बुद्धी (उद्धव मात्रावृत्त प्रयत्न)

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
15 Dec 2008 - 8:36 pm

मी गोंधळलेलो असता
ती ठाम राहिली होती
मी दिशाहीन असताना
ती नाव वल्हवत होती

ती लक्ष अंधार-किरणे
अंगावर आदळत होती
अंधार अभेद्यच असता
ती मिणमिणतच हो होती

जाणीवा मजला नसता
भोवती तर्कदुष्ट ते फार
ती तर्कशुद्ध नसती तर
जीवास कायमचा घोर

ती दुसरी नसोन कोणी
जी असता असते शुद्धी
प्रेयसी अन ही सखी हो
माझीच शाबुत "बुद्धी"

--ऋषिकेश
टीपः
१. माझ्या बालबुद्धीप्रमाणे मी मात्रा नीट मोजल्या आहेत. जिथे जिथे चुकले आहे ते नक्की दाखवून द्या!
२. मला व्रुत्त म्हणावे तितके कळले नाहि तरी जे काहि कळते त्यानुसार प्रयत्न. जास्तीत जास्त चुका कोणीतरी दाखवून द्याव्यात हा उद्देश!

कविताप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

घाटावरचे भट's picture

15 Dec 2008 - 9:00 pm | घाटावरचे भट

मलाही मात्रा कशा मोजायच्या ते नीटसं समजलेलं नाही. पण खाली दिलेल्या ओळींत वृत्त सुटल्यासारखे वाटले. बरोबर ओळींना *.

*
*
*
ती नाव वल्हवत होती

ती लक्ष अंधार-किरणे
अंगावर आदळत होती
*
ती मिणमिणतच हो होती

जाणीवा मजला नसता
भोवती तर्कदुष्ट ते फार
*
जीवास कायमचा घोर

ती दुसरी नसोन कोणी
जी असता असते शुद्धी
*
*

या ओळी वर लिहिताना मी फक्त ठेक्याचा विचार केला. आणि पंतांनी दिलेल्या कवितेचा ठेका आणि तुमच्या कवितेचा ठेका जुळवून पाहिला. त्यात ह्या ओळी विसंगत वाटल्या. ज्या ओळी बरोबर आहेत असं मला वाटलं त्या कदाचित मात्रांच्या हिशोबात चुकीच्याही असू शकतील. ठेक्याचा विचार करताना अजून एक मजा सापडली. संदीप खरेंचं 'मी मोर्चा नेला नाही' हे गाणं बहुतेक उद्धव मात्रावृत्तात आहे. पंत अधिक खुलासा करतीलच.

--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.

लिखाळ's picture

15 Dec 2008 - 9:06 pm | लिखाळ

> पंत अधिक खुलासा करतीलच. <
मी सुद्धा उत्सुक आहे.
ठेक्यात म्हणताना फार, जोर या शब्दांतील शेवटच्या र वर जोर येतो. अश्या वेळी तो र दोन मात्रांचा धरायचा का? असा प्रश्न पडला आहे.

कविता छान आहे.
-- लिखाळ.

सुनील's picture

15 Dec 2008 - 9:11 pm | सुनील

मात्रा वगैरे प्रकरण मलाही फारसे कळत नाही. वर "मट्ठांनी" म्हटल्याप्रमाणे मीही कविता "गाऊन" बघतो (मनातल्यामनात!) आणि खटकलेल्या ओळी शोधतो.

तुमची कविता मी माझ्या मगदूराप्रमाणे "दुरुस्त" केली आहे. ती ठीक आहे की नाही तो धोंडोपंत सांगू शकतील.

मी गोंधळलेलो असता
ती ठाम राहिली होती
मी दिशाहीन असताना
ती होडी वल्हवीत होती

ती लक्ष तमो-किरणें ही
अंगावर अदळत होती
अंधार अभेद्यच असता
ती अखंड तेवत होती

जाणीवा मला नसताना
घेरीतां तर्कदुष्टांनी
ती तर्कशुद्ध नसती तर
जीवास कायम हानी

ती दुसरी नसोन कोणी
जी असता असते शुद्धी
तिज म्हणा सखी, प्रेयसि वा
ती माझी शाबुत "बुद्धी"

(यमक्या) सुनील

टीप - जीवास कायम हानी ही ओळ माही मलाच फारशी रुचलेली नाही पण सध्या दुसरी ओळ सुच त नाही.

स्वगत - च्यायला कवितापण पाडायला लागला की हा, काही खरं नाही बॉ!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

घाटावरचे भट's picture

15 Dec 2008 - 9:16 pm | घाटावरचे भट

ती दुसरी नसोन कोणी
जी असता असते शुद्धी
प्रेयसी म्हणा वा मैत्रीण
ती माझी शाबुत "बुद्धी"

--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.

सुनील's picture

15 Dec 2008 - 9:19 pm | सुनील

छान. फक्त मैत्रीण ऐवजी मैत्रिण करायला लागेलसे वाटते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चतुरंग's picture

15 Dec 2008 - 9:23 pm | चतुरंग

मात्रा चुकलेल्या ओळी अशा आहेत

ती लक्ष अंधार-किरणे
२ १ १ २ २ १ १ १ २ = १३
अंगावर आदळत होती
२ २ १ १ २ १ १ १ २ २ = १५
अंधार अभेद्यच असता
२ २ १ १ २ २ १ १ १ २ = १५
भोवती तर्कदुष्ट ते फार
२ १ २ २ १ २ १ २ २ १ = १६
माझीच शाबुत "बुद्धी"
२ २ १ २ १ १ २ २ = १३

चतुरंग

ऋषिकेश's picture

16 Dec 2008 - 11:20 am | ऋषिकेश

अरे वा!
भटोबा, सुनीलराव, लिखाळ आणि रंगराव अनेक आभार.. बरीच मदत झाली

सुनीलराव, कवितेला नेटके केल्याबद्दल आभार! :)

भटोबा, मला देखील "मी मोर्चा नेला नाहि" हे उद्धव मात्रावृत्तात आहे असे लिहिताना जाणवले होते :) असो इतक्या "*" बघुन आश्चर्ययुक्त आनंद झाला :)

रंगराव, अभेद्यच मधील द्य = २ कसे?

बाकी , चुकणार ही खात्री होतीच आणि मिपाकर ती दुरुस्त करतील याचीही. सगळ्यांचे आभार!

-(गोंधळलेला) ऋषिकेश

विसोबा खेचर's picture

17 Dec 2008 - 1:04 am | विसोबा खेचर

वा! सुंदर काव्य..

तात्या.

सहज's picture

17 Dec 2008 - 8:11 am | सहज

सुंदर काव्य.

आवडले.

मनीषा's picture

18 Dec 2008 - 6:56 am | मनीषा

मी दिशाहीन असताना
ती नाव वल्हवत होती ...खूपच छान!

कविता सुंदर आहे ... आवडली