सोबत आणि सोबतीचे परिणाम 

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
20 Mar 2018 - 12:42 am

अनादी काळापासून मनुष्य प्राणी हा कायम समुहात राहातो. एकटेपणा त्याला आवडत नाही; हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणूनच कदाचित् आपण नाती निर्माण केली. सर्वात अगोदर मैत्रीच नातं निर्माण झाल असावं अस मला वाटत. मग हळूहळू पती-पत्नी आणि मग या नात्याच्या अनुषंगाने येणारी इतर नाती निर्माण झाली असावीत. कालांतराने एकटेपणा आवडत नसल्याने आपण ही नाती निर्माण केली आहेत हे मनुष्यप्राणी विसरला. त्यामुळे ही नाती म्हणजेच आयुष्य झालं आपलं. त्यामुळे आयुष्य जगण्याला एक वेगळाच अर्थ आला. एका अर्थी नाती जपण आणि या नात्यांमधला ओलावा वृद्धिंगत कारण हा आपल्या आयुष्याचा स्थायीभाव झाला. 

मात्र आयुष्याचा स्थायीभाव आणि मनुष्य स्वभाव या दोन वेगळ्या गोष्टी आहेत; हे आपण लक्षातच घेत नाही. आपण म्हणतो आपल्याला नात्यांची सोबत असते. पण खर सांगायचं तर आपण आयुष्यभर एक वेगळीच सोबत जपतो; आणि या सोबतीचा परिणाम आपल्या नाते जपण्यावर होतो. 

ही सोबत म्हणजे...  क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या भावना! आपण या भावनांपैकी ज्या भावनेची सोबत घेतो; त्यावरून आपण नाती कशी जपू ते ठरतं. म्हणजे आपण रागीट असलो की आपल्याला वाटत समोरची व्यक्ती देखील आपल्यासारखी रागीट आहे. त्यामुळे जरी एखादा विषय चर्चा करून सोडवता येत असेल तरी आपण समोरच्या व्यक्तीने काहीही म्हणायच्या अगोदरच आपला राग दाखवून मोकळे होतो. त्यामुळे सहज चर्चा होऊन जो विषय संपू शकतो कधीच संपत नाही. हाच परिणाम लोभ, मोह, मद (गर्विष्ठपणा), आणि मत्सर केल्याने होतो. कदाचित् म्हणूनच आपल्या पुरातन काळापासून म्हंटल आहे की या भावनांवर ताबा असणे खूप महत्वाचे आहे. 

एकवेळ आपण या भावनांवर ताबा मिळवू देखील. परंतु यासार्वांपेक्षा मोठं अस काहीतरी आपल्या प्रत्येकाच्या मनात असतच....... खूप प्रेमाने जपून ठेवलेलं.  ते म्हणजे आपण स्वतः! अहम्! Ego! 

या अहम् ची सोबत आपण जितकी जास्त जपतो तितके आपण आपल्या नात्यांपासून दूर जातो. प्रांजळपणे विचार केला तर  क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे या अहम् चे वेगवेगळे पैलू आहेत. तुम्ही जितकी या पैलूंची सोबत घ्याल तितके तुम्ही जोडलेल्या नात्यांपासून दूर जाल.

"काय समजतो तो स्वतःला? गेला उडत." क्रोध दिसतो यातून....

"तिच्या सारखे दागिने... महागड्या साड्या... आलिशान बंगला मला देखील हवा" या वाक्याचा संबंध लोभाशी.

"तिचं जे आहे तेच मला हवं" यातून मोह दिसतो.

"मी नाही जाणार आपणहून बोलायला." मद... गर्विष्ठपणा जाणवतो या वाक्यात. 

"भला मेरी साडी उसकी साडीसे सफेद कैसे?" मत्सराचे हे उदाहरण किती योग्य आहे.

म्हणूनच वाटत की आपण ज्या भावनेची किंवा ज्या प्रमाणात आपल्या अहम् ची... इगोची... सोबत घेऊ तितकेच आपले सखे-सोबती आणि नाती आपल्यापासून दूर जातील. त्यामुळे नाती महत्वाची की अहम् महत्वाचा हा विचार आपण प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.  

एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्यानंतर "काश मैने अपने दिल की बात केहेदी होती। " असा विचार करत बसण्यापेक्षा मनात आलं की मनमोकळं बोलून टाकण्या इतका चांगला उपाय नाही. बोलल्याने प्रश्न सुटतात आणि मनात ठेवल्याने याच प्रश्नांचे राक्षस होतात. 

आपण प्रत्येकाने हा विचार करण्याची आवश्यकता नाही का?

विचार