अलक - वारी

Primary tabs

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
2 Jul 2022 - 9:15 am

अलक १

भरपूर कष्टातून वर आलेला तो. लक्ष्मी आणि सरवस्ती दोघींचा वरदहस्त असलेला तो तरीही जरा अस्वस्थच असायचा. पाहिजे ते समाधान मिळेना. शेवटी कंटाळून मानसोपचार तज्ञ् गाठला. सगळं गाऱ्हाणं ऐकून झाल्यावर तज्ज्ञांनी हसून त्याला वारीला जायचा सल्ला दिला. त्याचा विश्वास बसेना तरीही त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी तो निघाला. त्या लाखो लोकांमधला एक झाला. त्यांच्यासारखाच पेहराव, त्यांच्यातच मिळून मिसळून वागताना तो स्वतःला विसरला. त्यांच्याबरोबर भजन म्हणत, अभंग गात त्यानेहि ताल धरला. इतर वारकर्यांबरोबर टाळ वाजवून नाचताना तो भान हरपला आणि मग त्याला जाणवलं. हेच तर हवं होत आपल्याला. हीच अशीच तंद्री त्याची लहानपणी गावातल्या देवळात उत्सवात लागायची. तेव्हा मन कोर होत त्यामुळे तल्लीन होणं सहज जमलं. नंतर मात्र यशस्वी होण्याच्या नादात ते गाव, तो उत्सव सगळं पाठीचा पडलं. आज या वारीत त्याला हरवलेलं गवसलं आणि परत एकदा मोकळ्या मनाने तो पांडुरंगाच्या चरणी लीन झाला.

अलक २

दरवर्षी प्रमाणे वारीला निघालेले ते दोघे. पांडुरंगावर अपार श्रद्धा. मागच्या महापुरात होत्याच नव्हतं झालं. तरीही त्यांची श्रद्धा जराही कमी नाही झाली. पांडुरंग करतो ते भल्यासाठी असच कायम मानत आले. मधेच जोरदार पाऊस आला नि मागच्या आठवणी जाग्या झाल्या. अभंग म्हणता म्हणता कधी डोळे पाझरू लागले आणि पावसाच्या पाण्यात ते खारट अश्रू कधी मिसळले कळलं देखील नाही. एकादशीला विठुरायाचं दर्शन घेऊन निर्लेप मनाने काहीही न मागता दोघ परत आली. घर उघडलं तर दारात एक पत्र येऊन पडलेलं. उशिरा का होईना सरकारने दखल घेऊन त्यांना नुकसान भरपाई चा चेक पाठवला होता. परत एकदा त्यांचे डोळे भरून आले आणि आपसूक हात जोडले गेले. यावेळी मात्र हे अश्रू आनंदाचे होते.

-धनश्रीनिवास

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

मधुका's picture

4 Jul 2022 - 3:18 pm | मधुका

सुन्दर झाल्या आहेत दोन्ही कथा!

श्वेता व्यास's picture

4 Jul 2022 - 4:10 pm | श्वेता व्यास

दोन्ही कथा आवडल्या, तुमच्या अलक नेहमीच आवडतात.

Nitin Palkar's picture

4 Jul 2022 - 7:35 pm | Nitin Palkar

दोन्ही अलक सुंदर.