राजयोग-२१

Primary tabs

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
17 Jul 2020 - 11:35 am

राजयोग - २०

***

बिल्वन परत येईपर्यंत राजाने कुकी जमातीच्या सैनिकांना परत जायला सांगितलं होतं. त्यांनी राज्यात मनमानी करायला सुरुवात केली होती. सैनिकांच्या टोळ्या विभागून टाकल्या होत्या. युद्धाची काहीही तयारी केली नव्हती.बिल्वनने परत येताच राजाला अथपासून इतिपर्यंत संपूर्ण प्रसंगाचे वर्णन केले.

राजा म्हणाला, “ठीक आहे ठाकूर, मी आता निघतो.राज्य, धन हे सर्व नक्षत्रसाठी आहे.”

बिल्वन म्हणाला, “असहाय्य लोकांना कुणा दुसऱ्याच्या हाती सोपवून तुम्ही पळून जात आहात. केवळ या एका विचाराने मी तुम्हाला प्रसन्न चित्ताने निरोप देऊ शकत नाही, महाराज! सावत्र आईच्या हाती बाळाला सोपवून आईने निश्चिन्त व्हावं, अशी कल्पना करणं कुणालाही शक्य आहे काय?”

राजा म्हणाला, “ठाकूर, तुमचे शब्द तीरासारखे टोचतात माझ्या हृदयाला. मला क्षमा करा. आता मला अजून काही सांगू नका. माझं मन वळवण्याचा असा प्रयत्न करू नका. तुम्हाला माहिती आहे ठाकूर, मी रक्तपात न करण्याची मनोमन प्रतिज्ञा केली आहे, ती प्रतिज्ञा मी मोडू शकत नाही.”

बिल्वन म्हणाला, “महाराज, मग आता काय करायचा विचार आहे तुमचा?”

राजा म्हणाला, “तुम्हाला माझ्या मनातलं सांगायला हरकत नाही. मी ध्रुवला बरोबर घेऊन वनात जाईन. ठाकूर, माझं खूप काही जगायचं राहून गेलं आहे. जे जे मनात ठरवलं होतं, ते काहीच करू शकलो नाही. आता जेवढं आयुष्य गेलं, ते काही परत मिळून मला नवी सुरुवात तर करता येणार नाही. ठाकूर, मला वाटतं, भाग्य आपल्याला सर्वांना धनुष्यातून निघणाऱ्या बाणासारखं सोडून देतं. आपल्या लक्ष्यापासून आपण किंचितही इकडे-तिकडे झालो तर हजारो वेळा प्रयत्न करूनही पुन्हा त्या लक्ष्याकडे येऊ शकत नाही. मी जिथं जन्मताच माझ्या लक्ष्यापासून दूर गेलोय, तर आता या अंतिम क्षणांमध्ये मला ते कसं सापडेल? ज्याचा विचार करतो, ते घडत नाही. आत्मरक्षा करण्याची वेळ होती तेव्हा जाग आली नाही, आता बुडत चाललो आहे तर मी जागा झालो. समुद्रात बुडत असणारे लोक जसा एखाद्या ओंडक्याचा आधार शोधत असतात, तसा आधार मी ध्रुवमध्ये शोधतो आहे. आता ध्रुवमध्येच स्वतःला शोधून मी त्याच्याच रूपात पुनर्जन्म घेईन. एखाद्या रोपाला वाढवावं, तसं मी पालन पोषण करून ध्रुव निर्माण करेन. त्याला घडवता घडवता कणाकणाने मीही घडत जाईन. माझ्या मनुष्य जन्माचे सार्थक होईल. ठाकूर, मी तर माणूस व्हायच्या लायक नाही, मी राजा होऊन काय करणार?”

राजा बोलता बोलता अतिशय हळवा झाला. ध्रुव राजाच्या गुढघ्यांवर आपले डोके घासत म्हणाला, “माझे बाबा.”

बिल्वनने हसत हसत ध्रुवला कडेवर घेतलं. खूप वेळ त्याच्या निरागस चेहऱ्यावरचे भाव टिपून शेवटी राजाला म्हणाला, “जंगलात जाऊन कसा माणूस घडवणार? जंगलात तर फक्त एखादं झाड मोठं केलं जाऊ शकतं. माणूस घडवायचा असेल तर या मनुष्य समाजात राहूनच घडवावा लागणार.”

राजा म्हणाला, “मी पूर्ण वनवासी नाही होणार. मानवी वस्तीपासून थोडासा दूर जाईन, पण समाजापासून माझे संबंध पूर्ण तोडणार नाही. फक्त काही दिवसांसाठी दूर जातोय.”

