तिसरी मिती.....

Jayant Naik's picture
Jayant Naik in जनातलं, मनातलं
1 Feb 2018 - 2:20 pm

तिसरी मिती......

प्रेमासाठी कोण काय करेल हे सांगणे खूप कठीण आहे. मी ,हा राजेश इनामदार असे करेल असे तरी लोकांनाच काय मला सुध्दा कुठे वाटले होते? एका संस्थानिकांच्या घराण्यात जन्मलेला अगदी बौर्न विथ सिल्वर स्पून! ... ज्या .. पुण्यात मी जन्मलो आणि वाढलो त्या माझ्या लाडक्या पुण्यातून मी पळून गेलो....
हो अगदी शब्दशः पळून गेलो .नंतर किती तरी वर्षे मी दहा बारा दिवसांपेक्षा जास्त दिवस येत नव्हतो.मी शिकायला अमेरिकेत गेलो ,तिथेच M.B.A. केले आणि मग अटलांटात नोकरी.आता तर मी ग्रीन कार्ड होल्डर आहे ...एका अमेरिकन मुलीशी लग्न केले आहे...माझा एक सुंदर बंगला आहे...पण अजूनही पुण्यात यायला माझे मन तयार होत नाही. ...माझे आई वडील सुद्धा मला भेटायला अमेरिकेतच येतात....एकमेव बहिण आहे ती ..लंडन ला .....
बराच मोठा मित्र परिवार आहे पुण्यात पण ......अजूनही मन पुण्यात जायला धजावत नाही .....
प्रेमासाठी कोण काय करेल हे सांगणे खूप कठीण आहे असे जे मी म्हणतो ....त्याला बरीच कारणे आहेत........... आणि एवढे सगळे करून खरे प्रेम मिळते की नाही कुणास ठाऊक ?...
******
दहा बारा वर्षापूर्वीचा काळ ...
मी तेव्हा ,सायन्स च्या शेवटच्या वर्षात होतो.एकदम सोनेरी दिवस होते ते....आमच्या कॉलेजमध्ये सगळ्यात हुशार आणि लोकप्रिय मुलगा होतो मी...क्रिकेट टीम चा कप्तान ....आमच्या कॉलेजात मोटरकार घेऊन येत असणाऱ्या काही मोजक्या मुलांपैकी मी एक होतो....रुबाबदार शरीरयष्टी, उत्तमातले उत्तम कपडे घालणारा आणि खिशात कायम भरलेले पाकीट ठेवणारा.....अनेक मुली माझ्या मागे होत्या. मी कायम त्यांच्या घोळक्यात .....पण एका खास मुलीवर जरा जास्त मेहेरबान असणारा ....मी हा राजेश इनामदार.
आमची अंतिम परीक्षा संपली होती. मी सगळ्या विद्यापीठात पहिल्या दहात येणार याची मला खात्री होती....त्या दिवशी संध्याकाळी मी क्रिकेट ची प्रक्टिस संपवून माझ्या गाडीतून बाहेर निघालो.समोरच कुणाची तरी वाट पहात रेवा तांबे उभी होती. मी तिच्या जवळ जाऊन थांबलो. हीच ती खास मुलगी.... गोरापान रंग....घारे डोळे, कुरळे सोनेरी केस.....त्याचा शानदार बॉब कट केलेला...डोळ्यावर येणारे केस मानेच्या झटक्याने मागे सारायची तिची लकब होती. नेहमी पंजाबी ड्रेस मध्ये असायची ती. केव्हातरी तिच्या गोऱ्या रंगाला शोभणारी साडी. मला तिचे खळखळून हसणे खूप आवडायचे....... तसे .. तिचे सगळेच मला आवडायचे. तिलाही मी आवडत होतो यात शंका नव्हती.
“ राणी साहेब ! आपला रथ तयार आहे ! या.आपल्याला कुठे सोडू?..” मी माझ्या गाडीचे दार उघडत म्हणालो. हा आमचा नेहमीचा संवाद. ती मला राजे म्हणायची आणि मी तिला राणीसाहेब.
“काय राजे ! आज शतक ठोकले का झालात शून्यावर बाद?... “ रेवा म्हणाली आणि तिच्या नेहमीच्या सवयीने स्वतःच जोरात हसली....तिचे गुलाबी ओठ तिच्या शुभ्र दातावरून अलग झाले आणि मला जणू आसमंतात वीज चमकावी तसे झाले.का असे जीवघेणे हसतेस तू ? असे मला तिला विचारायचे होते...बऱ्याच दिवसापासून !
आजची प्रक्टिस बघायला बऱ्याच मुली आल्या होत्या त्यात रेवाही होती
पण आमचा हा नेहमीचा संवाद ....

