारिक विचार त्यामागे असतो. हीच स्थिती व्यसनी भावंडाबद्दल असते.

माणसं स्वार्थी असतात. त्याचे खापर व्यसनमुक्ती केंद्र किंवा मनोविकार रुग्णालयावर कशाला फोडताय?

म्हणून असे सरसकट विधान करणे चूक आहे

व्यसनमुक्ती हा एक अत्यंत कठीण आणि गहन असा विषय आहे. आणि जोवर आपला अगदी जवळचा नातेवाईक यात अडकत नाही तोवर बहुसंख्य माणसे व्यसनाबद्दल आणि व्यसनमुक्ती केंद्राबद्दल बऱ्यापैकी पूर्वग्रह बाळगून असताना दिसतात.

व्यसनातून मुक्त झालेले रुग्ण परत परत व्यसनात अडकताना दिसतात त्यामुळे व्यसनमुक्ती केंद्राच्या एकंदर यशाबद्दल सामान्य माणसांना बरेच गैरसमज असतात. हेरॉईन कोकेन सारख्या व्यसनातून मुक्ती मिळवणे खरोखरच अवघड आहे आणि परत परत येणारे रुग्ण पण बरेच असतात परंतु

बरे झालेले बहुसंख्य रुग्ण आपण व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन बरे झालो हे कुठेही सांगत नाहीत कारण नोकरी व्यवसाय लग्नसंबंधात अडथळा येऊ शकतो.

यामुळेच बरे न झालेल्या रुग्णांच्या सुरस आणि चमत्कारिक कथा बऱ्याच ऐकायला मिळतात.

हेरॉईनच्या व्यसनातून मुक्ती होण्यासाठी रुग्णास अन त्याला उपचार देणाऱ्या कर्मचाऱयांना बरेच शारीरिक कष्ट करावे लागतात.

हेरोईन मिळाले नाही तर रुग्णाला हगवण लागते ओकाऱ्या होतात. रुग्ण त्या घाणीत बराच काळ पडून राहतो. नातेवाईक हे साफ कार्याला तयार नसतात. हे सर्व साफ करायला कर्मचारी मिळवणे जिकिरीचे असते. खाजगी ठिकाणीच कशाला सार्वजनिक रुग्णालयात सुद्धा यासाठी पैसा मोजावा लागतो. आणि असे परत परत होत राहते. यामुळे नातेवाईक रुग्णाला आणून टाकले की परत नेण्यास अजिबात तयार नसतात.

अगदी आईबापांच्या धीराची कसोटी लागते.

पण म्हणून सर्वच व्यसनमुक्ती केंद्राला अंधश्रद्धा म्हणणे?

बरे झालेले बहुसंख्य रुग्ण आपण व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन बरे झालो हे कुठेही सांगत नाहीत कारण नोकरी व्यवसाय लग्नसंबंधात अडथळा येऊ शकतो.

असा प्रकार मनोरुग्ण असलेल्या ओळखीच्या मुलींबरोबर पाहिला.दोघींचा भूतकाळ लग्नासाठी लपविला गेला.एक चांगला संसार करते पण दुसरी परत पहिल्या मानसिक स्थितीत आली.वाताहतच आहे.
खरोखर आईवडिलांचा घरच्या लोकांचा मनोरूग्ण,व्यसन असणार्या मुलांमुळे कस लागतो.

असेच काहीसे विचार मनात आले होते. मुक्तांगणची गोष्ट हे अवचटांचे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचले असल्याने असे केंद्र चालवण्याचा व्याप आणि त्याला लागणारी चिकाटी जाणवली होती. त्यामुळे वरील मत वाचून जरा धक्काच बसला होता. पण काही वेगळ्या स्वरूपाची माहिती असेल तर काय नेमके ? तो तपशील वाचायला रोचक वाटले असते.

आणखी एक पटले तुमचे डॉक्टर..

व्यसन या विषयात, विशेषतः सिगरेट, गर्द यात, व्यसन कायमचे सुटणे (आजार बरा होणे) याचे प्रमाण उर्फ सक्सेस रेट अत्यंत कमी आहे. हे अनेक ठिकाणी वाचले आहे.

त्यामुळे यश अपयश यांची थेट टक्केवारी बघून अशा संस्थेच्या आवश्यकतेबद्दल मत देणे अयोग्य होईल.

माझ्या ओळखीचे एक ऑनकोलॉजिस्ट होते. ते काहीसे गमतीने म्हणायचे की माझ्या पेशंट्सची बरे होण्याची, वाचण्याची टक्केवारी (म्हणजे माझा सक्सेस रेट) इतर डॉक्टर्सपेक्षा अत्यंत कमी असते. याचा अर्थ कर्करोगावरील सर्वच उपचार निरुपयोगी किंवा स्कॅम असतील असे नव्हे. (तत्वतः तसे असूही शकेल.. पण त्यासाठी सॉलिड मुद्दे मांडणी करून कोणी सांगितले तर पटेलही.)

सुबोध खरे's picture

1 Nov 2023 - 11:44 am | सुबोध खरे

एके काली क्षयरोगावरील उपचार कठीण आणि फारच कमी यश देणारे होते परंतु तेंव्हाही त्यावर उपचार करणारे डॉक्टर काही घोटाळा किंवा बनवाबनवी (scam) करत होते असे नाही

कर्करोगावर औषधोपचार करणारे डॉक्टर यांचे यशाचे प्रमाण इतर आजारांपेक्षा कमी आहे. याचे कारण हा रोगच दुर्धर आहे. परंतु म्हणून कर्करोगावरील उपचार म्हणजे घोटाळा हे समजणे साफ चूक आहे. आणि एखादा रुग्ण मरणारच आहे म्हणून त्यावरील उपचार सोडून देता येईल का?

