उंदरांची शर्यत -२

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
25 Sep 2019 - 8:33 pm

उंदरांची शर्यत (RAT RACE) -२

उंदरांची शर्यत -२

मी विक्रांत वर असताना (१९९०) माझा एक मित्र लेफ्टनंट कमांडर नरेश राणा (हा हॅरियर या लढाऊ विमानाचा वरिष्ठ वैमानिक आणि प्रशिक्षक होता.) याने मला एक प्रकाशचित्र दाखवले. त्यात एकाच फ्रेम मध्ये तीन विमाने होती. सर्वात पुढे मिराज २०००, मध्ये हॅरियर ( ज्यात हा स्वतः होता) आणि सर्वात शेवटी HPT ३२ हे पुढे पंखा असलेले (प्रोपेलर) विमान होते. हा फोटो पाहून मी त्याला आश्चर्याने विचारले कि हा फोटो कसा काढला ( तेंव्हा फोटोशॉप हा शब्द फारच क्वचित कुणी ऐकला असेल).

कारण मिराज २००० चा स्टॉल स्पीड (कमीत कमी वेग ज्या पेक्षा कमी वेगाला इंजिन बंद पडते) हा ताशी २६० किमी आहे तर HPT ३२ चा सर्वात जास्त वेग २८० किमी आहे.हॅरियर हे विमान हेलीकॉप्टर सारखे सरळ वर जाऊ शकते आणि हवेत तरंगू शकते त्याचा सर्वात जास्त वेग ताशी ११८२ किमी आहे. आणि कमीत कमी वेग ० किमी.

त्यावर नरेशनी मला सांगितले कि हा फोटो घेण्यासाठी मिराजच्या आणि HPT ३२ वैमानिकाना फार कष्ट घ्यावे लागले. कारण तिन्ही विमाने एकाच तसबिरीत येण्यासाठी मिराजला आपले इंजिन बंद पडणार नाही यासाठी काळजी घ्यावी लागत होती तर HPT ३२ ला पूर्ण वेगात चालवून इंजिन गरम होऊन बंद पडेल का याची भीती वाटत होती. हा फोटो काढेपर्यंत HPT ३२ चे इंजिन बर्न आउट होईल या परिस्थितीत आले होते. फोटो काढल्यावर ताबडतोब त्या विमानाने आपला वेग अगदी कमी केला आणि कसे बसे ते विमानतळावर उतरवले.

१) माझ्याकडे आमच्या परिचयातील एक होतकरू आणि अतिशय हुशार मुलगा, चिन्मय वय वर्षे २७, आला होता. त्याचा रक्तदाब १५०/९४ झाला होता आणि त्याला चक्कर करत होती. डोक्यात घाव पडत होते. हातपाय गार पडले होते. त्याची पूर्ण तपासणी केली तेंव्हा त्याला कोणताही शारीरिक आजार नव्हता. उगाच धोका नको म्हणून मी त्याला शीरेतून ग्लुकोज दिले. अर्थात त्याने फारसा फरक पडला नाही. त्याचे डोळे सारखे फडफडत होते. तोंडाने तो काहीतरी बोलायचं प्रयत्न करत होता. हात पाय सारखे हलत होते आणि तो मला काहीतरी होतंय काही तरी होतंय म्हणत होता. मी त्याला बसवले, प्यायला पाणी दिले आणि त्याला एक ग्लास इलेक्ट्राल प्यायला दिले धीर दिला. थोड्या वेळानें तो व्यवस्थित झाला. त्याचा रक्तदाब सुद्धा कमी झाला.
हि त्याची स्थिती मुलुंड स्थानकात झाली होती. गाडीतून उतरल्यावर अशी स्थिती झाली तेंव्हा लोकांनी त्याला मदत करून माझ्या दवाखान्यात आणले. त्याची परत व्यवस्थित तपासणी केली असता त्याला कोणताही शारीरिक आजार नव्हता. मला असे जाणवत होते कि हा त्याचा आजार मानसिक असावा. तरीही मी त्याच्या काही मूलभूत चाचण्या करून घेतल्या. ज्यात रक्त चाचण्या, स्ट्रेस इको कार्डिओग्राफी आणि फुप्फुसांची क्षमता( PFT) इत्यादी होते. या सर्व चाचण्या व्यवस्थित होत्या. यानंतर मी त्याचे समुपदेशन केले. त्यात काही आश्चर्यकारक गोष्टी बाहेर आल्या.
हा मुलगा अतिशय हुशार होता यात शंकाच नव्हती परंतु आपला एकुलता एक मुलगा म्हणून त्याची आई त्याच्या आयुष्याच्या घोड्यावर स्वार होऊन त्याला धावडवत होती. याला आय आय टी च्या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात काही प्रवेश मिळाला नाही. परंतु त्याला कोणत्याही चांगल्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला असता. परंतु आपल्याला मुंबई आय आय टी मध्येच जायचे आहे हे त्या मुलावर बिम्बवले गेले होते म्हणून त्याने एक वर्ष ढोर मेहनत करून ती प्रवेश परीक्षा परत दिली. या वेळेस त्याला प्रवेश मिळाला परंतु त्याचा यादीतील क्रमांक १५०० च्या आसपास आला होता. पण मुंबई आय आय टी मध्येच जायचे आहे मग तेथे उपलब्ध असलेल्या जागांपैकी ५ वर्षाच्या मेटॅलर्जी मध्ये थेट एम टेक साठी प्रवेश मिळवला. तेथे पण इलेक्ट्रिकल किंवा कॉम्पुटर मध्ये शाखा बदलण्यासाठी त्याने पहिल्यावर्षी ढोर मेहनत केली. परंतु तसा प्रयत्न तेथे असलेले सर्वच करत असल्याने त्याला काही शाखा बदलून मिळाली नाही.मग सतत उत्तम सीजीपीए मिळ्वण्यासाठी एकंदर पाच वर्षे त्याने प्रचंड मेहनत केली. या उत्तम सीजीपीए वर त्याला एका बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये महिना २ लाखाची नोकरी मिळाली. या कंपनीत तो दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करीत काम करत होता. परंतु त्या कंपनीला अपेक्षित असणारी कामगिरी त्याला झेपेना. शेवटी दोन वर्षांनी कंपनीने त्याला राजीनामा द्यायला सांगितले. आता याने एका भारतीय कंपनीत नोकरी धरली. तेथे पगार महिना दीड लाख होता परंतु त्यांनी त्याला चांगले काम केल्यास अधिकचा ६ लाख रुपये बोनस देऊ असे आश्वासन दिले होते.
आज तो माझ्याकडे आला ते त्याला कंपनीने सध्या परिस्थिती चांगली नाही तेंव्हा तुला ते ६ लाख रुपये देता येतीलच याची खात्री नाही असे असून सुचवले होते. याचा प्रचंड तणाव घेऊन हा मुलगा अशी शारीरिक स्थिती घेऊन माझ्याकडे आला होता. यावर त्याची आई तुला नको असेल तर सोडून दे नोकरी म्हणून सुचवत होती. त्याने घर घेतले आहे वडील निवृत्त आहेत. त्यांना निवृत्ती वेतन नाही. आई गृहिणी अशा स्थितीत नोकरी सोडून देणे हि काही सोपी गोष्ट नाही. आणि लगेच दुसरी त्याच तोलामोलाची नोकरी मिळणे सोपे नाही. बाजाराची परिस्थिती माहिती नसता याची आई आपल्या इच्छा आकांक्षा त्याच्यावर लादून त्याला पळवते आहे हि वस्तुस्थिती
एक दोन वेळा त्याच्याशी बोलल्यावर त्याची मानसिक स्थिती माझ्या लक्षात आल्यावर मी त्याला एका उत्तम मानसोपचार तज्ज्ञाकडे पाठवले आहे. तेथे त्याचा इलाज उत्तम तर्हेने होऊन त्याला आता असा त्रास होणे बंद झाले आहे.

