तंदुरुस्त की नादुरुस्त : भाग ५ ( वय ५० + )

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
23 Mar 2018 - 12:33 pm

वय ५० चे पुढे : आयुष्यावर बोलू काही !

आपण पन्नाशीच्या उंबरठ्यावर असतो तेव्हा अर्धशतक पूर्ण केल्याची एक सुखद भावना मनात असते खरी. पण त्याचबरोबर अजून किती काळ ‘नाबाद’ राहू याचीही हुरहूर लागते. समाजात आजारांचे प्रमाण एकूणच Lवाढलेले आहे. त्यात अनेक आजार प्रत्येक पिढीगणिक अलीकडच्या वयात होताना दिसत आहेत.
सध्या ५०+ वयोगटात एकही व्याधी अथवा औषध चालू नसलेली व्यक्ती दुर्मिळ झाली आहे. बऱ्याच जणांच्या बाबतीत काही चाळणी चाचण्या चाळीशीच्या दरम्यानच पार MMपडलेल्या असतात.

या वयांत शिफारस केलेल्या मुख्य चाचण्या खालील आजारांसाठी आहेत:
मोठ्या आतड्याचा कर्करोग
स्तनांचा कर्करोग
गर्भाशयाच्या cervix चा कर्करोग आणि
मधुमेह

मोठ्या आतड्याच्या कर्करोग
याचे प्रमाण पुरुषांमध्ये स्त्रियांच्या तुलनेत जास्त आहे. काही चाचण्यांच्या मदतीने जर आपल्याला या रोगाची चाहूल लवकर लागली तर त्याचा प्रतिबंध करता येतो तसेच उपचारही प्रभावी ठरतात. या रोगाची पूर्वसूचना देणारा एक विकार म्हणजे आतड्यात polyp होणे. हा विकार ५०+ वयांत होत असल्याने या गटातील सर्वांचीच चाचणी करावी असे तज्ञांचे मत आहे.
आता या आजाराची अधिक जोखीम कोणाकोणाला असते ते पाहू. अशांचे परत दोन गटात वर्गीकरण केले आहे:

उच्च जोखीम असणारे :
यात आतड्याचे खालील आजार झालेल्या व्यक्ती मोडतात:
दीर्घकालीन ulcerative colitis
Crohn disease
अनुवांशिक polyposis चा आजार
(ulcerative colitis आणि Crohn disease हे मुळात आतड्याचे दाहविकार आहेत. त्यांत जुलाब होणे आणि त्यात रक्त व आव पडते).

मध्यम जोखीम असणारे :

गट १ मध्ये उल्लेखिलेले आजार आई वडील वा भावंडे यांना असणाऱ्या व्यक्ती
आहारात भाज्या व फळांचे प्रमाण कमी असणे
भरपूर मेदयुक्त आहाराची सवय
मद्यपान व धूम्रपान

आतड्याच्या कर्करोगाच्या चाळणी चाचण्या:
मुख्यत्वे ५०-७५ या वयोगटासाठी यांची शिफारस केलेली आहे. त्या दोन प्रकारच्या आहेत:

इमेजिंग’चे प्रकार: यात दुर्बिणीच्या सहाय्याने (scopy) आतडे पाहणे आणि CTscan च्या मदतीने केलेल्या अत्याधुनिक चाचण्यांचा समावेश आहे. त्या दर ५ वर्षांनी कराव्यात. पण उच्च जोखीम असल्यास दर २ वर्षांनी. या चाचण्यांमुळे कर्करोग पूर्व-प्राथमिक अवस्थेत ओळखता येतो. हे अत्यंत महत्वाचे आहे.

शौच प्रयोगशाळा-तपासणी : यात शौचात दडलेले रक्त आहे का ते पाहतात. पण जेव्हा ते सापडते तेव्हा प्रत्यक्ष कर्करोग झालेला असतो. त्यामुळे ही खऱ्या अर्थाने चाळणी चाचणी ठरत नाही.
ज्या व्यक्ती लठ्ठ आहेत आणि अतिरीक्त मद्यपान व धूम्रपानाच्या आहारी गेल्या आहेत त्यांनी या चाचण्या ४५ व्या वर्षीच सुरु कराव्यात. सर्वांनी ७५ व्या वर्षांनंतर मात्र या चाचण्यांच्या फंदात पडू नये.

