पुस्तक परिचय: मनात -- भाग २ -- फ्रॉइड आणि मनोविश्लेषण

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
4 Sep 2022 - 1:13 am

----
वाचण्यापूर्वी:
हा लेख "मनात" पुस्तकातील लिखाणावर आधारित असला, तरी, खरं म्हणजे वाचकांना "सिग्मंड फ्रॉइड" वाचायला प्रेरित करावं, म्हणून लिहिला आहे. आणि त्यासाठी "मनात" पुस्तकातून सुरुवात करायला हरकत नाही.

लेखमालेतील याआधीचा लेख: पुस्तक परिचय: मनात -- भाग १
----

आरंभ

६ जानेवारी १९०० रोजी व्हिएन्नामध्ये एका पुस्तकाचं परीक्षण छापून आलं. या पुस्तकानं माणूस स्वतःकडे कसा पाहतो, याची दृष्टीच बदलून जाणार होती. त्याआधी या पुस्तकाविषयी कोणी ऐकलंच नव्हतं. या युगप्रवर्तक पुस्तकाचं नाव होतं "The interpretation of dreams" आणि याचा लेखक होता ४४ वर्षांचा, फ्रायबर्ग, ऑस्ट्रिया इथला एक ज्यू डॉक्टर -- सिग्मंड फ्रॉईड.

डार्विन, आइन्स्टाईन आणि सिग्मंड फ्रॉइड हे एकाच शतकातले, त्या त्या शास्त्रातले, दिग्गज शास्त्रज्ञ होते, ज्यांच्या थिअरीज आणि शोधाने, माणसाची बाह्यजगाचा आणि अंतर्मनाचा विचार करण्याची दिशाच बदलून टाकली.

फ्रॉइड आणि आइन्स्टाईन दोघेही ज्यू होते, आणि दोघांनाही जर्मनी सोडून दुसऱ्या देशांत स्थलांतरित व्हावं लागलं होतं.

आइन्स्टाईन एकदा म्हणाला होता,

लेखक आणि विचारवंत मनाच्या फ्रॉइडचा, मी एक उत्कट प्रशंसक आहे.

पाय जमिनीवर असणाऱ्या फ्रॉइडने त्याच्या पुतण्याला एका पत्रात लिहिलं होतं,

जगभरातील ज्यू माझं नाव आइन्स्टाईनशी जोडून माझा उगीचच अभिमान बाळगतात.

फ्रॉइडची अनकॉन्शसची कल्पना विसाव्या शतकातली सगळ्यात महत्वाची कल्पना मानली गेली आणि हळू हळू सर्वांना त्यातली खोली आणि त्यातले विचार कळायला लागले.

फ्रॉइडच्या बऱ्याचशा थिअरीज चुकल्या असल्या तरी मानवी मनात एवढ्या खोलवर जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न करणारा फ्रॉइड हा पहिलाच मानसशास्त्रज्ञ होता. फक्त मानसशास्त्राच नाही तर त्याच्या विचारांचा चित्रकला, साहित्य, अशा इतरही अनेक क्षेत्रांवर प्रचंड प्रभाव पडला. म्हणूनच त्याचं नाव मार्क्स, डार्विन आणि आइन्स्टाईन यांच्यासोबत "एक युगप्रवर्तक" म्हणून घेतलं जातं!

सिग्मंड फ्रॉइड
सिग्मंड फ्रॉइड

----

मनोविश्लेषण (psychoanalysis)

