नाही तर नाही.... जा!

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
24 Oct 2008 - 10:04 pm

नमस्कार मंडळी,
खालील गझल मी मायबोली च्या गझल कार्यशाळेसाठी लिहिली होती. नाही रदिफ घेऊन लिहायची होती गझल. गझल लिहिण्यासाठी महत्प्रायास करावे लागले आणि अजूनही लागताहेत. ही गझल कार्यशाळेसाठी पाठवल्यावर तिच्यात १-२ बदल करून संयोजकांनी तिला निर्दोष गझल असे जाहीर केले आणि माझा जीव भांड्यात की मतल्यात पडला..
खरंतर, गझलेच्या कार्यशाळेमध्ये भाग घेण्यापूर्वीही जवळ जवळ २ ते २.५ महिने मी गझल लिहिण्याचा अखंड प्रयत्न करत होते.. त्यासाठी माझे गुरू आणि मिपाचे गझलकार आणि निवृत्त विडंबन सम्राट केशव सुमार उर्फ अनिरूद्ध अभ्यंकर यांना भरपूर त्रास दिला आहे. त्यांची सहनशक्ती वाढली असल्याचे नुकतेच समजले आहे. ;) मी माझ्या गुरूंची त्याबद्दल आभारी आहे आणि त्यांची सहनशक्ती अशीच दिवसेंदिवस वाढत राहुदे अशी त्या ईश्वराला प्रार्थना करते.
तर हीच सो कॉल्ड गझल...

माझे मलाच पटले नाही
कोडे अजून सुटले नाही

या आधी ना भेटलो कधी
कसे मला हे पटले नाही

होकार तुझा मिळून गेला
'होय' जरी तू म्हटले नाही

असंख्य झाले वाद तरीही
नाते अपुले तुटले नाही

जीर्ण जाहली किनार त्याची
वस्त्र तरीही विटले नाही

तुफान वारा भिडून गेला
तारू हे भरकटले नाही

सोडुन तू गेलीस तरीही
प्रेम जराही घटले नाही

- प्राजु

गझलप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

24 Oct 2008 - 10:07 pm | मदनबाण

या आधी ना भेटलो कधी
कसे मला हे पटले नाही

ह्म्म्..असचं काहीस वाटत कधी कधी आपल्याला.

सोडुन तू गेलीस तरीही
प्रेम जराही घटले नाही
क्लासचं..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

सखाराम_गटणे™'s picture

24 Oct 2008 - 10:23 pm | सखाराम_गटणे™

या आधी ना भेटलो कधी
कसे मला हे पटले नाही

होते रे असे कधी कधी

सोडुन तू गेलीस तरीही
प्रेम जराही घटले नाही

पण असले नकारात्मक विचार काढुन टाक मना म्हधुन

अवांतरः शुभ्राचा खालचा ओठ थोडा मोठा वाटतो ना.

तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Oct 2008 - 10:42 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त आहे. आणि सर्टिफाईड पण आहे. :)

असंख्य झाले वाद तरीही
नाते अपुले तुटले नाही

हे खूप महत्वाचे आहे.

त्यासाठी माझे गुरू आणि मिपाचे गझलकार आणि निवृत्त विडंबन सम्राट केशव सुमार उर्फ अनिरूद्ध अभ्यंकर यांना भरपूर त्रास दिला आहे. त्यांची सहनशक्ती वाढली असल्याचे नुकतेच समजले आहे.

आता केसुंनी एक कडवे टाकायला हरकत नाही.

त्रास दिला तू किती तरीही
बोट तुझे मी सोडले नाही......... :)

बिपिन कार्यकर्ते

शितल's picture

24 Oct 2008 - 11:38 pm | शितल

असंख्य झाले वाद तरीही
नाते अपुले तुटले नाही

हे मस्त लिहिले आहेस.

हे म्हणजे कसे तुझे माझे पटेना आणि तुझ्या वाचुन जमेना :)

प्राजु,
शेवटी गझल रचलीस म्हणायची.
:)

चतुरंग's picture

25 Oct 2008 - 12:16 am | चतुरंग

गजल मस्तच झाली आहे! :)

(पाडून तू गेलीस गजल
विडंबन मी केले नाही!;))

(खुद के साथ बातां : प्राजूने त्रास दिल्यामुळे केसुशेठ फिरकेनासे झाले की काय हल्ली? :? :W )

चतुरंग

मीनल's picture

25 Oct 2008 - 4:52 am | मीनल

आम्ही काय बुवा लिहाव?
:
:
:
या प्रतिक्रिया आमच्या अकलेत खूप खूप भर मात्र घालत आहेत.

प्राजु,तू तर गझल लिहायचा नव्हे दोष रहित गझल लिहायचा चंगच बांधला होता.तो सफल झाला.
अभिनंदन.
आता पुढली गझल केव्हा वाचायला मिळणार?

मीनल.

