राजयोग-१८

Primary tabs

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
26 Jun 2020 - 12:26 pm

राजयोग-१७

***

यावर्षी त्रिपुरामध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली. उत्तरेकडून उंदरांच्या एकामागे एक टोळ्या त्रिपुराच्या शेतांमध्ये आल्या. सगळी पिकं तर खाल्लीच पण, लोकांनी त्यांच्या घरात जे साठवलं होतं, तेही अन्नधान्य खाऊन टाकलं. बघता बघता दुष्काळ पडला. जंगलात मिळणार्या कंदमुळांवर लोक आपली गुजराण करत होते. जंगलांची तशी कमतरता नव्ह्ती आणि तिथल्या जमिनीत खाण्यायोग्य गोष्टीही मिळत होत्या. शिकार करून आणलेले मांस बाजारात चढ्या भावाने विकले जाऊ लागले. लोक मोठ मोठ्या जंगली म्हशी, हरिणं, ससे, साळींद्री, खार, डुक्कर, कासव काहीही शिकार करून खाऊ लागले. हत्ती मिळाला तर हत्ती खाऊ लागले, अजगर, सापही लोकांच्या तावडीतून सुटले नाहीत. जंगलात खाण्यालायक पक्षीही भरपूर मिळत होते. उंच उंच झाडांना लगडलेली मधाची पोळी सर्रास खाली पडू लागली. जागोजागी नदीच्या पाण्याला बांध घालून त्यात विषारी वेली सोडल्या की आपोआप मासे वर तरंगू लागत. त्यांना गोळा करून कधी खात होते, तर कधी त्यांना वाळवून साठवत होते. काहीतरी करून दोन वेळच्या खाण्याची सोय होत होती, पण तरीही राज्यात अनागोंदी सुरु झाली. चोऱ्यांचे, दरोड्यांचे प्रमाण वाढले. लोक कधीही विद्रोह करतील अशी परिस्थिती निर्माण झाली.

लोकांमध्ये चर्चा सुरु झाली, "देवीचा बळी बंद केल्यामुळेच ही सर्व संकटं येत आहेत." बिल्वन ठाकूरने त्या गोष्टीला फार महत्व दिले नाही. तो त्यांना उपहासाने म्हणाला, "कैलासावर कार्तिकेय आणि गणेशामध्ये भांडण झाले आहे. म्हणूनच गणेशाचे उंदीर, कार्तिकेयाच्या मोरांची तक्रार करायला त्रिपुरेश्वरीकडे आले आहेत." लोकांना त्याच्या बोलण्यातला उपहास कळला नाही. त्यांच्या भाबड्या मनात आलं, जशा उंदरांच्या टोळ्या आल्या, तशाच त्या तीन दिवसांच्या आत सगळी पिकं नष्ट करून अदृश्य सुद्धा झाल्या. बिल्वन ठाकूरच्या अगाध ज्ञानाबद्दल आता कुणालाही काहीही शंका राहिली नाही. कैलासावर झालेल्या दोन भावांच्या वादावर गीतं रचली गेली. भिक्षुक त्यांना सुरेल चाली लावून गाऊ लागले. जनसामान्यात ती गीतं सगळेच गुणगुणू लागले.

तरीही राजाबद्दल असलेला जनतेचा असंतोष काही पूर्णपणे गेला नाही. बिल्वन ठाकूरच्या सल्ल्याने राजाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा एक वर्षाचा कर माफ केला. त्यातून थोडा फार जनसमुदाय शांत झाला, तरीही अनेक लोक देवीच्या शापापासून वाचण्यासाठी चट्टग्रामच्या (सध्याच्या बांग्लादेशमधील चित्तगोंग शहर) डोंगराळ प्रदेशात पळून गेले. आपण कुठेतरी कमी पडतोय ही भावना राजाचं मन खाउ लागली.

त्याने बिल्वनला बोलावून विचारले, "ठाकूर, राजाच्या पापांचे भोग प्रजेला भोगावे लागतात. मी देवीचा बळी बंद करून पाप केले का? ही सर्व त्याचीच शिक्षा आहे का?"

महाराजांची प्रत्येक शंका धुडकावून लावत बिल्वन म्हणाला, "जेव्हा देवीसमोर हजारो नरबळी दिले जात होते, तेव्हा तुमच्या प्रजेचं जास्त नुकसान व्हायचं की आता या दुष्काळात झालंय?"

