मिपा संपादकीय - अदृश्य आशीर्वाद

संपादक's picture
संपादक in विशेष
15 Dec 2008 - 1:10 am
संपादकीय

मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...

अदृश्य आशीर्वाद

व्यक्तीच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या जीवनात कधीकधी असा काळ येतो की जेंव्हा पुढचे काहीच दिसत नाही... अंधार्‍या बोगद्यातून जात असताना अंधारच दिसतो आणि कधी कधी समोर दिसणार उजेड हा त्या बोगद्याचा शेवट नसून समोरून येणार्‍या गाडीच्या दिव्याचा प्रकाश आहे असे लक्षात येऊन भ्रमनिरासाची देखील वेळ येते. साधे, आशेचे किरण पण दिसत नाहीत तर आशावादी कसे रहायचे हा प्रश्न भेडसावतो. अशा वेळेस बालकवींच्या खालील ओळींप्रमाणे अवस्था ही व्यक्ती, समाजमन आणि राष्ट्राला भेडसावू लागते.

रात्र संपली, दिवसही गेले, अंधपणा ये फिरूनी धरेला, खिन्न निराशा परी हृदयाला, या सोडीत नाही|
....
भोवर्‍यात जणू अडलो कोठे, स्वप्न भयंकर दिसते वाटे, जीवन केवळ करूणासंकुल नैराश्ये होई ||

हा लेख लिहीत असताना संपत आलेल्या वर्षाचा आढावा, हा माझ्या मातृभूमी आणि कर्मभूमीसाठी अर्थात भारतासाठी अथवा अमेरिकेसाठी घेण्याचा उद्देश नाही, पण या वर्षात ज्या दोनच पण खूप ठळक आणि एकदम महाप्रलय वाटावा अशा गोष्टी झाल्या त्यांच्या संदर्भात नक्कीच लिहीत आहे.

गेले काही वर्षे अमेरिकेची अर्थव्यवस्था एकदम जोरात आहे असे चित्र तयार झाले होते. पण गेले काही महीने जे प्रकर्षाने जाणवू लागले त्यावरून तरहे फोफसे बाळसे ठरावे अशी अवस्था झाली आहे. वास्तवीक आजही मुक्त अर्थव्यवस्थेचे जागतिक सक्रीय प्रवक्ते असलेल्या या देशाची अर्थव्यवस्था नसेल पण अर्थसंस्था आणि एकंदरीत निर्णयप्रक्रीया आणि धाडसीवृत्ती बघता हा वाईट काळ फार वेळ राहील असे वाटत नाही आणि तसा वाईट रहावा अशी इच्छाही नाही. तरी देखील आजच्या अर्थव्यवस्थेच्या अवस्थेने येथील पद्धतीतील भगदाडे जनसामान्यांच्या डोळ्यासमोर आणली. काहींना त्याचे भयानक वाटावे असे अनुभवांती दर्शनही झाले आहे. पण हे सर्व होण्याचे कारण काय आहे? तर मुक्तअर्थ व्यवस्थेचे समर्थन करत असताना आणि त्यासाठी नियंत्रणविरहीत अथवा कमीतकमी सरकारी नियंत्रण ठेवून खाजगी उद्योगांना अनियंत्रीत गुंतवणूक, कर्जवाटप तसेच सार्वजनीक अर्थव्यवस्थापनात स्थान दिले गेले. त्यातच भर म्हणून कर्जदर खूप कमी केले आणि कर्जे देणे हे याच अर्थउद्योगांनी अतिसुलभ केले अर्थात समोरच्याच्या ऐपतीकडे (विशेष करून परतफेडीच्या) कानाडोळा करत.

याचा मोठ्या स्तरावरील एक अतिरेक म्हणजे एकमेकांकडे कर्जे विकणे त्यातून नफा मिळवणे, दुसरीकडे स्थावर मालमत्ता अर्थात जमिनीचे दर सातत्याने वाढत रहाणे, दुसरी कडे चीन सारख्या देशात स्वतःचे उद्योग हे उत्पादनासाठी नेणे, त्यातून झालेला फायदा चीनकडून परत अमेरिकेत गुंतवणे आणि त्यातून परत कर्जवाटप करणे...अमेरिकन चलन आणि अर्थव्यवस्था या वरील विश्वासामुळे येथे परकीय गुंतवणूक अर्थातच जास्त आहे. परीणामी हे केवळ चीनच नाही तर इतर अनेक देशांच्या गुंतवणूकीसंदर्भात देखील लागू झाले. अर्थात मराठीत दोन वाक्प्रचार आहेत, "लक्ष्मी स्थिर रहात नाही" आणि "सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही". दुर्दैवाने तसेच झाले आणि बघता बघता हा जगातल्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थेचा डोलारा पत्त्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्याचे तरंग सर्व जगात उमटले. भारतातील अमेरिकन गुंतवणूक काही प्रमाणात कमी झाली आणि भारताच्या रुपयाचे मुल्यपण त्याबरोबर कमी झाले. स्थावर मालमत्तेला पण याचा, अमेरिकेइतका नाही पण पोटाला किमान चिमटा बसावा इतका त्रास होऊ लागला. भारतीय उद्योग आणि धोरणकर्ते हे थोडेफार जागे होऊ लागले. नुसते अमेरिकेकडेच डॉलरची म्हणजे "स्पेशल" बाजारपेठ म्हणून बघण्याऐवजी जगात इतरत्र पण गिर्‍हाइके शोधणे आणि मुख्य म्हणजे एक अब्जाच्या स्वतःच्याच देशात बाजारपेठ म्हणून बघणे याचा किमान विचार होऊ लागला आहे. थोडक्यात "अमेरिका एके अमेरिका" हा दृष्टीकोन बदलू लागला आहे. त्यातच ९१ सालची परदेशी गंगाजळीची चणचण आणि नंतरच्या काळातील हर्षद मेहता, केतन पारीख आदींची शेअर बाजाराला आणि पर्यायाने सामान्यांना वेठीस लावणार्‍या कारावायांमूळे आपण आधीच शिकलो होतो. एकंदरीत आपल्यावरील अमेरिकेचे वैचारीक प्रभुत्व थोडे कमी होऊन (चांगल्या अर्थी होऊ शकेल असे) स्वतंत्र आपण किमान विचार करू लागलो आहोत.