मी अशा अनुभवावर आधारित खूप मागे एक लेख लिहिला होता. https://www.misalpav.com/node/26521

याच साठी केला होता अट्टाहास
शेवटचा दिस गोड व्हावा

निदान जाणाऱ्या रुग्णाचे आहेत तेवढे दिवस सुखात जावेत सुसह्य होणे हा पण उपचाराचा भाग आहेच

गवि's picture

1 Nov 2023 - 11:46 am | गवि

+१

Bhakti's picture

1 Nov 2023 - 12:18 pm | Bhakti

अगदी खरं!
देहाच्या यातनेला फुंकर घालणारे निराळेच.

चांगला आणि काहीसा गमतीशीर प्रतिसाद आवडला!
प्रतिसाद गमतीशीर का वाटला ते आधी सांगतो...

व्यसनमुक्ती केंद्र वगैरे आधुनिक अंधश्रद्धांवर ज्यांना विश्वास ठेवायचा आहे त्यांना ठेऊद्या बापडे, पण अडगळ वाटू लागलेल्या आई-बापाप्रमाणे कुटुंबातल्या व्यसनी व्यक्तीला ठेवण्याची जागा ह्याशिवाय अशा व्यसनमुक्ती केंद्राची अजून काही वेगळी ओळख नाही असे माझे स्पष्ट वैयक्तिक मत.

सुमारे साडे पाच वर्षांपुर्वी पुंबा ह्यांच्या "गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी का?" ह्या धाग्यावर फार छान चर्चा झाली होती. धाग्यावरचे तुमचे सर्व प्रतिसाद मुद्देसुद आणि निर्विवादपणे माझ्या विचारांशी जुळणारे होते. त्या धाग्यावर माझाही एक लांबलचक प्रतिसाद होता ज्यात मी व्यसनाधीनता आणि उपरोल्लीखीत दिवंगत मित्राचा व पुण्यात असलेल्या एका मित्राच्या 'हेल्प' ह्या व्यसनमुक्ती केंद्राचा उल्लेख केला होता. हा जुना प्रतिसाद शोधताना बाकिच्या प्रतिसादांचीही उजळणी झाली. आज ते सर्व प्रतिसाद वाचत असताना तुम्ही एका मिपाकराला दिलेल्या उपप्रतिसादातील खालचे वाक्य वाचले आणि गंमत वाटली.

"मी जे लिहिले आहे ते तुम्हाला पटले नाही तर ते माझे वैयक्तिक मत आहे असे समजून सोडून द्या"

तीथे ज्या मिपाकराला तुम्ही लिहिलेले पटले नव्हते त्याला तुम्ही "ते तुमचे वैयक्तिक मत आहे असे समजून सोडून द्यायला सांगीतले होते, आणि
इथे माझ्या वरच्या वाक्यातला "असे माझे स्पष्ट वैयक्तिक मत." असा स्पष्ट उल्लेख असलेला भाग सोयीस्करपणे दुर्लक्षीत करुन,

माणसं स्वार्थी असतात. त्याचे खापर व्यसनमुक्ती केंद्र किंवा मनोविकार रुग्णालयावर कशाला फोडताय?

म्हणून असे सरसकट विधान करणे चूक आहे

असे लिहुन माझ्या 'वैयक्तिक मताला' सरसकट विधान ठरवताय ह्याची गंमत वाटली 😂
असो,

सहा आंधळे आणि हत्ती च्या गोष्टी प्रमाणे आपण जेवढे पहिले तेवढाच आपला अनुभव आहे असे खेदाने म्हणावे लागते.

हे वाक्यही गमतीशीर आहे! व्यसनाधीन लोकं आणि व्यसनमुक्ती केंद्रांबद्दलचा माझा अनुभव काय आणि किती आहे ह्यची आपल्याला कल्पना नसल्याने खेद वगैरे अजिबात वाटुन घेउ नये. हत्ती आणि आंधळ्यांच्या गोष्टीप्रमाणे 'व्यसनमुक्ती केंद्र' म्हणजे हत्ती आणि आंधळ्यांनी चाचपडुन पाहिलेले त्याचे सहा अवयव म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रांच्या व्यवस्थापनातले सहा घटक अशी कल्पना केल्यास त्या सहापैकी पाच घटक मी अगदी डोळसपणे अनुभवले आहेत. फक्त एक घटक तेवढा शिल्लक रहातो, तो म्हणजे तिथे स्वतः रुग्ण म्हणुन भरती होण्याचा अनुभव मात्र मला नाही 😀

वर उल्लेख केलेल्या पुण्यातल्या 'हेल्प' आणि खारघरच्या 'निर्धार' अशा दोन व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये 'पाहुण्यांशी संवाद' म्हणुन चालणाऱ्या सेशन्स मध्ये संचालकांच्या विनंतीला मान देउन तिथल्या रुग्णांना 'मोटीव्हेट' करण्यासाठी अनेकदा भाषणेही ठोकली आहेत. वास्तवीक 'नशा' ह्या प्रकारात मोडणारा आणि सर्वसामान्यपणे ज्ञात असलेला नशेचा एकही प्रकार असा नसेल जो एकदा का होईना पण तो करुन अनुभवला नाही अशा माझ्यासारख्या माणसाने नशामुक्ती केंद्रातल्या रुग्णांसमोर भाषण्/व्याख्यान देण्यची कल्पना जेव्हा 'हेल्प'चा संचालक असलेल्या किशोरने पहिल्यांदा मांडली होती तेव्हा मला ती फारच हास्यास्पद वाटल्याने मी त्यासाठी स्पष्ट नकार दिला होता, पण त्यात काही वावगे नसल्याचे सांगत पुस्तकी ज्ञानावर आधारीत उपदेशांचे डोस पाजणाऱ्या पाहुण्यांपेक्षा अनुभवाचे बोल ऐकणे रुग्णांना आवडते आणि त्याचा परिणामही चांगला होतो असे केवळ सांगुनच न थांबता त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी एका रविवारी 'अल्कोहोलिक अ‍ॅनॉनीमस' ह्या संस्थेच्या सेशनलाही मला घेउन गेला होता.