फ्रॉईडला मनोविश्लेषणाचा पितामह (father of psychoanalysis) म्हटलं जातं.
रुग्णावर कुठलंही बंधन न घालता कसंही बोलू दिलं तर त्या रुग्णाच्या मनातल्या सुप्त स्मृती, भीती, आणि इच्छा यांच्याविषयी आपल्याला माहिती मिळू शकते. आणि या सगळ्यांचा अर्थ लावून, त्या रुग्णावर उपचार करता येतील असं फ्रॉइडला वाटायला लागलं. फ्रॉईडनं ही पद्धती मग अनेकांवर वापरायला सुरुवात केली. यालाच तो "फ्री असोसिएशन" असं म्हणायला लागला. या सगळ्या प्रक्रियेत तो स्वतः खूपच कमी बोले. त्या रुग्णालाच मुक्तपणे बराच वेळ बोलायला लावे आणि मग त्या बोलण्याचा एकीकडे अर्थ लावत बसे. पण या बोलण्यानं मनातल्या भावनांचा निचरा (catharsis) झाल्यामुळे रुग्णालाही बरंच बरं वाटे. त्या रुग्णांच्या विचारावर किंवा भावनांवर फ्रॉइड कुठलीही टीका करत नसे किंवा त्याला नैतिकताही लावत नसे. यातून बाहेर पडणाऱ्या वाक्यांचे, भावनांचे, चिन्हांचे मग फ्रॉइड अर्थ लावायला लागला आणि या विश्लेषण पध्दतीला म्हणजेच ‌‌ॲनालिसीसला तो मनोविश्लेषण (psychoanalysis) म्हणायला लागला.
--

भावनिक निचरा (catharsis)

भावनिक निचरा हा मनोवैज्ञानिकदृष्ट्या सामान्य माणसाच्या आयुष्याचाही एक महत्वाचा भाग असतो. आपल्या समाजरचनेतच त्यासाठी वेगवेगळ्या नात्यांची रचना केलेली असावी. वेगवेगळ्या नात्यांतून, आपल्या मनाचे वेगवेगळे कप्पे उलगडत जातात. ज्या व्यक्ती भोवतीची अशा नात्यांची वीण जास्त घट्ट, त्यातील संवादाची खोली पुरेशी, ती व्यक्ती अंतर्मनात डोकावण्यात, भावनिक निचरा करण्यात यशस्वी होऊन, मानसिक स्थिरतेकडे वाटचाल करते.

----

फ्रॉईडचं हिमखंड रूपक (iceberg metaphor)

फ्रॉइड मानवी मनाची तुलना हिमनगाशी करीत असे. "ज्याप्रमाणे हिमनगाचा ९०% भाग पाण्याखाली असतो त्याप्रमाणे मानवी मनाची अवस्था असते", असं तो म्हणे. थोडक्यात, आपल्याला मनाचा जो भाग जाणवतो तो खूपच थोडा असतो. त्यापेक्षा अनेक पटींनी मोठा असणारा मनाचा भाग आपल्याला अज्ञातच असतो.

फ्रॉइडनं, आपल्याला जाणीव असते, अशा कॉन्शस मानसिक जगाखाली, दोन तऱ्हेच्या पातळ्या कल्पिल्या होत्या -- प्रीकॉन्शस, या क्षणाला मनात नसलेल्या पण चटकन मनात आणू शकणाऱ्या गोष्टी, आणि अनकॉन्शस, दडपून टाकलेल्या, अपूर्ण राहिलेल्या इच्छा.

कॉन्शस, प्रीकॉन्शस आणि अनकॉन्शस या पातळ्यांमुळे मनाच्या गुंतागुंतीविषयी आणि इतरही बाबींविषयी थोडाफार उलगडा होत असला तरी त्याच्याविषयी पूर्ण स्पष्टीकरण होत नव्हतं. हे सोडवण्यासाठी फ्रॉइडनं इड, इगो, सुपर इगोच्या कल्पना त्याच्या "The ego and the id" या बऱ्याच वर्षांच्या संशोधनानंतर, एप्रिल १९२३ मधे प्रकाशित केलेल्या, महत्वाच्या शोधनिबंधात मांडल्या.

फ्रॉईडने मानवी मनाचा विश्लेषणात्मक अभ्यास करून इड, इगो, सुपर इगो या मनोयंत्रणेतील सिद्धांतांची रूपरेषा मांडली. मनोविश्लेषणाच्या विकासात या तीन सिद्धांतांचं मूलभूत महत्व होतं.

या शोधनिबंधात त्याने विविध (किंवा सर्वच) बऱ्यावाईट, मनोवैज्ञानिक परिस्थिती स्पष्ट करण्यासाठीची पायाभूत तयारी म्हणून आवश्यक अशी तार्किक मांडणी केली.