जे भारताचे तसेच अमेरिकेचे.... विजिगिषु वृत्तीबद्दल हेवा वाटावा असा अमेरिकन समाज आणि सरकार आहे असे येथील अनेक चढ-उतार पहाताना दिसत आले आहे. तरी देखील काही बाबतीत उपजतच माज आहे का काय असे त्यांच्या वर्तनावरून वाटते. मात्र १९३०च्या भयावह आर्थिकमंदीपेक्षा अजून तरी त्यामानाने कमी असलेल्या या मंदीवरून धडा शिकला जात आहे. १९३० साली सामान्यांचे पैसे खाजगी उद्योगात असण्याचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र आता ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बहुतांशी झाले आहे असे म्हणता येण्यासारखी अवस्था आहे. हे संकट जसे व्यक्तीगत आहे तसेच उद्योगांना उद्योग चालू ठेवण्यासंदर्भात आणि अमेरिकेला जागतिक स्थान टिकवण्यासाठी तयार झालेले आहे. त्यातून बाहेर पडताना मोठमोठे उद्योग जे एरवीच्या वेळेस भांडवलशाहीचे गोडवे गातात तेच सरकारकडे अब्जावधींची मदत मागून स्वतःला तगवू लागले आहेत. इतके की आता, " In the United States we capitalize profit and socialize losses" असे गंमतीत म्हणले जाउ लागले आहे, आपले कुठे चुकले आहे याचा विचार करताना काही धडे समाज आणि धोरणात्मक बदल म्हणून येत्या काही काळात सहज दिसणार आहेत. सरकार आणि सरकारात येत असलेला राजकीय वैचारीक बदल याला चालनाच देईल असे वाटते.

थोडक्यात आजच्या जागतीक अर्थिक मंदीच्या लाटेने भारतीय उद्योगांना आणि धोरणकर्त्यांना जागे करून स्वतंत्र होण्याचा तसेच पुढच्याच्या ठेचेने शहाणे होण्याचा संदेश दिला तर दुसरीकडे अमेरिकेस अंतर्मुख करून स्वातंत्र्याचा आणि एकाधिकारशाहीने जगात वागता येणार नाही असा संदेश दिला. यातून घेतलेला धडा जितका या दोन मोठ्या लोकशाही डोळसपणे आचरणात आणतिल तितके केवळ या देशांचे/देशवासीयांचेच नाहीतर जगाचे भले होयला मदत होऊ शकेल.

जसा अर्थव्यवस्था डबघाईस येण्याचा महाप्रलय या वर्षात दिसला तसाच दुसरा महाप्रलय दिसला तो २६ नोव्हेंबरच्या मुंबईतील दहशतवाद्यांच्या युद्धसदृश्य हल्ल्याने. वास्तवीक दोन्ही म्हणजे अर्थव्यवस्थेतील खळगे हे खळगे नसून खड्डे आहेत हे जसे गेले काही वर्षे दिसून सुद्धा डोळेझाक केली गेली होती, तशीच अवस्था या दहशतवादाबद्दल आहे. भारत झाला तसेच इतर अनेक लोकशाही देश झाले, अमेरिकेसकट, दहशतवाद हा एखाद्या जंगली जनावराप्रमाणे थैमान घालताना कुठेना कुठेतरी दिसतच राहीला आहे. भारतात तर जणू जनतेला या संदर्भात जणू काही बधिरताच आली होती. रामदेवरायापासून ते शिवाजीच्या तिनशे वर्षाच्या काळात जशी सुलतानी आक्रमणे ग्राह्य धरली गेली होती तशीच भारतीय जनतेने गेल्या ८-१० वर्षात ह्या दहशतवादी कारवाया ग्राह्य धरल्या होत्या आणि तशीच ग्राह्य धरली होती, ती राजकीय/सरकारी नाकर्ती वृत्ती आणि स्वतःची व्यक्तिगत तसेच सामाजीक असहाय्यता... दरवेळेस मुंबईत बाँबस्फोट होणार, आपण पाकीस्तानला नाव न घेता नावे ठेवणार, अमेरिकेकडे रदबदली करणार आणि नंतर "जन पळभर म्हणतील हाय हाय" हे किती बरोबर आहे ते सिद्ध करणार... हेच इतर दहशतवादी हल्ल्याचा बळी ठरलेल्या शहरांबद्दल. मुंबईसंदर्भात बोलण्याचे कारण इतकेच की "स्पिरीट ऑफ मुंबई" म्हणत मुंबईकरांचा फाजील अहंकार सुखावायचा आणि नंतर नाधड माध्यमे काम करणार आणि सरकार तर काय बोलायलाच नको!

पण या वेळेस एक वेगळी गोष्ट घडली ज्याने सगळे जग हादरले. दहशतवादी आले, त्यांनी नुसते बाँब उडवले नाहीत, (हा लेख लिहीतानाच्या माहीतीप्रमाणे) ओलीस धरून काही मागण्या केल्या नाहीत तर, वाट्टेल तसा गोळीबार केला, ओलीस धरलेल्यांना केवळ स्वतःची प्रसिद्धी आणि दहशतवादी कृत्यांचा वेळ वाढवायला मदत म्हणून उपयोग केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी जे ठिकाण शोधले ते होते श्रीमंतांचे, उद्योजकांचे, आणि जेथे उद्योग मिळवण्यासाठी परदेशी माणसांना "प्रेमाने" बोलवून आदरातिथ्य केले जाते असे होते. अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे टिआरपी साठी अथवा अजून काही का कारणे असूदेत पण माध्यमांनी (त्यात अमेरिकन आणि ब्रिटीश माध्यमेपण आली) सतत ती बातमी दाखवली. परीणामी जनसामान्यांच्या लक्षात आले की ज्याच्या हातात कायदा सुव्यवस्था देण्यात आली आहे त्या हातात तिच्या साठी लढायला काहीच दिलेले नाही! कधी नव्हे ते मुंबईकरांना अतित्वासाठी तर देशवासीयांना तसेच परदेशांना आपण सुपात असल्याची भावना झाली. उद्योजकांना समजले की आपण आपल्या धंद्याबरोबर तो जेथे करता येतो त्या स्थानाचा/देशाचापण विचार केला पाहीजे. नुसत्या वैयक्तिक स्वार्थाचा उपयोग नाही तर राष्ट्रीय स्वार्थपण महत्त्वाचा आहे कळू लागले. अगदी ज्या कारणाने टाटा उद्योग समुह स्वातंत्र्यपूर्वकाळात उभा राहीला आणि स्वातंत्र्योत्तर हळू हळू आचरणात आणण्याचे विसरून गेला त्या टाटा उद्योग समुहाला पण आता बदलत्या काळातील राष्ट्रीय स्वार्थ कळले असले तर आश्चर्य वाटायला नको!

