कारी...

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
30 Oct 2008 - 5:01 pm

परवाचा लक्ष्मीपूजनाचा दिवस. एरवी एकटाच असतो. दिवाळीनिमित्त 'फ्यामिली' आली आहे इथे. ज्या दिवशी ते आले नेमकं त्या दिवसापासून रोज घरी जायला उशिर होत होता. दिवसभरात बायकोचा २-३ वेळा फोन येऊन गेला होता, आज लक्ष्मीपूजन आहे, आज तरी वेळेत ये घरी. त्या प्रमाणे थोडा लवकरच निघालो होतो. टॅक्सी पण मिळाली पटकन. म्हणलं आज खरंच चांगला दिवस दिसतोय. मस्त मूड होता. घरी जाऊन काय काय करायचं त्याचा विचार चालू होता. मस्त मुलींबरोबर मस्ती करायची, दाबून जेवायचं असले सुखासीन विचार चालले होते.

एकीकडे टॅक्सी ड्रायव्हर साहेबांनी पण बोलायला सुरुवात केली. इथले बव्हंशी टॅक्सीचालक पाकिस्तानी आणि त्यातल्या त्यात पठाण आहेत. पठाण लोकांची काही वैशिष्ट्य आहेत. कमालीचा गप्पिष्टपणा हे त्यापैकीच एक. बोलता बोलता त्याने बीबीसी वर 'उर्दू नशरियात' हा प्रोग्राम लावला. ही अजून एक सवय या टॅक्सीवाल्यांची. संध्याकाळी बीबीसी वर आधी उर्दू आणि मग हिंदी सर्व्हिस असते. हटकून न चुकता हे लोक हे प्रोग्राम ऐकतातच ऐकतात. उर्दू प्रोग्राम चालू होता. यामधे प्रामुख्याने पाकिस्तानकेंद्रित बातम्या आणि राजकिय / सामाजिक विषयांवर चर्चा / भाष्य वगैरे असे असते. पाकिस्तान सरकार सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे त्याबद्दल चर्चा चालू होती. त्यावर ड्रायव्हर साहेबांची 'लाईव्ह' कॉमेंटरी, 'आतषबाजी' सकट. मग प्रोग्राम आर्थिक / राजकिय मुद्यांकडून सामाजिक मुद्यांच्या दिशेने वळला. त्यानंतर जे काही ऐकले त्या प्रोग्राम मधे, खरं सांगतो, अजूनही मी त्या धक्क्यातून बाहेर येऊ नाही शकलो आहे पूर्णपणे. माणूस सैतानाचं रूप किती सहजतेने घेऊ शकतो हे पाहून भयंकर हादरलो आहे मी. असं काय होतं त्या कार्यक्रमात?

मी पहिल्यापासून सांगायला सुरुवात करतो.

पाकिस्तानातला सिंध प्रांत. तिथल्या खैरपूर जिल्ह्यातलं हजानशाह नावाचं एक छोटंसं खेडं. गुल शेर आणि झाकिरा बीबी ही त्याची बायको आणि त्यांची ६ मुलं, त्या गावातले एक सामान्य रहिवासी. गुल शेर चा गायीगुरं पाळण्याचा / विकण्याचा व्यवसाय. थोडीफार मालमत्ता. सुखवस्तू सधन कुटुंब. तस्लीम ही त्यांची ३ नंबरची मुलगी. दिसायला छान. स्वभावाने धीट. एका कर्मठ वातावरणात वाढत असली तरी काही स्वप्नं बाळगण्या इतपत शिक्षण आणि जगाचं भान असलेली. तिचा मामा डॉक्टर होता, ती एकदा कराचीत त्याच्याकडे गेली होती तेव्हा पासून तिला पण वाटत होतं की आपण पण डॉक्टर व्हायचं. खेड्यापाड्यात लोकांना, विशेषतः बायकांना, वैद्यकिय मदत मिळणं खूपच दुरापास्त असतं. तर आपण हेच काम करायचं. ती मॅट्रीकची परिक्षा नीट पास झाली. आपल्या आईला अक्षरओळख करून दिली, तिला स्वत:च नाव लिहायला शिकवलं.

