पोपटाचा दिवस

Primary tabs

हृषीकेश पालोदकर's picture
हृषीकेश पालोदकर in जनातलं, मनातलं
7 May 2020 - 3:05 pm

दुपारच्यावेळी आम्हा पोरांचा खेळ ऐन भरात आलेला होता. गावातले बहुतांश लोक शेतात गेल्याने आमच्या आवाजाव्यतिरिक्त गल्ली तशी शांत होती. जेवणासाठी ज्याला त्याला आपापल्या घरून बोलावणे येऊन गेलेले होते. पण पुढचाडाव झाल्यावर जाऊ, असे म्हणत सगळेजण रंगात आलेला गोट्यांचा खेळ पुढे नेत होते. तेवढ्यात मांजरीचा ओरडण्याचा आणि पक्षाच्या किंचाळण्याचा कर्कश आवाज कानावर आला. वळून पाहिले तेव्हा आमच्या वाड्यातल्या लिंबाच्या झाडावर काहीतरी झटापट झाल्याचा अंदाज आला. तसेच आम्ही ताडकन आठ दहा जणं तिकडे धावत गेलो. आम्ही पोहोचलो आणि तेवढ्यात झाडावरून एक पक्षी खाली फडफड करत पडला. मांजर त्याच्यावर झेप घेणार तेवढ्यात आम्ही तिला हुसकावून लावलं. त्या सदाबहार लिंबाच्या झाडाशेजारीच आमच्या घराची भिंत होती. तिथून आमचं घरचं मांजर नेहमीच पक्षांची शिकार करत असे.

खाली पडलेल्या पक्षाला आम्ही दुरून निरखून पाहात होतो. आणि लक्षात आले की तो तर पोपट आहे. जखमी अवस्थेतला तो पोपट डोळ्यांची उघडझाप करत होता आणि मधूनच पंख पसरून उडायचा प्रयत्न करत होता. पण त्याला काही जागचं हलणं पण जमत नव्हतं. तो प्रचंड घाबरलेला असावा. मांजराच्या झडपेत पक्षी जखमेपेक्षा घाबरूनच अधिक मरतात, हे आम्ही ऐकून होतो.

आमच्यातल्या एकाने त्या पोपटाच्या जवळ जाऊन त्याचा अंदाज घेतला. त्याच्या मानेवर जखम झाल्याचे लक्षात आले. बाकी कुठे जखम नव्हती. त्या पोपटाला मांजरीपासून वाचवायचे आम्ही ठरविले. आमच्या गावात कुणाकडेच पोपट नव्हता. खूप कधीकाळी एकाने एक पोपट पाळला होता, तो शिट्टया वाजवायचा, ते कुतूहल आमच्या मनात कुठेतरी होतेच. तो जर आमचा पाळीव पक्षी झाला, तर मग धमालच. त्याच आशेने आमच्यातल्या एकाने हळूच कपड्यामध्ये त्या पोपटाला उचलून घेतले.
तोपर्यंत एकाने चपलेचा खोका असतो, तसा खोका छिद्र पाडून आणि त्याची एक बाजू मुडपून आणला. अत्यंत अलगदपणे त्या पोपटाला आम्ही खोक्यात ठेवलं. ते खोकं गवत, कपडा, पाने, मिरच्या, अन्नधान्याचे दाणे आणि पाण्याची एक पसरट छोटी वाटी या सुखसोयींनी लगेच सज्ज झालेलं होतं. तो पोपट अलगदपणे खोक्यात ठेवला. पक्षी फार काही प्रतिकार करत नव्हता. याला आपण गावातल्या ढोर डॉक्टरकडे घेऊन जाऊ आणि मानेचं ऑपरेशन करू ,अशी सुचना एका संवगड्याने दिली.

ताबडतोब दोघे- तिघे डॉक्टरकडे रवाना झाले. घरापासून जवळच पारापाशी ढोर डॉक्टरचा दवाखाना होता. त्या ढोर डॉक्टरांनी आमच्या उत्साही मंडळींची माहिती ऐकून थोडी हळद भरा, एवढाच काय तो सल्ला दिला. आमच्यासारख्या गावातल्या प्राणी प्रेमी टोळ भैरवांची त्यांना सवय होतीच. हा निरोप येईपर्यंत आम्ही पोपटावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागते की काय, या चिंतेने व्याकूळ झालो होतो. पण ते थोडक्यात टळलं. कापसाने हळूच जखमेवर हळद लावली आणि पोपटाला एकटं सोडून आम्ही थोड्या दुर अंतरावर जाऊन शांतपणे बसलो.

