अभिनव वैचारिक शब्दप्रवास

Primary tabs

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
23 Sep 2019 - 10:01 am

रविवार दिनांक 22-9-2019 च्या सकाळ, सप्तरंग पुरवणीत प्रा. विनिता देशपांडे (पुणे) यांनी लिहिलेले माझ्या कादंबरीवरचे परीक्षण:

- विनीता श्रीकांत देशपांडे

डॉ. सुधीर देवरे लिखित "मी गोष्टीत मावत नाही" कादंबरी वाचल्यावर प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे "ते" गोष्टीत खरंच मावत नाहीत. वाचकहो, आता हे "ते" कोण? हे जाणून घेण्यासाठी कादंबरी वाचल्याशिवाय उमगणार नाही. "ते" समाजात सर्वत्र वावरणारे आहेत. सर्व स्तरांवर ते वावरतात. वैश्विक, सृष्टी, भू-तल, देश, धर्म, सत्ताधारी, समाज, समाजातील प्रत्येक घटक आणि तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनामनांच्या नेणीवेतील स्तरांवर या पुस्तकातील वाक्य आघात करतात, आदळतात आणि विचार करायला भाग पाडतात.
आतापर्यंतच्या कोणत्याच कादंबरीशी हीची तुलना करता येणार नाही. आपली स्वतंत्र वाट चोखाळणारी ही कादंबरी आहे. एक आत्मचिंतन आहे. आपल्या भवताल घडणार्याो घटनांची वैचारिक मांडणी केली आहे. या साखळीतून अनेक परिणाम साधले गेलेत. ह्या परिणामात डॉ. सुधीर देवरे यांनी "माणसातील माणूसपण हे अपेक्षांच्या कोषातून बाहेर पडल्याशिवाय कळत नाही!" हे सुरवातीलाच स्पष्टपणे मांडलं आहे. वाचकहो, जीवनाच्या आगळ्यावेगळ्या अनुभुतीसाठी तुमच्या सर्व गृहितकांना बाजूला ठेवून ही कादंबरी जरूर वाचा. आयुष्याचा विचार नव्या दृष्टीकोनातून करायला भाग पाडणारं असं हे पुस्तक.

कादंबरी वाचतांना "कळणं" आणि "आकलन होणं" यातील भेद स्पष्ट होता होता लेखक वाचकाला भयाण वास्तवाचे चटके देऊ लागतात. आपले कल्पित चिंतन आणि वास्तव आयुष्य यात नेहमीच कमी अधिक प्रमाणात तफावत असते. म्हणून आपण ते विसंगत होऊ देत नाही. नवीन ताळमेळ जोडून पुन्हा नव्यानं आयुष्य उपभोगत असतो. आधीच तडजोडीतील आयुष्याचा साधा सरळ उपभोग घेऊन समाधान मानेल तो कसला माणूस? व्रात्यपणा प्रत्येकाच्या मनात रुंजी घालत असतो. तो रस्त्यात कोणाच्या डोळ्यातून व्यक्त होतो तर कोणाच्या वाचेतून.
या तडजोडीतील आयुष्याचा उपभोग घेतांना आपण कल्पित आयुष्यात सतत फेरफटका मारत असतो. व्यावहारिक भाषेत सांगायचं झालं तर वासना, आशा, आकांक्षा, अपेक्षा कळत नकळत सर्व काही जीवंत ठेवण्याचा माणसाचा कायम प्रयत्न असतो. म्हणजे माणूस आपल्या स्वप्नांना गोंजारत बसतो. कालांतराने या आशा- आकांक्षा- अपेक्षा- वासनांचे उंदीर आपल्याच देहावर फिरू लागतात आणि सुरवातीला तडजोडीतील आयुष्यात मिळणारा आनंद आपण गमावून बसतो.
आयुष्याच्या प्रवासात मोहाचे डोलणारे अनेक मोर आपल्याला आजूबाजूला दिसतात. आपण आकर्षित होतो. अगदी मोर आणि लांडोर एकमेकांकडे आकर्षित होतात, तसे. आपण जेवढा अधिक वेळ या मोहमयी मोरांकडे बघत राहातो तेवढे आकर्षण वाढत रहातं. अनेक मोर, अनेक मोह, अनेक आकर्षणं आणि यातून प्रसवले जाणारे अनेक अपत्य. दिवा स्वप्नातून प्रसवलेले अपत्य आपण मनात खोलवर जपत असतो. या अपत्यांची या कादंबरीत विस्तृत चर्चा आली आहे.

