न्याय .... कलियुगातला

Jayant Naik's picture
Jayant Naik in जनातलं, मनातलं
24 May 2018 - 11:26 am

न्याय – कलियुगातला.
स्थळ: सम्राट सूर्यकेतू यांचा दरबार.
काळ: इंग्रजांचे भारतात राज्य यायच्या थोड्या आधीचा काळ.
सम्राट सूर्यकेतू गंभीर पणे न्यायाधीश राजकुमार रवीन्द्रना म्हणाले,
“ राजकुमार आपली न्यायाधीश पदी नेमणूक झाल्यापासून येव्हडा सर्वाना संभ्रमित करणारा विवाद समोर आला नव्हता.. काल आपण वादी आणि प्रतिवादी या दोघांची बाजू ऐकून घेतली. दोन्ही बाजूंच्या साक्षी पण संपल्या आहेत. आता आपण निर्णय देण्याची वेळ आली आहे. सारा दरबार आपल्या निर्णयाची वाट पहात आहे.तेव्हा या राज्याचे न्यायाधीश म्हणून या विवादाचा आपण न्याय करावा.आपल्या मते इथे सादर केलेल्या पुराव्यानुसार, प्रधानजी सत्यव्रत यांनी प्राजक्ता नावाच्या कन्येला पळवून नेले , तिला आपल्या शेतातील वाड्यावर डांबून ठेवले, आणि तिच्याबरोबर गैरव्यवहार केला हा आरोप सिद्ध झाला आहे का? “
राजकुमार रवींद्र एक विचारी,न्यायप्रिय आणि हुशार न्यायाधीश म्हणून थोड्याच दिवसात सर्वदूर प्रसिद्ध झाले होते.त्यांनी न्यायाशास्त्राचा गुरुकुलात खास अभ्यास केला होता. राजकुमारांनी थोडा विचार केला . त्यांनी प्रधानजी सत्याव्रतांकडे रोखून पहिले. समोर आलेला पुरावा आणि साक्षीदारांची साक्ष प्रधानजी दोषी आहेत हे दर्शवत होता. पण राजकुमार प्रधानजीना पूर्ण ओळखत होते. या सगळ्या प्रकरणात काही तरी पाणी मुरतंय असे त्यांचे अंतर्मन त्यांना सांगत होते. त्यांना अजून थोडा वेळ हवा होता. पण या विवादाचा निकाल लवकर होणे आवश्यक होते. हा विवाद सुरु झाल्यापासून प्रधानजीना पद उतार व्हावे लागले होते. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रधानपद रिक्त असणे धोक्याचे होते. राजकुमारांनी प्रधानजीना प्रश्न केला,
“मला गुन्हेगाराला परत एकदा विचारायचे आहे. आता पर्यंत आलेल्या साक्षी पुराव्या नुसार त्यांना काय वाटते? प्रधानजी मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो ,तुम्ही दोषी आहात कि नाहीत ?”
आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असलेल्या प्रधानजी सत्यव्रत शांत पणे उभे राहिले. त्यांनी आपले उपरणे सावरले. आपल्या काळ्याभोर तेजस्वी डोळ्यांनी त्यांनी साऱ्या दरबाराकडे नजर टाकली आणि ते म्हणाले,
“राजकुमार , मला माझ्या समर्थनार्थ जे सांगायचे होते ते मी अगोदरच सांगितले आहे. तुम्ही माझ्याबरोबर बरीच वर्षे काम केले आहे. तेव्हा मी असत्य बोलत नाही हे तुम्हाला आणि राजेसाहेबाना पूर्ण माहित आहे . मी पुन्हा एकदा सांगतो ,तुम्ही इथे सादर केलेले सर्व पुरावे खोटे आहेत. तुम्ही ज्या कन्येला मी पळवून नेले आहे असे ईथे सिद्ध करायचा प्रयत्न करत आहात ती आपल्या शेजारच्या त्रिवेणी राज्याची हस्तक आहे ,असा माझा अंदाज आहे. आपल्या राज्यातील एका सरदार पुत्र तिच्या मागे लागला आहे , तिच्या आणि तिच्या आई वडिलांना त्या सरदार पुत्रापासून धोका आहे असे सांगून आणि स्वतःला वाचवण्या साठी ती आणि तिचे माता पिता माझ्या आश्रयाला आले होते. शहरात त्या सरदार पुत्राचे हस्तक मला शोधत आहेत असे सांगून तिनेच मला कुठेतरी दुसरीकडे लपवण्याची विनंती केली होती. ”