तो बिचारा निपचित तिथे बसलेला होता. मधून डोळ्यांची थोडीफार उघडझाप करायचा. आमची मांजर त्याच्यवर पाळत ठेवून होतीच. आम्हाला मांजरीपासून आता त्याचं खास संरक्षण करायचं होतं. त्यामुळे त्या हिशोबाने पण सर्व मंडळी खेळ सोडून तयारीला लागली होती. एकदा हा पोपट बरा झाला की, त्याच्या जिभेवर अक्कलकाढ्याची काडी घासू म्हणजे पोपट छान बोलेल. तालुक्यावरून त्याला चांगला मोठा पिंजरा आणू आणि तो गल्लीतून जाणाऱ्या येणाऱ्याला दिसेल असा लावू, असे काय काय इमले आम्ही शांततेत बांधत होतो.

आमची ही सगळी टोळी कुत्रे आणि मांजराच्या पिल्लांच्या संवर्धनात अत्यंत तयार होती. बारीक पिल्लाला कापसाच्या बोळ्याने दुध कसे पाजायचे, हे सर्वांना माहित होते. पण पोपटाचे काय करायचे, हे काही कोणाला समजत नव्हते. त्याच्या समोर ठेवलेले धान्य, फळाचे तुकडे त्याने खरंच खाल्ले की नाही, हे काही केल्या आम्हाला कळत नव्हते. मात्र तो त्याची लालबुंद चोच मधूनच उघडायचा आणि जीभ आतल्याआत गोल- गोल फिरवायचा. अशीच संध्याकाळ झाली आणि पोरांना आपापल्या घरून बोलावणे यायला सुरूवात झाली. पोपट रात्रभर कसा राहिलं, याची काळजी सगळ्यांनाचा वाटत होती. घरी जाताना सगळ्यांनी मला पोपटाबद्दल रात्री काय काय दक्षता घ्यायची, याच्या सूचना केल्या. हे असले खुळं बाकीच्या कोणाच्या घरात अजिबात चालले नसते. पण माझी आजी आणि काकू माझ्या या खुळांना खपवून घ्यायच्या.
रात्रभर थोड्या थोड्यावेळाने उठून पोपट जागेवर आहे की नाही, हे मी पाहत होतो. मोठ्या दादाने तर ‘पोपटाचे सोड मांजर उपाशी राहिलीये तिलाच खायला दे तो पोपट’, असा सल्लाही गमतीत दिला होता.

सकाळ झाली तेव्हा पोपट जरा ताजातवाना दिसत होता. त्याने काही तरी खाल्लं पण असावं असे वाटले. सकाळची न्याहारी करून पोरं येईपर्यंत पोपटाला मी राखणदार होतो. सवंगडी मंडळी आली आणि भलतीच खूश झाली. पोपट व्यवस्थित दोन पायांवर बसलेला होता. खोक्यातल्या खोक्यात थोडं थोडं चालत होता. एकदोनदा तर त्याने आवाजही काढला. त्यामुळे आता हा पोपट वाचला, याचा फारच आनंद आम्हा सगळ्यांना झाला. तरीही तो पुर्ण बरा होईपर्यंत कुठलेही खेळ खेळायचे नाही, असा मुक ठराव पास झालेलाच होता. आमच्याा पोरांच्या टोळीमध्ये काही मंडळी फक्त आमची गंमत पाहायलाच आमच्यात असायची. ती तेवढी निष्ठावान नव्हती. त्यामुळे आम्ही त्यांना टाळून पोपटाबाबतचे महत्त्वाचे निर्णय घेत होतो.

हा दिवस पण सर्व पोरांनी पोपटाबद्दलची चर्चा आणि त्याच्या देखभालीमध्येच घालविला. त्याचे खोके साफ करताना अलगद कपड्याने उचलून लिलया सफाई केली. त्याने विष्ठा केलेली होती. यावरून तो खात असेल, असा कयास आम्ही काढला. या पक्षांना माणसाचा स्पर्श झाला की त्यांना त्यांच्या कळपातून टोचे मारून हकलून देण्यात येतं, याची माहिती आम्हा सर्वांना होती. त्यामुळे आम्ही त्याला कमीतकमी आमचा संपर्क आणि स्पर्श होऊ देत होतो. पोपटाच्या आजच्या हालचालीने आणि संध्याकाळी तीन चार वेळेसच्या कर्कश्श किंकाळ्यांनी आमचा उत्साह फारच वाढविला. मंडळी जोशातच घरी गेली. रात्री कशी काळजी घ्यायची, या सुचनेबरोबरच आता याचे नाव काय ठेवायचे, याचाही विचार सुरू केला.

