वाचकांचा पत्रव्यवहार अर्थात जनमानस

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
3 May 2018 - 8:06 am

आपण सर्वजण इथे वाचन आणि लेखन करण्यासाठी जमतो. अनेक विषयांवर चर्चा होतात, रंगतात, वादविवाद अन काथ्याकूटही होतो. या माध्यमाव्यतिरिक्तही आपण इतर वाचन करतो. रोजचे वृत्तपत्र वाचन हा आपल्या दिनक्रमाचा एक भाग असतो. त्यावरून एक नजर फिरवल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. आज जरी इ-माध्यम प्रस्थापित झालेले असले तरी आपल्यातील बहुतेकांना एखादे तरी छापील वृत्तपत्र वाचायला आवडतेच. जेव्हा आपण ते चाळू लागतो तेव्हा त्याच्या पानांमध्ये आपल्याला विविध विषयांची विभागणी केलेली दिसते. मग आपल्या आवडीनुसार आपण हव्या त्या पानावर रेंगाळतो.

संपादकीय पान हा वृत्तपत्राचा आत्मा असतो. त्याचा एक कोपरा हा खास वाचकांच्या पत्रांसाठी राखीव असतो. त्यामध्ये अनेक वाचक अल्प शब्दांमध्ये आपापली मते, विचार, तक्रारी वा सूचना मांडत असतात. अशा सदरातून सातत्याने पत्रलेखन करणे हे एक जागरूक नागरिक असल्याचे लक्षण असते. साधारणपणे असे म्हटले जाते की वृत्तपत्रे ही राज्यकर्त्यांचा ‘विरोधी पक्ष’ असतो. त्यापुढे जाऊन असे म्हणता येईल की नियमित पत्रलेखक हे वृत्तपत्रांचा ‘विरोधी पक्ष’ असतात. एक प्रकारे ते ‘जागल्या’ची भूमिका करतात ! ( ही दोन्ही विधाने शब्दशः तसेच पूर्णसत्य म्हणून घेऊ नयेत ही विनंती).

मला खात्री आहे की आपल्यातील अनेकांनी असे पत्रलेखन केले असेल आणि अधूनमधून करतही असाल. अशा लोकांपैकी मीही एक. या धाग्याचा हेतू सांगण्याआधी थोडे माझ्याबद्दल लिहितो.

माझ्या पत्रलेखनाची सुरवात झाली वयाच्या २१व्या वर्षी. ते माझे एम बी बी एसचे अखेरचे वर्ष. अभ्यासाच्या पुस्तकांच्या गराड्यात बसून प्रचंड वाचन, मनन, पाठांतर आणि मग चर्चा असा तो व्यस्त दिनक्रम असे. पण या सगळ्यातून थोडी तरी फुरसत काढून काहीतरी अभ्यासबाह्य करावे असे मनातून वाटे. आपल्या आजूबाजूस असंख्य घटना घडत असतात त्यातील काही मनाला भिडतात. त्यावर आपण कुठेतरी व्यक्त झाले पाहिजे असे अगदी आतून वाटे.
तशा आपण मित्रांबरोबर चर्चा करतोच. पण त्या विस्कळीत स्वरूपाच्या असतात. पुन्हा त्या ठराविक वर्तुळात सीमित राहतात. जर मला काही विचार मुद्देसूद मांडायचे असतील आणि ते समाजात व्यापक स्वरूपात प्रसारित व्हावे असे वाटले तर ते लिहून काढणे क्रमप्राप्त होते. त्यातूनच लेखनाची ठिणगी मनात पडली आणि वाचकपत्र ही त्यासाठीची पहिली पायरी झाली.

तो जमाना हा फक्त छापील माध्यमाचा होता. रोज सकाळी घरी पेपर येऊन पडल्यानंतर तो प्रथम पटकावण्यासाठी घरच्या लोकांमध्ये स्पर्धा असायची ! वृत्तपत्रे ही बऱ्यापैकी गांभीर्याने वाचली जात. त्यांत लोक पत्रलेखन बऱ्यापैकी आवडीने करत. नामांकित वृत्तपत्रात आपले पत्र प्रसिद्ध होणे हे तितकेसे सोपे नव्हते आणि ते मानाचे समजले जाई. आपले पेपरात छापून आलेले नाव पाहण्याचा आनंद काही औरच असे. त्यामुळे मलाही हे सर्व खुणावत होते.
अशाच एका उर्मीतून मी पहिलेवहिले पत्र लिहीले. ते क्रिकेटवर होते. आता लिहून तर झाले पण छापून येण्याची काय शाश्वती? आपल्या शहरातील सर्वाधिक खपाच्या पेपरात तर ते छापून येणारच नाही असे मनोमन वाटू लागले. मग एक युक्ती केली. त्या पत्राच्या तीन हस्तलिखित प्रती सुवाच्य अक्षरात लिहिल्या आणि त्या तीन वृत्तपत्रांना पाठवल्या.

