१८२६ सालातील प्रवासीमित्र - भाग १.

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in जनातलं, मनातलं
2 May 2018 - 8:37 am

नाठाळ बकरीप्रमाणे इकडे तोंड घाल, तिकडे थोडा पाला ओरबाड असे जालावर करीत असतांना काही मनोरंजक पुस्तके दिसतात. कॅ. जॉन क्लून्स, १२वी रेजिमेंट, बॉंबे नेटिव इन्फन्ट्री अशा नावाच्या लेखकाने लिहिलेले Itinerary and Directory of Western India, Being a Collection of Routes अशा शीर्षकाचे आणि १८२६ सालामध्ये छापलेले पुस्तक माझ्यासमोर आले. कसलीहि यान्त्रिक वाहने आणि अन्य साधने, तसेच कसलेही रस्ते - पक्के वा कच्चे - नसण्याच्या काळामध्ये पालखी, घोडागाडी आणि क्वचित उंट वापरून १९व्या शतकाच्या पहिल्या अर्ध्या भागात प्रवास कसे गेले जात असतील ह्याची थोडीबहुत कल्पना ह्या पुस्तकावरून येते. Vade Mecum (शब्दश: Go With Me) ह्या लॅटिन नावाने ओळखल्या जाणार्‍या पुस्तकांसारखाच ह्याचा अवतार आहे. मुख्यत: आजचा पश्चिम महाराष्ट्र, तसेच गुजराथ, माळवा ह्या भागातील प्रमुख गावांमध्ये एका गावापासून दुसर्‍याकडे जायचे असल्यास कसे जावे, वाटेत कोणकोणती खेडी आणि नद्यानाले भेटतात, त्यांची अंतरे आणि आकार, तेथे असलेल्या तुटपुंज्या सोयीसुविधा अशा प्रकारच्या २१२ मार्गांची तपशीलवार वर्णने येथे आहेत. त्यावरून आपला देश १८३०च्या पुढेमागे कसा दिसत असेल, आजच्या तुलनेने त्याची वस्ती कशी असेल, पेशवाईच्या अंतानंतर ब्रिटिशांकडे सत्ता गेल्यावर नवी घडी बसवायचा त्यांनी कसा प्रयत्न सुरू केला होता हे ह्या पुस्तकावरून कळते.

कसल्याहि प्रकारच्या सुव्यवस्थित वाहतूकप्रणालीचा पूर्ण अभाव असल्याने कोठलाहि लहान वा मोठा प्रवास करावयाचा झाला तर त्याची पूर्ण तयारी पुरेशा आधीपासून करावी लागे. त्यासाठी laying the dawk ह्या गोष्टीचा अवलंब करावा लागे. पोस्टाचे टपाल ह्याला आपण ’डाक’ म्हणतो. ’डाक बंगला’ ह्या नावाची सरकारी कर्मचार्‍यांसाठी प्रवासामध्ये वापरायची तात्पुरती निवासी व्यवस्था हीहि आपल्या परिचयाची आहे पण मुस्लिम काळापासून अस्तित्वात असलेली पत्रे अणि प्रवासी एका जागेहून दुसर्‍या जागी घेऊन जाण्याची व्यवस्था - ज्याला ब्रिटिश काळात laying the dawk म्हणत असत - ती मात्र आता पूर्ण विस्मरणात गेली आहे. ह्या पद्धतीचे काही वर्णन ह्या पुस्तकामध्ये आहे,