आजची रात्रही तशी डोळ्यात तेल घालून पोपटाच्या रक्षणात घालविली. बैठकीतून मागच्या अंगणात जायचा जो रस्ता होता, तिथे अडगळीचं सामान ठेवायची व्यवस्था होती. तिथेच पोपटाचा मुक्काम होता आणि मी त्याच्यासाठी बैठकीतच झोपायचो. सकाळी मित्रमंडळी न्याहारी करून वेळेत हजर झाली. आम्ही पोपटाकडे बघितलं तर तो काल इतका फे्र श वाटत नव्हता. तरी स्वच्छता करून आम्ही त्याचं खाणं- पिणं बदललं. त्याच्या खाली अंथरलेला कपडा बदलला आणि आम्ही सर्व मित्र दुर अंतरावर त्याच्या तैनातीत बसलो.

दुपारच्या वेळेस कुणीतरी सहज नजर मारायला डब्याकडे गेला, तर पोपट मान टाकलेला दिसला. त्याने सगळ्यांना बोलवलं. आम्ही सगळेजणं हळू हळू तिथे जमलो आणि पाहिलं तर पोपट खरंच निपचित पडलेला होता. त्याच्या डोळ्याची उघडझाप पुर्णपणे बंद होती. त्याची ती लालबुंद चोच उघडून तो आतल्या आत जिभ फिरवायचा, ते ही पुर्णपणे बंद झालं होतं. एकाने त्याला हलवून पाहिलं. पण त्याचं जड अंग पाहून तो आपल्याला सोडून गेलाय, याचे आम्हाला अत्यंत दु:ख झाले. इयत्ता दुसरी - तिसरी पासून ते पाचवी- सहावी पर्यंत या वयोगटातली आमची गँग एकदमच सुन्न झाली. आता काय करायचं, कुणाला काही सुचत नव्हतं. या पोपटाला फेकून द्यावं, का त्याला मांजरीला खायला द्यावं का त्याचा आदरपुर्वक अंतिम संस्कार करावे, याचा काही उलगडा होत नव्हता. अंतिम संस्कार करायचे, म्हणजे नेमकं करायचं काय, याचीही कल्पना येत नव्हती. मग एकाने गोठयासमोरील अंगणात जिथे आम्ही विटांच्या गाड्या खेळायचो, त्या मैदानात याला आदरपुर्वक दफन करू अशी कल्पना सुचविली. ती सर्वानुमते पास झाली.

आम्हा सर्वांकडे गजाचे गाडे होते. एकदोघांकडे त्याच्या ट्रॉल्याही होत्या. त्यांनी लगेच त्यांच्या ट्रॉल्या आणि गाडे स्वच्छ धुवून आणले. कुणी दोन चार फुले आणली कुठूनतरी. त्या पोपटाचं पार्थिव गजाच्या गाड्याच्या ट्रॉलीमध्ये ठेवण्यात आले. जमा झालेल्या झेंडुच्या आणि नालीवरच्या कर्दळीच्या फुलांनी पोपटाचे पार्थिव सजवले होते. सर्वांनी आपल्या गजाच्या गाड्यांनी उगंच त्या गोठ्यासमोर दोन- चार राऊंड मारून अंतयात्रेचे स्वरूप दिले. ठरलेल्या जागी एक गड्डा करून तिथे पोपटाला गाडले.
सर्वांनाच दु:ख झाले होते. पण आता हे झाल्यावर पुढे काय करायचे, याची तिथेच चर्चा सुरू झाली. छोटं स्मारक बनवू किंवा अजून काहीतरी करता येईल काय, याचा विचारही झाला. बहुदा त्या पोपटाचं पटकन जाणं आम्हा बच्चे कंपनीला पचलं नसावं. त्यामुळे त्याला पुरल्यानंतर लगेच खेळात रमावं असं काही कुणाला वाटतंच नव्हतं. त्यामुळे त्या दिवशी संध्याकाळी एक- दोन मेंबर सोडता बाकी सगळ्यांनी काही न खेळताच घरचा रस्ता धरला. एक दोघं बाजूच्या गल्लीत जाऊन लपून खेळले, याची बातमी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमच्या कानावर आली होती खरी. पण फार कुणी मनावर घेतलं नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे खेळायला सगळे जमले. पण खेळ रंगतच नव्हता. आपण सगळं केलं पण पोपटाचा दिवस घातला नाही, अशी एक शंका एकाने उपस्थित केली. आता दहा दिवस आपण सुतकात राहायचं की काय, यावर दुसºया एकानी त्याला वेड्यात काढलं. पण दिवस घालणं ही कल्पना मात्र सगळ्यांनाच पटली होती. प्रियजनांचे दिवस घालणे ही जर प्रथा असेल, तर पोपट आमचा प्रियच होता. या लॉजिकने पोपटाचा दिवस आजच घालून टाकायचा, असा ठराव पास झाला.

