हे टाळता आले असते? - ४ एरोफ्लोट फ्लाईट -५९३

लाल टोपी's picture
लाल टोपी in जनातलं, मनातलं
20 Nov 2017 - 5:41 am

हे टाळता आले असते?-१ वारिग फ्लाईट २५४
हे टाळता आले असते?- २ एअर कॅनडा फ्लाईट १४३
हे टाळता आले असते? -३ एरोपेरू: फ्लाईट- ६०३

1
२२ मार्च, १९९४ संध्याकाळी ५.४५ ला मॉस्कोच्या शेरेमेटेयो विमानतळावरून हॉंगकॉंगकडे जाणारे विमान रात्री १.०० सुमारास संकटात असल्याची किंवा धोक्याची कोणतीही सूचना दिल्याशिवाय अचानक रडार वरुन नाहीसे झाले आणि काही तासांतच स्पष्ट झाले की हे विमान कुझनेट्स्क अलताउ पर्वत रांगांत कोमेरोओ ओब्लास्ट येथे कोसळून सर्व ६३ प्रवासी आणि १२ कर्मचारी यांच्यापैकी कोणीही बचावले नव्हते.

एरोफ्लोट ही रशियन सरकारची अधिकृत एअर लाइन १९९४ मध्ये ब-याच सुधारणा करीत होती. संपूर्ण राशियातच बदल घडत होता १९९० मध्ये सोवियत युनियनचे विघटन झाल्यानंतर सर्वच क्षेत्रात बदलांचे वारे वहात होते. जुनाट रशियन बनावटीची विमाने बदलून त्यांच्या जागी अमेरिकन बनावटीची प्रवाशांमध्ये लोकप्रिय असणारी आधुनिक विमाने येत होती. १९९२ मध्ये इ- ३१०-३०४ एअर बस एरोफ्लोटच्या ताफ्यात दाखल झाल्या होत्या. त्यापैकी एक असणारे हे अपघातग्रस्त विमान केवळ अडीच वर्षापुर्वीच सेवेत दाखल झाले होते ५००० तासांचा प्रवास पूर्ण केलेले होते. या विमानात कोणताही तांत्रिक दोष यापूर्वी आढळून आला नव्हता.

विमानातील ६३ प्रवाशांपैकी बहुसंख्य प्रवासी रशियातील बदलत्या आर्थिक आणि राजकीय परिस्थितीत व्यवसायाच्या नव्या संधी शोधणारे चीन आणि तैवानचे व्यावसायिक, उद्योजक होते तर काही प्रवासी एरोफ्लोट देत असलेल्या युरोपच्या अनेक ठिकाणांहुन आशियाला जोडणा-या स्वस्त प्रवास योजनांचा लाभ घेत होते.

या नव्या को-या विमानांसाठी सेवेतल्या सर्वोत्तम वैमानिक निवडून प्रशिक्षित केलेले होते. त्यामुळे तांत्रिक आणि मानवी दोन्ही दृष्टीने सुयोग्य असणा-या विमानाचा हा अपघात चक्रावणारा होता. त्यातच विमानाच्या कॉकपिट मध्ये किमान एक किशोर वयीन मुलाचा मृतदेह आढळून आला होता ही देखील बुचकळ्यात टाकणारी घटना होती.

कॉकपिट व्हाइस रेकॉर्डर चांगल्या स्थितीत मिळाल्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळण्याची शक्यता होती. ध्वनि मुद्रित आवाज ऐकले गेले आणि अपघाताचे कारण क्षणात स्पष्ट झाले.