पुणे म.न.पा.च्या एका शाळेच्या वर्गात चालणाऱ्या त्या सेशनसाठी उपस्थित असलेली विविध वयोगटांतली ४०-५० स्त्री-पुरुष मंडळी पाहुन सुरुवातीला मला हसुच आले होते कारण त्यांच्यापैकी अर्ध्याहुन अधिक मंडळी प्रचुर मद्यपान करुन आली होती. पुढे त्यांच्यातला एक एक जण आपापले अनुभव सांगू लागल्यावर मात्र मन गलबलुन गेले होते. व्यसनाधीन वीशी-पंचवीशीतल्या मुली आणि मध्यमवयीन महिलांचे अनुभवही सुन्न करणारे होते. आणि विशेष म्हणजे नशामुक्तीसाठीच्या सेशनला नशेत हजर असलेली मंडळीही मन लाउन सगळ्यांचे बोलणे ऐकत होती, आपल्या शंका विचारत होती.

हा प्रकार पाहिल्यावर मात्र मला किशोरचे म्हणणे पटले होते आणि माझ्या त्यानंतरच्या प्रत्येक पुणे भेटीत त्याच्या केंद्रातल्या रुग्णांशी 'संवाद' साधत होतो. तिथेच त्याने माझी तुषार नातूंशी ओळख करुन दिली होती आणि ते खारघरच्या 'निर्धार' व्यसनमुक्ती केंद्राची धुरा सांभाळत असताना काहिवेळा तिथेही जाउन तिथल्या रुग्णांशी 'संवाद' साधला होता.

तात्पर्य काय? तर माझे वरिल 'स्पष्ट वैयक्तिक मत' हे ऐकिव-वाचीव ज्ञानतुन काढलेला निस्कर्ष नसुन ते अनुभवाचा पायावर आधारित आहे. आणि ते 'वैयक्तिक मत' असल्याने सगळ्यांना पटलेच पाहिजे असा माझा दुराग्रहही नाही! पटले तर घ्यायचे नाहितर सोडुन द्यायचे. हाकानाका.

आता प्रतिसाद चांगला का वाटला ते सांगतो,
तुम्ही जी उदाहरणे दिली आहेत ती सर्व माझ्या व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे "अडगळ वाटू लागलेल्या आई-बापाप्रमाणे कुटुंबातल्या व्यसनी व्यक्तीला ठेवण्याची जागा" ह्या मताला दुजोरा देणारी व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबीयांची मानसिकता दर्शवत आहेत.
बाकी,

व्यसनमुक्ती हा एक अत्यंत कठीण आणि गहन असा विषय आहे. आणि जोवर आपला अगदी जवळचा नातेवाईक यात अडकत नाही तोवर बहुसंख्य माणसे व्यसनाबद्दल आणि व्यसनमुक्ती केंद्राबद्दल बऱ्यापैकी पूर्वग्रह बाळगून असताना दिसतात.

सहमत! फक्त वरिल वाक्यात 'बऱ्यापैकी पूर्वग्रह बाळगून असताना दिसतात.' ऐवजी 'बऱ्यापैकी गैरसमज बाळगून असताना दिसतात.' असा बदल सुचवावासा वाटतो!
आणि,

खाजगी व्यसनमुक्ती केंद्रात माणूस आपल्या नातेवाईकाला किती वेळ " अडकवून" ठेवू शकेल?

ते 'त्या' नातेवाईकाच्या व्यसनापायी दरमहा होणाऱ्या खर्चावर आणि कुटुंबियांच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबुन असेल. आणि शेवटी घरच्यांनी रुग्णाच्या सुधारण्याची आशा सोडुन पैसे भरणे आणि रुग्णाचा घरवापसीचा मार्ग बंद केल्यावर त्याच्यासमोर त्याच केंद्रात राहुन-खाउन दोन-तिन हजार रुपये हातखर्चाला मिळ्णारे पडेल ते काम करण्याचा पर्याय उपलब्ध असतो, असे अनेक रुग्ण आहेत ज्यांनी हा मार्ग स्वीकारला आहे.

सुबोध खरे's picture

1 Nov 2023 - 6:55 pm | सुबोध खरे

व्यसनमुक्ती केंद्र वगैरे आधुनिक अंधश्रद्धांवर ज्यांना विश्वास ठेवायचा आहे त्यांना ठेऊद्या बापडे, पण अडगळ वाटू लागलेल्या आई-बापाप्रमाणे कुटुंबातल्या व्यसनी व्यक्तीला ठेवण्याची जागा ह्याशिवाय अशा व्यसनमुक्ती केंद्राची अजून काही वेगळी ओळख नाही

अजूनही हेच आपले वैयक्तिक मत असेल तर मी ते बदलण्यासाठी प्रयत्न करणारच नाही

परंतु आपल्या वैयक्तिक मतामुळे लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून मी काही गोष्टी वस्तुस्थिती म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला.