अशा मनोवैज्ञानिक परिस्थिती मनातील विविध तणावामुळे उद्भवतात:
१) इगो आणि इड मधील तणाव
२) इगो आणि सुपर इगो मधील तणाव
३) निर्मिती आणि विध्वंस प्रवृत्ती मधील तणाव

इड
मनाच्या तळाशी वावरणाऱ्या स्वाभाविक प्रेरणांना फ्रॉइड "इड" असं म्हणतो. इड हा असंबद्ध, अविवेकवादी, आततायी (impulsive) असतो. तो pleasure priciple वर चालतो. थोडक्यात, इड हा मनाच्या खोलवरचा गाभा असतो.

इगो
इगो शब्दाचा लॅटिन मध्ये अर्थ होतो "मी". फ्रॉइडच्या मनाच्या मॉडेल मध्ये इगो म्हणजे मनाचा बाह्यभाग, अनुभवातून आणि आकलनातून तयार होणारा. व्यक्तिमत्त्वाचा जो भाग व्यक्तीच्या क्रिया आणि प्रतिक्रिया यातून प्रकट होत असतो त्याला फ्रॉइड "इगो" असं म्हणतो.
इगो सतत इडवर लगाम ठेवत असतो. इगो हा सुसंबद्ध, विवेकवादी, वास्तववादी असतो. तो reality principle वर चालतो. थोडक्यात, इगो हा मनाचा बाह्य पापुद्रा असतो.

सुपर इगो
माणसावर नीतिमत्तेचं, मूल्यांचं, आदर्शांचं आणि ध्येयाचं दडपण असतंच. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीवर एका ठराविक तऱ्हेनं वागण्याचं अलिखित बंधन असतं. याला फ्रॉइड सुपर इगो असं म्हणतो.

सुपर इगो नेहमी इगो वर सतत नियंत्रण ठेवतो. तो कायम व्यक्तीचं वास्तव आणि त्याचे आदर्श यातला फरक दाखवत असतो. त्यामुळे इड मधल्या ऊर्जेला दिशा मिळून माणूस काहीतरी उच्च दर्जाचं करायची धडपड करतो. या प्रक्रियेलाच फ्रॉइड उदात्तीकरण (sublimation) म्हणतो. यामुळेच माणसाची आतापर्यंतची कलेतली, संस्कृतीतली, साहित्यातली प्रगती झालीय असं फ्रॉईडला वाटे.

इड, इगो, सुपर इगो
फ्रॉईडचं हिमखंड रूपक (iceberg metaphor)

----

फ्रॉइडचे काही भावलेले उद्गार

स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहणं हा एक चांगला मानसिक व्यायाम आहे.

मनोधैर्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला असुरक्षिततेच्या भावनांचा खडतर प्रवास करावाच लागतो.

भांडवलशाहीचा पुरस्कार करताना फ्रॉईड म्हणतो की:

पैशाचा शोध ही माणसासाठी खूप मोठी सामाजिक, सांस्कृतिक प्रगती आहे.

परंतू, समाजातील आर्थिक समतेसाठीही फ्रॉईड आग्रही होता.

फ्रॉइडनं त्याची एकेकाळची रुग्ण, चाहती आणि पुढे जाऊन स्वतः मनोविश्लेषक म्हणून काम करणाऱ्या मेरी बोनापार्टे हिला पत्रातून लिहिलं होतं:

एक असाधारण प्रश्न, ज्याचं कधीच उत्तर मिळालं नाही, आणि स्त्रीच्या मनाचं ३० वर्षे संशोधन करूनही मला ज्याचं उत्तर अजून तरी देता आलेलं नाही, तो म्हणजे, 'स्त्रीला खरं म्हणजे हवं तरी काय असतं?' (What does a woman want?)

--

'लोक सामान्यतः मोजमापाची खोटी मानके वापरतात -- ते स्वत:साठी शक्ती, यश आणि संपत्ती शोधतात, इतरांमध्ये त्याची प्रशंसा करतात आणि जीवनात जे खरे मूल्य आहे ते कमी लेखतात', हे आकलन नाकारणं अशक्य आहे.

बहुतेक लोकांना स्वातंत्र्य नको असतं, कारण त्यासोबत जबाबदारीही येते, आणि जबाबदारीची त्यांना भीती वाटते.

