कुतुबमिनार परिसरातील लोहस्तंभ - मूल स्थान इत्यादि - लेख ३.

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in जनातलं, मनातलं
17 May 2018 - 4:49 am

(भाग १, भाग २)

विदिशेजवळची आणि कालिदासास ’नीचै:’ ह्या नावाने माहीत असलेली ही टेकडी म्हणजेच दिल्लीच्या स्तंभामध्ये उल्लेखिलेला ’विष्णुपदगिरि’ असा तर्क ठरल्यावर तिच्यावर तो ’विष्णुध्वज’ अशा वर्णनाचा लोहस्तंभ कोठे उभा असेल ह्याच्या शोधाचा प्रारम्भ होतो, आणि त्यासाठी आपणास प्राचीन भारतीयांच्या ज्योतिर्विज्ञानाकडे वळावे लागते.
फिट्झ्-एडवर्ड हॉल ह्यांचा Three Sanskrit Inscriptions ह्या शीर्षकाचा एक लेख Journal of the Asiatic Society of Bengal, Volume XXXI, Nos I-V, 1862 येथे पृ. १११ वर उपलब्ध आहे. लेखाच्या तळटीपेमध्ये ते लिहितात:

At Bhelsa, within the fort, I recently found a fragmentary inscription, built into the outer wall of a modern house, and looking upon one of the streets of the town. Subjoined is all that remains of a record of which perhaps a full half is missing.

ह्यानंतर लेखाच्या उपलब्ध दहा ओळी ते देवनागरीमध्ये देतात. त्यातील पाचवी ओळ अशी आहे -

भाइल्लस्वामिनामा रविरवतु भुव: स्वामिनं कृष्णराजम्। (भाइल्लस्वामी सूर्य पृथ्वीपति कृष्णराजाचे रक्षण करो.).

आता सर्वांच्या स्मृतीमधून पूर्णत: बाहेर गेलेले, पण एकेकाळी दूरवर ख्याति पसरलेले ’भैलस्वामी’ नावाच्या सूर्यदेवाच्या एका स्वरूपाचे मंदिर विदिशेच्या परिसरामध्ये होते, ह्याचा हा एक लिखित पुरावा आहे.
गुप्तकालीन विदिशा-भिलसा गाव सध्याच्या जागी नसून ते बेस-बेटवा संगमावर होते आणि तेथे परिसरामध्ये भैलस्वामी नावाच्या देवाचे दूरवर ख्याति असलेले मंदिर होते. ह्याची आणि मालव प्रान्ताची कीर्ति ऐकून १२३४ मध्ये सुलतान इल्तमशच्या सैन्याने माळव्यावर चाल केली आणि बरीच लूटमार करून देवळे पाडली, तसेच बरीच लूट दिल्लीस नेली. उज्जयिनीचे मेघदूतामध्ये कालिदासाने वर्णिलेले महाकालाचे मंदिर आणि वर्णनावरून बरेच मोठे असावे असे वाटणारे भिलशाचे भैलस्वामीचे मंदिर, ही अशा तोडलेल्या मंदिरांमध्ये होती असे पुढील वर्णन सांगते. वर्णनात नाव न दिलेले मंदिर भैलस्वामीचे असावे. ह्या सर्व प्रकरणाचे पुढील वर्णन मिन्हाज्-उस्-शिराज़ लिखित तबकात-अल-नासिरी ह्या इतिहासात दिले आहे. (भाषान्तर एच.एम. इलिअट, पृ. ३२८, History of India as Told by Its Own Historians V. II)

"After he (Altamash) had reached the Capital he sent, in A.H.632 (1234 A.D.) the army of Islam towards Malwa and took the fort and the city of Bhilsa. There was a temple there which was three hundred years in building. It was about one hundred and five gaz high. He demolished it. From there he proceeded to Ujjain, where there was a temple of Maha-kal, which he destroyed, as well as an image of Bikramajit, who was king of Ujjain, and reigned 1316 years before this time. The Hindu era dates from his reign. Some other images cast in copper were carried with the stone image of Maha-kal to Dehli."

ह्याच पुस्तकाच्या रॅवर्टी ह्यांनी केलेल्या भाषान्तरामध्ये हा इल्तमशच्या कार्याचा आढावा घेतांना हाहि अन्य मजकूर आहे:

(Conquering) Ujjain-Nagari and bringing away of the idol of Maha-kal, which they have planted before the gateway of the Jami Masjid in the capital city of Delhi in order that all true believers might tread upon it.
(Tabakaat-i-Naasiri - A General History of the Muhammadan Dynasties of Asia including Hindustan पृ.६२८)