२) मागच्या आठवड्यात असाच एक मित्र माझ्या कडे सल्ल्यासाठी आला होता. त्याच्या मुलाचा रक्तदाब वाढला आहे म्हणून १६०/१०० वय २६ फक्त. त्या मित्राचा मुलगा सी ए होऊन एका प्रथितयश कंपनीत नोकरीला आहे. त्याचे कॉलेजमधीलच एका मुलीबरोबर प्रेम होते आता तिच्याशीच लग्न झालंय . त्यांनी स्वतःचे पुण्यात घर घेतले आहे. दिसायला सर्व दृष्ट लागण्यासारखे आहे. त्या मुलाची पूर्ण रक्त तपासणी केली असता बाकी सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत. नवरा बायको मध्ये सकृतदर्शनी तणाव नाही. आईवडिलांपासून दोघे वेगळेच राहत आहेत.
मग प्रश्न काय आहे?
मुलाचे आणि मुलीचे प्रेम होते.मुलीचे वडील स्वतः सी ए असून एका मोठ्या कंपनीत संचालक आहेत. भरपूर पैसे मिळतात. याचा मेहुणा पण सी ए आहे आणि तो सुद्धा पुण्यात एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे. माझा मित्र मध्यमवर्गीय स्थितीतील आहे तर याचे सासू सासरे उच्च मध्यमवर्गीय ते उच्च वर्गीय यात आहेत. मुलाला मुलीशी लग्न करायचे होते म्हणून त्याने खूप मेहनत करून यशस्वीपणे सी ए केलं. त्यानंतर त्याला चांगली नोकरी पण लागली. या नोकरीत तो प्रचंड मेहनत करतो आहे त्यामुळे सलग त्याला तीन वर्षे उत्तम कर्मचारी म्हणून पारितोषिक मिळाले आहे.( नोकरी जाण्याची अजिबात भीती नाही) तरीही आपल्या क्षमतेपेक्षा जास्त धावून हा मुलगा उरी फुटतो आहे. कारण बायको लहानपणापासून उच्च वर्गातील असल्यामुळे तिच्या अपेक्षा जास्त आहेत.खर्च हि जास्त आहेत (कदाचित तुलना वडिलांशी होते आहे) मुलगी सुद्धा अतिशय सालस आहे पंरतु आपला खर्च जास्त आहे असे तिला वाटत नाही कारण त्याची तिला लहानपणापासून सवय आहे. आणि हा मुलगा या अपॆक्षाना पुरे पडण्यासाठी आणि स्वतःला लायक सिद्ध करण्यासाठी फार कष्ट करतो आहे. त्यातून त्याचा रक्तदाब वाढला आहे.
त्याला मी समुपदेशनासाठी बोलावले आहे. पाहू या येतोय का?