अमेरिकेतील पोलीसांचे पण ही घटना सीएनएन वर सलग ३ दिवस पहाताना धाबे दणाणले! आपल्या भागात जर असे झाले तर काय होईल याची कल्पना त्यांना येऊ लागली. स्वतःचे नागरीक "अमेरिकन नागरीक" म्हणून जेंव्हा मारले गेले तेंव्हा हे युद्ध भारतापुरते मर्यादीत नव्हते हे अमेरिका आणि ब्रिटनला समजून चुकले आणि ऐतिहासीक पाठींबा म्हणावा इतके सहकार्य या दोन सत्तांकडून भारताला मिळू लागले. भारतात देखील एकीकडे जनतेने रस्त्यावर येऊन, विलासरावांना विधानसभेच्या सहाव्या मजल्यावरून रस्त्यावर आणले तर दुसरीकडे संसदेत, "नळाच्या पाण्यावरील भांडणे बरी" असे म्हणता येइल इतकी भांडणे करणारे एकमेकांचे विरोधक पक्ष, एकत्र येऊन बोलू लागले (अर्थातच त्यांना जनतेचे विराट दर्शन झाले असल्याने).

या युद्धस्वरूप घटनेला आता तीन आठवडे होतील. पण जनसामान्य शांत राहीला असला विसरत नाही आहे आणि हीच एक मोठी भारतासाठीची आशा आहे. ह्याच जनसामान्यांकडून आता नागरी कर्तव्ये - मतदान करण्याचे आणि नंतर निर्वाचित उमेदवाराला पाच वर्षे धारेवर धरून काम करून घेणे हे करावे लागणार आहे. पण त्याच बरोबर स्वतःची सामाजीक कर्तव्ये करण्याची जबाबदारीपण पेलावी लागणार आहे. कारण ती आज पर्यंत व्यक्तीगत स्वार्थाच्या नादात पेलली गेली नाही, मग जात मधे येते , शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष होते, कामगार नकोसे होतात वगैरे वगैरे...त्याचा फायदा राजकारणी आणि तोटा आपण घेत राहीलो.

थोडक्यात मुंबईवरील हल्ल्यात कदाचीत ९/११ नंतर प्रथमच प्रगत जग एकत्र आले. भारतासाठी तर प्रगत जग प्रथमच एकत्र आले आणि दहशतवाद हा एका राष्ट्रापुरता, भूभागापुरता मर्यादीत नसून सर्वत्र भेडसावणारा आहे हे कटू सत्य मान्य केले. तर दुसरीकडे भारतीय राजकीय नेतॄत्वाला तसेच जनतेला जाग आली असे किमान आत्तातरी म्हणता येण्यासारखी परीस्थिती आहे.

सुरवातीस म्हणल्याप्रमाणे, "व्यक्तीच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या जीवनात कधीकधी असा काळ येतो की जेंव्हा पुढचे काहीच दिसत नाही..." पण अशी अवस्था ही कुशल नेतृत्व आणि आत्मविश्वासी समाज हे "ब्लेसिंग इन डिसगाईज" अर्थात "अदृश्य आशीर्वादा" सारखी स्विकारतो आणि त्यातूनच पुढे जाणारा मार्ग शोधतो, नसला तर तयार करतो. या लेखात उल्लेखलेल्या दोन घटना आणि त्याची स्थानीक आणि आंतर्राष्ट्रीय पातळीवर ज्याप्रकारे दखल घेतली आहे, ते लक्षात घेतले तर येत्या नववर्षात नुसतेच मागील पानावरून पुढे न जाता , अनुभवातून शहाणे होऊन योग्य मार्गावर प्रवास करायला लागू अशी खात्री वाटू लागली आहे. म्हणुनच ह्या वर्षातील कडवट अनुभवा हे नजिकच्या आणि लांबच्या भविष्यासाठी "अदृश्य आशिर्वाद" ठरतील असे म्हणावेसे वाटते.

पाहुणा संपादक : विकास.

प्रतिक्रिया

अभिजीत's picture

15 Dec 2008 - 6:32 am | अभिजीत

अग्रलेखाच्या अपेक्षा पूर्ण करणारा लेख.

भारताबद्दल बोलायचं तर समाजाच्या सर्व थरांना हतबद्ध करणार्‍या घटना म्हणजे मंदी आणि दहशतवादी हल्ला. राजकीय आणि सामाजिक पातळीवर आपण किती निर्नायकी झालो आहोत याचा प्रत्यय आपण घेत आहोत.

यातुन योग्य तो बोध घेउन जर परिस्थिती बदलली आणि सुधारणा झाली तर या घटना "ब्लेसिंग इन डिसगाईज"ठरतील.

- अभिजीत

यशोधरा's picture

15 Dec 2008 - 7:43 am | यशोधरा

अग्रलेख अतिशय आवडला.
संपादकीयात व्यक्त केलेल्या मतांनुसार हे हल्ले म्हणजे "अदृश्य आशिर्वाद" ठरोत.