अलीकडील संशोधनावरून असे दृष्टीस पडले आहे की चन्द्रगुप्तपूर्व कालापासून ही जागा आकाशस्थ ग्रहगोलांचा वेध घेण्यासाठी वापरात असावी. कनिंगहम ह्यांनी उदयगिरीच्या दोन उंचवट्यांपैकी दक्षिणेच्या उंचवट्यावर काही बांधकामाचे अवशेष, तसेच १६ फुटाहून लांब आणि २’९" व्यासाच्या एका भग्न स्तंभाचे अवशेष, त्यावर बसलेला सिंह, तसेच काही बांधकामाचे अवशेष पाहिले होते (Archaeological Survey of India, Reports Vol. X पृ. ५६), पण त्यावर काहीच टिप्पणी केली नव्हती. केवळ इतकाच उल्लेख केला होता की हा स्तंभ येथून हलवून दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न झाला असावा आणि तसे करतांना तो खाली पडून त्याचे तुकडे झाले असावेत. तुकडे नेण्यात कोणाला स्वारस्य नसल्याने ते तुकडे तसेच जागेवर पडून राहिले. हे जागेवर पडलेले सिंहाचे शिल्प १९२० साली खाली दाखविल्याप्रमाणे दिसत होते. हे शिल्प नंतर ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये असलेल्या पुरातत्त्व विभागाच्या वस्तुसंग्रहालयामध्ये १९३० च्या आगेमागे हलविण्यात आले, आणि तेथे ते अजूनहि पहावयास मिळते. त्याचे मूळ स्थानावर असतांनाचे १९२० साली घेतलेले चित्र आणि वस्तुसंग्रहालयातील नंतरचे चित्र पुढे दाखवीत आहे. सिंहाच्या खाली दिसणाऱ्या गोल पट्टीवर (abacus) काही प्राण्यांच्या आकृति दिसतात. त्यांकडे काही वेळाने परत येऊ. अलीकडील अधिक बारकाईने केलेल्या ह्या उंचवट्याच्या पाहणीवरून असे वाटते की विस्मृतप्राय असे हे भैलस्वामीचे मंदिर ह्या उंचवट्यावरच असावे.२

सिंहाचे शिल्प १९२० मध्ये जागेवर


सिंहाचे शिल्प सध्या संग्रहालयामध्ये

१९१३-१४ या वर्षामध्ये देवदत्त रामकृष्ण भांडारकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली उदयगिरीच्या उत्तरेकडील उंचवट्याची पाहणी आणि उत्खनन करण्यात आले. (जवळच्याच सांचीप्रमाणे उदयगिरीवर बौद्ध अवशेष मिळतील अशी कनिंगहम आणि भांडारकर दोघांचीहि समजूत होती, पण तसे घडले नाही.) ह्या पाहणीमध्ये दोन तुकडयांत मोडून पडलेला एक स्तंभ जमिनीत अर्धा पुरलेला दिसून आला. तेथेच एका चक्राचा एक भग्न तुकडा मिळाला ज्यावर काही स्त्री-चित्रे कोरलेली दिसतात. स्तंभाचे चार दिशांना पाहणाऱ्या चार सिंहांचे स्तंभशीर्ष आणि त्याखालची गोल पट्टी (abacus) ह्या दोन गोष्टी जागेवरून गडगडून लेणे १९ च्या बाहेर पडलेल्या मिळाल्या. हे स्तंभशीर्षहि ग्वाल्हेरच्या वस्तुसंग्रहालयात नेण्यात आले. ह्या मोडलेल्या स्तंभाचे आणि भग्नचक्राचे अशी अलीकडची, स्तंभशीर्षाची जागेवर असतांनाची दोन आणि वस्तुसंग्रहालयातील एक, तसेच त्यांच्याखालील गोल पट्टीची दोन अशी उपलब्ध छायाचित्रे येथे दर्शवीत आहे.