या दोन्ही बाबतीत मला HPT ३२ या विमानाची आठवण होते. फार कष्टाने हे विमान एक वेग गाठू शकते आणि तो वेग फार वेळ ठेवला तर त्याचे इंजिन जळून जाण्याचा धोका असतो.

आपली कुवत आणि मानसिक स्थिती पाहून जर हि मुले काम करतील तर थोडे कमी पैसे मिळाले तरी तणावमुक्त आणि सुखी जीवन जगू शकतील.

या दोन्ही मुलांच्या बाबतीत असेच होताना मला स्पष्टपणे दिसते आहे. दोन्ही मुले जवळच्या व्यक्तींच्या अपेक्षाना पुरे पाडण्यात उरी फुटत आहेत. एवढा तणाव घेऊन तारुण्यातच वृद्धत्व येणारी माणसे या पिढीत बरीच दिसतील अशी शंका मला भेडसावते आहे.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

राजे १०७'s picture

25 Sep 2019 - 8:55 pm | राजे १०७

किती सुंदर रित्या उदाहरणं देऊन समजावलं आहे. अलीकडे चंगळवाद आणि भौतिक वाद यामुळे माणूस स्वत:वर ओझं लादून घेतो व धावत सुटतो. धन्यवाद.

जॉनविक्क's picture

25 Sep 2019 - 9:26 pm | जॉनविक्क

अशी बरीच उदा बघितली आहेत. अंथरूण बघूनच पाय पसरावेत हेच खरे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Sep 2019 - 10:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर विवेचन !

विद्यार्थी असताना सतत प्रत्येक परिक्षेतल्या गुणांची आणि नंतर उत्पन्न आणि पद यांची तुलना करत राहणे ही सद्या एखाद्या व्यसनासारखीच घातक सवय झाली आहे... आणि तिच्यापुढे जीवनातले सुखाचे क्षण जगण्याचा विसर पडत आहे ! :(

टीपीके's picture

26 Sep 2019 - 12:03 am | टीपीके

हे थोडा ससा आणि कासवाच्या गोष्टी सारखा होतंय कमी वयात खूप धावायचं पण थकून जायचं. इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात लोकांचा वेळ जातो. स्वतःसाठी कधी जगतच नाही. शेवटी योग्य जोडीदार मिळण्यासाठी पण नशीबच लागत असं म्हटलं पाहिजे

विजुभाऊ's picture

26 Sep 2019 - 1:19 pm | विजुभाऊ

खरे आहे. दुर्दैवाने आपल्या इथे पालकांना त्यांचे मूल हे डॉक्टर किंवा इंजीनीयरच हवे असते.
यात मुलाच्या क्षमतेचा , आवडीचा विचारच केला जात नाही.
बरीच नवी निघालेली इंजीनीयरिम्ग कॉलेजानी यात भरच घातली. परीणाम पहातो आहोतच.
त्या नंतर आय टी क्षेत्राची भार पडली. बेसीक सायन्सेस विसरून सगळे त्या मागे लागले.

परिस्थिती च अशी निर्माण केली गेली की मुलांचे बालपण कोमेजून गेले .
सर्व क्षेत्रात झालेलं स्थित्यंतर ह्याला जबदार आहे .
सामाजिक रचना बदली,आर्थिक क्षेत्र बदली,स्पर्धा जीव घेनी झाली आहे हे कसे आणि कधी घडल हे सुद्धा जाणवलं नाही .
त्या आई,वडील सुद्धा परिस्थिती च्या रेट्या समोर हतबल झाले .
सर्व समजत आहे काय चुकतंय ते पण पाण्याच्या प्रवाह बरोबर वाहत जावे लागत तसे परिस्थिती च्या प्रवाहात वाहत जावे लागत आहे .
आमच्या पिढीच बालपण हे बालपण होते .
अभ्यास चे प्रेशर नाही .जीवघेणी स्पर्धा नाही .
शाळेतून घरी आले की दप्तर टाकून देणे आणि मोकळ्या मैदानात खेळायला जाणे,

परिस्थिती च अशी निर्माण केली गेली की मुलांचे बालपण कोमेजून गेले .
सर्व क्षेत्रात झालेलं स्थित्यंतर ह्याला जबदार आहे .
सामाजिक रचना बदली,आर्थिक क्षेत्र बदली,स्पर्धा जीव घेनी झाली आहे हे कसे आणि कधी घडल हे सुद्धा जाणवलं नाही .
त्या आई,वडील सुद्धा परिस्थिती च्या रेट्या समोर हतबल झाले .
सर्व समजत आहे काय चुकतंय ते पण पाण्याच्या प्रवाह बरोबर वाहत जावे लागत तसे परिस्थिती च्या प्रवाहात वाहत जावे लागत आहे .
आमच्या पिढीच बालपण हे बालपण होते .
अभ्यास चे प्रेशर नाही .जीवघेणी स्पर्धा नाही .
शाळेतून घरी आले की दप्तर टाकून देणे आणि मोकळ्या मैदानात खेळायला जाणे,
तरी त्या काळातील लोकांना उत्तम यश मिळवलं सर्व क्षेत्रात

जॉनविक्क's picture

26 Sep 2019 - 7:20 pm | जॉनविक्क

तरी त्या काळातील लोकांना उत्तम यश मिळवलं सर्व क्षेत्रात

या काळातील लोक ज्युपिटरवरून आले का ? ते तर त्याच काळातील मुलं आहेत. तरीही...