ईस्ट इंडिया कंपनीच्या अखत्याराखालील सर्व भागामध्ये पोहोचलेले पहिले पोस्ट खाते Post Office Act XVII of 1837 ह्या कायद्याने निर्माण झाले. तत्पूर्वी मुंबई आणि मद्रासच्या गवर्नरांनी आपापल्या अखत्यारात डाक इकडून तिकडे न्यायची काही यन्त्रणा निर्माण केली होती आणि मुंबईमध्ये ’पोस्टमास्टर जनरल’, तसेच मुंबई, पुणे, ठाणे आणि सोलापूर येथे ’पोस्टमास्टर’ नावाच्या अधिकार्‍यांची नेमणूकहि केली होती. प्रवाशांच्या वाहतुकीचा laying the dawk हा प्रकार ह्या पोस्टमास्टरांच्या कामाचा एक भाग होता. स्वत: लेखक क्लून्स हे मुंबईमध्ये पोस्टमास्टर होते. ह्या प्राथमिक अवस्थेतील पोस्ट विभागाचे नियम तसेच पत्रे, पार्सले आणि प्रवाशांच्या वाहतूकीचे दर ह्याच्या वर्णनासाठी पुस्तकाचा काही भाग देण्यात आला आहे. ह्यातील laying the dawk ह्या प्रकाराकडे आपण ह्यापुढील दुसर्‍या भागामध्ये पाहू.

काय प्रयोजन असावे कळत नाही पण पश्चिम महाराष्ट्र आणि गुजराथमधील सर्व राज्यांचे प्रमुख आणि त्यांचे महत्त्वाचे सरदार ह्यांची त्रोटक माहिती पुस्तकाच्या अखेरीस देण्यात आली आहे.

पुस्तकाच्या तक्ता क्रमांक १ मध्ये मुंबईपासून पुण्यापर्यंतच्या प्रवासात लागणारी महत्त्वाची गावे, त्यांची परस्परांपासूनची अंतरे, वाटेतील नद्या हे नोंदविलेले आहेत. तो तक्ता असा:


ह्या तक्त्याकडे नजर टाकली की अनेक मनोरंजक गोष्टी दिसू लागतात. पहिली गोष्ट म्हणजे नावांची स्पेलिंग्ज - Ahmednuggur, Panwell, Khopooli (खोपवली-खोपोली साठी), Gaudhe R. (गाढी नदी), Putulaganga (पाताळगंगा नदी), Khundala, Loonowlee, Wulwun, Indrownee इत्यादि. गावांमधील घरांची आणि दुकानांची संख्या ह्या गोष्टीहि बघण्याजोग्या आहेत. खंडाळ्यामध्ये १८२६ साली एकूण ५० घरे आणि १२ दुकाने होती, लोणावळ्यात एकूण २० घरेच होती अणि एकहि दुकान नव्हते, वलवण, वाकई आणि कार्ले ही गावे लोणावळ्यापेक्षा बरीच मोठी होती. तळेगाव हे दाभाडयांचे गाव बरेच मोठे आहे कारण तेथे १५०० घरे आहेत. आजची स्थिति ह्याचा एकदम उलटी आहे.

तक्त्यात ठिकठिकाणी त्या त्या जागेबद्दल प्रवाश्याला मनोरंजक वाटेल अशी उपलब्ध माहिती नोंदवली आहे. बोरघाटामध्ये रस्ता असा नव्हताच. ३ मैल १ फर्लांग घाटाची चढण दाखविली आहे. घाटामधील गाडीचा रस्ता जॉन माल्कमच्या गवर्नर असण्याच्या काळात १८३० मध्ये बांधण्यात आला अशी नोंद अमृतांजन-रिवर्सिंग स्टेशनखालील ह्या संगमरवरी स्मृतिलेखावरून कळते. मजजवळ त्या लेखाचे शब्द आहेत ते असे:

THIS GHAUT CONSTRUCTED BY CAPTAIN HUGHES
WAS COMMENCED ON THE 19TH OF JANUARY
AND OPENED ON THE 10TH OF NOVEMBER 1830
DURING THE ADMINISTRATION
OF
MAJOR GEN.L SIR JOHN MALCOLM M.G.C.E.
ANNO DOMINI
1830
THE ROAD ON THIS GHAUT WAS CONSTRUCTED
WHICH
BY RENDERING THE TRANSIT OF MERCHANDIZE
ON WHEELED CARRIAGES AVAILABLE
AND
THEREBY FACILITATING THE INTERCOURSE
BETWEEN THE
DECKAN AND CONKAN
SECURES TO THE COUNTRY
PERMANENT AND SOLID
ADVANTAGES
ACTIS OVUM IMPLET NON SIGNIBUS ANNIS

