पुस्तक परिचय: मनात -- भाग १

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
30 Jul 2022 - 9:41 pm

----

अभियांत्रिकीमधे करियर असूनही पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात रुची जपणारे, किंवा इतर विषयात नाक खुपसणारे, खोऱ्याने सापडतील. अभियंत्यांचा तो अवगुण म्हणावा लागेल, किंवा तार्किक आणि तांत्रिक निश्चिततेचा कंटाळा.

मात्र आवड ते निवड हा कठीण रस्ता फक्त काहींनाच पार करता येतो. एक चांगलं उदाहरण म्हणजे लेखक अच्युत गोडबोले. इंजिनीअरिंग क्षेत्रात यशस्वी करिअर करताना, आपली आवड, उत्सुकता जपत, त्यांनी खूप वेगवेगळ्या विषयांवर लिहिलं आहे. "मनात" हे मानसशास्त्राच्या प्रवासावरील पुस्तक त्यातीलच एक. दोन वर्षे अभ्यास करून, मागील दोनशे वर्षातील मानसशास्त्राचा प्रवास त्यांनी सोप्या भाषेत मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. ज्यांना मानसशास्त्राबद्दल कुतूहल वाटतं त्यांनी या पुस्तकातून वाचनाची सुरुवात करायला हरकत नाही.

"मनात" पुस्तकाचं मुखपृष्ठ
("मनात" पुस्तकाचं मुखपृष्ठ)

मानसशास्त्र या विषयावरील वर्तमानपत्रातलं वाचन सोडलं तर कुठलंही पुस्तक यापूर्वी वाचण्यात आलं नव्हतं. "मनात" पुस्तक हाती आलं, दोन पारायणं झाली, करावी लागली, आणि तरीही मनाच्या प्रवासाला नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे, असं वाटलं. या प्रवासात शक्य असेल तितक्या सहप्रवाशांना सोबत घेण्यासाठी ही लेखमाला म्हणजे एक छोटासा प्रयत्न.

इंस्टा-रिल्सच्या जमान्यात पूर्ण पुस्तक वाचणं म्हणजे महाकठीण काम, त्यामुळे या लेखमालेतील लेख, पुस्तकावर आधारित रिल्स समजून वाचायला हरकत नसावी!

----
आकृतीबंध

लेखकाने पुस्तकात मानसशास्त्राचा प्रवास ऐतिहासिक क्रमानं लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यातील मला भावलेलं, किंवा थोडंफार समजलेलं, असं मोजकंच लिखाण नोंदीच्या स्वरूपात या लेखमालेतून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक वाचकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो त्यामुळे संपूर्ण पुस्तक वाचणं कधीही श्रेयस्कर!

मला भावलेलं लिखाण:
१) (मनाचा) भारतीय विचार
२) फ्रॉइड -- मानसशास्त्राचा पहिला प्रवाह, मनोविश्लेषण
३) मानसशास्त्रातील प्रयोगाधारीत व आधुनिक प्रवाह
४) चंगळवाद (मटेरियालिझम)
५) (लेखकाने दिलेल्या संदर्भातून) भावलेली पुस्तके

याव्यतिरिक्त लेखकाने मनाचा व मेंदूचा शास्त्रीय अभ्यास होण्यापूर्वीची अंधश्रद्धेची, गोंधळाची स्थिती; मेंदूरचना; बुद्धीची संकल्पना, अशा बऱ्याच विषयांवर विस्तृतपणे लिहिलं आहे.

"समारोप" या शेवटच्या प्रकरणात लेखकाने खूप चांगली निरीक्षणं, विचार आणि मतं मांडली आहेत, अगदी ओघवत्या भाषेत आणि मनापासून!