सुबोध खरे's picture

27 Sep 2019 - 10:01 am | सुबोध खरे

माझ्या अकरावी बारावीच्या वर्गातील मुलाने १९८०-८२ अभियांत्रिकीला जायचे होते पण आईने सक्ती केली म्हणून डॉक्टर झाला पण तो मानसिक तणाव न झेपल्याने त्याने आत्महत्या केली.
तेंव्हा तो काळ चांगला होता आणि आताच काळ वाईट असे मला तरी अजिबात वाटत नाही. उलट पूर्वीचा काळ तितका चांगला नव्हता आणि आताच काळ जास्त चांगला आहे आणि येणार काळ अजूनच चांगला असेल असा माझा ठाम विश्वास आहे.

हा लेख लिहिण्याचे कारण आपला भविष्यकाळ अधिक चांगला कसा करता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे.

या आपल्या मुलाची कुवत ओळखण्यात आपण कमी पडू नये आणि मुलाला जीवघेण्या शर्यतीत टाकून उरी फुटू नये हि इच्छा आहे.

जाता जाता -- कासवाला झाडावर चढण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायला लावला तर ते कायमच नापास होत राहील आणि आपण आयुष्य जगण्याच्या लायकीचे नाहीत असाच गंड निर्माण होऊ शकतो.

फेरफटका's picture

26 Sep 2019 - 7:45 pm | फेरफटका

चांगला विषय आहे. मी उगाच पूर्वी फार छान होतं आणी आता सगळं बिघडलं असा सूर लावणार नाही. कारण भूतकाळ नेहमीच रम्य / सोपा असतो, कारण तो जगून झालेला असतो आणी काळानुरूप गोष्टी बदलणं / evolve होणं हे नैसर्गिक आहे.

परंतू, आपल्या पायाची ताकद न ओळखता धावणार्यांची संख्या जगात अफाट आहे. किंबहूना तसं न करणारे विरळा. त्यातून भारतासारख्या देशात, जिथे अफाट लोकसंख्या आहे, प्रत्येक गोष्टीला अनेक पर्याय (मॅनपॉवर) आहेत, तिथे ही स्पर्धा कितीही दुर्दैवी असली तरी अनिवार्य ठरते. आवडीचं काम करून, अपेक्षेप्रमाणे जीवन जगण्याची इच्छा खूप कमी प्रमाणात पूर्ण होते. जोपर्यंत उप्लब्ध संधी आणी उमेदवार (opportunity seekers) चं प्रमाण व्यस्त आहे, तोपर्यंत, अगदी वैय्यक्तिक पातळीवर ह्या रॅट रेस मधून बाहेर पडायचा निर्णय घेतला नाही, तर त्या रेट्याबरोबर धावलंच जाईल.

जॉनविक्क's picture

26 Sep 2019 - 10:42 pm | जॉनविक्क

जोपर्यंत उप्लब्ध संधी आणी उमेदवार (opportunity seekers) चं प्रमाण व्यस्त आहे, तोपर्यंत, अगदी वैय्यक्तिक पातळीवर ह्या रॅट रेस मधून बाहेर पडायचा निर्णय घेतला नाही, तर त्या रेट्याबरोबर धावलंच जाईल.

नेमकं.

दुर्गविहारी's picture

26 Sep 2019 - 9:42 pm | दुर्गविहारी

सुन्न आणि खिन्न करणारे अनुभव.

अर्धवटराव's picture

27 Sep 2019 - 8:36 am | अर्धवटराव

रॅट रेस तर आहेच. त्यावर समुपदेशन करणारे आपापल्या परिने फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावायचा प्रयत्न करतात. पण यातले बहुतेक उपाय म्हणजे आग लागल्यावर विहीर खोदण्यासारखे असतात. परिणाम होतो, नाहि असं नाहि, पण फार सिलेक्टीव्हली.

खरे साहेब खरच सांगताहेत (अब ये भी कोई केहेनेकी बात हुई भला ;) ). प्रत्येक विमानाची क्षमता वेगेवेगळी असते. त्यामुळे त्यांचा प्रवास देखील वेगवेगळाच होणार. पण क्षमतांची वृद्धी करण्याची सवय अगदी लहानपणापासुन लागली तर संतुलीत जीवन जगणं तुलनेने सोपं करता येईल. पाण्यात तर प्रत्येकाला उतरावं लागणार आहे. कुणाला खोल पाणि लागेल, कुणाला वेगवान प्रवाहाचा सामना करावा लागेल. पण अगदी लहानपणापासुन रोज जर जगण्यातली ३० मिनीटे पोहोण्याचा सराव केला तर गटांगळ्या खाऊन गुदमरण्याची शक्यता कमि करता येईल. वाटल्यास अर्धा तास कमि झोपावं, शालेय अभ्यास कमि करावा, मनोरंजन कमि करावं... पण ५० सूर्यनमस्कार आणि १५ मिनीटे ध्यानाची प्रॅक्टीस.... एव्हढी सवय वयाच्या १२-१३ व्या वर्षापासुन मुलांना लावावी. तसं बघितलं तर वयाच्या कुठल्याही टप्प्यावर हा अभ्यास सुरु करावा. शरीर आणि मनाला फुल्ल रिचार्ज करणारं हे टॉनीक जन्मभर घ्यावं. हा विजयाचा हमखास उपाय वगैरे नाहि.. पण जिद्दीने लढायची सोय करणरा उपाय खात्रीने आहे.
असो.

