सफर ग्रीसची: भाग १३ – अक्रोपोलिस

निशाचर's picture
निशाचर in भटकंती
30 Nov 2017 - 12:15 am

भाग ९ - अथेन्समधील पहिला दिवस
भाग १० - प्राचीन तंत्रज्ञान प्रदर्शन आणि अक्रोपोलिस संग्रहालय
भाग ११ - गूढरम्य डेल्फी १
भाग १२ - गूढरम्य डेल्फी २

प्राचीन कोरिंथच्या भागात लिहिल्याप्रमाणे अक्रोपोलिस म्हणजे खरंतर उंचावर बांधलेली गढी किंवा नगर. त्याअर्थाने अथेन्सचं अक्रोपोलिस एकमेव नसलं तरीही अक्रोपोलिस म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते अथेन्सचं अक्रोपोलिस आणि तिथलं पार्थेनॉन. अथेन्समध्ये फिरत असताना ते आपल्याला कायम खुणावत राहतं आणि अथेन्सच्या गतवैभवाची सतत आठवण करून देत असतं.

आदल्या दिवशी डेल्फीचा प्रवास आणि दिवसभर फिरणं झाल्याने २९ डिसेंबरला सकाळी सावकाश उठून अक्रोपोलिस पाहायचं आणि नंतर निरुद्देश भटकायचं एवढाच कार्यक्रम ठेवला होता. मेट्रोने अक्रोपोलिस स्टेशनपर्यंत आलो. तिथे आमच्याबरोबर मेट्रोतली यच्चयावत जनता उतरली. सगळ्यांना आमच्यासारखंच अक्रोपोलिस बघायचं होतं! त्यात परदेशी पर्यटकांपेक्षा सुट्टीत सहकुटुंब अथेन्सला आलेले ग्रीक्स जास्त होते. दर चारपाच मिनिटांनी मेट्रोने येणार्‍या लोढ्यांमुळे गर्दीत भर पडत होती. ग्रीसमध्ये फिरताना एवढी गर्दी तोपर्यंत पाहिली नव्हती. त्यात अक्रोपोलिसचं एकच, दक्षिणेकडचं प्रवेशद्वार खुलं होतं, सामान ठेवायची सोय बंद केली होती. त्यामुळे गोंधळात भर पडत होती. एकंदर अक्रोपोलिस व्यवस्थित नाही बघता आलं तरी मनोरंजन नक्की होणार असं वाटायला लागलं.

इ.स.पूर्व पाचव्या शतकाच्या सुमारास अक्रोपोलिसमधील महत्त्वाच्या इमारतींचं बांधकाम सुरू झालं. अक्रोपोलिस संग्रहालयात ठेवलेल्या या मॉडेलवरून इसवीसनाच्या दुसर्‍या ते तिसर्‍या शतकात अक्रोपोलिस कसे असेल, याचा अंदाज येतो.

.

दक्षिणेकडून अक्रोपोलिस पाहायला सुरूवात केली की प्रथम लागतं वरच्या फोटोत उजवीकडे असलेलं Theatre of Dionysus. ते पाहून डावीकडे वळून टेकडीला वळसा घालत आपण डावीकडे टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या Odeon या दुसर्‍या थिएटरपाशी येतो. त्यानंतर अक्रोपोलिसच्या मुख्य मार्गावर येऊन टेकडी चढली की Propylaea या अक्रोपोलिसच्या प्राचीन द्वारातून अक्रोपोलिसमध्ये प्रवेश करता येतो. अक्रोपोलिस आणि आजूबाजूच्या परिसराची ही चित्रमय झलक.

.इ.स.पूर्व चौथ्या शतकात बांधण्यात आलेलं Theatre of Dionysus

.Odeon of Herodes Atticus हे दुसर्‍या शतकात बांधलेलं बंदिस्त नाट्यगृह. ५ हजार आसनक्षमता असलेल्या या थिएटरची दर्शनी भिंत तिमजली होती. १९५० साली या इमारतीचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि तेव्हापासून इथे पुन्हा सांगितिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ लागले. एपिडाउरोससारखंच इथेही एखादा कार्यक्रम बघायला मजा येईल.

.

.अक्रोपोलिसवरून दिसणारं Odeon

.टेकडी चढताना दिसलेलं Temple of Hephaestus आणि खालच्या बाजूला उजवीकडे प्राचीन अगोराचे अवशेष. हे देऊळ पाहायचं मात्र राहून गेलं.

.अक्रोपोलिसच्या संरक्षणासाठी असलेल्या तटबंदीत पश्चिमेला असलेला दरवाजा. याखेरीज नैऋत्येला आणखी एक दरवाजा होता.

.आतल्या बाजूने तट आणि दरवाजा

.तटातून किल्ल्यात शिरल्यावर दिसणारं Propylaea हे महाद्वार. संगमरवरी पायर्‍या चढून आलं की प्रोपिलाइयातून अक्रोपोलिसमध्ये प्रवेश करता येत असे. उजवीकडे उंचावर बांधलेलं अथेना नायकीचं देऊळ, Temple of Athena Nike.

.

.तीनदा कोन्सुल बनलेल्या अग्रिप्पा या प्राचीन काळातील राजकारण्याच्या स्मारकाचे अवशेष. प्रोपिलाइयाच्या डावीकडे असलेल्या या पीठिकेवर काश्याचा चार घोड्यांचा रथ (quadriga) होता. अग्रिप्पाच्या आधी तिथे युमेनसचे स्मारक असावे.