आता ते पत्र प्रसिद्ध होणार की नाही याची जाम उत्सुकता लागलेली. रोज सकाळी पेपर आल्यावर त्यावर झडप घालून ‘ते’ पान उघडायचे आणि त्यावर अधाशासारखी नजर फिरवायची. ८-१० दिवस गेले आणि एके दिवशी माझे स्वप्न साकार झाले ! यथावकाश ते पत्र अन्य दोन पेपरांतही प्रसिद्ध झाले.
मग या प्रकाराची गोडी लागली. विविध विषयांवर पत्रलेखन हा माझा छंद झाला.

आता ह्या धाग्याचा हेतू सांगतो. आपल्यापैकी काहीजण असेच पत्रलेखक असू शकतील. आपण पूर्वी लिहिलेल्या पत्रांची कात्रणेही जपून ठेवली असतील. तर अशा जुन्या पत्रांचे या धाग्यात पुन्हा प्रकाशन करावे अशी कल्पना आहे. एक पथ्य आपण पाळू. ते पत्र इथे लिहिल्यावर त्याखाली संबंधित वृत्तपत्र वा नियतकालिकाचे नाव, तेव्हाचा प्रकाशन दिनांक आणि ‘साभार’ अशी टीप यांचा उल्लेख करावा. म्हणजे ‘प्रताधिकार’ वगैरे समस्या येत नाही. आपण स्वतःचेच पत्र इथे पुन्हा प्रकाशित करत आहोत. तरीही यात काही वावगे असल्यास साहित्य संपादकांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.

आपल्या गत लेखनाची पुनर्भेट अशी यामागची कल्पना आहे. पत्र जेवढे अधिक जुने तेवढी अधिक मजा आता वाचताना येईल.
अजून एक. आपल्यातील काही जण स्वतः पत्रलेखक नसले तरी ते सदर आवडीने वाचणारे असू शकतात. त्यांनीसुद्धा एखाद्या चांगल्या अथवा संस्मरणीय पत्राची आठवण लिहायला हरकत नाही. एखाद्या विषयाचा पाठपुरावा पत्रांतून करून जर त्यावर काही शासकीय अंमलबजावणी झाली असेल, तर तेही जरूर लिहा. इतरांसाठी ते स्फूर्तीदायक ठरते.

तर मग मित्रांनो, काढा आपली जुनी कात्रणवही आणि घडवूयात आपल्या पत्रांची पुनर्भेट !
धन्यवाद.
*********************************************

समाजविचार

प्रतिक्रिया

अशी काही कात्रणे वगैरे नाहीत. परंतु इ. स. दोन हजारपर्यंत नियमितपणे पत्रे पाठवत असे. काही प्रसिद्धही झाली. (प्रसिध्द म्हणजे प्रकाशित झाली! ;-) ) आता मात्र वाचकांचा पत्रव्यवहार हे सदर बरेच आकुंचन पावले आहे.

रविकिरण फडके's picture

4 May 2018 - 10:00 pm | रविकिरण फडके

मीही ८-१० पत्रे लिहिले असतील. टाइम्स, लोकसत्ता, मटा, इ. ठिकाणी. पण एकही कात्रण ठेवलेले नाही. वाटते ठेवायला हवे होते. आता ह्यापुढे.

खूप छान विषय आहे. काही लिहीलं नाही कधी, पण वाचकांची पत्रे आवर्जून वाचायचो. कधी कधी काही पत्र लेखकांची जुगलबंदी चालायची. आता काही आठवत नाहीये. पण Mipa करांचे अनुभव वाचण्यास उत्सुक.

कुमार१'s picture

4 May 2018 - 7:50 am | कुमार१

आभार.
एस, आपल्या स्मरणात जर एखादे पत्र राहिले असेल तर जरूर लिहा .