राजाला यावर काही उत्तर देता आलं नाही, पण त्याच्या मनातला संशय तसाच खदखदत राहिला. प्रजा त्याच्यावर नाराज आहे, त्याच्यावर संशय घेतेय ही गोष्ट त्याच्या जिव्हारी लागली. स्वतःवरचा विश्वास ढळला. एक खोल निःश्वास सोडत राजा म्हणाला, "मला काहीच कळेनासं झालंय."

बिल्वन म्हणाला, "अजून काही कळून घेण्याची काय गरज आहे? इतके सगळे उंदीर येऊन पीक का खाऊन गेले हे आपल्याला कधीच नाही समजणार. पण मी कुणाचंही अहित करणार नाही, कुणावरही अन्याय होऊ देणार नाही एवढंच जरी स्पष्ट समजलं तरी ते पुरेसं आहे. त्याउपर जी परमेश्वराची इच्छा असेल ते होईल. तो काही आपल्याला हिशोब द्यायला येणार नाही."

राजा म्हणाला, "ठाकूर तुम्ही घरोघरी जाऊन अथक परिश्रम करीत आहात. या जगाचं जे काही भलं होत आहे, त्यातच तुमचा सन्मानही होतोय. आपण कुणासाठी काहीतरी करतोय या आनंदात तुमच्या मनात कुठली शंका येत नाही. मी दिवसरात्र फक्त डोक्यावर एक मुकुट चढवून, सिंहासनावर बसून राहतो, काही थोड्याफार चिंता माझ्या गळ्यात अडकवून घेतल्या आहेत बस्स - तुमच्या कामाचा आवाका बघितला की मला तुमचा हेवा वाटतो."

बिल्वन म्हणाला, "महाराज, मी तुमचाच एक अंश आहे. जर तुम्ही या सिंहासनावर नसता, तर मला काही काम करता तरी आलं असतं का? तुम्ही आणि मी, आपण दोघे एकत्र आहोत म्हणूनच संपूर्ण आहोत."

असं बोलून बिल्वनने राजाची आज्ञा घेतली. डोक्यावरच्या मुकुटाला चाचपत मनोमन राजा म्हणाला, "माझी किती कामं शिल्लक आहेत, त्यातलं मी काहीच करीत नाही. मी फक्त स्वतःच्या काळजीमध्ये मश्गुल झालो आहे. म्हणूनच तर जनतेचा विश्वास जिंकू शकत नाही. मी राज्य करण्यायोग्य नाही."

***

एकीकडे नक्षत्रराय मुघल सैन्याचा राजा बनून तेंतुले नावाच्या छोट्या गावात आराम करीत होता. सकाळ होताच रघुपती येऊन म्हणाला, "महाराज आपल्याला आता पुढील प्रवासास निघायचे आहे. आपण तयार व्हावे."

रघुपतीने मारलेली "महाराज" ही हाक नक्षत्ररायच्या कानांना अतिशय गोड वाटली. त्याचं तनमन उत्साहाने प्रफुल्लित झालं. त्याच्या कल्पनाविश्वात सर्वांच्याच मुखातून महाराज महाराज असा जयघोष ऐकू येऊ लागला. मनातल्या मनात तो त्रिपुराच्या सिंहासनावर बसून सभेची शोभा वाढवायची कल्पना करू लागला. त्याच आनंदाच्या भरात तो रघुपतीला म्हणाला, "ठाकूर, तुम्हाला मी कधीच दूर जाऊ देणार नाही. तुम्हाला राजसभेमध्येच रहावे लागेल. तुम्हाला जे हवं असेल, ते तुम्ही मला मागा."

मनातल्या मनातच नक्षत्ररायने एक भलीमोठी जहागीर रघुपतीला देऊनही टाकली.

रघुपती म्हणाला, "मला काही नकोय."

नक्षत्रराय म्हणाला, "हे काय बोलणं? ठाकूर - हे बिलकुल चालणार नाही. काहीतरी घ्यावंच लागेल तुम्हाला. कयलासर परगणा आता तुमचा. तुम्ही आवश्यक कागदपत्र तयार करा."

रघुपती म्हणाला, "ते सगळं नंतर बघुयात."

नक्षत्रराय उतावीळ होऊन म्हणाला, "नंतर कशाला? आताच घ्या. सगळा कयलासर तुमचा. मला एक पैसा कर नको."

"मेल्यानंतर तीन हात जमीन मिळाली तरी मला आनंद होईल. मला बाकी काही नको." असं म्हणून रघुपती तिथून बाहेर पडला. त्याला जयसिंहची आठवण आली. त्याला वाटलं, जयसिंह असता तर काही पुरस्कार घेतला असता. आता तोच नाही तर संपूर्ण त्रिपुरा राज्य मिळालं तरी तेसुद्धा मातीमोल आहे.

