सफर ग्रीसची: भाग १२ - गूढरम्य डेल्फी २

निशाचर's picture
निशाचर in भटकंती
16 Oct 2017 - 8:24 am

भाग ९ - अथेन्समधील पहिला दिवस
भाग १० - प्राचीन तंत्रज्ञान प्रदर्शन आणि अक्रोपोलिस संग्रहालय
भाग ११ - गूढरम्य डेल्फी १

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या डेल्फीच्या अवशेषांतील अपोलोच्या मंदिराचा परिसर पाहून झाल्यावर अथेनाच्या मंदिराकडे निघालो. दोनअडिच हजार वर्षांपूर्वी इथे अपोलो आणि अथेना या मुख्य देवतांबरोबर इतर काही देवांचीही देवळे होती. ग्रीक संस्कृतीत नाट्यकला, क्रीडा यांनाही खूप महत्त्वाचं स्थान असल्याने डेल्फीत देवळे आणि त्यांच्याशी संलग्न इतर बांधकामांशिवाय खेळ आणि नाट्यकलेशी संबंधित इमारतीही होत्या.

Gymnasium आणि अथेनाची sanctuary

मागच्या भागात बघीतलेल्या थिएटर आणि स्टेडियमबरोबर डेल्फीत खेळाडूंसाठी राहायला जागा, gymnasium, baths अश्या अनेक सुविधा होत्या. रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या अथेनाच्या देवळाकडे जाताना आधी gymnasium दिसले. इ.स.पूर्व चौथ्या शतकात याजागी प्रथम जिम बांधण्यात आले. नंतर इथे नवनवीन सुविधा झाल्या, पुनर्बांधणी करण्यात आली. या जिममध्ये Track and field, कुस्ती, मुष्टियुद्ध यांचा सराव करता येत असे. तरणतलावही होता. वाईट हवामानामुळे बाहेर सराव करणे शक्य नसेल तर बंदिस्त portico ची सोय होती.

.

.

जिम्नॅशियम लांबूनच पाहून डोंगर उतरून अथेनाच्या sanctuary पाशी आलो. प्राचीन काळी अथेन्सहून डेल्फीला येणारे प्रथम अथेनाच्या देवळाशी येऊन पोहोचत. त्यामुळे Athena Pronaia म्हणजे (अपोलोच्या देवळाच्या) आधी असलेली अथेना असं नाव पडलं असावं. या परिसरात असलेले थोलोस (Tholos) प्रकारच्या इमारतीचे दुरूनही दिसणारे तीन खांब हे डेल्फीचे प्रतीक म्हणावे इतके प्रसिद्ध झाले आहेत.

.

.

थोलोस म्हणजे वर्तुळाकार बांधलेली इमारत. ही इमारती जमिनीपासून थोड्या उंचावर असलेल्या गोलाकार पीठिकेवर (podium) बांधलेली असून, पीठिकेवर चढायला काही पायर्‍या असत. डेल्फीच्या थोलोसला पीठिकेवर बाहेरच्या बाजूने बारा डोरिक पद्धतीचे आणि त्यांच्या आत दहा कोरिंथियन पद्धतीचे खांब होते. इ.स.पूर्व तिसर्‍या शतकात बांधलेली ही इमारत डेल्फीतील सगळ्यांत वैशिष्ट्यपूर्ण इमारत असली तरी तिचे प्रयोजन काय असावे याबद्दल काहीही माहिती नाही.

.

थोलोसव्यतिरिक्त या परिसरात अथेनाची विविध कालखंडांत बांधलेली देवळे, treasuries, इतर देवतांच्या वेदी होत्या. आता या इमारतींचे विशेष अवशेष उरलेले नाहीत. खाली दिलेल्या दोन चित्रांवरून या परिसराची रचना लक्षात येते.

