.. एक क्षण भाळण्याचा(३).....

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
26 Dec 2017 - 3:19 pm

मागील दुवा http://www.misalpav.com/node/41677

चला तुमचं चहा पाण्याचं बघु या. आलेल्या पाहुण्याला नुसत्या गाण्यागीण्यावर पाठवलं तर त्या रागावतील. तुमच्या वहिनी हो. बसा हं आलोच मी . आम्ही कशाला कशाला म्हणायच्या आतच ते आलोच असे म्हणत आत गेले.
सुमीत माझ्या कडेच पहात होता. त्याला बहुतेक हे नवीनच होते.

नाथ साहेब हे सुमीतला अगदी सुरवातीला कोणत्यातरी कंपनीत मॅनेजर म्हणून होते. त्यावेळेस सुमीतची त्यांची भेट झाली होती. वाचन ही त्यांची कॉमन आवड. त्यातून ओळख वाढत गेली. चित्रपटाची आवड हेही आणखी एक कारण. अर्थात एखाद्याशी दोस्ती जमायला कारण लागतेच असे नाही. पण आवडी निवडी जुळत असतील तर ती पटकन जमते. दोस्ती टिकायला मात्र स्वभाव तितकेच दिलदार असावे लागतात.
नाथ साहेबांच्या पुस्तकांच्या कपाटात पुस्तकेच पुस्तके होती. व्हीटी स्टेशनच्या स्टेशनमधून सकाळी साडे नऊ दहा वाजता जशी एकमेकांशी संबन्ध नसलेली गर्दी बाहेर पडते ना तशी. एकमेकाशी कसलाही संबन्ध नसलेली पुस्तके. कार्ल मार्क्स च्या दास कॅपिटल शेजारी दासबोध होता. त्या शेजारीच पाडगावकरांचा उदासबोध. रॉबर्ट फ्रॉस्टच्या बाजूला सोफोक्लीज चे किंग ईडिपस, आणि राईज अँड फॉल ऑफ थर्ड राइश च्या शेजारी ज्ञानेश्वरी. इलीयाहु गोल्डराट च्या " थेअरी ऑफ कन्स्ट्रेंट्स " च्या बाजूला "द सिक्रेट". मला गंमत वाटली. अहो याच्या वाचकांचे एकमेकांशी पटत नाही म्हणून ग्रंथालयात देखील ही पुस्तके शेजारी शेजारी ठेवत नाहीत.
मी पुस्तके बघत असतानाच आतून चहा ची भांडी घेतल्याचे वगैरे आवाज येवू लागले. त्याचबरोबर नाथ साहेब कोणाशी तरी बोलत होते " कोण आलंय माहीत आहे का? सुमीत आलाय माझा एके काळचा ऑफिसमधला सहकारी. तो आपण नाही का त्या पुण्याच्या कंपनीत होतो त्यावेळी घरी यायचा. हो कमलचा नवरा.
आतून हे आवाज येत होते. आमच्या बायका नजरेनेच " चला आता उरका" वगैरे इशारे एकमेकीना करत होत्या. तेवढ्यात नाथ साहेब एक ट्रे घेऊन बाहेर आले. ट्रे मधे चहाचा एक भला मोठा थर्मास, काही रिकामे मग्स आणि बिस्कीटे घेवुन आले.
घ्या ओ. मुद्दामच थर्मास आणला. काय होतं गप्पा च्या नादात चहा किती वेळा होतो ते सांगता येत नाही. आणि चहा करायला उठले की गप्पा मोडतात बघा.
घ्या की हो वहिनी. फस्क्लास केलाय चहा. जमलाय का बघा तुमच्या सारखा. असे म्हणत ते दिलखुलास हसले आणि त्यानी मग मधे चहा भरुन हीच्या पुढे केला.
आता आमचा संकोच मोडला होता. "नाथसाहेब ही इतकी पुस्तके? कोण वाचतं."
मीच वाचतो. तुमचा पुढचा प्रश्न सांगतो " इतक्या प्रकारची?" ही सगळी पुस्तके वेगवेगळ्या वयात वाचलेली आहेत. आत्ताही ही पुस्तकं वाचताना मी त्या वयात जातो. माझ्यासाठी ही पुस्तके एक नॉस्टॅल्जीया आहे. दासबोध आणि उदासबोध ही तितक्याच आवडीने वाचतो. जी ए कुलकर्णी आणि गुरुनाथ नाईक ही वाचतो.