रात्रंदिवस रघुपती आता नक्षत्ररायला राजा होण्याची धुंदी चढवण्याचा प्रयत्न करीत असतो. तरीही त्याच्या संशयी मनात भीती आहे, इतकी सगळी मेहनत वाया तर नाही जाणार? दुर्बल स्वभावाचा नक्षत्रराय त्रिपुराला पोचताच युद्धापासून पलायन तर नाही करणार? त्याला पुन्हा बंदी बनवलं तर? परंतु दुर्बल मनात एकदा सत्तेचा माज उत्पन्न केला की मग अजून विचार करायची आवश्यकता नसते. रघुपती आता जाणूनबुजून नक्षत्ररायच्या कुठल्याही गोष्टीला विरोध करीत नाही. त्यानं काहीही केलं तरी तो कौतुक आणि अदबीनं त्याचा सन्मान करतो. प्रत्येक गोष्ट त्याला विचारून, त्याचा आदेश मिळाला तरच करतो. मुघल सैनिक त्याला महाराजा साहब असे म्हणतात, त्याला पाहताच सगळ्यांची धांदल उडते. वारा आला की सगळी पिकं जशी खाली वाकतात, तसंच नक्षत्रराय येताच ओळीने उभे सैनिक एका लयीत झुकुन त्याला कुर्निसात करतात. सेनापती त्याच्या पुढे सन्मानाने आपली मान झुकवतो. शेकडो तळपत्या तलवारींच्या मधोमध एका विशाल हत्तीवर सुवर्ण अलंकारांनी जडलेल्या हौदात बसून नक्षत्रराय यात्रा करतो. त्याच्याबरोबर राजपताका घेऊन सैनिक चालत राहतात. तो जिथे जिथे जातो, तिथले नागरिक सैनिकांच्या भितीने घरदार सोडून पळून जातात. त्यांची भिती पाहून नक्षत्ररायचं मन गर्वाने भरून येतं. त्याला वाटतं, मी दिग्विजय करायला चाललो आहे. छोटे छोटे जमीनदार त्याला अनेक भेटी आणून प्रणाम करतात, त्यांना पाहून ते युद्धात हरलेल्या राजांप्रमाणे वाटतात.

एक दिवस सैनिक त्याला अभिवादन करून म्हणाले, "महाराजा साहब!"

नक्षत्रराय आपल्या आसनावर उठून ताठ बसला.

"आम्ही तुमच्यासाठी स्वतःचे प्राणही अर्पण करू शकतो. आम्हाला त्याची फिकीर नाही. आमचा नियम आहे, युद्धावर जाताना वाटेत लागलेलं प्रत्येक नगर आम्ही लुटतो - कुठल्याही शास्त्रात हे चूक आहे असं लिहलं नाहीये."

मान हलवत नक्षत्रराय म्हणाला, "बरोबर आहे, बरोबर आहे."

सैनिक म्हणाले, "ब्राह्मण ठाकुरांनी मात्र आम्हाला कसलीही लूट करायला मनाई केली आहे. आम्ही आमचे प्राण द्यायला निघालोय पण जराशी लुटमारही करायची नाही, हा आमच्यावर मोठा अन्याय आहे. "

पुन्हा एकदा मान हलवत नक्षत्रराय म्हणाला, "अगदी, हेही बरोबरच आहे. "

"जर महाराजांचा हुकूम असेल तर आम्ही ब्राम्हण ठाकुरांची आज्ञा धुडकावून लूट करायला जाऊ."

मोठ्या गर्वाने नक्षत्रराय म्हणाला, "कोण ब्राम्हण ठाकूर? काय कळतं त्याला? मी तुम्हाला आज्ञा देतो, जा तुम्ही लूटमार करायला."

असं म्हणून त्याने इकडे तिकडे बघत कानोसा घेतला, रघुपती जवळपास नाही हे पाहून निश्चिन्त झाला.