----

भारतीय विचार

[खूप खूप पूर्वी]
प्राचीन ऋषी कपिल मुनींनी सांख्यशास्त्रात तीन गुणांचा उल्लेख केला आहे. सत्त्व (सात्त्विक) म्हणजे शुद्ध किंवा प्रकाशमान, तर रज (राजसिक) म्हणजे मंद आणि तम (तामसीक) म्हणजे काळोख किंवा अंधारासम तत्त्व. ह्या गुणात कोणतीही क्रमवारी किंवा उच्च नीच असे न मानता ह्या गुणांना एकमेकांचे पुरक असे मानण्यात आले आहे. या तिन्ही गुणांची साम्यावस्था म्हणजे प्रकृती.

[इसवी सन पूर्व दुसरं शतक]
अग्निवेश, किंवा चरक संहितेत, प्रकृती आणि स्वभाव यांचं विश्लेषण केलं आहे. आयुर्वेदात तीन प्रकृतींची माणसं मानलेली आहेत. यांना 'मानसप्रकृती' असं म्हणतात. कफ, वात, पित्त हे त्रिदोष समजून घेतले तर आपल्याला कुठल्याही व्यक्तीच्या प्रकृतीचं विश्लेषण करता येतं.

कफ प्रकृतीच्या व्यक्तींचे इतरांशी संबंध स्थिर असतात. अशा व्यक्ती शांत, मृदुस्वभावी आणि धीरगंभीर व्यक्तिमत्त्वाच्या असतात. अशा लोकांची मैत्री किंवा शत्रुत्व या दोन्ही गोष्टी दीर्घकाळ टिकतात.

वात प्रकृतीच्या व्यक्ती या मानसिकदृष्ट्या खूप अस्थिर असतात. अशा व्यक्ती लहरी, तात्कालिक रागीट, आणि त्यामुळे बेभरवशाच्या असतात. अशा व्यक्ती कुणाच्याही किंवा कशाच्याही चटकन प्रेमात पडतात.

पित्त प्रकृतीच्या व्यक्ती अतिशय बुद्धिमान, प्रतिभावान असतात. त्यांना राग अनावर येतो. ते चिडखोर असल्यामुळे त्यांना मित्रमैत्रिणींचे प्रमाण कमी असतं.

"कुठलीही गोष्ट वाऱ्यावर सोडा; तिचा नाद सोडून द्या; निसर्गाला अव्यवस्थितपणा आवडत नाही; त्यामुळे ही गोंधळाची अवस्था तात्पुरती असते. जेव्हा मनाचं चलनवलन नियंत्रित असतं, तेव्हा मन स्फटिकासारखं स्वच्छ होतं; चित्त निर्मळ झालेलं असतं. म्हणजेच तिथला गोंधळ निवळलेला असतो", असं पतंजली म्हणतात.

[१३ वे शतक]
"खालौरा धावे पाणी"
संत ज्ञानेश्वर म्हणतात की ज्याप्रमाणे पाणी खालच्या दिशेनं सहजगत्या जातं, तसंच मन हे अधोगतीला जाऊ शकतं. त्यामुळे त्याला सुसंस्काराची खूप आवश्यकता असते.

"संत तेच जाणा जगी, दया क्षमा ज्यांचे अंगी|
लोभ अहंता न ये मना, जगी विरक्त तेचि जाणा||.
इहपरलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी|.
मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा||"
धाकटी मुक्ता, मोठ्या बहिणीसारखी, उद्विग्न ज्ञानेशाची समजूत काढते, मनाची ताटी उघडावी म्हणून.

[१४ वे शतक]
"ऊस डोंगा परी रस नोव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा"
संत चोखामेळा बाह्य रुपापेक्षा अंतर्मनात डोकावण्याचा सल्ला देतात.

[१५ वे शतक]
"ऐसी वाणी बोलिए, मन का आपा खोये|
औरन को शीतल करे, आपहुं शीतल होए||"
संत कबीर आपल्या दोह्यातून जगणं शिकवतात.

[१७ वे शतक]
"मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण"
या सुखाचा मूलमंत्र संत तुकाराम देतात.

