एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
4 Jan 2018 - 12:47 pm

एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति
श्री. माहितगार यानी त्यांच्या "कुराण आणि हदिथ ..." या धाग्यात
* एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति - ऋग्वेद 1.64.46 - meaning wise people explain the same truth in different manners. असा एक सुविचार दिला आहे. wise people explain the same truth in different manners. याला सुविचार म्हणावयास काहीच हरकत नाही. परंतु या वाक्याचा ऋग्वेदाशी काही संबंध नाही असे मी प्रतिसादात लिहले. त्यावर त्यांनी प्रतिप्रश्न विचारला की ' सत' ला आपण ऋग्वेदातील वर्णित देवतां अग्नी, सोम, वरुण.. पर्यंत आपण मर्यदीत करू इच्छित आहात का ? आता याचे उत्तर दिले पाहिजे. तुम्हाला प्रश्न पडणे शक्य आहे की एका धाग्यातील एक वाक्य घेऊन त्यावर दुसरा धागा काढावा कां ? माझे म्हणणे असे की जर आपण वर्तमानत्रातील वा दूरदर्शनवरील एकाद्या बातमी वरून नवा धागा काढतो तर मग अशा एखाद्या विषयावर जर तो नवीन असेल तर धागा काढावयास हरकत नसावी. बरेच दिवस माझ्या मनात ऋग्वेदातील पुढील दोन ऋचांवर लिहावे असे घोळत होते. (1) द्वा सुपर्णा.. व (2) एकं सद्विप्रा. आज एकावर लिहावयाची संधी घेत आहे. उपनिषदांतील चार महावाक्यांप्रमाणे ह्या दोन ऋचांमधील संकल्पना वैदिक वाङ्मयात नवीन विचाराला वाव देतात. जरी श्री. माहितगार यांच्या लेखावरून ह्या धाग्याला सुरवात केली असली तरी हा धागा सर्वस्वी नवीन विषय आहे..

प्रथम संपूर्ण ऋचा बघा.

इन्द्रं मित्रं वरुणंअग्निमाहुरयो दिव्य: सुपर्णो गरुत्वान् !
एकं सद्विप्रा बहुदा वदन्ति अग्नि यमं मातरिश्वानमाहु: !! ऋग्वेद् 1.164.46

वेदकाली भारतात अनेक देवता होत्या. इन्द्र, वरुण, अग्नि, यम इत्यादि. त्याच वेळी या सर्व देवतांच्या पलिकडील महान तत्व "ब्रह्म" ही संकल्पनाही मान्य करण्यात आली होती. केनोपदिषदात आपण पाहिले आहेच की या ब्रह्माने समोर टाकलेली एक काढी या देवता हलवू शकल्या नाहीत की जाळू शकल्या नाहीत. तर हे ब्रह्म व देवता यांचे संबंध काय याचाही विचार व्हावयास पाहिजे तो या ऋचेत मांडिला आहे.

सत्, चित्, आनंद ही ब्रह्माची लक्षणे समजली गेली आहेत. सत् म्हणजे सत्ता, चित् म्हणजे जाणिव, आनंद म्हणजे अक्षर समाधान, शांती. ही लक्षणे म्हणजेच ब्रह्म. उपनिषदात सुरवातीला सत्, होते व त्या पासून हे विश्व निर्माण झाले असे म्हटले आहे.

एकाच "सत्",रूप परमेश्वराचे विद्वान (त्याच्या विविध गुणांच्या/स्वरूपांच्या आधारावर) विविध प्रकारांनी वर्णन करतात. त्याच परमेश्वराला (ऐश्वर्ययुक्त आहे म्हणून ) इन्द्र, (हितकारक आहे म्हणून ) मित्र्र, (श्रेष्ठ आहे म्हणून ) वरुण, (सगळ्यांना प्रकाशित करतो म्हणून ) अग्नि म्हटले जाते. तो परमात्माच सर्व जगाचे पालन करतो म्हणून त्याला सुपर्ण (गरुड) म्हणतात.