“ पण तुमच्या विरुद्ध ज्या अनेकांनी साक्ष दिली ,ज्यांनी त्या कन्येला तुमच्या मिठीत पाहिली ,त्या प्रत्यक्षदर्शी साक्षीला काहीच अर्थ नाही का?”राजकुमारांनी विचारले.
“ त्यांनी पहिले ते दृश्य तसे तयार केले गेले होते. ते सत्य नाही भासमान सत्य होते. सत्याचा आभास होता .त्या कन्येने माझ्या मागे लागलेला सरदार पुत्र इथे येत आहे , मला वाचवा असे म्हणून मला मिठी मारली होती. पण त्या वेळी तिथे हजर असलेले सुद्धा तिचेच हस्तक होते.त्या मुळे मी जे सांगत आहे ते सत्य असून सुद्धा ते असत्य आहे असे ओरडून पुन्हा पुन्हा सांगितले जात आहे. मिठी मारलेली पाहिली पण ती कन्या त्या आधी काय म्हणाली ते हे प्रत्यक्षदर्शी सांगत नाहीत. असत्याला जर पुन्हा पुन्हा सत्य म्हणून सांगितले तर तेच सत्य आहे असे लोकांना वाटू लागते .”
“ प्रधानजी , मला सांगा ,राजेसाहेब ,मी आणि ईथे उपस्थित असलेले सर्व दरबारी ज्यांनी अनेक प्रसंगात योग्य न्यायदान केले आहे त्यांना फसवणे एवढे सोपे आहे असे तुम्हाला वाटते का?आणि सर्व साक्षीदारांचे सांगणे खोटे आहे असे एका क्षणापुरते जरी गृहीत धरले तरी त्या कन्येच्या साक्षीचे काय?तिची साक्ष सुद्धा खोटी मानायची का?”
“ती त्रिवेणी राज्याची हस्तक आहे असा माझा संशय मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. मला सर्वात ज्यास्त त्या कन्येचे आश्चर्य वाटत आहे. मला कुणीतरी पळवून नेले आणि माझ्या मनाविरुद्ध प्रधानजींच्या घरी ठेवले होते हे ती कसे काय सांगू शकते? आमच्या घरी तिला सर्वांनी इतक्या प्रेमाने वागवले होते. त्या प्रेमाला आणि आदराला विसरून ती इतके धादांत असत्य सांगते म्हणजे तिला कोणतेतरी जबरदस्त आमीष दाखवले असले पाहिजे. आणि त्या आमीषाला ती कन्या बळी पडली असली पाहिजे. पण इतके तिच्यावरचे संस्कार तकलादू होते? कलियुग कलियुग म्हणतात ते हेच असले पाहिजे , असेच म्हणावे लागेल. “ प्रधानजी असे खेदाने सांगून खाली बसले.
“ ठीक आहे ,आम्ही सर्वांनी तुमचे सुरेख भाषण ऐकले . न्याय फक्त वर्तन पहातो. आपण दोषी आहात हे सिद्ध झाले आहे. आता राजकुमार ,आपणच न्यायदान करून या गुन्ह्याची योग्य ती शिक्षा द्यावी.” सम्राट म्हणाले.
सम्राट सूर्यकेतू दरबाराला उद्देशून म्हणाले “ आता सर्वाना गोंधळात टाकणाऱ्या या खटल्याचा न्याय निवडा करण्याची वेळ आली आहे. मी सुद्धा या सर्व प्रकाराने व्यथित झालो आहे. प्रधानजी माझ्या खास विश्वासातील आहेत. ते नेहमीच माझ्या आदरास पात्र आहेत. सर्व समाजात त्यांना मानाचे स्थान आहे. राज्याच्या विकासा साठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आहेत. राजकुमार आपण न्यायशास्त्राचा विशेष अभ्यास केला आहे. या खटल्यात प्रधानजी सत्यव्रत यांचे या दरबारातील स्थान व आपल्या सर्वांच्या मनातील आदराचे स्थान यांचा विचार न करता या खटल्यातील साक्षी पुराव्यांचा विचार करून योग्य तो निर्णय न्यायाधीशांनी करावा “ सम्राट सूर्यकेतू म्हणाले.