स्तनांचा कर्करोग:
याचे विवेचन याआधीच्या वयोगटात झालेले आहे. इथे खालील मुद्दे लागू असल्यास रोगाची जोखीम अजून वाढते:
स्वतःला यापूर्वी हाच कर्करोग झालेला असणे
एकही मूल न होणे
पहिले मूळ पस्तीशी ओलांडल्यावर होणे
मासिक पाळी खूप उशीराच्या वयात बंद होणे
पाळी बंद झाल्यानंतर हॉर्मोन्सचे उपचार घेणे
लठ्ठपणा आणि अतिरीक्त मद्यपान टिकून असणे.

अशा जोखीमवाल्यांनी दरवर्षी mammography आणि स्तनांची MRI तपासणी करावी.
इथे एक मुद्दा लक्षात घ्यावा. स्त्रीच्या आयुष्यात जेव्हा मासिक पाळीची प्रथम सुरवात ते पूर्ण समाप्ती हा कालखंड खूप मोठा असतो तेव्हा एकूण cycles ची संख्याही वाढते. तसेच मूल न होणे, अथवा होऊन त्याला अंगावर न पाजणे या सर्वांमुळे cycles ची संख्या वाढते. परिणामी अशा स्त्रीला दीर्घकाळ इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली राहावे लागते. हा घटक या कर्करोगाची जोखीम वाढवतो.

Cervix चा कर्करोग : याचेही विवेचन याआधीच्या वयोगटात झालेले आहे. तेव्हा अशा चाचण्या झाल्या नसल्यास आता जरूर कराव्यात. किमानपक्षी दरवर्षी स्त्रीरोगतज्ञाकडून जननेंद्रियाची तपासणी करून घ्यावी.
मधुमेह:
याचेही विवेचन पूर्वीच्या गटाप्रमाणेच. बऱ्याचदा या रोगाचे कुठलेही लक्षण नसेल तर चाचणी करणे टाळण्याकडे लोकांचा कल असतो. “मला काय धाड भरलीय, चांगला टूणटूणीत आहे मी”, अशा भ्रमात न राहता दर ३ वर्षांनी ग्लुकोज-पातळी,इ. तपासून घ्यावे.यातून जर मधुमेह उघडकीस आला तर मग कोलेस्टेरॉल व इतर मेदांचे प्रमाणही तपासून घ्यावे.
** ** ** **

काही बहुचर्चित पण शिफारस न केलेल्या चाचण्या
अशा काही चाचण्यांबद्द्ल अनेकांच्या मनात शंकाकुशंका असतात. मुळात त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर शिफारस केलेली नसते. पण काही देशांत, विशिष्ट समूहांत किंवा ठराविक डॉक्टरांच्या मतानुसार त्या सांगितल्या जातात. त्यातून एकूणच रुग्णांचा गोंधळ वाढतो. अशा फक्त ३ चाचण्यांची दखल घेतो:

ड’-जीवनसत्वाची रक्तपातळी :
या जीवनसत्वाचे शरीरात दोन प्रकार(forms) असतात( ड-२ व ड-३). त्यापैकी कुठला मोजायचा यावर एकमत नाही. हे मोजण्याच्या ज्या प्रयोगशाळा-पद्धती आहेत त्यांच्यात एकवाक्यता नाही. ‘नॉर्मल पातळी’ कशाला म्हणायचे याबाबतीतही गोंधळ आहे. एकाच रक्तनमुन्याची दोन ठिकाणी केलेली मोजणी बरीच जुळणारी नसते. अशा अनेक गुंतागुंतीत ही चाचणी अडकलेली आहे. तेव्हा संबंधित आजार रुग्णात थोडाफार दिसू लागला असेल तरच तिचा विचार व्हावा; सरसकट चाळणीसाठी नको.

ब १२’-जीवनसत्वाची रक्तपातळी :
’ड’ प्रमाणेच त्यातील काही मुद्दे इथेही लागू होतात. चाचणीचे निष्कर्ष बऱ्याचदा विश्वासार्ह नसतात. समजा पातळी ‘नॉर्मल’ पेक्षा कमी असेल तरीही त्या व्यक्तीत संबंधित आजाराची लक्षणे बिलकूल नसतात. म्हणून काही त्रास (रक्तक्षय वगैरे) नसेल तर उठसूठ याच्या फंदात पडू नये. कधीकधी अशी टूम निघते की सर्व शाकाहारीनी हे प्रमाण बघून घ्यावे. पण अशा सरसकटीकरणाला तसा अर्थ नाही.