आयुष्य अवघड असतं, ते खूप सारं दुःख, निराशा आणि अशक्य अशी आव्हानं घेऊन येतं. ते सहन करणं वरवरच्या उपायांनी शक्य नसतं. कदाचित असे वरवरचे तीन उपाय असतात:
१) पूर्ण शक्तिनिशी दिशा बदलणं, सोप्या शब्दांत, सोडून देणं, जे की दुःखाचं महत्व कमी करतं.
२) पर्यायी समाधान शोधणं, जे की दुःख कमी करतं.
३) व्यसनाच्या आहारी जाणं, जे की आपल्याला असंवेदनशील बनवतं.

----

वैयक्तिक आयुष्य

फ्रॉइडच्या जडणघडणीत त्याच्या आईचा प्रचंड मोठा वाटा होता. आपल्या आईमुळेच आपलं मन आनंदी आणि खंबीर होऊ शकलं असं फ्रॉईड नेहमी म्हणायचा.

जो मनुष्य आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत आईच्या अगदी निकट असतो त्याचाकडे जग जिंकण्याचा आत्मविश्वास असतो आणि यश त्याच्याकडे चालतच येतं.

असं फ्रॉईडनं स्वतः यशाच्या शिखरावर असताना म्हटलं होतं.

फ्रॉइडला मानसशास्त्राव्यतिरिक्त औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि पुरातत्वशास्त्र अशा विविध विषयात रुची होती.
विरोधाभास हा की मानसशास्त्रातील त्याचे विचार जरी क्रांतिकारी (radical), पुरोगामी (liberal) असले, तरी त्यानं वैयक्तिक आयुष्य मात्र कमालीचं पुराणमतवादी (conservative) राखलं होतं.

आयुष्यात खूप काही मिळवूनही फ्रॉईड स्वतः मात्र बऱ्याचदा असमाधानी राहिला. माणसाला अंतर्मनात डोकवायला शिकविणारा फ्रॉइड स्वतः मात्र सिगारच्या पूर्ण आहारी गेला होता, इतका की जबड्याचा कॅन्सर होऊनही त्याचं व्यसन शेवटपर्यंत सुटलं नाही.
रुग्णांवर उपचार करताना त्याच्या असं लक्षात आलं की तो दुसऱ्यांवर खूप चांगले मानसिक उपचार करू शकतो, मात्र स्वतःवर उपचार करणं त्याला कधीच जमलं नाही. एका अवघड संशोधनादरम्यान त्याने लिहून ठेवलं की:

माझा सर्वात महत्वाचा रुग्ण, ज्यामध्ये मी नेहमी व्यस्त राहतो, तो म्हणजे, मी स्वतःच!

----

साहित्यिकशिफारस

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

4 Sep 2022 - 11:13 am | कुमार१

आइन्स्टाईन एकदा म्हणाला होता,

एक सूचना :
आपण मराठीतून लिहिताना जेव्हा परदेशी विद्वानांचा उल्लेख करतो तेव्हा आपण त्यांना एकेरी संबोधले नाही पाहिजे.
इंग्लिशमध्ये आदरार्थी बहुवचन नसेल, परंतु मराठीत ते वापरले पाहिजे.

श्रीगणेशा's picture

4 Sep 2022 - 12:53 pm | श्रीगणेशा

धन्यवाद कुमार सर _/\_
नक्कीच! तुमची सूचना मी लक्षात ठेवेल, पुढील भाग लिहिताना.

सहज म्हटलं जातं. त्यात गैर नाही.
ठराविक संबोधनं पक्की झाली आहेत.

देशाबाहेरील शास्त्रज्ञांच्या बाबतीत आपण एकेरी संबोधने वापरतो, किंवा तसं करताना आपल्याला चुकल्यासारखं वाटत नाही.

उदाहरणार्थ "ते आइन्स्टाईन" पेक्षा "तो आइन्स्टाईन" असंच संबोधन आजपर्यंत मराठीत ऐकण्यात, वाचण्यात आलं आहे.

