मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हेंडगूळ

अरिंजय · · जनातलं, मनातलं
*हेंडगूळ* पावसाळ्यातली गोष्ट. गाडी मित्राकडे होती, ती आणायला पायीच चाललो होतो. उड्डाणपूलाच्या बाजूने सर्विस रोडवर पूर्ण चिखल झालेला. एकच माणूस जाईल, इतकीच पायवाट शिल्लक, बाकी सगळा चिखल. जवळपास अर्ध अंतर गेल्यावर एके ठिकाणी पाच सहा कुत्र्यांचा घोळका एका कुत्री साठी जोरजोरात भांडत होता. ते बघून पलीकडून येणारे दोघं तिघं आणि इकडून जाणारे आम्ही दोघं तिघं, जागेवर थांबलो. चुकून जरी भांडत आमच्या अंगावर आले, तरी आम्हाला पळायला जागासुद्धा शिल्लक नव्हती. मिनीटभराने ती कुत्री तिथून हलली आणि तिच्या मागे सगळा घोळका. मनातल्या मनात शिव्या घातल्या "भाद्रपदाला अजून दोन महिने अवकाश असताना मधेच काय?". सावधपणे पुढची चिखलाची पायवाट तुडवताना हा किस्सा आठवला. किस्सा आहे, मी मुक्तांगण मधे असतानाचा. वार्डमधे आमच्या सोबत एक काका होते, "जोशी काका". नावाप्रमाणेच त्यांचं व्यक्तिमत्त्व. मध्यम उंची, ५'४/५'५ वगैरे, गुटगुटीत देह, गुलाबी झाक असलेला गोरापान रंग आणि डोक्यावर फक्त कडेकडेने पांढऱ्याशुभ्र केसांच्या पुंजक्याची पट्टी, मधे तुळतुळीत गुलाबी गोरं टक्कल. बोलणं सुद्धा टिपिकल पुणेरी संथ टोनमधे. पण .... फार अतरंगी माणूस. कन्याकुमारी च्या विवेकानंद केंद्रामध्ये योगासने शिकवायचे. कोणास ठाऊक कसे, व्यसनात अडकले आणि मुक्तांगणला येऊन पोचले. तिथे आमची ओळख झाली. काकांचा माझ्यावर विशेष लोभ असण्याचं एक कारण होतं. मुक्तांगणमध्ये सगळे पेशंट एकाच वॉर्ड मधे रहायचे. प्रसिद्ध व्यसनमुक्ती केंद्र असल्यामुळे बरीच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पाहुणे मंडळी भेट द्यायला यायची. आणि अशी पाहुणे मंडळी आली की, आमचे वॉर्ड निरीक्षक "बंधू", नाव वेगळं होतं पण सगळे बंधूच म्हणायचे, पाहुण्यांना घेऊन वॉर्ड दाखवायला यायचे. आणि काही खास पेशंट लोकांची ओळख करून द्यायचे, त्यात आमच्या दोघांचा नंबर असायचा. नेहमीप्रमाणे पुस्तकी भाषेत माहिती देऊन झाली की बंधू सगळ्यांना बोलवायचे. "या, या सगळे जण या, पाहुण्यांची ओळख करून घेऊ". असं म्हणलं की सगळे एका जागी गोळा व्हायचे. पुढे काय होणार, सगळ्यांना पाठ असायचं. अशावेळी जोशी काका हटकून माझ्या बाजूला येऊन थांबायचे. पुणेरी संथ टोनमधे पुटपुटायचे, "झाऽली सुरूवात, ....... च्याऽयला. आऽता समोऽर बोऽलावून इज्जत काऽढणार, च्याऽयला". सगळे गोळा झाले की बंधू चालू व्हायचे "आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं करणारी लोकं येतात." मग माझ्या नावाचा पुकारा व्हायचा. मी पुढे जाऊन नमस्कार चमत्कार करून माझ्या व्यसनाची माहिती द्यायचो आणि परत आपल्या जागेवर. आणखी एक दोघं झाले की पुढचा विषय. "आमच्या कडे वेगवेगळ्या स्तरातील लोकं येतात" इती. बंधू. आणि काकांचं नाव घेतलं जायचं. "या, जोशीकाका या". लगेच काका त्यांचे गुलाबी ओठ, पार या कानापासून त्या कानापर्यंत पसरवून स्मित हास्य करायचे आणि माझ्या मागून जात जात कानात पुणेरी संथ टोनमधे पुटपुटायचे "आऽयची ** बंध्याच्या". असे हे काका एक दिवस, चहाच्या वेळी, खिडकीजवळ उभे राहून सावकाश चहा पित, गंभीरपणे बाहेर बघत उभे होते. मी ग्लासभरून गरमागरम चहा घेऊन वॉर्ड मधे शिरत होतो. मला दारात बघून काका पुणेरी संथ टोनमधे एकदम ओरडले,"अऽरे मानस ... मानस, इऽकडे येऽ इकडे ये इकडे ये." मी चहा सांभाळत घाईघाईने काकांजवळ पोहोचलो. त्यांनी त्यांचा गोरापान गुटगुटीत हात बाहेर काढून बोटाने इशारा केला आणि पुणेरी संथ टोनमधे म्हणाले,"तेऽ बऽघ, हेंऽडगुळ लागलंय." बाहेर गवतावर एक कुत्रा आणि एक कुत्री जगप्रसिद्ध रोमँटिक पोज मधे धापा टाकत उभे होते. मी जागेवर फुटायच्या बेतात होतो. उभ्या उभ्या चहा सांभाळत खदाखदा हसायला सुरुवात केली. काका पण सावकाश हसत पुणेरी संथ टोनमधे म्हणाले,"ह्या ह्या ह्या ...... बऽघून घे. याऽ जेऽलमधे हेऽच बऽघायला मिळणार ..... ह्या ह्या ह्या." माझा खदखदाट बघून आणखी तीन चार जण गोळा झाले. काका त्यांना पण दाखवत पुणेरी संथ टोनमधे म्हणाले "बऽघून घ्याऽ रेऽ, इथे हेऽच बघायला मिळणार."

वाचन 10793 प्रतिक्रिया 0