कारण एक डॉकटर म्हणून व्यसनाधीन झालेल्या माणसाला व्यसनमुक्ती केंद्र हा त्यातल्या त्यात सर्वोत्कृष्ट उपाय आहे असे माझे मत आहे

आता त्याला तुम्ही अंधश्रद्धाच ठरवून मोडीत काढायला निघालाय यास्तव त्याचा प्रतिवाद करणे आवश्यक आहे.

आपल्याला हत्ती संपूर्ण समजला असेल हे गृहीत धरून मी माझे तेवढे विधान मागे घेतो.

तसा मला अजूनही हत्ती पूर्ण समजलेला नाही त्यामुळे मी सुद्धा बऱ्याच गोष्टीत अनभिज्ञ आहे हे मी मान्य करतो

बाकी व्यसनातून बाहेर पडताना होणार शारीरिक आणि मानसिक त्रास यावर उपचार करणे याचा सामान्य डॉक्टर/ रुग्णालये याना अनुभव नसतो.

त्यामुळे व्यसन थांबवताना होणार त्रास कमी करण्यासाठी अशी प्रशिक्षित कर्मचारी असणारी केंद्रे आवश्यक आहेत असे माझे मत आहे.

एकनाथ जाधव's picture

1 Nov 2023 - 5:25 pm | एकनाथ जाधव

तुशार नातु म्हनुन एक आहेत न्त्यानी हा बोग लिहील आहे

https://bevdyachidiary.blogspot.com/2013/05/blog-post.html

चौथा कोनाडा's picture

2 Nov 2023 - 9:17 am | चौथा कोनाडा

पण अडगळ वाटू लागलेल्या आई-बापाप्रमाणे कुटुंबातल्या व्यसनी व्यक्तीला ठेवण्याची जागा

टर्मी भाऊ, हे अडगळ वैग म्हणणं अ ति वाटते. आधी कुटूंबिय, मित्र मंडळी त्यांच्या कुवती प्रमाणे अनेक प्रयत्न करतात. कुटंबातला विशेषतः तरूण, अगदी व्यसनी झाला तरी कुटूंबियाच्या दृष्टीने अ‍ॅसेट असतो. ते हरले की मगच त्यांची पाठवणी केन्द्रात करतात असे पाह्ण्यात येते !

" हे अडगळ वैग म्हणणं अ ति वाटते. "
अरे देवा! ते वाक्य इतके 'क्रिप्टीक' झाले आहे कि काय 😀
मला वाटतं माझ्या त्या मूळ वाक्याची फोड करून त्यातले दोन मुद्दे आणि त्या मुद्द्यांतून काय अर्थ निघणे अभिप्रेत आहे ते स्पष्ट करणे योग्य ठरेल!

"व्यसनमुक्ती केंद्र वगैरे आधुनिक अंधश्रद्धांवर ज्यांना विश्वास ठेवायचा आहे त्यांना ठेऊद्या बापडे, पण अडगळ वाटू लागलेल्या आई-बापाप्रमाणे कुटुंबातल्या व्यसनी व्यक्तीला ठेवण्याची जागा ह्याशिवाय अशा व्यसनमुक्ती केंद्राची अजून काही वेगळी ओळख नाही असे माझे स्पष्ट वैयक्तिक मत."

फोड / उकल:

  • व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलेली व्यसनाधीन व्यक्ती व्यसनमुक्त होऊन परतते हि अंधश्रद्धा आहे, ज्यांना त्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायचा आहे त्यांनी ठेवावा माझा त्यावर विश्वास नाही!
  • अडगळ वाटू लागलेल्या आई-बापांना ठेवण्याची जागा = वृद्धाश्रम. आणि सांभाळणे अशक्य झालेल्या कुटुंबातल्या/समाजातल्या व्यसनाधीन व्यक्तीला ठेवण्याची जागा = व्यसनमुक्ती केंद्र, अशी ती तुलना आहे.

व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलेली व्यसनाधीन व्यक्ती व्यसनमुक्त होऊन परतते असे कोणाला वाटत असेल तर ती अंधश्रद्धा आहे, कारण व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडायचे कि नाही हे सर्वस्वी रुग्णाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते, त्या व्यक्तीला तिथे पाठवणाऱ्या कुटुंबियांच्या, सल्ला देणाऱ्या डॉक्टर-मानसोपचारतज्ज्ञांच्या, मित्रमंडळी किंवा अन्य कोणा हितचिंतकांच्या ईच्छा आणि भावनांना त्या प्रक्रियेत काही स्थान नसते. व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णामध्ये तशी इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न नक्कीच केले जातात पण बहुसंख्य रुग्णांच्या बाबतीत त्याचा परिणाम अल्पकाळासाठी टिकतो आणि बाहेर पडल्यावर काही दिवस, महिने लोटले कि पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती निर्माण झालेली दिसते. त्यामुळे तिथल्या उपचारांनी किंवा समुपदेशनामुळे व्यसनमुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अगदीच शून्यवत नसले तरी ते नगण्य असते.