त्याच्या तयारीसाठी प्रत्येकाने काही पैसे गोळा करायचे ठरविले. पण ते काही जमलं नाही. आमच्यातल्या दोघा- चौघा धनिकांनी एकत्र येऊन छोटी रक्कम जमविली. दिवस कसा घालायचा, याच्यावर सुरूवातीला मतभेद होते. पण फक्त काहीतरी खायचं, दोन मिनिटं मौन पाळायचं आणि दुखवटा उतरवायचा, हे सुसंगत वाटत होतं. ठरल्याप्रमाणे एकदोघांनी चिवडा विकत आणला. एकाने घरातली ज्वारी देऊन त्या बदल्यात थोडी बडीशेप विकत आणली. गेलेल्या व्यक्तीचा प्रिय पदार्थ काय ठेवायचा, यावर मिरची इतका दुसरा उत्तम पर्याय नव्हता. आमच्या टोळीतले बरेच जण कच्या मिरच्या खाणारे होते आणि काही जणं ‘तुंपघंट’वाले होते. त्यामुळे कच्च्या मिरच्या खाणे सर्वांनाच जमणारे नव्हते. गावात एका टपरीत मिरचीच्या आकाराची आणि रंगाची मिठाई मिळायची. ती गेलेल्या व्यक्तीचा प्रिय पदार्थ म्हणून ठेवण्यात आली. या सर्व कार्यात मदत केलेल्या आमच्या सवंगड्यांना रितीरिवाजाप्रमाणे निमंत्रणही धाडण्यात आली.

हा सर्व लवाजमा घेऊन आम्ही आमच्या जुन्या वाड्याच्या बंगल्यात जमलो. वाड्याच्या पहिल्या मजल्याला आम्ही बंगला म्हणायचो. लग्नकार्याप्रसंगी आलेले पाहुणेरावळे किंवा दिंडी गावात उतरली की त्यांची व्यवस्था या बंगल्यातच केली जायची. इतर वेळी तो रिकामाच असायचा. पोपटाचा फोटो तर काही आमच्याकडे नव्हता. म्हणून मग नुसतेच मनातल्या मनात पोपटाचे स्मरण करून उदबत्ती ओवाळली. शोकाकूल वातावरणात सर्व मंडळींची पंगत बसली. चिवड्यावर, गोड मिरच्यांवर आणि नंतर बडीशेपवर यथेच्च ताव मारून झाला. मग निघायची वेळ झाली. आम्हा दोघा- तिघा आयोजकांना सोडल्यास बाकीच्या मंडळींनी फक्त आस्वाद घेण्याकरता या दिवसाला हजेरी लावली आहे, हे त्यांच्या खाण्याच्या गतीवरून लक्षात आल्याने फारच राग आला होता. पण निरोपाच्या आधी दोन मिनिटाचे मौन व्रत घेण्यात आले होते. त्यात हा राग गळून पडला.

गेल्या तीन दिवसांपासून पोपटाची केलेली सुश्रुषा, तो गेल्याने झालेले दु:ख आणि त्याचा घातलेल्या दिवसाची लगबग याने आम्ही खेळ जणू विसरूनच गेलो होतो. पण आता पोपटाचे सर्व क्रियाकर्म पार पाडून आणि दुखवटा संपवून आम्ही सर्व मंडळी खेळासाठी पुन्हा मोकळे झालो होतो.

थोड्याच वेळात परत सर्व मंडळी गल्लीत खेळायला जमा झालो. पण सर्वांची नजर मात्र लिंबाकडेच होती. काहींना पोपटरूपी मित्राची आशा होती, तर काहींना पोपटाचा दिवस खाण्याची हाव.

बालकथाअनुभव

प्रतिक्रिया

शेखरमोघे's picture

7 May 2020 - 6:45 pm | शेखरमोघे

इतक्या तन्मयतेने पुन्हा जुन्या आठवणी छान लिहिल्या आहेत. आवडल्या.
‘तुंपघंट’वाले म्हणजे काय हे मात्र कळले नाही.