विसोबा खेचर's picture

25 Oct 2008 - 6:42 am | विसोबा खेचर

असंख्य झाले वाद तरीही
नाते अपुले तुटले नाही

वा! या ओळी सुंदर...प्राजू, छान लिहिली आहेस हो गझल!

तात्या.

अरुण मनोहर's picture

25 Oct 2008 - 8:08 am | अरुण मनोहर

साधे, सोपे शब्द. चांगला आषय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Oct 2008 - 8:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गझल आवडली !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश's picture

25 Oct 2008 - 9:55 am | ऋषिकेश

लै भारी.. गझल आवडली.. भावही उत्तम! प्राजुताई बॉ फॉर्मात आहे सध्या ;)

एक शंका:
या गझलेत अलामत काय समजावी? क्वचित 'अ' च्या जागी र्‍हस्व 'इ' किंवा 'उ' हा स्वर अलामत म्हणून वापरता येतो. मात्र गझलेच्या पहिल्या शेरातच अ आणि उ अलामत आहे. तेव्हा अश्यावेळी काहि नियम आहेत का? की अ, इ आणि उ स्वरचिन्ह म्हणून कधीही घेतलेले चालते?

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

बेसनलाडू's picture

25 Oct 2008 - 2:13 pm | बेसनलाडू

गझलेच्या पहिल्या शेरात - म्हणजे मतल्यातच वरच्या ओळीत एक आणि खालच्या ओळीत दुसरी अलामत अशा प्रकारे अलामतीची 'सूट' घेतली असेल, तर तुटले, सुटले, पटले, म्हटले, विटले असे काफिये पूर्ण गझलेत वापरता येतील.
मात्र मतल्याच्या दोन्ही ओळींमध्ये समजा पटले, म्हटले हे काफिये आले, तर अलामत 'अ' निश्चित होईल; आणि मग पूर्ण गझलेत ती कायम ठेवावी लागेल, 'उ', 'इ' चालायचे नाहीत. पण तरीही, असे झाल्यावरही अलामतीची 'सूट' घ्यायचीच असेल, तर गझलेत दोन मतले लिहावेत (अशा गझलेला हुस्न-ए-मतला गझल म्हणतात; दुसर्‍या मतल्याला 'सानी मतला' म्हणतात) मग दोन्ही मतल्यांमध्ये मिळूनही अशी 'सूट' घेता येते. या प्रकारात र्‍हस्व अलामतींसाठी अशी सूट घ्यावी की नाही, याबाबत 'घ्यावी' आणि 'घेऊ नये; दीर्घ अलामतीसाठी घेतलेली चालेल' अशी विभिन्न मते असणारे कंपू आहेत. पण या मतमतांतरांचे मूळ कोणत्याही तर्कात नसून गझलेच्या इतिहासात, परंपरेत आणि उर्दूकडून तिच्या मराठीमध्ये झालेल्या प्रवासात आहे, असे (मला) वाटते.
(माहीतगार)बेसनलाडू
व्यक्तिशः, 'शक्यतोवर' अलामतीची सूट घेणे टाळावे, असे माझे मत आहे. शेरातून/गझलेतून मांडला जाणारा विचार, भावना जर सशक्त असतील आणि त्यांच्या प्रकटीकरणासाठी अशी सूट घेणे स्वतःला पटत असेल, तसेच अशी सूट घेऊन काफिया संच समृद्ध करणे व इतर सशक्त कल्पना राबविणे हा हेतू असेल, तर ती घ्यावी या मताचा मी आहे.
(व्यक्तिशः)बेसनलाडू

प्रशांत उदय मनोहर's picture

9 Sep 2009 - 10:57 am | प्रशांत उदय मनोहर

अलामतबद्दल ज्ञानात भर पडली. आतापर्यंत गज़लसदृश कविता करून पाहिल्या. (त्यांना गज़ल म्हणावं का याबद्दल मला शंका आहे.) पण अशी माहिती साठवल्यावर प्रयत्न करायला नक्की सोपं जाईल.
आपला,
(कृतज्ञ) प्रशांत
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :)
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

राघव's picture

25 Oct 2008 - 10:03 am | राघव

गझलांबद्दल आपली माहिती फार तोकडी... त्यामुळे त्याबद्दल नो कमेंट्स :D
येऊ देत अजून... वाट बघतोय! पुढील रचनेस शुभेच्छा :)
मुमुक्षु

रामदास's picture

25 Oct 2008 - 1:39 pm | रामदास

हा माझा विषय नाही त्यामुळे गझल या बाबत काही लिहीणार नाही. परंतू कविता फार सुंदर आहे.

कुमार गंधर्वांनी गायलेल्या एका गाण्यात गायलेल्याकधी गहीवरलो कधी धुसफुसलो या ओळीची आठवण झाली.

अवांतरः गझलेसाठी आता शिकवणी लावण्याचा विचार करतो आहे.

जैनाचं कार्ट's picture

25 Oct 2008 - 5:15 pm | जैनाचं कार्ट (not verified)

सुंदर गझल !