माझे पत्र :
मुलीला दत्तक घेणारे मुलीचे पालक

अवाढव्य लोकसंख्या हा आपल्या देशापुढील एक यक्षप्रश्न आहे. ‘एक कुटुंब, एक मूल’ या तत्वाचे आचरण करणे ही काळाची गरज आहे. या संदर्भात माझ्या एका परिचितांचे आचरण नमूद करतो.

सदर दांपत्यास स्वतःची पहिली मुलगी आहे. लोकसंख्येच्या प्रश्नावर संवेदनशील असल्याने आपल्याला दुसरे मूल होऊ देणे त्या पतीपत्नींना काही पटत नव्हते. त्याचबरोबर आपल्या मुलीस भावंड हवे हा मानसशास्त्रीय विचारही त्यांच्या मनात येई. या प्रश्नावर त्यांनी एक उत्तम तोडगा काढला. दुसऱ्या अपत्याची ‘निर्मिती’ करण्याऐवजी त्यांनी दुसरे मूल अनाथालयातून दत्तक घेतले. त्यातही कौतुकाची बाब म्हणजे त्यांनी मुलगीच दत्तक घेतली. पहिली मुलगी असताना दुसरीही मुलगीच का घेतली असे विचारून आप्तस्वकीयांनी त्यांना छेडले. त्यावर त्या दांपत्याने सांगितले की, अनाथालयात वाढणाऱ्या मुलग्यांपेक्षा मुलींचा प्रश्न मोठेपणी अधिक बिकट असतो. म्हणून एका अनाथ मुलीला ‘कौटुंबिक सावली’ देणे आवश्यक आहे.

स्वतःस काही कारणाने मूलबाळ न झाल्यास मूल दत्तक घेणारी अनेक जोडपी समाजात आहेत. परंतु स्वतःची पहिली मुलगी असताना जाणीवपूर्वक दुसरे मूल न होऊ देता एका अनाथ मुलीला दत्तक घेणारे सदर दांपत्य हे अभिनंदनास पात्र आहे. अशा आदर्शाची समाजास आज खरोखरीच गरज आहे.

(पूर्वप्रसिद्धी:
१. दै. लोकसत्ता,पुणे, ९/२/२००१ आणि
२. दै. सकाळ, पुणे, १५/२/२००१ .
साभार ! )

मंदार कात्रे's picture

4 May 2018 - 10:21 am | मंदार कात्रे

कपिलदेवच्या निवॄत्तीनन्तर लोकप्रभा मध्ये कपिलविषयी एक लेख आला होता त्यात कपिलची प्रशंसा करण्या ऐवजी टीकाच जास्त केली होती . त्यावर एक प्रशस्त पत्रवजा लेख मी लोकप्रभाला पाठवला होता. तो त्यानी प्रसिद्ध केला होता " वाचकांचा पत्रव्यवहार"मध्ये
साल सुमारे १९९४-९५ असेल . मी तेव्हा १९ वर्षाचा होतो !

माहितगार's picture

4 May 2018 - 11:47 am | माहितगार

वृत्तपत्रीय वाचक पत्रव्यवहार करण्याचा योग आला नाही , पण क्वचित (नेहमी नाही) संपूर्ण वृत्तपत्र चाळण्याचा स्वभाव असल्यामळे वाचकांच्या पत्रव्यवहारावरुन नजर फिरवली नाही असे नाही. पण वाचक पत्रव्यवहारातूनही बरीच माहिती आणि समाजमन उघडत असणार तेव्हा त्याचा समाजशास्त्त्रीय अभ्यास होऊन त्यावर आधारीत
अभ्यासपुर्ण लेखनाची गरज वाटते. त्या दृष्टीने हा धागा उपयूक्त वाटतो .

आताच्या काळात आंतरजालामुळे वाचकांना व्यक्त होणे फारच सुलभ झाले आहे . अर्थात ह्या व्यक्त होण्याचाही अभ्यास करुन अभ्यासपुर्ण लेखनाची गरज वाटते

वृतपत्रिय प्रतिक्रीया लिहिणार्‍यांचे अनुभव या धाग्याच्या माध्यमातून वाचण्यास आवडतील.

कुमार१'s picture

4 May 2018 - 12:06 pm | कुमार१

मंदार, रोचक अनुभव.
माहितगार, आभार.

यासंबंधीच्या १९९५ पूर्वीच्या काही आठवणी रोचक आहेत:

१. दै. केसरीमध्ये या सदरातील दरमहा १ पत्र हे बक्षीसपात्र ठरवले जाई. मग त्या पत्रलेखकाचा फोटो, परिचय इ. प्रसिद्ध होई. मी त्या आशेने केसरीकडे नियमित लिही पण, बक्षिसाचा योग काही आला नाही !