पण त्याच वेळी घरात काही कुरबुरी चालू होत्या. कारण नेहमीचंच. संपत्ति / जमिनजुमला वगैरे. शेर गुल आणि त्याच्या भावांमधे काही वाद चालू होते. गावातल्या काही बड्या-बुढ्यांनी शेर गुलला सल्ल दिला की तस्लीमचे लग्न तिच्या चुलतभावांपैकी एकाशी लावून दे म्हणजे वाद मिटतील. त्यालाही ते पटले. झाकिराबीबी मात्र या प्रस्तावाच्या पूर्ण विरुद्ध होती. ती पण प्रचलित समाजव्यवस्थेमुळे दबलेली एक स्त्री होती. तिला आपल्या मुलीला शिकलेलं पाहायचं होतं. डॉक्टरणीची आई म्हणून मिरवायचं होतं. पण स्वतः तस्लीमने मात्र हा प्रस्ताव स्विकारायचं ठरवलं. तिला वाटलं की खरोखर या लग्नामुळे जर का काही चांगलं होणार असेल तर देऊ आपण ही कुर्बानी. आणि चुलतभावाशीच तर करायचं आहे ना लग्न? हरकत नाही. समजवू त्याला हळू हळू आणि शिकू की अजून पुढे. झाकिराबीबीने परोपरी समजवूनही हे लग्न झालं. पण तस्लीमचे दुर्दैव असे की, एक मुलगा होऊनही परिस्थिती काही सुधारली नाही.

वाद टोकाला गेला आणि तिच्या सासरच्यांनी तिला 'कारी' म्हणून घोषित केलं. 'कारी' म्हणजे काय तर, ज्या स्त्री किंवा पुरूषावर बदफैलीपणाचा आरोप असतो ती किंवा तो. तर तस्लीमला कारी ठरवून लगेच शिक्षा पण दिली गेली. आधी गुलशेर आणि बाकी परिवाराला एका खोलीत कोंडून घातलं गेलं आणि बाहेर अंगणात सैतानी खेळ खेळला गेला. उपासमारीने पिसाळलेले कुत्रे आणले गेले आणि तिच्या आणि तिच्या जेमतेम २ महिन्यांच्या निष्पाप बाळावर सोडले गेले. आधी त्या कुत्र्यांनी त्या बाळाचे लचके तोडले आणि मग तिच्याकडे मोर्चा वळवला. ती घरभर सैरावैरा धावत सुटली. मदतीसाठी हाका मारत राहिली. कोण करणार मदत? शेवटी ती धडपडून खाली पडली, कुत्र्यांनी झडप घातली. पण तेवढ्यात तिच्या सासर्‍याला (जो तिचा सख्खा काका होता), नवर्‍याला आणि इतर लोकांना तिची थोडी दया आली आणि तिचा अजून लचके तोडून छळ होऊ न देता तिला छातीत ३ गोळ्या घालून ठार मारण्यात आले. तिचे आईबाप आणि इतर भावंडं हे सगळं हताशपणे खिडकीतून बघत होते, आक्रोश करत होते.

आता गुलशेर आणि त्याचं कुटुंब कराचीत लपूनछपून रहात आहेत. या घटनेचा जाहिर बोभाटा झालाय. तिथल्या मानवाधिकार संघटनांनी खूप गदारोळ केला आहे. त्या मुळे आता गुलशेर आणि झाकिराबीच्या जीवाला पण धोका निर्माण झाला आहे. सहसा कोणतंही सरकार असं प्रकरण दाबून टाकायला बघतं पण इथे आता ही घटना आंतरराष्ट्रिय पातळीवर गेली आहे. कर्जबाजारीच्या संकटामुळे पाकिस्तान सरकार परदेशांपुढे वाकले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी पाकिस्तानचे राष्ट्रपति आसिफ आली झरदारी स्वतः जातीने लक्ष घालून करणार आहेत म्हणे.

मागच्या वर्षी पाकिस्तानी पंजाबात पण मुख्तारन माई नावच्या मुलीचे असेच प्रकरण घडले होते. ती तथाकथित खालच्या जातीची होती. तिच्या लहान भावावर गावतल्या चौधरीच्या मुलीची छेड काढल्याचा आरोप झाला आणि पंचायतीत शिक्षा सुनावली गेली, छेडछाडीचा बदला म्हणून मुख्तारन वर 'अधिकृतरित्या' सामूहिक बलात्कार केला गेला. पण ती जिवंत राहिली. तिने लढा दिला आणि न्याय मिळवायचा प्रयत्न केला. तिला नुकसानभरपाई म्हणून बरेच पैसे मिळाले ते तिने पूर्ण पणे समाजसेवेसाठी दान केले.

पण हे नविन प्रकरण ऐकले आणि सुन्न झालो. खून आणि तोही असा? माणूस खरोखर इतका सैतान बनू शकतो? मन मानत नाहिये पण सत्य परिस्थिती दिसते आहे ना समोर. जगात एकच गोष्ट दबू नाही शकत ना खोटी ठरवली जाऊ शकत... ती म्हणजे सत्य.