.देवळाच्या परिसराचे कल्पनाचित्र

.अथेनाच्या sanctuary चा आराखडा
१) इ.स.पूर्व सातव्या आणि पाचव्या शतकातील डोरिक पद्धतीच्या देवळांचा पाया. २) नंतरचे इ.स.पूर्व चौथ्या शतकातील देऊळ. ३) डोरिक पद्धतीने बांधलेली Treasury. ४) Treasury of Massalia; Massalia अर्थात आताचे फ्रांसमधील Marseille येथे त्याकाळी ग्रीक कॉलनी होती.
५) Tholos प्रकाराची इमारत

.अथेनाच्या sanctuary चा परिसर

sanctuary पासून थोड्या उंचावर असलेल्या एका viewpoint वरून हा सगळा परिसर व्यवस्थित दिसतो. निळसर डोंगरांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारे अवशेष पाहत तिथे थोडा वेळ रेंगाळलो. मग चढण चढून रस्त्यापाशी आलो. आता जायचं होतं वस्तुसंग्रहालय बघायला.

डेल्फी पुराणवस्तुसंग्रहालय

ग्रीसमधील मुख्य पुरावशेषांच्या उत्खननात सापडलेल्या वस्तू जवळच एखाद्या संग्रहालयात मांडून ठेवलेल्या असतात. त्याशिवाय अथेन्सला ग्रीसचं राष्ट्रीय पुराणवस्तुसंग्रहालय आहे, तिथे विशेष महत्त्वाच्या वस्तू पाहता येतात. डेल्फीच्या संग्रहालयातही मंदिरांचे काही अवशेष, पुतळे, देवाला दान केलेल्या किंवा नवस फेडताना दिलेल्या वस्तू इत्यादी ठेवल्या आहेत. त्यातील निवडक संग्रह पाहू.

.
नवसपूर्तीची इ.स.पूर्व आठव्या शतकातील कांश्याची ढाल

.
नवसपूर्तीचं इ.स.पूर्व सातव्या शतकातील कांश्याचं प्राणी कोरलेलं शिरस्त्राण

. .
Naxos बेटावरील लोकांनी दिलेली ही संगमवरी Sphinx एका उंच खांबावर असे. खांब आणि स्फिन्क्स मिळून उंची साडेबारा मीटर होती.

.Siphnian Treasury ची इमारत. सिफ्नोस या एका सोन्याचांदीच्या खाणी असलेल्या संपन्न बेटाची ही Treasury

.
Siphnian Treasury मधील एक पुतळा

.सिफ्नियन ट्रेझरी वरील frieze

.सिफ्नियन ट्रेझरी वरील frieze

.सिफ्नियन ट्रेझरीच्या पूर्वेचं ट्रोजन युद्धाचं मुख्य frieze. यात डावीकडे ट्रोजन्सचं रक्षण करणार्‍या आर्टेमिस, अपोलो, झ्यूस इत्यादी पाच देवता आहेत. झ्यूसची प्रार्थना करणार्‍या अकिलिसच्या आईची आकृती नष्ट झाली असून Achaeans च्या रक्षक देवता अथेना, हेरा, डेमेटर त्यानंतर आहेत. इतर भागात युद्धाचं चित्रण आहे.

.
आर्गोसचं जुळं म्हणून प्रसिद्ध असलेले दोन भावांचे इ.स.पूर्व सहाव्या शतकातील पुतळे

.
लाकूड, सोन आणि हस्तिदंत वापरून बनविलेली, बहुधा अपोलोची, मूर्ती

.अपोलोच्या देवळावरील पूर्वेकडच्या शिल्पांचं कल्पनाचित्र. पुढच्या दोन फोटोत काही शिल्पांचे अवशेष दिसतात.