तुफान वारा भिडून गेला
तारू हे भरकटले नाही

सोडुन तू गेलीस तरीही
प्रेम जराही घटले नाही

वा मनातलं लिहलं आहे !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

दत्ता काळे's picture

25 Oct 2008 - 5:46 pm | दत्ता काळे

असंख्य झाले वाद तरीही
नाते अपुले तुटले नाही

हे फार छान

प्राजु's picture

25 Oct 2008 - 8:30 pm | प्राजु

आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद.
बेला, आपल्याला विशेष धन्यवाद. गझलेबद्दल इतकी सुंदर माहिती आपण इथे सांगितलीत.
मी आपली आभारी आहे. असेच मार्गदर्शन करत रहा ही विनंती..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

31 Oct 2008 - 9:58 pm | टारझन

धन्यवाद..
सहमत, असेच म्हणतो
आमच्या गंजलेल्या डोक्याला गझल झेपली.. आवडली आहे.

सब के साथ बातां : आम्हाला काय सुचत नाय बॉ खविसगिरी शिवाय, आम्ही तस स्वप्नात पण गद्याच्या वर जात नाय. :)

--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
बघता काय सामिल व्हा

महेश काळे's picture

31 Oct 2008 - 9:12 pm | महेश काळे

फार छान

नंदन's picture

1 Nov 2008 - 2:01 am | नंदन

गझल आवडली. पहिलीच गझल आहे, असं वाटत नाही. अगदी सफाईदार आहे.

जीर्ण जाहली किनार त्याची
वस्त्र तरीही विटले नाही

- खासच.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

एकलव्य's picture

10 Sep 2009 - 12:02 pm | एकलव्य

जीर्ण जाहली किनार त्याची
वस्त्र तरीही विटले नाही
- खासच.

महेश काळे's picture

7 Sep 2009 - 12:33 pm | महेश काळे

वाह वाह...
सुरेख गझल आहे...

मी माझा ..महेश

कानडाऊ योगेशु's picture

7 Sep 2009 - 12:50 pm | कानडाऊ योगेशु

गझल आवडली.

कोडे अजुन सुटले नाही.. ही ओळ वृत्तात पूर्णपणे निर्दोष आहे पण
तरीही "कोडे अजुनहि सुटले नाही.." अशी (चुकुन)वाचल्यावर छान वाटली(माझे व्यक्तिगत मत).
ह्यामागे काय कारण असावे ?
बहुतांशवेळा आपण अजुन हा शब्द जेव्हा जेव्हा वापरतो तेव्हा त्याच्यापुढचा शब्द 'हि' किंवा 'सुध्दा' (अजुनहि,अजुनसुध्दा) असल्यामुळे असेल.

पाऊसवेडी's picture

7 Sep 2009 - 3:27 pm | पाऊसवेडी

खूपच छान गझल आहे
>>माझे मलाच पटले नाही
कोडे अजून सुटले नाही

>>या आधी ना भेटलो कधी
कसे मला हे पटले नाही

मस्त!!
हे पट्ले सुंदर

संदीप चित्रे's picture

9 Sep 2009 - 12:54 am | संदीप चित्रे

गझल पुन्हा एकदा वाचायला खूप आवडली.
>> होकार तुझा मिळून गेला
'होय' जरी तू म्हटले नाही

असंख्य झाले वाद तरीही
नाते अपुले तुटले नाही
>>
हे शेर तर खूप मस्त आहेत.

प्रशांत उदय मनोहर's picture

9 Sep 2009 - 10:59 am | प्रशांत उदय मनोहर

छान. आवडली.
आपला,
(काव्यप्रेमी) प्रशांत
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :)
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

sneharani's picture

9 Sep 2009 - 12:46 pm | sneharani

गझल आवडली...
पहिलीच गझल आहे, असं वाटत नाही.

अजिंक्य's picture

9 Sep 2009 - 1:25 pm | अजिंक्य

छान गझल आहे. आवडली.
गझल कशी लिहावी, त्यात वृत्त वगैरे काय असावं याची मला अजिबातच माहिती नाही. त्यामुळे वर 'बेसनलाडू' यांची प्रतिक्रिया नीटशी कळली नाही. थोडं थोडं समजलं, पण पूर्ण नाही.
अलामत, मतला, काफिये इ. चा अर्थ समजावून सांगणार्‍या लेखाची 'लिंक' उपलब्ध असेल तर ती द्यावी, ही विनंती.
-अजिंक्य

बेसनलाडू's picture

10 Sep 2009 - 12:07 pm | बेसनलाडू

ही घ्या लिंक
(दुवादार)बेसनलाडू

फ्रॅक्चर बंड्या's picture

10 Sep 2009 - 6:06 pm | फ्रॅक्चर बंड्या

फार छान गझल आहे

या आधी ना भेटलो कधी
कसे मला हे पटले नाही

हा शेर आवडला