आपण व्यसनाधीन झालोय ह्याची जाणीव होऊन त्यातून बाहेर पडण्याच्या ईच्छेने स्वतःहून व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होऊन यशस्वीरीत्या व्यसनमुक्त होणाऱ्या व्यक्ती अगदी विरळा. त्याउलट बळजबरीने (अक्षरशः केंद्राची चार माणसे येऊन रुग्णाला बळजबरीने गाडीत टाकून नेणे वगैरे) किंवा फसवून तिथे दाखल केले जाणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त असते. अशी बळजबरीने किंवा फसवून दाखल होणारी बहुतांश मंडळी असहकाराचे धोरण स्वीकारतात, अन्य रुग्णांशी आणि स्टाफशी क्षुल्लक कारणांवरून भांडणे, मारामाऱ्या करतात, बाहेर पडल्यावर ह्या बळजबरी, फसवणुकीसाठी घरच्यांना धडा शिकवणार, अद्दल घडवणार अशी जाहीर वाच्यता करतात. तर शासकीय सेवेत असलेल्या काही व्यसनाधीन लोकांची आणखीनच वेगळी तऱ्हा, त्यांना आपली नोकरी टिकवण्यासाठी नाईलाजाने म्हणा कि अनिच्छेने, पण तिथे दाखल होणे भाग असते, अशा लोकांना तिथल्या उपचारांत, समुपदेशनात आणि व्यसनमुक्त होण्यात काहीहि रस नसतो, केवळ विहित कालावधी पूर्ण करून व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतल्याचे प्रमाणपत्र मिळवणे एवढाच त्यांचा उद्देश असतो.

राहिला दुसरा मुद्दा...
वृद्धाश्रमांची गरज आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तर जसे 'हो' आहे तसेच व्यसनमुक्ती केंद्रांची गरज आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तरही 'हो' असेच आहे.
वृद्धाश्रमांत अनेक वृद्धांना अनिच्छेने राहावे लागत असले तरी तिथे स्वेच्छेने राहणारी मंडळीही आहेत. त्याच प्रमाणे ज्या व्यसनाधीन लोकांना सांभाळणे कुटुंबियांना अशक्यप्राय होऊन बसते त्यांना ठेवण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रे असणे जरुरी आहे. सुधारणेपलीकडे गेलेली अशी व्यसनाधीन लोकं व्यसनपूर्ती न झाल्यास त्यांच्या कुटुंबियांसाठीच नव्हे तर शेजाऱ्या-पाजाऱ्यांसाठीही प्रचंड त्रासदायक ठरतात.

कल्पना करा तुम्ही सकाळी कामावर जायला निघाला आहात, तळमजल्यावर कोणीतरी लिफ्टचा दरवाजा उघडा ठेवल्याने वैतागून तुम्ही पायऱ्या उतरून खाली आलात पण शेवटच्या पायरीवर तुमच्या बिल्डिंग मधली एक व्यसनाधीन व्यक्ती हातात सूरी घेऊन संपूर्ण नग्नावस्थेत जिना अडवून बसली आहे आणि "आज बिल्डिंगमधलया कोणीही कामावर जायचे नाही" असे तुम्हाला बजावते आहे, अशावेळी तुम्ही काय कराल?
किंवा,
पहाटे तुमच्या सोसायटीत येत असलेल्या दुधवाल्याचा तुमच्या इमारतीत राहणाऱ्या कोणा व्यसनाधीनाने जिन्यात गळा दाबून धरला आहे, श्वास कोंडल्याने त्या बिचाऱ्याच्या तोंडातून आवाजही बाहेर पडत नाहीये, केवळ त्या दुधवाल्याच्या नशिबाने कोणीतरी दोन जण जिना चढून येताना हा प्रकार बघून त्या व्यसनाधीन व्यक्तीच्या तावडीतून त्याची सुटका करतात, ह्या प्रसंगाने भयभीत झालेला दूधवाला तुमच्या बिल्डिंगमध्ये पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेऊन तुम्हाला दुसरा दूधवाला शोधा म्हणून सांगतो. अशी व्यक्ती जर तुमच्या इमारतीत राहात असेल तर तुम्हाला कितपत सुरक्षित वाटेल?

ह्या कल्पना नसून प्रत्यक्षात घडलेल्या घटना आहेत! बाकी घरात चोऱ्यामाऱ्या करणे, गावभर ज्यांच्याकडे उधार उसनवारी करून ठेवलेली असते ती लोकं वसुलीसाठी घरी येणे, घरच्यांना शिवीगाळ, मारहाण असल्या गोष्टींची यादी तर न संपणारी. त्यामुळे ह्या व्यक्तींच्या सुधारण्याची शक्यता शून्य असली तरी निदान त्यांचा सांभाळ करून त्यांच्या त्रासापासून घरच्यांना आणि इतरांना सुटका मिळवून देण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणून तरी व्यसनमुक्ती केंद्रे असणे अत्यावश्यक ठरते. तसेच व्यसनमुक्ती केंद्रात स्वेच्छेने जाऊन व्यसनमुक्त होणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी असले तरी त्यांच्यासाठीही हा पर्याय उपलब्ध असावा.

टिपः वर व्यक्त केलेली मते ही माझी 'वैयक्तिक मते' असुन ती सगळ्यांना पटलीच पाहिजेत असा माझा अजिबात दुराग्रह नाही 😀

अरे हो, ह्या उपप्रतिसादाच्या आधी ह्या धाग्यावर मी तिन उपप्रतिसाद दिले आहेत, पण मुळ धागाविषयावर प्रतिक्रीया द्यायची राहुनच गेली की...
असो, अरिंजय भाऊ, लेख आवडला 👍 'हेंडगूळ' हा शब्द मलाही पहिल्यांदाच समजला!

चौथा कोनाडा's picture

3 Nov 2023 - 6:10 pm | चौथा कोनाडा

@टर्मी दादा,
प्रतिसाद पटण्यासारखा आहे ! तुमच्या मताच्या उकली बद्दल धन्स !

व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलेली व्यसनाधीन व्यक्ती व्यसनमुक्त होऊन परतते असे कोणाला वाटत असेल तर ती अंधश्रद्धा आहे,

या बद्द्ल काही निरिक्षणे, विदा असतील तर त्याबद्द्ल उत्सुकता आहे. जरुर मांडावित !

