गुरुवार गुंज आणि गुरू

Primary tabs

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
28 Jan 2021 - 8:33 pm

गुरुवार गुंज आणि गुरु.

वीज नव्हती, टिव्ही नव्हते ,त्या काळात गावात रात्री लवकरच शांतता होई.संध्याकाळी कामावरून घरी परतलेले लोक थकलेले असत.दिवे लागण झाली की थोड्याच वेळात जेवणखाणे आटोपून बहुतेक जण झोपी जात.रात्री आठ साडेआठचे सुमारास सगळीकडे चिडीचूप.कुठे पोथी,भजन वगैरे सुरू असे ते आणि दर गुरुवारी रात्री देशमुख गल्लीत 'दत्त पंचपदी 'होई,तेवढेच अपवाद.तिथे मात्र उशीरा पर्यंत जाग असे. ज्या घरी पंचपदी असे ते घर गॅसबत्तीने उजळून निघे. जेवणे आटोपून लोक रात्री आठचे दरम्यान पंचपदी साठी जमा होत. बैठकीत चौरंगावर दत्ताची तसबीर मांडून पुजा केली जाई. सर्वांचे कपाळी बुक्का लावला की, 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा'चे गजरात पंचपदी सुरू होई.म्हणावयाचे भजनांचा क्रम ठरलेला असे.माझे वडील तबल्यावर आणि गल्लीतील प्रभुकाका पेटीवर अशी साथसंगत असे.इतरांचे हाती टाळ .प्रत्येक
पदानंतर,'श्री गुरुदेव दत्त,योगानंद महाराज की जय 'असा घोष व्हायचा. वारकरी संप्रदायातील अभंग पण गायले जात.सगळेच गाणारे तयारीचे अन गोड गळ्याचे नसत.पण पारंपारिक,सुरेल चालीची भजने ,सामुहिक स्वरात म्हणताना शांत सात्विक भाव मनात जागे होत.पंचपदीचे समारोपा पुर्वी चुरमुरे, शेंगदाणे व खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून ,नारळ वाढवले जाई. पुढील गुरुवारचे यजमानपद घेण्यासाठी दत्ता समोर ठेवलेला नारळ उचलायचा असे.आरतीनंतर प्रसाद वाटला जाई.चुरमुर्यांना हमखास बुक्क्याचा वास असे.त्या प्रसादाची अन खोबर्याची चव अजूनही जीभेवरआहे.नंतर चहापान होई,तेव्हा मध्यरात्र झालेली असे.डोळ्यात झोप असली तरी पंचपदी तील पदे डोक्यात घोळत असत.
श्री.दत्ताचे अवतार मानले जाणारे,श्री वासुदेवानंद सरस्वतीं रचित या पंचपदीचे दत्त सांप्रदायात फार महत्त्व. मुळचे गुजरात मधील श्री.योगानंद सरस्वती, हे श्री.वासुदेवानंदाचे शिष्य.मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील गुंज हे छोटे गाव ,ही त्यांची कर्मभुमी तिथे गोदावरीच्या काठी त्यांचे प्रेरणेने दत्त मंदीर उभे राहिले.
श्री.योगानंद स्वामींचे शिष्य आणि उत्तराधिकारी श्री.चिंतामणी महाराज.आडगावला श्री.चिंतामणी महाराजांचा शिष्य परिवार मोठा. महाराज व गुंज क्षेत्राविषयी
लोकांचे मनात फार श्रद्धा .
'गुंज क्षेत्र हे पवित्र पाथरी तालुक्यातले ।
गौतमी तटाक्यरम्य परभणी जिल्ह्यातले।
दत्त मंदीरासमोर घाट भव्य देखिला ।
नमन माझे परमहंस योगानंद स्वामीला।।'
कुण्या अनामिक भाविकाने रचलेला हा श्लोक, शाळकरी मुलाने लिहिला वाटावा ,असा असला तरी तो, गुंज क्षेत्राची भौगोलिक माहिती व वैशिष्ट्ये वाचकांपर्यंत पोहचविण्यात यशस्वी झाला आहे हे निश्चित.
फाल्गुन वद्य द्वादशीला श्री.योगानंद महाराजांचा पुण्यतिथी उत्सव गुंज येथे असतो.आडगाव ते गुंज अंतर,गाडीवाटेने सात कोस म्हणजे चवदा मैल किंवा वीस किलोमीटर.तेव्हा बसची सोय नव्हती.अनेकजण, विशेषतः गल्लीतल्या मुली पायी वारी करीत.आम्ही बैलगाडीने जायचो.तिथे पोहंचे पर्यंत दिवस कललेला असे.मंदिराचा कळस दुरून दिसला की, 'दिगंबरादिगंबरा' चा घोष सुरू होई .दक्षीण गंगा गोदावरीचे पात्र समोर दिसे.उन्हाळा असला तरी नदीत थोडेफार पाणी वाहत असे .झुळझुळत्या पाण्याखालील वाळूच्या स्पर्शाने पायाला गुदगुल्या होत.अनेक जण नदीत डुबकी मारून,आपले पदरी पुण्याची जोडणी करीत.नदी ओलांडून गेले की घाट चढून मंदीरात प्रवेश करायचा.तिथे भाविकांची दाटी असे. दत्त सांप्रदायात सोवळे फार कडक.आतल्या गाभार्यात फक्त पुजारी लोकांना प्रवेश.इतरांना बाहेरूनच दर्शन.मुर्तीचे दर्शन झाले की धन्य झाल्याचे भाव चेहर्यावरअसत.गाभार्यातसतत भजन,किर्तन ,पंचपदी सुरु असे.