इकडे नक्षत्रराय सैन्याला घेऊन राजधानीजवळ आला. प्रजेचं धनधान्य लुटलं गेलं. सगळे फक्त महाराज गोविंदमाणिक्यना दोष देत राहिले. प्रजा म्हणू लागली, “राजाच्या पापाचीच ही शिक्षा आहे.”

राजाने एकदा रघुपतीला भेटण्याची विनंती केली. रघुपती आल्यावर त्याला म्हणाले, “प्रजेला अजून कष्ट का देत आहात? मी नक्षत्ररायसाठी राज्य सोडून जात आहे. तुझ्या मुघल सैनिकांना आता परत पाठव.”

रघुपती म्हणाला, “जशी आज्ञा. आपण निरोप घेतला की मी लगेच मुघल सैनिकांना परत पाठवेन. त्रिपुरा लुटलं जावं - अशी माझीदेखील इच्छा नाही. “

राजाने त्याचदिवशी राज्य सोडण्याची तयारी सुरु केली. भरजरी कपडे उतरवून संन्याश्याची भगवी कफनी धारण केली. नक्षत्ररायला राजाच्या सर्व कर्तव्यांची कल्पना देत आशीर्वाद देणारे एक लांबलचक पत्र लिहिले.

शेवटी ध्रुवला मांडीवर बसवून म्हणाले, “ध्रुव माझ्याबरोबर वनात येणार ना बाळ?”

ध्रुव त्याचक्षणी महाराजांच्या गळ्याला मिठी घालत म्हणाला, “येणार.”

राजाला अचानक आठवलं, ध्रुवला बरोबर घेऊन जाण्यासाठी त्याचे काका, केदारेश्वराची परवानगी घेतली पाहिजे. राजाने केदारेश्वरला बोलावून विचारलं, “केदारेश्वर, तुझी काही हरकत नसेल तर मी ध्रुवला माझ्याबरोबर घेऊन जातो.”

ध्रुवतर रात्रंदिवस महाराजांकडेच असायचा. त्याच्या काकांचा त्याला विशेष लळा नव्हता. कदाचित त्यामुळेच राजाच्या मनात केदारेश्वर ध्रुवला बरोबर नेऊ देणार नाही अशी पुसटशी शंकादेखील आली नाही.

राजाचं बोलणं ऐकून केदारेश्वर म्हणाला, “मी असं नाही करू शकणार, महाराज.”

त्याचं उत्तर ऐकून राजाला आश्चर्य वाटलं. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. थोडा वेळ शांत राहून म्हणाले, “केदारेश्वर, तूसुद्धा चल आमच्याबरोबर.”

केदारेश्वर - “महाराज, मी इथलं सगळं सोडून जंगलात कसा येऊ?”

राजा हळवा होऊन म्हणाला,” मी जंगलात नाही जात, मग तर झालं? मी काही सेवक आणि थोडं धन घेऊन नगराच्या जवळच राहीन.”

केदारेश्वर म्हणाला, “मी देश सोडून नाही येऊ शकत.”

राजाने काही न बोलता एक मोठा निश्वास सोडला. आता सगळ्याच आशा संपल्या होत्या. क्षणात जणू काही सगळी पृथ्वीच परकी झाली. ध्रुव खेळात रंगून गेला होता - खूप वेळ त्याच्याकडे पहात राहिले पण जणूकाही आता तो त्यांच्या नजरेस दिसतच नव्हता. ध्रुव त्यांच्या कपड्याचे टोक पकडून म्हणाला, “खेळा”

राजाचं सगळं हृदय पाणी होऊन डोळ्यांच्या कडांवर जमा झालं. मोठ्या कष्टाने त्यांनी अश्रू आवरले. तोंड दुसरीकडे फिरवून आपली सगळी वेदना लपवत म्हणाले, “ठीक आहे ध्रुवला इथेच राहू द्या. मी एकटाच जातो.”

त्या एका क्षणात, उरलेला जीवनप्रवास रुक्ष, वैराण वाळवंटासारखा त्यांच्या डोळ्यासमोर तरळून गेला.

केदारेश्वरने ध्रुवच खेळणं थांबवलं. “ये, चल माझ्याबरोबर.” असं म्हणून त्याचा हात ओढून त्याला तिथून घेऊन जाऊ लागला. ध्रुव त्याचा हात सोडवून घेत रडत रडत म्हणाला, “नाही.”