.अपोलोच्या देवळावरील पूर्वेकडची शिल्पं

.अपोलोच्या देवळावरील पूर्वेकडची शिल्पं

.एका भांड्यावर चितारलेला वाद्य वाजवणारा अपोलो

.
तीन नर्तकींचा खांब

.
'Melancholy roman' या नावाने प्रसिद्ध पुतळा

.
'The Charioteer' या नावाने प्रसिद्ध असलेला कांश्याचा १.८२ मीटर उंच पुतळा. हा सारथी चार घोड्यांच्या रथावर आरूढ असावा. पिथियन खेळात रथांच्या शर्यतीच्या एका विजेत्याने या सारथ्यासह रथ अर्पण केला होता.

शेवटी बघू या डेल्फीच्या एका तत्त्वज्ञाने त्याच्या कुटुंबाच्या वतीने अर्पण केलेल्या पुतळ्यांचा समूह. त्यातील वयस्क तत्त्वज्ञाचा पुतळा पूर्ण आहे. बरोबर त्याची मुलगी आणि पत्नी आहे.

.

संग्रहालयात ठेवलेल्या देवाला अर्पण केलेल्या वस्तू, पुतळे, शिल्पांचे अवशेष यांवरून तत्कालीन डेल्फीच्या संपत्तीची आणि प्रभावाची कल्पना येते. दुरून कष्टप्रद प्रवास करून आलेले भाविक ते वैभव पाहून ओरॅकलला भेटण्याआधीच मंत्रमुग्ध होत असतील का, असा विचार डेल्फीचा निरोप घेताना मनात येत होता.

(क्रमशः)

प्रतिक्रिया

ह्या समृद्ध जुन्या संस्कृतीचे निदान इतके तरी अवशेष शिल्लक आहेत. आपल्याकडे मात्र आनंदीआनंद आहे! असो.

छान सफर सुरू आहे. पुभाप्र.

निशाचर's picture

16 Oct 2017 - 10:54 pm | निशाचर

आणि बरेच शिल्लक अवशेष documented ही आहेत. म्हणजे एखादा पुतळा कोणत्या कारागिराने कुठल्या कार्यशाळेत बनवला, तो कमिशन कुणी केला वगैरे. असं काही बघितलं की आपल्याकडच्या स्थितीशी तुलना स्वाभाविकपणे होते आणि वैषम्यही वाटतं. पण हे सगळं वाचल्या, अनुभवल्याशिवाय कुठला पल्ला गाठायचाय हे तरी कसं कळणार?

प्रचेतस's picture

17 Oct 2017 - 8:09 am | प्रचेतस

भन्नाट.

डेल्फी पुराणवस्तू संग्रहालयातील सर्वच वस्तू देखण्या आहेत. त्यांचे जतन मोठ्या निगुतीने केलेले दिसते आहे. स्फिंक्स, निमियन लायन ह्यांच्या प्रतिकृती विशेष आवडल्या.

निशाचर's picture

19 Oct 2017 - 4:42 am | निशाचर

सिफ्नियन ट्रेझरीच्या frieze चे पहिले दोन फोटो उत्तरेच्या frieze चे आहेत. त्यात देवांची Giants शी लढाई दाखवली आहे. सिंह थेमिसच्या रथाला जोडलेला आहे, तो निमियन सिंह नाही. फोटोंमध्ये शिरस्त्राण घातलेले Giants आहेत आणि बाकीचे देव आहेत. पहिल्या फोटोत डावीकडे हेरा आणि अथेना आहेत. दुसर्‍यात डावीकडून डायोनिसस, रथावर थेमिस आणि मध्यभागी अपोलो व आर्टेमिस आहेत.

मला नक्की आठवत नव्हतं. त्यामुळे थोडं शोधावं लागलं.

कोरिंथच्या जवळ असूनही निमियाला मात्र जायचं राहिलं. निमियन गेम्स ऑलिंपिकएवढे प्रसिद्ध नसले तरी तिथेही काही अवशेष आहेत. ऑलिंपिया, Nestor's palace आणि मेस्सिनी गेल्या वर्षी पाहिलं. त्याबद्दलही शक्यतो लिहायचंय. बघू कधी जमतंय ते.

संग्रहालय छानच आहे. प्रतिसादासाठी आभार!