अमेरिका 12 - भय इथले संपत नाही

निमी's picture
निमी in जनातलं, मनातलं
14 Sep 2023 - 3:33 pm

इथल्या वास्तव्यात 'प्लीज, इफ यू डोन्ट माईंड..कॅन आय आस्क यु ए क्वेश्चन?' अशी प्रांजळ आवाजात विनंती करून काही जणांना/जणींना मी काही प्रश्न विचारले. माझा हेतू हा होता की, मानसतज्ञ म्हणून काम करताना अन्य देशांत आणि प्रामुख्याने भारतात वयाची 18 ते 21 वर्षे घालवलेली मुलं/मुली इथे येतात. त्यांना किती आणि कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं? भारतात असणाऱ्या पालकांचा रोल काय असावा..काय नसावा? त्यांच्याकडे पाहणाऱ्या शालेय मित्र-मैत्रिणींपासून, नातेवाईकांचा दृष्टिकोन बदलतो का? हा बदल त्यांना कसा सलतो? इ..इ..

'आहे मनोहर तरी.. गमते मला उदास!' असे वाटते तेव्हा नेमकं काय करता? कोण सर्वात जवळचे वाटतात? काय काय करता येतं? काही जणांशी बोलल्यावर एक नक्की जाणवलं की, इथे आलेलं प्रत्येक मूल सुरुवातीच्या काळात कशाना कशाशी तरी झुंजल आहे. इथंवर पोचण्यासाठी आणि आता पोचल्यावरही त्यांच्या जीवाला सातत्याने कुठल्या ना कुठल्या तरी स्पर्धेला तोंड द्यावच लागतंय्.

भारतात स्थित असणाऱ्या पालकांना वाटत असतं...नव्या जागेचं..जगाचं त्याने वर्णन सांगाव.. मी कसा मजेत आहे हे 'ऑल इज वेल' स्टाईलने बोलावं. आपल्या भारतातल्या पदार्थांना - आयत्या रुचकर जेवणाला 'मिस्' करतोय म्हणावं... पण मूल तिथं तेव्हा गारव्याशी झुंजत असतं.. पोटात ढकलायला भुकेच्या वेळी काहीतरी पोटभर मिळालं म्हणून खुश असतं..आणि 'ऑल इज वेल' नसतानाही 'काळजी करू नका.. मी छान आहे !' असं सांगून आई-बाबांचा घोर कमी करण्याचा प्रयत्न करत असतं. उत्तर सांगता येणार नाही आणि उत्तर दिलंच तर रक्तबीजाप्रमाणे एका उत्तरातून अजून दहा प्रश्न जन्म घेणार याची कल्पना आल्यानं फोन आवरता घेतला जातो. काळ-काम-वेगाची गणित सोडवणार मूल इथे राहून, तिथली कोडी ऐकायला, सोडवायला नाखूश असतं..दर शनिवारी रविवारी कॉलेजला - कामाला सुट्टी असताना साध्यात साधं काम महिनाभर का होत नाही हे पालकांना समजत नाही. क्वचित जर समजणारे पालक असतील तर हा समजूतदारपणा आजी-आजोबांच्या पिढीला रुचत नाही. कात्रीतले पालक मुलाला पकडायला पाहतात... मुल मात्र त्या कामाने..रोज नव्याने समोर येणारे प्रश्न सोडवत...स्वतःची सुटका करून घेत.. आई-वडिलांना, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला व्हाॅट्सअप वर उत्तरं अपेक्षित असतात...कॉलला प्रतिसाद हवा असतो...तिथली वर्णन सांगणारे फोन हवे असतात..तर मुल इथे कॉलेजच्या किंवा कामाच्या मेलना - कॉलना उत्तरं देऊन आणि रोज नव्याने येणाऱ्या असाइनमेंट - परीक्षा - अर्ज - सबमिशन या सगळ्या गोष्टींशी अभिमन्यूप्रमाणे एकाकी असूनही निष्ठेने - प्रामाणिकपणे लढत असतं ! बरं इथे शत्रू कुणीच नसतो - विजय कुणावरच मिळवायचा नसतो, पण लढण्याशिवाय गत्यंतरच नसते. हे सगळं स्वतःसाठी, उज्वल भविष्यासाठी असतेच पण त्यासोबत तोंड द्यावं लागत असतं ते अनेक धक्क्यांना !

भाषिक - संस्कृतीक - वैचारिक - आर्थिक - वांशिक आणि देशीक तफावत असणारे मित्र-मैत्रिणी ! सगळेच चाचपडत असतात - धडपडत - चिडत असतात. शिक्षण पूर्ण होईपर्यंत काही वर्ष जे शिकलो ते कसं जुनं, आता निरुपयोगी आणि टुकार होतं हे समजतं. इथले विषय - शिकण्याची - शिकवण्याची पद्धत वेगळी असल्याने अनेक हुशार विद्यार्थी सुरुवातीला 'फेल' होतात किंवा हलक्या ग्रेड मिळवतात. घरी हा रिझल्ट सांगू शकत नाहीत आणि उत्तम ग्रेडशिवाय पुढील कोर्सला चांगले विषय मिळवता येणार नसल्याने 24 तासांपैकी जेमतेम काही तास झोप मिळते.

चांगलं कॉलेज - चांगल्या ग्रेड - चांगले विषय - चांगले प्रोफेसर - चांगलं काम अशा चक्रातून पदवी घेऊन बाहेर पडण्याच ठरवावं तर पुढील दोन वर्षात सुयोग्य जॉब मिळणे - आवडणे - टिकवणे आणि त्यासाठीच्या आवश्यक सर्व व्हिसा प्रक्रिया, त्यातील अर्ज, 50-60 पानांची माहिती भरून देणे हे चक्र असतं. जगणं थोडं सुकर होण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, घर पाहणी, सामानाची जुळवणी आणि नव्या ठिकाणी मांडणी ही भूतं छळतच असतात. इथे सगळेजण एकमेकांच्या मदतीला जातात पण त्यासाठी तुमचे स्वतःचे हक्काचे मैत्र जुळवून ठेवावे लागते. मदत करावी लागते तर मदत मिळतेही.