३. प्रोस्टेट-कर्करोगाची PSA चाचणी:
प्रगत देशांत हिचा खूप बोलबाला आहे. पण निव्वळ एक चाचणी करून काही साध्य होत नाही. त्यावरून निष्कर्ष काढणे अवघड असते.

याबरोबर वयोगटानुसार चाचण्यांचे विवेचन संपत आहे. पुढचा आणि अंतिम भाग हा ‘खास स्त्री विभाग’ आहे आणि त्यात विवेचन असेल ते गरोदरपणातील चाचण्यांचे.
******************

आरोग्यजीवनमान

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

23 Mar 2018 - 3:29 pm | मार्मिक गोडसे

‘ब १२’-जीवनसत्वाची रक्तपातळी :
’ड’ प्रमाणेच त्यातील काही मुद्दे इथेही लागू होतात. चाचणीचे निष्कर्ष बऱ्याचदा विश्वासार्ह नसतात. समजा पातळी ‘नॉर्मल’ पेक्षा कमी असेल तरीही त्या व्यक्तीत संबंधित आजाराची लक्षणे बिलकूल नसतात. म्हणून काही त्रास (रक्तक्षय वगैरे) नसेल तर उठसूठ याच्या फंदात पडू नये. कधीकधी अशी टूम निघते की सर्व शाकाहारीनी हे प्रमाण बघून घ्यावे.

बर्‍याच मांसाहारींचेही ब १२ नॉर्मल पेक्षा कमी आढळते. हे चाचणीत दोष असल्यामुळे होते का?

कुमार१'s picture

23 Mar 2018 - 4:05 pm | कुमार१

ब १२ मोजण्याच्या ज्या प्रयोगशाळा-पद्धती आहेत त्यांच्यात एकवाक्यता नाही. ‘नॉर्मल पातळी’ कशाला म्हणायचे याबाबतीतही गोंधळ आहे. तसेच ,जरी पातळी रिपोर्टमध्ये कमी दिसत असली तरी शरीरात पेशींच्या पातळीवर ती पुरेशी असते.
त्यामुळे या रिपोर्टचा बाऊ करू नये.

मार्मिक गोडसे's picture

23 Mar 2018 - 4:13 pm | मार्मिक गोडसे

ओके. म्हणजे ट्रिट्मेंट नाही घेतली तरी चालू शकेल.

कुमार१'s picture

23 Mar 2018 - 4:55 pm | कुमार१

अगदी बरोबर .

चौकटराजा's picture

23 Mar 2018 - 5:41 pm | चौकटराजा

लक्षण दिसताच चाचणी करायची या विषयी आता बरेच ज्ञान सामान्य लोकाना मिळत आहे . पण आपण म्हणता त्या प्रकारच्या चाचण्यांचे ज्ञान सर्व मेडिकल व पॅरा मेडिकल स्टाफ ला असते का ? आता समजा आहे असे मानले तर त्यात डॉ मंडळीची आर्थिक स्थिती चांगली असते .अशावेळी पूर्वसूचना मिळावी म्हणून ही जमात तरी वरील सर्व चाचण्या करून घेते का ? जीवन हे अमूल्य असते हे सर्वात जास्त वैद्यकीय क्षेत्राशी संबंध असलेल्या माणसाला अधिक समजते असे मी तरी समजतो. आपले अनेक डॉ मित्र असतील किंवा मिपावर ही काही डॉ मंडळी आहेत . यापैकी आपापले धोरण काय आहे ?

कुमार१'s picture

23 Mar 2018 - 6:21 pm | कुमार१

त्यात डॉ मंडळीची आर्थिक स्थिती चांगली असते .अशावेळी पूर्वसूचना मिळावी म्हणून ही जमात तरी वरील सर्व चाचण्या करून घेते का >>>

साधारण ४०+ पासून आम्ही योग्य त्या चाचण्या जरूर करून घेतो. रोगप्रतिबंधक हाच रोगावरील सर्वोत्तम उपाय असतो हे आम्ही पुरेपूर जाणतो !

