द्वा सुपर्णा

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
1 Feb 2018 - 7:25 am

द्वा सुपर्णा
ब्रह्म (परमात्मा) व प्रत्येक जीवात असलेला जीवात्मा यांचे एकमेकाशी असलेले संबंध काय ? हा भारतीय तत्वज्ञानातील एक महत्वाचा प्रश्न मानला जातो. ब्रह्म एकमेवाद्वितीय तर प्रत्येक जीवात असलेला जीवात्मा तर विविध रुपात दिसतो. यातील संबंधांचा उकल करण्याचा प्रयत्न ऋग्वेदापासून झालेला दिसतो. पुढे उपनिषदांमध्ये याचा विस्तार झाला. {मनुस्मृतीवरील लेखावरून असे दिसते की काही वाचकांना संस्कृत श्लोक पाहिजे असतात. (देव या सुसंस्कृतांचे भले करो!) मी आज संस्कृत श्लोक देणार आहे. माझ्यापर्यंत पोचलेला अर्थही देत आहे. जर दुसरा जास्त योग्य अर्थ कोणाला द्यावयाचा असेल तर अवष्य द्या; (तो मला मान्य आहे.}

द्वा सुपर्णा सयुजा सखाया वृक्षं परिषस्वजाते !
तयोरन्य: पिप्पलं स्वाद्वत्यनश्वन्नन्यो अभि वाकशीति !!
यन्ना सुपर्णा अमृतस्य भागमनिमेषं विद्धाभिस्वरन्ति !
इनो विश्वस्य भुवनस्य गोपा: स मा धीर: पाकमत्रा विवेश !!
यस्मिन्वृक्षे मध्वद:सुपर्णा निविशन्ते सुवते चाधि विश्वे !
तस्येदाहु: पिप्पलं स्वाद्वग्रे तत्रोत्रशद्य: पितरं न वेद !! ऋग्वेद 1.129.,20,21,22

एका वृक्षाच्या फांदीवर मित्र असलेले दोन पक्षी बसले आहेत. त्यातील एक स्वादिष्ट पिंपळाची फळे खात आहे तर दुसरा काही न खाता केवळ बघत आहे. हे एक रूपक आहे. एक पक्षी
म्हणजे जीवात्मा व दुसरा परमात्मा. वृक्ष म्हणजे शरीर वा प्रकृति. जीवात्मा मायारूप फळे चाखतो तर परमात्मा काही न खाता (मायेच्या जाळ्यात न सापडता ) द्रष्ट्याप्रमाणे फक्त पाहत आहे.
येथे दोन तीन गोष्टी स्पष्ट केवळ केल्या आहेत. दोघेही मित्र आहेत. पुढ जीवात्म्याला परमात्म्याचा अंश म्हटले आहे. जीवात्मा या संसारातील सुखाच्या गोष्टी उपभोगण्यात मग्न असतो, परमात्मा मात्र मायेच्या जाळ्यात गुंतत नाही. तो अलिप्त आहे.

या प्रकृतीरूपी वृक्षाच्या फांदीवर बसलेला मर्त्य जीव संसारातील सुखदु:खरुपी फळे चाखतो व परमात्म्याची प्रार्थना करतो ह्या लोकांचा स्वामी व संरक्षक परमात्मा अज्ञानी जीवात्म्यात सुद्धा विद्यमान आहे. प्रजावृद्धीकरता समर्थ असलेले जीव या संसाररूपी वृक्षावर राहून प्राणरस पीत असतात. पण जे जीव या पित्याला (परमात्म्याला) जांणत नाहीत ते ( सत्कर्मरूपी) मधुर फळांचा आस्वाद घेण्यापासून वंचित रहातात.
जर तुम्ही परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न केला नाही तर तुम्हाला आनंदाची (आनंद- ब्रह्माचे लक्षण) कशी ओळख होणार ? सर्व श्रुतींमध्ये ब्रह्मानंद व वैषयिक सुख यातील फरक वर्णन करावयाचा प्रयत्न केला आहे.

ऋग्वेदातील या सुरवातीला मुण्डक उपनिषदाने थोडे पुढे नेले.