राजाने आश्चर्याने ध्रुवकडे पाहिलं. ध्रुवने पळत पळत जाऊन राजाला घट्ट पकडत त्यांच्या गुढघ्यात डोकं लपवलं. राजाने ध्रुवला कडेवर घेत त्याला आपल्या छातीशी कवटाळलं. त्यांचं विशाल हृदय केव्हाच तुकडे तुकडे होऊन विदीर्ण झालं होतं, छोट्याश्या ध्रुवला छातीशी कवटाळताच ते एकसंध झालं. ध्रुवला तसेच कडेवर घट्ट पकडून ते त्या विशाल कक्षामध्ये फेऱ्या मारू लागले. ध्रुव त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवून एकदम शांत पडून राहिला.

शेवटी निघायची वेळ झाली. ध्रुव राजाच्या कडेवर झोपला होता. त्याला सावकाश केदारेश्वरच्या हाती सोपवून राजा प्रवासाला बाहेर पडला.

***

नक्षत्ररायने सैन्य आणि जमीनदारांसोबत पूर्वेच्या दरवाजाने राजधानीत प्रवेश केला. बरोबर थोडेसे धन आणि काही सेवक घेऊन गोविंदमाणिक्य पश्चिमेच्या दरवाजाने बाहेर पडले. गावकर्यांनी शंखनाद, ढोलताशाचा गजर, निरनिराळी वाद्ये वाजवीत नक्षत्ररायचे स्वागत केले. ज्या रस्त्याने गोविंदमाणिक्य आपल्या घोड्यावरून जात होते, त्या रस्त्यावर किमान उभे राहूनही त्यांना आदर दाखवणं कुणाला आवश्यक वाटलं नाही. दुतर्फ़ा असलेल्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या स्त्रिया त्यांना नकोनको ते बोलू लागल्या. पोटात उसळलेली भूक आणि भुकेल्या लहान मुलांचं रडणं असह्य होऊन त्या लोकांची जीभ जरा जास्तच तिखट झाली होती. कालपरवाच दुष्काळात ज्या बाईने राजाच्या अन्नछत्रात जाऊन जेवण केलं होतं, राजानं स्वतः जिचं सांत्वन केलं होतं, तीच आपल्या कृश हातांनी राजाला शिव्याशाप देत होती. आयांचे बघून लहान मुलेही महाराजांची खिल्ली उडवत त्यांच्या मागेमागे जाऊ लागली.

इकडेतिकडे कुठेही न बघता, सरळ समोर बघत राजा हळू हळू चालत होता. शेतातून एक शेतकरी परत येत होता, महाराजांना पाहून त्यानं आदराने नमस्कार केला. राजाचं हृदय भरून आलं. त्याच्या जवळ जाऊन त्यांनी प्रेमळ, व्याकुळ स्वरात निरोप घेतला. सगळ्या प्रजेला आपल्या मुलाबाळांप्रमाणे सांभाळणार्या राजाला त्याच्या उतरत्या काळात फक्त या एका शेतकऱ्याने भक्तिभावाने, उदास होऊन निरोप दिला होता. राजाला त्रास देत असलेली लहान मुलांची टोळी पाहून तो रागाने त्यांना हुसकावून लावायला धावला, पण राजाने त्याला थांबवलं.

शेवटी, जिथे केदारेश्वराची झोपडी होती तिथे ते पोचले. एकवेळ उजवीकडे वळून पाहिले. थंडीच्या दिवसांमधली कोवळी सकाळ होती. धुकं बाजूला करत सूर्याची किरणं हळूहळू पसरत होती. झोपडीकडे पाहताच राजाला आषाढ महिन्यातली ती सकाळ आठवली, काळेकुट्ट ढग, मुसळधार पाऊस. द्वितीयेच्या चंद्रासारखी अशक्त झालेली हासि अंथरुणावर एका कोपऱ्यात निपचित पडली होती. छोटा, अजाण असलेला ताता कधी दिदीच्या ओढणीचं टोक तोंडात घालून दीदीला बघत होता तर कधी आपले गोल गोल, छोटे छोटे हात दीदीच्या गालांवर मायेने फिरवत तिला उठवण्याचा प्रयत्न करीत होता. आजची मार्गशीर्षातली ही दवात न्हाऊन निघालेली सकाळ त्यादिवशी आषाढातल्या ढगांनी झाकोळून टाकली होती. राजाला वाटलं, जे प्रारब्ध त्यांना आज राज्यहीन करून, अपमानित करून महालातून घालवत आहे, तेच प्रारब्ध कधीकाळी या झोपडीच्या दाराशी आपली वाट पहात होतं? इथेच त्याची पहिली भेट झाली होती. राजा काही वेळ झोपडीसमोर अस्वस्थपणे उभे राहिले. रस्त्यावर त्यांच्या सेवकांशिवाय कुणीही नव्हते. शेतकऱ्याने दटावल्यावर लहान मुले पळून गेली होती, पण तो दूर जाताच ती पुन्हा परत आली. त्यांच्या दंग्याने राजा भानावर आला आणि एक खोल निश्वास सोडून पुन्हा चालू लागला.