इस्लाम, ख्रिस्चन धर्म एकेश्वरी आहेत व हिव्दु धर्म अनेकेश्वरी आहे असे समजले जाते. लौकिक पातळीवर ते खरेही आहे. शैव शिवाला मानतात तर वैष्णव विष्णूला. पण वैचारिक, आध्यात्मिक दृष्टीने सर्व देव-देवता एकच आहेत ही संकल्पना येथे स्पष्ट शब्दात मांडली आहे. आता तुम्हाला शैव शंकाराचार्य देवीची मनोवेधक स्तोत्रे का लिहतात ते लक्षात येईल. वारकरी विष्णू-शंकर एकरूप कसे समजवून घेतात तेही कळेल.

पण हे एवढ्यातच आटोपले नाही. आम्ही सर्वधर्मसमभाव स्विकारला. कबीर-महात्मा गांधी सोडा, ते विचारवंत होते पण खेडेगावात आम्ही पीराला भजू लागलो व माहीमचा कोळी मेरीमातेची पूजा करू लागला. बुद्ध हा विष्णूचा अवतार मानण्यात आला. एखादी महान संकल्पना तुमच्या विचारांना/भावनांना कळत-नकळत,( नकळतच जास्त,) कशी प्रभावित करते ते लक्षात येण्यास हरकत नाही.

येथे ऋग्वेदातील ऋचेचे निरुपण संपले. पण आमचे मित्र श्री. माहितगार लेखात यावयास पाहिजेतच. तेव्हा आता त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतो." सत् "ला मर्यादित करावयाला मी कोण लागून गेलो आहे ? मी फक्त ऋचेतील संस्कृतचा मला लागलेला मराठी अर्थ सांगितला.
अहो, (ग्रेसच्या कवितेचा अर्थ लावण्यास असमर्थ ठरलेला मी;) श्रीमत् शंकराचार्य, गौडपादाचार्य, मध्वाचार्य आदि महान आचार्यांनी जेथे हात टेकले तेथे पाउल टाकण्यास मी यडा आहे की कांय ? असो ,

शरद

वाङ्मयमाहिती

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

6 Jan 2018 - 9:23 pm | यशोधरा

आवडले. अजून लिहाल का?

मूकवाचक's picture

6 Jan 2018 - 9:44 pm | मूकवाचक

+१

राजहंसाचे चालणे। भूतळी जाहाले शहाणे।
येर काय कोणे। चालावेचि ना।।

तस्मात् अजून लिहा ही विनंती.

ह्या आणि अशाच विषयांवर अजूनही लिहीत राहावे.

" एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति"

चा मला आंतरजालावर आढळलेला अनुवाद "wise people explain the same truth in different manners. "

आपण दिलेला अनुवादाचा "एकाच .... परमेश्वराचे विद्वान ...... विविध प्रकारांनी वर्णन करतात." एवढा भाग घेतला तर ; विद्वान = wise people ; explain .... in different manners = विविध प्रकारांनी वर्णन करतात यात कुठे मोठा फरक आढळत नाही. truth आणि परमेश्वर एकसामन नाही असा काहीसा आपला अट्टाहास दिसतो. बरीच अध्यात्मिक मंडळी परमेश्वर हेच → अंतीम सत्य (truth ) असे गृहीत धरत असतात आपणही सतचा अनुवाद करताना अंतीमतः परमेश्वर या संकल्पनेला येताच पण तिथे येताना मूळ श्लोकात सत हा शब्द truth च्या जवळ न जात असल्या बद्दलचा आपला अट्टाहास बर्‍याच जणांना अचंबित करून जाईल. पण एनी वे ज्यांनी truth शब्द अनुवादासाठी वापरला आहे त्यांनाही ऋग्वेदातील उर्वरीत काँटेक्स्ट समजलेला नाही आणि truth म्हणजे परमेश्वर अभिप्रेत नसेल असे म्हणणे मला तरी धाडसाचे वाटते.

आपण सत चा context बेस्ड अर्थ जेव्हा परमेश्वर असा देता तेव्हा त्या बद्दल दुमत असण्याचे कारण दिसत नाही. पण आपण दिलेल्या उर्वरीत दोन अ‍ॅनालॉजी (तुल्यभाव) बद्दल अधिक सबळ दुजोर्‍यांची गरज वाटते.