अनिल हटेला's picture

15 Dec 2008 - 7:46 am | अनिल हटेला

या वर्षातील दोन ठळक आणि एकदम महाप्रलय वाटाव्यात अशा घटनांची दखल अग्रलेख घेतो..
भारत आणी अमेरीकाच काय पण संपूर्ण जगाला जाग आल्याची जाणीव झालीये...
सहमत....

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विनायक पाचलग's picture

15 Dec 2008 - 11:39 am | विनायक पाचलग

सहमत
आपला,
(कधितरी विचार करणारा)को दा

सहज's picture

15 Dec 2008 - 9:13 am | सहज

मुंबईवरचा हल्ला, जागतीक आर्थीक संकट ह्या दोन घटना येणार्‍या काळात अर्थव्यवस्था तसेच सुरक्षाव्यवस्था या दोन्ही व्यवस्थेत काही आमुलाग्र बदल, जागतीक सामंजस्य घडवुन आणतील अशी अपेक्षा आहे.

अग्रलेख आवडला.

धोंडोपंत's picture

15 Dec 2008 - 9:14 am | धोंडोपंत

उत्तम. खूप आवडला.

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Dec 2008 - 9:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अग्रलेख आवडला ! सदानकदा सिस्टीमला जवाबदार धरतांना त्या सिस्टीमचे आपणही एक भाग आहोत म्हणजेच आपण आपली नागरी कर्तव्य पार पाडली तर सर्वांनाच सामान्य माणसांच्या भावनांची दखल घ्यावी लागते हा लेखातील संदेश भावला !!!

केवळ अप्रतिम अग्रलेख !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Dec 2008 - 12:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विकासराव, अग्रलेख आवडलाच.
या युद्धस्वरूप घटनेला आता तीन आठवडे होतील. पण जनसामान्य शांत राहीला असला विसरत नाही आहे आणि हीच एक मोठी भारतासाठीची आशा आहे.
हे वाक्य फारच आवडलं, खरंच आशादायी वाटलं.

थोडं वेगळं: अतिरेक्यांनी मुद्दामच ब्रिटीश, अमेरीकन आणि इस्रायली नागरिकांची, पर्यायाने त्या देशांची खोड काढली असेल तर त्यांनीही (बॉसेसनी) परिणामाचा विचार केला नसेल का? का त्यांना या देशांचीही भारताबरोबर खोड काढायची होती. (खोड काढणे हा खूपच कमी परिणामकारक शब्द आहे.)

सुनील's picture

15 Dec 2008 - 1:32 pm | सुनील

विकासरावांकडून अग्रलेखाच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करणारा अग्रलेख.

म्हणुनच ह्या वर्षातील कडवट अनुभवा हे नजिकच्या आणि लांबच्या भविष्यासाठी "अदृश्य आशिर्वाद" ठरतील असे म्हणावेसे वाटते.
सहमत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चेतन's picture

15 Dec 2008 - 1:53 pm | चेतन

अग्रलेख मस्त झालायं
दोन्ही घटनांचा आढावा चांगला घेतलाय.

मुंबईसंदर्भात बोलण्याचे कारण इतकेच की "स्पिरीट ऑफ मुंबई" म्हणत मुंबईकरांचा फाजील अहंकार सुखावायचा आणि नंतर नाधड माध्यमे काम करणार आणि सरकार तर काय बोलायलाच नको!
याच संदर्भात
म्हणुनच ह्या वर्षातील कडवट अनुभवा हे नजिकच्या आणि लांबच्या भविष्यासाठी "अदृश्य आशिर्वाद" ठरतील असे म्हणावेसे वाटते.

आशावाद चांगला आहे. पण येणारा काळच् ठरवेल की हे खरं होइल की पहिल्या वाक्याप्रम्नाणेच् येथेही घडेल.

असो

(आशावादी )चेतन

बैलोबा's picture

15 Dec 2008 - 2:21 pm | बैलोबा

उत्तम लेख.

चित्र खुप आशादाई दिसत आहे परंतू समाज सर्व काही लवकर विसरतो ह्याची अडचण आहे पण असे होऊ नये हीच इच्छा.
जे तेज समाजाने दाखवले आहे काही आठवड्यापासून तेच तेज जर नेहमी राहीले तर सरकार व पोलिस खाते ह्यांची डोकी ठीकाण्यावरच राहतील.

अरे वा, चक्क १४३९ शब्दांचे संपादकीय आहे! पण पुन्हा एकदा ब्लेसिंग इन डिसगाइजच का!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विसोबा खेचर's picture

15 Dec 2008 - 2:27 pm | विसोबा खेचर

अग्रलेख चांगलाच आहे, अदृष्य आशीर्वादाची संकल्पनाही आवडली, परंतु..

तर येत्या नववर्षात नुसतेच मागील पानावरून पुढे न जाता , अनुभवातून शहाणे होऊन योग्य मार्गावर प्रवास करायला लागू अशी खात्री वाटू लागली आहे.

हे विधान सरकारी पातळी संदर्भात केले असल्यास चांगलेच आहे परंतु बर्‍याचदा अनुभवातून शहाणपण न येता सगळे स्वप्नरंजनच ठरते.. काही कालावधी लोटल्यावर पुन्हा पुन्हा अतिरेकी हल्ले होतच आहेत, निरपराध माणसे मरतच आहेत. पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दडपण आणण्याचा एक फार्स केला जातो परंतु पाकिस्तान त्याला कधीच जुमानत नाही आणि भारतावर अतिरेकी हल्ले करणार्‍या संघटनांवर त्यांच्या देशात मदत/आश्रय सर्व काही दिले जाते आणि भारतावर अतिरेकी कारवाया सुरूच राहतात..