“ आज बराच वेळ batting प्रक्टिस केली. रफ़िक़ होता की गोलंदाजीला.....तो मात्र खूप सुधारतोय . त्याला खेळणे दिवसेंदिवस अवघड होते आहे! गुड फॉर टीम .....ये आत ये.!” मी म्हणालो. रेवा आत आली.शेजारी बसताच एक मंद सुगंध दरवळला . आम्ही निघालो.
“ अरे वा ! मस्त वास येतोय आणि आज ही तू नेहमीसारखीच छान दिसते आहेस!”
“ Thanks for the compliments!. तू सुद्धा आज एकदम मारू दिसतो आहेस !”
“ काही तरीच काय? आत्ताच खेळून येतोय...अजून अंघोळ सुद्धा झाली नाही !” मी म्हणालो.
“ अरे जातीच्या सुंदरा काहीही शोभते ,असे म्हणतात ना?....” रेवा म्हणाली.मला खूप बरे वाटले .
रेवाचे वडील वकील होते आणि आमचे बाबा त्यांचे मित्र होते.त्यामुळे आम्ही दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखत होतो.आमची मैत्री आमच्या दोन्ही कुटुंबाना मान्य होती आणि आम्ही पुढचे पाउल केव्हा टाकतो याची दोन्ही कुटुंबे अगदी चातकासारखी वाट पहात होती. माझ्या परीक्षेचा निकाल लागला की मी M.B.A. करायला अमेरिकेला जाणार होतो.आणि मग आमच्या घरचा business जॉईन करणार होतो....पण त्या आधी रेवाला विचारले पाहिजे ..लग्नाचे....किमान साखरपुडा तरी लवकरात लवकर करायला पाहिजे ....
“ रविवारचे चे काय प्लान आहेत? खडकवासल्याच्या धरणावर वर जाऊ या? संध्याकाळी मस्त वाटते तिथे.”
आम्ही दोघे अनेकवेळा तिथे गेलो होतो. केव्हा केव्हा मित्र मैत्रिणींबरोबर तर केव्हा आम्ही दोघेच.या वेळी मात्र मला रेवाला प्रपोज करायचेच होते.माझी खात्री होती की ती एक औपचारिकता आहे पण ..ते करायला हवे .
“ जाऊ या कि ! चार च्या सुमारास जाऊ या .” रेवा ने होकार दिला. मला वाटले चला सुरवात तरी चांगली झाली.
मग ,त्या कातर सांज वेळी मी रेवा समोर माझे जणू मनच उघडे केले.
“ रेवा तू माझे सर्वस्व आहेस ! आपण लहानपणापासून एकमेकांना ओळखतो पण ,तुझे माझ्या जीवनातील स्थान गेल्या दोन तीन वर्षापासून माझ्या लक्षात येत आहे.... तुलाही मी आवडतो हे मला माहित आहे....माझ्याशी लग्न करशील ? ..” मी म्हणालो आणि माझ्या शेजारीच गाडीत बसलेल्या रेवाकडे बघितले.ती माझ्याकडे एकटक पहात होती. किती सुंदर दिसत होती ती ! आज तिने सोनेरी काठ असलेली निळसर रंगाची साडी घातली होती. त्याला शोभेल अश्या रंगाची खूप मोठी टिकली तिने आपल्या कपाळावर लावली होती.मला ही तिची आवड माहित होती. तिला साडी नेसायला खूप आवडे ,आणि खूप मोठे कुंकू किवा टिकली लावायला ही तिला खूप आवडे. तिला ते सगळे किती शोभून दिसे.....
रेवा एकदम खळखळून हसली ..तिचे ते जीवघेणे हास्य...तिचे गुलाबी ओठ तिच्या शुभ्र दातापासून जणू नाईलाजाने विलग झाले ...
“ राजेश ! काय हे? तू खरच मला प्रपोज करतोयस ? ....का माझी चेष्टा करतोयस ? ...अरे अनेक मुलीनी तुला प्रपोज केले असेल आणि तू मला ? ... काही तरी चुकतेय असे नाही वाटत तुला?..” रेवा म्हणाली पण तिचे हसू काही थांबत नव्हते.मी मग तिचा उजवा हात माझ्या हातात घेतला आणि तो हळूच माझ्या गालावर ठेवला.