* पहिले म्हणजे सत = सत्य नव्हे तर सत्ता अभिप्रेत आहे. (या बाबतीत ऋग्वेदात सत हा शब्द इतरत्र कुठे आला आहे आणि कोणत्या अर्थाने आला आहे म्हणजे सत्य नव्हे सत्ता अर्थाने आला आहे असे दाखवून देणारा दुजोरा लागेल)

* दुसरे आपण ब्रह्मा ह्या देवतेला पुन्हा पुन्हा ओढून आणत आहात (मी कुणी वेदाचार्य नाही, पण तरीही) ब्रह्मा, वीष्णू , महेश ह्या ऋग्वेदाच्या सुरवातीस तरी प्रमुख देवता नसाव्यात असा कयास बांधला जातो. किमान उधृत श्लोकात ब्रह्म ह्या देवतेचा सुस्पष्ट उल्लेख दिसत नाही. ऋग्वेद नंतरच्या काळातील साहित्यातील सत = ब्रह्म हा दावा पुर्वाश्रमीच्या ऋग्वेदतील उल्लेखावर थोपताना अधिक तर्कसुसंगत उदाहरणे आणि दुजोर्‍या ची अपेक्षा माझ्या सारख्या अज्ञानी लोकांना वाटते.

पण मुख्य म्हणजे लेखाच्या शेवटास आपण मूळ श्लोकाचा अर्थ मर्यादीत करु इच्छित नसल्याचे स्विकारताना दिसता तेव्हा या आपल्या सगळ्या शब्द छलाचे नेमके साध्य / प्रयोजन नीटसे उलगडले नाही .

बाकी आपल्या मत, लेखन आणि वेगळे धागे काढण्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्या बद्दल माझे काहीही आक्षेप नसताना आपल्या लेखनातून अप्रत्यक्ष तसे सुचवले जात असल्याचा अभास निर्माण होतो आहे त्याचीही आवश्यकता समजलेली नाही.

एनी वे आपण माझ्या लेखनास महत्व देऊन आपली बाजू मनमोकळे पणाने मांडली या बद्दल आभार

शरद's picture

14 Jan 2018 - 7:57 am | शरद

श्री. माहितगार यांच्या प्रतिसादातील मुद्द्यांवर अनुक्रमे :

(1) अंतिम सत्य = परमेश्वर हे विधान बरोबर असले तरी ते परमेश्वर वर्णनाचे एक अंग झाले. ईश्वराला god हा शब्द वापरून श्री माहितगार आपले विधान wise people explain the same god in different manners असे करू इच्छितात कां ? मग हे भाषांतर ऋचेच्या संदर्भात जास्त उचित होईल.
सत्य आणि अंतिम सत्य एक नव्हे. "विराटने 100 रन काढल्या हे सत्य आहे ". बरोबर ? म्हणून "विराटने 100 रन काढल्या" म्हणजे. परमेश्वर असे म्हणता येईल का ? truth म्हणजे अंतिम सत्य नव्हे. हा शब्दच्छल वाटत असेल तर सोडून द्या. फारफार तर असे म्हणू श्री. माहितगार ऋचेतील एका अंशासारखा "अंतिम सत्या"तील एक भाग निवडत आहेत.

(2) "सत्" चा अर्थ सत्ता असा लिहला तेव्हा मला कल्पना नव्हती की सत्ता याचा अर्थही द्यावयास पाहिजे होता. सत्ता म्हणजे अस्तित्व, असणेपणा, हल्लीच्या भाषेत existence. ब्रह्म विश्वनिर्मितीपूर्वीही होते, आताही आहे व विश्व नसेल तेव्हाही असणार आहे म्हणून सत् हे ब्रह्माचे लक्षण. छांदोग्य उपनिषदात उद्दालक आरुणी म्हणतात ".(विश्व). उत्पत्तीपूर्वी केवळ सत् च होते. त्याने विचार केला की आपण विविध रुपे धारण करावीत ..्हणून त्याने जलाची निर्मिती केली. जलापासून अन्न.. अशी विश्वाची उत्पत्ती झाली. (छांदोग्य उपनिषद, 6.2.1.) माउली म्हणतात " तरी केवळ जे सत्ता ! ते पुरुष गा पांडुसुता ! (ज्ञा.13.965) सत्ता प्रकाश सुख ! या तिही तिही उणे लेख ! (अनु. 5.1) तर माझे म्हणणे ऋचेमध्ये सत् चा अर्थ truth घेणे अयोग्य आहे.

