कंदिल बनविणे: एक आनंददायी कला

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in कलादालन
25 Oct 2008 - 9:27 am

दिवाळी हा सर्वार्थाने घरातल्या प्रत्येकाचा सण. दिवाळी आली की वेगवेगळ्या आघाड्यांवर सगळं घर तयारीला लागतं. एकीकडे घराची साफसफाई, रंगरंगोटी चालु असते. तर दुसरीकडे फराळाचे मस्त पदार्थ चालू असतात. लहानांना सुट्ट्या असतात. पुर्वी किल्लेही बनवले जात. एकत्र कुटंबांमधे तर आपेष्ट जमलेले असतात. मनसोक्त हास्य विनोदात आठवडा कसा जातो ते कळतही नाहि.

आज दिवाळीचा पहिला दिवस. वसुबारस!
आमच्या घरी आज दिव्यांची रोषणाई आणि कंदिल लागतो. त्यामुळे गेला विकांत कंदिल बनविण्यासाठी राखून ठेवला होता. अजूनहि मी कंदिल घरीच बनवतो. दर तीन वर्षांनी तर कंदिलाचा सांगाडाहि नवा बनतो. कंदिल बनवणे हि कला असली तरी त्यात कठीण काहि नाहि. हस्तकलेचा एक नमुना. बालगोपाळांसाठी तर आनंदाची पर्वणी.
तर असा पारंपारिक कंदिल कसा बनवायचा हे आज बघुया का?
चला तर करूया सुरवात!

१. एक लांब बांबु मिळवा. आणि कोयत्याने त्याच्या छोट्या काठ्या/काड्या कापा. सुरीने त्या तासून एकदम गुळगुळीत बनवा. एकाच जाडीच्या एकाच मापाच्या ३२ काड्या/काठ्या तयार झाल्या पाहिजेत. या शिवाय चार दुप्पट लांबीच्या काठ्या तासा.

२. आता फुलपुडीच्या दोर्‍याने (हा दोरा काड्या अतिशय घट्ट बांधतो. शिवणकामाचे दोरे उपयोगाचे नाहित) त्यातील चार चार काड्या चौरसाकृती पद्धतीने एकत्र बांधा.
अश्याप्रकारे ८ सारखे चौरस तयार झाले पाहिजेत.

३. आता त्यातल्या चार चौरसांना एका अक्षातून जातील अश्या पद्धतीने लांब काठ्या बांधा. या काठ्या चौरसाच्या टोकांना समान लांबीने बाहेर आल्या पाहिजेत. आता या चार चौरसांना पतंगासारखे कोनात पकडून एकमेकांना कोपर्‍यावर बांधा. चार चौरस बांधल्यावर एक खोक्यासारखा आकार तयार होईल व लांब काठ्या वर व खाली बाहेर येतील.

४. आता या चौरस-पतंगाकृती भिंतीच्या खोक्याच्यावर व खाली उरलेले चार चौरस, दोन वर व दोन खाली या पद्धतीने बांधून टाका . झाला सांगाडा तयार. :)

यंदा सांगाडा न बनवता फक्त कागद लावणे इतकेच काम होते त्यमुळे वरील टप्प्यांचे छायाचित्र काढता आले नाहि. परंतू तयार झाल्यावर सांगाडा असा दिसतो:

५. आता सांगाडा बनला की अर्धे काम झालेच!. आता फक्त कागद लावून कंदिल सजवणे राहिले. त्यासाठी तुम्हाला आवडतील त्या रंगांचे अथवा एकाच रंगाचे पतंगाचे कागद आणा.

६. पतंगाच्या कागदांचे चार चौरस कापा. हे चौरस मुळ चौरसापेक्षा किंचीत मोठ्या आकाराचे हवेत म्हणजे ते नीट चिकटवता येतात. आता खालील चित्रात दाखवल्या प्रमाणे चार उभ्या चौरस-पतंगाकृती खोक्याच्या भिंतींना हे कागद चिकटवा.

७. आता ८ त्रिकोण कापा. लक्षात ठेवा हे त्रिकोण चौरसाचे अक्षात कापून बनवू नका कारण ते तिरके असल्याने समभुज त्रिकोण नसून समद्वीभुज त्रिकोण असतात. तसेच काड्यांच्या जाडीने आकार अधिक लांबुडका होतो. हे आठ त्रिकोण खाली दाखवलेल्या पद्धतीने लावा.