तेव्हड्यात गुरुदेव गौतम दरबारामध्ये आले. धिप्पाड शरीरयष्टी,मानेपर्यंत रुळणारी धवल रंगाची दाढी आणि भगव्या रंगाच्या कफनी मुळे त्यांचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व खुलून दिसत होते. सम्राट ताबडतोब उठून त्यांच्या सामोरी गेले आणि त्यांना आदराने स्थानापन्न केले.
“ गुरुदेव आपल्याला काही सांगायचे आहे काय? “ सम्राट म्हणाले.
“मला या प्रकरणी थोडी वेगळी माहिती मिळाली आहे ती मला दाराबारासमोर सादर करायची आहे.” गुरुदेव म्हणाले.
“ आपल्याला या प्रकरणासंबंधी काही माहिती आहे काय? कृपा करून ती सदर करा!” राजकुमारांनी गुरुदेवांना नमस्कार करून विचारले.
“ होय राजकुमार!, गेले काही दिवस माझे खास गुप्तहेर फिर्यादी कन्या प्राजक्ता हिच्या मागावर होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मी आजच सकाळी फिर्यादीच्या घरी जावून फिर्यादी प्राजक्ताच्या मातापित्यांकडे जाऊन त्यांच्या कडून सत्य वदवून घेतले आहे. इथे उपस्थित असलेली फिर्यादी कन्या प्राजक्ता आणि तिचे माता आणि पिता या सर्वांनी या दरबारामध्ये खोटी साक्ष दिली आहे. “ गुरुदेव म्हणाले.
“गुरुदेव हा सर्व काय प्रकार आहे याचा पूर्ण खुलासा करा.” सम्राट अचंबित होऊन म्हणाले.
“ द्वारपाल....! फिर्यादी प्राजक्ता यांचे माता पिता यांना दरबारी सादर करा! फिर्यादी कन्या प्राजक्ता तुम्ही पण समोर या!” राजकुमारांनी आज्ञा केली. थोड्याच वेळात फिर्यादी आणि तिचे मातापिता मान खाली घालून आणि अपराधी मुद्रेने दरबारात उभे राहिले.
“ फिर्यादी प्राजक्ता राजेसाहेबाना सर्व सत्य कथन करा. मला तुमच्या मातापित्यांनी सर्व सत्य अगोदरच सांगितले आहे. तेव्हा आता परत असत्य सांगून राजेसाहेबांचा रोष ओढवून घेऊ नका.” गुरुदेवांनी आवाज चढवला.
फिर्यादी प्राजक्ता आता थरथरा कापू लागली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले.
तिने राजेसाहेबांपुढे आणि राजकुमारांपुढे गुढगे टेकले आणि ती कापऱ्या आवाजात बोलू लागली.
“ महाराज मला माफ करा. मी खूप मोठा अपराध केला आहे. प्रधानजी पूर्ण निर्दोष आहेत. त्यांनी मला अजिबात कसलाही त्रास दिला नाही. प्रधानजी यांनी मला त्यांच्या कन्ये सारखी वागवली आहे. त्यांनी मला पळवली नाही. असला नीच आणि धादांत खोटा आरोप करताना माल खूप यातना होत होत्या. ते तर देवमाणूस आहेत. पण मी तरी काय करू? आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न होता.मी असे खोटे बोलण्याबद्दल मला एक मोठा भूखंड मिळणार होता आणि त्यावर शेती करून आमच्या साऱ्या कुटुंबाची गरिबी कायमची नाहीशी होणार होती. यात माझ्या मातापित्यांचा दोष एवढाच कि त्यांनी माझी साथ दिली. या बद्दल जी काही शिक्षा होईल ती भोगायला मी तयार आहे. “
सारा दरबार सुन्न होऊन हे ऐकत होता. एवढे मोठे असत्य आणि ते सुद्धा प्रधानजी सारख्या सज्जन माणसाबद्दल? आतापर्यंत या दरबारात असा विवाद आला नव्हता.या नीच मुलीला आता राजेसाहेब काय शिक्षा देतात या कडे सारा दरबार उत्सुकतेने पहात होता.
काही सुज्ञ सज्जनांची मान मात्र शरमेने खाली गेली होती. काही वेळापूर्वी हेच सर्व सज्जन या अश्या नीच कन्येच्या शब्दावर विश्वास टाकून प्रधानजीना दोषी ठरवणार होते? एव्हडा मोठा भ्रम? असा काय जादू टोणा त्या कन्येने केला होता? प्रधानजी एवढे जीव तोडून सांगत होते त्यावर कुणाचाही विश्वास कसा बसला नाही?
