चला हवा येऊद्या.

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
7 Nov 2017 - 12:01 pm

सोमवार आणि मंगळवार आला की संध्याकाळी ऑफिसमधून आल्याबरोबर लवकर जेवण आणि कामे उरकण्याची लगबग चालू होते. कारण ह्या दोन दिवसांत आमच्या एकत्र कुटुंब पद्धतीतील अख्ख्या कुटुंबाची हास्य विनोदाचा आस्वाद घेण्यासाठी हॉलमधील टीव्ही समोर बैठक बसणार असते. घरातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत एकत्रित बैठक जुळवून देणारा कार्यक्रम म्हणजे झी टीव्ही वर ९.३० ते १०.३० ला लागणारा चला हवा येऊद्या हा मनोरंजनात्मक कार्यक्रम. तसं टीव्ही वर माझ्या मुली श्रावणी, राधा आणि पुतण्या अभिषेक यांच राज्य असत व ते आपल्या वयानुसार लागणारे कार्यक्रम पाहत असतात. पण चला हवा येऊद्या ह्या कार्यक्रमासाठी मात्र ते आम्हाला टीव्हीचे राज्य एक तासासाठी घरातील सगळ्यांसाठी खुले करून सगळ्यांना सामावून घेतात. ह्या कार्यक्रमाचा आस्वाद एकत्रपणे घेतल्याने ह्या कार्यक्रमाबद्दल मनात एक मानाचे स्थान निर्माण झाले आहे.

तसं झी मराठी म्हणजे मनोरंजनाचा एक उत्तम खजिना आहे. ह्या खजिन्यातील सगळ्यात मौल्यवान रत्न म्हणजे चला हवा येऊद्या ही मालिका. आठवड्यातील दोनच दिवस लागणारी ही मालिका आठवडाभरच मनोरंजन प्रेक्षकांच्या पोतडीत भरून देते. ह्या मालिकेतील सगळेच कलाकार त्यांच्यातील मौल्यवान कलेच जीव ओतून सादरीकरण करत असतात. प्रेक्षकांच निखळ मनोरंजन करून आम्हा प्रेक्षकांचा दिवसभराचा थकवा, ताण-तणाव दूर करण्यात ही मालिका यशस्वी झाली आहे. ह्या मालिकेचे सूत्रधार निलेश साबळे हे डॉ. असल्याने ते प्रेक्षकांच्या नसा ओळखून प्रेक्षकांना दर्जेदार मनोरंजनाचे हास्यमय डोसच देत असतात. डॉ. निलेश साबळे यांना प्रसंगावधानाने कलाकार, येणारे मान्यवर व प्रेक्षक यांच्यात समांतर दुवा साधण्याची सूत्रसंचालनाची कला अवगत आहे त्यामुळे कार्यक्रमात कुठेही विचका होताना दिसत नाही तर कार्यक्रम अजून हवा हवासा वाटतो. सूत्रसंचालना बरोबरच त्यांचा कार्यक्रमातील एखाद्या नकलेचा अभिनय हा कार्यक्रमाचा बोनस मनोरंजन ठरतो. लेखन, सादरीकरण, सूत्रसंचालन तसेच अशा हुबेहूब नकला करणे ही तर दैवी देणगीच म्हणावी लागेल.

चला हवा येऊद्या ह्या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराकडे उत्तम विनोद करण्याची कला आहे. ह्या कलाकारांच्या टीम मध्ये श्रेया बुगडे ही एकटीच स्त्री कलाकार असून तिचा स्टेज वरील वावर आणि अभिनय इतका बिनधास्त असतो की त्या बिनधास्तपणातून तिचा अभिनय जास्त खुलतो. तिची एंट्री म्हणजे चला हवा येऊद्याच वादळच जणू. तिच्या बोलक्या नजरेतही अभिनय ठासून भरला आहे.