"अचपळ मन माझे, नावरे आवरिता"
समर्थांनी करुणाष्टकात म्हटल्याप्रमाणे "मन" खूप चंचल, अस्थिर आहे. कितीही आवरायचा प्रयत्न केला तरीही न आवरणारं.

"येथ बोल ना ही जनासी| हे अवघे आपणास पासीl
सीकवावे आपल्या मनाशीl क्षण क्षणा|"
स्वतःच्या मनाला निरंतर शिकवावे, जनाला नाही, असं समर्थ आपल्या प्रथम पुरुषी वचनात केलेल्या लिखाणातून अगदी समर्पकपणे सांगतात.

[१९ वे शतक]
"आंतरिक असो वा बाह्यजगाचं ज्ञान, ते केवळ मनाच्या एकाग्रतेनं मिळविता येतं."
भारतीय तत्वज्ञ स्वामी विवेकानंद एका व्याख्यानात मनाच्या एकाग्रतेचं महत्व सांगतात.

"मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावर..."
कवयित्री बहिणाबाई मनाचं चपखल वर्णन करतात. मनाचं कोतेपण, विशालता, चंचलता, सारं काही मांडताना त्या जीवनाचं तत्वज्ञान सांगतात.

----

मनाचा भारतीय विचार ऋषीमुनी, संत, तत्वज्ञ, साहित्यिक, कवी असा प्रवास करत सामान्यांपर्यंत पोहोचतो.
या प्रवासात अलीकडच्या काळात, मागच्या दोन शतकात, भारतीय शास्त्रज्ञांचा खूप काही विशेष सहभाग आला नाही याची खंत लेखक व्यक्त करतो.

थोडक्यात सांगायचं म्हटलं तर, आपला स्वतःशीच निरंतर संवाद सुरू असायला हवा, मनाला समजून घेण्यासाठी आणि घडवण्यासाठी.
मानसशास्त्रासारख्या वरवर क्लिष्ट वाटणाऱ्या विषयात फक्त एवढंच अभिप्रेत असावं!

----

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

30 Jul 2022 - 9:52 pm | कुमार१

चांगली सुरवात.
विषय गहन आहे.

श्रीगणेशा's picture

1 Aug 2022 - 10:00 am | श्रीगणेशा

कुमार सर,
अभ्यासपूर्ण लिखाण कसं असावं हे तुमच्या लिखाणातून शिकायला मिळतं _/\_

धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2022 - 10:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुस्तकाची चांगली ओळख करुन दिली आहे, लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

श्रीगणेशा's picture

1 Aug 2022 - 10:00 am | श्रीगणेशा

धन्यवाद प्रा. डॉ. सर!

कॉमी's picture

30 Jul 2022 - 10:16 pm | कॉमी

छान ओळख !

श्रीगणेशा's picture

1 Aug 2022 - 10:03 am | श्रीगणेशा

धन्यवाद कॉमी!
या लेखमालेतील पुढील लेख वाचनीय करण्याचा प्रयत्न राहील.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Jul 2022 - 11:37 pm | ज्ञानोबाचे पैजार

प्रयत्न आवडला,
लिहित राहा
पैजारबुवा,

श्रीगणेशा's picture

1 Aug 2022 - 10:12 am | श्रीगणेशा

धन्यवाद पैजारबुवा!
तुम्ही "पेरणा" घेऊन लिहिलेल्या वात्रटिका मूळ पेरणेपेक्षाही सरस असतात बऱ्याचदा _/\_

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

31 Jul 2022 - 12:11 am | ॲबसेंट माइंडेड ...

छान सुरूवात.

श्रीगणेशा's picture

1 Aug 2022 - 10:19 am | श्रीगणेशा

धन्यवाद ॲबसेंट माइंडेड!

कर्नलतपस्वी's picture

31 Jul 2022 - 10:30 am | कर्नलतपस्वी

श्रीगणेशा,छान लिहीले आहे.