काही सुज्ञ लोकांच्या मोठ्या शरमेने लक्षात आले.अश्रू पात करणाऱ्या एखाद्या सुंदर कन्येने सांगितलेले असत्य सुद्धा बऱ्याच पुरुषांना आणि काहीवेळा स्त्रीयानासुद्धा सत्यच वाटते. स्त्री च्या सौंदर्यात आणि अश्रूत केवढे सामर्थ्य असते हे आज सर्वाना पुन्हा एकदा जाणवले. त्या समोर सत्शील माणसाचे सत्यकथन सुद्धा असत्यकथन ठरते.
“ हे कन्ये! तू फार मोठा अपराध केला आहेस. पण हे करायला तुला कोणी मोहात पाडले? “ राजेसाहेबांनी करड्या आवाजात विचारले.
प्राजक्ता एकदम दचकली . काही वेळ तिच्या तोंडून काही शब्दच फुटेनात.एखाद्या भेदरलेल्या हरिणी प्रमाणे तिने आपली भेदरलेली नजर सर्व दरबारावरून फिरवली. काहीच न बोलता ती तशीच निशब्द उभी राहिली.
“ ताबडतोब त्या व्यक्तीचे नाव सांग!” सम्राट कडाडले.
“ सम्राट मी मधेच बोलतो याची माफी असावी . “ गुरुदेव मधेच आपल्या आसनावरून उठून म्हणाले.
“ मी सांगतो त्या व्यक्तीचे नाव. आपल्या शेजारील शत्रू राज्याचे प्रधानजी दुर्मुख यांचा हा कट आहे. आपल्या प्रधानजीना कलंकित करून त्यांच्या पदावरून काढले कि आपल्या राज्यावर कब्जा करणे सोपे होईल असा त्यांचा डाव होता. त्या साठी या कन्येला खूप मोठा भूखंड देण्याचे वचन त्यांनी दिले होते. “
सम्राट सूर्यकेतू काही वेळ निशब्द झाले. ते आपल्या प्रधानजीना खूप चांगले ओळखत होते. त्यांच्या वरचे बालंट नाहीसे झाले याचे त्यांना खूप बरे वाटले.
“ गुरुदेव आपण योग्य वेळी याचा छडा लावलात या बद्दल आम्ही तुमचे उपकृत आहोत. “ सम्राट म्हणाले.
“ होय महाराज . ते तर माझे कर्तव्यच होते. पण या सर्व प्रकारातून आपल्या राज्याचा आणि त्यातल्यात्यात आपल्या न्याय व्यवस्थेचा खूप फायदा व्हावा असे मला वाटते. नव्हे त्यात आमूलाग्र बदल घडवण्यासाठीच या प्रसंगाचा आपण उपयोग करून घ्यायला हवा. “ गुरुदेव म्हणाले.
“ गुरुदेव आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये काय सुधारणा कराव्या असे तुम्हाला वाटते, या बद्दल आम्हाला मार्गदर्शन
करावे. “ राजकुमार म्हणाले.
“ आपल्या सर्वाना हे माहीतच आहे कि न्याय नेहमी प्रमाण मागतो . कोणताही गुन्हा सिद्ध होण्यासाठी प्रमाण हवे. प्रमाणासाठी प्रत्यक्ष , शब्द आणि अनुमान ह्यांचा आधार घेतला जातो. घडलेला गुन्हा कुणी प्रत्यक्ष पहिला आहे का? या गुन्ह्याबद्दल कोणी साक्ष देत आहे का? आणि त्या वरून काय अनुमान लावता येईल. आजवर आणि या पुढे सुद्धा याच सूत्रांचा आधार घ्यावा लागणार आहे पण त्यात थोडा बदल करून. आता मी हे सर्व आत्ताच का सांगतो आहे हे हि सांगतो . आपल्या सर्वाना हे ज्ञात असेलच कि आता कलियुगाला सुरुवात होऊन काही काळ लोटला आहे. या युगाचे नियम वेगळे आहेत. लोकांच्या वागण्याच्या पद्धती आमुलाग्र बदलणार आहेत. आपल्या न्याय पद्धतीत त्या नुसार बदल केले नाहीत तर आज जसे प्रधानजी यांच्यासारखे निरपराध, सज्जन आणि आपल्या सर्वाना पूज्य असे व्यक्तिमत्व या दरबारात दोषी ठरले असते,तशी परिस्थिती पुन्हा पुन्हा येईल हे मला आपल्या सर्वाना सांगायचे आहे.