वर्षातून एकदा एरोफ्लोटचे कर्मचारी आपल्या कुटुंबियांना सवलतीच्या दरात प्रवासाला घेऊन जाऊ शकत असत. अपघात ग्रस्त विमान लांबपल्ल्याचे असल्यामुळे यात दोन वैमानिक आणि दोन सह वैमानिक होते. मॉस्कोहुन उड्डाणापासून सुरुवातीचे सुमारे सहा तास मुख्य वैमानिकाने काम पाहिल्यावर तो विश्रांतीसाठी गेल्यावर आता प्रवासाच्या पुढच्या टप्प्यासाठी यारोस्लाव कूदरिंस्की प्रभारी वैमानिक होता. आज च्या प्रवासात त्याच्या बरोबर १२ वर्षाची मुलगी याना आणि १६ वर्षाचा मुलगा एल्डर प्रवासात करीर होते. दोन्ही मुलांचा हा पहिलाच परदेश प्रवास होता. प्रवासी कक्षात या मुलांसोबत कूदरिंस्कीचा सहकारी वैमानिक, शेजारी आणि मित्र असणारा व्ही. मकारोव्ह हा होता. या प्रवासात मात्र तो सुटीवर निघालेला प्रवासी होता.

कूदरिंस्की आपले काम पाहू लागल्यावर काही वेळातच मकारोव्ह दोन्ही मुलांना घेऊन कॉकपिट मध्ये पोहोचला. ९ -११ ची घटना घडण्यापूर्वी कॉकपिट मध्ये कोणी जावे आणि कोणी जाऊ नये या बाबतचे नियम फारसे काटेकोरपणे पाळले जात नसत.

आता कॉकपिट मध्ये वैमानिक कूदरिंस्की, सह वैमानिक पिस्कारेव्ह, मकारोव्ह आणि दोन मुले ऐसे पांच जण होते. सर्व नियम धाब्यावर बसवून कूदरिंस्कीने त्याच्या १२ वर्षाच्या मुलीला वैमानिकाच्या खुर्चीवर बसवले. विमान ऑटो पायलट वर असल्याने वेग, ऊंची, दिशा यांची काळजी आपोआप घेतली जात होती. नियंत्रण करणारी स्टिक यानाच्या हातात देऊन टीला केवल आपण विमान चालवत आहोत असा आभास करून दिला प्रत्यक्षात विमान ऑटो पायलाटच नियंत्रित करीत होते. १५ मिनिटे हे काम केल्यानंतर आता एल्डर चा नंबर होता. बराच वेळ तो वाटच पहात होता. आपल्या बहिणीपेक्षा एल्डर ने नियंत्रण करणारी स्टिक जास्त वेळ आणि जास्त ताकदीने वापरली. त्याचा परिणाम म्हणून विमानाच्या ऑटो पायलटची डावी उजवी कडे वळण्यासाठी असणारी एलरोंन व्यवस्था ऑटो पायलट मधून मुक्त झाली इतर त्यामुळे विमानाचे डाव्या उजव्या बाजूला वळणे हे वैमानिकाच्या हातात आले होते. मात्र ऑटो पायलटची इतर कामे सुरळीत चालू असल्यामुळे आणि रशियन बनावटीच्या विमानांमध्ये ऑटो पायलट पूर्णत: किंवा अंशत: बंद झाल्यास तशी सूचना बझर वाजून मिळत असे मात्र एयरबस मध्ये केवळ एक दिवा प्रकाशित होऊन सूचना देत असे त्यामुळे जुन्या रशियन विमानांची सवय असणा-या वैमानिक किंवा सह वैमानिकाच्या ही महत्त्वाची गोष्ट लक्षात आली नाही.

विमान सतत उजवीकडे वळत असल्याचे सर्वप्रथम वैमानिकाच्या खुर्चीवर बसलेल्या एल्डरच्या लक्षात आले. विमान वळत असल्याने नविन फ्लाईट प्लान समोर दिसत होता आणि अजुन विमान वळत असल्याने संभाव्य प्लान १८० अंशाच्या कोनात असल्याचे दाखवत होता. विमान उतारण्याची वाट पहात असतांना ज्याप्रमाणे १८०च्या कोनात फिरत रहाते त्याप्रमाणे आताची स्थिति (होल्डिंग पॅटर्न) दिसत होती. विमान एका बाजूला का वळत आहे असे एल्डरने आपल्या वडिलांना विचारले त्यावेळी देखील कूदरिंस्कीने अगदी सहजपणे विमान स्वत्:हुन वळत आहे का? असे विचारल्याचे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये ऐकू येते.

