माझं "पलायन" ८: हाफ मॅरेथॉनच्या पुढची वाटचाल

Primary tabs

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
6 May 2019 - 6:54 pm

८: हाफ मॅरेथॉनच्या पुढची वाटचाल

डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

माझं "पलायन" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!!

माझं "पलायन" २: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत

माझं "पलायन" ३: मंद गतीने पुढे जाताना

माझं "पलायन" ४: पहिली व्यक्तिगत हाफ मॅरेथॉन

माझं "पलायन" ५: सिंहगड घाट रस्त्यावर धावताना

माझं "पलायन" ६: हाफ मॅरेथॉनची नशा!

माझं "पलायन" ७: पहिली आणि शेवटची हाफ मॅरेथॉन ईव्हेंट

फेब्रुवारी २०१८ मध्ये हाफ मॅरेथॉन उत्तम झाली. आता फुल मॅरेथॉनचा विचार करतोय. वाटतंय की, जेव्हा सव्वा दोन तासांच्या आत हाफ मॅरेथॉन करतोय, तर फुल मॅरेथॉनही कट ऑफ (७ तास) वेळेत आरामात करेन. आधी फुल मॅरेथॉनच्या डेटस बघितल्या. पहिलं ओपन बूकिंग जूनमध्ये होतं- सातारा नाईट मॅरेथॉनचं. तेव्हा माझ्या जवळच्या दिग्गज रनर्सचं‌ मार्गदर्शन घेतलं. आणि हळु हळु त्यांच्या मार्गदर्शनामध्ये अनेक गोष्टी कळत गेल्या. आत्तापर्यंत- हाफ मॅरेथॉनपर्यंत ब-याच प्रमाणात ad hoc झालेला माझा प्रवास हळु हळु जरा व्यवस्थित होऊ लागला. माझे जिजाजी व दिग्गज रनर परागजी जोशी ह्यांनी मला सविस्तर सांगितलं व समजावलं की, फुल मॅरेथॉनच्या आधी मला कोअर- स्ट्रेंदनिंग करायला हवं. रनिंगशी‌ संबंधित शरीरातले अवयव आहेत त्यांना बळकट करायला पाहिजे. त्यासाठी इंटरनेटवर व्हिडिओ बघितले आणि लवकरच ते व्यायाम सुरू केले. स्टॅमिना/ एंड्युरन्स फक्त ऊर्जा नाही तर मसल्स मजबूत असण्याशीही संबंधित असतो. त्यामुळे योग्य व्यायाम देऊन त्या मसल्सना तयार करणं खूप आवश्यक असतं.

सुरुवातीला हे एक्सरसाईजेस बरेच कठीण गेले. पण ७- मिनिटांचे हे व्यायाम हळु हळु जमायला लागले. काही दिवसांनी त्यांचा परिणामही जाणवला. असं वाटलं की, हे व्यायाम जर नियमित अंतराने (आठवड्यातून दोन- तीन वेळेस) केले, तर रनिंगमध्ये गॅप पडली तरी ती जाणवत नाही. मी हे ७ मिनिटांचे व्यायाम सुरू केले- ४५ सेकंद प्रत्येक प्रकाराचा- स्ट्रेंदनिंग- बॉडी वेट स्क्वॅटस, बॅकवर्ड लंज, साईड लेग रेझ, प्लँक, साईड प्लँक, ग्लूट ब्रिज, बर्ड- डॉग एक्सरसाईजेस. प्रत्येक एक्सरसाईजनंतर १५ सेकंद पॉझ. ह्यामध्ये खूप वैविध्य आहे, अनेक पर्यायही आहेत. मला जे ठीक वाटले, ते मी करत गेलो. त्याबरोबर योग- प्राणायाम- ध्यानही नियमित करत गेलो. कारण फक्त वर्क- आउट करणं बरोबर नाही, ते संतुलित होण्यासाठी वर्क- इन ही‌ करायला पाहिजे. सायकल तर सुरू आहेच.