आपण पाहिलेत कि पूर्वी आपले शील जपणाऱ्या कुलीन स्त्रिया आज पैश्या साठी आणि स्वार्थासाठी सज्जन पुरुषाची अब्रू वेशीवर टांगायला मागे पुढे बघणार नाहीत.आणि सज्जन व निरपराध व्यक्तीच त्यांची शिकार होत राहणार आहेत.
आपण न्याय व्यवस्थे मध्ये समजतो कि सत्य आणि असत्यामध्ये अन्तर फक्त चार बोटे असते. जे कानाने एकले ते खोटे असू शकते पण डोळ्यांनी पाहिलेले सत्य असायलाच पाहिजे. या कलियुगात हे गृहीत बदलणे गरजेचे आहे. आपल्या किवा साक्षीदाराच्या डोळ्यांनी जे पहिले ते भासमान सत्य तर नाही ना ? सत्याचा आभास तर नाही ना? हा प्रश्न न्यायाधीशाने मनात विचारायला हवा. असत्यच सत्याचा पोशाख घालून तर उभे नाही ना? हाही प्रश्न विचारायला हवा. आपल्या धर्मग्रंथावर हात ठेऊन शपथ घेतल्यावर सुद्धा आज साक्षीदार असत्य अगदी सफाईदार पणे बोलू शकतो याची जाण आजच्या आणि येण्याऱ्या न्याय संस्थेला असायला हवी .प्रत्यक्षदर्शी साक्षीदारावर कितपत विश्वास ठेवायचा हे न्यायाधीशांनी विवेक वापरून ठरवायला हवे.
सज्जन माणसाचे सत्य सुद्धा अश्या दांभिक असत्यापुढे नांगी टाकते. सत्याचा शेवटी विजय होतो असे भाबडे विचार या कलियुगात अजिबात उपयोगाचे नाहीत.
राजकुमार उद्याची न्यायव्यवस्था सांभाळणार आहेत. त्यांना न्यायदानामध्ये गुप्तहेरांचे स्थान किती महत्वाचे आहे हे समजावे या साठीच मी त्या कन्येच्या मागे गुप्तहेर लावून सत्याच्या मुळापर्यंत जाता येते हे सिद्ध करायची व्यवस्था केली होती. “ गुरुदेव म्हणाले.
“ गुरुदेव तुम्ही काय सांगताय हे माझ्या लक्षात येत आहे. पण आता या पुढे न्यायाधीशांनी काय काय काळजी घ्यायला हवी असे तुम्हाला वाटते.” राजकुमार म्हणाले.
“ न्यायाधीशाचा विवेक कायम शाबूत हवा. आपल्या समोर जो पुरावा मांडला जातोय तो असत्य तर नाही ना? ते एक नाट्य,भासमान सत्य तर नाही ना? या ठिकाणी हजर केलेल्या आरोपीला दोषी ठरवण्यात कुणाचा फायदा तर नाही ना? असे प्रश्न सतत न्यायाधीशांनी आपल्या मनाला विचारत राहिले पाहिजेत.ह्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी गुप्तहेरांचा योग्य तिथे उपयोग करायला हवा.सत्य आणि असत्याची सीमारेषा आता खूप धूसर होत जाणार आहे याचे भान त्याने कायम ठेवायला हवे. म्हणजे प्रत्यक्षावर आणि शब्दावर विश्वास ठेऊन अनुमान काढताना न्यायाधीशाला विवेक वापरायला हवा. कशाला प्रमाण मानायचं? ह्यावर खूप विचार केला गेला पाहिजे. न्यायाधीशाची नीर क्षीर विवेक बुद्धी कायम जागृत हवी.
राजकुमार या विचारांचा कायम विचार करून न्यायदान करा.हे कलियुगातील न्यायदान आहे हे कायम लक्षात ठेवा. माझे तुम्हाला पूर्ण आशीर्वाद आहेत आता या प्रकरणात आपण योग्य तो न्याय द्याल अशी माझी खात्री आहे. !” गुरुदेव आपल्या गंभीर आवाजात म्हणाले.
*******************************************************************
जयंत नाईक ,पुणे

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

शलभ's picture

24 May 2018 - 6:02 pm | शलभ

छान आहे. आवडली.

Jayant Naik's picture

28 May 2018 - 2:22 pm | Jayant Naik

आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार .