गूढ अंधारातील जग -१०

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
1 Sep 2018 - 8:44 pm

गूढ अंधारातील जग -१०

खोल पाण्यातील वैद्यक शास्त्र --Diving medicine, also called undersea and hyperbaric medicine

रोजचे वैद्यक शास्त्र हे शरीरावर हवेचा दाब १ atm (म्हणजे समुद्र सपाटीवर असलेला हवेचा दाब) याला शरीर कसे प्रतिसाद देते त्यावर अवलंबून असते.

पण खोल पाण्यातील वैद्यक शास्त्र म्हणजे पाण्याच्या दाबामुळे शरीरावर होणारे परिणाम आणि त्याच्यावरचे उपाय/ उपचार असे आहे.

पाणबुडीला जर अपघात झाला तर आतील सैनिकांना सुरक्षित बाहेर काढताना ती कोणत्या खोलीवर आहे हे महत्त्वाचे ठरते. मुळात ती जर फार खोल नसेल तर त्यातुन बाहेर निसटण्यासाठी असलेल्या खिडकीतून (ESCAPE HATCH) सैनिक बाहेर पडतात आणि पाण्यातून पोहत समुद्र पृष्ठभागावर येतात.

आणि जर खोली जास्त असेल तर एक छोटेखानी पाणबुडी त्या पाणबुडीच्या बाहेर निसटण्यासाठी असलेल्या खिडकीला(ESCAPE HATCH) लावून सर्व माणसे या छोट्या पाणबुडीत घेतली जातात आणि त्या सर्वाना वर आणले जाते.
बऱ्याच वेळेस पाणबुडीला अपघात होते तेंव्हा तिचे संदेशवहन आणि संपर्क बंद होतो (१५ नोव्हेंबर २०१७ रोजी गायब झालेल्या अर्जेंटिनाच्या सॅन जुआन या पाणबुडीचा आजतागायत थांग पत्ता लागलेला नाही.) अशा स्थितीत या पाणबुडीतील लोकांना पाणबुडीतुन आहे त्या स्थितीत आणि खोलीवर बाहेर पडणेच आवश्यक होऊन बसते.

याशिवाय प्रत्येक मोठे जहाज (नौदलाचे किंवा व्यापारी) बंदरात येते तेंव्हा त्याच्या इंजिनाच्या प्रॉपेलर ( पंख्यात) अनेक मासे पकडायची जाळी अडकलेली असू शकतात ती सोडवायला लागतात. शिवाय पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली गंज लागलेला असू शकतो.काही वेळेस दोन जहाजांची टक्कर होते तेंव्हा जर हानी जास्त झालेली नसेल तर असे पाणबुडे पाण्याखाली जाऊन वेल्डिंग करून तो भाग दुरुस्त करतात. या सर्व गोष्टींचे निरीक्षण करणारे पाणबुडे पाण्याच्या खाली जातात.

समुद्रात नदीत बुडालेली माणसे/ पार्थिव बाहेर काढण्यासाठी गुन्हे अन्वेषण ज्यात वस्तू(चाकू पिस्तूल इ) नदीत समुद्रात टाकून दिलेल्या असतात त्या काढाव्या लागतात त्यासाठी पाणबुडे पाण्याच्या खाली जातात.

"बॉम्बे हाय" या आपल्या तेलाच्या विहिरी जेथे भारतात उत्खनन होते त्याच्या ५० % तेल निघते.येथे १२५ च्या आसपास तेलविहिरी आहेत हे तेलक्षेत्र मुंबईच्या १७५ किमी पश्चिमेस आहे तेथे सरासरी पाण्याची खोली ७५ मीटर आहे. तेथे उभ्या असलेल्या तेल विहिरीच्या पायाची देखभाल करण्यासाठी शिवाय तेथून ज्या पाईप लाईनने कच्चे तेल मुंबईत आणले जाते तिची देखभाल करण्यासाठी पाणबुडे सतत खोल पाण्यात जात असतात.