ही पुस्तके म्हणजे आपले विचार असतात. ते डोक्यात येतात तशी ही पुस्तके मला सांगा आपल्या मनात एकाच वेळेस कितीतरी प्रकारचे विचार येत असतात. निव्वळ सात्वीक किम्वा निव्वळ तामसी विचारच मनात ठेवायचे असे ठरवता येत नाही. आपल्या मनाची एक गम्मत आहे. ज्या गोष्टी टाळाव्याशा वाटतात त्यांचा विचार मन जास्त करते. शरीरसुखा बद्दलचे विचार ब्रम्हचारी साधुच जास्त करतात. जेवताना आपण आज फक्त तिखटच खायचे असे ठरवून जेवू शकत नाही. तिखटाच्या जोडीला मीठ , मसाले, गोड आंबट सगळे काही असेल तर त्या अन्नाला चव येते. तसेच विचारांचे ...वाचनाचे.
आता हे बघा ना गाण्यातसुद्धा नुसता फक्त ग किंवा मग नुसता सा लावून चालत नाही त्या सुराचं गाणं करायचं असेल ना तर जोडीला इतर सूरही घ्यावे लागतात. रागातला वर्ज्य सूरही कधीतरी चिमुटभर येवुन गम्मत करुन जातो.
काय मस्त बोलत होता हा माणूस.
हीची थोडीशी चुळबूळ सुरू झाली होती. डोळ्यानी पुन्हा एकदा उरका, आटपा हे इशारे चालू झाले होते.
गम्मत असते नाही बायकांची. नाटकाला गेलो असतो तर घरी जायला घाई वगैरे काही होणार नव्हते पण आता काय होत होते कोण जाणे.
आलोच हं जरा. म्हणत नाथ साहेब आत गेले.
का हो यांच्या मिसेस कुठे आहेत. दिसत नाहीत .मघाशी तर ते आत कुणाशीतरी बोलत होते. त्या का नाही बाहेर आल्या. हीने सुमीतला विचारले.
असतील ना . बहितेक काहीतरी करत असतील. मी आमच्या कंपनीच्या अॅकन्यूअल डे ला भेटलो होतो मी त्याना.
आम्ही हे बोलत होतो तोच आतून आवाज आला.
भावसाहेब आत या. नाथ साहेबानी आम्हाला सगळ्यानाच आत बोलावले. मी आत गेलो. फ्लॅट मोठा प्रशस्त होता. मोजकेच फर्निचर पण घरमालकाच्या रसिकतेची
दाद द्यावी असे. एका खोलीत चॅपलीनचे पोस्टर. एका कपाटात प्रोजेक्टर समोर होम थिएटर आणि त्या खालच्या कप्प्यात असंख्य सी डीज होत्या. हा माझा छंद.
मला चार्ली चॅपलीनचे पिक्चर आवडतात. अरे पोट धरुनच नाही तर पोट भरुन हसता येते. निख्खळ हसता येते. त्याच्या पिक्चर मधला एक एक सीन पाठ आहे. गोल्ड रश मधला तो भुकेलेला असतानाचा बूट उकडून खाणारा. काय नजाकतीने तो बुटाच्या लेस काट्याला गुंडाळतो.
त्या सी डी च्या कप्प्यात चॅपलीनच्या सी डीज चे भांडारच होते.
मला जर कोणाला गुरू करायचा असेल तर मी चॅपलीनला करेन . अरे किती सोप्या शब्दात... शब्द जाऊदे शब्द ही न वापरता तो आख्खं आयुष्य सांगून जातो.
मॉडर्न टाईम्स मधला तो त्याच्या घराचा प्रसंग माणसाला काय हवं असतं साधंसं घर , घरा भोवती फळांचं झाड, दूध देणारी गाय , साधंसंच जेवण,आणि आणि सोबत आनंदी पत्नी. आणखी काय हवं असतं माणसाला. चॅपलीन रडवता रडवता हसवतो आणि हसता हसता अंतर्मूख करतो.
तो एक प्रसंग नव्हे नव्हे आख्खा पिक्चर मी कितीतरी वेळा पाहिला आहे. आणि प्रत्येक वेळा तितकाच धमाल हसलो आहे.
नाथ साहेब रंगात येवून सांगत होते. सांगतानाही ते तो मॉडर्न टाईम्स मनात पहात असावेत बहुतेक.