२. तसेच रोज एखाद्या पत्राला साजेसे चित्र काढण्याचा केसरीचा शिरस्ता होता. चित्र समर्पक असे. तो योग मात्र माझ्या पत्राबाबत बऱ्याचदा आला.

३. दै. सकाळ (पुणे) मध्ये रोज १० तरी पत्रे प्रकाशित होत आणि त्यातले मुख्य पत्र हे ठळक मथळ्यात असे. त्या पत्राच्या लेखकाला अंकाची एक प्रत भेट पाठवली जाई ! तो योगही माझ्या पत्राबाबत बऱ्याचदा आला.

४. काही वेळेस जर मी ‘सकाळ’ला एखादा ‘लेख’ पाठवला तर तो लेखाऐवजी त्या दिवशीच्या मुख्य पत्रात रुपांतरीत केला जाई आणि मग अर्थातच अंकाची प्रत भेट मिळे.

माहितगार's picture

4 May 2018 - 1:42 pm | माहितगार

वाचकांची पत्रे वरुन आठवले, 'आठवले' नावाचेच एक पत्रकार लेखक काका होते, त्यांच्या विद्या कॉमर्स लायब्ररी आणि पत्रव्यवहाराबद्दल हा एक मिपा लेख लिहिण्याचा योग आला होता. (माझ्या या मिपा लेखाला नुकतीच चार वर्षे झाली असे दिसते)

माहितगार's picture

4 May 2018 - 1:20 pm | माहितगार

एखादा ‘लेख’ पाठवला तर तो लेखाऐवजी त्या दिवशीच्या मुख्य पत्रात रुपांतरीत केला जाई

वाचकांची पत्रे वाचताना काही वेळा लक्षात येऊन खटकले आहे. लेखकाच्या पुर्वानुमती शिवाय लेखाचे रुपांतरण परस्पर पत्रात करणे प्रशस्त होते असे वाटत नाही. लेख छापायचा नसेल तर वापस करावा हे श्रेयस्कर राहीले असते. म्हणजे लेख दुसर्‍या वृत्तपत्रास प्रसिद्धीस देता येतो. (असेच धोरण ऐसि अक्षरे नावाच्या वेबसाईट अनुभवल्यामुळे मी तिकडे जाणे कमी केले)पाठव

अशा धोरणामुळे वृत्तपत्रांकडे लेखन करुन कधी पाठवावे वाटले नाही . नाही म्हणयला एका छोट्या इंग्रजी वृत्तपत्रास एक दोन लिहून दिले ते त्यांनी योग्य पानावर न घेता कुठे तरी कोपर्‍यात टाकले तेव्हा पासून वृत्तपत्रिय लेखनाची इच्छा मरुन गेली. आता सध्या तरी आपले मिपा बरे वाटते.

कुमार१'s picture

4 May 2018 - 2:43 pm | कुमार१

सहमत आहे. तुमचा लेख सवडीने वाचतो.

नाखु's picture

4 May 2018 - 8:31 pm | नाखु

समस्यांबाबत दैनिक लोकसत्ता,सकाळ इथे वाचकांची पत्रे पाठवून आवाज उठवला आहे.
पत्रे छापून येण्याचे प्रमाण कमी (दहास स दोन) असे आहे, माझ्या पेक्षा मुलांना जास्त आनंद वाटला, तूर्तास मिपावर वाचकांची पत्रे लिहीतोय,
कधी दखलपात्र होतात कधी बेदखल! मिपावरील प्रेम अजून उत्साह टिकवून आहे.

वा प नाखु पांढरपेशा मिपाकर

कुमार१'s picture

4 May 2018 - 9:55 pm | कुमार१

तुमचे कार्य चालू ठेवा.
तुमची पत्रे उत्साहवर्धक असतात.

कुमार१'s picture

5 May 2018 - 10:13 am | कुमार१

२००२ मध्ये ‘लोकसत्ता’ तील माझ्या एका पत्रावर दोन प्रतिसाद आले होते. त्यातील एकात माझ्या मुद्द्यास विरोध केला होता. तर त्यावर आलेल्या अन्य एका वाचक-प्रतिसादात पुन्हा माझा मुद्दा उचलून धरला होता. ही खरी संवादाची मजा असते. ती ३ पत्रे आता सादर करतो. माझे पत्र पूर्ण आहे. पण अन्य २ वाचकांची नावे न घेता त्यांच्या पत्रांचा गोषवारा देतो.

