सफर ग्रीसची: भाग ११ - गूढरम्य डेल्फी १

निशाचर's picture
निशाचर in भटकंती
14 Oct 2017 - 7:31 am

भाग ९ - अथेन्समधील पहिला दिवस
भाग १० - प्राचीन तंत्रज्ञान प्रदर्शन आणि अक्रोपोलिस संग्रहालय

प्राचीन काळी ग्रीक संस्कृतीत जगाचं केंद्र मानण्यात आलेली डेल्फी (Delphi)! ग्रीक देव झ्यूसने पृथ्वीचं नाभीस्थान शोधण्यासाठी पूर्व आणि पश्चिम दिशांहून सोडलेले दोन गरूड ज्या ठिकाणी भेटले ती ही जागा. प्राचीन ग्रीकांचं हे सगळ्यांत महत्त्वाचं धर्मस्थळ अथेन्सपासून १८० किमीवर पार्नासस पर्वताच्या (Mount Parnassus) उतारावर वसलेलं होतं. ग्रीसमधील पुरावशेष पाहण्यात रस असेल तर अथेन्स आणि ऑलिंपिया बरोबर डेल्फीची वारी करणे भाग आहे.

अथेन्सहून एका दिवसात डेल्फीची सहल घडविणार्‍या अनेक टूर कंपन्या आहेत. आपल्या डोक्याला त्रास न देता फिरायचं असेल तर तो पर्याय उत्तम आहे. पण या सहलींत डेल्फीजवळच्या एका स्की रिझॉर्टला भेट, तिथे दुपारचं जेवण अश्या गोष्टींत वेळ वाया जातो आणि प्रत्यक्ष डेल्फी बघायला कमी वेळ मिळतो. शिवाय माणशी किमान ९० युरो किंमत. त्यापेक्षा स्वस्तात सार्वजनिक बसने ही सहल करायची असं ठरवलं होतं. आदल्या दिवशीचा संपाचा अनुभव होता, त्यामुळे सकाळी उठून आधी इंटरनेटवर संपाची बातमी वगैरे आहे का बघितलं. बस साडेसात वाजता होती. तयार होऊन पावणेसातला आम्ही निघालो. हॉटेलच्या रिसेप्शनिस्टलाही संपाबद्दल विचारलं. तिने संपाची सूचना अजूनतरी मिळालेली नाही म्हटल्यावर जीव थोडा भांड्यात पडला. न्याहारी सातपासून सुरू होणार होती. पण आम्ही डेल्फीला जातोय कळल्यावर रिसेप्शनिस्टने किचनला कळवून आमची खाण्याची सोय केली. तिला दुवा देत थोडंसं खाऊन घेतलं.

हॉटेलबाहेरच टॅक्सी स्टँड होता. टॅक्सी ड्रायव्हरला मात्र आम्हाला कुठे जायचंय ते कळे ना. ग्रीक भाषेत लिहिलेलं बस स्टँडचं नाव आणि पत्ता दाखवला. नकाशा दाखवूनही उपयोग होईना. पुन्हा आत जाऊन रिसेप्शनिस्टशी बोलले. तिलाही तो बस स्टँड माहित नव्हता. तिने इंटरनेटवर शोधल्यावर सगळा उलगडा झाला. कुर्ला टर्मिनस माहित्येय पण लोकमान्य टिळक टर्मिनस माहित नाही असा प्रकार होता. एकदाचे टॅक्सीत बसून स्टँडवर पोहोचलो. संप असेल तर लगेच परत फिरू असा विचार करून बसचं एकेरी तिकिट काढलं आणि डेल्फीचा प्रवास सुरू झाला. साधारण तीन तासाचा प्रवास. बाहेर तसा अंधारच होता. मग मस्त झोप काढली. दोन तासांनी एक छोटा ब्रेक होता. थोडे पाय मोकळे केले. तिथून पुढे डेल्फीपर्यंत डोंगररांगेतून रस्ता जात होता. बाहेरचं दृश्य पाहण्यात छान वेळ गेला.

.