यावरून मी मागे वाचलेले एक आत्मचरित्र आठवते. एका ब्रिगेडियर मुलगा डेहराडूनला होस्टेलला राहून शिकत असताना तिथल्या बाजूच्या गावातल्या अफूच्या गांजाच्या शेतीत चुकून पोहोचला. त्याने त्या अमंली पदार्थांचे सेवन केले आणि हळूहळू व्यसनाधीन झाला. त्याचे ब्रिगेडियर वडील विमनस्क झाले आणि त्याला दिल्लीच्या व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. तो मुलगा पूर्ण व्यसनमुक्त झाला आणि एक पुस्तक, स्वतःचे आत्मचरित्र लिहिले आणि त्यात व्यसनाधीनतेचा सगळा आलेख मांडला. तो संपूर्णपणे व्यसनमुक्त झाले याची खात्री झाली. पण जेव्हा दोन-तीन वर्षांनी तो दिल्लीतल्या अमली पदार्थ मिळण्याच्या अड्ड्याच्या उपनगरात गेला तेव्हा दुसऱ्या दिवशी तो मृतावथेत सापडला. आदल्या रात्री त्याने पुन्हा नशा केली होती असे आढळले. या आत्मचरित्राचे शेवटचे प्रकरण देखील त्याच्या ब्रिगेडियर वडिलांनीच लिहिलेली आहे ! बहुदा त्यांचं नाव मला आठवते त्यानुसार रॉबिन सिंग वगैरे असं काहीतरी असावं !

याच कारणासाठी व्यसनी माणसाला कुटुंब आप्तेष्ट आणि मित्रांची नितांत गरज पडते.

मी नौदलाच्या व्यसनमुक्ती केंद्रात काम करत असताना माझ्या माहितीतील एक लढाऊ वैमानिकाला फार कष्टाने व्यसनातून बाहेर काढून परत विमान उडवण्यासाठी सक्षम केले होते. पुढे चार वर्षांनी (मी एम डी करायला पुण्याला गेलो असताना) तो परत व्यसनाधीन झाल्याची बातमी आली. त्याच्या एक्झिक्युटिव्ह अधिकाऱ्याने तू नशेडी आहेस, तुझ्याच्याने काहीही होणार नाही असे अनुदार उद्गार काढल्यावर वैफल्यग्रस्त होऊन आणि चिडीने तो परत व्यसनाकडे वळला आणि शेवटी त्याला नौदलातून सक्तीने निवृत्त करावे लागले.

या वैमानिकाला भारत सरकारने ५ लाख पौंड ( त्यावेळेस ८० रुपये विनिमय दर होता) शुल्क भरून ब्रिटन मध्ये प्रशिक्षण दिलेले होते आणि तो QFI ( QUALIFIED FLIGHT INSTRUCTOR) होता. परंतु नशेच्या अवस्थेत त्याच्या हाती २०० कोटी रुपयाचे विमान देणे शक्य नसते.

माणसे १० -१२ वर्षांनी पण परत व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात. यामुळे त्याला सतत कुटुंब आप्तेष्ट आणि मित्रांच्या आधाराची गरज पडू शकते.

रंगीला रतन's picture

3 Nov 2023 - 8:38 pm | रंगीला रतन

घोडा बोलो या चतुर बोलो
कूच तो एक बोलो भैया :=))

अहिरावण's picture

1 Nov 2023 - 7:42 pm | अहिरावण

ऐकावे, वाचावे ते भयानकच !
https://maharashtratimes.com/india-news/mp-rehab-centre-operator-sodomis...

चौथा कोनाडा's picture

3 Nov 2023 - 9:40 am | चौथा कोनाडा

किती क्रुर ! पुर्ण बातमी सुद्धा वाचावीशी वाटली नाही !
अश्या नराधम व्यक्ति मानवजातीला काळीमा आहेत.

कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीच्या दारूच्या व्यसनाधीनतेमुळे अक्षरशः वाताहत झालेली घरचीच २ उदाहरणे डोळ्यांसमोर येतात.
त्यामुळे सरसकट विधान जसे धाडसी होईल तसेच अशा व्यक्तीला घरात ठेवून घेणे त्रासदायक वाटणे हे सुद्धा सहज शक्य आहे.

दुर्दैवानं या दोन्ही उदाहरणांतील व्यक्तींना स्वतःलाच सुधरायची इच्छा नव्हती. त्यामुळे व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींच्या अनुभवाबद्दल मी काही बोलणे अयोग्य.

हेंडगूळ हा शब्द मात्र पहिल्यांदा वाचनात आलाय.

अवांतरः डॉक्टर साहेबांचा प्रतिसाद वाचून बंदिनी चित्रपटातील "अब के बरस भेजो भैया को बाबुल.." या गाण्याची आठवण झाली.

व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडायचे कि नाही हे सर्वस्वी रुग्णाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते,

रोचक वाक्य.
व्यसनाचा विळखा हा एक आजारच असतो. हे म्हणजे एखाद्या अलझायमर्सच्या रुग्णाला "तुझं ह्या रोगातून बरं होणं हे केवळ तुझ्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे" असं
सांगण्यासारखं आहे. पण चालूद्या... मी पॉपकॉर्नचा पुडा घेऊन केव्हाचा बसलोय....

टर्मीनेटर's picture

3 Nov 2023 - 9:15 am | टर्मीनेटर

व्यसनाचा विळखा हा एक आजारच असतो. "हे म्हणजे एखाद्या अलझायमर्सच्या रुग्णाला "तुझं ह्या रोगातून बरं होणं हे केवळ तुझ्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे" असं सांगण्यासारखं आहे.

धन्यवाद!