आत्मकथानकातून अभिव्यक्त केलेले प्रत्येक प्रसंग- अनुभव तुम्ही आम्ही कधीतरी उपभोगलेला असतो. त्यावेळी अनेक प्रश्न मनात आले असतील. पण लोक काय म्हणतील, शेजारी पाजारी काय म्हणतील, समाज काय म्हणेल, या ना त्या कारणाने आपण व्यक्त करण्याचं धाडस करत नाही. या कादंबरीतलं हे धाडस खूप महत्वाचं आहे. शब्दांत व्यक्त होण्याचं कादंबरीतल्या पात्राचं शाब्दिक सामर्थ्य तुमच्या आमच्या सारख्यांसाठी "कॅथॉर्सिस" ठरेल यात शंका नाही. "कॅथॉर्सिस" अर्थात विरेचन. कादंबरी वाचून तुमच्या आमच्यात घुटमळणार्याा अगणित अव्यक्त विचारांचे नक्कीच विरेचन होणार. अनुभवाने समृद्ध होणं म्हणजे नेमकं काय, ते हे पुस्तक वाचल्यावर प्रचितीस येतं.
गोष्टीत न मावणार्याह कादंबरीत पात्र असलेल्या लेखकाने वाचकाला अनुभवसिद्ध प्रचिती दिली. ही प्रचिती नेहमीच्या आकृतीबंधात न देता एका वेगळ्या बंधात दिली आहे. तो बंध असला तरी छंदमुक्त आहे. लिखाणात प्रत्येक वाक्यात एक असा शब्द असतो जो वाचकावर प्रभावशाली ठरत असतो. या पुस्तकात शब्दच कथानकाचे पात्र आहेत. हे शब्दपात्र व्यक्त होतात. अर्थात तेच थेट आघात करतात, प्रहार करतात. हा कादंबरी लिखाणाचा एक अभिनव प्रयोग म्हणता येईल.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी, तुम्ही- आम्ही- आपण, म्हणून, खरं तर, अथवा, तरीही, पुन्हा, कारण, पण, चूक, चांगले, अर्थ, वाचक, अशा अनेक शब्दांशी सामना होत असतो. हे शब्दच तर आपल्या आयुष्याला नवा अर्थ देत असतात. आयुष्य सांधणार्याप शब्दांना महत्व देत लेखकाने या शब्दांभोवती अर्थपूर्ण सुभाषित उद्गा्रांची गुंफण लिलया केली आहे. म्हणूनच शब्दप्रधान लिखाणात प्रामाणिक आत्मकथानक व्यक्त करण्याचा हा एक अभिनव प्रयोग असल्याचं जाणवतं. भाषाशैली, घाट आणि आशयाच्या अंगानेही ही कादंबरी अभिनव ठरावी.
कादंबरीतल्या लेखक पात्राच्या आयुष्यातील अनेक टप्पे आले आहेत. प्रत्येक वळणावर त्यांच्या आयुष्यातील प्रसंग, अहिराणी भाषेच्या संरक्षणार्थ केलेला प्रयत्न, पुस्तक छापून ते वाचकांपर्यन्त पोहचवण्याचा हट्ट आहे, भवताली वावरणार्या गर्दीच्या मनातील गूज आहे, विविध लोक आणि त्यांची वैविध्यपूर्ण मानसिकता आहे. या पुस्तकात एक वाचकाच्या- लेखकाच्या अनुभवांनी समृध्दतेने सिद्ध झालेला अचंबीत करणारा प्रवास आहे.
एक लेखक म्हणून या पात्राचा खडतर प्रवास वाचक अनुभवतो तेव्हा या प्रवासात लेखक पात्राची वैचारिक प्रगल्भता अलगद उलगडत जाते. कादंबरीत पानोपानी एक विचारप्रक्रिया (Thought Process) आहे. या प्रक्रियेत जाणिवांतील बोथटपणा नाहीसा होईपर्यन्त विचारांच्या विजा कोसळत राहतात. संपूर्ण पुस्तक वाचल्यावर लक्षात येतं, की लेखकाने या जाणिवेतूनच स्वत:ची वेगळी पाऊलवाट शोधली आहे. लेखकासोबत आपणही विचारांच्या आणि भावनांच्या कल्लोळात धडपडतो, चाचपडतो, उठतो- पडतो, परत चालू लागतो. सारांश, एक अभिनव वैचारिक शब्दप्रवास म्हणजे डॉ. सुधीर देवरे यांची ही कादंबरी "मी गोष्टीत मावत नाही". आपली प्रतिमा नव्याने दाखवणार्यां या कादंबरीमुळे आपण नव्याने आपल्याकडे पाहू लागतो.
सरदार जाधव यांनी कादंबरीला सुंदर मुखपृष्ठातून बोलतं केलं आहे.

कादंबरी: मी गोष्टीत मावत नाही
लेखक: डॉ. सुधीर राजाराम देवरे
मुखपृष्ठ: सरदार जाधव
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन, पुणे
प्रथम आवृत्ती: 25 फेब्रुवारी 2019
पृष्ठ संख्या: 137 , मूल्य: 170 रुपये
000
पुस्तक परीक्षक:
विनीता श्रीकांत देशपांडे, पुणे.

वाङ्मयसमीक्षा

प्रतिक्रिया

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

23 Sep 2019 - 5:26 pm | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद