पिंजरा

Primary tabs

मिलिंद जोशी's picture
मिलिंद जोशी in जनातलं, मनातलं
4 Sep 2019 - 5:43 pm

आपली मराठी भाषा खरंच खूप ग्रेट आहे. मराठीत एकाच वाक्याचे अनेक अर्थ होऊ शकतात. इतकेच काय पण संदर्भ बदलला की वाक्याचा अर्थही बदलू शकतो. याचा एक अगदी ताजा ताजा अनुभव मला काल आला. निमित्त होते मित्राच्या घरच्या कार्यक्रमाचे. तसे माझे एकदोन मित्र सोडले तर बाकी सगळे विवाहित आहेत. बरे सगळेच मला ‘लग्न कर... लग्न कर’ असे सुचवत असतात. अर्थात अजून तरी मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलेले नाही. जर कुणी जास्तच त्याबद्दल म्हणायला लागले तर सरळ बोलून टाकतो... “च्यायला... माझे सुख बघवत नाही काय तुम्हाला?” अहो... काही जणांनी तर मला तसे स्पष्ट बोलूनही दाखवले आहे. असो...

नेहमी प्रमाणे आमच्या गप्पा चालू झाल्या. तेवढ्यात कुणीतरी विषय काढला.

“च्यायला... प्रव्या, आताच काही दिवसांपूर्वी तुझे लग्न झालं ना? तरी तुझ्या चेहऱ्यावर बारा का वाजलेत?”

“काय सांगायचं यार..! लग्न करताना छान वाटलं, पण आता कळलं... साला... लग्न म्हणजे सोन्याचा पिंजरा आहे... दिसायला बाहेरून सुंदर, पण एकदा त्यात अडकलो की जीवघेणी फडफडचं...” चेहऱ्यावर वैतागलेले भाव आणून प्रवीण उत्तरला.

“आयला प्रवीण... काय भारी उपमा दिली यार... म्हणूनचं मी या फंदात पडत नाही... ” मी प्रवीणच्या बोलण्याला अगदी मनापासून दाद दिली. प्रवीणच्या बायकोचे आमच्या बोलण्याकडेच लक्ष होते आणि आमच्या या विषयावर कोट्या चालू होत्या.

मग सुरु झाले विविध गुणदर्शन. खरे तर काही वेळेस मला हे गुणदर्शन उगाचच गुण उधळणे वाटते भो... काही जणांनी जोकं सांगितले, काही जणांनी मिमिक्री केली. मी मात्र शांत होतो. पण काही मित्र आपले शत्रू असल्या सारखे वागतात. जी गोष्ट आपल्याला जमत नाही तीच करण्याचा आग्रह करतात. बरे काही वेळेस तो मोडताही येत नाही. मलाही गाणे म्हणायचा आग्रह चालू झाला. एकतर मला नीट गाणे म्हणता येत नाही. माझे गाणे ऐकून अगदी खरे गाढवं जमलेलेही मी पाहिले आहेत. शेवटी गाणे म्हणायचे मान्य केले. मनात विचार केला, आपल्याला कमीपणा घेऊन इतरांना आपल्यावर हसण्याचा आनंद घ्यायचा असेल तर आपण तरी तो का मोडावा?

माझं एक खूप आवडतं गाणं आहे. सुधीर फडके यांनी गायलेलं... “आकाशी झेप घे रे पाखरा...” एकदम अप्रतिम गाणं. हे गाणं ऐकूनचं मी माझी नोकरी सोडून व्यवसायात पडायचं ठरवलं होतं. त्यामुळे त्याच गाण्याची मी निवड केली. गाणं सुरु केलं आणि इथचं सगळ्यात मोठी चूक झाली. साधारणतः आपण जेंव्हा गाणे चालू करतो त्यावेळेस जसे लोकांचे आपल्याकडे लक्ष असते, तसेच आपलेही इतरांकडे लक्ष असतेच. बऱ्याच वेळेस गायक श्रोत्यांच्या चेहऱ्याकडे पाहून गाणे पूर्ण म्हणायचे की दोन कडव्यात संपवायचे हे ठरवत असतो. मीही गाणे चालू असताना एकेकाच्या चेहऱ्याकडे पहात होतो. प्रवीणच्या बायकोकडे पाहिले तर मला तिच्या चेहऱ्यावर नापसंतीची झलक साफ दिसली. बरे जसजसे मी एकेक कडवे म्हणत होतो, तिचा चेहरा रागाने अधिकच लाल होत होता. शेवटी ३ कडवे झाल्यावर मीचं आटोपतं घेतलं. एक व्यक्ती सोडून जमलेल्या सगळ्यांनी टाळ्या पिटल्या. बहुतेक मी लवकर आवरतं घेतलं म्हणूनही असेल कदाचित. प्रवीणची बायको मात्र माझ्यावर चांगलीच भडकलेली दिसली.

“भाऊजी... तुम्हाला काही वाटायला पाहिजे मित्राला असे सल्ले देताना...” तिने डायरेक्ट विषयालाच हात घातला.

“आयला... असे सल्ले म्हणजे कसे वहिनी? आणि मी कुणाला आणि कधी सल्ले दिले?” मी अगदी गोंधळून विचारलं.

“कधी म्हणजे? आताच नाही का तुम्ही गाण्याची आड घेवून मित्राला सल्ला देत होतात.” तिचा तक्रारीचा स्वर जास्तच वाढला.