मोडून पडलेला स्तंभ

चक्राचा एक भग्न तुकडा

स्तंभशीर्ष जागेवर

स्तंभशीर्ष जागेवर

स्तंभशीर्ष संग्रहालयात

स्तंभशीर्षाखालील गोल पट्टी

स्तंभशीर्षाखालील गोल पट्टी

वरील सर्व चित्रांमधील प्राणी कशाचे निदर्शक असावेत ह्याबाबत तर्क करण्यात आले आहेत. एक सिंह असलेल्या शीर्षस्तंभाखालचे प्राणी वर्षाचे सहा ऋतु दाखवितात. चक्रावरच्या आकृति नक्षत्रांच्या आहेत. चार सिंहांच्या शीर्षस्तंभाखाली बारा राशि असून प्रत्येक राशीच्या पुढेमागे आसनावर बसलेला सूर्यदेव आहे असे मानण्यात आले आहे. ह्यांपैकी नक्षत्र आणि राशीविषयक तर्क अधिक विश्वसनीय वाटतात. जवळून निरखून पाहिल्यास राशींपैकी वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, धनु, मकर आणि कुंभ इतक्या राशींची चित्रे ओळखता येतात.
उज्जयिनी आणि तिचा परिसर जवळजवळ कर्कवृत्तावर पडत असल्याने प्राचीन कालापासून उज्जयिनीचे नाव भारतीय खगोलविद्येशी निगडित आहे. आज रेखांशांची मोजणी ’ग्रीनिच गावापासून अमुक रेखांश’ अशी केली जाते. भारतीय भूवर्णनात हेच स्थान उज्जयिनीचे होते. कित्येक करणग्रंथांमध्ये ग्रहांचे स्थान निश्चित करण्यासाठी लागणारे मूळचे ’क्षेपक’ (अहर्गणाच्या पहिल्या दिवसाची ग्रहांची स्थिति) उज्जयिनीचे दिलेले असतात. चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या थोड्याच पुढील काळात होऊन गेलेला वराहमिहिर हा उज्जयिनीचाच. वैदिक कालापासून सूर्यदेवता आणि विष्णु, तसेच विष्णूचा वराह अवतार ह्यांचा निकटचा संबंध मानला गेला आहे. सूर्यरूपी विष्णु प्रतिदिन तीन पावलांमध्ये - उदय, मध्याह्न आणि अस्त - विश्वाचा प्रवास करतो अशी समजूत आहेच. सूर्याच्या वार्षिक उत्तर-दक्षिण-उत्तर आंदोलनाचे कर्कवृत्त-विषुवन्-मकरवृत्त-विषुवन्-कर्कवृत्त असे चार भाग पाडले तर प्रत्येक भागाच्या मधोमध दोन राशी पडतात. ह्या राशींपैकी कर्कवृत्ताच्या आणि मकरवृत्ताच्या मागील आणि पुढील अशा दोन राशींच्या संक्रान्तींना विष्णूचे दोन पाय म्हणतात असा काहीसा संदिग्ध उल्लेख सूर्यसिद्धान्तामध्ये करण्यात आला आहे. (त्याचा निश्चित अर्थ संस्कृत टीकाकारालाहि नीटसा समजलेला दिसत नाही, अशी टिप्पणी सूर्यसिद्धान्ताचे भाषान्तरकार रेव्हरंड एबेनेझेर बर्जेस ह्यांनी केली आहे. पहा बर्जेसकृत भाषान्तर सूर्यसिद्धान्त अध्याय १४, श्लोक ८, पृ.३१३).
उदयगिरीवरील वर वर्णिलेल्या वराहाच्या आणि अनन्तशयन विष्णूच्या मूर्ति, तेथेच एकेकाळी उभे असलेले भैलस्वामीचे मंदिर, उदयगिरीचे जवळजवळ कर्कवृत्तावरील स्थान (२३.५४०५२८ उ. ७७.७७१०२८ पू.), तेथे मिळालेली राशींची चित्रे आणि नक्षत्रांची चित्रे, ह्या बाबींचा एकत्रित विचार केल्यास असे म्हणता येते की ह्या टेकडीचा वेधशाळेसारखा उपयोग केला जात असला पाहिजे, आणि कर्कवृत्तामुळे तिचा संबंध विष्णुपदांशी जोडला गेला असला पाहिजे. कनिंगहम ह्यांना दिसलेला सिंहशीर्ष स्तंभ छायायन्त्राचा 'शंकु' (gnomon) म्हणून निर्माण झाला असला पाहिजे. गूगलकृपेने पृथ्वीवरील कोणत्याहि भूभागाचा आकाशातूनचा देखावा कोणालाहि पाहता येणे शक्य झाले आहे. ह्याचा उपयोग करून Google Earth वर उदयगिरीकडे जवळून पाहिले तर वेगळ्या रंगच्छटेमध्ये दिसणाऱ्या काही जागा आणि त्यांचे आकार असे सुचवितात की कोणे एके काळी येथे काही मोठया इमारती वा बांधकाम असावे.
उदयगिरीचे एक नैसर्गिक वैशिष्ट्य असे आहे की तिच्या उत्तर आणि दक्षिण उंचवट्यांना दुभागणारी अशी अरुंद आणि खोल पट्टी अथवा मार्ग आहे. हा अरुंद मार्ग क्र.१ च्या लेखात दाखविलेल्या Contour Map मध्ये दिसत आहे. तिच्याकडे येथे पुन: नजर टाकू:

