अदूला सातव्या वाढदिवसाचं पत्र: असंख्य प्रश्न आणि अमर्याद स्वप्नं

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
17 Sep 2021 - 2:14 pm

१. एक प्रेमपत्र

२. दुसरं प्रेमपत्र: सूर निरागस हो. . .

३. लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस!!!!

४. मुलीच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: गोष्ट आणि फगड्या

५. मुलीच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: परीकथेच्या सवे

६. अदूला सहाव्या वाढदिवसाचं पत्र- औ पाबई!

नमस्कार. आज अदूचा सातवा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मनात आलेले विचार आपल्यासोबत शेअर करत आहे. धन्यवाद.

अदूला सातव्या वाढदिवसाचं पत्र: असंख्य प्रश्न आणि अमर्याद स्वप्नं

१७.०९.२०२१

प्रिय अदू!

आज तुझा सातवा वाढदिवस!!!! चक्क सात वर्षांची झालीस तू! एका बाजूला विश्वास बसत नाही आणि दुस-या बाजूला आनंद होतो की, अजूनही तू छोटीच आहेस! आणि मनामध्ये खात्री‌ वाटते की, तू मोठी होशील तेव्हाही अशी छोटीच राहणार आहेस आणि मी तुझा छोता छोता निन्नूच राहणार आहे! अर्थात् तुझी नावं खूप बदलतील, तू मलाही वेगवेगळी नावं ठेवत जाशीलच. पण ही गंमत सुरू राहील. तुझा वाढदिवस हा अशा वर्षभरातल्या सगळ्या गमतींना आठवण्याचा दिवस! आणि आता मला ह्या गोष्टीचा आनंद होतो की, तू हे पत्र स्वत: वाचू शकशील! इतकी मोठी तू झाली आहेस! आणि हो, आता मला तुला कडेवरही घेता येत नाही (म्हणजे कडेवर ठेवता येत नाही)! गेल्या वर्षातला हा एक फरक आहे! ह्या वर्षापासूनच मला तुला कडेवर घेणं कठीण होत गेलं! तुला कडेवर घेऊन मी वॉक करायचो पाहा, ते आता करूच शकत नाही! पण अजूनही हट्टाने तू मात्र मला घोडा करायला लावतेस. आणि तेही इतक्या उत्साहाने की, जणू पहिल्यांदाच करते आहेस!

अदू! गेल्या वर्षातल्या अनेक कडू- गोड आठवणी आहेत. सगळे प्रसंग आजही डोळ्यांपुढे उभे राहतात. पण त्या सगळ्यांमध्ये सतत जाणवते तुझी आनंदाची व समाधानी राहण्याची वृत्ती. तुला गेल्या वर्षीच्या पत्रात बोललो होतो पाहा तो कोरोना राक्षस अजूनही त्रास देतो आहे. आणि त्यामुळेच तुला शाळेत जाता येत नाही, बाहेर कुठे जास्त फिरता येत नाही. इतरही अनेक गोष्टी करता येत नाहीत. पण मी सतत बघतो की, तुझा स्वर तक्रारीचा अजिबात नसतो. किती तरी वेळेस मी हे बघितलं आहे. तुझ्या मनात खूप गोष्टी असतात, तुला खूsssssप काही करायचं असतं. पण हे सगळं असूनही तू कधीच नाराज होत नाहीस. इतक्या गोष्टी करता आल्या नाही तरी जे शक्य आहे, जे समोर आहे, जे आत्ता करता येण्यासारखं आहे ते तू आनंदाने करतेस. एखाद्या मरमेड किंवा क्राफ्ट पेपरसाठी मागे लागतेस, पण घरात जे आहे तेही लगेच आनंदाने खेळत बसतेस. तुझं पहिल्या वाढदिवसाचं नाव तू अजूनही सार्थ करते आहेस- शुद्ध प्रसन्नता! तुझी ही प्रसन्नता पाहताना आनंदाश्रू येतात डोळ्यांमध्ये.

अदू! तुझी नावं आठवतात वेगवेगळी! स्वरा, छकुली, पिकू, टमडी, गोष्ट, साखर, गोड! आणि मागच्या वाढदिवसाच्या वेळेस तर तू औ पाबई नाव घेतलं होतंस! आणि त्यानंतर मात्र तुझं नवीन नाव पडलं- ब्याऊ! कारण तू अगदी आवडीने आणि हुबेहूब छोट्या ब्याऊसारखा आवाज काढायला लागलीस आणि अजूनही काढतेस! नवीन माणसाने ऐकला तर त्याला वाटतं छोटं पिल्लूच आत आलंय की काय! आणि जे नाव तुझं होतं, ते आमचंही होत! जसं तू पाबई असताना आईला बाबई म्हणत होतीस, तसं मला तू ब्याऊ म्हणतेस! मागच्या वाढदिवसाच्या वेळेस मी आणि सूरज मामा तुला कॅटरपिलर (अळी) गिफ्ट म्हणून आणण्यावरून चिडवत होतो! तू इतकी गोड होतीस की, शेवटी तू म्हणाली होतीस की, ठीक आहे, आणा अळी, पण सॉफ्ट टॉयमधली आणा! आणि तीच गंमत ह्याही वाढदिवसाच्या वेळेस झाली! पण ह्यावेळी तुला आम्ही चिडवतोय हे कळत होतं! आणि तुला ते आवडतही होतं! हो की नाही! आणि तू चिडण्याची एक्टींगही करत होतीस!

भल मोठ सक्षस!

तर ब्याऊ! मला आठवतं गेल्या वाढदिवसाच्या वेळेसच तुला लिहीणं आवडत होतं. छोटी गोष्टींची पुस्तकं तू वाचायला सुरुवात केली होतीस. माझं मागचं पत्रही तू थोडं वाचलंस! तू ते पत्र वाचलंस तेव्हा मला काय आनंद झाला! छोटी छोटी वाक्य तू वाचायला व लिहायला शिकलीस त्याचा आनंद अजूनही होतोय मला. त्यामध्येही तू खूप गमती करायचीस. वाचताना तुझं चुकीचं वाचलं जायचं. मग तुला हसू यायचं आणि तू ते बरोबर वाचायला शिकायचीस. तू गमतीने मला भला मोठा राक्षस असं म्हणतेस पाहा! हे नाव काही तू मला दिलेलं नाहीस, आजूने दिलेलं आहे! पण तुलाही ते आवडतं. आणि तू लिहीताना ते भल मोठ सक्षस असं लिहीलं होतंस! आणि तुलाच किती हसू आलं होतं! एक सेकंद तू रागवतेस, थोडी ओरडतेस एहॅ एहॅ करतेस! आणि मग हसतेस लगेच! आणि तसंच एक वाक्य एका गोष्टीच्या पुस्तकात वाचून तू असं लिहीलं होतंस- मोज धवायली टक! आपण एकदा तर तसंच बोललो होतो! अठवत न तुल कस लहत हती तू! किती गंमत आणि आनंदाचा पाऊस!

टीचर, प्लीज सेंड द होमवर्क

मागच्या वेळेस तू मला सारखी विचारायचीस निन्नू शाळा कधी सुरू होणार रे! आणि मी बिचारा तुला दर वेळी तेच उत्तर द्यायचो की, अजून दोन- तीन महिन्यांनी किंवा दिवाळीनंतर! तुझ्या १७ सप्टेंबरपासून मात्र कोरोनाचे आकडे कमी व्हायला सुरुवात झाली. तू विचारायचीस रोज की, आज किती पॉझिटीव्ह, किती रिकव्हर? आणि तुला त्या कोरोनाचा इतका राग की, तू स्वत: छोटे छोटे स्टिकर्स बनवले की, कोरोनापासून कसं वाचायचं! आणि ते दरवाजावर चिटकवले. एकदा तर तुझ्या बल्लूला मास्क लावून तू एक व्हिडिओसुद्धा बनवला होतास. कोरानावर तुझा खूप राग आणि खूप खदखद तुझ्या मनात होती. पण तरी दुस-या मिनिटाला तू ते सोडून द्यायचीस व दुसरं काही करायचीस. मागच्या वर्षी आजोबांच्या ५० पेक्षा जास्त गोष्टी तू ऐकल्या. आधी तू ज्या गोष्टी ऐकायचीस त्या गोष्टी हळु हळु मागे पडत गेल्या! पण त्या गोष्टी व तुझ्यासाठी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी माझ्या मनात रेकॉर्डेड आहेत! तुझ्यासोबतचा एक एक क्षण असा आठवतो आणि डोळे ओले करून जातो. अगदी आजही तू तुझ्या ऑनलाईन क्लासमध्ये तुझ्या टीचरना सांगताना दिसतेस- टीचर, प्लीज सेंड द होमवर्क द ग्रूप! दर वेळेस तू टीचरला आठवण करून द्यायचीस!