वरील विधान वियक्तिक पातळीवर घ्यायचे झाल्यास अनुभवातून मी कसा काय शहाणा होणार? मी फार फार तर बसमध्ये, लोकलमध्ये बसताना आसपास कुठली अनोळखी बॅग/पिशवी दिसत नाही ना, इतकेच पाहू शकतो. पण भर खचाखच गर्दीच्या वेळेस तेही अशक्य आहे. कारण संध्याकाळच्या वेळेस लोकलमध्ये धडपणे उभे रहायचेच वांधे असतात. शिवाय परवा व्हीटीला झाला तसा अंधाधुंद गोळीबार पुन्हा केव्हाही, कुठेही होऊ शकतो. अश्या परिस्थितीत मी अनुभवातून शहाणं व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं?

जागतिक मंदी हा त्या मानाने अधिक चिंतेचा विषय नाही. ती आज ना उद्या नक्की उठेल आणि परिस्थिती सुधारेल अशी आशा तरी करू शकतो, काटकसर वगैरेचा वापर करून, दोन टाईम फक्त डाळभातच खाऊन राहून किमान जिवंत तरी निश्चित राहू शकतो.

पण दहशतवादाचे काय? त्याकरता पाकिस्तानाशी युद्ध करून इस पार या उस पार असा सरळ फैसला करण्याचा आता हा हाय टाईम आला आहे. एवीतेवी आज प्रत्येक भारतीय नागरीक दहशतीच्या छायेखालीच जगतो आहे त्यापेक्षा पाकिस्तानशी युद्ध करून तो देश नेस्तनाबूत करणे हाच एकमेव उपाय आहे. अर्थात, त्यात भारताचेही काही प्रमाणात नुकसान होईल, मुंबई, दिल्ली इत्यादी प्रमूख शहरांवरही हमले होऊ शकतात! पण तसेही एवीतेवी बॉम्बस्फोटामुळे अन् अंधाधुंद गोळीबारामुळे नागरीक मरतच आहेत की! आज तरी ते सुरक्षित कुठायत?

असो,

तात्या.

ऋषिकेश's picture

15 Dec 2008 - 4:34 pm | ऋषिकेश

"अमेरिका एके अमेरिका" हा दृष्टीकोन बदलू लागला आहे. त्यातच ९१ सालची परदेशी गंगाजळीची चणचण आणि नंतरच्या काळातील हर्षद मेहता, केतन पारीख आदींची शेअर बाजाराला आणि पर्यायाने सामान्यांना वेठीस लावणार्‍या कारावायांमूळे आपण आधीच शिकलो होतो. एकंदरीत आपल्यावरील अमेरिकेचे वैचारीक प्रभुत्व थोडे कमी होऊन (चांगल्या अर्थी होऊ शकेल असे) स्वतंत्र आपण किमान विचार करू लागलो आहोत.

चोक्कस विकाससेठ! :)

अर्थातच त्यांना जनतेचे विराट दर्शन झाले असल्याने

हे वाक्य कंसात असले तरी फार आशादायक आणि महत्त्वाचे ठरावे. या दुर्दैवी घटनेनंतर भारतीय समाजाने ज्या प्रगल्भतेचे दर्शन घडवले आहे (नेत्यांचं सोडा हो तसंही प्रगल्भ वगैरे शब्द ते शाळेतच विसरले होते) व शांततामय आंदोलनांतून पोलिस यंत्रणांवर अतिरिक्त ताण न देता सरकारला ज्या ठामपणे मेसेज पोहोचवला आहे त्याला तोड नाहि. जनतेचा दबाब सरकारांनी बर्‍याच कालावधीनंतर अनुभवला असावा.
तीन आठवड्यानंतरही वृत्तपत्रांत हाव विषय ऐरणीवर आहे हा ही आशेचा किरण आहेच

आता-आतापर्यंत समाजातहि "मला काय त्याचे / मी तर सुरक्षित आहे ना .. झाले!" ही भावना होती त्यामुळे सहाजिकच सरकार त्याच भावनेच्या नेत्यांचे होते. मात्र या घटनेनंतर जास्तीत जास्त जनता मतदानाला बाहेर पडून त्यांचे प्रतिनिधी निवडून देतील, तितकी संसद प्रगल्भ होईल व न जाणो येणारे सरकार हे जनतेच्या विचार करण्याच्या पद्धतीत व सजकतेत झालेल्या बदलांचे प्रतीक असेल असे वाटते (आमेन! :) ) असं काहि झालं तर मात्र अदृश्य आशिर्वाद हे अग्रलेखाचे शीर्षक चपखल बसेल.

अग्रलेख आवडला हे वे सां न

-(गोंधळलेला) ऋषिकेश

कलंत्री's picture

15 Dec 2008 - 7:22 pm | कलंत्री

रोगाच्या परिणामावरच बरीच चर्चा झाली. रोगाचे मूळ कारण म्हणजे अमेरिका हेच आहे, जगात कोणताही देश नष्ट होऊ नये, कोणतीही व्यक्ति नष्ट होऊ नये असे मला वाटते परंतु नष्टच करावयाचे असल्यास अमेरिका हा देशच नष्ट करावयाला हवा.

व्हिएतनाम, इराण, अफगाणीस्थान, रशिया या देशांना नष्ट करणारा देश कोणता? या जगात शस्त्राच्या खरेदीसाठी लढाया लावणारा देश कोणता? जागतिक बॅकेंच्या नावाखाली अफ्रिका खंडाला देशोधडीला लावणारा देश कोणता? असे प्रश्न विचारले तर एकच उत्तर येईल ते म्हणजे अमेरिका.

स्वता:चेच स्वार्थ पाहणारा देश म्ह्णजे अमेरिका. याला योग्य उत्तर म्हणजे त्या देशाला वगळून अर्थव्यवस्था निर्माण केली गेली पाहिजे. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसण्याची सवय कोठेतरी ठेचली पाहिजे.

भारतातील अतिरेकी कारवाया या खरोखरच काळजीचे कारण आहे. माणसाच्या अंतकरणातील माणुसकी आणि सुप्त असलेला बंधुभाव कधीतरी जागा होईल आणि भारत-पाक या देशात परत सौहार्दाचे वातावरण परत येईल असा भाबडा जरी असला तरी आशावाद माझ्या मनात आहे.