फेब्रुवारीनंतर रनिंगमध्ये थोडी गॅप आली आणि मग ऊन्हाळा सुरू झाल्यामुळे जास्त रनिंग करता आलं नाही. पण छोटे रन्स सुरू ठेवले आणि अगदीच बंद आहे, अशी वेळ येऊ दिली नाही. माझे मित्र संजय बनसकरजींसोबत चर्चा करून त्यांच्या सल्ल्याने नाईट मॅरेथॉनचा विचार सोडून दिला. जूनमध्ये खूप दमटपणा असतो व त्यामुळे मॅरेथॉन पळणं कठीण गेलं असतं, त्यांनी समजावलं. मी हाफ मॅरेथॉनसाठी जे नायके शूज वापरले होते, ते लाँग रनसाठी (२५ किमी +) ठेवून छोट्या रन्ससाठी बाजारात मिळणारे अगदी स्वस्त शूज घेतले. आता रनिंगची स्पीड वाढली आहे आणि पेस घटली आहे (कारण पेस म्हणजे प्रति किलोमीटरसाठी लागणारे मिनिटस)! आता हळु हळु ६.१९, ६.२५ अशी पेसही मिळतेय. मार्चनंतर मोठे रन मात्र नाही झाले. मध्ये अनेक दिवस सायकल प्रवास झाला व त्याच्या तयारीमुळेही रनिंग थोडं बाजूला राहिलं. ह्या वेळी स्ट्रेंदनिंग खूप उपयोगी पडलं. आणि फक्त रनिंगच नाही, तर सायकलिंगमध्येही स्ट्रेंदनिंगमुळे बराच फरक पडला.

सुरुवातीला वाटायचं की, सायकलिंगसोबत रनिंग करून मी एक प्रकारे ऑल राउंडर बनत आहे, पण माझा इरफान पठान तर होणार नाही ना, ही भिती होती! रनिंगच्या नादात रनिंग तर राहीलच आणि सायकलिंगही‌ विस्कळीत होईल, अशी भिती होती! पण जेव्हा हाफ मॅरेथॉन यशस्वी‌ ठरली आणि स्ट्रेंदनिंग इ. करायला सुरुवात केली, तेव्हा विश्वास आला की नाही, दोन्ही करू शकेन! एखाद्या बॅटसमनला बॉलिंगमध्ये यश मिळाल्यावर काय वाटतं, ह्याची थोडी अनुभूती आली! आता अनुभवाने म्हणू शकतो की, रनिंग आणि सायकलिंग दोन वेगळ्या कला नक्कीच आहेत, पण परस्परांशी जोडलेल्याही आहेत. आणि हे काहीसं दोन पाण्याच्या टाक्यांसारखं आहे. ह्या दोन वेगळ्या टाक्या असल्या, तरी चांगल्या जोडलेल्या आहेत (स्ट्रेंदनिंग, योग, वॉक अशा माध्यमांनी जोडलेल्या आहेत)! आणि त्यामुळे एका टाकीत जरी भरपूर पाणी असेल, तर दुस-या टाकीतही पाणी मिळणार! म्हणजे कोणाचं सायकलिंग चांगलं असेल, सायकलिंगमुळे एंड्युरन्स असेल, तर त्याला/ तिला रनिंगमध्येही उपयोग होईल, रनिंगची तयारी झालेली असेल, फक्त पॉलिश करणं बाकी असेल. असो, हा माझा अनुभव आहे. इतरांसाठी ते वेगळंही असू शकेल.

रनिंगमध्ये इतकी मजा येते, इतकं ते जमतंसुद्धा, तरीही सायकलिंगच्या तुलनेत मनामध्ये रनिंग करताना एक प्रकारचं दडपण, एक प्रकारची भिती अजूनही आहे. आणि ती स्वाभाविकही आहे. कारण सायकलिंग तर मी अनेक वर्षांपासून करतो व लहानपणापासून कॉलेजपर्यंत सायकल चालवली होती. रनिंगचं तसं नाही. त्यामुळे रनिंग एक प्रकारे मनाच्या बाहेरच्या भागामध्ये जास्त संबंधित आहे, मनात खोलवर अद्याप पोहचलेलं नाही. त्यामुळे अजून खूप पुढे जायचं आहे. आणि भितीला दूर करायचं असेल, तर ज्या गोष्टीची भिती वाटते, तीच करायला पाहिजे. त्यामुळे २५ किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पळण्याविषयी विचार सुरू केला.

पुढील भाग- माझं "पलायन" ९: लाँग रन्ससोबत मैत्री

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

आरोग्यअनुभव