(3) पण एनी वे ज्यांनी truth शब्द अनुवादासाठी वापरला आहे त्यांनाही ऋग्वेदातील उर्वरीत काँटेक्स्ट समजलेला नाही आणि truth म्हणजे परमेश्वर अभिप्रेत नसेल असे म्हणणे मला तरी धाडसाचे वाटते.
इन्ग्रजी भाषांतरकर्त्यांना सत् चा अर्थ काय लागला ते मी तर काही सांगू शकत नाही पण हिन्दी भाषातरकर्त्यांनी "ब्रह्म" च्या जवळचा परमेश्वर अर्थ घेतला आहे व तो truth पेक्षा नक्कीच जास्त बरोबर आहे.

(4) दुसरे आपण ब्रह्मा ह्या देवतेला पुन्हा पुन्हा ओढून आणत आहात (मी कुणी वेदाचार्य नाही, पण तरीही) ब्रह्मा, वीष्णू , महेश ह्या ऋग्वेदाच्या सुरवातीस तरी प्रमुख देवता नसाव्यात असा कयास बांधला जातो. किमान उधृत श्लोकात ब्रह्म ह्या देवतेचा सुस्पष्ट उल्लेख दिसत नाही. ऋग्वेद नंतरच्या काळातील साहित्यातील सत = ब्रह्म हा दावा पुर्वाश्रमीच्या ऋग्वेदतील उल्लेखावर थोपताना अधिक तर्कसुसंगत उदाहरणे आणि दुजोर्‍या ची अपेक्षा
माफ करा पण येथे आमचे मित्र श्री. माहितगार टिपिकल मिपावर शोभेसा खोडसाळपणा करत आहेत असा मला संशय येतो आहे. येथे " ब्रह्मा " कोठून घुसला ? आता त्यांना "ब्रह्माने"," ब्रह्माचे" असे शब्द आले आहेत ते "ब्रह्म" ने; "ब्रह्म" चे असे असावयास पाहिजे होते असे म्हणावयाचे आहे कां ? च्या, म्हणजे " रामाला राज्याभिषेक झाला " याचा अर्थ ते रामा गड्याला राज्याभिषेक झाला असा घेणार की काय ? गंमतच आहे. सत् शब्द ऋग्वेदात आणखी कोठे आला हे शोधत बसण्याऐवजी तो "श्रुतीं मध्ये आहे एवढे मला तरी पुरेसे वाटते.