हा मार्ग कर्कवृत्ताशी जवळजवळ पूर्णत: संलग्न आहे. क्र.१ च्या लेखात दाखविलेले अनन्तशयनाचे लेणे ह्या अरुंद मार्गाच्या पश्चिमेकडील टोकास दक्षिण बाजूस आहे. कर्कवृत्तावरील सर्व स्थानांमध्ये दक्षिणायन प्रारंभ होण्याच्या दिवशी (summer solstice - २१ जून) सूर्योदय खऱ्या पूर्वेच्या उत्तरेस २३.५ अंशाच्या बिंदूवर होतो, मध्याह्नीला सूर्य सरळ डोक्यावर असतो आणि सूर्यास्त खऱ्या पश्चिमेच्या उत्तरेस २३.५ अंशाच्या बिंदूवर होतो. हा अरुंद मार्ग कर्कवृत्ताशी संलग्न आहे हे त्याचे वैशिष्ट्य तत्कालीन स्थापत्यकारांच्या लक्षात आले असले पाहिजे, कारण ह्या अरुंद मार्गाची उत्तरेकडील बाजू तासून काढण्यात आली आहे आणि तिच्यावर अन्य कसलेहि कोरीव काम केलेले नाही, ज्यामुळे उत्तरेच्या बाजूवरून कसलीच सावली मार्गामध्ये पडू शकत नाही. दक्षिणेच्या भिंतीमध्ये अनन्तशयन विष्णूचे शिल्प आहे. ह्या मार्गाच्या अनन्तशयनापासून विरुद्ध बाजूस जर शंकु (gnomon) उभा केला तर दक्षिणायनाच्या प्रारंभाला सूर्योदय होताच शंकूची छाया लांब पसरून अनंतशयनाच्या पायांकडे जाईल. टेकडी दुभागणार्‍या अरुंद मार्गाचे हे वैशिष्टय लक्षात आल्यावर तेथेच शंकुरूपी ’विष्णुध्वज’ उभा असणे हे तर्कसंगत वाटते. त्या अरुंद दुभाजकाची दोन रेखाचित्रे, त्याची दोन बाजूनी छायाचित्रे, तसेच कर्कवृत्तावरच्या कोणत्याहि स्थानी २१ जूनच्या दिवशी सूर्योदयाच्या, मध्याह्नीच्या आणि सूर्यास्ताच्या वेळी छाया कशा पडतील हे दाखविणारी छायाचित्रे पुढे जोडत आहे.

अनन्तशयन लेण्याची जागा

Contour Map वरून दिसणारा अरुंद मार्ग

अरुंद मार्ग पश्चिमेकडून पूर्वेकडे पाहतांना

अरुंद मार्ग पूर्वेकडून पश्चिमेकडे पाहतांना

२१ जूनचा उगवता, मध्याह्नीचा आणि मावळता सूर्य आणि छाया

ह्या पुढचा प्रश्न म्हणजे वर दाखविलेला संस्कृत लेख हा कोणाच्या आज्ञेने स्तंभावर कोरण्यात आला आहे. ह्या प्रश्नाला स्पष्ट उत्तर नाही, पण दोन तर्क सहज करता येतात. स्तंभ निर्माण करणाऱ्या चन्द्रगुप्त विक्रमादित्य ह्याच्या देखरेखीखाली श्लोकाची निर्मिति निश्चितच झालेली नाही, कारण तो स्वर्गवासी झाला असल्याचा उल्लेख लेखातच आहे. शक्यता अशी वाटते की त्याच्या मृत्यूनंतर लवकरच त्याच्या वंशजांपैकी कोणाच्या तरी, उदाहरणार्थ त्याचा पुत्र कुमारगुप्त, आज्ञेप्रमाणे हा श्लोक तयार करून स्तंभावर कोरण्यात आला असावा.
स्तंभाला ’विष्णुध्वज’ असे अभिधान आहे. ह्या अभिधानायोग्य सध्या उर्वरित स्तंभावर काहीच नाही. त्याच्या शीर्षस्थली काही मूर्ति, चिह्न असण्याची अपेक्षा आहे. तेथे असे काय होते ह्याचाहि विचार करण्यात आला आहे. स्तंभाच्या सर्वात वर असलेला चौरस आणि त्या भागामध्ये असलेली एक खाच पुढील चित्रामध्ये दाखविली आहे. अशा खाचेत बसू शकणारी आणि विष्णूशी संबंधित अशी गोष्ट म्हणजे डाव्या हातामध्ये असलेले सुदर्शनचक्र. असे चक्र हातात धरलेली विष्णूची मूर्ति उदयगिरीमधील क्र. ६ च्या लेण्यामध्ये दिसते आणि तेथे ते चक्र अशाच एका चौरस व्यासपीठावर आधार दिलेले असेहि दिसते. त्या मूर्तीचे चित्र आणि चक्राचा अधिक जवळून दिसणारा देखावा हाहि पुढे दाखवीत आहे. चौरस व्यासपीठाच्या साम्यामुळे असे वाटते की स्तंभाच्या सर्वात वरच्या खाचेमध्ये विष्णूचे निदर्शक असे चक्र उभे असावे आणि त्यामुळे स्तंभाच्या ’विष्णुध्वज’ अशा वर्णनाचे समर्थन होत असावे.