कानडाऊ योगेशु's picture

27 Sep 2019 - 9:27 am | कानडाऊ योगेशु

आयचा घो डॉक्टर!(काही चांगले वाचले/पाहिले/ऐकले कि हेच शब्द बाहेर पडतात त्याबद्दल क्षमस्व :) )
मी शेवटपर्यंत तोच विचार करत होतो कि विमानांचे पहिले उदाहरण का दिले आहे.?
अगदी चपखल बसले आहे.
तुमच्यात एक निष्णात दिग्दर्शक दडला आहे डॉक्टर साहेब.

स्वधर्म's picture

27 Sep 2019 - 10:39 am | स्वधर्म

डॉक्टर साहेब. तुमची शैलीपण छान अाहे.
समस्या गंभीर तर खरी, अाणि यावर अापण अाणि काही मंडळींनी उपायही सुचवले अाहेत. ते सगळे अापल्या मुलांभोवती केंद्रीत अाहेत. असायलाच हवेत. पण याबरोबरच अाणखी एक उपाय मला सांगावासा वाटतो, जो अापण सर्वांनीच करण्यासारखा अाहे. डॉक्टर, सीए किंवा अायअायटी मधल्या मुलांना अापण समाजात खूप म्हणजे खूपच मान देतो, त्याऐवजी त्यांना अगदी इतर मुलांसारख्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. त्याचीच दुसरी बाजू म्हणजे अापण कंपनीतल्या स्वच्छता कामगाराबरोबर वागताना अाणि एखाद्या अाधिकार्यासोबत वागताना जसा फरक नकळत करतो, तसा करणे सोडले पाहिजे. याला समाजातील ‘पॉवर डिस्टन्स’ असे म्हणतात. हे अापल्या समाजात खूप अाहे, अाणि ते सर्वांनी मिळून कमी करण्याची गरज अाहे.

जाता जाता मला स्वत:ला अाय अाय टीत शिकण्याची संधी मिळाली, अाणि अाजवर त्याचा खूप फायदा मिळत गेला. तिकडे अक्षरश: गुरासारखे राबवून घेतात, अाणि त्याचाच परिणाम बहुतेकांवर सकारत्मक होतो. क्वचित काहींना नकारात्मक परिणाम भोगावे लागतात. पण नेहमी त्या ब्रॅंडचा फायदा मिळतो अाहे हे समजते. अात्ताही अामच्या कंपनीत टिअर १ संस्थांमधून अालेल्या मुलांना टिअर २ संस्थांमधून अालेल्या मुलांपेक्षा ३०-४०% कमी पगार दिला जातो. हे पटत नाही, पण वास्तव अाहे.

जॉनविक्क's picture

27 Sep 2019 - 11:22 am | जॉनविक्क

कंपनीत टिअर १ संस्थांमधून अालेल्या मुलांना टिअर २ संस्थांमधून अालेल्या मुलांपेक्षा ३०-४०% कमी पगार दिला जातो

ऑफकोर्स दे हॅव देर रिजन्स, पण... तरीही हे पटत नाहीच. नोकऱ्या तर सोडाच पण सध्या स्टार्टअप चा जमाना आहे आणी तुम्ही कितीही बंडल आयडिया घेऊन या जर तुम्ही IIT तून आलेले असाल तर VC तुमच्यासाठी लाल गालीचे अंथरतातच.

सुबोध खरे's picture

27 Sep 2019 - 8:31 pm | सुबोध खरे

अात्ताही अामच्या कंपनीत टिअर १ संस्थांमधून अालेल्या मुलांना टिअर २ संस्थांमधून अालेल्या मुलांपेक्षा ३०-४०% कमी पगार दिला जातो. हे पटत नाही, पण वास्तव अाहे.
समजलं नाही
उलटं झालंय का?

असो चांगल्या संस्थेतून शिक्षण केलं असल्यास दोन गोष्टी असतात.

१) गुणवत्तेवर प्रवेश असल्यास काही किमान पातळीची गुणवत्ता लागतेच.
२) चांगल्या संस्था शिक्षणाची किमान पातळी तरी कायम ठेवून असतात.

त्यामुळे अशा संस्थातून शिकलेले विद्यार्थी हे नक्कीच एका पातळीच्या वरचे असतात म्हणून चांगल्या संस्थातून शिकलेल्या मुलांना इतर संस्थांपेक्षा निदान सुरुवातीला जास्त पगार मिळतो.
बाकी ब्रँड व्हॅल्यू तर नक्कीच असते. कारण रेमंडचा कापड म्हणजे काही तरी दर्जाचा नक्की असतो तसंच आहे हे.

गमतीची गोष्ट म्हणजे ब्रँड व्हॅल्यूची किंमत मला सुद्धा कळली केंव्हा? जेंव्हा लष्करातून बाहेर पडलो आणि कॉर्पोरेट जगात आलो तेंव्हा.

आणि दुसऱ्यांदा गम्मत म्हणजे आमची मुलांचे मित्र मैत्रिणी जेंव्हा वैद्यकीय प्रवेशाच्या परीक्षा देत होते तेंव्हा आमच्या मुलांनी माझे वडील ए एफ एम सी मधून एम बी बी एस आणि एम डी झाले आहेत असे सांगितले तेंव्हा त्यांच्या मित्र मैत्रिणीचे चेहरे "आजी मी ब्रम्ह पाहिले" असे झालेले पाहिले.