कबीरदासजी नी त्यांच्या बिजका मधे मनाचे अत्यंत समर्पक वर्णन केले आहे. संत रामदासांनी मनाने कसे वागावे हे मनाच्या श्लोकात सांगीतले आहे.
लहानपणापासून मनावर यांचे संस्कार केले तर मानसिक व्याधी वर सहज विजय मिळवता येईल.

मनाची अवस्था ,

पाणी ही तै पतला,धुवां ही तै झीण ।
पवनां बेगि उतावला, सो दोसत `कबीर’ कीन्ह ॥3॥

मनाचा मुलभूत स्वभाव

कबीर यह मन लालची, समझै नहिं गंवार। भजन करन को आलसी, खाने को तैयार।।

तन की भूख सहज है, तीन पाव की सेर ।
मन की भूख अनन्त है, निगलै मेरु सुमेरु।

मनाने कसे वागावे

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे
मना बोलणे नीच सोशीत जावे
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे
मना सर्व लोकांसि रे नीववावे

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे
अति स्वार्थ बुद्धी नुरे पाप साचे
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे
न होता मनासारिखे दु:ख मोठे

जगी सर्व सुखी असा कोण आहे
विचारी मना तुमची शोधून पाहे

मना सांगपा रावणा काय झाले
अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले

नाहीतर मग.

मन के हारे हार है, मन के जीते जीत। कहे कबीर हरि पाइए मन ही की परतीत।।"

भगवान ही मालीक है.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

31 Jul 2022 - 2:50 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान प्रतिसाद.

श्रीगणेशा's picture

1 Aug 2022 - 10:29 am | श्रीगणेशा

धन्यवाद कर्नल साहेब!
तुम्ही हिंदी व मराठी या दोन्ही भाषेत तितक्याच ताकदीने आणि सहजपणे लिहिता _/\_

"भारतीय विचार" या परीच्छेदातील बरचसं लिखाण "मनात" पुस्तकातून घेतलं आहे. आणि खरं तर ते हजारो, शेकडो वर्षांपूर्वीच असामान्य माणसांनी आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी लिहून ठेवलं आहे. आपण फक्त वाचायचं, पुन्हा एकदा.

धर्मराजमुटके's picture

31 Jul 2022 - 11:04 am | धर्मराजमुटके

तुम्ही तर छुपे रुस्तम निघालात ! एवढे छान लिहिले आहे. उगाच पहिला धागा काढून मिपाकरांची टर खेचायची होती काय :)
केवळ राजकारणावर व्यक्त होण्याऐवजी प्रत्येकाने असे काहीतरी वेगळे लिहित रहा ही या निमित्ताने सर्व मिपाकरांना विनंती.

श्रीगणेशा's picture

1 Aug 2022 - 10:49 am | श्रीगणेशा

धन्यवाद धर्मराजमुटके!
मिपाकरांची टर वगैरे निश्चितच नाही :-) उलट त्या धाग्यातून प्रेरणा घेऊन लिखाणात सुधारणा करता आल्या.

राजकारणावरील धाग्यांचा/चर्चेचा माझा अनुभव -- मी बऱ्याचदा प्रयत्न करूनही मला कधीच चर्चेत सहभागी व्हायला जमलं नाही. (देवकृपा म्हणावी लागेल)

लहानपणी दूरदर्शनच्या मराठी वाहिनीवर बहुतेक महाचर्चा नावाचा कार्यक्रम असायचा. विषय केंद्रस्थानी ठेवून, त्यातील व्यक्ती बाजूला करून, समतोल साधत होणारी ती महाचर्चा आजही लक्षात आहे.
सध्याच्या काळात सर्वच माध्यमात चर्चेचं स्वरूपच बदलून गेलं आहे. मिपा त्याला अपवाद कसा असेल.

अनन्त्_यात्री's picture

31 Jul 2022 - 12:48 pm | अनन्त्_यात्री

पुभाप्र

श्रीगणेशा's picture

1 Aug 2022 - 10:55 am | श्रीगणेशा

धन्यवाद अनन्त्_यात्री!
पुढील भागात खरी कसोटी आहे :-)
सुरुवात करणं सोपं.

श्रीगणेशा's picture

31 Jul 2022 - 12:52 pm | श्रीगणेशा

धन्यवाद सर्वांचे!
तुम्हां अभ्यासू वाचकांमुळे लिहायला उत्साह येतो, नवीन गोष्टी शिकता येतात.

त्यामुळे बऱ्याच विचारवंतांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण यात सुखदुःखाचे कप्पे असतात. ते रिकामे करून नव्याने भरता येत नाहीत. बाकी जडजड तत्त्वज्ञान आहे.

श्रीगणेशा's picture

1 Aug 2022 - 10:58 am | श्रीगणेशा

धन्यवाद कंजूस!
जडजड वाटणारं तत्वज्ञान समजून घेण्याची धडपड सुरूच ठेवली पाहिजे.

"कुठलीही गोष्ट वाऱ्यावर सोडा; तिचा नाद सोडून द्या; निसर्गाला अव्यवस्थितपणा आवडत नाही; त्यामुळे ही गोंधळाची अवस्था तात्पुरती असते. जेव्हा मनाचं चलनवलन नियंत्रित असतं, तेव्हा मन स्फटिकासारखं स्वच्छ होतं; चित्त निर्मळ झालेलं असतं. म्हणजेच तिथला गोंधळ निवळलेला असतो", असं पतंजली म्हणतात.

छान!हे आवडलं.
चांगला परिचय !

श्रीगणेशा's picture

1 Aug 2022 - 11:39 am | श्रीगणेशा

धन्यवाद भक्ती!
हे पतंजली ऋषींनी साधारण २२०० वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं!

टर्मीनेटर's picture

31 Jul 2022 - 10:27 pm | टर्मीनेटर

मस्त सुरुवात 👍
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

वर कर्नल साहेबांनी लिहिलंय

लहानपणापासून मनावर यांचे संस्कार केले तर मानसिक व्याधी वर सहज विजय मिळवता येईल.

ह्याच्याशी पूर्णपणे सहमत! कबीरांचे दोहे पण फार आवडतात. युट्युबवर बऱ्याचवेळा कबीर अमृतवाणी आणि अधून मधून दोहयांवर आधारित काही उर्दू कव्वाली पण मी ऐकत असतो.

श्रीगणेशा's picture

1 Aug 2022 - 12:08 pm | श्रीगणेशा

धन्यवाद टर्मीनेटर!

मुक्त विहारि's picture

1 Aug 2022 - 10:08 am | मुक्त विहारि

धन्यवाद

श्रीगणेशा's picture

1 Aug 2022 - 12:11 pm | श्रीगणेशा

धन्यवाद मुवि!
याच लेखमालेत अजून काही परिचय लेख लिहित आहे, भावलेल्या मुद्द्यांवर.

चौथा कोनाडा's picture

2 Aug 2022 - 6:02 pm | चौथा कोनाडा

खुप छान सुरुवात !

संत तेच जाणा जगी, दया क्षमा ज्यांचे अंगी|
लोभ अहंता न ये मना, जगी विरक्त तेचि जाणा||.
इहपरलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी|.
मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा||"
धाकटी मुक्ता, मोठ्या बहिणीसारखी, उद्विग्न ज्ञानेशाची समजूत काढते, मनाची ताटी उघडावी म्हणून.

अगदी समर्पक !

मनात हे गाजलेलं पुस्तक वाचायचं राहिलंय, या निमित्ताने त्या वाचनाची प्रेरणा मिळाली !
आकृतीबंध दिल्यामुळे पुस्तक कसं असेल याची कल्पना आली.

धन्यवाद, श्रीगणेशा !

श्रीगणेशा's picture

2 Aug 2022 - 9:18 pm | श्रीगणेशा

धन्यवाद चौको!