चला हवा येऊद्याच मुख्य नायक म्हणजे भाऊ कदम. भाऊ कदम ही व्यक्ती स्टेजवर उभी राहिली तरी प्रेक्षकांना हसू येत. भाऊचे सगळ्याच पात्रातील अभिनय अगदी सहज आणि नैसर्गिक असतात. कुठेही दुसर्‍याने हसावं म्हणून ओढाताण नसते. त्यामुळे त्याने केलेल्या विनोदांवर लोक मनापासून पोटभरूनं हसतात. भाऊचा शांताबाई बनून केलेला अभिनय हा दाद देण्यासारखा आहे.
माझी पाच वर्षाची मुलगी राधाही भाऊ कदमला नावाने ओळखते व कुठेही भाऊ हे नाव घेतलं की ती पुढे कदम लावते इतका आमच्या घरात चला हवा येऊद्याच पगडा बसला आहे.

सागर कारंडे हा कलाकारही अष्टपैलू आहे. त्याच्या विविध अभिनयांतून तो प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतो, मग तो पोस्टमन काकातील भावनिक अभिनय म्हणा, साडीमधील विनोदी स्त्री अभिनय म्हणा की नाना पाटेकरांची नक्कल म्हणा. अनेकदा तो आपल्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांना पोटभर हसवून पोस्टमन काकांच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे डोळे पाणावतो.

कुशल बद्रीकेची एंट्रीच हास्याचा लोट घेऊन येतो. त्याचा संपूर्ण अभिनय विनोदी असतो. त्याचे हाव-भाव, नकला, कुठल्याही वेषातील अभिनय निखळ विनोदी मनोरंजनाचा स्पोट असतो.

भारत गणेशपुरे ह्या कलाकाराची विदर्भातील बोली ही विनोदा बरोबर भाषेतील गोडी निर्माण करते. थुकरटवाडीतील सरपंच, दारूड्या ह्या त्यांच्या भूमिका सगळ्यांनाच आवडतात. किर्तनाद्वारे सामाज जागृती करण्याची कलाही ह्या कलाकारामध्ये आहे.

प्रत्येक कलाकाराकडे हसविण्याचे वेगवेगळे स्किल आहे. कोणाच्याही विनोदात अतिशयोक्ती नसते. स्त्री पात्र करणार्‍या पुरुषांचा अभिनय अगदी हुबेहूब असतो आणि विशेष म्हणजे त्यात इतर कार्यक्रमात दाखवतात तसा फाजीलपणा नसतो ह्या मालिकेतील साइड अ‍ॅक्टरही कधी कधी खूप हसवतात. त्यातील जाडा पिंकी आणि सरड्यासारखे केस असणारा पात्र हे तर मुलांचे आवडीचे झाले आहे. कार्यक्रमाला प्रसंगानुसार म्युझिक, आवाज देणार्‍या कलाकारांचे कौतुक वाटते. ह्या आवाजांमुळे, म्युझिक मुळेच अभिनय जास्त रंगतो. सगळ्यात जास्त कौतुक वाटत ते वेषभूषा करणार्‍या वेषभूषाकारांच. एखादं पात्र किती हुबेहूब नटवून देतात ते. ओळखावे लागतच नाही की हा कलाकार कोणाची नक्कल करणार आहे ते.

कार्यक्रमाची रूपरेखाही व्यवस्थित मांडलेली असते. येणारे चित्रपट व नाटके यांची टीम ह्या मालिकेत आणून त्यांची ओळख करून दिल्याने आम्हा प्रेक्षकांना येणार्‍या चित्रपटांची, नाटकांची व त्यातील कलाकारांची माहिती होते व त्या नाटक, जाहीरातही उत्तम पद्धतीने होते. झी वरीलच रोज घरात वावरणार्‍या मालिकांतील कलाकार जेव्हा आपल्या मालिकेच्या टीम सोबत येतात तेव्हा त्या भागात एक आपलेपणा जाणवतो आणि त्यांची मिमिकरी केली जाते तेव्हा निर्माण होणारा हास्यस्पोटस्फोट हा अवर्णनीय असतो. चला हवा येऊद्याचे विशेष भागही खरंच विशेष मनोरंजनात्मक असतात. कार्यक्रमात उभारलेली ठुकरटवाडी नियमित दाखवत असले तरी तिचा कधीच कंटाळा येत नाही उलट ती कधी अवतरेल ह्याची वाट पाहिली जाते. येणार्‍या कलाकार पाहुण्यांना खेळ खेळवून त्यांचेही मनोरंजन केले जाते. ते स्टेजवर खेळत असतात पण चढाओढ प्रेक्षकांच्या मनातही होत असते.