कार्ले गावाच्या उत्तरेला काही खडकात कोरलेली जैन देवळे आहेत असा उल्लेख आहे कारण भारतातील प्राचीन अवशेषांचा अभ्यास अगदी नुकताच सुरू झाला होता आणि ही लेणी बौद्ध आहेत ही जाणीव आली नव्हती - बौद्ध धर्म हा एकेकाळी भारतात आणि ह्या भागातहि प्रमुख धर्म होता ही आठवणच ह्या काळामध्ये पूर्णत: लुप्त झाली होती. तळेगावात अखेरच्या युद्धात दोन ब्रिटिश अधिकार्‍यांचा निर्दयपणे वध केला गेल्याचा उल्लेख आहे. चिंचवडचा उल्लेखहि मनोरंजक आहे. तेथील मोरया गोसावींचे वंशज गणपतीचे अवतार मानले जातात ह्याचा आणि ह्याच संदर्भामध्ये गाणपत्य पंथाचा उल्लेख आला आहे.

वाटेतील नद्यांपैकी फक्त इंद्रायणीवर पक्का दगडाचा पूल होता असे दिसते आणि त्याचे Challon's bridge असे वर्णन दिले आहे. ही बहुतेककरून पुलाच्या बांधणीची एक शैली असावी कारण अन्य ठिकाणी - उदा. गाढी नदीवर - Shakspearian bridge चा उल्लेख आहे आणि हे पूल flying bridge स्वरूपाचे म्हणजे झुलते पूल असावेत असे दिसते. पुढे मुळा नदीवर flying bridge असल्याचा उल्लेख आहे. त्याच्या पुढेच ८ वर्षांपूर्वीच्या युद्धामध्ये जाळल्या गेलेल्या इंग्लिश रेसिडेंटच्या बंगल्याच्या अवशेषांचाहि उल्लेख आहे.

मुंबई-पुणे प्रवासाला सुरुवात कशी केली जात असे ह्याचा उल्लेख तक्त्याच्या आरंभातच केला गेला आहे. मुंबईहून पनवेलपर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग म्हणजे समुद्रामधून पडावाने. ओहोटीला मुंबईत पडावात चढल्यास ३-४ तासांनी प्रवासी पनवेलला पोहोचत असे. परतीला मात्र ह्याच प्रवासाला चांगल्या हवेत ८ ते १० तास आणि पावसाळी हवेत १४ ते १५ तास लागत असत असे दिसते.

तक्त्याच्या शेवटच्या Note वरून असे दिसते की सध्या आपण ज्याला जुना पुणे-मुंबई रस्ता म्हणतो आणि जो चिंचवड-निगडी-आकुर्डी-दापोडीवरून जातो तो १८२६ मध्ये ’नवा’ रस्ता होता आणि सध्याचा औंध-गणेशखिंड ह्यावरून जाणारा ’नवा रस्ता तेव्हा ’जुना’ रस्ता होता.

ह्यानंतर मुंबई-ठाणे रस्त्याकडे पाहू.