विष्णुध्वजाचा माथा

चक्रधारी विष्णु आणि हातातील चक्र

स्तंभाचे सध्याचे स्थान हे त्याचे मूळचे स्थान नाही हे सहजच सांगता येते. एकतर ११व्या शतकामध्ये तोमार घराण्याने आपली सत्ता स्थापन करून दिल्ली, विशेषेकरून ’किला राय पिठोरा’ म्हणून ओळखली जाणारी जागा (सध्याचा कुतुबमिनारचा परिसर), येथे आपली राजधानी निर्माण करेपर्यंत दिल्लीला प्राचीन भारताच्या राजकारणात काहीच स्थान नव्हते. साहजिकच चन्द्रगुप्ताने आपला विष्णुध्वज तेथे उभारावा असे काहीच कारण दिसत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लेखात म्हटल्याप्रमाणे स्तंभ विष्णुपद नावाच्या गिरीवर होता. सध्याची त्याची जागा कोणत्याच गिरीवर नाही, इतकेच नव्हे तर आसपासच्या प्रदेशाच्या तुलनेने खोलगटच आहे. वर चर्चा केल्याप्रमाणे विदिशेजवळील टेकडीवर तो उभा केला असणे अधिक शक्य वाटते. तेथून तो येथे कसा आला हेहि स्पष्ट नाही. स्तंभावरील दोन ओळींच्या एका लेखावरून अनंगपाल तोमार ह्याच्या काळापासून तो सध्याच्या जागी आहे असे म्हणता येते. ह्या राजाचा काल ११वे शतक आहे इतकेच म्हणता येते. हा दोन ओळींचा लेख असा आहे: (पहा Archaeological Survey of India Reports, Vol I, (1862-63-64-65) by Alexander Cunningham, 1871 p. 151.) 'Samvat Dihali 1109 Ang (Ananga) Pal Bahi" "In Samvat 1109 Ang (Ananga) Pal Peopled Dilli".
शेषनागाचा मस्तकापर्यंत स्तंभ जमिनीत खोलवर गेला आहे अशी प्रसिद्ध दंतकथा पुढील दोन प्राकृत ओळींच्या मागे आहे.
जहिं असिवर तोडिय रिउ कवालु, णरणाहु पसिद्धउ अणंगवालु ||
वलभर कम्पाविउ णायरायु, माणिणियण मणसंजनीय ||
The ruler Anangapal is famous, he can slay his enemies with his sword. The weight (of the Iron pillar) caused the Nagaraj to shake.
(पहा - http://en.wikipedia.org/wiki/Vibudh_Shridhar)

स्तंभ मूळच्या जागेवरून उचलून येथे कोणी आणला ह्याबाबतहि काहीच तर्क शक्य दिसत नाही. दिल्लीच्या प्रदेशापासून माळव्यापर्यंतचा भाग ताब्यात असलेला, तसेच चन्द्रगुप्तापासून अनंगपालापर्यंतच्या काळात (म्हणजे ५व्या ते ११व्या शतकाच्या दरम्यान) होऊन गेलेला कोणी राजाच हे करू शकला असता, पण असा कोणीच राजा दृष्टीसमोर येत नाही. काही ठिकाणी इल्तमशचे हे काम आहे असे मत व्यक्त केले गेले आहे पण ते दोन कारणांसाठी शक्य वाटत नाही. एकतर इल्तमशच्या दीडशे पावणेदोनशे वर्षे आधीपासून स्तंभ आहे तेथेच उभा असल्याचा सबळ पुरावा अनंगपालाच्या लेखाच्या स्वरूपामध्ये आपल्यापुढे आहे. तबकात-इ-नासिरी ह्या इल्तमशच्या समकालीन इतिहासात त्याच्या माळव्यावरील स्वारीचे जे वर्णन वर दाखविले आहे तेथेहि महाकालाच्या मूर्तीसारखा असा काही स्तंभ त्याने आणल्याचा उल्लेख नाही. तेव्हा विष्णुपदगिरीपासून दिल्लीपर्यंतचा स्तंभाचा प्रवास कोणामूळे झाला हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित दिसतो.
मूळ जागेपासून तो दिल्लीपर्यंत कसा आला असावा ह्याबद्दल काही तर्क करता येतो. ह्या स्तंभाहून उंचीने आणि वजनाने कितीतरी मोठा असा एकसंधी आणि दगडी अशोकस्तंभ फिरोझशाह तुघलक ह्या सुलतानाने हरियाणातील खिझराबाद ह्या गावातून उचलून आणून त्याला दिल्लीतच फिरोझशाह कोटला ह्या त्याच्या तत्कालीन राजधानीमध्ये कसे उभे केले ह्याचे वर्णन शम्स-इ-शिराज ह्या समकालीन इतिहासलेखकाने आपल्या तारिख-इ-फिरोझशाही ह्या इतिहासामध्ये केलेले आपणास वाचता येते (पहा: History of India as told by its own historians, V. III, H.M.Elliot, p. 351). तदनुसार स्तंभ खणून काढून शेवरीच्या कापसाच्या गादीवर आडवा केला गेला. त्याला वेताच्या आणि कातड्याच्या वेष्टनामध्ये लपेटून बेचाळीस चाकांच्या खास बनविलेल्या गाड्यावर चढविण्यात आले. प्रत्येक चाक ओढण्यासाठी दोनशे माणसे पुरविली होती. स्तंभ गाड्यावरून जवळच असलेल्या यमुना नदीपर्यंत आणला आणि तेथे त्याला एका मोठया नावेवर चढवून दिल्लीपर्यंत कोटल्याबाहेर आणण्यात आले. ह्या स्तंभापुढे विष्णुध्वज हा लोहस्तंभ हलकाच म्हटला पाहिजे. असाच खास गाड्यावर चढवून रोज काही मैल प्रवास करत तो त्याच्या मूळच्या जागेपासून दिल्लीपर्यंत काही महिन्यांमध्ये पोहोचणे सहज शक्य होते.
कालिदासाच्या ’नीचै:’ गिरीपासून सुरुवात करून अखेर टेकडीचे नाव ’उदयगिरि’ येथे कसे पोहोचले असावे? त्या प्रान्तात दहाव्या शतकात राज्य करणाऱ्या उदयादित्य नामक राजावरून हे नाव पडले असावे असा तर्क कोठेकोठे वाचावयास मिळतो. मला दुसरीहि एक उपपत्ति सुचते. चंद्रगुप्ताच्या इच्छेनुसार प्रथम ’नीचै:’ गिरि हा ’विष्णुपदगिरि’ ह्या नावाने ओळखला जाऊ लागला असेल, आणि म्हणून तेच नाव त्याच्या मृत्यूनंतर लिहिल्या गेलेल्या लेखामध्ये मिळते. कालान्तराने चन्द्रगुप्त आणि विष्णुपदगिरीची आठवण पुसट होत गेली. तेथील भैलस्वामीचे मंदिर, सूर्याची उपासना आणि सूर्योदयाशी अनन्तशयन विष्णूचा संबंध स्तंभाच्या सावलीमुळे जोडला जाणे ह्याचा परिणाम जनमानसावर अधिक होऊन विष्णुपदगिरि हे नाव मागे पडून उदयगिरि हे नाव अधिक प्रचलित झाले असावे.