कोरोनाने आपल्याला खूप त्रास दिला. पण तरीही आपण काही गोष्टी एंजॉय करू शकलो. त्यातली एक गोष्ट म्हणजे परभणीची दिवाळी. आजोबांच्या गोष्टीतल्या तीन बहिणी दिवाळीला परभणीला एकत्र आल्या! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर हे माझ्यासाठी Dream come true होतं! वाटतच नव्हतं हे शक्य होईल. ते दहा दिवस तुम्ही खूप एंजॉय केले. जेव्हा तुला आत्मजा- अनन्या भेटायच्या तेव्हा तू एखाद्या सेलिब्रिटीसारखी होऊन जायचीस! माझ्याशी बोलायचीही नाहीस! आणि मी तुझ्याजवळ जाऊन तुला पकडलं तर लगेच आतूला बोलवायचीस, आतू वाचव मला, हा भला मोठा राक्षस मला पकडतोय! इतकी तुझी बहिणींसोबत गट्टी! परभणीला तुम्ही मस्त खेळलात. चाफ्याच्या झाडावर चढलात, अंगणात मस्त किल्ला केलात! आजूबाजूला खूप फिरलात. अंगणात खूप खेळलात, भिंत रंगवली! आजी - आजोबांकडून लाड करून घेतले. तुम्ही सोबत अभ्यासही करायचा आणि गाणी म्हणायचा! मला आठवतंय 'अभयारण्ये के के सन्ति' हे गाणं तू आजूकडून शिकलीस. अनन्याने किती सुंदर गाणे- संगीत- नृत्याचा कार्यक्रम भरवला होता. तिचं गाणं, तिची शिट्टी आणि तिचा उत्साहही जबरदस्त! तुझा नेमका मूड नव्हता म्हणून तू बहुतेक त्यावेळी गाणं गायली नाहीस.

रागाचा पहिला सा

ब्याऊ! शाळा सुरू होत नसल्यामुळे आपण घरातच वेगवेगळे खेळ सुरू केले. ते खेळताना कधी कधी नीट जमलं नाही तुला खूप राग यायचा. आणि मग तू प्रॅक्टीसच करायची नाहीस आणि त्यामुळे तुला ते जमायचं नाही. तुझा असा राग किंवा गालाचा फुग्गा येतो तेव्हाही मी तो एंजॉय करतो! कधी कधी तुझा राग थोडा अजून वाढवतो, तुला चिडवतो! जेव्हा तुझ्या रागाच्या सुराचा पहिला सा लागतो आणि मग जेव्हा तू भोकाड पसरण्याच्या जवळ येतेस, तेव्हा मी तुला थांबवतो आणि विचारतो की, अच्छा, तुला पसरायचं आहे का? पण अदू, इथे तर आधीच पसारा आहे, तू हॉलमध्ये जाऊन पसरतेस का? तेव्हा मग तुझा राग हळु हळु फुस्स होऊन जातो! आणि मग तू ओरडून मला म्हणतेस, मला तुझी चिड येतेय! आणि मग माझ्या अंगावर धावून येतेस! आणि दुस-या सेकंदाला हसतेस लगेच!

अदू, ब्याऊ, टमकडी, गोड, साखर, गोष्ट, शेंडी! तुझ्या शेंडीवरून आठवलं! तुझ्या शेंड्या आता खूप खूप मोठ्या आहेत! आणि त्या तुझ्या नाही तर माझ्याच शेंड्या आहेत! असं बोललो की, कशी रागवतेस आणि हसतेस! मी जेव्हा तुझी शेंडी खायला येतो तेव्हा आईला हाक मारून म्हणतेस, ऑई, बघ ना, हा माझी शेंडी खातोय! आपण जेव्हा लांब असतो, तेव्हा फोनवर बोलताना माझा पहिला प्रश्न हाच असतो की, तुझं जंगल कसं आहे, मोकळं आहे का बांधलंय! शेंड्या किती आहेत! मग तू सांगतेस की एकच आहे किंवा अंबाडा आहे! अशी गंमत! गेल्या वर्षातली अजून एक आठवण म्हणजे आपण दर रविवारी एक असं करत हॅरी पॉटरचे पहिले तीन भाग बघितले. ते तुला तसे समजायला कठीण होते, पण काही काही गोष्टी एंजॉय केल्यास! त्यातल्या प्राण्यांवरून आपण खूप हसलो पाहा! तू एकदा तर फँग कुत्रा आणि रॉनचं चित्र काढलं होतंस! नंतर आपण लायन किंग आणि लाईफ ऑफ पाय हेही पिक्चर बघितले! तुला ते आवडले होते आणि तू तितकी घाबरलीही नव्हतीस! आपण 'द रिबेलस फ्लॉवर' हा पिक्चरही सोबत बघितला. ओशोंच्या आयुष्यावरचा तो पिक्चर मी बघत होतो आणि तुलाही आवडला, तू पूर्ण बघितलास! त्यातल्या मग्गा बाबांसारखे हातवारे तू करायचीस आणि हसायचीस!