ह्या तक्त्याच्या पहिल्या पानाच्या उजव्या बाजूस ठाणे रस्ता सुरू होतो. आपल्यापैकी पुष्कळांना मुंबई-ठाणे भागाची उत्तम माहिती असणार. तक्त्यामधील बहुतेक जागा त्यांना माहिती असल्यामुळे त्यांचे आजचे चित्र आणि सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचे चित्र ह्यांची मनोरंजक तुलना ते सहज करू शकतात. शीव कॉजवेचे तेव्हाचे वर्णन पहा. त्याच्या आधी वर्णिलेला टेकडीवरला किल्ला आजहि पडक्या भिंतींच्या रूपात अस्तित्व दाखवून आहे. कुर्ल्याहून तुर्भ्याकडे जाणार रस्ता भरतीच्या वेळी पाण्याखाली बुडत असे असे दिसते. कान्हेरी लेण्यांचे वर्णन कार्ल्यापेक्षा बरेच बरोबर आहे. ठाणे हे जिल्ह्याचे ठिकाण होतेच पण त्याची वस्ती केवळ ९००० होती ह्यावर आज विश्वास बसत नाही.

वरच्याच तक्त्याच्या डाव्या बाजूस पुण्याहून अहमदनगरचा रस्ता दाखविला आहे. त्याचा पहिला भाग वर पुण्याच्या भागाच्या शेवटाला आहे. भीमानदीकाठच्या पेशवे आणि इंग्रज सैन्यांमध्ये झालेल्या कोरेगाव-भीमा लढाईचा आणि त्या लढाईच्या स्मारकस्तंभाचा उल्लेख आहे. त्यांची चित्रे खाली पहा.


शेवटाकडील अहमदनगरच्या माळीवाडा गेटचा आणि त्यामधील स्मारकाचा उल्लेख १८८४ सालाच्या अहमदनगर जिल्हा गझेटीअरमध्येहि सापडतो. जालावर मला माळीवाडा गेटच्या चित्रांमध्ये खालील चित्र दिसले. गझेटीअरच्या वर्णनाशी ते पूर्ण जुळते. हेच ते स्मारक असावे असे निश्चित म्हणता येईल. माळीवाडा गेट आणि दिल्ली गेट ह्या दोन्ही जागा आता ऐतिहासिक महत्त्वाच्या अशा घोषित केल्या गेल्या आहेत असे समजते. म्हणजे खालच्या चित्रातील स्मारक अजूनहि तेथे असावे असे मानायला हरकत नाही.

शिरूर गावाचा कँटोनमेंट म्हणून उल्लेख आहे कारण शिरूर हे ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्याचे एक प्रमुख ठाणे होते. पुस्तकामध्येहि शिरूरकडे येणार्‍याजाणार्‍या अनेक रस्त्यांची वर्णने आहेत.

पुणे ते सातारा, कात्रज घाटमार्गे ह्या रस्त्याकडे आता पाहू. पुढील तक्त्याच्या मागील पानावर हा तक्ता सुरू होते पण त्याची एकच ओळ तेथे आहे ती अशी
Poona Satara via Katruj Ghat, To Katruj 73h, 1S.... 6 0
कात्रज गावामध्ये ७३ घरे आणि १ दुकान असून तेथपर्य्ंतचे अंतर ६ मैल आहे अशी ही नोंद आहे. ह्यापुढील तक्ता असा:

कात्रजच्या पायथ्याच्या तलावातून पुण्याला पाणी पोहोचविण्याची पेशवेकालीन योजना, शिरवळ गाव भोरकर पंतसचिवांच्या जहागिरीचा भाग असणे असे उल्लेख मनोरंजक आहेत.

पुढील भागामध्ये laying the dawk ह्याकडे नजर टाकू.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

सुखीमाणूस's picture

2 May 2018 - 9:12 am | सुखीमाणूस

खूप छान माहिती.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

पैसा's picture

2 May 2018 - 9:34 am | पैसा

खूप मनोरंजक माहिती! कोरेगाव भिमा इथल्या स्मृती स्तंभावरील अक्षरे नीट वाचता येत आहेत.