“ रेवा मी आत्ता पर्यंत येवढा सिरिअस कधीच नव्हतो ! ...माझे खरेच तुझ्यावर प्रेम आहे ! “
“ राजेश ! तुला माझ्याशी लग्न करायचे आहे ? ....प्लीज ... आपण रांगेत आहात ! please stand in the Q ..... तुझा नंबर आला की मी तुला नक्की कळवीन .....” रेवा अजूनही हसतच होती...तिने आपला हात माझ्या हातातून सोडवून घेतला आणि आपल्या मागे अंगठ्याने खुण केली.
तिच्या बोलण्यापेक्षा ,तिने आपला हात सोडवून घेतला याचा मला खूप राग आला.
“ रेवा ,हसणे थांबव आणि जरा सिरिअस हो!..मी आत्तापर्यंत कुणालाही विचारला नाही तो प्रश्न मी तुला विचारतोय....”
रेवा पटकन हसायची थांबली.परत माझ्याकडे एकटक पहात मला म्हणाली,
“ राजेश ,तुला खरच वाटते की तुझे माझ्यावर प्रेम आहे ? ...का हे नुसते आकर्षण आहे ? ..का खूप मुली तुझ्या मागे असतात पण त्यात मी नाही हे तुला ...तुझ्या पुरूषीपणाचा अपमान वगैरे वाटून तू मला मिळवण्याचा प्रयत्न करतो आहेस?...जरा शान्तपणे विचार करू या का?...”
“ मी खूप विचार केला आहे याचा रेवा ! गेले काही दिवस मी हेच करत आहे !....पण तुला अजून विचार करावासा का वाटतोय ?
माझ्यात काय कमी आहे ?” मी म्हणालो.
“ तू मला आवडतोस पण ...त्यात प्रेम आहे असे मला वाटत नाही .मला माफ कर पण ..माझे कुणावर तरी प्रेम आहे ... त्याचे माझ्यावर प्रेम आहे का नाही याची मला कल्पना नाही ...पण मला त्याला विचारायचे आहे... माफ कर मला.गेल्या काही दिवसांपासून मला तुझ्या माझ्यावरच्या प्रेमाची कल्पना येत होती ...पण वाटले ..तुला अनेक मुलींचे आकर्षण आहे ,त्यातीलच हे एक असेल....जाईल थोड्या दिवसाने ...पण तू तर .....”रेवा खाली मान घालून म्हणाली..
मी काही क्षण ....शान्त बसलो.रेवा मला नकार देईल असे मला स्वप्नात सुध्दा वाटले नव्हते..मी गाडीच्या आतल्या कप्प्यातून माझी सिगरेट आणि lighter काढला आणि सिगरेट शिलगावली....रेवाला अजिबात आवडत नसे मी सिगरेट ओढलेली ....पण मला आत्ता या क्षणी सिगरेटची खूप जरुरी होती....माझी सिगरेट संपेतोपर्यंत रेवा शान्तपणे खिडकीतून बाहेर धरणाच्या पाण्याकडे एकटक पहात बसली.नन्तर मला म्हणाली..
“ झाले तुझे सिगरेट ओढून ? आता शान्त पणे विचार कर ...तुझे खरेच माझ्यावर प्रेम आहे ?...तुला माझ्यासाठी ही साधी सिगरेट सोडता येत नाही....प्रेम म्हणजे एकमेकांचा विचार करणे...त्यांच्या भावनांची कदर करणे....
एकमेकात विरघळून जाणे...”
मला आता खूप राग आला होता आणि मी कोणत्याही क्षणी रडायला लागेन असे ही वाटायला लागले होते.
“ जसे तुझे त्या कुणावर तरी प्रेम आहे तसे ?..कोण आहे तरी कोण तो भाग्यवान ?”
“ हो तसेच.पण मी तुला इतक्यात त्याचे नाव सांगणार नाही ...मला थोडा वेळ दे....तो जर मला नाही म्हणाला आणि तो पर्यंत जर तुझ्या भावना अश्याच असतील तर ...मी तुझा विचार नक्की करीन ..”