अदू, तू जेव्हा वाचायला व लिहायला लागलीस तेव्हा सुरुवातीला तू चुका करायला घाबरायचीस. किंवा चुकलं‌ तर तू तिथेच थांबायचीस, कंटाळा आला म्हणून पुढे जायची नाहीस. पण हळु हळु तू जसं वाचत गेलीस आणि लिहीत गेलीस तसं तुला ते चांगलं जमायला लागलं. आणि आता तर तू चुकण्याला अजिबातच घाबरत नाहीस. कारण तुला माहिती आहे जिथे तू चुकतेस, तिथे काही तरी शिकतेससुद्धा. आणि असं तू खूप काही शिकत जाते आहेस. लवकरच तुला मोठी पुस्तकं वाचता येतील.

प्रसन्नता

ह्या वर्षीची अजून एक आठवण म्हणजे आपण बदलापूरला फार्म हाऊसवर स्मिता आत्या व प्रसन्नकडे गेलो होतो ती आहे. तिथे बघ तुला किती नवीन फ्रेंडस मिळाले. प्रसन्न भेटला, रुद्र भेटला, बेबो भेटली. तिथल्या झोक्यावर झोका घेताना तू मला बोलली होतीस, निन्नू तू धीट का रे होत नाहीस, जरा धीट हो! तिथे तू खूप मजा केलीस पाहा. खूप खेळलीस. अगदी स्विमिंग पूलामध्ये पडलीसुद्धा आणि लगेच एका हाताने ओढून तुला मी वर घेतलं. आणि नंतर तू अजिबात घाबरली नाहीस. तिथून येताना मात्र तुला खूप त्रास झाला. कारण इतक्या दिवसांनी तुला नवीन गोष्टी मिळाल्या होत्या, सगळे भेटले होते आणि खूप मजा करता आली होती. तेव्हा मला जाणवलं बाकी सगळ्यांपेक्षा कोरोनाने मुलांना किती त्रास दिला आहे. मुलांमध्ये जी ऊर्जा असते, जी स्फूर्ती असते, ती सगळीच कोरोनाने कोमेजून टाकली. कोरोना कमी झालेला असताना तुझ्यासाठी सायकल आणली. ती खरं तर गेल्या वाढदिवसाची भेट होती, पण तेव्हा कोरोना जास्त होता. त्यामुळे ती जरा उशीरा आणावी लागली. सायकल चालवतानाही तू सुरुवातीला घाबरत होतीस. पण हळु हळु तुला जमत गेलं. आणि मी तुझ्यासोबत असताना अचानक तुझ्या सायकलच्या मध्ये यायचो व तुझी वाट अडवायचो! कारण असेही काही लोक असतात ना जे एकदम त्रास देतात. आपल्याला तीसुद्धा सवय असली पाहिजे. अशी एक एक गंंमत तू करत गेलीस. जेव्हा जे मिळेल ते एंजॉय करत गेलीस. आणि जे मिळत नव्हतं त्याबद्दल एक गोड तक्रार करायचीस, थोडसं ओरडायचीस आणि परत आनंदी व्हायचीस. तुझी ही प्रसन्नता सगळ्यांना खूप खूप प्रसन्न करून जाते!

'मी घाबरेन असं का वाटलं तुला?'

ह्या वर्षी पण दु:खाचंही सावट होतं. कोरोना राक्षस परत मोठा होत होता. आणि परत एकदा त्याने सगळ्यांना हतबल केलं. सगळ्या गोष्टी परत बंद करून टाकल्या. आणि महाभारतातल्या त्या गोष्टीप्रमाणे हा राक्षस प्रत्येकाच्या घरी जाऊ लागला आणि प्रत्येक घरातून त्याने एका जणाला त्रास दिला. ते दिवस सगळ्यांसाठी फार बिकट होते. किती तरी वेळेस तू विचारायचीस की, आमच्याच लहानपणी हे का होतंय? आमचीच शाळा का बंद आहे. नंतर नंतर तर कोरोनाचा त्रास आपल्या घरापाशी आला. आणि नाना कोरोनामुळे गेले. त्या दिवसांमध्ये तू मात्र तशीच प्रसन्न आणि आनंदी होतीस. नाना गेले हे मलाच तुला सांगावं लागलं. खूप तयारी‌ करून मी तुला हळु हळु सांगितलं. पण तू इतकी शांत आणि खंबीर होतीस की, बोललीस मला, हे कालच का नाही सांगितलं? मी घाबरेन असं का वाटलं तुला! तुला खूप वाईट वाटलं, पण तू रडलीसुद्धा नाहीस. इतकी तू शांत, स्थिर आणि प्रसन्न. तेव्हाही दहा दिवस आपण दोघेच सोबत होतो. मी जे बनवत होतो, ते तू आनंदाने खात होतीस. तुझा आनंद हा तुझा स्वभाव आहे, त्यामुळे तुला तो बाहेर फारसा शोधावाच लागत नाही. जी काही खेळणी असतील, जे काही ड्रॉइंग किंवा कलरिंग असेल, ते तू खेळत बसतेस. आणि तेही तास अन् तास! एक प्रकारे हे तुझं ध्यानच असतं. बाकी सर्व विसरून तू तेच करत बसतेस. आणि कधी कधी चिडण्याचं व रडण्याचंही ध्यान करतेस!