बसमधून उतरायच्या आधी उजवीकडे अवशेषांचं दर्शन झालं. संप वगैरे नव्हता. डेल्फी म्हणजे छोटंसं गावठाण आहे. स्टॉपसमोरच्या कॅफेत बसचं तिकिट मिळतं. लगेच परतीचं तिकिट काढलं. भूक लागली होती, दिवसभरात खूप चालणंही होणार होतं. मग कॅफेतच अंड्याचा पोळा, पाव आणि कॉफी अशी पोटपूजा केली आणि डेल्फी बघायला सज्ज झालो.

तिथून चालत दहा मिनिटांवर प्रवेशद्वार होतं. आजूबाजूला पर्वतराजी आणि दूर समुद्राचं पाणी असा नजारा पाहून प्रसन्न वाटत होतं.

.

इसवीसनपूर्व आठव्या शतकात डेल्फीला महत्त्व प्राप्त व्हायला सुरूवात झाली. इ.स.पूर्व सातव्या शतकात इथे अपोलो आणि अथेना (Athena Pronaia) या मुख्य देवतांची मंदिरे बांधली गेली. डोंगराच्या मध्यभागी बांधलेल्या अपोलोच्या देवळात जाण्यासाठी डेल्फीच्या प्रवेशद्वारापासून Sacred Way नावाचा मार्ग होता. देवळाच्या मागच्या बाजूला नाट्यगृह (theatre) आणि त्याच्या मागे आणखी उंचावर क्रीडांगण (stadium) होते. या दोन ठिकाणी ऑलिंपिक खेळांसारखे Pythian Games भरवले जात असत.

.संग्रहालयातील अपोलोच्या देवस्थानाचा आराखडा

अपोलोच्या देवळातील मुख्य पुजारिणीला (High Priestess) पिथिया (Pythia) म्हणत असत. भविष्यवेत्ती (Oracle of Delphi) म्हणून पिथियाची हळूहळू ख्याती होत गेली. अपोलो पिथियाच्या माध्यमातून दैवी संकेत देतो अशी श्रद्धा होती. या ओरॅकलचा सल्ला घेण्यासाठी भेटवस्तू घेऊन सर्वसामान्य लोक येत तसेच वेगवेगळ्या राज्यांचे प्रतिनिधीही येत असत. धार्मिक आणि राजकीय महत्त्व वाढत गेले तशीच अपोलोच्या देवस्थानाची संपत्तीही. अनेक नगरराज्यांनी इथे porticoes बांधले, पुतळे उभारले. देवाला समर्पित केलेल्या वस्तू ठेवण्यासाठी किंवा युद्धातील विजयाचे प्रतिक म्हणून treasuries बांधल्या. ओरॅकलची कीर्ती या काळात सर्वदूर पसरली होती. वैभवाच्या शिखरावर असताना डेल्फीतील अपोलोच्या देवळाचा परिसर कसा दिसत असेल याची कल्पना या चित्रावरून येते.

.

त्या २,७०० वर्षे पुराण्या वैभवाच्या खुणा काही इमारतींच्या आणि वस्तूविशेषांच्या रूपात अजूनही शिल्लक आहेत. जिथे फक्त इतस्ततः विखुरलेले दगडधोंडेच उरले आहेत तिथेही गतवैभवाचं चित्र डोळ्यांसमोर सहज उभं राहतं. डेल्फीचे अवशेष दोन भागांत आहेत. एका बाजूला डोंगरउतारावर मुख्य अवशेष आणि वस्तुसंग्रहालय आहे. हा भाग आम्ही आधी पाहणार होतो. रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला दूर डोंगराच्या पायथ्याशी अथेनाच्या sanctaury चे आणि इतर इमारतींचे अवशेष अस्पष्ट दिसत होते.

.

प्रवेशद्वारातून आत जाऊन थोडं चालल्यावर अपोलोच्या sanctaury च्या परिसर समोर आला.

.

अपोलोच्या sanctaury त एक फेरफटका मारून येवू!

.Treasury of the Athenians: सुस्थितीत असलेली डेल्फीतील महत्त्वाची इमारत

.