श्रेय क्र. ७

ह्यापुढील मोठा प्रश्न म्हणजे हा स्तंभ कोणत्या तन्त्राने निर्माण केला असावा. ह्याचे जे उत्तर देण्यात आले आहे७ त्यानुसार कोळशाच्या भट्टीमध्ये तापवून नरम केलेल्या २० ते ३० किलो वजनाच्या लोहगोलांना घणाच्या घावांनी - forge welding - एकमेकांशी जोडून हा स्तंभ निर्माण करण्यात आला आहे. वरील चित्रामध्ये ही प्रक्रिया दर्शविण्यात आली आहे. स्तंभ ९८% ओतीव लोखंडाचा असून लोखंडाचे खनिज हे कोळशाबरोबर मुशीमध्ये वितळवून केला गेला आहे. ह्या पद्धतीमुळे तयार धातूमधील फॉस्फरसचा भाग टिकून राहतो, आणि स्तंभ न गंजण्याचे ते कारण आहे. ही पद्धति सध्याच्या चुनकळी खनिजाबरोबर वितळवण्याच्या प्रक्रियेहून भिन्न आहे. स्तंभावरील लेख हा कोरून काढलेला नसून punch-marked नाणी तयार करतात त्याच पद्धतीने ब्राह्मी अक्षरांच्या अवयवांचे साचे करून आणि त्यांवर घणाचे घाव घालून ही अक्षरे उमटविण्यात आली आहेत.८
****************************************
टीप १ - अन्य काही लेखकांच्या अनुसारे ही मूर्ति दिल्लीतील ’तांबडया दगडाच्या मनोऱ्यापुढे' (कुतुब मिनार?) जमिनीमध्ये पुरण्यात आली. १७३४-४५ ह्या काळात हे मंदिर त्याच जागी राणोजी शिंदे ह्यांचे मन्त्री रामचन्द्रबाबा सुखटणकर ह्यांनी पुन: बांधले (पहा ’Ujjain’ by KB Dongray, p. 131). बदाउनीच्या मुन्तखाब-उल-तवारिखप्रमाणे १२९२ मध्ये अलाउद्दीन खिलजीने भिलशावर पुन: हल्ला केला आणि ह्यावेळी भैलस्वामीची मूर्ति जागेवरून हलवून बदाऊन गावात वेशीसमोर टाकण्यात आली. हा उल्लेख Studies in the Religious Life of Ancient and Medieval India - दिनेश चंद्र सरकार पृ. ११५ आणि खाली उल्लेखिलेल्या निबंधांपैकी क्र. १ येथे पहावयास मिळेल.
टीप २. ’विदिशा’ ह्या जुन्या नावाचा अपभ्रंश ’भिलसा’ असा झाला असावा अशी सार्वत्रिक समजूत आहे. ’मेघदूता’तील वर दाखविलेले श्लोक शिकतांना आम्हाला तसेच सांगण्यात आले होते. भाइल्लस्वामी/भैलस्वामी ह्या तेथील एकेकाळच्या प्रसिद्ध मंदिरावरून तर हे नाव पडले नसेल ना, अशी शंका मला येत आहे. विदिशा-भिलसा ह्यापेक्षा भैलस्वामी-भिलसा अधिक शक्य वाटते. स्वातन्त्र्योत्तर काळामध्ये 'विदिशा' हे प्राचीन नाव पुनः अधिकृत झाले आहे.
****************************************