***

पण हा 'कारी' प्रकार काय आहे? किती घटना खरोखर घडतात? हे सर्रास होतं की असले प्रकार तुरळक पणे घडतात? सिंध मधे 'कारो कारी' हा एक अतिशय प्रचलित शब्द आहे.

मूळात या प्रकाराला इंग्रजीमधे ऑनर किलिंग (मराठी प्रतिशब्द?) असं म्हणतात. बर्‍याचश्या आफ्रिकी आणि अशियाई समाजांमधे हा प्रकार अगदी सर्रास आणि राजमान्य आहे. तत्वतः जरी हे स्त्री आणि पुरुष दोघांच्या बाबतीत घडू शकते तरी बहुतेक वेळा असे नृशंस प्रकार स्त्रियांच्या बाबतीतच घडतात. पुरूषांच्या बाबतीत मूळात आरोप होणंच नगण्य आहे आणि बहुतेकवेळा मामुली शिक्षा किंवा जबरी दंड करून त्यांना सोडलं जातं. सामन्यतः असे प्रकार मुस्लिम देशांत घडताना दिसतात तरी ही प्रथा खरोखर धर्मातीत आहे. आपल्याकडे पण असे प्रकार सर्रास घडतात. एखाद्या असहाय्य गरीब विधवेला जादू-टोणा करते म्हणून सरळ दगडांनी ठेचून मारायचे, किंवा बदफैली म्हणून आरोप करायचा आणि लगेच शिक्षा द्यायची. फिर्यादी पण आपणच, न्यायाधीश पण आपणच आणि ती शिक्षा अंमलात आणायचं पुण्य पण आपल्याच पदरात घ्यायचं. पण बोभाटा झाला की आपण त्या गावचेच नाही असं दाखवून सरळ शेपूट घालायची हाच यांचा पुरुषार्थ. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बर्‍याच वेळा इतर बायकापण यात सामिल होतात. आपल्या प्रगत महाराष्ट्रातलं खैरलांजी प्रकरण आठवा. सगळं गाव सामिल होतं. सुरेखाबाईचा गुन्हा काय तर तिने मान ताठ ठेवायची हिंमत दाखवली. ठेचलीच तिला, अक्षरशः. याच प्रथेचं अजून एक रूप म्हणजे आरोपी व्यक्तिला आत्महत्या करायला भाग पाडणे. म्हणजे काही भानगडच नाही. पुरावे नाहीत आणि मृत व्यक्ति थोडीच येणार आहे आपली कहाणी सांगायला?

आपल्या पोटच्या गोळ्याला किंवा सख्या बहिणीला, जिच्या बरोबर आयुष्य काढलं लहानाचे मोठे झालो, निर्घृणपणे मारून टाकायचं, मुंडकं उडवायचं, गळा दाबायचा म्हणजे पूर्ण सैतानीकरण झाल्याशिवाय शक्यच नाही. खरंतर अश्या सैतानांना क्षमा नाहीच नाही. पण दुर्दैवाने असे अनेक देश अजूनही आहेत, मुख्यतः मध्यपूर्वेत जिथे अश्या गुन्ह्यांना शिक्षाच होत नाही आणि असलीच तर खूप कमी आहे. जगभरात मानवाधिकारांच्या लढाई मधे 'ऑनर किलिंग' विरोधातली लढाई हा एक मुख्य भाग आहे. आजकालच्या आधुनिक जगात प्रसारमाध्यमं बलवान झाली आहेत त्याचा एक चांगला परिणाम म्हणजे अश्या घटना तातडीने अतिशय मोठ्या समूहापुढे स्पष्टपणे आणि सहजपणे मांडता येतात. त्या मुळे जनमताचा रेटा तयार करता येतो. आणि न्यायदानात मदत होऊ शकते.

जीवनमानातला बदल हा अपरिहार्य असतो. तो थांबवू म्हणता थांबवता येत नाही. कुठे पटकन होतो कुठे भरपूर वेळ लागतो. पण जीवनमान बदलतं नक्कीच. या न्यायाने 'ऑनरकिलिंग' ची भीषण परिस्थिती पण नक्कीच बदलेल, प्रश्न इतकाच आहे की अजून किती तस्लीम, मुख्तारन, सुरेखाबाईंचा बळी जाणार आहे? 'सूनर द बेटर' हे या बाबतीत इंग्रजीतलं नुसतंच एक चमकदार वाक्य नाहीये तर प्रत्येक तस्लीमसाठी 'जीवनवरदान' ठरणार आहे.

***
यथावकाश मी घरी पोचलो, दार उघडल्या उघडल्या पोरी येऊन गळ्यात पडल्या, बाबाच्या अंगावर उड्या मारायची शर्यत लागली दोघींची. मी पण थोडा नॉर्मलला आलो. दोघींबरोबर मस्ती झाली. तो पर्यंत बायकोने लक्ष्मीपूजनाची तयारी केली. मी स्वच्छ आंघोळ करून देवासमोर बसलो. यथाशक्ति यथामति पूजा केली देवाची आणि प्रार्थना केली,

"देवा, लक्ष्मी येईल जाईल, तू मात्र माझं बोट सोडू नकोस. माझी सद्सदविवेक बुद्धी बनून माझ्या बरोबर रहा. आज मी जे काही ऐकलं तसं परत कोणाच्याच बाबतीत न घडो. आणि घडलंच तर मी जसा सुन्न झालो तशीच प्रत्येक व्यक्ति होऊ दे म्हणजे हे चित्र पालटायला वेळ लागणार नाही."

शुभं भवतु.

***

टीपः ती न पाहिलेली तस्लीम काही डोळ्यापुढून हलत नाहिये आणि तिच्या न ऐकलेल्या किंचाळ्या अजून कानात घुमताहेत.

समाजजीवनमानविचार

प्रतिक्रिया

अवलिया's picture

30 Oct 2008 - 5:16 pm | अवलिया

खुपच अस्वस्थ केले या कथेने.
मध्यपुर्वेतील अनेक कुप्रथांना एकच गोष्ट जबाबदार आहे. पण त्या गोष्टीला वेसण घालण्याची आज तरी कोणाकडे ताकद नाही.

लवकरात लवकर सुसंस्कृतीचा उदय होवो असेच फख्त आपण म्हणु शकतो

नाना

सर्वसाक्षी's picture

30 Oct 2008 - 5:18 pm | सर्वसाक्षी

बिपिनराव,

माणुस अशी कृत्ये कशी काय करू शकतो? अशा भयानक कृत्यांना अनेक देशात 'रितीरिवाज' ठरवले गेले आहे. सैतानाला धर्म नसतो हे खरे पण मुस्लिम देशात हे प्रकार सर्रास घडतात. किंबहुना अजुनही मुस्लिम समाजावर मुल्ला-मौलवींचा जबरदस्त पगडा आहे आणि स्त्री ही अजुनही गुलामच नव्हे तर नगण्य वा दखल न घेण्याजोगी वस्तू आहे. आवाज उठविणार्‍या मुस्लिम स्त्रीला परागंदा व्हावे लागते याचे तस्लिमा हे उदाहरण आहे.

मीनल's picture

30 Oct 2008 - 5:31 pm | मीनल

मन दुखावल गेल वाचून.चिड आली.असहाय्य वाटल.

मला वाटत हिंदु माणूस अस करू शकणार नाहीत.
ते हाल हाल करून मारलेले हलाल मांस ही नाकरतात.म्हणजे नाकारत असतील.नसतील नाकारत ,तर नाकारावे.

हिंदु काय मुसलमान काय!
शेवटी माणसचं.

जर आपल्याला जन्म देण्याची पूर्णतः क्षमता नाही तर देवाने दिलेले एखाद्याचे जिवन घायचा अधिकार तर नाहीच नाही.
कुणालाच नाही.

मीनल.

अनामिक's picture

30 Oct 2008 - 6:40 pm | अनामिक

मला वाटत हिंदु माणूस अस करू शकणार नाहीत.

काळ बदलला म्हणून आता करत नसतील.. पण सती जाण्याची किंवा सती जायला लावायची रित हिंदुं समजातलीच!

यशोधरा's picture

30 Oct 2008 - 6:42 pm | यशोधरा

खरय, परवा परवा पर्यंत रुपकुंवर सती गेलीच की.. किंवा तिला जायला लावलं म्हणता येईल..

मीनल's picture

30 Oct 2008 - 7:01 pm | मीनल

खर आहे

मीनल.

प्राजु's picture

30 Oct 2008 - 8:15 pm | प्राजु

डोकं बधीर झालं बिपिनदा..
इतका क्रूरपणा?? बापरे!!!!!!!!!!! माणुसकी नावाचा संबंध नाहीच का?? काय म्हणायचं या लोकांना?? त्या बापाला तरी कसं बघवलं आपलं तान्हं पोर कुत्रं लचके तोडून खातं आहे हे????? आई गं... कुठे फेडतील हे पाप?? वाचताना गळा दाटून आला माझा...
कशाला जन्माला घालयचं असंच मारायचं होतं बाळाला त्या तर?? माणुसकीच्या अंत झालाय का?

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शेणगोळा's picture

30 Oct 2008 - 5:35 pm | शेणगोळा

बिपिन,

सुन्नच झालो वाचून.

सर्वांचाच लाडका,
शेणगोळा.

यशोधरा's picture

30 Oct 2008 - 6:35 pm | यशोधरा

बापरे! सुन्न व्हायला झालं बिपिनदा हे वाचून... किती भयानक हो... :(

सहज's picture

30 Oct 2008 - 6:47 pm | सहज

पालापाचोळा सारखी वागणूक

कोण म्हणते स्वर्ग, नरक वेगळा आहे. एकाच वेळी एकाच ठीकाणी एकच जागा कोणासाठी स्वर्ग, कोणासाठी नर्क.

"औरतने जनम दिया मर्दो को..."

"देवा, लक्ष्मी येईल जाईल, तू मात्र माझं बोट सोडू नकोस. माझी सद्सदविवेक बुद्धी बनून माझ्या बरोबर रहा. आज मी जे काही ऐकलं तसं परत कोणाच्याच बाबतीत न घडो. आणि घडलंच तर मी जसा सुन्न झालो तशीच प्रत्येक व्यक्ति होऊ दे म्हणजे हे चित्र पालटायला वेळ लागणार नाही."

तथास्तु!

प्रमोद देव's picture

30 Oct 2008 - 8:49 pm | प्रमोद देव

ऐकून हतबुद्ध झालो.
बाकी सहजरावांशी सहमत आहे.

शितल's picture

30 Oct 2008 - 6:50 pm | शितल

किती भयानक आहे हा प्रकार.
माणुस तरी कसे म्हणावे असे कृत्य जे करतात त्यांना.
हे वाचुन आमच्या मनाला वेदना झाल्या तर तीच्या आई-वडिलांनी प्तत्यक्षरित्या पाहिले त्याचे काय झाले असेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Oct 2008 - 6:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बीपीन,
तस्लीमला एका खोलीत कोंडून पिसाळलेली कुत्रे तिच्या आणि लहान बाळाच्या अंगावर सोडून त्यानंतर तिला गोळ्या घालण्यात आल्या. किती हा कृरपणा, काय म्हणावे याला सुचत नाही. धर्मांध मुस्लीम देशात अशी अनेक प्रकरणे आपण ऐकतो. त्या तुलनेत आपल्याकडे असे प्रमाण कमी असावेत असे वाटते.

मुक्तसुनीत's picture

30 Oct 2008 - 7:32 pm | मुक्तसुनीत

पोटात ढवळण्याइतकी घृणा वाटावी असा प्रसंग.

घोडा का अडला ? भाकरी का करपली ? पान का सडले ? फिरवली नाहीत म्हणून.

हिंसाचार , दहशतवाद, अमानुष क्रौर्य, शोषण , जातीयवाद, धार्मिक कडवेपणा या वरचे उत्तर काय ? : "प्रबोधन".

प्रबोधनाला पर्याय नाही. मध्यपूर्वेतल्या दुर्दैवी लोकांना ज्ञानाचा सूर्य कधी दिसेल कुणास ठाऊक , आपल्या भारतातल्या , आपल्या महाराष्ट्रातल्या तरी लोकांपर्यंत प्रकाश पोचावा म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काहीतरी करणे शक्य आहे. स्त्रियांना शिकवणे सगळ्यात महत्त्वाचे. बाई शिकेल, घरच्याना शिकवेल. घरचे उलटले तर मदत घ्यायचा धीर तिच्याकडे येऊ शकेल. जितके शिक्षण तळागाळातल्या बायकांपर्यंत पोचेल, असे घृणास्पद प्रकार होण्याची शक्यता तितकी कमी होईल.

सूर्य's picture

30 Oct 2008 - 7:37 pm | सूर्य

बिपिनराव काय लिहीले आहे तुम्ही. डोळयासमोर उभे राहीले सगळे.

"देवा, लक्ष्मी येईल जाईल, तू मात्र माझं बोट सोडू नकोस. माझी सद्सदविवेक बुद्धी बनून माझ्या बरोबर रहा. आज मी जे काही ऐकलं तसं परत कोणाच्याच बाबतीत न घडो. आणि घडलंच तर मी जसा सुन्न झालो तशीच प्रत्येक व्यक्ति होऊ दे म्हणजे हे चित्र पालटायला वेळ लागणार नाही."

पुर्णतः सहमत.

- सूर्य.

ललिता's picture

30 Oct 2008 - 7:44 pm | ललिता

भयंकर प्रथा आणि भीषण क्रूर समाज!
तस्लिमाला तेव्हा काय यातना झाल्या असतील याचा विचार करुनच अंगावर काटा आला. X(
जिवंत स्त्रीला गुलाम म्हणून नरकयातना द्यायच्या.... दुसरीकडे स्वर्गातल्या अप्सरा मिळवायला जिहादच्या नावाखाली लाखो निरपराध जीव घ्यायचे, यातून कोणता पुरुषार्थ साधतात ते मुल्ला-मौलवीच जाणे! :D

विनायक प्रभू's picture

30 Oct 2008 - 7:54 pm | विनायक प्रभू

माणुस का घाणूस

सुनील's picture

30 Oct 2008 - 8:30 pm | सुनील

वाचूनच अंगावर काटा आला!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रेवती's picture

30 Oct 2008 - 8:36 pm | रेवती

मत नाही ह्या आणि असल्या प्रकरणांवर. माणूसपण नसलेल्यांबद्दल काय बोलायचे?

रेवती

चतुरंग's picture

30 Oct 2008 - 8:55 pm | चतुरंग

पोटात ढवळून आले आणि मी ऑफिसातून बाहेर मोकळ्या हवेत जाऊन आलो दोन मिनिटे आणि मूक श्रद्धांजली वाहिली त्या तस्लीमाला!

जगात ठिकठिकाणी अजूनही ह्या मध्ययुगीन हत्या चालूच आहेच ह्याचे फार वाईट वाटते. मग ते खैरलांजी असूदे किंवा आताचे हे तस्लीमाचे कारी प्रकरण!
माध्यमांच्या प्रबळ ताकदीमुळे निदान हे प्रकार दडपले जाणे कमी होते आहे आणि न्याय मिळण्याची शक्यता वाढते आहे हाच काय तो आशेचा किरण!
स्त्रियांचे शिक्षण आणि स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचे आहेच त्याखेरीज पुरुषी मनोवृत्ती बदलणे आणि वेळोवेळी स्त्रियांना दुय्यम वागणूक देणार्‍या मनोवृत्तीला सरळ केल्याखेरीज हे प्रकार थांबणार नाहीत.

बिपिनदा, काय झाली असेल रे तुझी अवस्था समजू शकतो मी! पण तू हे लिहिलंस त्यामुळे हे समजलं आणि प्रबोधनाचा पहिला धडा गिरवला गेला. माहीती समजलीच नाही तर पुढची वाटच बंद होते. त्यामुळे तुझे मी आभार मानतो. मलाही ह्या धक्क्यातून सावरायला कितीतरी दिवस लागतील. केवढा खिन्नपणा आला आहे मनाला.

चतुरंग

ऋषिकेश's picture

30 Oct 2008 - 9:07 pm | ऋषिकेश

कसंबसं पूर्ण वाचलं
काय बोलणार! काहि सुचतच नाहिए! :(

-(!!!!!!!!)ऋषिकेश

चित्रा's picture

30 Oct 2008 - 9:27 pm | चित्रा

अस्वस्थ व्हायला झाले. दुर्दैवी तस्लिम. लहानपणीच गावातील काही हिंदू-मुस्लिम मुलींना अशा प्रकारे लहानपणीच घरच्यांच्या मानपानाचे बळी होताना पाहिले आहे - त्यातील कोणी प्रत्यक्ष मेल्या नाहीत, पण सगळ्या आयुष्याची "घडी" घरच्यांनीच ठरवली. मुलीच्या इच्छेला कसलाही मान नाही. पण वरचे तस्लिमचे उदाहरण म्हणजे अधमपणाचा कळस आहे.

रेवती's picture

30 Oct 2008 - 10:02 pm | रेवती

अस्वस्थ झाले होते चित्राताई, जेंव्हा माझ्या मैत्रिणिला तिच्या सासरी भेटायला गेले होते. माझ्याबरोबरच कॉलेजला असलेली ती, तिच्या नवर्‍याला "साहेब "म्हणत होती. गमतीने माझे बाबा मला आणि माझ्या मैत्रिणिंना "कायम स्त्रीमुक्ती मोर्चा म्हणायचे". आता बदलेल्या तीला पाहताना अशीच मनात कालवाकालव झाली होती. ती म्हणाली कि हे सगळं ठीकच चाललय म्हणायचं. ती माहेरी फोन करू शकते, गावाकडून सासूबाईंनी एक कायमस्वरूपी मोलकरीण पाठवलीये. ह्या सगळ्याचे कारण म्हणजे तीला मुलगा झाला म्हणून हा एवढा मान तरी आहे.

रेवती

चित्रा's picture

31 Oct 2008 - 6:14 pm | चित्रा

माझ्याबरोबरच कॉलेजला असलेली ती, तिच्या नवर्‍याला "साहेब "म्हणत होती.

मीदेखील घरच्यांनी मुलींची बहिण तरूणपणी गेली म्हणून कोवळ्या, वयाची सोळाही न ओलांडलेल्या मुलींची "लग्ने" त्या बिजवरांशी लावून दिलेली पाहिली आहेत. मुली दोन्ही - हिंदू आणि मुसलमान. एक माझी खेळण्यातील मैत्रिण आणि दुसरी मुसलमान मैत्रिणीची बहिण.

पहिली घराजवळ राहणारी हिंदू मुलगी. मोठी मुलगी बाळंतपणात गेली म्हणून जेमतेम दहावी पार केलेल्या या मुलीचे शिक्षण थांबवून तिला पुण्याजवळच्या खेड्यात तिच्याच मेव्हण्याशी लग्न करून नांदायला पाठवून दिले. ती नंतर सुखात आहे, पण लहानपणी खेळात, शाळेत रस घेणारी ही मुलगी, स्वतः बरेच काही करू शकली असती, आज तिचे आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे आखून देऊन घरच्या लोकांनी स्वतःची जबाबदारीतून सुटका करून घेतली आहे.

दुसर्‍या मुसलमान मुलीचे शिक्षण एका दिवशी अचानक थांबले आणि अपघातात गेलेल्या मोठ्या बहिणीची "जागा" हिने ११ वीत असताना भरून काढण्याचा फतवा निघाला. आणि ती तिच्याहून किमान १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या मेव्हण्याच्या आणि आता नवर्‍याच्या मागे स्कूटरवरून जाताना दिसायला लागली. अपघातात मरण पावलेल्या बहिणीला तर मूलबाळही नव्हते, त्यामुळे नक्की त्या घरातच तिचे लग्न का लावून दिले गेले कळले नाही. आता ती दु:खात आहे का सुखात हे मला माहिती नाही, पण मुलींची बौद्धिक, मानसिक सगळी वाढ खुंटवणे हे घरचे लोक इतक्या सहजपणे करताना बघून संताप होतो.

असेच अजूनही काही बरेच पाहिलेले आहे, विस्तारभयास्तव इथे देत नाही.

मन's picture

30 Oct 2008 - 9:44 pm | मन

आणि भयंकर.

मनुष्य अजुनही मध्ययुगातच जगतोय हे पाहुन अत्यंत वाइट वाटतय.

आपलाच,
मनोबा

ब्रिटिश टिंग्या's picture

30 Oct 2008 - 10:42 pm | ब्रिटिश टिंग्या

अमानुष कृत्य!
लेख वाचुन फार अस्वस्थ झालो!

रामदास's picture

31 Oct 2008 - 12:28 am | रामदास

या लेखाची शेवटची चार वाक्य फार पटली.

मदनबाण's picture

31 Oct 2008 - 8:19 am | मदनबाण

हा तर रानटीपणाच झाला,,माणुस म्हणुन हे लोक जगतातच कसे ??

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

अनिल हटेला's picture

31 Oct 2008 - 8:30 am | अनिल हटेला

............
(सुन्न)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अभिजीत's picture

31 Oct 2008 - 9:13 am | अभिजीत

वाचताना अगदी काटा आला.

मध्ययुगीन काळात (५वे ते १६वे शतक) युरोपात क्रौर्याच्या परिसीमा गाठणार्‍या यातनामय शिक्षांचा इतिहास आहे.
अजूनही आफ्रिकेच्या दुर्गम भागात असेच भयानक प्रकार घडत असल्याच्या बातम्या वाचनात येतात.

धर्माच्या किंवा सत्तेच्या पडद्याआड माजलेल्या कर्म-कांडांमधे हे प्रकार फोफावले. याला कोणतेच धर्म अपवाद नाहीत.

पण, सामजिक प्रश्न जसजसे आधुनिक लोकशाही मार्गाने सोडवले जावु लागले आहेत तसतसे हे प्रकार कमी होताना दिसत आहेत.

अवांतर - न्यूयॉर्कच्या 'रिपलीज.. ' म्युझियम मधे बघितलेली 'टॉर्चर गॅलरी' आठवली. यातनामय शिक्षा द्यायसाठी वापरण्यात आलेली विविध 'साधने' अगदी हारीने मांडून ठेवली आहेत!

झकासराव's picture

31 Oct 2008 - 11:07 am | झकासराव

:(

:(

:(

................
बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय.
http://picasaweb.google.co.in/zakasrao

आनंदयात्री's picture

31 Oct 2008 - 12:54 pm | आनंदयात्री

सुन्न झालो.