८. आता करंजा करुयात. म्हणजे खायच्या नाहित हो तर कंदिलाच्या :)पतंगाच्या कागदाच्या काहिर्‍या रंद पट्ट्या कापा व त्या इतक्या रंद असल्या पाहिकेत की त्या रुंदीच्या चौरसाचा कर्ण कंदिलाच्या वरील पट्टीच्या मापापेक्षा किंचीत अधिक असला पाहिजे. पुढे दाखवलेल्या चित्राप्रमाणे कडा नक्षीदार कापून दोन टोके चिकटवून करंजा बनवा. भरपूर करंजा बनल्या की कंदिलाच्या वर व खालील पट्ट्यांमधे चिकटवा.

९. आता झिरमिळ्या बनवण्यासाठी पतंच्या कागदांच्या बारीक रुंदीच्या पट्ट्या कापा. जर रंगेबीरंगी झिरमिळ्या हव्या असतील अथवा वेळ कमी असेल तर मी यंदा वापरल्या तश्या वाढदिवसाच्या क्रेप पट्ट्याहि चालून जातात.

१०. आता कंदिलाच्या कडा चिकटवा-चिकटवीने काहिश्या विचित्र दिसतात त्या झाकण्यासाठी काळ्या अथ्वापांधर्‍या अथवा सोनेरी पट्ट्यांनी कडा झाकून टाका. कंदिलाच्या टोकांवर कागदाची फुले अथवा मी लावल्या आहेत तसे कागदी बोंडे लावा. झाला तुमचा कंदिल तय्यार. घराबाहेर दिमाखात लावा.. घरचा कंदिल!!

कंदिल करा आणि त्याचा मिपावर फोटो डकवायला विसरू नका.

टिपः
१. कंदिल बनवताना परदेशस्थांना बांबु स्टिक मिळतील का माहित नाहि. त्याऐवजी लांब(साधारण फुटभर) पेन्सिलिंनी प्रयोग करता येईलसे वाटते (स्वतः हा प्रयोग केलेला नाहि)
२. कंदिलात वापरलेली रंगरंगती हा नातवाईकांतील लहानग्यांचा चॉईस आहे. प्रत्येक लहानग्याच्या आवडीचा रंग कंदिलात वापरायचे बंधन होते ;)

सगळ्या मिसळपाव गावच्या जागतिक गावकर्‍यांना व त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

संस्कृतीमौजमजा

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

25 Oct 2008 - 9:35 am | मराठी_माणूस

कंदील न बनवता ही बनवण्याचा आनंद मिळाला. धन्यवाद आणि दिवळीच्या शुभेच्छा.

जैनाचं कार्ट's picture

25 Oct 2008 - 10:09 am | जैनाचं कार्ट (not verified)

वा छान माहीती !
धन्यवाद मित्रवर्य !

आनी हो, तुम्हाला ही दिवाळीच्या शुभेच्छा !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Oct 2008 - 10:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषी ,
आपल्या हस्तकलेला आमचा सलाम !!!
( इथे कमरेत वाकून मी आपणास अभिवादन करतोय असे चित्र डोळ्यासमोर आणावे )
आपण कंदील अजूनही बनवता, हे वाचून आनंद झाला कंदीलाच्या कृतीबद्द्ल आभारी !!!
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

अवांतर : कंदील बनवण्याचा लहाणपणी आम्ही प्रयत्न केला आहे, दोन-तीन दिवस प्रयत्न करुन झाल्यानंतर नवीनच कंदील विकत आणावा लागल्यामुळे आमच्या कलेचे कधीच कौतुक झालं नाही :(

-दिलीप बिरुटे
(ऋषीचा दोस्त )

विसुनाना's picture

25 Oct 2008 - 10:34 am | विसुनाना

खरोखरीच छान कृती.
आकाशकंदिल करून पहातो.

भाग्यश्री's picture

25 Oct 2008 - 10:44 am | भाग्यश्री

किती छान! लग्गेच करून पाहावासा वाटतोय..
धन्यवाद!

दिवाळीच्या शुभेच्छा!

स्वाती दिनेश's picture

25 Oct 2008 - 11:43 am | स्वाती दिनेश

ऋषिकेश,
कंदिल मस्त झालाय रे.. अजून तू घरी आकाशकंदिल बनवतोस हे वाचून आणि पाहून कौतुक वाटले.
लहानपणी घरातले इतर मोठे कंदिल बनवत असताना केलेली लुडबुड आठवली.. :) शाळेमध्ये कंदिल बनवायची स्पर्धा असायची ते आठवले.
स्वाती

विसोबा खेचर's picture

25 Oct 2008 - 12:42 pm | विसोबा खेचर

ऋषिकेशा, तू तर लेका कलाकार निघालास! उत्तम कंदील बनवला आहेस! :)

या निमित्ताने आंबोळीची आठवण झाली! :)

तात्या.