असो. विकास यांनी खुपच चांगला अग्रलेख लिहिला आहे. अभिनंदन.

केदार's picture

16 Dec 2008 - 2:57 am | केदार

स्वता:चेच स्वार्थ पाहणारा देश म्ह्णजे अमेरिका >> ह्यात एक देश म्हणून वाईट काय? काहीही नाही. प्रत्येक देशाने आपले कसे चांगले होईल हे पाहीलेज पाहीजे, जो तसे पाहत नाही त्याचा नाश अटळ आहे.

सवय कोठेतरी ठेचली पाहिजे >>
एका गांधीवाद्याकडून अशी प्रतिक्रिया अपेक्षीत नाही. कलंत्री साहेब. :) म्हणजे तूम्ही इतर ठिकानी सांगता तो गांधीवाद पण स्वत चिडल्यावर प्रतिक्रिया देता ती अशी असा दूहेरी गांधीवाद का?

माणसाच्या अंतकरणातील माणुसकी आणि सुप्त असलेला बंधुभाव >> इथे माणूस म्हणजे कोण? हा प्रश्न येतो. जर 'ते म्हणजे पाक' ह्या माणसाच्या व्याखेत बसतच नसतील तर माणूसकी आणि बंधूभाव कसे जागृत होणार?

कलंत्री's picture

16 Dec 2008 - 7:26 pm | कलंत्री

(अरेच्च्या मलापण राग आला तर? अहो, मी गांधीवादी वगैरे काही नाही.)

अमेरिकेचे धोरण दुटप्पी आहे हे कारण माझ्या रागाचे आहे. दुसरे असे की अमेरिका युद्धखोर आहे आणि जगाच्या अशांततेचे हेच एक कारण आहे.

भारतीय उपखंडाबद्दल मला प्रेम आहे आणि जेथे प्रेम आहे तेथे माणुस तर्कवादी कसा होऊ शकेल?

आजच्या काळातही आर्थिक दृष्ट्या अमेरिकेचा कारभार सर्वात मोठा आहे, त्या तुलनेत भारताचा कारभार अजूनही ५% पेक्षा कमी आहे. आपली सार्क देश एकत्र आली तर भारत २०२० ऐवजी त्याअगोदरच महासत्ता होऊ शकेल. त्याचबरोबर उपखंडातील विषमताही कमी / दुर होऊ शकेल.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Dec 2008 - 8:56 pm | प्रकाश घाटपांडे

मला हे संपादकीय अदृष्य आशावादासारखे वाटते. हा आशावाद भाबडा ठरु नये ही सदिच्छा.
ये रे माझ्या मागल्या हे अदृष्य भय मात्र टांगत्या तलवारीसारखे आहे
प्रकाश घाटपांडे

केदार's picture

16 Dec 2008 - 12:24 am | केदार

थोडक्यात "अमेरिका एके अमेरिका" हा दृष्टीकोन बदलू लागला आहे. त्यातच ९१ सालची परदेशी गंगाजळीची चणचण आणि नंतरच्या काळातील हर्षद मेहता, केतन पारीख आदींची शेअर बाजाराला आणि पर्यायाने सामान्यांना वेठीस लावणार्‍या कारावायांमूळे आपण आधीच शिकलो होतो. एकंदरीत आपल्यावरील अमेरिकेचे वैचारीक प्रभुत्व थोडे कमी होऊन (चांगल्या अर्थी होऊ शकेल असे) स्वतंत्र आपण किमान विचार करू लागलो आहोत. >>>

विकास, प्रथम तूम्ही चांगला लेख लिहीन्याचा प्रयत्न केला ह्या बद्दल अभिनंदन.

पण तूमच्या वरिल वाक्यात विरोधाभास आहे. भारत ९१ च्या आधी पर्यंत सोशॅलीझम च्या जोखडत अडकलेला होता. परकिय गंगाजळी कमी होणे हे त्याचेच एक लक्षन होते. बाकी अनेक गोष्टीही आहेत. अटल बिहारी नंतर खर्‍या अर्थाने भारतीय अर्थकारनाला जागतीकीकरन लाभले. काँग्रेसनेच आधी मिक्स्ड इकॉनॉमी आणली व नंतर ती ओपन करन्याचे श्रेय लाटले ह्याकडे दुर्लक्ष व्हावयास नको.
"केतन पारेख वा हर्शद ने जे काही केले ते योग्य न्हवतेच पण त्यांचमूळे आपण शिकलो व आत्ताचा मंदीचा फटका आपल्या कमी बसला" हे जे तूम्ही मांडताय ते पटत नाही कारण हा प्रश्न तूम्ही फक्त शेअर मार्केटची उलाढाल व काही मोठे नाव असा एवढाच लिमीटेड पाहताय. मंदीच्या बाबतीत सबप्राईम ने जे काम केले आहे ते भारतात कधीही होऊ शकनार नाही कारण आपल्याकडे कर्ज वैयक्तीक पत पाहून पण तरीही सर्वांना एकच रेट लावून दिले जाते. पण अमेरिकेत तसे नाही. हा विषय थोडा वेगळा आहे पण त्याचा तूम्ही आढाव्यात उल्लेख केला म्हणून लिहावे वाटले.
तसेच समाजवाद चांगला व भांडवलशाही वाईट हा सुरु लेखाच्या आरंभी व मध्यात जाणवतोय. आज भारत पुढे पडतोय ते ह्या न्यूओ कॅपीटलीझम मूळेच. आणि जर तूम्ही आर्थीक आकडेवारी पाहीली तर "भारत स्वतःच बाजारपेठ" हे तत्व इ स २००१-२ पासूनच आहे. ह्यात नविन काही नाही. आत्ताचे जे हाउसिंग बबल भारतात तयार झाले त्याची सायकल २००२ मध्ये सुरु झाली होती. ईंडिजीनीयस ग्रोथ असे आपण ज्याला म्हणतो ती आपली जास्त आहे, ह्यात परकियांचा व इ स २००६ पासून आय टी कंपन्याचा सहभाग कमी आहे. कारण भर इन्फ्रावर जास्त आहे. गेल्या काही वर्षातील आर्थाक आकडेवारी हे सांगेन.
आजच्या जगात, सर्व देशांची त्यांना स्वतःला तसे वाटले नाही तरी आर्थाक बाबतीत एकमेकांचे पाय एकमेकांत अडकलेले आहेत.