अचानक मुलांच्या दंग्यात त्यांना एक ओळखीचा आवाज ऐकू आला. मागे वळून पाहिलं तर छोटा ध्रुव दोन्ही हात पसरून त्यांच्याकडे धावत येत होता. केदारेश्वर केव्हाच नवीन राजाचे स्वागत करायला गेला होता. झोपडीत फक्त छोटा ध्रुव आणि एक म्हातारी आया होती. गोविंदमाणिक्य घोडा थांबवून खाली उतरले. खळखळून हसत तो त्यांच्या अंगाखांद्याला लपेटला, त्यांचे कपडे ओढले, त्यांच्या गुढघ्यात आपलं तोंड लपवत, झालेल्या आनंदाचा भर ओसरल्यावर गंभीरपणे राजाला म्हणाला, “आमि टक टक चो’बो.” (मी घोड्यावर बसणार.)

राजाने त्याला घोड्यावर बसवलं. घोड्यावर बसताच त्याने राजाच्या गळ्याला मिठी मारली. आपलं कोवळं कपाळ राजाच्या कपाळाला लावलं. त्याच्या बालबुद्धीला राजा वेगळा वाटला, त्यांच्यात काहीतरी बदल झालाय हे त्याला जाणवलं. एखाद्याला गाढ झोपेतून उठवताना जसे अनेक प्रयत्न करावे लागतात तसेच ध्रुव करू लागला. कधी त्यांना जवळ ओढून घेई, कधी त्यांना अगदी चिकटून बसे, कधी त्यांना पापी देऊन तो त्यांना पुन्हा पहिल्यासारखं करायचा प्रयत्न करू लागला. शेवटी हार मानून, तोंडात दोन बोटे घालून शांत बसला. राजाने त्याच्या मनातली चलबिचल ओळखून त्याला पुन्हा पुन्हा जवळ घेतलं.

शेवटी म्हणाले, “ध्रुव, आता मी येऊ?”

ध्रुव राजाच्या चेहऱ्याकडे पहात म्हणाला, “मीपण येणार.”

राजा म्हणाला, “तू कुठे येणार? तू इथे काकाजवळ रहा.”

ध्रुव म्हणाला, “नाही, मी येणार.”

त्याचवेळी झोपडीतून म्हातारी सेविका ओरडत बाहेर आली. ध्रुवला रागवून, त्याचा हात ओढत म्हणाली, “चल.”

ध्रुवने घाबरून राजाला अजून घट्ट पकडत त्यांच्या छातीत आपला चेहरा लपवला. निराश झालेल्या राजाला वाटलं छातीतल्या शिरासुद्धा एकवेळ काढून फेकून देता येतील, पण या दोन नाजूक हातांच बंधन सोडवणं कसं शक्य आहे? पण तेसुद्धा सोडवाव लागलं. हळूहळू ध्रुवचे हात आपल्या गळ्यातून सोडवत त्यांनी जबरदस्ती ध्रुवला त्या सेविकेच्या हाती सोपवलं. ध्रुव सगळी शक्ती एकवटून रडू लागला, हात पसरून म्हणाला, “बाबा, मी येणार.”
राजाने आता मागे न पाहता गडबडीने घोड्यावर बसून त्याला टाच मारली. जितके दूर जातील तेवढंच तीव्रतेने ध्रुवचं व्याकुळ होऊन रडणं ऐकू येत राहिलं, ध्रुव आपले हात पसरून “बाबा, मी येणार” म्हणत राहिला. राजाने इतकावेळ स्वतःला घातलेला बांध सुटला. राजाच्या शांत डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आजूबाजूचं काही दिसणं बंद झालं. घोडा जिकडे मर्जी होईल तिकडे पळू लागला.

रस्त्यात मुघल सैनिकांची एक टोळी राजाची ही अवस्था पाहून हसू लागली. त्यांच्या सेवकांनीही चेष्टा सुरु केली. राज्यसभेतील एक सभासद तिथूनच जात होता, तो महाराजांकडे येऊन म्हणाला, “महाराज, तुमची ही अवस्था पहावत नाही. तुम्हाला असं लाचार झालेलं पाहूनच या लोकांचं इतकं धाडस वाढलंय. ही पगडी घ्या, माझी तलवार घ्या. जरा वेळ थांबा, मी आताच माझ्या ओळखीच्या लोकांना बोलवून यांची खबरबात घेतो.”