रामदास's picture

25 Oct 2008 - 12:59 pm | रामदास

कारागीर म्हणून पाच ते दहा रुपये कम्माई व्हायची लहानपणी.
६५ / ७१ च्या दिवाळीत कंदील विकून विक्रमी कमाई केली होती .आलेले पैसे अनुक्रमे सैनीक आणि दुष्काळ फंडात दिले होते.

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Oct 2008 - 1:55 pm | बिपिन कार्यकर्ते

मित्रा... अरे काय सुंदर कंदिल बनवला आहेस...

आणि ते किल्ला, कंदिल वगैरे लिहून सगळ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्यास तू. माझ्या लहानपणी दिवाळीची सुट्टी लागली (म्हणजे सहामाही परिक्षेच्या शेवटच्या पेपरची दुपार) की पहिले काम म्हणजे फटाके विकत आणणे. बरीच वर्षे आमच्या शाळेतल्या एक बाई फटाके विकायच्या. मग त्यांच्या घरी जाऊन ऑर्डर देणे किंवा ऑर्डर अगोदरच दिली असेल तर जाऊन फटाके घेउन येणे. मग दुसर्‍या दिवसापासून ते फटाके गच्चीवर नेउन वाळवणे हा एक प्रचंड महत्वाचा प्रकार. असे वाळवलेले फटाके 'कडक' फुटतात हा दृढविश्वास.

दुपारी उन चढायला लागले म्हणजे एखादी आडोश्याची जागा धरून तिथे किल्ला बनवणे हा दुसरा उद्योग. कधी कधी स्थानिक आणि प्रासंगिक राजकारणामुळे दोन किंवा तीन सल्तनती तयार व्हायच्या आणि मग किल्ले बांधायची चढाओढ लागायची. त्या किल्ल्यांवर मग खेळातले सैनिक, तोफा वगैरे स्ट्रॅटेजिक ठिकाणी ठेवायच्या. आमच्या वेळी 'जी. आय. जो' किंवा 'ही मॅन' वगैरे नव्हते. पण प्लॅस्टिकचे वेगवेगळे सैनिक, प्राणी वगैरे मिळत असत. मग मराठमोळ्या मावळ्याच्या खांद्याला खांदा लावून एखादा रोमन सोल्जर उभा असायचा. जिथे कमतरता असेल तिथे वाघ, सिंह, हत्ती, घोडे मदतीला धावून येत असत. माकडं सुद्धा बाद नव्हती. (परत) तात्कालिन राजकारणाप्रमाणे तह व्हायचे, सैन्याची आणि साहित्याची देवाणघेवाण व्हायची. त्या किल्ल्याच्या बाजूला खंदक हवाच. त्या खंदकात पाणी नसले तर काय मजा? मग त्यात पाणी ओतायचे. किल्ला करताना चिखल भरपूर लागायचा. मग प्रत्येक (तळमजल्यावरच्याच फक्त) घरातून बादली बादली पाणी आणायचे. राड झाल्याशिवाय मजा नाही.

दिवाळीचे चार पाच दिवस नुसती धूम. अभ्यंगस्नानाच्या दिवशी पहाटे अंधारात उठून आंघोळ करायची. आईच काय, 'सात जन्माची वैरीण' :) असलेली ताईसुद्धा स्वतःहून छान तेलाने अंग चोळून द्यायची. उजाडायच्या आत फटाके फोडायचे. लाडू, चकल्या, करंज्या, चिवडा बर्‍याच दिवसांपासून तयार असायचं पण त्याचं दर्शन पण दुर्लभ असायचं. अभ्यंगस्नान झालं की मात्र सगळं आपोआप समोर यायचं, देवाला फराळाचा नैवेद्य झालेला असायचा. सुर्योदय होता होता सगळे जण देवळात जाऊन देवदर्शन घ्यायचो. त्या धुसर प्रकाशात देवळातली घंटा वाजायची, काकड आरतीची पदं चालू असायची. लोणीसाखर हातावर पडायची. दिवाळीचे चार दिवस बघता बघता जायचे.

बिपिन कार्यकर्ते

लिखाळ's picture

25 Oct 2008 - 4:00 pm | लिखाळ

मस्त वर्णन :)
फटाके वाळवणे, किल्ला करणे वगैरे उद्योग नेमाचेच असत...

आकशकंदिल छानच झाला आहे. मी सुद्धा अनेक वेळा घरीच कंदिल बनवायचो त्याची आठवण झाली. थर्मकोल आणणे, कापणे, रंगवणे, झिरमिळ्या इत्यादी.. मजा असते :)
षटकोनी पारंपारिक आकाशकंदिल सुद्धा मस्तच दिसतो.
--लिखाळ.

सहज's picture

25 Oct 2008 - 2:29 pm | सहज

सही रे.

सलाम.

तुझ्या आजोबांच्या वस्तु मालीकेत टाकू शकतोस.