'आम्ही गळ्यात गळे मिळवुन रे'

कोरोना राक्षसाच्या त्रासाच्या काळात आपण घरी राहून करण्यासारख्या काही गोष्टी शोधल्या. त्यामध्ये गौरी काकूने आपल्याला चिकू पिकूच्या गोष्टींची माहिती दिली. आणि त्या गोष्टी तुला एकदम आवडल्या. एकदम तुझ्या लाडक्या होऊन गेल्या. मग प्रत्येक वेळेस तुझी गोष्टीची फर्माईश सुरू झाली. आणि काही गोष्टी तर तुला इतक्या आवडल्या की, तू त्या स्वत:च्या आवाजात सांगायचीस! त्या गोष्टींची गमतीदार नक्कल करायचीस. काही गोष्टी आपण मिळून बनवल्याही. त्या गोष्टीत तू मस्त आवाज काढलेस, रागवण्याचे व खोटं रडण्याचेही आवाज काढलेस! कोरोना जेव्हा थोडा कमी झाला तेव्हा आपण अनन्या आत्मजाकडे डिएसकेला गेलो. ते पंधरा दिवसही अविस्मरणीय झाले! इतक्या महिन्यांची कसर तुम्ही तिघी बहिणींनी भरून काढली. तिथे तू खूप छान राहिलीस. तुझी जी कामं तुला जमत होती ती तू स्वत: करायचीस. स्वत:चा टॉवेल आंघोळीला घेऊन जायचीस, परत धुवायला टाकायचीस, तुझे कपडे, तुझं सामान नीट ठेवायचीस. पसारा आवरून ठेवायचीस. बाकीचे कोणी काही करत असतील तर त्यांना मदत करायचीस. तुझ्या अंगातली शक्ती बघून अनन्याही दमत होती! आणि 'आ अ आ आ आ' करून सतत "चाफा बोले ना" गाणं गुणगुणणारी आजू तर सतत तुझ्या 'आम्ही गळ्यात गळे मिळवुन रे' होती! दोघी बहिणींसोबत तुझं खेळणं- मस्ती- अभ्यास छान झाला. तिथे झालेला एक किस्सा आठवतो! मी सारखा तुझ्या शेंड्यांच्या मागे होतो! तेव्हा एकदा गमतीने गौरी काकू म्हणाली की, तुला तिच्या शेंड्या खायच्या आहेत का, ठीक आहे, मी फोडणी देते आणि जेवणात वाढते. चालेल? तेव्हा तू जोराने "छी!!!!!" म्हणाली आणि हसलीस! आजूचं ऐकून ऐकून तू 'पानी सा निर्मल हो मेरा मन' गाणं शिकलीस! आजूमुळे ते आपलं पाठच होऊन गेलं! दोघी बहिणींसोबत तू इतकी आनंदात होतीस की तिथून तुला निघायचं नव्हतं. कसबसं मनाची तयारी करून तू निघालीस. पण आपल्या घरी आल्या आल्या जे रडू आलं तुला ते थांबतच नव्हतं. इतका तुला त्रास होत होता. पुढे अनेक दिवस मग व्हिडिओ कॉल, फोन आणि पत्रापत्री सुरू राहिली!