कुठलीही शंका न येता रघुपतीला वरचढ झाल्यावर त्याला मनोमन आनंद झाला. त्याच्या नसा-नसांमधून सत्तेचा गर्व नशेसारखा दौडू लागला. त्याची जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलली. कल्पनेच्या भरारीत तो कुठेतरी इतका उंच उडू लागला की हळूहळू पृथ्वी खाली उडणाऱ्या ढगांसारखी लुप्त झाली. अधून मधून त्याला रघुपतीदेखील नगण्य वाटू लागला. थोडे साहस येताच मनातल्या मनात गोविंदमाणिक्यचा क्रोध करू लागला. सतत मनात म्हणू लागला, "मला निर्वासित केलं! स्वत:च्या भावाला एका सामान्य नागरिकाप्रमाणे न्यायसभेत उभं केलं! आता बघू, कोण कुणाला निर्वासित करतं ते. आता पाहतील त्रिपुरावासी नक्षत्ररायचा प्रताप!"

दिवसेंदिवस नक्षत्रराय आनंद आणि गर्वाने फुलू लागला.

काहीही त्रास न देणाऱ्या नागरिकांना उगीचच छळणं आणि लूटालूट करणं या मुघल सैनिकांच्या वर्तणुकीमुळे रघुपती अतिशय नाराज होता. त्यानं हे सर्व थांबवण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण नक्षत्ररायची परवानगी मिळताच सैनिकांनी त्याचा अपमान केला. रघुपती नक्षत्ररायकडे येऊन तो म्हणाला, "असहाय्य, दुर्बल जनतेवर हा अन्याय का!?"

नक्षत्रराय म्हणाला," ठाकूर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार नाहीत. युद्धावर जाताना सैनिकांच्या लुटमारीचा निषेध करून त्यांच्या उत्साहावर पाणी फिरवणं चांगलं नाही."

नक्षत्ररायचे शब्द ऐकून रघुपती आश्चर्यचकित झाला. नक्षत्ररायच्या मनातला खोटा गर्व पाहून तो मनातल्या मनात हसला. वरवर म्हणाला,"पण आता त्यांना मनमानी करून दिली तर पुन्हा आवरणं कठीण होईल. सगळं त्रिपुरा उध्वस्त करतील."

नक्षत्रराय म्हणाला, "मग काय वाईट होईल? तेच तर हवंय मला. एकदा कळू तर दे त्रिपुराला, नक्षत्ररायला निर्वासित करण्याच्या शिक्षेचं काय फळ मिळतं ते. ठाकूर या सर्व गोष्टी तुम्हाला नाहीत कळणार - तुम्ही कधी युद्ध केलंच नाहीत."

रघुपती मनातल्या मनात खुश झाला. पण काही न बोलता तिथून निघून गेला. आता नक्षत्रराय फक्त मिरवायचा बाहुला नव्हता, तर निर्दयी, कठोर, कुणाचीही पर्वा न करणारा माणूस होता. त्याची इच्छा अखेर पूर्ण झाली होती.

***

क्रमश:

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

रोचक. ह्या दुकलीचं के चाललंय ह्याची उत्सुकता होतीच. पुभाप्र.

हा भागही आवडला. उत्कंठावर्धक

रातराणी's picture

29 Jun 2020 - 12:59 pm | रातराणी

धन्यवाद =))

अनिंद्य's picture

2 Jul 2020 - 9:24 am | अनिंद्य

हा भाग छान जमला आहे !

त्रिपुरा भागात undaranchi dhad hee ghatana kalpanik nahi, tase kharech ghadle hote ase mee vachale aahe.

मध्यंतरी पुढचे भाग येण्यात खंड पडल्याने लिंक तुटली आहे, आता पहिल्यापासून सर्व भाग पुन्हा वाचावे लागणार!
पण काही हरकत नाही तुम्ही खूप छान लिहिताय आणि चांगले लेखन पुन्हा पुन्हा वाचण्यातही आनंद मिळतो!

धन्यवाद अनिंद्य आणि टर्मिनेटर, पुढचा भाग टाकत आहे.

अनिंद्य गोविंदमाणिकय, नक्षत्रमाणिकय हे माणिकय राजघराण्यातील त्रिपुराचे खरोखरचे राज्यकर्ते होते, मला वाटतं, त्या कालखंडात घडून गेलेल्या काही घटनांची सांगड घालून गुरुदेव टागोरांनी केलेली ही निर्मिती असावी.

राज्यकर्त्यांची नावे खरी आहेत, फक्त कालखंड मागेपुढे केले आहेत असे मला वाटते.

बादवे, नामांकित रूपगर्विता जयपुरच्या महाराणी गायत्री देवी ह्याच माणिक्य राजवंशातील एका शाखेतील (कूचबिहार) सुकन्या होत.

वीणा३'s picture

2 Jul 2020 - 11:57 pm | वीणा३

छान लिहिताय, पु भा प्र !!!