तोच पिक्चर पुन्हा पुन्हा पहाताना त्याच विनोदावर हसू येतं?....... ही कोणत्या ठिकाणी लॉजीकल प्रश्न विचारेल खरंच सांगणं अवघड आहे नाही.
अहो अगदी रंगात येवून कोणी एखादी गोष्ट सांगत असेल तर त्याला जमिनीवर आणून ठेवतात या बायका. म्हणजे बघा आकाशात टिप्पूर चांदणे पडलंय. अगदी चांदण्यांचं झाड फुललय आणि तुम्ही गावाकडे टेरेसवर पडून चांदण्याचा आस्वाद घेताय. कोणते नक्षत्र कुठे आहे हे सांगताय आकाशभर पसरलेली व्रुश्चीक राशीतील अनुराधा नक्षत्र दाखवताय. त्या वेळेस व्रुश्चीक शब्दावरुन हीला घरात झुरळे झाली आहेत . डांबराच्या गोळ्या संपल्या आहेत हे आठवतं. किती विरस होतो अशाने म्हणून सांगु. ती लहान मुले खेळतात ना " स्टॅच्यू " नावाचा एक खेळ तुम्ही कोणालातरी स्टॅच्यू म्हणता आणि त्याने जसा असेल त्या अवस्थेत स्थिर स्तब्ध उभे रहायचे.. कुठल्यातरी नर्तकाने रंगात येवून नाच करताना एकदम स्टॅच्यू म्हम्टले तर कसे वाटेल तसे. या प्रश्नाने बहुतेक नाथ साहेबांना स्टॅच्यू सारखी काहीतरी अवस्था प्राप्त करुन दिली असेल या अपेक्षेत मी...
नाथ साहेबानी आमच्य कडे पाहिले. वहिनी एक प्रश्न विचारु? तुम्ही लहानपणी कधी पाटी पेन्सील वापरली आहे.
हो . माझ्या शाळेत आम्हाला चौथी पर्यन्त पाटीच वापरायला लावायचे कंपल्सरी.
मग मला सांगा पाटीवर लिहायच्या अगोदर तुम्ही काय करायचा.
काय म्हणजे. पाटी पुसायचो. पाटीसाठी दप्तरात स्पंजाची डबी पण असायची.
पाटी पुसायचा? ते का
का म्हणजे . काहीतरी लिहायला पाटी कोरीच हवी की. अगोदरचे लिहीलेले सगळे पुसले असेल तरच नवे लिहीता येईल .
मी तेच करतो. एखादा पिक्चर बघायच्या अगोदर मनाची पाटी कोरी करतो. अगदी पाण्याने पुसून कोरी करतो ना तशी.
त्या पिक्चरच्या सगळ्या आठवणी पुसून टाकतो आणि तो नव्याने पहातो. तसें केलं तरच तो पुन्हा एन्जॉय करता येईल.
आपण आयुष्यात मनाची पाटी कोरी करत गेलो ना तर प्रत्येक क्षण नव्याने जगता येईल अगदी लहान मुलासारखा.
आम्ही सगळे एक क्षण स्तब्ध झालो. आमचाच स्टॅच्यू झाला होता.
कोणीच काही बोलत नव्हते. किती वेळ गेला माहीत नाही . टेबलवर काहीतरी ठेवल्याचा आवाज आला. नाथ साहेब टेबलवर बशीत सामोसे मांडून ठेवत होते.
ट्रेमधे बिस्किटे आणि केक होते.
या सामोसे घेऊ या.
आणि वहिनी ? .... ही ने विचारले
ती आत आहे. येईलच.
सामोसे घेउया तोवर. आता आमच्या गप्पा चहाच्या टेबलवर सुरू झाल्या. अचानक खोलीच्या दारातून एक साधारणतः पन्नाशी पलीकडच्या एक बाई आल्या.
क्रमश :

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

संग्राम's picture

26 Dec 2017 - 4:51 pm | संग्राम

किती सहज सुंदर

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Dec 2017 - 9:15 am | ज्ञानोबाचे पैजार

सहज, सुंदर आणि सुरेख
मनापासून आवडले
पुभाप्र
पैजारबुवा,

सुबोध खरे's picture

27 Dec 2017 - 5:15 pm | सुबोध खरे

झकास!

सिरुसेरि's picture

28 Dec 2017 - 6:41 pm | सिरुसेरि

हा भाग मस्त रंगला आहे .