खांबाला टेकून कुणी ध्यानमग्न,तर कुणी जपाची माळ ओढत बसलेलेदिसत.रात्री पालखीतून 'श्री'च्या पादुकांची मिरवणूक (छबीना) निघे.'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' चे घोषात,भाविक तल्लीन होऊन जात.
मंदिराला लागून घाट बांधलेला.तिथे उभे राहिले की छान देखावा दिसे.गोदावरीचे पात्र लोकांनी फुललेले.बैलगाड्या सुटलेल्या.वाळूत जत्रा भरलेली.नानाविविध दुकाने,हॉटेल,सर्कस,जादूचे खेळ,तमाशे ,मौत का कुवां,रहाटपाळणे,अजब नगरी,तंबूच तंबू.अजबनगरीत चित्रविचित्र
,अनैसर्गिक वाढ असलेले प्राणी,माणसे ;आपली विविध रुपे दाखवणारे जादूई आरसे भुलभुलैया,वगैरे चमत्कारिक गोष्टी असत.हे सारे पाहाण्याची
लोकांना फार उत्सुकता असे. लाउड स्पिकर वरून जोरजोरात जाहिरातसुरु असे."याल तर हसाल न याल तर फसाल" वगैरे.फोटो स्टुडिओ मधील ताजमहाल ,गेटवेचे प्रतिकृती समोर तसेच कार स्कुटर वर,हिरो हिरोईन चे कटआऊट समोर एकट्याने,जोडीने आणि,
असल्यास,मुलाबाळासह फोटो काढणे तर अनिवार्य. त्याशिवाय यात्रा पूर्ण होत नसे.टुरींग टॉकीज मधील सिनेमे हे तर जत्रेचे खास आकर्षण . तिथे जाहिरातीचा वेगळाच प्रकार.तंबू बाहेर सिनेमातील गाण्याचे रेकॉर्ड वर त्यातील कलाकारांचे वेशभुषेत कुणीतरी,नाच करून लोकांना आकर्षित करत असे.प्रेक्षकांची झुंबड उडे.सिनेमे हाऊसफुल्ल.अशी सगळी मजा पाहात फिरणे ही पण मोठी करमणूक असे. हवशे,नवशे,गवशे .गर्दीच गर्दी .
संध्याकाळपासून प्रसादाचे जेवण(भंडारा )सुरू होई.
नदीपात्रात,वाळूतच,पंगती उठत. प्रसाद घेऊन झाला की हौशी मंडळी करमणूक शोधायला मोकळे.मध्यरात्रीनंतर हळूहळू सगळीकडे शांतता होई.मंदिरात ही अन जत्रेतही.
एवढ्या रात्री गावी परतणे शक्य नसे .पाथरीचे चौधरी कुटुंबांची शेती आणि घरे तिथे आहेत.ते आमचे नातेवाईक.त्यांच्या घरी आमच्या मुक्कामाची सोय असे.आमच्या सारखे सुदैवी जे नसत;ते मंदिराबाहेर पटांगणात,नदी पात्रात, बैलगाड्यात,जमेल तशे, जमेल तिथे आडवे होत.सकाळी उठून आपापल्या गावी परत.काही हौशीमंडळी मात्र पुन्हा जत्रेत फेरफटका मारून खिसा पूर्णपणे मोकळा झाल्याशिवाय परतीची वाट धरत नसत.
उत्सवाचा मुख्य दिवस संपल्यावरही,पूढे तीन चार दिवस जत्रा सुरूच राही. हळूहळू लोकांचा ओघ कमी होउ लागे. तंबू रिकामे होउ लागत.तंबू उखडल्याच्या खुणा, फेकलेला कचरा,अन बीनकामाच्या वस्तू,इथे जत्रा होती ह्याची साक्ष देत.
पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी केव्हा तरी शेवटचा यात्रेला गेलो होतो .आता उत्सव होतो का?कसा होतो?जत्रा भरते का?माहिती नाही.पण तिथली गोदामाय आहे तेवढे पाणी पोटात घेऊन पूर्वीसारखीच वाहात असेल हे निश्चित. दत्त मंदीर अन घाटही आहे तिथेच असतील.पण बदलासह.काळाच्या ओघात बदल होणारच.आडगावही बदलले.गल्ली ही बदलली.किती तरी घरे बंद झाली.गुरुवारची सामुहिक पंचपदी केव्हाच बंद झाली.तेव्हाच्या कितीतरी गोष्टी अन कितीतरी लोकही केव्हाच भुतकाळात जमा झाले .पण मन अजूनही तिथेच घुटमळते.
श्री दत्तांनी चोवीस गुरू केले होते व प्रत्येकापासून वेगवेगळी शिकवण घेतली,असे श्रीमद्भागवताचे एकादश स्कंधात सांगितले आहे. त्यांनी आकाशाकडून अलिप्तता व सूर्यापासून अनासक्ती हे गुण घेतले.
भूतकाळ कितीही हवाहवासा वाटला तरी तो पुन्हा फिरून येणे नाही.जे आहे ते स्विकारणे भाग आहे. त्यासाठी अलिप्तता अनासक्ति हवी,हे समजण्यासाठी ही शिकवण उपयोगी पडावी.