“च्यायला... आमच्यात कोण आहे आळशी? कारण हे गाणे माणसाला आळस झटकून कष्ट करायला प्रेरित करतं असचं मी आज पर्यंत समजत आलो आहे. तसेच माझ्या आईनेही मी लहान असताना या गाण्याचा हाच अर्थ सांगितलाय...” मी पुरताच गोंधळलो.

“ते मला माहिती आहे; पण आज हे गाणे म्हणताना तुमच्या मनात भलताच विचार होता. आणि हे मी सिद्धही करू शकते.” तिने पुढचे वाक्य उच्चारले आणि मीच काय पण इतरही जण चाट पडले. प्रवीणने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण सगळे व्यर्थ. शेवटी मी ही वैतागलो.

“ठीक आहे वहिनी.., तुम्ही हे सिद्ध करून दिले तर मी अगदी सगळ्यांदेखत तुमची जाहीर माफी मागेन...” मी थोडेसं चिडूनच म्हटलं आणि वहिनींनी सुरुवात केली.

“थोड्या वेळापूर्वी तुमचे जे काही बोलणे चालू होते ते मी ऐकले आहे. आमचे ‘हे’ म्हणत होते की लग्न म्हणजे सोन्याचा पिंजरा आहे, आणि तुम्ही त्याला दाद तर दिलीच पण वर असेही सांगितले की तुम्ही यासाठीच अजून लग्न केले नाहीये...”

“बरं मग? त्यात काय झालं?”

“सांगते ना... तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली आणि गाण्याची वेळ आली त्यावेळेस सुरु केले... आकाशी झेप घे रे पाखरा... सोडी ‘सोन्याचा पिंजरा...’ म्हणजे तुम्ही माझ्या नवऱ्याला असे सुचवले की जर लग्न सोन्याचा पिंजरा आहे तर दे सोडून...”

“आयला...” आता मात्र मी खरंच गार पडलो. कधी कुणाचं डोकं कुठं चालेल काहीच सांगता येत नाही.

“बरे यातही मला काही वाटले नसते, पण तुम्ही फक्त पहिले तीन कडवे म्हटले... जे या गोष्टीसाठी अगदी समर्पक आहेत...

‘तुज भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा...’

यातील सुखलोलुप झाली काया हे तुम्ही कोणत्या सुखाबद्दल बोलत आहात हे काय मला समजत नाही असे वाटते का तुम्हाला? बरे पुढे म्हणतात काय तर...

‘घर कसले ही तर कारा, विष समान मोती चारा,
मोहाचे बंधन द्वारा, तुज आडवितो हा कैसा उंबरा?’

म्हणजे आता आमचे घर हे तुरुंग झाले आणि मी केलेला स्वयंपाक विषारी आहे होय? बरे इतकेच सांगून तुमचे मन भरले नाही म्हणून पुढचे कडवेही म्हटले...

‘तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्यांने,
दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा..!!!’

म्हणजे तुला नोकरीही चांगली आहे तर इथे कशाला राहतो? सरळ बदली करून घे अन् जा निघून विदेशात... इथे, या पिंजऱ्यात थांबू नको... सांगा ना... हे गाण्यातून तुम्ही नाही सुचवले? बरं तुमच्या मनात असं काही काळंबेरं नसतं तर तुम्ही बाकीची कडवीही म्हटली असती. पण ती तुम्ही अगदी विचार पूर्वक गाळली. आता बोला... आहे काही उत्तर तुमच्याकडे?”

“च्यायला... काहीच बोलायलाचं ठेवलं नाही तुम्ही... पण खरंच सांगतो वहिनी... अहो असं काही माझ्या मनात खरंच नव्हतं हो...” मी अगदी काकुळतीला येऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण आपले काही हितशत्रू आपल्याच मित्राच्या आविर्भावात वावरतात, ते टपूनच बसलेले असतात. लगेच एक दोघांनी वहिनींना सपोर्ट केला आणि मी जाहीर माफी मागावी असा निकाल देवून मोकळे झाले. शेवटी नाईलाज होता... कधीकधी चूक नसतानाही स्वतः कमीपणा घेऊन, जाहीर माफी मागून विषय संपवणे जास्त योग्य असते.

“वाहिनी... या पामराला मोठ्या मनाने माफ करा... पाहिजे तर तुम्ही लहान असूनही तुमचे पाय धरतो... पण माफी द्या... पुन्हा कधीही मी हे गाणे मैफिलीतच काय पण माझ्या घरातही म्हणणार नाही...” मी अक्षरशः वहिनींचे पाय धरायचेच बाकी ठेवले होते. आणि माझे सगळे मित्र ‘माझी कशी जिरली’ याचा आनंद मानत हसत होते.

आतापर्यंत अनेक वेळेस मी हे गाणे मैफिलीत म्हटले होते. आवाज बेसुरा असूनही. पण याआधी कधीही मला म्हटलेल्या गाण्याबद्दल जाहीर माफी मागावी लागली नव्हती. कधी काळी अशी वेळ येईल हा विचारही माझ्या मनाला शिवला नव्हता... एक गोष्ट मात्र खरीच...

“संदर्भ बदलला की अर्थ बदलतो हे काही खोटे नाही...”

मिलिंद जोशी, नाशिक...

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

4 Sep 2019 - 9:31 pm | ज्योति अळवणी

मस्तच धमाल प्रसंग