आकृतीबंध फक्त लेखमालेसाठी दिला आहे, पुस्तकातील मला भावलेल्या मुद्द्यांवर, पूर्ण पुस्तकाचा नाही.

या लेखात दिलेले, आकृतीबंधातील ५ मुद्दे सोडून, लेखकाने मनाचा व मेंदूचा शास्त्रीय अभ्यास होण्यापूर्वीची अंधश्रद्धेची, गोंधळाची स्थिती; मेंदूरचना; बुद्धीची संकल्पना, विविध मनोविकार अशा बऱ्याच विषयांवर विस्तृतपणे लिहिलं आहे.

प्रत्येक वाचकाचा दृष्टिकोन, आवड, आकलन वेगळं असू शकतं. पण पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. लेखकाच्या मते हे पुस्तक सोपं आणि त्यामुळे मानसशास्त्रात पहिल्यांदाच वाचन करणाऱ्यांसाठी अगदी योग्य आहे.

मी पहिलं वाचन भरभर केलं. आणि दुसरं वाचन मात्र फक्त भावलेल्या प्रकरणांचंच आणि बारकावे टिपत करत आहे.

लेखमालेची सुरुवात छान झालेली आहे. पुढील सर्व भाग वाचण्याची उत्सुकता आहे. अनेक शुभेच्छा.
पतंजलींची योगसूत्रे हा मानवी प्रतिभेचा एक अद्भुत अविष्कार आहे. अवघ्या सत्याणौ सूत्रात मानवी मन आणि अवघ्या ब्रम्हांडाला गवसणी घातलेली आहे.
"योगश्चित्तवृत्तिनिरोधः" ही योगाची व्याख्या अगदी सुरुवातीलाच सांगून पुढे 'यम - नियम - आसन - प्राणायाम - प्रत्याहार - धारणा - ध्यान - समाधि' हा अष्टांगयोग विशद केलेला आहे. अभ्यासेच्छुंनी बी के एस अय्यंगार आणि ओशो यांच्या ग्रंथांचे परिशीलन अवश्य करावे असे सुचवतो.

श्रीगणेशा's picture

4 Aug 2022 - 6:23 am | श्रीगणेशा

धन्यवाद चित्रगुप्त सर _/\_

लेखकाने "मनात" पुस्तकात "चित्तवृद्धीनिरोध" संदर्भात खालील विश्लेषण केलं आहे:

चित्तवृद्धीनिरोध म्हणजे योग. योग म्हणजे मनाचं संपून जाणं. योग म्हणजे मनाची निर्गुण, निराकार अवस्था असणं. थोडक्यात, मनात कुठलाही विचार नसणं.

'मी' आणि 'माझा' इतका सीमित विचार संपून मनात शांतता निर्माण होणं. जेव्हा माणूस स्वार्थरहित कर्म करतो, मी सोडून इतरांमध्ये एकरूप होतो किंवा एखाद्या कलेत तो रममाण होतो तेव्हा मनाच्या त्या अवस्थेला 'अमनी' (मनरहित) अवस्था म्हटलं जातं.

विवेकपटाईत's picture

4 Aug 2022 - 11:01 am | विवेकपटाईत

लेख आवडला. पण काय करणार मी पण काही संपत नाही.

श्रीगणेशा's picture

4 Aug 2022 - 12:31 pm | श्रीगणेशा

धन्यवाद विवेकपटाईत!

"चित्तवृत्तीनिरोध" हा उल्लेख आलाच आहे पुस्तकात.
...
'मी' आणि 'माझा' इतका सीमित विचार संपून मनात शांतता निर्माण होणं.
...

"मी" आणि "माझा" हे सामान्य माणसाचं लक्षण आहे, त्यात जगावेगळं काहीच नाही.

श्रीगणेशा's picture

4 Sep 2022 - 5:55 pm | श्रीगणेशा

या लेखमालेतील दुसरा लेख इथे आज प्रकाशित केला आहे:
पुस्तक परिचय: मनात -- भाग २ -- फ्रॉइड आणि मनोविश्लेषण