दुर्दैवाने आयन रॅन्ड ह्या लेखिकेने कैक वर्षांपुर्वी ऐटलास श्रगड असे पुस्तक लिहीले होते, त्या घटना अमेरिकेत आज अस्तित्वात येताना दिसत आहे. इच्छूकांनी ते पुस्तक जरुर वाचावे.

आधी लिहील्याप्रमाने लेख चांगला लिहायचा प्रयत्न आहेच फक्त वरिल गोष्ट, 'अर्थशास्त्रीय' दृष्टीने पाहतोय त्यामूळे मतभेद, इतकच.

विकास's picture

16 Dec 2008 - 10:37 am | विकास

केदार,

सर्वप्रथम धन्यवाद. तुमच्या मुद्यांसंदर्भात मला काय म्हणायचे होते ते थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो:

पण तूमच्या वरिल वाक्यात विरोधाभास आहे. भारत ९१ च्या आधी पर्यंत सोशॅलीझम च्या जोखडत अडकलेला होता. परकिय गंगाजळी कमी होणे हे त्याचेच एक लक्षन होते. बाकी अनेक गोष्टीही आहेत. अटल बिहारी नंतर खर्‍या अर्थाने भारतीय अर्थकारनाला जागतीकीकरन लाभले. काँग्रेसनेच आधी मिक्स्ड इकॉनॉमी आणली व नंतर ती ओपन करन्याचे श्रेय लाटले ह्याकडे दुर्लक्ष व्हावयास नको.

हा लेख लिहीत असताना माझ्या डोक्यात पक्षिय राजकारण नव्हते. तसेच आधी काय चुका झाल्या, कोणी कधी किती केल्या ते पण नव्हते. फक्त आपण अमेरिकेच्या प्रभावाखाली त्यांचाच मार्ग स्विकारत जर थोडेफार अंधानुनय करत असलो (माझ्या लेखी करतोच आहोत) तर त्याला आता आळा बसेल असे वाटते.

तसेच समाजवाद चांगला व भांडवलशाही वाईट हा सुरु लेखाच्या आरंभी व मध्यात जाणवतोय.

अहो माझे इथले वाद वाचलेत का? :-) समाजवादाच्या बाजूने मी लिहीतो असे का वाटले? अमेरिकन भांडवलशाहीतील दोष दाखवले/टिका केली याचा अर्थ समाजवाद चांगला म्हणतोय असे होत नाही. एक गाढव म्हणून दुसरा आपोआप घोडा कसा काय होईल? भांडवलशाही आणि सरकारी कमितकमी नियंत्रणे याचा अतिरेक झाल्याने काय होते हे दिसते या संदर्भात माझे लिखाण होते. आणि समाजवाद नको याचा अर्थ समाजभेद (सामाजीक दरी वाढली तर) चालेल असा अजिबातच अर्थ असता कामा नये.

आज भारत पुढे पडतोय ते ह्या न्यूओ कॅपीटलीझम मूळेच.
तेच अमेरिकेस वाटत होते. आजच्या बातम्या पाहील्यात का? आज अमेरिकन वित्तसंस्थेवरील विश्वास हा जगभरच्या वित्तसंस्थांच्या नजरेतून उडाला आहे. तरी अमेरिका असल्याने चालू शकेल. विचार करा उद्या असे भारतात झाले तर पुढारलेले देश कसे वागतील. शिवाय लोकसंख्या, त्यातील आर्थिक दरी याचा सर्व विचार केला तर परीणाम काय होऊ शकतात. अमेरिकेस असलेली "luxury" आपल्याला नाही आहे असे वाटते. त्यामुळे आपल्याला आपला मार्ग शोधणे गरजेचे आहे. नुसते निओकॅपीटॅलीझम म्हणत अमेरिकन अनुनय केला तर आपल्यावर होणारे परीणाम गंभीर असू शकतात.

आजच्या जगात, सर्व देशांची त्यांना स्वतःला तसे वाटले नाही तरी आर्थाक बाबतीत एकमेकांचे पाय एकमेकांत अडकलेले आहेत.

हे १००% मान्य आहे.

धनंजय's picture

16 Dec 2008 - 1:15 am | धनंजय

महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणारे आशावादी संपादकीय.

बाजारबुडी आणि दहशतवाद यांच्यामुळे काही फरक होणार, असे दिसते आहे.

विकास's picture

16 Dec 2008 - 2:17 am | विकास

सर्वप्रथम सर्व प्रतिक्रीयांना धन्यवाद. लेख सुचला तसा लिहीला असल्याने त्यात जर काही तृटी असल्या तर त्या माझ्या वेळेअभावी मर्यादा होत्या.

मला मूळ मुद्दा इतकाच सांगावासा वाटत होता की एकंदरीत स्थितीस्थापकत्व वृत्तीस कोठे तरी या दोन्ही घटनांनी धक्का पोचवला. त्याचे काही चांगले परीणाम नक्कीच होऊ शकतात असे किमान आत्ता तरी वाटते. भारतातील घटने संदर्भात एक प्रमुख कारण असे आहे की तरूण पिढी जास्त आहे आणि कायम अपेक्षा ही तरूण पिढीकडून जास्त असते. जस जसे वय वाढते तसे आधीच्या अनुभवातून आलेला एकतर कडवटपणा नकारार्थी करतो अथवा "हू केअर्स" अशी भावना आणतो.

घाटपांडेसाहेब अथवा चेतन म्हणतात तसा हा निव्वळ आशावाद आहे का? - तर मला आशिर्वाद आणि आशावाद हे नक्की हातात हात घालून जाऊ शकतात असे वाटते. तरी देखील हा आशावाद अदृश्य नको तर डोळस असावा असे वाटते. माझी किमान अपेक्षा तरी डोळस आशावादाचीच आहे.