संदर्भ निबंधांची यादी :
1. Inscriptions from Udayagiri: locating domains of devotion, patronage and power in the eleventh century, Michael Willis.
2. The Lion Capital from Udayagiri and the Antiquity of Sun Worship in Central India, by Meera Dass and Michael Willis. (South Asia Studies, 18:1, 25-45) One-Lion capital in museum and in situ, Varaha old pict.
3. The Original Image Atop the Delhi Iron Pillar, by R.Balasubramaniam, Meera I. Dass and Ellen M. Raven. Indian Journal of History of Science, 39.2 (2204) pp. 177-203 (Four lion Pillar museum and in situ, reference to Nakshatra figures, square platform top and slit, Vishnu holding chakra)
4. A Recut Aśokan Capital and the Gupta Attitude towards the Past, by Joanna Williams, Artibus Asiae, Vol. 35, No. 3 (1973), pp. 225-240.
5. Udayagiri Hills in Madhya Pradesh - An Ancient Astronomical Site, Sharan and Dass (used for black and white passage, broken pillar on north hill, Nakshatras and date for Sanakanika inscription).
6. Estimation of the original erection site of the Delhi iron pillar at Udayagiri, Meera I Dass and R. Balasubramaniam, Indian Journal of History of Science, 39.1 (2004), pp. 51-74.
7. The Iron Pillar at Delhi, T. R.Anatharaman, Iron and Steel Heritage of India, Jamshedpur, pp. 1-28.
8. On Technical Analysis of the Characters of the Oldest Delhi Iron Pillar Inscription, R.Subramaniam and V.N.Prabhakar, Current Science, Vol 92, No 12, 25 June 2007.
9. Date of Sanakanika inscription and its astronomical significance for archaeological structures at Udayagiri, Anand M. Sharan and R. Balasubramaniam.
10. On the astronomical significance of the Delhi iron pillar, R. Balasubramaniam and Meera I. Dass.

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

राही's picture

17 May 2018 - 6:29 am | राही

नेहमीप्रमाणेच अतिशय परिश्रमपूर्वक लिहिलेला माहितीपूर्ण लेख .
आवडला हेवेसांनलगे.

प्रचेतस's picture

17 May 2018 - 8:57 am | प्रचेतस

सहमत.

sagarpdy's picture

17 May 2018 - 11:30 am | sagarpdy

+१

असेच म्हणतो. याबद्दल पुस्तक लिहू शकाल इतकी माहिती आपल्याकडे आहे. तरी त्या दृष्टीने जरूर प्रयत्न करावेत ही विनंती.

manguu@mail.com's picture

17 May 2018 - 6:38 am | manguu@mail.com

छान

तुमची टीप वाचण्यापूर्वीच मला भैलस्वामी == भेलसा हे कनेक्शन जाणवले, असे ही होऊ शकते की विदिशा (अपभ्रंश होऊन) == भेलसा == भेलसा गावाचा स्वामी == भैलस्वामी.

एलियट आणि डॉसन यांचे भाषांतर बऱ्याचदा संक्षिप्त असते, त्यात चुकाही होतात (उदाहरण - खाफी खान याच्या भाषांतरात रामसेज किल्ला घेतानाचे वर्णन देताना एक माणूस जादूटोणा करून सोन्याचा नाग घेऊन गेला आणि गोफणीचा दगड लागून तो नाग आणि माणूस खाली पडले, याचे वर्णन सपशेल चुकले आहे). तेव्हा मूळ फारसी पहिले पाहिजे. तिथे भैलस्वामी नाव असेल आणि शब्द लागला नाही म्हणून इंग्रजीत आला नाही अस होणे शक्य आहे.

कपिलमुनी's picture

17 May 2018 - 11:16 am | कपिलमुनी

माहितीपूर्ण लेख .

ससंदर्भ असल्यामुळे लेख आवडला, पुर्वीही समकक्ष थेअरी आंतरजालावर वाचल्याचे आठवते पण आपल्यापैकी कुणी संदर्भ तपासून दुजोरा देणे नक्कीच ऊपयूक्त ठरते.

भिल (समुदायामुळे) या शब्दापासून तशी बर्‍यापैकी स्थलनामे गावे म.प्र. आणि उर्वरीत भारतात असावित असे पिनकोड डाटाबेसवरुन वाटते.

खूप भारी माहिती. मस्त लिहिलाय तुम्ही. _/\_

अतिशय अभ्यासपूर्ण, वाचनीय आणि संग्रहणीय लेखमाला.

या लेखावरून मला एक जुनी घटना आठवली. १९७७ मधे मी इंदौर सोडून दिल्लीला आलो. तेंव्हा मला साधारणतः ५०० रुपये पगाराची ( चित्रकार म्हणून) नोकरी दिल्लीच्या राष्ट्रीय प्राकृतिक इतिहास संग्रहालयात लागली होती. पु. ना. ओक तेंव्हा दिल्लीत रहायचे, आणि मी त्यांना भेटायला अधून मधून जात असे.

एकदा ते मला म्हणाले की मुळात कुतुब मीनारच्या खाली शेषशायी विष्णु (आणि लक्ष्मीची) मोठी मूर्ती होती, आणि विष्णुच्या नाभीतून विष्णुस्तंभ (कुतुब मीनार) निघून त्याच्या अगदी वरच्या टोकाला एक कमळाकृती संगमरवरी छतरी होती (ही छतरी सध्या मीनाराभोवतालच्या बगिच्यात ठेवलेली आहे) आणि तिच्यात ब्रम्हदेवाची मूर्ती असे. भोवतालच्या परिसरात सत्तावीस नक्षत्रांची सत्तावीस मंदिरे होती...वगैरे. तर हे सगळे दर्शवणारे चित्र तू काढून दे, तुला त्याचे पाचशे रुपये देईन.