आपण आता जालावरून संभाषण करतो आहोत त्याच्या तारा समुद्रतळाशी टाकलेल्या असतात. त्या तारांची बांधणी देखभाल यासाठी पाण्याच्या खाली जावे लागते.
या तारांचा वापर याबद्दल एक अतिशय मनोरंजक दुवा आहे जिज्ञासूंनी जरूर वाचून पाहावा.
http://mentalfloss.com/article/60150/10-facts-about-internets-undersea-c...

नौदलाचे कमांडो घातपाती कारवाया करण्यासाठी जातात तेंव्हा त्यांना शस्त्रूच्या प्रदेशात पाणबुडीतून पाण्याच्या पृष्ठभागाच्या खालीच सोडले जाते. तेंव्हा त्यांच्या शरीरावर होणारे परिणाम या सर्व गोष्टींचा अभ्यास म्हणजे खोल पाण्यातील वैद्यक शास्त्र.

अतीखोलीवर होणारे आजाराचे काही मुख्य प्रकार असे आहेत

१) Decompression Sickness अचानक दाब कमी झाल्याने होणारे आजार

२) Nitrogen narcosis नायट्रोजन ग्लानी/ गुंगी

३)High-pressure nervous syndrome अतिदाबाचे मज्जा विकार

४) Oxygen toxicity ऑक्सिजनची विषबाधा

५) Pulmonary barotrauma फुप्फुसांचा दाबविकार

१) Decompression Sickness अचानक दाब कमी झाल्याने होणारे आजार

जमिनीवर हवेचा दाब १ atm एवढा असतो हाच दाब दर १० मीटर खोलीला पाण्याचा दाब १ atm ने वाढत जातो. म्हणजे १०० मीटर खोलीवर हा दाब जमीनीच्या ११ पट म्हणजे ११ atm इतका होतो.
भौतिक शास्त्राच्या नियमानुसार दाब वाढत गेला कि वायूचे द्रवात विरघळणे वाढते. त्या प्रमाणे जसे जसे पाणबुडे पाण्याच्या खाली जातात तसे तसे त्यांच्या फुप्फुसातील हवेतील वायू(मुख्यत्वे ऑक्सिजन आणि नायट्रोजन) हे रक्ताच्या द्रवात जास्तीत जास्त विरघळायला लागतात. हे अतिरिक्त विरघळलेले वायू जसे जसे पाणबुडे वर येतात तसे हळू हळू परत रक्तद्रवातून फुप्फुसातील हवेत परत येतात.यात आपले शरीर ऑक्सिजन वापरून कार्बन डायॉक्साईड तयार करते. कार्बन डायॉक्साईड हा पाण्यात भरपूर विरघळतो आणि पाण्याशी संयुग पावतो परंतु नायट्रोजन मात्र विरघळत नाही किंवा पाण्याशी रासायनिक प्रक्रिया होत नाही.

जर काही कारणाने पाणबुड्याला वेगाने बाहेर काढावे लागले. उदा. तो पाण्याखाली बेशुद्ध झाला किंवा पाणबुडी पाण्यात बुडू लागली तर हा हवेचा दाब एकदम पटकन कमी होतो आणि मग सोडा वॉटरच्या बाटलीचा बिल्ला काढल्यावर कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे वेगाने बाहेर पडतात तसेच या नायट्रोजनचे बुडबुडे शरीरातील विविध अवयवातील रक्तवाहिन्यातील द्रवातून बाहेर पडतात.

जर हे बुडबुडे हवेच्या रूपात फुप्फुसात बाहेर पडले पण हि हवा त्या पाणबुड्याला उच्छवासातर्फे वेगाने बाहेर टाकता आली नाही तर फुप्फुसे आणि छातीचा पिंजरा अतिशय वेगाने प्रसारण पावून त्याला मोठ्या प्रमाणावर इजा होऊ शकते.

हे नायट्रोजनचे बुडबुडे आपल्या नळात जसे एअर लॉक होते तसे रक्त वाहिन्या ब्लॉक करतात आणि त्या पाणबुड्याच्या विविध अवयवांचे काम बंद होऊ लागते. हि स्थिती जर मेंदूत झाली तर मेंदूच्या अत्यंत नाजूक भागात हवेचा बुडबुडा अडकला तर त्या भागाला रक्त पुरवठा बंद होऊन कायमची इजा होऊ शकते.

अशा परिस्थितीत त्या रुग्णाला तातडीने परत अतिदाबाच्या वातावरणात घेऊन जावे लागते जेथे हे बुडबुडे परत रक्त द्रवात विरघळतील आणि मग हळूहळू दाब कमी करत आणला जातो ज्यायोगे हे रक्तद्रवात विरघळलेले वायू फुप्फुसातून सावकाशपणे बाहेर टाकले जातील.

पाणबुड्या पाण्याच्या खाली जाताना त्याच्या कानाच्या पडद्यावर दाब वाढत जातो यामुळे किंवा एकदम खोल पाण्यातुन वेगाने वर आला तर मध्य कर्णाच्या आत असलेली हवा अचानक प्रसारण पावल्यामुळे कानाचा पडदा फाटण्याची शक्यता असते.

असेच अतिदाबामुळे विरघळलेल्या हवेचे बुडबुडे अचानक पृष्ठभागावर आल्यास आपल्या सांध्यातील द्रवातुन बाहेर येतात आणि आपल्या सांध्यात हवा भरल्यासारखी स्थिती येऊ शकते.

क्रमशः

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

1 Sep 2018 - 11:24 pm | आनन्दा

बापरे..

गामा पैलवान's picture

2 Sep 2018 - 12:09 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

माझ्या (ऐकीव) माहितीनुसार कमी दाबामुळे जो नत्रवायू सुटतो त्यामुळे माणसाला अमाप वेदनादेखील होतात. केवळ वेदनांमुळे पाणबुडे बेशुद्धीत गेलेले आहेत. हे खरंय का? असल्यास या वेदना नक्की कशामुळे होतात?

आ.न.,
-गा.पै.

भटक्य आणि उनाड's picture

3 Sep 2018 - 11:33 am | भटक्य आणि उनाड

if u r interested to know more about wreck diving or scuba diving, decompression sickness -
pl read book Shadow Divers written by Robert Kurson.. interesting one..

गामा पैलवान's picture

3 Sep 2018 - 11:54 am | गामा पैलवान

माहितीबद्दल आभार भआउ! :-)
आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

5 Sep 2018 - 7:04 pm | सुबोध खरे

वेदना होतात याचे कारण सांध्यात वायूचे बुडबुडे तयार होतात म्हणून. आपले सांधे हे बंद पोकळी सारखे असतात त्यामुळे त्यात वायूचे बुडबुडे तयार झाल्यास आतला दाब अचानक वाढतो. हाडाचे बाहेरचे आवरण हे हाडाला अतिशय घट्टपणे बांधलेले असते त्यामुळे त्याला जरासा धक्का बसला किंवा दाब वाढला तरी फार वेदना होतात. चालताना पायाच्या नडगीचे पुढचे हाड (टीबीया) कुठे आपटले तर जबरदस्त वेदना होतात तशी स्थिती असते.

बेशुद्ध होण्याचे कारण मात्र वेदना नसून मेंदूच्या रक्तवाहिनीत नायट्रोजन वायूचा बुडबुडा अडकणे किंवा कवटीच्या पोकळीत वायूच्या दाबाने मेंदूवर दबाव वाढून मेंदूचा रक्तपुरवठा खंडित होणे हे आहे

आणि हे जास्त गंभीर आहे कारण वेळेत इलाज झाला नाही तर रुग्णाला कायमचे व्यंग येणे किंवा रुग्णाचा मृत्यू होणे सहज शक्य असते.

याउलट सांध्यातील वेदना हे जास्त दुःखदायक असले तरी त्याचा दूरत्वाने फार परिणाम होत नाही.

गामा पैलवान's picture

6 Sep 2018 - 12:32 am | गामा पैलवान

माहितीबद्दल धन्यवाद, खरे डॉक्टर!

उपरोक्त नत्रवायुचा बुडबुडा हृदयाजवळ असेल तर शूळाचा झटका यायची शक्यता कितपत असते?

आ.न.,
-गा.पै.

प्रमोद देर्देकर's picture

2 Sep 2018 - 2:32 pm | प्रमोद देर्देकर

वाचतोय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2018 - 8:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

माहितीपूर्ण ! या लेखाला खूप उशीर झाला. पुढचे धागे शक्यतो लवकर टाकावे.

नाखु's picture

3 Sep 2018 - 5:14 pm | नाखु

उशीर झाला असावा.

पावसाळ्यात समुद्रात जाण्यास मज्जाव केला जातो.

समुद्र,खरे,वाचक आणि पावसाळा सर्वांनी हलकं घेणे.

पुभाप्र

दुर्गविहारी's picture

3 Sep 2018 - 7:51 pm | दुर्गविहारी

भयानक आहे हे सगळे ! अक्षरशः एका नवीन जगाची ओळख करुन देताय. पु. भा.ल.टा.

सभोवतालचे वातावरण बदलले कि त्याचे मानवी शरीरावर कसे परिणाम होतात याची छान माहिती मिळाली या मालिकेतून.
आभारी आहे.

खटपट्या's picture

4 Sep 2018 - 12:23 pm | खटपट्या

पु.भा.प्र.

टर्मीनेटर's picture

5 Sep 2018 - 1:41 pm | टर्मीनेटर

हा भागही माहितीपूर्ण. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

वरुण मोहिते's picture

6 Sep 2018 - 1:16 am | वरुण मोहिते

उत्तम मालिका चालू आहे.

शाम भागवत's picture

12 Sep 2018 - 12:36 am | शाम भागवत

हे जगच वेगळे आहे. तुमच्यामुळे कळतय सगळ

मार्मिक गोडसे's picture

12 Sep 2018 - 1:50 pm | मार्मिक गोडसे

२-३ किमी खोल खाणीत काम करणाऱ्या कामगारांनाही ' फुप्फुसांचा दाबविकार ' होतो का? की हवेची घनता कमी असल्याने हवेचा दाब तेव्हडा नसतो.

चामुंडराय's picture

13 Sep 2018 - 6:34 am | चामुंडराय

तुम्हाला पाण्याच्या तुलनेने हवेची घनता कमी असते असे म्हणायचे आहे का?

कारण खोल खाणीमध्ये हवेची घनता आणि दाब समुद्र सपाटीपेक्षा जास्त असतो.

जमिनीवर सर्वसाधारणपणे हवेचा दाब १ kg/sq cm असतो आणि मानवी शरीराचे क्षेत्रफळ २ sq m च्या आसपास असते तर २०,००० किलो फोर्स च्या दाबाने माणूस चिरडला का जात नाही?

तुषार काळभोर's picture

13 Sep 2018 - 7:31 pm | तुषार काळभोर

सर्व प्राण्यांची शरीरे तशी उत्क्रांत झालीयेत. म्हणून अवकाशात व चंद्रावर 'प्रेशर सूट' घालावा लागतो.
अन्यथा बाहेरून शून्य दाब असताना मानवी शरीर बॉम्ब सारखे फुटेल तिथे.

सुबोध खरे's picture

14 Sep 2018 - 11:09 am | सुबोध खरे

साडे तीन ते चार किमी खोल खाणीत हवेचा दाब १ kg/ sq cm चा वाढून १.५ kg/ sq cm होतो. हा दाब ५ मीटर खोल पाण्या इतकाच असल्याने
याचा मानवी शरीरावर फारसा परिणाम होत नाही.

परंतु या खोलीवर भूगर्भातील उष्णतेमुळे तापमान ५५ ते ७० अंश सेल्सियप पर्यंत वाढू शकते यासाठी मीठ आणि बर्फाचे मिश्रण खाणीत सोडले जाते आणि ते गरम झाल्यावर परत काढून घेतले जाते.

मार्मिक गोडसे's picture

13 Sep 2018 - 8:31 am | मार्मिक गोडसे

हो, पाण्याच्या तुलनेने