तोवर त्यांचा दृष्टिकोन हा "अंकल जनरेशनचा बोअरिंग माणूस आहे" असाच होता

आज जी जीवघेणी शर्यत चालू आहे त्याचा उध्येश
१) ज्ञान प्राप्ती करणे हा आहे.
२) मानवी जीवन सुखाचे होण्या साठी आहे .
३) उत्तम चरित्र असणारी व्यक्ती तयार करण्या साठी आहे .
कशा साठी आहे .
आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी ही स्पर्धा चालू आहे .
जो ज्ञानी आहे तो यशस्वी नाही जो आर्थिक बाबतीत वरचढ आहे तो यशस्वी आहे असे समजले जाते .
तुम्ही काय करता त्या पेक्षा तुमच्या कडे पैसा किती आहे हे तुम्ही यशस्वी आहात की अपयशी हे ठरवले जाते .
आयआयटी मध्ये देशात पहिला येवून जर तुम्ही महिना १ करोड कमवत आसल आणि बाकी किरकोळ काम करून कोण्ही महिना २ करोड कमवत असेल तर आयआयटी वाला शिक्षित आहे म्हणून समाजात त्याची किंमत वाढत नाही

सुबोध खरे's picture

27 Sep 2019 - 7:24 pm | सुबोध खरे

किरकोळ काम करून कोण्ही महिना २ करोड कमवत असेल
अशी तरुण मुले भारतात नगण्य असतील.

आय आय टी मधून उच्च विषयात उच्च गुणांनी पास झाल्यास लाख दीड लाख रुपये महिन्याची नोकरी सहज लागू शकते. आणि या साठी बापाकडे पैसे नसले तरी चालतात. या तुलनेत त्याच्या दुप्पटच ( कोटी रुपये नव्हे) पैसे व्यवसाय धंद्यात मिळवण्यासाठी भक्कम भागभांडवल लागते. आणि त्याला बराच काळ (काही वर्षे) सुद्धा जावा लागतो. वयाच्या २१-२२ व्या वर्षी दीड लाख रुपये महिना व्यवसायात मिळवणारी मुले हाताच्या बोटावर सुद्धा मिळणे कठीण आहे

परंतु अशी काही शेकडा मुले आय आय टी मधून पास झालेली दर वर्षी मिळवत असतात. हि त्यांच्या बुद्धीची बाजारात असलेली किंमत आहे हे आपण मान्य करा.

आपल्या अतिशय हुशार मुलाला उरापोटी कर्ज काढून आई बाप आय आय टी मध्ये पाठवण्याचे स्वप्न पाहतात. त्यातून या गरिबीतून आपल्या कुटुंबाची सुटका होईल हे स्वप्न त्यांना क्लास वाले दाखवतात.

( अशीच दिवा स्वप्ने शेअर बाजार, अँमवे सारख्या MLM कंपन्या, लाख रुपयाची गादी विकणारे आणि विविध लिंग/ स्तन वर्धन करणाऱ्या कंपन्या दाखवत असतात)

या वस्तुस्थिती मुळे त्या परीक्षेसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात भारतभर मुले बसतात. आणि मग त्याच्या क्लासचा बाजार चालू होतो.

दुर्दैवाने आय आय टी ला मिळाली नाही तर आयुष्य फुकट गेले असे काही तरी विचित्र विचार आई बाप स्वतः करतात आणि तेच विचार मुलांच्या मनात रुजवतात. मग हि मुले पण या जीवघेण्या स्पर्धेत भाग घेतात.

दरवर्षी कोटा येथे होणाऱ्या आत्महत्या हे या हिमनगाचे वरचे टोक आहे.

https://timesofindia.indiatimes.com/city/jaipur/three-suicides-in-48-hou...

मंदार कात्रे's picture

27 Sep 2019 - 8:13 pm | मंदार कात्रे

सुंदर विवेचन !

चांगल्या दर्जाचे मनुष्य बळ हवं असेल आणि तर टिकवून ठेवायचे असेल तर त्यांच्या अपेक्षा पेक्षा जास्त पगार ध्या हा विचार आहे त्या पाठचा.
ह्याचा फायदा बुध्दी मान व्यक्तीला मिळाला हे सत्य आहे आणि हे पण सत्य आहे जगातील बुध्दीमान माणसं एका चोकडीत बंदिस्त झाली .
कमी वयात अपेक्षा पेक्षा जास्त पैसा मिळाल्या मुळे त्यांनी चाकोरी बद्घ जीवन स्वीकारलं गगनाला गवसणी घालण्याची स्वतःची क्षमता विसरून गेले .
इन्फोसिस चे संस्थापक नारायण मूर्ती च्या शब्दात सांगायचे झाले तर .
आपण बौद्धिक हमाल तयार केले .

चांगल्या दर्जाचे मनुष्य बळ हवं असेल आणि तर टिकवून ठेवायचे असेल तर त्यांच्या अपेक्षा पेक्षा जास्त पगार ध्या हा विचार आहे त्या पाठचा.
ह्याचा फायदा बुध्दी मान व्यक्तीला मिळाला हे सत्य आहे आणि हे पण सत्य आहे जगातील बुध्दीमान माणसं एका चोकडीत बंदिस्त झाली .
कमी वयात अपेक्षा पेक्षा जास्त पैसा मिळाल्या मुळे त्यांनी चाकोरी बद्घ जीवन स्वीकारलं गगनाला गवसणी घालण्याची स्वतःची क्षमता विसरून गेले .
इन्फोसिस चे संस्थापक नारायण मूर्ती च्या शब्दात सांगायचे झाले तर .
आपण बौद्धिक हमाल तयार केले .