नगरच्या स्मारकाचा फोटो बरोबर आहे, त्या दगडावर खाली इंग्रजी शिलालेख कोरलेला आहे. १५-२० वर्षांपूर्वी त्या स्मारकाची सफाई केली होती. वास्तविक पाहता हा लेख नगरच्या वेशीच्या भिंतीत बसवलेला होता पण बाकी सर्व भिंत केंव्हाच पडून गेली, हा लेख आणि माळीवाडा दरवाजा, दिल्ली गेट आणि इतर थोडे तेवढे उरले आहेत. १८१७-१८१८ चौ इंग्रज मराठा युद्धात नगरच्या वेशीबाहेर लढाईत कामी आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांची नावे आणि एक वर्णनात्मक लेख आहे असे आठवते - चांगला फोटो सापडला तर देतो.

लेख हा माळीवाडा वेशीच्या बांधकामाशी जोडलेला नाही, साधारण ३०-४० फूट दूर डाव्या बाजूस स्वतंत्र भिंतीत आहे आणि बराच मोठा म्हणजे ६ फूट उंच किमान आहे.

कंजूस's picture

2 May 2018 - 11:08 am | कंजूस

खूप मजेदार माहिती.
आपल्याकडे १९२०-४० आसपास जन्मलेल्या व्यक्तिंनी लेखन करून ठेवायला हवे होते. लेखक असण्याची गरज नाही फक्त सविस्तर वर्णन खर्चासह अपेक्षित.
माझे आतोबा पोस्टमास्तर असल्याने त्यांची तीनचार वर्षांनी बदली होत असे. साठ बासठमध्ये माथेरानला होते. काही डाक व्यवस्था लगेच बदलल्या नव्हत्या. खालच्या टपालवाडीतून ( गावाचे नाव त्यावरूनच पडले) एक दमदार ठाकर पाचच्या रेल्वेने मुंबईहून आलेले टपाल वर माथेरानला न्यायचा. त्याच्याकडे एक भाला असायचा बिबट्यांसाठी. हा 'रनर' सातला पोहेचायचा आणि तिथेच राहायचा. काल वर गेलेला आज पाचला वरचे टपाल आणायचा आणि खाली राहायचा.

अनिंद्य's picture

2 May 2018 - 12:08 pm | अनिंद्य

रोचक.
पु भा प्र

खूप मस्त माहिती.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

दुर्गविहारी's picture

2 May 2018 - 5:37 pm | दुर्गविहारी

मस्तच माहिती. माझ्या अनवट किल्ले लेखमालेनिमित्ताने गँझेटियर वाचावी लागतात. त्यातून योग्य तो अर्थ काढून धाग्यात टाकतो.
पु.भा. प्र.

अर्धवटराव's picture

2 May 2018 - 10:16 pm | अर्धवटराव

अन्यथा असे विषय कधि वाचाण्यात आले नसते कदाचीत.
धन्यवाद.

निशाचर's picture

3 May 2018 - 4:38 am | निशाचर

रोचक माहिती. पुभाप्र

प्रचेतस's picture

3 May 2018 - 9:08 am | प्रचेतस

रोचक माहिती.
औंध रस्त्याला अगदी यायाआआत्ता आत्ता पर्यंत जुना पुणे मुंबई रस्ताच म्हणत.

माहितगार's picture

3 May 2018 - 11:58 am | माहितगार

रोचक , कदाचित बाहेर देशातून आलेल्यांच कल कदाचित आपसूकच अधिक ऑर्गनाईज्ड रहात असेल. ब्रिटीशपुर्व काळातील प्रवास आणि संदेश वहन पद्धती नेमकी कशी होती . विशीष्ट गावी पोहोचण्याचे रस्ते कसे शोधले जात याचे कुतूहल वाटते.

पु.भा.प्र.

उत्तम माहिती. पुभाप्र.

पिवळा डांबिस's picture

3 May 2018 - 11:17 pm | पिवळा डांबिस

काय एकेक शोधून काढतात कोल्हटकर काका!
पण त्या माहितीवर लेख मात्र मस्त लिहितात!!
लेख नेहमीप्रमाणेच आवडला.