महिनाभर नोकरी करून मिळणारी रक्कम मला एका चित्रातून मिळणार याचा मला आनंद झाला, कारण दिल्लीत ५०० रुपयात भागत नसल्याने मला पैशांची गरज होतीच. मग मी एका कॅनव्हासवर हे चित्र काढायला घेतले. अभ्यासचित्रे रेखाटण्यासाठी संध्याकाळी कुतुबमीनार परिसरात जायचो. बरीच मेहनत घेऊन चित्र रंगवले. एक मोठा तलाव, त्यात शेषनागाच्या गुंडाळ्यांवर पहुडलेला विष्णु, नागाचा फणा, विष्णुचे पाय चुरणारी लक्ष्मी, त्या दोघांचे मुकुट, दागिने, कंबरपट्टा वगैरे तपशील, नाभीतून निघालेल्या कुतुबमीनाराचे हुबेहुब तपशील, त्यावर संगमरवरी छतरी आणि त्यात ब्रम्हदेवाची मूर्ती, भोवतालची मोजून सत्तावीस नक्षत्रांची मंदिरे.. असे सगळे रंगवले, खरेतर हे सगळे करताना मी वैतागलो होतो, कारण मला त्याकाळी ब्रशचे जोमदार फटकारे मारून झपाट्याने चित्र रंगवणे आवडायचे, त्या मानाने हे फारच किचकट काम होते.
शेवटी चित्र बघायला पु.ना. आले. त्यांना एकंदरित चित्राची रचना वगैरे आवडली, पण त्यांना चित्र मुळगावकर पद्धतीचे अगदी गुळगुळित, सुंदर साजरे गोजरे चेहरे वगैरे असलेले हवे होते. मी मुळातच वैतागलेला होतो, या चित्रापायी माझे आवडते काम बराच काळ करायला मिळालेले नसल्याची खंतही होतीच, मग मी ते चित्र तसेच सोडून दिले (आणि त्यानंतर कधीही असले ऑर्डरबरहुकूम काम केले नाही). ते चित्र अजूनही माझ्याकडे कुठेतरी असेल कदाचित. (दिल्लीतल्या चाळिसेक वर्षांच्या निवासातल्या गमती कधीतरी लिहील्या पाहिजेत).

शाली's picture

18 May 2018 - 8:23 am | शाली

खुप जुनी आणि छान आठवण सांगीतली. तुमच्या खजिन्यात नक्कीच बरेच खुप असणार. येवूद्या एक एक बाहेर. दिल्लीच्या आठवणींची एखादी सुरेख सचित्र लेख मालाच लिहा खरे तर. वाचायला खुप आवडेल.
तुमचे 'अजब महाभारत' हे सगळे लेख वाचले. मजा आली. प्रतिसाद काय द्यावा? याचा विचार करत होतो म्हणून राहीला. सविस्तर प्रतिक्रिया देईनच. तुम्ही 'दिल्ली'च्या लेखमालेचे मनावर घ्याच गुप्तकाका.

माहितगार's picture

18 May 2018 - 8:23 am | माहितगार

:)

दिल्लीतल्या चाळिसेक वर्षांच्या निवासातल्या गमती कधीतरी लिहील्या पाहिजेत).

अवश्य लिहावे . पुलेशु

गामा पैलवान's picture

21 May 2018 - 11:57 pm | गामा पैलवान

चित्रगुप्त,

माहितीबद्दल धन्यवाद. कृपया त्या चित्राचा फोटो काढून इथे टाकणे ही विनंती.

आ.न.,
-गा.पै.

चित्रगुप्त,भारीच माहिती!

शेखरमोघे's picture

20 May 2018 - 2:03 am | शेखरमोघे

नेहमीसारखीच अभ्यासपूर्ण मालिका - एकमेकान्शी सम्बन्धित अनेक विषयही - मध्यप्रदेश, कर्कवृत्त, सन्स्कृत, लेणी आणि शिल्पे, भारतातला इस्लामचा प्रसार इ. इ.- छान विस्ताराने हाताळले आहेत.

सुधीर कांदळकर's picture

20 May 2018 - 6:22 am | सुधीर कांदळकर

विविध दुवे, त्यामधले तार्किक नाते, कारणमीमांसा, अप्रतिम मांडणी. त्यामुळे कठीण विषय थोडाफार तरी कळतो आहे.

आवडले, धन्यवाद.

गामा पैलवान's picture

21 May 2018 - 11:58 pm | गामा पैलवान

अरविंद कोल्हटकर,

तुमच्या व्यासंगाला व चिकाटीला नम्र अभिवादन. भन्नाट लेखमाला आहे.

आ.न.,
-गा.पै.