आनंद नगर

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
8 Jan 2018 - 6:25 pm

ही कथा दुर्दैवाने काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा वास्तवाशी बराच संबंध आहे. तो लागल्यास निव्वळ योगायोग समजू नये.

आनंदनगरात क्रिकेटची मॅच रंगात आली होती. गणेश ,सुर्याजी विरुद्ध अहमद , सिद्धार्थ असे गट पडले होते.

अहमदची विकेट आधीच पडली होती. बॅटिंग करायला सिद्दार्थ उभा होता. या पठ्याला बॅटिंग जमायचीच नाही. या चौघात तो लहान होता. जी अवजड बॅट त्याला उचलायचाच कष्ट पडायचे त्याने खेळणे खुपच लांबची गोष्ट !

गोलंदाजीसाठी सुर्याजी उभा होता. आपल्या खेळीतून त्याने अहमदच्या टिमसमोर मोठ्या धावसंख्येचे आव्हान ठेवले होते. आक्रमक फलंदाजी हे सुर्याजीचे वैशिष्ठ्य

क्षेत्ररक्षणासाठी गणेश उभा होता. त्याने सिद्धार्थला उद्देशून टोमणा मारला , " सुर्या तू साधा बॉल टाक बाबा. लहान पोरग आहे रे ते. अस नाही तर तो थोडीच खेळू शकणार आहे .." सुर्याजीही गालात हसला आणि गोलंदाजी करू लागला.

हे टोमणे सिद्धार्थ खुप दिवसांपासुन ऐकत होता पण लहान असल्याने सहन करण्याशिवाय काही इलाजच नसे. दुसरे एक कारण म्हणजे ते ज्या बॅटनी खेळत ती बॅट मुळात गणेशची होती.

जेमतेम दुस-याच चेंडूवर सिद्धार्थचा तिफळा उडाला आणि अहमदने हताशपणे मान डोलावली. सिद्धार्थ रडत रडत घरी निघून आला.

काही दिवसांनी त्यांच्या आनंदनगरात हेन्री रहायला आला. हेन्रीचे वडिल मोठ्या पदावर कार्यरत होते. जग रहाटीचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी होता आणि त्यांचे गूण अर्थातच हेन्रीमद्धे होते.

स्वताःची नवी कोरी बॅट घेऊन तो खेळायला येऊ लागला. गणेशच्या वर्चस्वाला आता धक्का बसू लागला होता. हेन्रीने सिद्धार्थला आपल्या बाजूला करून घेतले होते. जरी फलंदाजी जमत नसली तर सिद्धार्थ गोलंदाजी उत्तमरित्या करू शकेल हे हेन्रीने जाणले.

या सगळ्यात अहमद जास्त मिसळायचा नाही. आपल्यला समजून घेणारे इथे कोणी आहेत असे वाटायचेच नाही. पटेल त्या गटाकडून तो खेळायचा.

गणेशने आपले वर्चस्व टिकवण्यासाठी हेन्रीला एका सामन्याचे आव्हान दिले. हेन्रीनेही ते हसत स्विकारले.

सामन्याच्या दिवशी सुर्याजी आणि गणेशने धावांचा डोंगर उभा केला होता. हेन्रीसमोर स्वताःला सिद्ध करण्याचे कडवे आव्हान होते. धावांचा पाठलाग तो वेगाने करू लागला. विजय डोळ्यासमोर असताना हेन्रीच्या हातून एक चुकीचा फटका बसला आणि गणेशने त्याचा झेल घेऊन त्याला बाद केले.

आता सामना निर्णायक वळणावर पोहचला होता. केवळ दहाच धावांची आवश्यकता होती मात्र सिद्धार्थसाठी हे अर्थातच सोपे नव्हते.

पण आपल्या अपमानाचा बदला घेण्याची ही सुवर्णसंधी आहे असे त्याला जाणवले. प्राणप्रणाने खेळून त्याने हेन्रीला विजय मिळवून दिलाच. गणेशच्या वर्चस्वाला धक्का लागला होता.

यानंतर खेळाचे सगळे निर्णय हेन्रीच्या मर्जीनुसार होऊ लागले. स्वताःकडे फलंदाजी ठेऊन तो बाकीच्यांवर वर्चस्व गाजवत असे. सिद्धार्थची स्थिती तर आगीतून फूफाट्यात अशीच झाली होती.

इकडे गणेशचे प्रताप त्याचा घरी समजले होते. सिद्धार्थला चांगली वागणूक देण्याबद्दल त्याला समज देण्यात आली.गणेशचाही वागण्यात बदल होऊ लागला.

दुसरीकडे वडिलधारी मंडीळीही हेन्रीच्या परिवासास वैतागली होती. त्या परिवाराचे वर्तन नियमबाह्य ठरत होते अखेरीस एकमताने त्यांच्यावर आनंदनगर सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि ते आनंदनगर सोडून ब्यूटी रेसिडेंशियलमद्धे रहायला निघून गेले

इकडे आधीच्या इतिहासातून शिकत या मुलांवर काही बंधने घालण्यात आली. अहमदला सगळ्यांसोबत मिसळ्यासाठी प्रोत्साहन दिले गेले. चांगल्या वागणूकीसाठी गणेशला समज देण्यात आली.