दोन्ही वैमानिक या ठिकाणी गोंधळल्याने पुढचे ९ सेकंद पूर्ण शांतता आहे. मात्र या काळात ४५ अंशा पेक्षा जास्त; जवळपास ९० अंशा पर्यंत उजवीकडे झुकले होते. मात्र कोणत्याही बाजूला इतका जास्त झुकाव सहन करण्याच्या क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक होता. आशा स्थितीत विमान आपली उंची कायम राखू शकत नाही त्यामुळे ते वेगाने जमिनीच्या दिशेने घसरू लागले. या घसरण्याच्या या वेगामुळे आणि विमान इतक्या कललेल्या स्थितीत असल्यामुळे वैमानिक आणि इतर कर्मचा-यांना गुरुत्वाकर्षणाच्या ताकदीमुळे आपल्या स्थितीत रहाणे अशक्य तर झालेच पण कूदरिंस्कीला आपल्या मुलाला बाजूला सारून वैमानिकाच्या खुर्ची पर्यत पोहोचणे अशक्य झाले.

प्रसंग अतिशय गंभीर होता ही परिस्थिति हाताळण्यासाठी प्रशिक्षित आणि अनुभवी वैमानिकाची गरज होतो. मात्र या आणीबाणीच्या प्रसंगी मुख्य वैमानिक आपल्या खुर्ची पासून दूर होता विमानाचे नियंत्रण १६ वर्षाच्या मुलाच्या हातात होते. त्यामुळे आशा स्थितीत विमानावर नियंत्रण मिळवणे अवघड नव्हे अशक्य होत होते. विमान स्थिर करण्यासाठी ऑटो पायलट कारवाई करत होते (एलरोंन व्यतिरिक्त ऑटो पायलट कार्यरत होते) त्यामुळे विमानाची पुढची बाजू वर उचलली जावून वेग वाढवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र आता परिस्थिति नियंत्रणा बाहेर जात होती.

मात्र सर्व परिस्थिति नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर ऑटो पायलट बंद झाले. आणि विमान पुढची बाजू सरळ जमिनीच्या दिशेने होवून विमान वेगाने कोसळू लागले. परंतु सहवैमानिकाने विमानावर नियंत्रण मिळवून पुढची बाजू पुन्हा वर वळवण्यात यश मिळवले पण आता वरची बाजू जास्तच वर उचालल्या गेल्यामुळे पुन्हा विमान पुन्हा कोसळू लागले. अगदी शेवटच्या क्षणी वैमानिक आपल्या खुर्ची वर पोहोचण्यास यशस्वी झाला होता आणि दोन्ही वैमानिकांनी विमानावर नियंत्रण मिळवले होते परंतु तोपर्यंत खूपच उशीर झाला होता आता उंची फारच कमी झाली होती आणखी उंची गाठण्यापूर्वी समोर आलेल्या अलताउ पर्वत रांगांत कोसळले.

लगेचच झालेल्या चौकशीत आढळून आले की , विमानाचे अवशेष दूर पर्वत रांगात विखुरलेले होते. विमानाचे लैंडिंग गियर उतरण्याच्या स्थितीत नव्हते, प्रवासी आणीबाणीच्या वेळी जसे खुर्चीचे पट्टे बांधलेले असतात त्या स्थितीत होते. संकटात असल्याच्या कोणताही संदेश पाठवाला गेला नव्हता. दोन्ही वैमानिकांनी विमान कोसळण्या पासून वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केल्याचे दिसून येत होते. चौकशी करणा-या तज्ञांच्या मते त्यांनी केवळ योग्य दिशा देऊन बाकी सर्व ऑटो पायलट वर सोडले असते तार कदाचीत हा अपघात टाळता आला असता.

2

सुरुवातीला विमान कंपनीने कॉकपिट मध्ये मुलांना प्रवेश दिल्याचे साफ नाकारले; असा काही प्रकार घडला असल्याचे कंपनीने ठामपणे नाकारले पण रशियाच्या एका वर्तमानपत्राने कॉकपिटमधील संपूर्ण संभाषणच प्रकाशित करून करून कंपनीचे म्हणणे पूर्णत: खोडून काढले.