“ म्हणजे मी तुझा... आमच्या क्रिकेट च्या भाषेत म्हणतात तसा .. राखीव खेळाडू आहे तर ?...धन्यवाद ..मला अगदीच टाकाऊ न समजण्या बद्दल...पण मला असे सहानुभूतीतून आलेले प्रेम नको आहे ...” मी चिडून म्हणालो.
“ ठीक आहे तर !” रेवा म्हणाली. मला तिचा हा एक दोन वाक्यात संवाद संपवायचा स्वभाव माहित होता.
त्या जीवघेण्या संध्याकाळचा विचार करतच मी काही दिवसांनी अमेरिकेला गेलो. अभ्यासात माझे मन गुंतवून टाकले.पण केव्हाही .. अनाहूतपणे रेवाची आठवण समोर येत गेली. मी काही वेळा रेवाला फोन करायचा प्रयत्न केला पण तिने तो घेतला नाही...आमच्या आई वडिलांनी दोन तीनवेळा मला रेवाबद्दल विचारायचा प्रयत्न केला...पण मी तो विषय टाळला.असेच दिवस जात होते आणि बघता बघता माझे पहिले वर्ष संपले आणि मी सुट्टीसाठी पुण्याला आलो. रेवाचे काय झाले याची उत्सुकता होतीच.पण घरी आल्यावर आईने अगदी हळू आवाजात मला सांगितले की रेवा कुणाबरोबर तरी पळून गेली अशी अफवा होती. तिचे आई वडील या विषयावर काहीच बोलत नव्हते.आता मलाच याचा शोध घ्यायचा होता....केवळ उत्सुकता म्हणून...
माझा दुसरा दिवस जेटलाग मध्ये गेला. तिसऱ्या दिवशी अगदी सकाळीच मी आमच्या क्रिकेट टीम ला भेटायला मैदानावर गेलो. मला थोडा उशीरच झाला होता. सगळे बाहेरच पडत होते आम्ही मग तिथेच थोडा वेळ गप्पा मारल्या. …...तेवढ्यात रफ़िक़ शेख आमच्या टीम चा बोलर माझ्यापाशी आला.आता तो कॉलेजमध्ये नव्हता पण टीमला मार्गदर्शन करायला येत होता असे मला समजले होते.
“ अरे राजेश ! कसा आहेस? तुझ्या शिवाय टीमला मजा नाही बघ!...हे बघ, मी आता घरीच निघालो आहे ...चल घरी ब्रेकफास्टला ...जवळच आहे रेवेनू कॉलोनीत ...मला खूप बरे वाटेल...” रफ़िक़ म्हणाला.
तसा मी दोन तीन वेळा त्याच्या घरी गेलो होतो. त्यांचा बंगला लहान पण टुमदार होता....त्याचे वडील शिक्षक होते.हा त्यांचा पिढीजात बंगला.. रफ़िक़च्या ३ बहिणी आणि २ भाऊ तिथे रहात असत. मोठे सुशिक्षित आणि सभ्य कुटुंब होते त्यांचे. रफ़िक़ आपल्या बाईक वरून निघाला तर मी माझ्या कार मधून ... पण मी लवकर पोचलो त्याच्या पेक्षा.गाडी पार्क करून मी दारापाशी थांबलो.बंगल्याच्या आवारात एक टेबल आणि पाच सहा खुर्च्या टाकल्या होत्या.तिथे बसावे म्हणून मी फाटक उघडून आत गेलो. बंगल्याच्या मुख्य दारापाशी काळा बुरखा घातलेली पण चेहरा उघडा असलेली एक गरोदर तरुण मुलगी कसल्याश्या काळ्या पावडर ने दात घासत उभी होती. मी लगेच आपली नजर वळवली.पण त्या मुलीनेच मला त्या काळी पावडर लागलेल्या बोटाने खूण करून आत येऊन खुर्चीवर बसा असे खुणावले.
तिचे कुंकू नसलेले ते पाढरे कपाळ आणि त्या काळ्या पावडरने माखलेले तिचे ओठ पाहायला मला कसे तरी वाटले.कदाचित हे असे पहायची मला सवय नसेल म्हणून असेल.....
कुंकू नसलेले कपाळ मला अमेरिकेत नवीन नव्हते पण इथे पुण्यात असे पहायची मला सवय नव्हती. मी तिच्याकडे फारसे न बघता खुर्चीत बसलो. ती मुलगी गडबडीने आत गेली. तेवढ्यात रफ़िक़ आलाच. मला बसायला सांगून तो आत गेला.
“ बैस ,मी हा आलोच. तुला माझ्या बायकोचीही ओळख करून देतो....”
“ अरे वा! लग्न केलेस वाटते ? अभिनंदन ...” मी म्हणालो.
“ ते आता आम्हा दोघानाही दे....मी आलोच...”
थोड्याच वेळात रफ़िक़ त्या गरोदर तरुण मुलीला बरोबर घेऊन आला. आता तिने तोंड धुतले होते....आणि ती माझ्या कडे बघून स्मित करीत होती. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना ...
“ तुझी ओळख आहेच पण नव्याने करून देतो.माझी बेगम... आयेशा शेख ..पण तू हिला रेवा तांबे म्हणून ओळखतोस ...” रफ़िक़ हसत हसत म्हणाला....
मी त्या गरोदर बुरखा घातलेल्या रेवा कडे पहातच राहिलो.साडी आवडणारी ,कुंकू प्रिय असणारी ही रेवा अशी आयेशा शेख म्हणून माझ्या समोर आली ? ...काळा बुरखा आणि कुंकू विरहीत कपाळाने ? मला काहीच समजेना.
“ अरे राजेश ...असा बघू नकोस ...हाच माझा प्रियकर आणि आता शौहर ! आमच्या घरचा विरोध असल्याने आम्हाला पळून जाऊन लग्न करावे लागले. तुला त्या मुळेच कळवता आले नाही.काय म्हणतेय अमेरिका ?” रेवाने चौकशी केली.मी अजून या धक्क्यातून सावरलो नव्हतो.मी काही तरी उत्तर दिले. मी काय बोलत होतो हे माझे मलाच कळत नव्हते....
“ तुम्ही बसा बोलत मी नास्त्याची तयारी करतो...” असे म्हणून रफ़िक़ आत गेला.
आम्ही दोघेही काहीच न बोलता तसेच बसून राहिलो ....किती तरी वेळ....
“ अभिनंदन तुझे...” मी काही तरी बोलायचे म्हणून म्हणालो.
“ धन्यवाद...” रेवा म्हणाली आणि आपल्या डोके झाकलेल्या शेल्याशी खेळत अस्वस्थ पणे तशीच बसून राहिली.
“ हा सगळा काय प्रकार आहे ? मला समजावून सांगशील ?... “ मी रेवाला म्हणालो.
“ मला माझे प्रेम सापडले....तुला ही सापडेल.....तुझी प्रेमाची व्याख्या काय आहे मला माहित नाही पण माझी अगदी सोपी आणि सरळ आहे.....प्रेमात मने जुळली पाहिजेत ... माझे मन तुझे मन असे न राहता ते एक आमचे मन झाले पाहिजे. शरीराचे मिलन त्या नंतर ..मग हे माझे विचार ,हे तुझे विचार असे रहात नाही....मी रफ़िक़ साठी माझे घर सोडले ,धर्म सोडला ,साडी नेसणे बंद केले ,तू पाहतोसच आहेस की मला प्रिय असे कुंकू लावणे ही मी सोडले....कारण आज ते माझे विचार आहेत म्हणून....” रेवा म्हणाली.
“ आणि रफ़िक़ ने काय सोडले ?...तुझ्या प्रेमासाठी....” मी म्हणालो...थोड्या कडवट पणे.
“ आपल्या धर्मातील बायको केली नाही याचा त्याला ही खूप विरोध झाला...कुटुंबातील बहुतेक सर्वांनी त्याला वाळीत टाकले आहे... माझ्यासाठी त्याने तो सगळा विरोध सहन केला.. आज मला वाटले तर तो माझ्यासाठी देवळात येतो.... आमच्या बाळाला आम्ही हिंदूंचे नाव ठेवणार आहे ... आणि त्याने माझ्या साठी सिगरेट सुध्दा सोडली आहे बर का ? ....” रेवा जरा हसतच म्हणाली.
तेवढ्यात रफ़िक़ आला चहा आणि इडली घेऊन. आम्ही मग असेच काही तरी निरर्थक काही वेळ बोलत राहिलो. थोड्या वेळाने मी घरी आलो.एक रिक्त पण बरोबर घेऊन.रेवाने मला नकार दिला असला तरी मनात एक वेडी आशा होती.ती माझ्याकडे परत येण्याची ….पण आज ती ही नाहीशी झाली. आज मी पूर्ण पराभूत झालो होतो. पण एक प्रश्न मला कायम पडलेला होता.