शाम भागवत's picture

28 Sep 2019 - 10:04 pm | शाम भागवत
Rajesh188's picture

28 Sep 2019 - 10:52 pm | Rajesh188

आता पर्यंत दहावी बारावी मध्ये ९९.९९ % मार्क मिळवणारे आणि jee मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवणारे ,
डॉक्टर झालेलं हुशार मुल आता पर्यंतची ..
ते सर्व आता कोणत्या लेवल ला आहे त
मोठमोठ्या कंपन्या ,मोठमोठी हॉस्पिटल,ह्यांचे मालक नाहीत .
नवीन येणाऱ्या शोध मध्ये ह्यांचे कष्ट हुशारी असेल पण तो शोध ह्या मधील किती लोकांच्या नावावर आहे

पहिल्या पिढीतील उद्योजक मुळात इत्तर क्षेत्रात सुद्धा किती आहेत?

त्यातून स्वतःच्या बुद्धिमत्तेवर मोठे उद्योग उभे करणारे लोक आय टी सोडले तर हाताच्या बोटावर मोजण्या इतकेही मिळणार नाहीत.

वैद्यकीय क्षेत्रात डॉ देवी शेट्टी( नारायण हृदयालय), डॉ रमाकांत पांडा( एशियन हार्ट इन्स्टिटयूट) किंवा डॉ नरेश त्रेहान( एस्कॉर्टस आता मेदांत रुग्णालय) यांची उदाहरणे देता येतील.

आंबट गोड's picture

3 Oct 2019 - 3:12 pm | आंबट गोड

लिहीले आहे. पण मग ..... नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम........ वगैरे वगैरे म्हणी आपणच तर शिकवितो ना.....?
स्वप्ने पाहणे आणि ती पुरी करण्यासाठी झटणे....... ......ही आदर्श जीवनशैली झाली ना?

सुबोध खरे's picture

3 Oct 2019 - 6:51 pm | सुबोध खरे

नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम
हे बरोबर आहे. मुलाला जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रवृत्त करणे हे नक्कीच महत्त्वाचे आहे.

परंतु ६० टक्के गुण मिळवणाऱ्या मुलाला तू आय आय टी मध्येच गेलास तरच तुझ्या जीवनाचे सार्थक झाले हे समजावणे हि गोष्ट चूक आहे.

हीच स्थिती वाणिज्य विषयात आहे. मूल सी ए /सी एस( कंपनी सेक्रेटरी) झालं तरच हुशार हे इतकं बिंबवलं गेलंय कि मुलं त्यात कल नसूनही ढकलली जातात आणि आयुष्याची काही मूल्यवान वर्षे फुकट घालवून बसतात.
१० लाख विद्यार्थ्यात पहिल्या ५ हजार मध्ये आलास तरच ठीक आहे. मग बाकी ९ लाख ९५ हजार मुले काय कायमची अयशस्वी असतात का?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही मुलाला दोन तीन प्रयत्नात जेमतेम त्या ५ हजारात पोचवण्यात यशस्वी झालात तरी आयुष्यभर त्यांना जीवघेण्या स्पर्धेत उतरवत नाही ना याकडे लक्ष देणे फार आवश्यक आहे. अन्यथा एच पी टी ३२ या विमानासारखे इंजिन जळून जाण्याचा धोका असतो.
अशी असंख्य मुलं मी आजूबाजूला पाहत असतो. त्यावेळेस मला हटकून या फोटोची आठवण येते.

आयुष्यभर नको असलेल्या विषयात आपला उमेदीचा काळ फुकट घालवताना मी अनेक मुले पाहिली आहेत. आई वडिलांची इच्छा म्हणून वैद्यकीय व्यवसायात आलेली हुशार किंवा हुशारी नसली तर आईवडिलांनी प्रचंड फी( एक कोटीच्या वर) भरून खाजगी महाविद्यालयातुन पास झालेले आणि पुढे इच्छा नसताना डॉक्टरकि चा व्यवसाय "ढकलत असलेले" अनेक डॉक्टर मला माहिती आहेत.

शक्य असेल तर जरूर शेअर करावा अशी विंनती आहे.

सुबोध खरे's picture

3 Oct 2019 - 7:14 pm | सुबोध खरे

नाही.
तो फोटो माझ्या मित्राच्या केबिन मध्ये लावलेला होता. (१९९० सालची गोष्ट).
https://www.google.com/search?q=hpt-32+deepak+aircraft&rlz=1C1CHNY_en-IN...
https://www.google.com/search?rlz=1C1CHNY_en-ININ376IN383&biw=1164&bih=5...
https://www.google.com/search?rlz=1C1CHNY_en-ININ376IN383&biw=1164&bih=5...

फेरफटका's picture

3 Oct 2019 - 7:45 pm | फेरफटका

छान मुद्दा आहे सुबोधजी. पायाची ताकद ओळखून पळायचं टारगेट सेट करायचं असतं. मुलांविषयी कळकळ असणं वेगळं, पण झाडाची फळं झाडापासून लांब पडत नाहीत ह्या न्यायानं त्या मुलांची कुवत ओळखणं हा सुद्धा एक भाग आहे. मुलांचा कल कुठे आहे ते जोखून त्यांना त्या क्षेत्रातले चांगले मार्ग कसे उपलब्ध होतील ते पहाणं, त्यांना त्या क्षेत्रातल्या संधी उपलब्ध करून देणं आणी स्वतःच्या मुलांवर, स्वतःवर, त्यांच्या आपण केलेल्या पालनपोषणावर, संस्कारांवर संपूर्ण विश्वास ठेवणं हे पालकत्व-१०१ आहे असं मला वाटतं.