अपघाताच्या दुस-या दिवशी विमानाचे ब्लेक बॉक्स मिळाले. काही दिवसा नंतर प्रवाशांच्या नातेवाईकांना हेलिकॉप्टरने अपघात स्थळी नेण्यात आले चीनी नागरिकांनी आपल्या नातेवाईकांसाठी संदेश लिहिलेलेले कागद खाली टाकले तर इतर मृतांच्या नातेवाईकांनी फुले टाकली.

अशा प्रकारच्या अपघातांनंतर ती घटना घडण्यास कारणीभूत ठरलेल्या कारणांचा अभ्यास करून त्यावर उपाय योजिले जातात, काही नियम तयार केले जातात. या अपघातानंतर नेमके काय बदल केले गेले याविषयी शोध घेऊनही काही माहिती मिळाली नाही.

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

20 Nov 2017 - 10:43 am | मराठी_माणूस

भयंकर.
मुलां साठी सगळ्या प्रवाशांचे जीव धोक्यात घालण्यचा केव्हढा हा बेजबाबदारपणा .
श्वानांना / लहान मुलांना ड्रायव्हर सिट वर मांडीवर ठेउन गाडी चालवणारे महाभाग पाहीले आहेत त्याची आठवण आली.

एस's picture

20 Nov 2017 - 1:17 pm | एस

भयंकर!

मराठी कथालेखक's picture

20 Nov 2017 - 5:27 pm | मराठी कथालेखक

एकट्या सहवैमानिकाकडून विमान पुर्णपणे नियंत्रित होवू शकत नाही का ?

लाल टोपी's picture

21 Nov 2017 - 11:18 pm | लाल टोपी

किमान या अपघतासंदर्भात हा प्रश्न येत नाही कारण विमान सुरक्षीत उड्डाण क्षमतेपेक्षा खूपच जास्त एका बाजूला झुकत गेले होते. मात्र हे योग्य वेळी कोणाच्याच लक्षात आले नाही जेव्हा हे लक्षात आले तेव्हा खूप उशीर झाला होता. त्यावेळी जर दोन्ही वैमानिकांनी एकत्र प्रयत्न करुन अपघात टाळण्याचा प्रयत्न केला असता मात्र तसे करण्यासाठी वैमानिक आपल्या जागेवर नव्हता. त्या

Nitin Palkar's picture

20 Nov 2017 - 7:04 pm | Nitin Palkar

अतिशय सुंदर मालिका! पुलेशु.

खास निवडक केसेस घेतल्या आहेत या सीरीजमधे. अभिनंदन.. येऊदेत आणखी केसेस आणि रिपोर्ट्स.

सान्वी's picture

21 Nov 2017 - 9:57 pm | सान्वी

सर खुप छान लिहीताय तुम्ही. काही वर्षांपुवी झालेल्या मलेशियन एअरलाइंस च्या अपघाताबद्दल पण लिहा.

लाल टोपी's picture

21 Nov 2017 - 11:50 pm | लाल टोपी

या विषयावर मिपावर खूप विस्तृत चर्चा झाली आहे 'एम एच ३७० फ्लाईट डीलेड' या धाग्यावर, त्या धाग्याची लिंक शोधली पण सापडली नाही. कोणी मदत करु शकेल का?

हो.. गविंचा लेख होता. त्या धाग्याची लिंक ही आहे. पण काही कारणाने धागा दिसत नाहीये.

फारच जबरी चालली आहे ही मालिका.. अगदी माहितीपूर्ण!
आवडत आहे असं तरी कसं म्हणावं? दर वेळी 'वन ड्रॉप किल्स मेनी' आठवतं..

लाल टोपी's picture

22 Nov 2017 - 1:53 am | लाल टोपी

हो मलाही ही लिंक उघडता आली नाही गविंचे सगळे लेखन पाहीले तर तेथेही हा लेख सापडला नाही.

हो का? ठिक आहे. माझ्या वाचनात आल्याचे आठवत नाही.
आपणास पुलेशु.

दीपक११७७'s picture

23 Nov 2017 - 1:05 pm | दीपक११७७

हा भाग ही छान झाला
पुभालटा