ह्या कार्यक्रमाचा आत्मा म्हणजे स्टेज. प्रसंगाला धरून पाठी उभे केलेले सीन त्या प्रसंगाला एकरूप करण्यात स्टेजचा मोलाचा वाटा असतो. ह्या कार्यक्रमात उभारलेल्या सीन मुळे कार्यक्रमाला चेतना निर्माण होते. मग त्यात सैराट साठी उभारलेली विहीर असो, प्रेस कॉन्फ़रन्स साठी केलेली बैठक असो की इतर स्थळांचे सीन असोत ह्या मालिकेत जीव आणतात.

हा कार्यक्रम आवडण्यामागे अजून एक कारण म्हणजे ह्या कार्यक्रमाने जपलेली सामाजिक बांधिलकी. चांगले सामाजिक कार्य करणार्‍या संस्था व व्यक्तींना ह्या कार्यक्रमाने मदत, सन्मान देऊन त्यांना लोकांपर्यंत पोहोचवले आहे. ठुकरटवाडीत एकाच बुकेने केलेला पाहुणचार ह्यामागेही निसर्गाच्या घटकांची अनावश्यक लूट नसावी हाच असावा. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची लागवड व्हाही ह्या उद्देशाने सर्व मान्यवरांना गिफ्ट म्हणून कार्यक्रमाच्या शेवटी झाडांची रोपे दिली जातात. म्हणजे दर आठवड्याला कमीत कमी ७-८ झाडांची लागवड ह्या कार्यक्रमामार्फत होऊन हरीत क्रांती होण्यास मदत होत आहे चला हवा येऊद्या मध्ये कधीच राजकारण दिसले नाही. फक्त निखळ मनोरंजनच ह्या मालिकेमार्फत मिळते.

आता वैयक्तिक पातळीवर म्हणाल तर हा कार्यक्रम म्हणजे आजच्या युगातील आम्हा नोकरी-व्यवसायाच्या धावपळीत त्रस्त असणार्‍यांसाठी एक वरदानच आहे. माझ्या मिस्टरांचा वकिली पेशा व समाज कार्य, माझी नोकरीची-घरातील धावपळ, जाऊबाईंच्या दिवसभराच्या घरातील जबाबदार्‍या, दिरांचे नोकरी, घरातील वडीलधार्‍यांच्या स्वास्थतेच्या चिंता, मुलांचे अभ्यासाचे दडपण ह्या पासून आम्हा लहान थोर सगळ्यांनाच चला हवा येऊ द्या ह्या कार्यक्रमातून थोडा चेंज मिळून आमच्या मनावरचे ताणतणाव दूर होतात. ह्या टीम मुळे आम्ही मनापासून खळखळून हसतो व आमचे एक तासाचे निखळ मनोरंजन होते. ह्या एक तासामुळे दिवसभराचा थकवा दूर होतो व आठवडाभरासाठी उत्साह निर्माण होतो. त्यामुळे चला हवा येऊद्याच्या पडद्यावरच्या व पडद्या मागच्या पूर्ण टीमचे मनापासून आभार. पण कालच्या इपिसोडमध्ये कळले की हवा येऊद्या हा कार्यक्रम काही काळासाठी बंद होणार आहे तेव्हा खिन्न वाटल. पण थोड्या विश्रांतीने नव्या जोमाने हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी येणार आहे हे ऐकून समाधान वाटले. हा कार्यक्रम इतक्याच दर्जेदारपणे पुढे चालू राहूदे ह्यासाठी मनापासून शुभेच्छा.

सौ. प्राजक्ता प. म्हात्रे.

मौजमजालेख

प्रतिक्रिया

रामदास२९'s picture

7 Nov 2017 - 12:32 pm | रामदास२९

खरय .. 'चला हवा येऊ द्या' बन्द का करत आहेत हे कळत नाही ..

ही विश्रांती काही दिवसांची असणार आहे. काहीतरी नवं करण्यासाठी हा काही क्षणांचा दुरावा असल्याचेही loksatta madhil batmit सांगितले आहे.

भारत गणेशपुरे ह्या कलाकाराची विदर्भातील बोली ही विनोदा बरोबर भाषेतील गोडी निर्माण करते. थुकरटवाडीतील सरपंच, दारूड्या ह्या त्यांच्या भूमिका सगळ्यांनाच आवडतात. किर्तनाद्वारे सामाज जागृती करण्याची कलाही ह्या कलाकारामध्ये आहे.
मला ह्या लाईन वर अ‍ॅड करायच्या होत्या.

माम्लेदारचा पन्खा's picture

7 Nov 2017 - 1:01 pm | माम्लेदारचा पन्खा

अति होतं सगळं . . . . . . . काही ताळतंत्र नको काय ? तेच तेच बाष्कळ विनोद . . . . किती फुटेज खायचं ??

काही इपिसोड होतात कंटाळवाणे पण इतर कॉमेडी कार्यक्रमांपेक्षा हा कार्यक्रम चांगला वाटातो.

धर्मराजमुटके's picture

7 Nov 2017 - 1:41 pm | धर्मराजमुटके

चला हवा येऊद्या कार्यक्रम चांगला आहे. पण त्यात नेहमी एक बुटके पात्र घेऊन त्याच्या शारिरीक व्यंगाचा आधार घेऊन केले जाणारे विनोद हे चीड आणणारे प्रकरण आहे. तेवढे एक सोडले तर कार्यक्रम बर्‍यापैकी निरागस आणि कुटुंबाने एकत्र बघून बसण्यासारखा आहे.

तसाच प्रकार कपीलच्या शोमधे आहे. सुमोनाच्या शारीरीक ठेवणीवरुन कपील नेहमी किळसवाणे विनोद करतो ते अजिबात आवडत नाहित. हा कार्यक्रम कधीच पाहत नाही मात्र अधून मधून युट्युबवर २-३ मिनिटे कधीकधी नजरेखालून घालणे होते.

अर्थात त्या त्या कलाकारांना स्वतःवर विनोद करुन घ्यायचे पैसे मिळतात व त्यात त्यांचे समाधान होते त्यामुळे आपल्याला चीड येऊन काय फायदा म्हणा !

चला हवा येऊद्या कार्यक्रम चांगला आहे. पण त्यात नेहमी एक बुटके पात्र घेऊन त्याच्या शारिरीक व्यंगाचा आधार घेऊन केले जाणारे विनोद हे चीड आणणारे प्रकरण आहे.

सहमत

नाखु's picture

8 Nov 2017 - 8:46 am | नाखु

सहमत,जुना सवंगडी बदलतानाही नवीन बुटकाच घेतला तेंव्हा उघडपणे जाणवलं

बरेचदा बळेच हसणं (अतिरंजित) पाहुण्यांना अनिवार्य असते असं दिसतंय

हवापालट विश्वास असलेला नाखु रेडिओवाला

चौथा कोनाडा's picture

7 Nov 2017 - 5:21 pm | चौथा कोनाडा

सुरेख रसग्रहण जागूतै !

काही रिपीट विनोद, बाष्कळ किस्से सोडले तर बहुतेक सर्व भाग आवडले !
आम्ही देखिल हा कार्यक्रम सहाकुटुंब पहात असतो.
यातला एक एक कलाकार म्हंजे अष्टपैलू अभिनयातले दिग्गजच !
कार्यक्रम संपणार आहे याची चुटपुट आहेच, याच्या अनुपस्थितीने काही आठवडे चुकचुकल्या सारखेच होणार !

चहयेद्या च्या सर्व अतरंगी कलाकारांना सलाम !