पत्र क्र. १ (माझे) : विद्यार्थी भाडेकरू नकोच !
गेल्या काही वर्षांत पुण्याच्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर निवासी संकुले बांधून झाली आहेत. एखादे संकुल बांधून झाले की त्यातील बऱ्याच सदनिका या स्वतःला राहण्याची गरज नसणाऱ्याकडून ‘गुंतवणूक’ म्हणून घेतल्या जातात. मग त्या विद्यार्थ्यांना भाड्याने दिल्या जातात. असे विद्यार्थी हे बहुतांश सधन वर्गातील, परराज्यातील आणि विनाअनुदान महाविद्यालयांमध्ये भरमसाठ शुल्क भरून शिकणारे(?) असतात.
या विद्यार्थ्यांच्या बेताल वर्तनाचा आजूबाजूच्या कुटुंबांना खूप त्रास होतो. रात्री बेरात्री मोठ्याने गप्पा मारणे, बाइक्सवरून वारंवार रपेट करणे, मित्रमैत्रीणींना जमवून ‘ओल्या पार्ट्या’ साजऱ्या करणे असे अनेक उद्योग हे विद्यार्थी करतात.

संकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सहकारी संस्था स्थापन व्हायला बराच कालावधी लागतो. या काळात सदनिका विद्यार्थ्यांना भाड्याने देणाऱ्या लोकांवर कोणताच अंकुश नसतो. वास्तविक विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह हेच योग्य ठिकाण आहे. परंतु, तेथील शिस्तीचा बडगा नको म्हणून बरेच विद्यार्थी सदनिकांमध्ये घुसतात.

तेव्हा सदनिका भाड्याने देताना त्या कुटुंबालाच देण्याचे नैतिक बंधन मालकांनी स्वतःवर घालावे. प्रत्येक सहकारी गृहसंस्थेने सदनिका विद्यार्थ्यांना भाड्याने न देण्याचा ठराव मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी. सदनिकांमध्ये भाड्याने राहून शिस्तीत वागणारे विद्यार्थी हे अपवादात्मक आढळतात.
( ‘लोकसत्ता’, दि. २५/३/२००२, साभार !)
*****

पत्र क्र. २ (श्री. अबक) : विद्यार्थी भाडेकरू का नकोत ?
वरील पत्र वाचले. काही विद्यार्थी बेताल वागत असतील पण त्यासाठी सर्वांनाच वेठीला धरू नये. पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे नसतात. ........ सदनिका विद्यार्थ्यांना भाड्याने न देण्याचा ठराव सुचवण्यापेक्षा बेशिस्त विद्यार्थ्यांना ताबडतोब सदनिका खाली करण्याचा ठराव करण्याबाबत कुमार यांनी सुचवले असते तर बरे झाले असते. (१/४/२००२).
************

पत्र क्र. ३ (श्रीमती गमभ) : विद्यार्थी भाडेकरूंचा त्रासच !
वरील दोन्ही पत्रे वाचली. श्री. अबक यांची प्रतिक्रिया पटण्यासारखी नाही. आमच्या सोसायटीतील विद्यार्थ्यांचा आम्ही अतोनात त्रास व धिंगाणा सहन केला आहे. ... घरमालकाकडे खूप तक्रारी केल्यावर त्यांनी मोठ्या नाराजीनेच विद्यार्थ्यांना घर सोडायला लावले.....

पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थांची सोय वसतिगृह, dormitaries, नातलग आणि श्रीमंत विद्यार्थ्यांच्या बाबतीत हॉटेल्समध्ये होऊ शकते. विद्यार्थ्यांकडून सामूहिकरित्या गैरवर्तन होण्याचा धोका लक्षात घेऊन, त्याना भाडेकरू म्हणून ठेवणे नकोच हे कुमार यांचे मत नक्कीच समर्थनीय आहे. ( ६/४/२००२).
******
......... आपल्याला काय वाटते याबद्दल ? जाणून घेण्यास उत्सुक !

कुमार१'s picture

30 Oct 2019 - 9:30 pm | कुमार१

'केसरी'तील माझे एक पत्र :

ok

सध्या त्याची एकदम आठवण झाली !
त्यातील विचार १९८४ मधील आहेत याची नोंद घ्यावी.
नवीन टिपणी करीत नाही.