राजा म्हणाला, “नको नयनराय, आता मला पगडी, तलवार काही नको. काय करतील हे लोक करून करून? याहीपेक्षा मोठा अपमान मी आता सहन करू शकतो. नग्न तलवार हातात घेऊन मला या लोकांकडून कसलाही मानसन्मान मिळवण्याची इच्छा नाही. सामान्य लोक जसे भल्याबुऱ्या काळात मानापमान सहन करीत जगतात, इथून पुढे मीही तसंच सर्व काही सहन करेन. मित्र शत्रू झालेत, ज्यांना आश्रय दिला ते उपकार विसरले, विनम्र लोक उन्मत्त झाले, कदाचित कोणे एकेकाळी या सर्व गोष्टी मला असह्य झाल्या असत्या, पण आज याच गोष्टी सहन करून मला आंतरिक समाधान मिळवायला हवं. आता मला खऱ्या मित्रांची ओळख झाली आहे. जा नयनराय, परत जा, नक्षत्रचे आदरपूर्वक नगरात स्वागत कर. माझा जितका आदर केलात, तेवढाच नक्षत्रचाही करा. तुमच्याकडे एक शेवटची प्रार्थना करतो, आता तुम्ही सर्वानी मिळून नक्षत्रला चांगल्या मार्गावर आणायला हवं, प्रजेच्या हिताकडे त्याचं अजिबात दुर्लक्ष होऊ देऊ नका. मी तुम्हाला अशा सूचना दिल्यात हे सांगून किंवा त्याची माझ्याशी तुलना करून त्याला जराही दुःख देऊ नका. मी निघतो आता.”

राजाने नयनरायला मिठी मारून त्याचा निरोप घेतला आणि पुढे निघाला. नयनराय भरलेल्या डोळ्यांनी राजाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहिला.

गोमती नदीच्या किनारी असलेल्या उंच पहाडावर राजा पोचला तेव्हा जवळच्या जंगलातून बिल्वन ठाकूर बाहेर आला. राजाच्या समोर येत, आकाशाकडे हात उंचावून म्हणाला, “महाराजांचा विजय असो.”

राजाने घोड्यावरून खाली उतरून त्याला प्रणाम केला.

बिल्वन म्हणाला, “मी आपला निरोप घ्यायला आलो आहे, महाराज.”

राजा म्हणाला, “ठाकूर, यावेळी तुम्ही नक्षत्रजवळ असायला हवं. त्याला योग्य मार्गदर्शन करून प्रजेचं कल्याण करा.”

बिल्वन म्हणाला, “नाही महाराज, जिथे तुमचीच किंमत नाही तिथे माझी काय कथा? इथं राहून आता मला अजून काहीही करणं शक्य नाही.”

राजा म्हणाला, “मग आता कुठे जाणार ठाकूर? एक उपकार माझ्यावर करा, माझ्यासोबत आलात तर मला तुमचा आधार मिळेल.”

बिल्वन म्हणाला, “मी कुठे जाणार? जिथे माझी गरज असेल तिथे. ती गरज आता मलाच शोधायला हवी. तुम्हाला आश्वासन देतो महाराज, मी तुमच्या जवळ असो अथवा दूर, माझ्या मनात तुमच्याविषयी असलेलं प्रेम, आदर तसूभरही कमी होणार नाही. पण मी आपल्याबरोबर जंगलात येऊन काय करणार?”

राजा मृदू स्वरात म्हणाला, “ठीक आहे. येतो मी.”

बिल्वनला पुन्हा एकदा प्रणाम करून राजा एका दिशेला गेला आणि बिल्वन दुसर्या दिशेला मार्गस्थ झाला.

***

क्रमश:

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

अनिंद्य's picture

17 Jul 2020 - 4:05 pm | अनिंद्य

कसली सुरेख प्रतीके वापरली आहेत टागोरांनी !! साधीसुधी, चपखल, वैश्विक.
कथालेखांक आवडला,
पु भा प्र.

प्रचेतस's picture

24 Jul 2020 - 3:30 pm | प्रचेतस

अगदी हेच म्हणतो.
खूप सुंदर.

श्वेता२४'s picture

17 Jul 2020 - 6:33 pm | श्वेता२४

पु. भा. प्र

धन्यवाद अनिंद्य आणि श्वेता :)

पुढचा भाग इथे आहे.