मस्त.

वारकरि रशियात's picture

25 Oct 2008 - 3:23 pm | वारकरि रशियात

मुक्तसंगः अनहंवादि
सुं द र !
बरयाच वर्षांनी पूर्वस्म्रुतिंना उजाळा मिळाला. धन्यु.

मीनल's picture

25 Oct 2008 - 5:36 pm | मीनल

मस्त आहे. मला असा स्टिक्सचा आणि वर कागदाची करंजी लावलेला आकाशकंदिल खूप आवडतो.
अमेरिकेत मायकेल ,हॉबी लॉबी या नावाची आर्टचे सामान मिळण्याची मोठाली दुकान आहेत.तिथे सर्व सामान मिळते.
गरब्याच्या दांडियांच्या साईज पासून ते पार मोठ्या ,बारिक ,पातळ सर्व साईज मधे उत्तम लाकडी काड्या मिळतात.पेपरची ही सर्व व्हरायटी आहे.पट्ट्या आहेत्.चिटकवायला हर त-हेचे ग्लु आहेत.

पण आमच्या घरात कुणीच उत्साह दाखवला नाही.
मला एकटीला जमेल अस वाटल नाही.
सोप वाटत आहे करायला.
पण आता पुठल्या वर्षी ---

मीनल.

डॉ.प्रसाद दाढे's picture

25 Oct 2008 - 5:52 pm | डॉ.प्रसाद दाढे

मस्तच आकाश क॑दील आहे. पण शीर्षक वाचून आ॑बोळीच्या क॑दिलाच्या आठवणीने एक क्षण ठोका चुकला :)

चित्रा's picture

25 Oct 2008 - 6:52 pm | चित्रा

छान कंदिल. लहान मुलांसाठी अजून एक उत्तम मराठी लेख.

लहानपणी तांदळाच्या ख़ळीने चिकटवण्याची कला अवगत झाली होती. आम्ही अनेकदा असे कंदिल घरी करत असू.

मस्त, आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, यानिमित्ताने.

मदनबाण's picture

25 Oct 2008 - 9:29 pm | मदनबाण

ऋषि मस्त कंदील बनवला आहेस रे..
तुला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.. :)

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

प्राजु's picture

25 Oct 2008 - 10:24 pm | प्राजु

ऋषि,
हा प्रयोग करून बघेन आजच. मला असा ट्रॅडिशनल आकाश कंदिलच आवडतो . त्या प्लॅस्टिकच्या कंदिलापेक्षा हाच छान वाटतो..
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

इथे सचित्र कृती दिली आहेस ते फार छान केलेस! अभिनंदन.
लहानपणी केलेले कंदील आठवले. मजा यायची. स्वतः केलेल्या कंदिलात दिवे लावताना कोण आनंद व्हायचा!

(खुद के साथ बातां : रंग्या, आंबोळीने त्याचा कंदील काढला का रे माळ्यावरुन ह्या वर्षी? :O :T )

चतुरंग

ऋषिकेश's picture

26 Oct 2008 - 10:27 am | ऋषिकेश

प्राडॉ.,

इथे कमरेत वाकून मी आपणास अभिवादन करतोय असे चित्र डोळ्यासमोर आणावे

:) धन्यु!.. मात्र असे चित्र डोळ्यासमोर आणताच खूप हसलो ;)

मीनल,

अमेरिकेत मायकेल ,हॉबी लॉबी या नावाची आर्टचे सामान मिळण्याची मोठाली दुकान आहेत.तिथे सर्व सामान मिळते.

अरे वा! मला वाटलं होतं बांबु मिळणसं कठीण असावं म्हणून पिन्सिल डोक्यात आली. तुम्ही म्हणता तसं असेल तर काय सक्कास कंदिल होईल

चित्राताई,
मीही तांदळाच्या खळीनेच चिकटवतो.. फेविकॉल फक्त सोनेरी पट्ट्यांसाठी :)

खरडी, व्यनीतून, प्रतिक्रियांतून कौतूक करणार्‍या प्रतिक्रिया देणार्‍यांचे - प्रोत्साहन देणार्‍यांचे अनेक आभार!
आणि सगळ्यांना पुन्हा एकदा दिवळीच्या शुभेच्छा!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

बेसनलाडू's picture

26 Oct 2008 - 10:33 am | बेसनलाडू

छान झालेले दिसते. आधीच्या चित्रांवरून मेहनतीची कल्पना येते आहे. अभिनंदन आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
(प्रेक्षक)बेसनलाडू

ऋचा's picture

26 Oct 2008 - 11:13 am | ऋचा

ह्या वर्षी मी पण घरीच कंदील बनवला :)

तुमची कृती खरच उत्तम आहे.
आवडली :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"