हृषीकेश पालोदकर's picture

11 May 2020 - 12:17 pm | हृषीकेश पालोदकर

कमी तिखट खाणार्यांना उपरोधाने घट्टतूप खाणारे या अर्थाने "तुम्पघंट" वापरतात.

हृषीकेश पालोदकर's picture

11 May 2020 - 12:18 pm | हृषीकेश पालोदकर

धन्यवाद

अर्धवटराव's picture

8 May 2020 - 12:25 am | अर्धवटराव

एकदम चित्रदर्शी झालं प्रकटन.

योगी९००'s picture

8 May 2020 - 9:41 am | योगी९००

एकदम छान लिहीलेय.. असं वाटत होतं की मी पण तुमच्यातच होतो.

लहान मुले कसे विचार करतात हे सुद्दा छान मांडले आहे. पण पोपटाच्या जाण्याचे फार वाईट वाटले.

पण एक शंका की कोणीच मोठी माणसे पोपटाच्या मदतीला आली नाहीत?

हृषीकेश पालोदकर's picture

11 May 2020 - 12:27 pm | हृषीकेश पालोदकर

धन्यवाद.
मोठी मंडळी दिवसभर शेताकोतात किंवा बाहेर असायची.
मुलांच्या खेळात फार लक्ष पण देत नसत.

Nitin Palkar's picture

8 May 2020 - 1:39 pm | Nitin Palkar

लंपनची आठवण आली....

चांदणे संदीप's picture

8 May 2020 - 1:49 pm | चांदणे संदीप

माझ्या लहानपणी पण असाच एक किस्सा घडलेला. त्यामुळे उजळणी झाल्यासारखं वाटलं. लंपनही आठवलाच!

अजून लिहा.

सं - दी - प

हृषीकेश पालोदकर's picture

11 May 2020 - 12:29 pm | हृषीकेश पालोदकर

धन्यवाद.
लहानपणीच्या अश्या गमती जमतीच कायम लक्षात राहतात.

ऋतु हिरवा's picture

8 May 2020 - 5:04 pm | ऋतु हिरवा

एका पोपटाला वाचवण्याचे तुम्ही प्रयत्न केले ते वाचून खूप कौतुक वाटले.

हृषीकेश पालोदकर's picture

11 May 2020 - 12:31 pm | हृषीकेश पालोदकर

धन्यवाद

आम्हीही लहानपणी एका चतुराची अंत्ययात्रा काढून त्याला अग्नी दिला होता हे आठवले. लेख आवडला. लहान मुलांचे भावविश्व, त्यांची विचार करण्याची पद्धत, आजूबाजूच्या जगाचे निरीक्षण करून त्याचे अनुकरण आपल्या पद्धतीने करण्याची धडपड हे सारे छान उतरवले आहे. अरुंधती रॉय यांच्या 'द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' मधील अशाच लहानग्यांच्या मनोव्यापाराची आठवण झाली.

हृषीकेश पालोदकर's picture

11 May 2020 - 12:36 pm | हृषीकेश पालोदकर

बोलक्या प्रतिक्रीयेसाठी धन्यवाद.
चतुराची अंतयात्रा आणि अग्नी...निरागस.
अरुंधती रॉय यांचे पुस्तक वाचलेले नाही....पण वाचायला हवे.

सचिन's picture

11 May 2020 - 5:39 pm | सचिन

छानच लिहिलय !!! लहानपणीच्या काही आठवणी जग्या झाल्या.
पण एक छोटीशी दुरुस्ती : पक्षाच्या, पक्षांची, पक्षाला नसून पक्ष्याच्या, पक्ष्यांची, पक्ष्याला असे हवे. (कारण मूळ शब्द "पक्षी" आहे, पक्ष नव्हे).
अनाहूतपणाबद्दल आधीच क्षमा !

सचिन's picture

11 May 2020 - 5:41 pm | सचिन

छानच लिहिलंय !!! लहानपणीच्या काही आठवणी जाग्या झाल्या.
पण एक छोटीशी दुरुस्ती : पक्षाच्या, पक्षांची, पक्षाला नसून पक्ष्याच्या, पक्ष्यांची, पक्ष्याला असे हवे. (कारण मूळ शब्द "पक्षी" आहे, पक्ष नव्हे).
अनाहूतपणाबद्दल आधीच क्षमा !

हृषीकेश पालोदकर's picture

18 May 2020 - 12:59 pm | हृषीकेश पालोदकर

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तुम्ही सुचवलेली दुरुस्ती खूप योग्य आहे.
सुधारणा करतो.