रेवा ज्याला प्रेम प्रेम म्हणते ते हेच काय ? रेवाला मला सोडून रफ़िक़शी लग्न करून काय मिळाले? रेवाला आपले प्रेम मिळाले असेल ?
****
प्रेमभंगाच्या या धक्यातून बाहेर येण्यासाठी मला अमेरिकेत मानसोपचार घ्यावे लागले.तिथली स्वागतिका म्हणून पामेला माझ्या जीवनात आली…..आणि मग ती हळूच माझी प्रेयसी केव्हा झाली हे माझे मलाच समजले नाही…
पामेलाच्या प्रेमाच्या कल्पना खूप सुंदर होत्या ,
“ प्रेम हे बोलून दाखवण्यापेक्षा अनुभवता आले पाहिजे….ही एक सर्व व्यापी भावना आहे ती नदीसारखी प्रवाही असते ,तुम्ही त्याला बांध घातला तर ते तुमच्याच अंगावर येऊन तुम्हाला बुडवून टाकू शकते. जसे तुझे आत्ता होते आहे....तुम्हाला हे प्रेम तुमच्या जोडीदारावर उधळून टाकता आले पाहिजे ...नाही तर तुम्ही त्यात गुदमरून जाऊ शकता .एकतर्फी प्रेमात हेच होते.” पामेला मला नेहमी म्हणायची .
प्रेम म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर मी पामेलाच्या प्रेमात पडलो तेव्हापासून मला हळू हळू मिळायला लागले.....मी अमेरिकेत पामेलाच्या प्रेमात पडून तिच्याशी लग्न केले ...अगदी हिंदू पध्दतीने आणि नंतर नोंदणी पध्दतीने ..... त्या नंतर हळू हळू ... प्रेम म्हणजे काय हे मला पामेला मुळे कळायला लागले.
पामेला आणि माझ्या लग्नाला सुध्दा आमच्या घरच्या लोकांचा विरोध होता.कारण ती कृष्ण वर्णी होती.अमेरिकन आफ्रिकन ..पण तिने मला समजून घेतले ,माझ्या धर्माचा आदर केला , माझ्याबरोबर देवळात यायला लागली....मला आवडते म्हणून साडी नेसायला लागली ,कुंकू सुध्दा लावायला लागली.मी ही तिच्या बरोबर चर्च मध्ये जाऊ लागलो .
त्या प्रेमाने मला शिकवले की प्रेमात “मी” आणि “ती” हे विसरून तुम्हाला “आम्ही “ कडे जायला हवे. शारीरिक आकर्षणातून प्रेमाची सुरुवात होत असली तरी ते ध्येय नव्हे...मला हेही समजले की जसेजसे प्रेम बहरत जाते तसे तसे , तुमचे विचार तिचे विचार ,तुमचे मित्र मैत्रिणी तिच्या मित्र मैत्रिणी ,तुमचा पैसा तिचा पैसा ,हे कमी होते आणि सर्व आमचे होते. ...
“मी “ आणि “ती “ याच्या मिलनातून एक नवीन व्यक्तिमत्व निर्माण होऊ लागते ,A third dimention !
किवा “तिसरी मिती” ज्यात मी ही आहे आणि ती सुध्दा आहे.
यालाच मी प्रेमाचा तिसरा धर्म म्हणतो . असे व्यक्तिमत्व जे फक्त माझे नाही आणि फक्त तिचेही नाही पण आमच्या दोघांचे आहे. असा आचारधर्म जो आमच्या दोघांच्या आचार आणि विचारातून प्रकट होतो आणि जो कदाचित आमच्या मुलांचाही असेल ….
******
मला माहित नाही रेवाला आणि रफ़िक़ ला ही तिसरी मिती सापडली की नाही ते! ..पण रेवाच्या नकारातून आलेली ती पराभूत भावना माझ्या मनातून जाण्यासाठी खूप काळ जावा लागला. पामेलाच्या प्रेमाने हळू हळू त्या भावनेचा निचरा होत गेला आणि मग केव्हातरी मला आणि पामेलाला ती तिसरी मिती सापडली …