(5) पण मुख्य म्हणजे लेखाच्या शेवटास आपण मूळ श्लोकाचा अर्थ मर्यादीत करु इच्छित नसल्याचे स्विकारताना दिसता तेव्हा या आपल्या सगळ्या शब्द छलाचे नेमके साध्य / प्रयोजन नीटसे उलगडले नाही .
श्री. माहितगारांचा पहिला प्रश्न पुढील होता
सत' ला आपण ऋग्वेदातील वर्णित देवतां अग्नी, सोम, वरुण.. पर्यंत आपण मर्यदीत करू इच्छित आहात का ?
या प्रश्नाचे उत्तर मी दिले आहे की "ब्रह्म" या कल्पनेचे वर्णन करता येत नाही कारण तेथे "यतो वाचो निवर्तंते अप्राप्य मनसा सह " असेच सर्व आचार्य मानतात. तेथे म्या पामरे "ब्रह्म"ला काय मर्यादित करावे ? नूळ ऋचेतही त्या काळच्या काही मुख्य देवता नोंदल्या आहेत. याचा अर्थ त्यांनीही "ब्रह्म" ला (आता कसे !) मर्यादित केले आहे असे वाटत नाही.
आता येथील प्रश्नाचे उत्तर. सहसा मी लिहतो तेव्हा कमीत कमी शब्दात लिहण्याचा प्रयत्न करतो. बर्‍याच वेळी वाचकच " जास्त लिहा" असेच म्हणतात, येथेही ऋचेबद्दल मोजून 16 ओळी आहेत. त्यात शब्द छलाचे नेमके साध्य / प्रयोजन काय असणार ? मी येथे स्पष्ट करतो की जे वाचून मला आनंद मिळाला ते येथे देऊन मित्रांचा आनंद वाढवावा. एवढेच या लेखांचे प्रयोजन. जर आपणास काही आक्षेपार्ह्य वाटले असेल तर सोडून द्या हीच विनंती.
.
(6) बाकी आपल्या मत, लेखन आणि वेगळे धागे काढण्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्या बद्दल माझे काहीही आक्षेप नसताना आपल्या लेखनातून अप्रत्यक्ष तसे सुचवले जात असल्याचा अभास निर्माण होतो आहे त्याचीही आवश्यकता समजलेली नाही.
इथे मात्र हात टेकले. अहो, असे वाटावयाचे कारणच काय ? आपल्या अभ्यासाबद्दल व विषयांच्या विविधतेबद्दल मला आदरच वाटतो. किंवा माझे वय लक्षात घेऊन कौतुक म्हणालात तरी चालेल. मी मागील एका लेखात लिहले आहे की श्री. माहितगार, श्री प्रचेतस या सारख्या लोकांनी ’ ठीक आहे " अशी प्रतिक्रिया दिली तरी बरे वाटते. जर आपला काही गैरसमज झाला असेल तर ’माफ करा" म्हणावयास मला अजिबात संकोच नाही. आता आपल्या लेखावरील माझी प्रतिक्रिया मलाच थोडी बोचक वाटली म्हणून मी ती आपल्याला व्य.नि.. वर पाठवावयाचा प्रयत्न केला होता. ते शक्य नाही म्हणून शेवटी प्रतिसाद दिला. श्री. गबाळ्या यांचाही माझ्या प्रतिक्रियेबद्दल असाच गैरसमज झाला होता पण माझ्या खुलाश्या नंतर तो दूर झाला व त्यांनी तसे कळविले. आशा आहे की आपणही असाच उदारपणा दाखवाल.

शरद

.

.

माहितगार's picture

14 Jan 2018 - 9:58 am | माहितगार

आपल्या मनमोकळ्या अभिप्रायासाठी अनेक आभार. शेवटच्या मुद्यातील गैरसमज दूर झाले असे मनमोकळे पणाने कबूल करतो. मी संस्कृत विकिस्रोतातील ऋग्वेद आवृत्तीत ब्रह्मा शब्दावर दिलेल्या शोधावर शोध मिळाले नाहीत पण आपल्या या प्रतिसादा नंतर ब्रह्म शब्दावर शोध घेतल्यास अनेक शोध मिळाले त्यामुळे आपली ती बाजूस सहमती करतो.

मूळ ऋचेतही त्या काळच्या काही मुख्य देवता नोंदल्या आहेत. याचा अर्थ त्यांनीही "ब्रह्म" ला (आता कसे !) मर्यादित केले आहे असे वाटत नाही.

तो धागा धार्मिक संदर्भाने असल्यामुळे wise people explain the same god in different manners असे किंवा god च्या जागी 'अंतिम सत्य' / 'अंतीम ट्रूथ' साठी जो काही इंग्रजी शब्द असेल तो अधिक चालावा असे वाटते.

'काही विप्र/विद्वान 'ब्रह्म' चे वर्णन गॉड अथवा अल्ला असेही करतात .' हे वाक्य आपण कितपत मोकळेपणाने स्विकारू शकता आणि या वाक्या बाबत आपणास काही खूपत असल्यास मनमोकळेपणाने व्यक्त केल्यास जाणून घेणे आवडेल.

सत् शब्द ऋग्वेदात आणखी कोठे आला हे शोधत बसण्याऐवजी तो "श्रुतीं मध्ये आहे एवढे मला तरी पुरेसे वाटते.

कोणत्याही शब्दाचा अर्थ काढताना त्याच साहित्यिकाने इतरत्र कोणत्या अर्थाने वापरला आहे किंवा समकालीन साहित्यात कसा वापरला गेला आहे या क्रमाने प्राधान्य द्यावयास हवे. इतर लेखक अथवा नंतरच्या काळातील साहित्य तोच शब्द वेगळ्या अर्थाने वापरत असू शकतात.