.प्रोपिलाइयाचा दर्शनी भाग

.प्रोपिलाइयाचा दर्शनी भाग

.अथेन्स शहराची देवता (Patron) मानण्यात आलेल्या अथीना पार्थेनॉस (Athena Parthenos) देवीचे Parthenon हे प्रसिद्ध मंदिर.

.पार्थेनॉनच्या दुरुस्तीचं काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. काम संपल्यावर एकदम नवंकोरं पांढरंशुभ्र पार्थेनॉन दिसेल कि काय, अशी शंका मनात आली.

.इ.स.पूर्व ४४० च्या दरम्यान बांधलेल्या पार्थेनॉनच्या गाभार्‍यात सोनं आणि हस्तिदंतात घडविलेली अथीना देवीची मूर्ती होती. युद्धाच्या वेषात असलेली देवी अथेन्सवासियांसाठी उजव्या हातात Nike म्हणजे विजयश्री घेऊन आली आहे असे मूर्तीचे स्वरूप होते. डोरिक पद्धतीने बांधलेलं पार्थेनॉन नंतरच्या काळात चर्च आणि मशिद म्हणूनही वापरण्यात आलं.

.अक्रोपोलिसवरून दिसणारं सुरुवातीला पाहिलेलं Theatre of Dionysus

.अथेन्समधील आणखी एका देवळाचे अवशेष. इ.स.पूर्व सहाव्या शतकात बांधायला सुरुवात केलेलं Temple of Olympian Zeus हे देऊळ सुमारे साडेसहाशे वर्षांनंतर रोमन सम्राट हाड्रियनच्या काळात बांधून पूर्ण झालं. फोटोत खालच्या भागात रस्त्याच्या शेवटी Arch of Hadrian दिसत आहे. तर वरच्या बाजूला डावीकडे Panathenaic Stadium चा काही भाग दिसत आहे. इ.स.पूर्व ३३० च्या आसपास त्याजागी स्टेडियम बांधण्यात आले. इसवीसनाच्या दुसर्‍या शतकात जुन्या स्टेडियमची संगमरवरात पुनर्बांधणी करण्यात आली. एकोणिसाव्या शतकात स्टेडियमची दुरुस्ती करण्यात येऊन १८९६ सालच्या पहिल्या आधुनिक ऑलिंपिक खेळांचा उद्घाटन आणि समारोप सोहळा तिथे साजरा झाला. अजूनही ग्रीसमधील ऑलिंपियाला प्रज्वलित केलेली ऑलिंपिक ज्योत ऑलिंपिक्सच्या यजमान देशाकडे सुपूर्द करण्याचा समारंभ या स्टेडियममध्ये होतो. अथेन्समधील या काही जागा अक्रोपोलिसवरून पाहण्यात समाधान मानावे लागले.

.टेकड्यांमधे पसरलेलं महानगर. मध्यभागी लायकाबेटस टेकडी दिसत आहे.

.अक्रोपोलिसचा परिसर, उजवीकडे Erechtheion हे देऊळ

.Erechtheion

.अथीनाचं Erechtheion हे देऊळ आधीच्या जुन्या देवळाच्या जागी इ.स.पूर्व ४१० च्या दरम्यान बांधण्यात आले.

.इतर ग्रीक देवळांपेक्षा वेगळं दिसणारं हे देऊळ एका बाजूच्या Karyatides नावाच्या सहा नर्तकींच्या पुतळ्यांमुळे लक्ष वेधून घेतं. मूळचे पुतळे संग्रहालयात असले तरी इथे ठेवलेलेही सुंदर आहेत. या नर्तकींबरोबरच आम्ही अक्रोपोलिसचाही निरोप घेतला.
(क्रमशः)

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

30 Nov 2017 - 7:05 am | प्रचेतस

खूप म्हणजे खूपच जबरदस्त.

देखणी आहे ही ऑलिम्पियन नगरी. एकापेक्षा एक सरस अवशेष आहेत, तेही निगुतीने जपले आहेत.

निशाचर's picture

1 Dec 2017 - 2:09 am | निशाचर

धन्यवाद, प्रचेतस! अवशेष (विशेषतः जागतिक वारसा स्थळं) खूप जपले आहेत. पण काही जागांची दुरूस्ती पाहून एकदम नूतनीकरण केल्याचा भास होतो. ते मात्र खटकलं. आणि अक्रोपोलिस आणि त्याचं संग्रहालय यांचं मिळून एक तिकिट असायला हवं होतं. किंवा दोन्हीची तिकिटं थोडी स्वस्त हवी होती. ग्रीसमधील इतर स्थळं पाहणं त्यामानाने स्वस्त आहे.

दुर्गविहारी's picture

4 Dec 2017 - 7:48 pm | दुर्गविहारी

खुपच देखणे फोटो. हे पहायला मिळेल कि नाही हे माहिती नाही, पण तुमच्यामुळे चित्रसफर तरी होती आहे याबध्दल धन्यवाद.

निशाचर's picture

5 Dec 2017 - 4:19 am | निशाचर

धन्यवाद, दुर्गविहारी!
इतिहास, पुरातन वास्तू अशा गोष्टींत रस असेल तर ग्रीसमध्ये पाहायला खूप काही आहे.