तात्या म्हणतातः हे विधान सरकारी पातळी संदर्भात केले असल्यास चांगलेच आहे परंतु बर्‍याचदा अनुभवातून शहाणपण न येता सगळे स्वप्नरंजनच ठरते.. काही कालावधी लोटल्यावर पुन्हा पुन्हा अतिरेकी हल्ले होतच आहेत, निरपराध माणसे मरतच आहेत.

हे खरे आहेच. तरी देखील या वेळेस जरा वेगळे घडले आहे...सामान्य माणसांपेक्षा, निरपराध असले तरी उच्चवर्गावर वार झाला आहे. शिख दहशतवाद जसा एका विशिष्ठ वेळे नंतर उखडण्यात आला तसेच काहीसे तेव्हढे सोप्या पद्धतीने नाही पण या संदर्भात होण्याची शक्यता आहे. कारण आता सरकारला पर्याय नाही. आणि जे सरकार ऐकणार नाही त्या सरकारला पर्याय मिळेल...स्वतः शिकून सावध रहाण्याची गरज नक्कीच आहे. शिख अतिरेकाच्या वेळेस अनेक ठिकाणी रेडीओ बाँब फुटून माणसे मेली पण नंतर त्यातून शिकलीच. सहन करण्याची आणि निर्विकार राहू शकण्याची म्हणून जी काही मर्यादा आहे ती आता समाजाने एकत्रीत (कलेक्टीव्हली) ओलांडली की बदल घडतात. अहो असा विचार करा. धर्माला नुसती ग्लानी आली म्हणून देव लगेच जन्म घेत नाही, जेंव्हा "अधर्म उठतो भारी तेंव्हा मी जन्म घेत असे" . आपले देव असे अगदी अती होऊ पर्यंत वाट पहातात तर त्यांच्या भक्तगणांकडून लगेच अपेक्षा कशी करता येईल. पण आताची अवस्था मात्र "भारी" झाली आहे.

बाकी सविस्तर होऊ शकतात म्हणून प्रतिसाद कलंत्रीसाहेबांना आणि केदार यांना त्यांच्या लेखाखाली देतो.

बाकी, पुनश्च धन्यवाद!

एकलव्य's picture

16 Dec 2008 - 7:23 am | एकलव्य

विकास - आपले लिखाण मुद्देसूद असते आणि बहुदा वाचनातून सुटत नाही. हा लेखही आज वाचला... शक्य झाले तर तपशीलात प्रतिसाद देईन याक्षणी मात्र फक्त धावती तिरंदाजी -

विषय अवघड आहे हे मान्य असले तरीही मांडलेले आडाखे ढोबळ आणि वरवरचे वाटले. अभ्यासाची जोड अनेक ठिकाणी देता येईल असे वाटले. जाता जाता काही मुद्दे -

  1. भारतीय अर्थव्यवस्था अमेरिका एके अमेरिका या सूत्रावर फारशी आधारित आहे असे नाही. जगाच्या एकूणच अर्थव्यवहारावर अमेरिकेचा पगडा आहे भारतावरही तो आहे इतकेच. खरे तर जगातील काही मोजक्या इकॉनॉमींपैकी भारत एक आहे की ज्याची पडझड अमेरिकन उलथापालथीवर तुलनेने कमी प्रमाणात अवलंबून आहे.
  2. रशिया एके रशिया असे न राहता भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये झालेला (उर्वरित जगाच्या दृष्टीने सर्व सूत्रे आणि नियम धाब्यावर बसवून)अणुसहकार्याचा करार ही अनेक अर्थाने नव्या जगाची नांदी आहे. अवांतर - येथेही अमेरिका एके अमेरिका आजतरी नाही. इतर युरोपीय राष्ट्रे अगदी गेल्या आठवड्यात रशिया हे सगळेजण आता भारतात अणुभट्ट्या काढण्यासाठी पुढे सरसावतील.
  3. टाटांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान स्वातंत्र्योत्तर काळातही अगदी भरीवच आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रतीक म्हणून एकच समूह निवडायचा म्हटले तर आजही टाटाकडेच पहावे लागेल. मुंबईच्या एका घटनेने त्यांचे डोळे उघडले असे म्हणता येणार नाही.
  4. हर्षद मेहता ऍन्ड कंपनी ही चहाच्या पेल्यातील वादळे झाली. शिक्षण म्हणायचे तर ९१चा आपण दिलेला दाखला आणि एशिअन क्रायसिसचे धडे मोलाचे होते असे म्हणता येईल.
  5. मुंबईतील हल्यांमुळे आमचे सरकार काही शिकले असेल याची खात्री वाटावी किंवा चिह्ने दिसावीत असे काहीही दिसलेले नाही. आमच्या मराठी सरकारच्या नेतृत्वाचा सावळा गोंधळ शरमेने मान खाली घालावा असा होता. परदेशी नागरिक असले काय किंवा नसले काय त्याने ह्या सरकारला ढिम्म फरक पडत नाही.
  6. ९/११ नंतर जग आज परत एकत्र आले आहे असे मला तरी दिसत नाही. नॉट मेनी केअर फॉर व्हॉट हॅपन्स इन इन्डिआ.

आपली सदिच्छा चांगली आहे... पण देअर आर हार्डली एनि ब्लेसिंग्ज.

प्रदीप's picture

16 Dec 2008 - 11:01 am | प्रदीप

त्यातील आशावाद अवास्तव वाटला तरी अग्रलेख आवडला.

ज्या कारणाने टाटा उद्योग समुह स्वातंत्र्यपूर्वकाळात उभा राहीला आणि स्वातंत्र्योत्तर हळू हळू आचरणात आणण्याचे विसरून गेला त्या टाटा उद्योग समुहाला पण आता बदलत्या काळातील राष्ट्रीय स्वार्थ कळले असले तर आश्चर्य वाटायला नको!

हे कळाले नाही. पण तो तपशिलाचा भाग झाला.