इतर लेखक अथवा नंतरच्या काळातील साहित्य यावरून पुर्वाश्रमीच्या लेखकाच्या अभिव्यक्तीवर अनवधानाने वेगळ्या अर्थाचे आरोपण होत नाही आहे ना याची विशेष सजगता बाळगली पाहीजे असे माझे मत आहे .

गीते सारखे काही अपवाद सोडल्यास सुव्यवस्थीत विश्वासार्ह दक्षते सहित संस्कृत साहित्याचे विशेषतः वैदिक साहित्याचे अनुवाद उपलब्ध होताना दिसत नाहीत किमान आंतर जालावर युनिकोडातून उपलब्ध नसतात या बद्दल मी पुर्वीही लिहिले आहे त्याची पूर्ण पुनरौक्ती टाळतो.

संस्कृत विकिस्रोतात सत किंवा इतर कोणतेही शब्द ऋग्वेद , किंवा संबंधीत ग्रंथात काही क्षणात असे शोधता येतात (काही त्रुटी विदेत असू शकतात या डिसक्लेमर सह) हे आपल्या माहिती आणि सुविधेसाठी.

मनमोकळ्या संवादासाठी पुनश्च आभार

माहितगार's picture

14 Jan 2018 - 10:02 am | माहितगार

वरील प्रमाणे शोध दिल्यास त चा पाय न मोडता लेखन केलेला आणखी एका सत चा उल्लेख संस्कृत विकिस्रोतात दिसतो आहे.

राही's picture

14 Jan 2018 - 10:28 pm | राही

सत् शब्द हे अस् धातूचे प्रेझेन्ट पार्टिसिपल (वर्तमानकालवाचक धातुसाधित) आहे. शब्दशः अर्थ 'असणारे'. हा 'असणारा' जो भाव, ते सत्-त्व, सत्-ता. याला 'खरे' हा अर्थ अशा रूपाने मिळाला की जे असणारे, ते आहेच, ते सत्य आहे. पण ते 'वास्तव' आहे का? वस्तुमात्राचा भाव (गुणधर्म) म्हणजे वास्तव. मृदुपणा म्हणजे मार्दव, तसे वस्तुपणा म्हणजे वास्तव. ऋतु-आर्तव, गुरु-गौरव प्रमाणे. आपण मॅटर या इंग्लिश शब्दाचे मराठी भाषांतर 'वस्तु' असे करीत असू. Matter exists. बस्स.
'सत्'चा सूक्ष्म अर्थ सहजपणे ध्यानात येत नाही. हे जगत् सत्य आहे की मिथ्या? जगातली यच्चयावत गोष्ट सत् आहे का? 'असणारी' आहे का? एक उत्तर आहे, 'नाही. नाशिवंत आहे'. सो, वास्तव काय? रिअ‍ॅलिटी काय?
सत् हा वर्तमानकाल आहे. जे आत्ता आहे, ते आत्ता सत् आहे. जे उद्या असेल ते उद्याचे सत् असेल. 'सत्'ला व्याकरणातल्या कर्माची आवश्यकता नाही. काहीही'असू' शकते. पण वास्तवाचे तसे नाही. वस्तु आहे म्हणून वास्तव आहे. वस्तु कोणतीही असू शकते पण वास्तव मात्र त्या त्या वस्तूचा वस्तुपणा असल्याने त्या वस्तूशीच निगडित राहाणार. वस्तूला गुण असतो, 'सत्'ला गुण नाही. ते केवळ आहे. तर हे गुणातीत असे काय आहे? ते'सत्' आहे. हे जाणून घ्यायला कठिण. कारण ते सगुण नाही. पण ते निर्गुणही नाही. ते निव्वळ गुणातीत असे आहे.
टीप : हा प्रतिसाद म्हणजे शरदरावांनी उद्धृत केलेल्या ऋचेचा अर्थ अथवा मराठी अनुवाद नाही. तर लेख वाचून सुचलेले केवळ फुटकळ विचार आहेत. नासदीय सूक्तांवरही लिहावेसे वाटले पण फारच अवांतर, म्हणून नाही लिहिले.