गणेश.१०'s picture

24 Mar 2018 - 11:50 pm | गणेश.१०

ड जीवनसत्व कमतरता आणि ऑटो इम्यून आजार याचा काही संबंध आहे का? ड जीवनसत्वाला हार्मोनचा दर्जा द्यावा असं संशोधकांचं मत आहे - यात कितपत तथ्य आहे? हल्ली ड जीवन सत्वाच्या चाचण्या सर्रास कमतरता दाखवतात (माझे १० पैकी ८-९ सहकारी) यामागे काही गौडबंगाल आहे का?

कुमार१'s picture

25 Mar 2018 - 5:43 am | कुमार१

ड जीवनसत्व कमतरता आणि ऑटो इम्यून आजार याचा काही संबंध आहे का? >>≥>
सिद्ध झालेला नाही.

ड जीवनसत्वाला हार्मोनचा दर्जा द्यावा असं संशोधकांचं मत आहे - यात कितपत तथ्य आहे? >>>>

अगदी बरोबर. ते जीवनसत्त्व व हॉर्मोन असे दोन्ही आहे ! तो दर्जा केव्हाच दिलेला आहे.

हल्ली ड जीवन सत्वाच्या चाचण्या सर्रास कमतरता दाखवतात (माझे १० पैकी ८-९ सहकारी) यामागे काही गौडबंगाल आहे का? >>>

खूप भारतीयांमध्ये ते कमी आहे, पण यात गौडबंगाल नाही. ,लेखात चाचणीबद्दलचे तांत्रिक मुद्दे स्पष्ट केले आहेत.

( हे उत्तर वाचल्याची पोच द्यावी ही वि)

धन्यवाद. ही लेखमालिका (आपले आरोग्यावरील सर्व लेख) म्हणजे आपल्या ज्ञानाचा सर्वोत्तम उपयोग कसा करावा याचे एक छान उदाहरण.

जसं लहान मुलांचं लसीकरणाचं वेळापत्रक असतं तसं या चाळणी चाचण्यांचं करता येईल का? (जन्मल्यापासून साधारण ७५ वर्षापर्यंत.. आशावादी असल्याने ७५ ची आशा :-)) अगदी सर्वांना लागू होईल असं नाही पण एकाच सारणीमधे चित्र स्पष्ट दिसेल.

कुमार१'s picture

25 Mar 2018 - 7:51 am | कुमार१

असे वर्गीकरण या मालेच्या ५ भागांनुसार झालेले आहे.
अर्थात लसीकरण इतकी चाळणी चाचण्यांची सक्ती करता येणार नाही. जोखिमीनुसार ते ठरेल.

कुमार१'s picture

25 Mar 2018 - 9:32 pm | कुमार१

‘ड’ आणि ऑटोइम्युन आजार >>>>>

या संदर्भात डेन्मार्क मधील एक संशोधन वाचण्यात आले. जर एखाद्याला गर्भावस्थेत ‘ड’ कमी मिळाले तर त्याच्या पुढच्या आयुष्यात ऑटोइम्युन थायरॉइड आजार व्हायची शक्यता वाढते.
अर्थात व्यापक संशोधन झाल्याशिवाय निष्कर्ष काढता येणार नाही.

Nitin Palkar's picture

25 Mar 2018 - 10:00 pm | Nitin Palkar

मालिकेतील आधीच्या सर्व लेखांप्रमाणेच माहितीपूर्ण आणि उत्तम.

कुमार१'s picture

26 Mar 2018 - 11:42 am | कुमार१

सातत्यपूर्ण प्रतिसाद व उत्साहवर्धनाबद्दल आभार

कुमार१'s picture

2 Apr 2018 - 2:35 pm | कुमार१

म्हातारपण आणि काही चाचण्यांचे निष्कर्ष :

आपण जेव्हा रक्तावर एखादी रासायनिक चाचणी करतो तेव्हा तिची ‘नॉर्मल’ पातळी दोन अंकांच्या मध्ये दाखवतात. उदा. युरीआची पातळी ही २० – ४० mg/dL असते. साधारण प्रयोगशाळा-रिपोर्ट्समध्ये दाखवलेली ही पातळी ही प्रौढ व्यक्तीची असते. लहान मुले आणि वृद्ध यांचे बाबतीत या पातळीत काही चाचण्यांसाठी फरक असतो. ६५ वयानंतर काही चाचण्यांच्या बाबतीत जो फरक पडतो तो ध्यानात घेणे महत्वाचे आहे. अशा ३ महत्वाच्या चाचण्या या आहेत:

१. युरिआ (मूत्राविकारांसाठी)
२. क्रिअ‍ॅटीनिन ( ,, )
३. TSH (थायरॉइड साठी)

या सर्वांच्या पातळीची ‘वरची’ मर्यादा (upper limit) ही प्रौढांपेक्षा जास्त असते. तेव्हा रिपोर्टवरून निष्कर्ष काढताना हे लक्षात घेतले पाहिजे.