द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते।
तयोरन्य: पिप्पलं स्वाद्वत्त्यनश्नन्नन्यो अभिचाकशीति॥
समाने वृक्षे पुरुषों निमग्नोऽनाशया शोचति मुह्यमान:।
जुष्टं यदा पश्यत्यन्यमीशमस्य महिमानमिति वीतशोक:॥
यदा पश्य: पश्यते रुक्मवर्णं कर्तारमीशं पुरुषं ब्रह्मयोनिम्।
तदा विद्वान्पुण्यपापे विधूय निरंजन: परमं साम्यमुपैति॥ मुण्डकोनिषद 3.1.1.2.3.

पहिला मंत्र ऋग्वेदातून उद् धृत्त केला आहे. पुढील दोन मंत्र स्वतंत्र आहेत.
शरीररूपी वृक्षावर असलेला पुरुषरूपी पक्षी कर्मानुसार आलेली फळे चाखतो व दु:ख भोगतो.पण मुक्त झालेल्या दुसर्‍याला जेव्हा पाहतो, तेव्हा शोकमुक्त होऊन आत्मस्वरूप प्राप्त करतो.

जेव्हा जीव तेजस्वी, उत्पत्ती करणार्‍या ईश्वराला पाहतो, तेव्हा तो पाप-पुण्य झटकून, ज्ञानाने निर्लेप होऊन मोक्षाला जातो.
इथे एकच विधान द्विरुक्ती करून निनिराळ्या शब्दात सांगितले आहे.
पुरुष शब्द वैदिक वाङ्मयात निरनिराळ्या अर्थाने येतो सांख्य दर्शनात येणारा "पुरुष" येथे अभिप्रेत नाही. येथे तो "बद्ध जीव" या अर्थाने वापरला आहे. जीव त्याच्या कर्मानुसार येणारी फळे भोगतो. कधी ती सुखकारक असतात व कधी दु:खकारक. महत्वाचे म्हणजे ही कर्मे करत असतांना त्याची सुटका नाही. त्या करिता त्याला परमात्म्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. येथे तो "मुक्त झालेल्या दुसर्‍याला पाहतो" असे म्हटले आहे. याचा अर्थ जीवात्मा परमात्म्याला "भेटतो"; तुम्ही त्याच्याशी एकरूप होता. मग तुम्ही शोकमुक्त होता, तुम्हाला आत्मस्वरूपाची जाणीव होते. जेव्हा जीवात्मा व परमात्मा यांचे मीलन होते तेव्हा नक्की काय होते याबद्दल श्रुतीत मतभेद आहेत पण आज आपण तिकडे वळणार नाही.
मुण्डकोपनिषदाने येथे वेदाच्या पुढे एक पाऊल टाकले. जर जीवाला मुक्तीची इच्छा असेल तर त्याने संसारातले लक्ष काढून ते परमेश्वराकडे लावले पाहिजे. मुण्डक उपनिषद संन्यासवादी आहे. त्यामुळे येथेही त्याने संसारातून बाहेर पडण्याचाच मार्ग सुचवला आहे.
येथे द्वा सुपर्णा याचा स्पष्ट उल्लेख आहे. पण इतर उपनिषदांमध्ये हाच धागा पकडून जीवात्मा व परमात्मा यांच्यात एकरूपता वर्णिली आहे.
( कै.पु.य.देशपांडे यांचे "अनामिकाची चिंतनिका" नावाचे एक सुंदर पुस्तक आहे. मिळाले तर अवष्य वाचा.)

शरद

वाङ्मयमाहिती

प्रतिक्रिया

विवेकानंदांच्या वाङ्मयात थोडं वेगळं वाचलं होतं..
हा बद्ध जीव वरच्या पक्षाकडे बघून शोकही करतो, पण हळूहळू तो पक्षी जिथे आहे तिथे जायचा प्रयत्न देखील करतो..

आणि असे करता करता जेव्हा तो वर पोचतो तेव्हा त्याला कळते की आपण आणि हा पक्षी वस्तुतः एकाच आहोत.