डॉ.प्रसाद दाढे's picture

31 Oct 2008 - 1:05 pm | डॉ.प्रसाद दाढे

भय॑कर आहे. भारतातही अजुन हु॑डाबळी आहेतच की! प्रबोधन म्हणाल तर उच्च विद्या विभूषित म॑डळी आन॑दाने व हक्काने डब्बल हु॑डा मागता॑ना दिसतात. स्त्री भ्रूण हत्त्या करणारेपण त्यातलेच.. आणि मग शेगावला कि॑वा शिर्डीला अभिषेक केला की पाप॑ फिटतातच

सुहास कार्यकर्ते's picture

31 Oct 2008 - 5:41 pm | सुहास कार्यकर्ते

वाचुन मन् सुन्न होउन गेले.पण बहुतेक मध्य्य पुर्वेत सगळीकडे थोड्या फर् काने अशाच अघोरी प्रथा चालु आहेत, पण त्या बाहेर येत नाहीत. राजस्थानात भ्रुण हत्त्येचे प्रमाण अजुनही कही कमी नाही.

विसुनाना's picture

31 Oct 2008 - 6:16 pm | विसुनाना

अघोरी प्रकार! सुन्न झालो.
हा सगळा 'कार्यक्रम' ऐकल्यावर त्या पठाण टॅक्सी ड्रायव्हरची प्रतिक्रिया काय होती?

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2008 - 3:41 pm | बिपिन कार्यकर्ते

तो पण हे ऐकत होता. त्याची प्रतिक्रिया पण जवळजवळ माझ्यासारखीच होती. हे कृत्य करणार्‍या लोकांना तो 'शैतानकी अवलाद' असे म्हणत होता. इथे 'जवळजवळ' असे म्हणायचे कारण की मला जेवढा धक्का बसला तेवढा त्याला बसला असे नाही वाटले.

कदाचित, असे प्रकार त्याला पसंत नसले तरी त्याने याआधीपण असे प्रकार घडतात हे ऐकलं / पाहिलं असणार. त्यामुळे त्याला पसंत नसेल तरी धक्का बसला नसेल. किंवा तो अतिशय मितभाषी / संयत असेल. मी पाहिलेले बहुतेक पठाण एकदम टोकाचे बोलघेवडे नाहीतर टोकाचे मुखदुर्बळतरी असतात.

बिपिन कार्यकर्ते

लिखाळ's picture

31 Oct 2008 - 8:33 pm | लिखाळ

अस्वस्थ करणारा प्रकार आहे..
ऑनर किलिंग हा भयंकर प्रकार अजूनही चालू आहे हे त्याहून भयंकर ! यासारख्या अजून काही बातम्या बिबिसी-सिएनएन वर सुद्धा मध्यंतरी बघितल्या होत्या.

देव सर्वांना सद् बुद्धी देवो !
--लिखाळ.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2008 - 3:48 pm | बिपिन कार्यकर्ते

या लेखात अजून एक लिहायचं राहून गेलं होतं. त्याच रेडिओ कार्यक्रमात अजून एक घटना उल्लेखिलेली होती. बलुचिस्तानमधे 'ऑनर किलिंग' म्हणून ५ बायकांना जिवंत पुरण्यात आले आहे. पण ही घटना मात्र बहुतेक दबते आहे. कारण सरकार असे काही झालेच नाही असे म्हणत आहे.

आज तस्लीम साठी सुरू केलेला हा ब्लॉग नजरेस पडला.

http://wordpress.com/tag/shaheed-bibi-tasleem-solangi/

बिपिन कार्यकर्ते

वाटाड्या...'s picture

14 Nov 2008 - 8:30 pm | वाटाड्या...

मित्रहो...

असेच प्रकार अजुनही सो कोल्ड प्रगत राष्ट्रांतही घडतात. फक्त ते पद्धतशीर्पणे दाबले जातात. मला अजुनही लख्ख आठवतय..जेव्हा तालीबान चे राज्य होते तेव्हा एका कुठल्यातरी वेब्साईट वरुन आमच्या एका यड्या मित्राने काही चित्रफिती डौनलोड करुन आम्हाला पाठवलेल्या...

अक्षरशः आमचं ऑफिस जेवलं नव्हतं ते २ दिवस...तो होता सौदी मधे तेव्हा...भारतातही असले प्रकार होतात फक्त समोर काहीच येतात. एक आंध्र प्रदेशात जा म्हणजे कळेल तिथले लोक आपल्या आया-बहिणींना कशी वागणुक देतात ते...

परमेश्वराचे आभार मानावे तितके थोडेच की मी सुसंस्क्रुत मराठी घरात जन्माला आलो...

बिपीनदा...परत एकदा चांगला लेख व माणसातलं माणुसपण जागवणारा लेख लिहील्याबद्दल अभिनंदन...

आपला...

मुकुल...