रात्रीच्या अंधारात...
... रात्रीचे सव्वाबारा वाजलेले. देवळातलं किर्तन संपलं आणि श्रोते पांगले. चारपाच उनाड पोरांनी बाजारपेठेतल्या एका दुकानाच्या कट्ट्यावर अड्डा ठोकला. गावातल्या लफड्यांपासून गरीबी हटावच्या राजकारणापर्यंतचे सगळे विषय चर्चेला येत गेले आणि गप्पांचा फड भलताच रंगला...
अचानक चारपाच बायका घाबऱ्याघुबऱ्या अवस्थेत धावत येताना दिसल्या, आणि गप्पा थिजल्या.
किर्तनानंतर घरी, वरच्या आळीत निघालेल्या त्या बायका माघारी फिरल्या म्हणजे वाटेत कायतरी गडबड होती हे टोळक्याने लगेच ताडले. तोवर त्या बायकाही समोर आल्या होत्या. घाबरलेल्या!!
‘माळावरच्या शाळेवर कुणीतरी आहे... आमच्या अंगावर रेवा सडकल्यानी... ‘ कसंबसं कुणीतरी बोललं.
भर मध्यरात्री त्या भीतीने घामाघूम झाल्या होत्या...
टोळक्यानं काहीतरी विचार केला. खाणाखुणा झाल्या. बॅटऱ्या तपासल्या... काठ्या आपटल्या, आणि सगळे उठले.
‘चला आमच्याबरोबर. आम्ही सोडतो तुम्हाला घरी, आणि वाटेत बघतो कोण आहे शाळेवर!’ एकजण म्हणाला आणि सगळे माळाच्या दिशेने चालू लागले.
अंधार गडद झाला होता.
लांबवरच्या झाडीतून हुमणाचं घुमणं रात्र भयाण करून सोडत होती.
मध्येच एखादी टिटवी कर्कश किंचाळत डोक्यावरच्या आभाळात घिरट्या घालत होती...
माळ जवळ आला. अंधारात शाळेची कौलारू इमारत सावलीसारखी दिसत होती.
काहीच कारण नसतानाही, सगळ्यांची पावलं जडावली होती.
गप्पा संपून सगळे गप्प झाले होते.
शाळा जवळ आली.
आणि अचानक, कौलांवरून दगड गडगडत गेल्याचा आवाज सुरू झाला...
अंगावर रेतीचा हलका शिडकावा झाल्यासारखे वाटून सगळे थबकले.
अंगावरचे सारे केस ताठ उभे राहिले होते.
तरीही धीर करून टोळक्याच्या म्होरक्याने एक सणसणीत शिवी हासडली.
... आणि कौलांवर दगडांचा मारा सुरू झाला.
बाजूच्याच नदीकाठच्या किर्र झाडीतून, लहान मुलं रडताहेत असे आवाज येऊ लागले.
अंधार अधिकच मी म्हणू लागला होता.
टोळक्याची जीभ टाळ्याला चिकटली होती...
मागे जावे, पुढे जावे, काहीच कळेना झाल्याने साऱ्यांनी तिथेच बसकण मारली.
हळुहळू आवाज थांबले...
पुन्हा एक हुमण पक्षी जोरदार घुमला. नदीचं पाणी उगीचच घुसळलं गेलं, आणि सारं शांत झालं!
टोळकं उठलं.
... अचानक एकाची नजर, लांबवरच्या आंब्याच्या झाडाकडे गेली.
झाडाखाली उघड्यावरच एक शंकरांची पिंडी होती.
एक ज्योत त्याभोवती फिरत होती.
पुन्हा पावलं थबकली.
नजरा थिजल्या.
काही वेळाने ती ज्योत टोळक्याच्या दिशेने सरकू लागली.
ज्योतीच्या प्रकाशात दोन पायही अंधुकसे दिसत होते.
ते नुसतेच पाय आपल्या दिशेने येताना पाहून टोळक्याची पुरती फाटली होती.
आता ती ज्योत अगदी जवळ आली, आणि टोळक्याच्या लक्षात आलं.
कंदील घेऊन कुणीतरी चालत येत होता.
तो माणूसच आहे हे कळल्यावर सर्वांना धीर आला.
तो माणूस टोळक्याजवळ येऊन थांबला, आणि हातातला कंदील उंचावून टोळक्याचे चेहरे निरखून लागला.
एकमेकांची ओळख पटली, आणि सारे सैलावले.
मग भुताटकीच्या गप्पा सुरू झाल्या,
आणि कंदीलवाल्याकडून रहस्यभेद होऊ लागला.
‘शाळेमागच्या पिंपळावर वटवाघुळांचे थवे रात्रभर असाच धिंगाणा घालतात. आणि सगळी वाघळं, एकाच वेळी शिटतात. पाऊस पडतो कौलांवर...’ तो म्हणाला, आणि सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.
‘पण तो रडण्याचा आवाज?’... एकानं थिजलेल्या सुरात विचारलं.
‘तो ना?... पलीकडे झाडीत स्मशान आहे. लहान मुलांचं.’ तो सहज म्हणाला,
आणि टोळकं गांडीला पाय लावून गावांच्या दिशेने पळत सुटलं!
प्रतिक्रिया
6 May 2018 - 5:13 pm | जव्हेरगंज
=))
कडक!!
6 May 2018 - 11:44 pm | एस
:-) ट्विस्ट!