धन्यवाद एवढ्यासाठी कि मतभेद दर्शविताना नकळतपणे का होईना पण मुख्यत्वे वाढत्या वयोमानामुळे आणि जनुकीय, पर्यावरणीय घटकांमुळे उद्भवणाऱ्या 'अलझायमर्स' सारख्या (रुग्णाने स्वतःहून ओढवून न घेतलेल्या मेंदूशी निगडित आजाराची) आणि "आ बैल मुझे मार" म्हणतात त्याप्रमाणे एखाद्याने 'व्यसनाचा विळखा' नामक स्वतःहून ओढवून घेतलेल्या आजाराची (वरील माझ्या 'वैयक्तिक मताला' पूरक ठरेल अशी) तुलना करून रोचकता आणखीन वाढवलीत 😀

'अलझायमर्स' ह्या आजारावर आजही रामबाण इलाज उपलब्ध नाहीये (अगदि इस्त्रायलमध्ये सुद्धा 😂), जे काही औषधोपचार केले जातात त्याने आजाराची लक्षणे तात्पुरती कमी होण्यास मदत होते, तीच गत 'व्यसनाचा विळखा' नामक आजाराची, त्यावरही कुठला रामबाण इलाज उपलब्ध नाहीये. व्यसनमुक्ती केंद्रातले उपचार, समुपदेशन ह्यातून रुग्णाला व्यसनमुक्त होण्यासाठी सहाय्यक ठरतील असे प्रयत्न नक्कीच केले जातात आणि त्यांचा तात्पुरता परिणामही होतो, पण मुळात रुग्णाची व्यसनमुक्त होण्याची प्रबळ इच्छाशक्तीच नसेल तर ते परिणाम अल्पकाळासाठी टिकतात आणि बाहेर पडल्यावर काही दिवस, महिने लोटले कि पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती निर्माण झालेली दिसते हे वर आधीही लिहिलेले आहे.

असो, असे रोचक प्रतिसाद आणखीन येणार असतील तर मी पण आता डझनभर 'पॉपकॉर्न' ची पाकिटे मागवून ठेवतो आणि ते खात खात त्या प्रतिसादांचा वाचनानंद घेत बसतो... मज्जानी लाईफ 😀

पण मुळात रुग्णाची व्यसनमुक्त होण्याची प्रबळ इच्छाशक्तीच नसेल तर ते परिणाम अल्पकाळासाठी टिकतात आणि बाहेर पडल्यावर काही दिवस, महिने लोटले कि पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती निर्माण झालेली दिसते हे वर आधीही लिहिलेले आहे.

वा! वा! माझा मुद्दा तुमच्या थोडातरी ध्यानात येतो आहे हे बघून आणंद झाला.
अलझायमर्सशी मी मुद्दाम तुलना केली होती. असं बघा - रोगाची सुरूवात कुठल्या घटकाने झाली ते क्षणभर बाजुला ठेवा (जनुकीय, पर्यावरणीय, परिस्थितीजन्य इ.). आता, त्या रोगावर मात करणं हे केवळ आणि केवळ इच्छाशक्तिवर अवलंबून असतं असा तुम्ही जो दावा करता आहात तो वास्तवाकडे डोळेझाक करणारा तर आहेच पण अनिभिज्ञ वाचकांची दिशाभूल करणारा आहे.
आता आजाराची सुरुवात कशामुळे झाली असेल - दारू/अफू/सिगारेटच्या वाटेला कशाला गेला? असं विचारणं आणि मग त्या चूकीवर मात करायची म्हणजे, "रहा इच्छाशक्तिवर अवलंबून (आणि कडमडा तिकडे, आम्हाला त्रास देऊ नका)" - असा सूर असेल तर तो हास्यास्पद आहे, आणि एका प्रकारे हार मानणारा आहे (कुठल्याही दुर्रधर रोग बरा होणारच नसेल तर मग संशोधन करून उपाय का शोधा - असं काहीसं म्हणण्यासारखं)

असो. चश्मा उतरवा आणि वास्तवात या.

शुबेच्चा !!(हो हा शब्द आमच्यात असाच लिहितात)

सुबोध खरे's picture

3 Nov 2023 - 11:44 am | सुबोध खरे

बहुसंख्य रुग्ण जे स्वतःहून व्यसनमुक्ती केंद्रात येतात त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते.

परंतु अफू हेरॉईन सारख्या द्रव्यांवर त्यांचे शारीरिक आणि मानसिक अवलंबित्व इतके जास्त असते कि हि प्रबळ इच्छाशक्ती सुद्धा अपुरी पडते. त्यामुळे किती आंतरिक इच्छा असली तरी बहुसंख्य रुग्णांना व्यसनातून कायमचे बाहेर पडणे फार कठीण जाते

अशीच स्थिती बहुसंख्य अतिलठ्ठ माणसांची असते.

व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडायचे कि नाही हे सर्वस्वी रुग्णाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते, त्या व्यक्तीला तिथे पाठवणाऱ्या कुटुंबियांच्या, सल्ला देणाऱ्या डॉक्टर-मानसोपचारतज्ज्ञांच्या, मित्रमंडळी किंवा अन्य कोणा हितचिंतकांच्या ईच्छा आणि भावनांना त्या प्रक्रियेत काही स्थान नसते

एकंदर आपला मादक द्रव्यांचे व्यसन आणि व्यसनमुक्ती केंद्रे याबद्दल पूर्वग्रह दिसून येतो असे मला नम्रपणे सुचवावेसे वाटते.

माणूस रक्तदाब किंवा मधुमेह सारख्या आजारातून पूर्णपणे बरा होतो का? औषधे घेऊन माणूस आपले आयुष्य व्यवस्थित जगू शकतो तसेच मादक द्रव्यांबाबत असू शकते हि शक्यताच आपण गृहीत धरलेली नाही.

अतिलठ्ठपणामुळे मधुमेह बळावलेला माणूस आपण सहज पाहतो. त्याला एखाद्याने 'व्यसनाचा विळखा' नामक स्वतःहून ओढवून घेतलेल्या आजाराची सारखे स्वतःहून ओढवून घेतलेल्या आजारासारखे आपण वागवत नाही ना?

कित्येक माणसे व्यसनातून संपूर्ण मुक्त झाली नसली तरी आपले व्यसन नियंत्रणात ठेवून आपले रोजचे आयुष्य बऱ्यापैकी व्यवस्थित जगत असलेले मी प्रत्यक्ष पाहतो आहे. यात काही डॉक्टर सुद्धा आहेत. अशा व्यक्ती एखादि शल्यक्रिया झाल्यानंतर( द्रव्य न मिळाल्याने) विचित्र वागु लागल्यावर त्यांनि किंवा त्यांच्या नातेवाईकांनी ते अशा द्रव्यांचे सेवन करत होते हे कबूल करतात. बॉलिवूड मध्ये आणि राजकारणात अशा अनेक प्रथितयश व्यक्ती आहेत हे आपणास माहित नसावे.

अशा व्यक्तींना कुटुंबियांच्या, सल्ला देणाऱ्या डॉक्टर-मानसोपचारतज्ज्ञांच्या, मित्रमंडळी किंवा अन्य कोणा हितचिंतकांच्या साहाय्याची नितांत गरज असते हे आपण लक्षातच घेत नाही असे दिसते

आपल्याला हत्ती पूर्णपणे समजलेला आहे असा आपला दावा असल्यामुळे मी यापेक्षा अधिक काही सांगत नाही.

टर्मीनेटर's picture

3 Nov 2023 - 12:45 pm | टर्मीनेटर

मादक द्रव्यांचे व्यसन आणि व्यसनमुक्ती केंद्रे याबद्दलची माझी वैयक्तिक मते, अनुभव, पूर्वग्रह, बॉलिवूड मध्ये आणि राजकारणातल्या अशा अनेक प्रथितयश व्यक्ती बद्दल मला काय माहिती आहे कि नाही वगैरे जे काय असेल ते माझे मला लखलाभ, मी तुमच्यावरवर माझी वैयक्तिक मते लादत नाहिये आणि तुम्हालाच काय अन्य कोणला ती पटावित असा माझा आग्रहही नाहिये, त्यमुळे उगाच "अतिलठ्ठपणामुळे मधुमेह बळावलेला इतर जगासाठी निरुपद्रवी माणूस आणि समाजासाठी त्रासदायक ठरणारा उपद्रवी व्यसनाधीन माणुस" अशा काहिच्या काही तुलना आणि उदाहरणे न देता,

अजूनही हेच आपले वैयक्तिक मत असेल तर मी ते बदलण्यासाठी प्रयत्न करणारच नाही

ह्या दोन दिवसांपुर्वी तुम्हीच केलेल्या विधानावर/प्रतिज्ञेवर कायम रहात आवरा आता...

जाता जता: "हो...अजूनही तेच माझे वैयक्तिक मत आहे आणि कृपया आपण ते बदलण्यासाठी प्रयत्न करु नये अशी नम्र विनंती 🙏"

इत्यलम.

सुबोध खरे's picture

3 Nov 2023 - 1:44 pm | सुबोध खरे

हा प्रयत्न आपले मत बदलण्यासाठी नाहीच तर आपल्या वैयक्तिक अनुभवामुळे लोकांचा गैरसमज होऊ नये यासाठी

आणि

त्यामुळे एखादा वाचक आपल्या जवळच्या कुणाला व्यसनमुक्ती केंद्राच्या सेवेपासून वंचित ठेवू नये साठीच मी लिहिले

वामन देशमुख's picture

3 Nov 2023 - 4:17 pm | वामन देशमुख

हेंडगा, हेंडगूळ हे शब्दप्रयोग मराठवाड्यात मुक्तपणे वापरले जातात.

"या म्हैन्यात काय हेंडगा लागलाय तिच्या माईला नेऊन" म्हणजे "मागच्या महिन्याभरापासून मला सतत काहीतरी अडचणी येत आहेत".

चौथा कोनाडा's picture

3 Nov 2023 - 5:59 pm | चौथा कोनाडा

आमच्या जिल्ह्यात असाच एक शब्द नेहमी वापरला जातो - हांडगा
हांडगा म्हणजे षंढ, किंवा म्हणजे ज्याच्यात ( गांxडीxत) दम नाही असा..

रंगीला रतन's picture

3 Nov 2023 - 8:48 pm | रंगीला रतन

भारी शेट. मी लहानपणापासून असा अडकन्याचा खेळ बघितला पण त्याला हेंडगूळ बोलतात ते माहित नव्हते :=)

डॉ.प्रिया देशपांडे यांची नुकताच स्व.झालेल्या लोकप्रिय म्यथ्यू पेरी या अभिनेत्याचा व्यसनांशी लढा याबाबत पोस्ट वाचण्यासारखी आहे.व्यसनी माणसाची यातून बाहेर
पडण्यासाठीची इच्छाशक्तीही सबळ हवी.
https://www.facebook.com/100000620052065/posts/pfbid02h4oSzyaTvJM1Hdbpga...

अथांग आकाश's picture

3 Nov 2023 - 11:08 pm | अथांग आकाश

मस्त. व्यसनी माणसाची यातून बाहेर
पडण्यासाठीची इच्छाशक्तीही सबळ हवी.
खरे आहे.