सिद्धार्थ लहान असल्याने तो मोठा होईपर्यंत त्याला दोनदा बाद झाल्याशिवाय बाद पकडू नका असे सिद्धार्थच्या वडिलांकडून ठरवण्यात आले.

काही दिवस शांततेत गेले आणि एक दिवस यात मिठाचा खडा पडला. सिद्धार्थ खेळत असताना त्याने एक फटका सुर्याजीकडे लगावला आणि सुर्याजीला तो पकडता आला नाही.

"हेन्रीसोबतच्या सामन्यात मी असाच सुंदर फटका लगावला होता नाही ? " सिद्धार्थ पुटपुटला.

सुर्याजी आणि गणेशला हा आपला अपमान वाटला. शाब्दिक चकमक सुरू झाली आणि तिघेही हातघाईवर आले.

या प्रसंगावनंतर मैदान रिकामेच राहू लागले. तिघांनाही हा आपलावरचा अन्याय वाटू लागला.

काही दिवसांनतर हेन्री अहमदला भेटायला आला. घडलेला प्रकार ऐकून तो हसु लागला आणि जाताना त्याने अहमदला टोमणा मारला ," हाच तुमच्या आणि आमच्यातला फरक आहे. स्वताःतच भांडत बसा .."

अहमदला हे वाक्य चांगलेच झोंबले. तो उत्तरला , " एवढीच मिजास असेल एक सामना तुझ्या आणि आमच्या टिममद्धे होऊन जाऊ दे.." हेन्री या वेळेसही तयार झाला.

अहमदने लगेच गणेश आणि सुर्याजीला बोलावून घेतले आणि सगळा प्रकार सांगितला. गोष्ट आता आनंदनगराच्या प्रतिष्ठेची आहे म्हटल्यावर दोघेही तयार झाले. आता वेळ होती ती सिद्धार्थला तयार करण्याची.

दोन वेळेला बाद होण्याची सवय लागलेला सिद्धार्थ मोठा झालाच नव्हता. सुर्याजीने सिद्धार्थला फलंदाजीत सक्षम करण्यासाठी आपली सगळी कौशल्ये सिद्धार्थसाठी खर्ची घातली.

सिद्धार्थही उत्तम गोलंदाजी करू शकतो हे एव्हाना कळालेच होते. गणेश त्याकडून गोलंदाजीचे धडे घेत होता.

आणि सामन्याचा दिवस उजाडला..

हेन्रीच्या टिमला गणेश आणि सिद्दार्थने मोजक्याच धावात गारद केले. एकटा हेन्री एकाच बाजूने खिंड लढवत होता.

एक चेंडू त्याने हवेत फटकारला आणि धाव घेण्यासाठी पळाला. तिकडे सुर्याजीही झेल घेण्यासाठी धावत सुटला आणि धडपडत त्याने तो झेल घेतला पण त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

इकडे अहमदच्या टिमने फलंदाजीस सुरवात केली. काही धावात अहमदने झेल दिला.

आता सिद्धार्थ मैदावर उतरला होता. जिंकण्याची जबाबदारी पुन्हा त्याच्यावर पडली होती. त्याने सुर्याजीकडे पाहिले. त्याची नजर सिद्धार्थला आश्वस्त करून गेली.

सिद्धार्थने प्रयत्नांची शिकस्त केली आणि पुन्हा एकदा सामना जिंकून दिला.

सिद्धार्थ स्तब्ध झाला होता..

गणेश सुर्याजीला खांदा देऊन नाचवत होता. तर अहमद एकटाच नाचत सुटला होता

आनंदनगरचे हे रहिवासी एकदिलाने 'खेळाडू' म्हणून पुढेही एकत्रच राहिले.

राजकारणबातमी

प्रतिक्रिया

शब्दानुज's picture

10 Jan 2018 - 7:04 pm | शब्दानुज

कदाचित माझ्याकडून नेमका अर्थ पोहचवण्यात मी अपयशी ठरलो आहे असे दिसते . कथा प्रतिकात्मक आहे.

पूर्ण अर्थ इथे स्पष्ट केलेले आहेत

आनंदनगर = भारत
गणेश = ब्राह्मण समाज
सुर्याजी = मराठा समाज
सिद्धार्थ = दलित समाज
अहमद = मुस्लिम समाज
हेन्री = इंग्रज
मॅचेस = लढाया

पार्श्वभुमी = भारतिय इतिहास मुख्यतः भिमा कोरेगाव घटना

सुखीमाणूस's picture

11 Jan 2018 - 6:20 am | सुखीमाणूस

खूप छान प्रयत्न केलाय तुम्ही.
सगळ्यानीच एकमेकांना समजून घेतले पाहिजे.

तुमच्या मनातला भारत लवकरच साकार होवो.