सुबोध खरे's picture

3 Oct 2019 - 8:47 pm | सुबोध खरे

माझं एक गृहीतक आहे.

यशस्वी होण्यासाठी आयुष्यात एकदा केंव्हा तरी तुम्ही उत्तम कामगिरी करणे आवश्यक असते.

काही मुलांची मानसिक स्थिती लवकर परिपकव( MATURITY) होते आणि ते १० -१२ मध्ये उत्तम यश मिळवतात. काही मुलांची हि स्थिती पदवी प्राप्त केल्यावर होते. तर काही मुलांना तिशी चाळीशी येईपर्यंत अशी परिपक्वता येत नाही. प्रत्येक मुलाची जडणघडण वेगवेगळी असते. त्यापरामें प्रत्येक मुलाचा यशस्वी होण्याचा कालावधी वेगवेगळा असतो.

आमच्या परिचयातील एक डॉक्टर कुटुंबातील मुलगा आई वडील विभक्त झाले म्हणून मानसिक दृष्ट्या फार खचला आणि बारावीला कुठेच प्रवेश मिळाला नाही म्हणून असेच उंडारत होता. बापाने त्याला अमेरिकेत बी एस( इंजिनियरिंग) करायला पाठवले. तेथून तो मध्येच परत आला. इथे रडत खडत बी एस सी केले.दोन वर्षे आयुष्याची अशीच वाया गेली. पण कुठेतरी आतून वाटू लागल्यावर कसून अभ्यास करून थेट अहमदाबादच्या आय आय एम मध्ये प्रवेश मिळाला आणि एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक म्हणून २५ लाख रुपये (वार्षिक) पगारावर रुजू झाला आहे.

आमच्या वडिलांचे एक मित्र अत्यंत गरिबीतून वर येऊन कारकुनी करत होते वयाच्या ५२ व्य वर्षी त्यांनी पी एच डी पूर्ण केली यानंतर त्यांच्या आयुष्यात फार मोठे यश मिळाले.

दुसऱ्या एका मित्राने रडत खडत बी एस सी मग एम एस सी केले त्यानंतर ५ वर्षे पीएचडीला लागली. परंतु त्यानंतर दोन तीन वर्षे अनु भवानंतर तो एकदम वरच्या परिस्थितीत पोहोचला.

एक माझ्या बरोबर असलेली डॉक्टर पॅथॉलॉजि मध्ये एम डी केलेली. वयाच्या ३९ व्या वर्षी आय एस बी सारख्या प्रथितयश संस्थेत प्रवेश मिळवला आणि त्यानंतर तिची चढती कमान इतकी वर गेली आहे आता ती एका प्रथितयश फार्म कंपनीच्या संचालकपदी आहे शिवाय वैद्यकीय संशोधन विभाग प्रमुख पण आहे अस दुप्पट पगारही मिळतो आहे.

अशी अनेक उदाहरणे आहेत.

चामुंडराय's picture

5 Oct 2019 - 7:22 am | चामुंडराय

RAT RACE म्हणजे नक्की काय?
हा शब्द प्रयोग कसा चालू झाला?

सुबोध खरे's picture

5 Oct 2019 - 9:24 am | सुबोध खरे

A rat race is a fierce, competitive way of life that involves pursuing goals in a repetitive, endless manner. The idea behind the expression rat race is a group of laboratory rats racing through a maze in order to be the first one to obtain cheese. In this case, the rats are at the mercy of the experimenter and the degree of difficulty he designed into the maze. Being involved in the rat race feels as though one is at the mercy of others or of other forces. The term rat race is usually rendered with the definite article the, as in the rat race. The exact origin of the term rat race is unknown. It may come from the practice of testing rats in laboratories, or it may come from actual rat-racing sporting events held in the 1800s.

खूपच सुंदर लेख. छोटे उदाहरण देऊन आयुष्यातील फार मोठे सार सांगितले. आयुष्यभर आपल्या संग्रही हा लेख ठेवावा आसा लेख. डॉ. साहेब धनयवाद.

खटपट्या's picture

8 Oct 2019 - 6:10 pm | खटपट्या

छान लेख आणि सुंदर विवेचन...

Jayant Naik's picture

9 Oct 2019 - 12:41 pm | Jayant Naik

एक अतिशय ज्वलंत विषय मांडला आहे. आत सुंदर विश्लेषण. सुखी आणि समाधानी असा शब्द प्रयोग पूर्वी वापरला जायचा. आता सध्या सुखी म्हणजे जो आपल्या बरोबरच्या लोकांपेक्षा जास्त पैसे मिळवतो तो असा अर्थ झाला आहे. म्हणजे तो समाधानी असणार नाही हे ओघानेच आले. मला आणखीन एक गोष्ट जाणवते. तुम्ही कोणत्याही हॉटेल मध्ये जा ..तिथे बसलेल्या लोकांचे संवाद ऐकले तर बहुतेक सगळे पैसा हा एकच विषय बोलत असतात.

डोळ्यात अंजन घालणारा लेख.धन्यवाद.