पण भारतीय शास्त्रज्ञांच्या बाबतीत मात्र आपण आदरार्थी संबोधने वापरतो. उदाहरणार्थ "ते विक्रम साराभाई".

तर्कवादी's picture

5 Sep 2022 - 1:09 am | तर्कवादी

बोलताना वापरले जाणारे संबोधन (एकेरी वा आदरार्थी) हा फारच गमतीदार विषय आहे. याबद्दल ची निरिक्षणे एकत्र करुन पाहिलीत तर खूप विरोधाभास आढळेल.
स्वतंत्र धाग्याचा विषय होईल हा !!

प्रकाश घाटपांडे's picture

6 Sep 2022 - 10:29 am | प्रकाश घाटपांडे

हेच म्हणायला आलो होतो. भारतीय पार्श्वभूमीवर सुद्धा देव,राजा,आई व मित्र यांना एकेरी संबोधण्याला ब्याकरणाची ही मान्यता असते. तो बाप व ते वडील

तर्कवादी's picture

5 Sep 2022 - 5:24 pm | तर्कवादी

फ्रॉईडची पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत का ?

प्रकाश घाटपांडे's picture

6 Sep 2022 - 10:38 am | प्रकाश घाटपांडे

फ्रॉईड समजून घेताना ही डॉ उल्हास लुकतुक्यांची एक मालिका स्टोरीटल वर आहे. ती ऐकली. फ्रॉईडचे लैंगिकता व स्वप्ने, ईडिपस कॉप्लेक्स विषयी विवेचन अनेकांना बुचकळ्यात टाकते.
https://www.storytel.com/in/en/books/freud-samjun-ghyaychay-1725233

प्रकाश घाटपांडे's picture

6 Sep 2022 - 10:47 am | प्रकाश घाटपांडे

https://www.youtube.com/watch?v=Ydb2Le_cHUM
समकालात फ्रॉइडकडे कसे पहावे? ,यावर माझे मित्र डॉ. प्रदीप पाटील यांनी केलेले तरुणांना मार्गदर्शन

तर्कवादी's picture

6 Sep 2022 - 11:30 am | तर्कवादी

प्रकाश घाटपांडेजी
स्टोरीटेल व युट्युब दुव्यांकरता धन्यवाद. युट्युब आधी बघेन. स्टोरीटेल चे एखाद्या महिन्याचे सबस्क्रीप्शन घेतले की ते पण नक्की ऐकेन..

श्रीगणेशा's picture

6 Sep 2022 - 6:43 pm | श्रीगणेशा

तर्कवादी सर,
बुकगंगा वेबसाईट वर शोधल्यावर खालील तीन मराठीतील पुस्तके सापडली:

सिग्मंड फ्रॉइड विचारदर्शन
लेखक: साधना कामत
https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5473337892467400933?BookN...

स्वप्नमीमांसा
लेखक: जीवन आनंदगावकर, डॉ. कमलेश सोमण
https://www.bookganga.com/eBooks/Books/details/4654076198875656104?BookN...

मानसोपचार पद्धतीचे आद्य प्रणेते - सिग्मंड फ्रॉइड
लेखक: विश्वास पाटील
https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5690892111003059052?BookN...

प्रकाश घाटपांडे सर,
डॉ. उल्हास लुकतुकेंना जवळून पाहिलं आहे, बऱ्याच वर्षांपूर्वी, आता खूप वय झालं असेल त्यांचं. त्यांचं सुरेख हस्ताक्षर कायम लक्षात राहील, आणि विशेष म्हणजे ते मराठीत लिहितात!
(हल्ली फार्मसीचे विद्यार्थी, डॉक्टरांचं लिपी वाचता यावी म्हणून वेगळा अभ्यास करतात, असं ऐकलं आहे!)

स्टोरीटेलवरील डॉ. लुकतुकेंची मालिका आणि डॉ. प्रदीप पाटील यांचं यूट्यूबवरील मार्गदर्शन नक्की ऐकेल.

धन्यवाद_/\_

तर्कवादी's picture

7 Sep 2022 - 11:43 pm | तर्कवादी

धन्यवाद श्रीगणेशा
आणि तो फक्त तर्कवादी म्हणा मला "सर" नको :)