अदू, दुस-या वर्षी तुला ऑनलाईन शाळेचा कंटाळा आला. आणि ते स्वाभाविक होतं. कोरोना राक्षसाने सगळ्यांची फार मोठी कसोटी घेतली आणि मुलांचा तर फारच छळ केला. त्याची फार थोडी कल्पना मोठ्यांना येऊ शकते. मुलांना त्यांच्या वयाच्या मुलांच्याच सोबतीची खरी गरज असते. आणि कोरोनामुळे नेमकं तेच शक्य होत नव्हतं. आणि बाकीचे सगळे पर्याय हे खूपच अपुरे ठरतात. पण आपल्याला परत परभणीला जाता आलं आणि थोडे दिवस दोघी बहिणींसोबत राहता आलं! तू येणार म्हणून त्यांनी किती उत्साहाने तयारी केली होती! तीन दिवस परत तुमचे सगळे खेळ आणि जल्लोष सुरू होता. आणि आजी- आजोबा परभणी सोडत असल्यामुळे परत परभणीला सारखं यायला जमणार नाही म्हणून तर तुम्ही खूपच एंजॉय केलं. तिघी बहिणी बाहेर जुईकडे एकट्या गेला. तीन दिवस नुसता दंगा केला. आणि परत एकदा हॅरी पॉटरही तिघींनी सोबत बघितला! तेव्हा तू बोललेलं एक वाक्य लक्षात आहे- ती झिपरी शिक्षिका अदिती आत्यासारखी दिसते!! इतकी धमाल केलीत तुम्ही तिघींनी. अनन्या व आजू परत गेल्यावरही तुला थांबावसं वाटलं. आणि आपण नंतरही पंधरा दिवस तिथे थांबलो! दोन वर्षापूर्वी तू चार वर्षाची असताना थांबलो होतो तसेच! फक्त तेव्हापेक्षा ह्यावेळी तू आणखी जास्त गमती केल्या. स्वानंद, जुई आणि श्रीजासोबत मस्त खेळलीस.

चिठ्ठीचं विमान

ए ब्याऊ! माझ्यासोबत तू मस्त राहिलीस. खूप मस्त खेळायचीस. आणि माझ्याशी कसं‌ गोड बोलायचीस! कोरोनाचे दोनशे तुकडे केले, त्याचे परत शंभर तुकडे केले तर त्याहूनही छोता छोता तू माझा ब्याऊ आहेस म्हणायचीस! आणि मी तुझी शेंडी खायला आलो की खोटी खोटी घाबरून एकदम पळून जायचीस! एकदा तर मी तुला पकडलं होतं तेव्हा तू चक्क टॉम अँड जेरीतल्या आवाजात म्हणत होती, This Tom is beating me, help me, help me! तुझ्या आवाजांची गंमत तर आता सगळ्यांना माहिती आहे. पण तू खूप मूडी आहेस. कोणी म्हणेल तेव्हा असे आवाज काढत नाहीस! परभणीमध्ये आजीकडून तू गाणी शिकलीस. आपण परभणीत असताना दिवसभर सोबतच असायचो. तुझी नवीन शाळा ऑनलाईन तिथेच सुरू झाली. ते तुझे क्लासेस, होमवर्क, माझं काम हे सगळं करताना माझी चिडचिड व्हायची. आणि कधी कधी तू माझ्यावर रागवायचीसही! मागे एकदा बदलापूरच्या प्रसन्नने मला विचारलं होतं, की निरंजन मामा, मला खूप राग आलेला. राग आल्यावर मी काय करू रे! त्याने मला इतका मोठा बाउंसर टाकला होता. खूप विचार करून मी त्याला तेव्हा बोललो होतो की, राग आला तर मोठ्याने ओरड किंवा थोडा वेळ पळून ये. किंवा पाय आपट थोडा वेळ. पण अदू, तू मला आणखी नवीन एक पर्याय सांगितलास! नव्हे तू तो करून दाखवलास! जेव्हा जेव्हा तू माझ्यावर चिडतेस, तेव्हा तू एक छोटीशी चिठ्ठी लिहीतेस आणि त्याचं विमान करून माझ्या अंगावर फेकतेस! आणि ते लिहीताना तुझा एखादा चुकलेला शब्द मी तसाच्या तसा वाचला की, तुझ्या रागाचा फुग्गा फुस्स होतो आणि तुला हसू येतं!

"गाईन गीत सुरेल नवे"