इथल्या कामासाठी वेगळा व्हिसा - लॉटरी पद्धतीने मिळणारा H1B व्हिसा, तो मिळाल्यावरची वेगळी प्रक्रिया, नाकारला गेला तर पुन्हा फॉर्म भरणे आणि असे दोन वेळा झाले की तिसऱ्या वर्षी व्हिसा नाकारला गेला तर काय याची टांगती तलवार डोक्यावर असते. तिसऱ्या प्रयत्नातही लॉटरी लागली नाही तर चांगली कंपनी अशा कर्मचाऱ्यांना कॅनडाला पाठवते. त्यामुळे इथल्या सगळ्या सामानासह प्रियजनांची गट्टी सोडावी लागते. पहिली कार ते पहिली प्रेयसी-प्रियकर सगळं सोडावं लागतं. व्हिसा मिळाला असला आणि कंपनीने कामावरूनच कमी केलं तर पुढील केवळ 60 दिवसात दुसरं काम मिळवावे लागते.. नाहीतर सर्व चंबुगबाळे आवरून मायदेशी परतावे लागते. या सर्वच बाबतीत काही ठोस माहिती नसल्याने, भविष्यातील अनिश्चितीमुळे प्रेम - लग्न - संसार - मुलंबाळ या सगळ्यांना दुय्यम स्थानावर ढकलले जाते. दुरून डोंगर साजरेप्रमाणे इथला संघर्ष अडचणी, त्रास आणि अनिश्चिततेच्या असंख्य अदृश्य तलवारी लांब राहणाऱ्या प्रियजनांना - परिजनांना समजतच नाहीत. सहन होत नाही, सांगता येत नाही याप्रमाणेच 'भय इथले संपत नाही....'

मांडणीविचार

प्रतिक्रिया

बऱ्याचदा 'तिकडे' काय आहे, हे 'इकडून' दिसत नाही.
पालक भारतात आणि मुले युरोप अमेरिकेत किंवा पालक मराठवाडा-विदर्भातील गावात आणि मुले पुणे किंवा बंगळूरात एखाद्या काचेच्या इमारतीत. दोन्ही परिस्थिती सारख्याच.
भय दोन्हीकडे तेच. पालकांच्या अपेक्षा आणि अपेक्षाभंग तेच.

बऱ्याचदा 'तिकडे' काय आहे, हे 'इकडून' दिसत नाही.
पालक भारतात आणि मुले युरोप अमेरिकेत किंवा पालक मराठवाडा-विदर्भातील गावात आणि मुले पुणे किंवा बंगळूरात एखाद्या काचेच्या इमारतीत. दोन्ही परिस्थिती सारख्याच.
भय दोन्हीकडे तेच. पालकांच्या अपेक्षा आणि अपेक्षाभंग तेच.

हो..अगदी बरोबर! म्हणूनच 'जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे' असे दोन्हीकडे होते. मुलं आणि आई-वडील दोघेही आपल्या जागेवरून दुसऱ्या जागेकडे बघत असतात.

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Sep 2023 - 12:06 pm | राजेंद्र मेहेंदळे

एखाद दोन महीने नोकरी नाही म्हणुन कोणी तुम्हाला हाकलुन तरी देणार नाही.

पण परदेशात तुमचे नशीब तुमच्या व्हिसाशी बांधलेले असते. तुम्ही स्टुडंट व्हिसा वर आहात का वर्क व्हिसावर का ग्रीन कार्ड अशा इमिग्रेशनच्या बर्‍याच भानगडी असतात. कधी कधी काही कंपन्या तुमचा व्हिसा स्पॉन्सर करायला तयार असतात, पण ईतरवेळी ह्या भानगडीत त्याना पडायचे नसते, त्यामुळे व्हॅलिड व्हिसा नसलेले किवा संपत आलेले उमेदवार आधीच वगळले जातात. मग देश सोडण्या शिवाय पर्याय नसतो. अशा वेळी पाण्यातुन बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे तडफड होते.

दुसरी तर्‍हा म्हणजे कुठेही राहायचे तरी पोटापाण्याचे प्रश्न सोडवावेच लागतात. किती दिवस पदरचे पैसे खर्च करुन परदेशात राहणार? त्यामुळे दुसर्‍या प्रकारची मंडळी, (व्हिसा आहे पण नोकरी नाही) मिळेल ते काम करुन तिथे राहायची धडपड करतात. मग ऑफिस असिस्टंट, टॅक्सी चालवणे,सुपरस्टोर मधे काम करणे(काउंटर जॉब किवा हमाली सुद्धा) असे काहीही करावे लागते. ईथल्या सारखे आले मनात म्हणुन केले पाळणाघर सुरु, किवा घेतली स्वयंपाकाची कामे, लागले केस कापायला किवा ईलेक्ट्रिशियन/प्लंबरचे काम करायला असे चालत नाही. त्याची वेगवेगळी लायसन्स घ्यावी लागतात.

एक मात्र चांगले आहे, टॅक्सी ड्रायव्हर आणि आय टी ईंजिनीयर च्या कमाईत खूप जास्त फरक नसतो, आणि श्रमाला किंमत दिली जाते. त्यामुळे कुठलेही काम हलके समजले जात नाही.

श्रम प्रतिष्ठा खूप चांगली आहे..धन्यवाद प्रतिसादाकरता.