ती सापडल्यावर केव्हा तरी .. मला हे ही समजले की ही मिती कुणाबरोबर तुमच्या जीवनात तुम्हाला सापडेल याचे काही संकेत असले पाहिजेत. हिंदी चित्रपटात कसे ओळख पटवण्यासाठी एकाच नोटेचे दोन भाग करून ते वेगवेगळ्या माणसाकडे देतात आणि ते नोटेचे भाग जुळले की ओळख पटली ….तसेच ही मिती सापडण्यासाठी माझ्याकडे असलेल्या नोटेचा दुसरा भाग कुणाकडे आहे हे मला हुडकायचे होते. तो भाग रेवाकडे अजिबात नव्हता …...तो होता पामेला कडे …
रेवाबरोबर मला ती मिती सापडणार नव्हती ...त्यासाठी पामेलाच माझ्या जीवनात यायला हवी होती ...
रेवाने मला झिडकारले नाही….. तिने फक्त पामेलाचा मार्ग मोकळा केला आम्हाला ही तिसरी मिती सापडावी म्हणून !....
*********************************************

कथालेख

प्रतिक्रिया

manguu@mail.com's picture

1 Feb 2018 - 6:27 pm | manguu@mail.com

संकल्पना आवडली

विनिता००२'s picture

3 Feb 2018 - 11:32 am | विनिता००२

मस्त मांडले आहे :)

पैसा's picture

3 Feb 2018 - 10:10 pm | पैसा

छान कथा. कल्पना आणि तिचा विस्तार खूप सुबक झाला आहे.

पद्मावति's picture

3 Feb 2018 - 10:24 pm | पद्मावति

कथा आवडली.

Jayant Naik's picture

4 Feb 2018 - 10:33 am | Jayant Naik

सर्व मिपाकरांचे खूप खूप आभार . आपल्या प्रतिसादाने मला आणखी लिहिण्याचा हुरूप आला आहे . माझ्या गोष्टीत काही सुधारणा हवी असेल तर कृपया अवश्य सांगा .आपल्या सूचनांचा मी आदरपूर्वक विचार करेन ....

कानडाऊ योगेशु's picture

5 Feb 2018 - 7:17 am | कानडाऊ योगेशु

सुरेख कथा आहे. पण शीर्षकामुळे पहिल्यांदी वाटले काहीतरी साय-फाय प्रकारावर बेतलेली असावी.

प्राची अश्विनी's picture

5 Feb 2018 - 8:38 am | प्राची अश्विनी

कथा आवडली. पुलेशु.

नावातकायआहे's picture

5 Feb 2018 - 10:37 am | नावातकायआहे

कथा आवडली.

सुखीमाणूस's picture

5 Feb 2018 - 5:47 pm | सुखीमाणूस

तुम्ही जे वर्णन केले त्याला द्वैत म्हणता येईल का?
पण मला कोणी कोणासाठी आमूलाग्र बदलणे यापेक्षा एक्मेकाना आहे तसे स्वीकारणे हे जास्त छान वाटते.

Jayant Naik's picture

5 Feb 2018 - 7:37 pm | Jayant Naik

आहे तसे स्वीकारणे हे म्हणजे तरी काय ? आपल्या जोडीदाराची संस्कृती ,विचार,,आचार हे आपले मानणे की तुझे तू तुला हवे तसे वाग आणि मी मला हवे तसे वागतो असे म्हणणे ? सगळा तिढा हा इथेच आहे .आंतरजातीय विवाहा मध्ये तर फारच ....आजपर्यंत तरी स्त्री हा बदल करून आपल्यात आमुलाग्र बदल करत आली आहे ...पुरुषांनी सुध्दा हा बदल करणे गरजेचे आहे. मी एक मार्ग सुचवतोय हे पूर्ण उत्तर आहे असे अजिबात नाही .

श्रीगुरुजी's picture

5 Feb 2018 - 6:44 pm | श्रीगुरुजी

छान कथा! आवडली.