नीलकंठ देशमुख

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

कंजूस's picture

28 Jan 2021 - 8:40 pm | कंजूस

लहानपणी मामाच्या गावी एखाद्या जत्रेला मोठी मुले जात. पण लहान मुलांना टाळत.

नीलकंठ देशमुख's picture

28 Jan 2021 - 11:14 pm | नीलकंठ देशमुख

असे बहुतेक सगळीकडे होत असे

nanaba's picture

28 Jan 2021 - 10:28 pm | nanaba

Chan lihiley.

नीलकंठ देशमुख's picture

28 Jan 2021 - 11:14 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

मुक्त विहारि's picture

29 Jan 2021 - 9:48 am | मुक्त विहारि

कोणे एके काळी, डोंबिवली येथे पण जत्रा लागायची... बालपणीचा काळ सुखाचा ....

लहानपणी जितकी जत्रा आवडायची, तितकी आता आवडत नाही...

नीलकंठ देशमुख's picture

29 Jan 2021 - 11:12 am | नीलकंठ देशमुख

त्या काळात करमणूकीची साधने कमी होती.
कॉम्प्युटर इंटरनेट आल्यापासून सगळे बदलले आहे. घरीच सगळे समोर दिसते. आता जत्रा कशाला हवी?

मुक्त विहारि's picture

29 Jan 2021 - 11:47 am | मुक्त विहारि

गावोगावी जत्रा हवीच, कारण....

खेडेगावात, आर्थिक उलाढाल होते ...

काही कुटुंबे, ह्या कष्टमय जीवनावरच जगतात...

नीलकंठ देशमुख's picture

29 Jan 2021 - 2:03 pm | नीलकंठ देशमुख

जत्रा हवी.
आपले मताशी सहमत आहे.
आता लोकांना विशेषतः नव्या पिढीला करमणूकीचे इतर साधने असल्याने जत्रा कशाला हवी
असे वाटते,असे मला म्हणायचे आहे

मुक्त विहारि's picture

29 Jan 2021 - 6:08 pm | मुक्त विहारि

काही गोष्टी, लहानपणीच करणे, योग्य असते.

Rajesh188's picture

18 Feb 2021 - 12:19 am | Rajesh188

मस्त लिहले आहे.
दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण लिखाण .

नीलकंठ देशमुख's picture

18 Feb 2021 - 8:53 am | नीलकंठ देशमुख

प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.