प्रिय अदू! तू ज्या ज्या गोष्टी बघतेस, त्यातून खूप काही शिकत असतेस. कोण होणार करोडपती बघून तू मनानेच तसे गमतीदार प्रश्न आणि त्यांचे चार पर्यायही तयार केलेस! तुझी स्मरणशक्ती फोटोग्राफिकच आहे. बरोबर जुन्या गोष्टी तुला आठवतात. किंवा तुझ्या खेळण्यांमध्ये कोणतं कुठे ठेवलंय तुला बरोबर लक्षात असतं. आणि आता मला ह्या वर्षातली आणखी एक गोष्ट खूप आवडते. ती म्हणजे तू चुका दुरुस्त करायला तयार असतेस. आणि मी चूक जरी सांगत असलो तरी ते तुझ्या चांगल्यासाठी, हे तुला खूप छान समजलंय. त्या दिवशी तसंच झालं! तू मस्त 'हिच अमुची प्रार्थना' आणि 'चाफा बोले ना' गाणी रेकॉर्ड करत होतीस. खूप मन लावून करत होतीस. आणि केल्यावर मला दाखवत होतीस. मला गाण्यातलं काहीच कळत नाही! पण मी तुला शब्दांचे स्पष्ट उच्चार, चुकीचा शब्द असं काही सांगत होतो. किंवा जास्त आरामात म्हण असं सांगत होतो. तेव्हा तू एकदम म्हणालीस, हे तर तू त्या गाईन गीत सुरेल नवे सारखंच सांगतो आहेस! अशी मजा! अशा अनेक गोष्टी तू सतत करत असतेस. सतत काही ना काही शिकत असतेस. आत्ता अगदी काल परवा नानीने तुला लोकरीचं विणकाम शिकवायला सुरूवात केली आहे. तुझ्यामध्ये खूप शिकण्याची तयारी आहे. समंजसपणा आहे आणि त्याबरोबर तुझ्या निरागस मनाची तुझी अमर्याद स्वप्नंही आहेत. एकदा तू असंच स्वगत बोलत होतीस व ते मी बरोबर लिहून ठेवलं होतं (त्यात अगदी कॉलेज व बॉयफ्रेंडबद्दलही तू बोलली आहेस!!)-

असंख्य प्रश्न आणि अमर्याद स्वप्नं: निन्नू, मला सांग!

आज अदू इतके इतके प्रश्न विचारत होती! तिला आता इतक्या गोष्टी कळत आहेत आणि इतकं काही समजतं आहे की खूप मस्त बोलते आणि प्रश्न विचारते. खूपशा गोष्टी कार्टूनमध्ये बघते किंवा क्लासमध्ये ऐकते. त्यातून खूप खूप गमतीदार प्रश्न विचारते! आज तिचा हा असंख्य प्रश्नांचा आणि अमर्याद स्वप्नांचा सोहळा चालला होता! निन्नू, मला सांग पासून तिचे प्रश्न सुरू होतात! आणि हे प्रश्न विचारताना आणि इतकी लांबची पण इतकी मोठी स्वप्नं बघताना तिचे डोळे तेजाने दिपून जातात! तिच्या डोळ्यांमध्ये खूप मोठी चमक येते! इतकी ती त्या स्वप्नांमध्ये रंगून जाते!

काल खूप कल्पना करत होती की, मी २० वर्षांची होईन तेव्हा आपण बीचवर कँपिंग करायला जाऊ. मग काय काय सामान घ्यायचं, कोण कोण येणार, किती वेळ लागेल पोहचायला, ही माझी सॅक घेऊ का. नको, निन्नू, मी १३ वर्षांची होईन ना, तेव्हा जाऊ. मग तिथे मला टेंट लागेल, टॉर्च लागेल, आणि अजून काय काय! आज खूप वेळ हॉस्टेल हा विषयच घेऊन बोलत होती. कार्टूनमध्ये खूप काही बघते आणि त्यावरून मग तिला आणखी पाच गोष्टी सुचत जातात! आणि मग डोळे चमकायला लागतात! स्वप्नांमध्ये रंगून जाते आणि विचारांमध्ये बुडून जाते!

निन्नू, मला सांग, हॉस्टेल म्हणजे काय असतं रे? मग तिला तिच्या भाषेमध्ये सांगितलं. त्यावर लगेच परत पुढचे प्रश्न व पुढचे स्वप्नं सुरू! निन्नू, मला सांग, हॉस्टेलमध्ये काय काय असतं? माझ्या रूममध्ये काय काय असेल? तिथे शॉवर असेल का? केस विंचरायला असेल का? आणि मला जर एकटीलाच राहायचं असेल तर अशी सिंगल रूम मला मिळेल का? आणि प्रिंसिपलसुद्धा कॉलेजातच राहतात का? आणि जर कधी प्रिंसिपल व बाकी कोणीच कॉलेजमध्ये नसेल व सगळे सुट्टीवर गेले असतील आणि मी एकटीच असेन तर किती मजा येईल? कॉलेज पाच वर्षांचं असेल तर मला तिथे सगळं सामान- कपाटभर कपडे न्यावे लागतील ना? तू दिलेली कोणती वस्तू मी तिथे नेऊ बरं?