.इ.स.पूर्व सहाव्या शतकात अपोलोच्या देवळाला आधार देण्यासाठी बांधलेली polygonal भिंत. मागे देवळाचे खांब आणि पुढे Stoa of the Athenians चे अवशेष आहेत. अथेनियन्सनी युद्धात, विशेषतः पर्शियन्सकडून, लूटलेल्या आणि देवाला अर्पण केलेल्या वस्तू Stoa या इमारतीत ठेवत असत. पर्शियाच्या झर्क्सिसला एका लढाईत हरवल्यावर अथेनियन्सनी ही इमारत बांधली.

.

.देवळाचा परिसर

.

.

.परिसरातील एका खांबावरील लेख

.मुख्य देऊळ
.उंचावरून दिसणारं पार्नासस पर्वताच्या कुशीत वसलेलं अपोलोचं देऊळ

.

.थिएटर आणि त्याखाली देवळाचे अवशेष

थिएटर बघून एक चढण चढल्यावर स्टेडियमपाशी आलो. इ.स. पूर्व पाचव्या शतकात इथे एक racing track बनविण्यात आला, प्रेक्षकांना जमिनीवर बसावे लागे. दुसर्‍या शतकात रोमन सम्राट हाड्रियनच्या कार्यकाळात बांधलेलं तीन arches असलेलं प्रवेशद्वार (क्र. २) आणि संगमरवरी आसने अजूनही आहेत.

.स्टेडियमची रचना

.शर्यतीचा १७८.३५ मीटरचा track आणि उजवीकडे arched entrance. साधारण मध्यभागी परीक्षकांची विशेष आसने दिसत आहेत.

.शर्यत संपते ते स्टेडियमचं टोक

आमचीही डेल्फीची अर्धी शर्यत झाली होती. वस्तूसंग्रहालय आणि डोंगर उतरून अथेनाचं देऊळ पाहण्याआधी थोडा श्रमपरिहार केला. समोर दिसणारं डेल्फीचं विहंगम दृश्य साथीला होतंच!

.

(क्रमशः)

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

15 Oct 2017 - 9:31 am | प्रचेतस

जबरदस्त झालाय हा भाग.
डेल्फीचे प्राचीन अवशेष खासच. अपोलो मंदिर टिपिकल ग्रीक शैलीतलं. पर्शियन सम्राट झर्क्सिसचे नाव वाचून '३००' चित्रपट आठवला.

अथेना मंदिरावरील भाग लवकर लिहाच.

निशाचर's picture

15 Oct 2017 - 6:21 pm | निशाचर

धन्यवाद! डेल्फीचं setting ही खूप मस्त आहे. त्यामुळे अवशेष अधिक परिणाम साधतात. इथे सापडलेले बरेच पुतळे, देवाला अर्पण केलेल्या वस्तू वगैरे संग्रहालयात आहेत. त्याबद्दल पुढच्या भागात लिहित आहे.

'३००' मलाही आठवला होता. झर्क्सिस युरोपच्या किनार्‍याला येण्यासाठी pontoons चा पूल बनवत होता. त्या पुलाचा नाश केल्यावर Stoa बांधण्यात आला. Stoa बरोबर पुलाचे दोरखंड, बोटींचे figureheads देवाला अर्पण केल्याचा उल्लेख एका शिलालेखावर आहे.

प्रचेतस's picture

15 Oct 2017 - 8:23 pm | प्रचेतस

शिलालेख रोचक आहे.

निशाचर's picture

16 Oct 2017 - 8:33 am | निशाचर

पुढचा भाग इथे वाचता येईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Oct 2017 - 2:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर सफर. मस्तं फोटो !

निशाचर's picture

15 Oct 2017 - 5:27 pm | निशाचर

धन्यवाद!

अतिशय सुरेख लिहिलंय. फोटोही छान आहेत.

पद्मावति's picture

16 Oct 2017 - 8:13 pm | पद्मावति

तुमची ही लेखमाला पर्वणी आहे वाचकांकरता. हाही भाग सुरेखच.

निशाचर's picture

16 Oct 2017 - 10:26 pm | निशाचर

एस आणि पद्मावति, लेख आवडल्याचं कळवल्याबद्दल आभार!