मित्रहो's picture

7 Nov 2017 - 10:02 pm | मित्रहो

चला हवा द्या चा मुख्य उद्देष होता मराठी चित्रपट आणि नाटकाला प्रचारासाठी एक प्लॅटफॉर्म देणे. हा उद्देष नक्कीच सफल झाला.झीच्या सिनेमांनी तर याचा खूप फायदा उचलला. कट्यार तर तीन दिवस वाजत होता. काही नाटकांना तर खरच बऱ्यापैकी फायदा झाला. नाटके लोकांपर्यंत पोहचवायला वृत्तपत्रांशिवाय पर्याय नव्हता.
इतर विनोदी कार्यक्रमाकडे बघितले तर चला हवा द्या क्लासिक वगेरे म्हणावे लागेल. मुख्यतः त्यांचा कल मॅड कॉमेडीकडे असतो आणि मस्त जमले.

चौथा कोनाडा's picture

8 Nov 2017 - 6:15 pm | चौथा कोनाडा

<< काही नाटकांना तर खरच बऱ्यापैकी फायदा झाला.
नाटके लोकांपर्यंत पोहचवायला वृत्तपत्रांशिवाय पर्याय नव्हता.>>

हे यश दुर्ल़क्षण्यासारखं नक्कीच नाही !

रमेश आठवले's picture

7 Nov 2017 - 10:03 pm | रमेश आठवले

'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम बंद होणार व त्याच्या जागेवर ' सा रे ग मा ' येणार हे वाचून हायसे वाटले. चला मधील तोच तोच पणा, सुमार विनोद , आचरटपणा , निलेश चे किंचाळणे आणि स्वतःच्या नाटक सिनेमांचे प्रमोशन करण्यासाठीच आलेल्या पाहुण्यांचे शिकवल्या प्रमाणे कृत्रिम आणि अवास्तव हसणे, या सर्वांचा उबग आला होता.

अभिदेश's picture

7 Nov 2017 - 10:08 pm | अभिदेश

सुमार दर्जा , लोकांच्या व्यंगावर , रंगावर विनोद , तोचतोचपणा .... हे सगळं बघण्यापेक्षा सरळ इंडिया टीव्ही बघा , भरपूर मनोरंजन.

अभिजीत अवलिया's picture

8 Nov 2017 - 10:16 am | अभिजीत अवलिया

सहमत.

र्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. सगळ्यांच्या विविध मतांचे स्वागत.

तिमा's picture

8 Nov 2017 - 9:42 pm | तिमा

चला हवा येऊ द्या, हा कार्यक्रम काही मित्रांच्या सांगण्यावरुन पाहिला होता काही दिवस. पण लवकरच ते सगळे उबगवाणे वाटू लागले. विशेषतः पाहुणे म्हणून आलेले नाटकातले कलाकार, इतक्या सुमार विनोदांना इतके कसे हंसू शकतात, याचे आश्चर्य वाटायचे. खरं तर त्यातले कलाकार हे उत्तम अभिनय येणारे आहेत. पण आजकाल, विनोदाचा दर्जाच इतका घसरलाय, की ते तरी काय करणार ? त्यांनाही रोजीरोटी आहेच की.
हल्ली मराठी वा हिंदीतले सो कॉल्ड विनोदी कार्यक्रम बहुतेक याच मार्गाने जाणारे वाटतात. विनोद आवडतो पण तो उच्च दर्जाचा असला तरच.
वार्‍यावरची वरात मधली रविवारची सकाळ पहाताना अजूनही कंटाळा येत नाही, फक्त कालमानाप्रमाणे ती आता कालबाह्य वाटू शकते.

भारत गणेशपुरे सोडला तर एकही काही खास नाही,कुशल एकदम बोर. भाई कदम पर्याप्त वेळा कमरेखालचे जोक मारतो. उबगवाणे वाटत होतं.

भारत गणेशपुरे सोडला तर एकही काही खास नाही,कुशल एकदम बोर. भाई कदम पर्याप्त वेळा कमरेखालचे जोक मारतो. उबगवाणे वाटत होतं.