इतकं मजेशीर तिचं हे स्वगत सुरू होतं की बस्स! मग म्हणते कॉलेजच्या पहिल्या दिवशी माझे फ्रेंडस असतील का? आणि जेव्हा माझे मित्र- मैत्रिणी होतील, तेव्हा मी सगळ्यांशी नीट वागेन. कोणावरही रागवणार नाही व ओरडणार नाही. आणि कोणी ओरडलं तरी शांत राहीन. निन्नू, मला सांग तुझ्या हॉस्टेलवर काय गमती जमती होत्या? आणि निन्नू, मला एक टेलिस्कोप लागेल ना. मी विचारलं का, तर म्हणते लुनार एक्लिप्स! मी परत विचारतो की, काय? तर म्हणते अरे चंद्रग्रहण! ते बघायला टेलिस्कोप लागेल ना. हेसूद्धा कार्टूनमधूनच शिकली! त्या कार्टूनचीही कमाल आहे! मग माझ्या हॉस्टेलला कसं होतं हे विचारते.

आणि निन्नू, मी सायंस शिकताना एक पक्षी रोबोट बनवेन. जेव्हा माझा छोटा मोबाईल स्विच ऑफ झाला असेल ना, तर तो पक्षी रोबोट तुला पत्र घेऊन येईल. आणि तो अर्ध्या दिवसातच तुझ्याकडे येईल. मी आपल्या तिघांचा एक फोटो माझ्याकडे ठेवीन. निन्नू, मला सांग हॉस्टेलवर कँप करून रात्रभर जागता येतं का? शेकोटी पेटवून बार्बेक्यू करून गप्पा मारत?

आणि निन्नू, माझा मित्र असेल- जर माझा पार्टनर असेल तर आम्ही सोबत राहू शकतो का? आम्ही सोबत जेवायला जाऊ! आणि जरी त्याने माझी पिग्गीबँक तोडली, तरी मी त्याच्यावर रागवणार नाही. आणि माझी कधी चूक झाली तर सॉरी म्हणून टाकेन. आणि मला जेव्हा सुट्टी असेन तेव्हा मी इकडे येईन. मला कॉलेजला हॉस्टेलवरच पाठव. म्हणजे मला अगदी शांत शांत राहता येईल. मी तुला मॅसेज करेन मधून मधून. आणि तू मला लिहिलेल्या पत्रांचं पुस्तक माझ्याजवळ ठेवेन. इतकी इतकी मस्त बोलत होती! रेकॉर्ड करावं असं ते मनोगत सुरू होतं! तिला मग सांगितलं की, माझी शाळा व माझं कॉलेज वेगळं होतं. आजोबांच्या वेळेस अजून वेगळं होतं. तुझ्यावेळी अजून वेगळ्या गोष्टी असतील. आणि मला त्या सांगताही येणार नाहीत. आणि मी तुला आत्ता का सांगू? आत्ता तुला सांगितलं तर सरप्राईझ कसं राहील?

अशी ही अखंड प्रश्नांच्या लाटांची व स्वप्नांच्या मालिकेची मेजवानी! डोळ्यांमधली चमक आणि निरागसता अशी की, स्वप्नांनी स्वत:च प्रत्यक्षात यावं! अदू तू नेहमी अशीच राहावीस व तुझ्या सहवासात आम्हीही तुझ्यासारखेच होऊ, हीच एक इच्छा मनात येते आहे.

पानी सा निर्मल हो मेरा मन

पानी सा निर्मल हो मेरा मन
धरती सा अविचल हो मेरा मन

सूरज सा तेजस हो मेरा मन
चन्दा सा शीतल हो मेरा मन

धुन्दलाई आँखें जब, भरमाया चित्त है
समझे ना मन को जब सत्य या असत्य है

चंचलता मोह से दूर रहे
अपने ही द्रोह से दूर रहे

करूणामय निर्भय हो मेरा मन
पानी सा निर्मल हो मेरा मन

- तुझा निन निन टिन टिन हू हू किंवा निन्नू!

निरंजन वेलणकर 09422108376 niranjanwelankar@gmail.com www.niranjan-vichar.blogspot.com

व्यक्तिचित्रणविचार

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Sep 2021 - 3:45 pm | अमरेंद्र बाहुबली

मला वाटलं काहीतरी सॅरकॅस्म वाला लेख आहे का?? वाढदिवसानिमीत्त...:)

माझ्याच इमारतीमधली दोन मुलं - चौथी सहावीत होती मागच्या वर्षी. त्या अगोदर दोन वर्षे सायकली काढून सहालाच बाहेर पडायची. पावणे सातला परत येऊन लगेच शाळेत जायची. काय धमाल करायची. संध्याकाळी परत तासभर. आता चिडिचिप बसतात घरात. कोरोना जाईल तोपर्यंत बाल्य संपलेले असेल.

योगायोगाने बटाट्याच्या चाळीतलं राघूनाना सोमण यांची गोदीस पत्रे वाचतो आहे.

गॉडजिला's picture

17 Sep 2021 - 6:22 pm | गॉडजिला

आवडले.

मार्गी's picture

18 Sep 2021 - 4:01 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!!