कुमार१'s picture

3 Apr 2018 - 9:17 am | कुमार१

भाग ६ इथे आहे
https://misalpav.com/node/42332

निदान-चाचण्यांच्या वाढत्या किंमती हा सामान्यांचे दृष्टीने चिंतेचा विषय असतो. काही चाचण्या या अगदी जीवनावश्यक असतात. नुकतेच W H O ने अशा ५८ चाचण्यांची यादी करून सर्व देशांना पाठवली आहे.

ही यादी संदर्भासाठी वापरून प्रत्येक देशाने स्वतःची यादी करायची आहे. नंतर सरकारने त्या चाचण्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवायचे आहे.

आपले सरकार यावर विचार करत असून लवकरच ती यादी तयार होईल. असे जर प्रत्यक्षात आले तर ते गरीबांसाठी वरदान ठरेल. बघूयात.

एस's picture

18 May 2018 - 11:27 pm | एस

नुकतेच W H O ने अशा ५८ चाचण्यांची यादी करून सर्व देशांना पाठवली आहे.

ही बातमी वाचताच याच लेखमालेची आठवण झाली होती. जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेल्या चाचण्यांची संपूर्ण यादी तुम्ही इथे किंवा स्वतंत्र धाग्यात टाकून त्यावर भाष्य करू शकाल का?

कुमार१'s picture

19 May 2018 - 7:25 am | कुमार१

एस, चांगल्या सुचनेबद्दल आभार
सवडीने प्रयत्न करतो

कुमार१'s picture

19 May 2018 - 9:29 am | कुमार१

५८ चाचण्याचे ३ गटांत विभाजन केले आहे. त्यापैकी पहिला गट हा ‘प्राथमिक आरोग्य सेवा’ पातळी वरचा आहे. फक्त त्याच चाचण्यांची यादी देतो:

१. हिमोग्लोबिन,, पांढऱ्या पेशींची मोजणी, रक्तगट
२. ग्लुकोज, अलब्युमीन, बिलिरुबिन, A1c, lactate
३. गर्भवतीचे CG
४. लघवीची सामान्य तपासणी
५. हिपटायटीस- बी व सी, एच आय वि, मलेरिया, क्षयरोगात थुंकी तपासणी व सिफिलीस .

कुमार१'s picture

8 Jun 2018 - 10:10 am | कुमार१

कर्करोगातून उदभवणारा मधुमेहाचा धोका

सुमारे ९ अवयवांचा कर्करोग झालेल्या रुग्णांना मधुमेह होण्याची शक्यता वाढते असे नवीन संशोधन सांगते.

या अवयवांमध्ये प्रामुख्याने स्वादुपिंड, मोठे आतडे, स्तन, मूत्रपिंड व यकृत यांचा समावेश आहे.

त्यामुळे अशा कर्करोग्यांची मधुमेहासाठीची चाळणी चाचणी नियमित केली पाहिजे.

कुमार१'s picture

4 Feb 2020 - 9:17 am | कुमार१

आतापर्यंत कर्करोग निदानाची अंतिम चाचणी ही बऱ्याच वेळेस ‘अवयवाची बायोप्सी’ ही आहे. यात रुग्णाच्या शरीरात सुई घालायची असल्याने ती प्रक्रिया वेदनादायक असते.

त्याला पर्याय म्हणून आता निव्वळ रक्ताच्या नमुन्यावरच करायची अंतिम निदान चाचणी विकसित झाली आहे. संबंधित बातमी आजच्या छापील ‘सकाळ’च्या पान ३ वर आहे.
(इ-दुवा मिळण्यात अडचण येत आहे)

जगात ३ ठिकाणी झालेल्या या संशोधनात नाशिकमधल्या वैद्यकीय केंद्राचाही समावेश आहे.
अभिनंदन !